‘And the Band Played On’ - एड्स, राजकारण आणि समाजकारण
१९८३ साली सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होतो तेव्हा एका विद्यार्थ्याने आमच्या साप्ताहिक सेमिनार मध्ये एड्स या विषयावर एक प्रेझेंटेशन केले होते. ही एड्स या विषयाशी पुसटशी ओळख होती.
भारतात एड्स आला (किंवा पहिल्यांदा आल्याचे कळले) तो १९८६ मध्ये.
पुण्यात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही राष्ट्रीय संशोधन संस्था १९९२ साली स्थापन झाली.
'अँड द बँड प्लेड ऑन' हे पुस्तक वाचेपर्यंत एड्स साथीच्या इतिहासाबद्दल संकलित आणि सखोल असे काहीही वाचनात आले नव्हते. पुस्तक खूप सखोल आणि व्यापक आहे. एका रोगाची साथ अमेरिकेत कशी पसरत गेली, कशी पसरवू दिली गेली याचा उत्तम आढावा या पुस्तकात दिला गेला आहे.
या आजाराची साथ अमेरिकेत जरी १९८० च्या दशकात सुरू झाली असली तरी हा आजार सेंट्रल ट्रॉपिकल आफ्रिकेत यापूर्वीही अस्तित्वात होता. एड्सची एक ज्ञात केस म्हणजे डेनिश डॉक्टर ग्रेटन रास्क यांची. या डॉक्टर, कॉंगो ( तत्कालीन झैरे ) मधे एका दुर्गम भागात समाजसेवा म्हणून लोकांना १९७० पूर्वीपासून वैद्यकीय सेवा पुरवत होत्या. सर्जरीकरिता ग्लोव्हज, sterile disposable सिरींजेस/नीडल्स वगैरे सुविधा नसलेली जागा असणार ही. या आजाराने त्यांचे १९७७ साली निधन झाले (त्यावेळी नक्की कशामुळे त्या गेल्या हे कळू शकलेले नव्हते.) त्यांच्या आजारातील सर्व लक्षणांची नोंद झाली होती डॉ रास्क यांना एड्सची सर्व क्लासिकल लक्षणे होतीच.परंतु त्याचे मृत्यूपूर्व घेतलेले व प्रिझर्व केलेले रक्ताचे सॅम्पल १९८०च्या दशकात अमेरिकेत टेस्ट केले तेव्हा त्यांना एड्स झाला होता हे उघड झाले.
पूर्वी विविध कारणांनी प्रिझर्व केलेल्या सॅम्पल्सच्या नंतर केलेल्या टेस्टिंग मध्ये हे लक्षात आले की अगदी १९५९ साली घेतलेल्या सॅम्पलमधेही एड्सचा विषाणू (HIV) सापडला.
साथ
१९८०च्या दशकात कापोसी सारकोमा,न्यूमोसिस्टीस न्यूमोनिया आणि क्रिप्टोस्पोरिडिओसिस अशा सामान्य माणसांना न होणाऱ्या आजारांनी लोक आजारी पडून खंगून खंगून मृत्यू पावू लागले. यांना हे आजार का व्हावे याचे कारण ज्ञात नव्हते.
यातील बहुतांश मंडळी समलैंगिक होती.
केवळ 'समलैंगिक लोकांना होणारा आजार' या कारणाने अमेरिकन सरकार (रेगन ऍडमिनिस्ट्रेशन ) व अमेरिकन मेनस्ट्रीम मीडिया (यात उजवी मीडिया आलीच पण अगदी लिबरल समजली जाणारी न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट वगैरेही आले) यांनी याकडे पहिली चार पाच वर्षे साफ दुर्लक्ष केले.अमेरिकन समाज हा एकीकडे खूप लिबरल असला,तरीही समाजात,राजकारणात ख्रिश्चन धर्मपरंपरावादी लोकांचा प्रभाव मोठा होता/आहे. समलैंगिकता म्हणजे अनैतिक वर्तन, पाप असा धार्मिक दृष्टिकोण. त्यामुळे समलैंगिक संबंधित विषयांकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाण्याचा हा काळ होता.
या काळातील रेगन ऍडमिनिस्ट्रेशनचा पब्लिक हेल्थ विषयात फंडिंग न वाढविण्याचा निर्णय होता.
नवीन आजार,साथ आल्यावर त्याचे कारण शोधणे व त्याचे नियंत्रण करणे इत्यादी महत्त्वाच्या कारणांसाठी लागणारा निधी सरकारकडून अजिबात दिला गेला नाही.
या सर्व अनास्थेमुळे आजाराचे कारण,शास्त्रीय अभ्यास, साथनियंत्रण कसे करावे, यावर उपाय /औषधे शोधणे वगैरे महत्त्वाच्या कामांमध्ये अतिशय विलंब झाला. यात चारपाच वर्षे अशीच वाया गेली.तोपर्यंत अमेरिकेत हा आजार लाखो लोकांमध्ये पसरला होता आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले होते
निधीअभावी प्रयोगशाळेत काही काम करणे अशक्य आहे हे लक्षात आल्याने डॉक्टर डॉन फ्रान्सिस व त्याचे CDCमधील (Centre for Disease Control, अमेरिकेतील साथीचे आजारविषयक संशोधन करणारी सर्वात महत्त्वाची संशोधन संस्था. कोविड महासाथीच्या काळात या संस्थेचा वारंवार उल्लेख वारंवार केला जात असे.) सहकारी बिल हॅरो, हॅरोल्ड जॅफे, मेरी गिनन यांनी अतिशय बेसिक आणि जुन्या सोशिओलॉजिकल पद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून साथीचा छडा लावायला सुरुवात केली.यात त्यांना साथ मिळाली ती सॅन फ्रान्सिस्कोच्या आरोग्य विभागातील डॉ सेल्मा ड्रीट्झ यांची.(डॉ डॉन फ्रान्सिसला आफ्रिकेतील इबोला साथ आटोक्यात आणण्याचा पूर्वानुभव होता. तो पूर्वी भारतातही देवीनिर्मूलनाच्या कामात सहभागी झाला होता) सोशिओलॉजिकल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे आजार झालेल्या लोकांचा पूर्वी एकमेकांशी संपर्क आला होता का? (आला असेल तर कशा पद्धतीचा) आणि मग त्यांचा अजून कुणाकुणाशी संपर्क आला होता त्यांनाही आजाराची लक्षणे दिसत आहेत का याची माहिती घेत राहणे. हे करत असताना यातील पहिल्या काही बाधित लोकांचा ज्याच्याशी लैंगिक संबंध आला ते लोक आजारी पडत आहे हे निदर्शनाला आले. मग या नवीन बाधित लोकांचे अजून कुणाकुणाशी लैंगिक संबंध आले होते व त्यांचे अजून कुणाशी वगैरे.
त्या बरोबरच बिल क्रॉस नावाचा गे कार्यकर्ता (जो तत्कालीन सिनेटरचा सल्लागार होता) हाही गे कम्युनिटीच्या प्रबोधनात सहभागी झाला.
याव्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सजग कार्यकर्ते , डॉक्टर्स एड्स या विषयावर चाचपडत जमेल तसे प्रयत्न करत होते.
पुस्तकात सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील गे कम्युनिटी,त्यांच्या सामाजिक चळवळी, त्यांच्या भेटण्याच्या विशिष्ट जागा, तिथले अर्थकारण आणि या सगळ्याकडे "वाईट आहे ते" अशा दृष्टीने संपूर्णपणे दुर्लक्ष करणारा अमेरिकन समाज, सरकार, मीडिया यांबद्दलही बरीच रोचक माहिती मिळते.
याच काळात एड्स हा आजार रक्तामधूनही पसरतो, यामुळे एड्स झालेल्या लोकांनी रक्तदान केले, तर त्यातून रोग खूप पसरू शकतो ही माहिती पुढे आली. (सर्व मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी पेशंटना व हिमोफिलियासारख्या आजारांनी ग्रस्त लोकांना रक्ताची जरुरी असते.)
रक्तपेढ्या हा एक मोठा व्यवसाय होता. साथ पसरू नये म्हणून एड्सची लक्षणे दिसणाऱ्या लोकांकडून रक्त घेऊ नये, स्क्रिनिंग करावे किंवा काही ढोबळ टेस्ट करूनच मग रक्तदात्याचे रक्त घ्यावे ही रास्त मागणी रक्तपेढी संघटनेने "फार खर्चिक काम आहे" व "पण पक्का शास्त्रीय पुरावा कुठे आहे याचा!" असली थातूरमातूर कारणे सांगून नाकारले. याचा परिणाम म्हणजे रक्त घेणाऱ्या हजारो लोकांमध्ये हा आजार पसरला.
१९८३ मध्ये फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी या आजाराचे कारण असलेला विषाणू आपल्या संशोधन / प्रयोगांच्या आधारे शोधला.
एकाच वेळी फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूट व अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये एड्सचे कारण शोधण्यावर संशोधन सुरू होते. डॉ रॉबर्ट गॅलो (NIH ) हा या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा शास्त्रज्ञ मानला जात होता. पाश्चर इन्स्टिट्यूट मधील डॉ ल्युक मोंतान्यूए व डॉ फ्रान्स्वाज बारे सिनुसी यांना एड्स रोग निर्माण करणारा (तोपर्यंत अज्ञात असा) विषाणू शोधण्यात यश आले. या क्षेत्रातील दादा माणूस म्हणून त्यांनी ते सँपल व आपल्या संशोधनाशी संबंधित कागदपत्रे डॉ रॉबर्ट गॅलो यांना पाठवली. व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा किंवा मोठ्या माणसाचा मनाचा कोतेपणा म्हणा, डॉ गॅलो यांनी स्वतःला यश येईपर्यंत फ्रेंच शास्त्रज्ञांचे हे संशोधन दाबून ठेवले. व जवळजवळ वर्षानंतर हा शोध आपणच प्रथम लावला असा दावा केला. यावरून मोठी चर्चा वाद सुरू झाला (अखेर २००८ मध्ये या दोन फ्रेंच शास्त्रज्ञांना एड्स निर्माण करणाऱ्या विषाणूचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला.)
या वर्षभर झालेल्या उशिरामुळे शोध लागल्यावरच्या पुढच्या संशोधनात (म्हणजे एड्सची टेस्ट कशी करावी यावर संशोधन, आजाराबद्दलचे, तो टाळण्याकरिताचे व साथ नियंत्रण करण्यासाठी काय करावे याविषयी संशोधन) अक्षम्य उशीर लागला.
रॉक हडसन हा एक प्रसिद्ध हॉलिवूड स्टार. हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा मित्र. १९८५ साली रॉक हडसन एड्स आजार होऊन गेला. इतका प्रसिद्ध माणूस एड्सने गेल्यावर अखेर सरकार व मीडियाने या आजाराची दखल घ्यायला सुरुवात केली.
१९८७ साली अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या रोगाविषयी पहिल्यांदा जाहीर वक्तव्य केले तेव्हा अमेरिकेत २५००० लोक मृत्युमुखी पडले होते, आणि लाखो लोकांना या आजाराची लागण झाली होती.
पुस्तकात साधारणपणे एड्सचा १९७७ ते १९८६ सालापर्यंतचा आढावा आहे (पुस्तक १९८७ साली लिहिले गेले).
या काळातील सरकारी व मीडियाची अनास्था, राजकारण , समाजकारण, गे चळवळ, शास्त्रीय संशोधनसंस्थांमधील स्पर्धा व संशोधन, साथ नियंत्रण यामध्ये झालेला अक्षम्य विलंब इत्यादीवर समकालीन प्रकाश टाकणारे 'And the Band played on' पुस्तक शोधपत्रकारितेचे एक उत्तम उदाहरण आहे. ही शोध पत्रकारिता रँडी शिल्ट्स नावाच्या या पुस्तकाच्या लेखकाने केली. हा स्वतः एड्सग्रस्त होता. याचे एड्ससंबंधित आजारानेच १९९४ साली निधन झाले.
एड्स या आजारामुळे जगात आत्तापर्यंत सुमारे चार कोटींपेक्षा जास्त माणसं मृत्युमुखी पडली आहेत. खूप शास्त्रीय प्रगती होऊनही अजून हा आकडा म्हणावा तसा कमी होत नाहीये (२०२१ मधे या आजारामुळे सुमारे साडेसहा लाख लोकं गेली).
एड्स कशा मार्गाने पसरतो याबद्दल सांप्रतकाळी पुरेसे जनप्रबोधन झाले असावे. अगदी सामान्य पातळीवर हेअर कटिंग सलूनमध्ये गेल्यावर सर्वांना वापरला जाणारा एकच वस्तरा आता इतिहासजमा होऊन 'प्रत्येकाला वेगळे नवे ब्लेड' हेही रुळून गेले आहे. तीच गोष्ट डिस्पोजिबल सिरींजेसबाबत.
आज एड्स आजार पूर्ण बरा करण्याइतपत प्रगती झाली नसली तरी एड्स झाल्यावर विशिष्ट औषधे घेऊन कायम नॉर्मल जगता येऊ शकते अशी परिस्थिती आहे.
१९९३ साली या पुस्तकावर याच नावाची फिल्म निघाली.अर्थात एका फिल्ममध्ये पुस्तकातील सर्व माहिती घेणे अशक्य होते. फिल्मही नक्कीच बघावी, युट्युबवर उपलब्ध आहे.
या आजार/साथीच्यावरचा पुढचा इतिहास कुणीतरी लिहायला हवा असे वाटते.
नक्की वाचावे असे पुस्तक.
प्रतिक्रिया
चांगला लेख, पुस्तकांची ओळख.
सध्या तिकडे आणि भारतात या रोगाचा प्रसार किती असावा? वाढतो आहे का,आहे तेवढाच आहे.
पूर्वीपेक्षा खूप कमी आहे असे
पूर्वीपेक्षा खूप कमी आहे असे म्हणावे लागेल.