काही विस्कळीत जुन्या नोंदी

माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी.

Test

- अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे. अंगणातील इतर झाडी जशी त्यांच्या अंगाखांद्यावर बागडल्यामुळे ओळखीची वाटायची तसा हा थोडा परका वाटायचा. कधी चिंचा पाडायला किंवा असेच अंगणात फेरफटका मारताना घरामागे (गोठ्यामागे) गेलो तरच दिसत असे. ह्या गुलमोहराची मनात कोरलेले चित्र म्हणजे थंडीच्या दिवसात सूर्य मावळतेवेळी नांगरलेले घरामागचे रान पाहता पाहता कोपऱ्यात तटस्थपणे उभा असलेला हा वृक्ष एखाद्या सीमारेषेवरच्या राखणदार सारखा वाटे.

- लहानपणी अंगणात बरीच झाडी होती. सवंगगाड्यांसोबतचे बरेच खेळ ह्या झाडांच्या साक्षीने चालत. अंगणातल्या बऱ्याच जागांना झाडांचीच ओळख असे. घरामागचा आंबा, बोळीतला जांभूळ, रानातली दिवसमावळी, पुलावरची दिवसमावळी, देवळजवळचा रामफळ, देवळासमोरचा चाफा, ओसरीवरचा आंबा, पडवीतली जास्वंद, बांबू, पेरू, चिक्कू, कागदी फुलाचे झाड, विहिरीजवळचा मोठा आवळा, त्याच्या शेजारचा गोड आवळा जणू ही सर्व रोज समोर दिसणारी माणसं होती. त्या अंगणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं.

- वस्तीवरचे मित्र जेंव्हा उन्हाळी सुट्टीत त्यांच्या आजोळी निघून जात तेंव्हा हीच झाडी माझ्या खेळातले सवंगडी होत. रामफळाच्या झाडावर माझ्या कल्पना जगातले हेलिकॉप्टर होते, गोबरगॅस प्लान्ट माझी बोट होती, देवळासमोरच्या बदामाला पाणी देण्यासाठी मी मातीचे छोटे धरण बांधले होते. सरडे, पाली, खारुताई तर असंख्य. अशोकाच्या झाडावर मोठ्या घारीचे घरटे होते. बुचाच्या झाडाखाली मुळ्याच्या खोबणीत पिवळी धामण कधी कधी दर्शन देत असे. उंबराच्या झाडावर मोठमोठाली आगीमोहळे होती. ह्या सगळ्यात मी खूप रमून जात. आख्खी दुपार जेंव्हा घरातले इतर लोक गाढ झोपेत असे तेंव्हा माझे हे खेळ सुरू असत. पुढे आयुष्यात मी प्रचंड इन्ट्रोवर्ट झालो त्याचे बीज बहुदा तिथे असावे.

- मला एक सवय आहे. नवीन ओळख झालेल्या आणि मैत्री होऊ शकणाऱ्या व्यक्तीला मी मुद्दामहून त्याचे लहानपणीचे संदर्भ येतील असे प्रश्न विचारतो.आपल्या घराबद्दल बालपणाबद्दल भरभरून बोलणारे लोक खूप आवडतात. त्यांच्या आणि माझ्या मध्ये काही समान दुवा आहेत असे वाटते. झाडांचा संदर्भ देऊन पत्ता सांगणारे लोकही मला आवडतात - समोरच्या चिंचेपासून डावीकडे वळा. असे लोक झाडांचे अस्तित्व consider करतात हे मला आवडते. लहानपणीच्या आठवणी केवळ माणसं केंद्रित असणारे लोक मला रूटलेस वाटतात.

- पानगळीच्या दिवसात सारे अंगण झाडले जात. पानांचे मोठमोठाले खच बनवून पेटवून दिले जात. पेटवलेल्या वाळलेल्या पानांचा वास मला अतिप्रिय.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला रात्रीचा वारा सुटे. त्या हवे मध्ये ही वेगळाच वर्णन न करता येणार वास असे. खास त्या वासासाठी मी रात्रीचे जेवण झाल्यावर तुळशीच्या ओट्यावर बसत असे.

पूर्वी देवळाजवळ खूप मोठे बुचाचे झाड होते. ह्या झाडाला छोटी छोटी पांढरी फुले येत. ह्या झाडाखाली खूप साऱ्या फुलांचा सडा सतत पडलेला असत. अख्खा आसमंत ह्या फुलांच्या वासाने सदैव भारलेला. पुढे एका वादळात हे मोठे झाड पडले. ह्या झाडाच्या लाकडातून अख्ख्या घरासाठी फर्निचर झाले. पडलेल्या झाडातून परत छोटी छोटी फुलांची झाडे उमलली. अंगणाचा उत्तरपूर्व भाग आज ही सुवासाचे सुख देणाऱ्या झाडांनी भरलेला आहे.

झोपायच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले की उंच पण बारीक अंगकाठीचा चाफा दिसे. हा चाफा आज ही आहे. बहाराच्या मोसमात सगळी पाने गाळून फक्त सुबक पांढरी सुवासाची फुले अंगावर लेवून उभा असलेला चाफा हे फार सुंदर दृश्य असे. चाफ्याच्या समोर पूर्वी ओळीने लावलेला मोगरा असे. रातराणी, बकुळ ही इथे तिथे असत. पूर्वी गुलाबाची बाग लावण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याच्या आठवणी अगदीच पुसटश्या.

- घरामागचा उंबराच्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या होत्या. उंबराच्या झाडावर लहानपणी खूप खेळलो. पण गोड फळामुळे ह्या झाडावर बऱ्याच लाल मुंग्या आणि इतर कीटक असत. खेळून झाल्यावर बराच वेळ अंग खाजत. त्याकाळी अर्थातच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात. तर ह्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या असल्याकारणाने तिथे दत्ताचे ठाणे आहे म्हणून तिथे मंदिर बांधण्यात यावे असा उपदेश एका देवरूषीने माझ्या आज्जीला दिला होता. उंबर घरामागे असल्या कारणाने मंदिर तिथे न बांधता घरासमोर असलेल्या उंबराजवळ बांधले. देवळात सुबक दत्ताची मूर्ती आहे. शंकराची पिंड आणि नंदी आहेत. मोठी काकू सोडली तर घरातले तसे फार पूजा पाठ देव देव करणाऱ्यातले नव्हते. पण देवळातल्या पूजेसाठी नेहेमी कोणी न कोणी माणूस ठेवला असल्याची आठवण आहे.

- माझा जन्म होईस्तोवर गोठ्यातले गोधन बरेच कमी झाले होते. माझ्या आठवणीतल्या गोठ्यात २-३ म्हशी आणि तेवढ्याच शेळ्या होत्या. अगदी पुसटशी बैलगाडीची आठवण आहे. गोठा पूर्वीच्या सुबत्तेची साक्ष देत ऐसपैस होता. त्याकाळी तो मॉडर्न असावा. पाया ताशीव दगडांचा होता आणि दावणी लाकडी होत्या. शेळ्यांचा गोठा ही वेगळा होता. माझ्या बालपणी हा गोठा गुरांसाठी कमी आणि अडगळीचे सामान ठेवण्यासाठी जास्त वापरत. लपाछपी खेळताना लपण्यासाठी सगळ्यात आवडती जागा म्हणजे हा गोठा. पावसात गोठ्यात उभे राहिले की पत्र्यावर ताड ताड आवाज भीतीदायक पण तेवढाच मनोरंजक वाटे.
गोठ्याशेजारी गॅरेज होते. गॅरेज शेजारी जांभळीचा बोळ ओलांडून दोन मोठाल्या खोल्या होत्या. हे नवीन घर बांधायच्या आधीचे घर. खोलीत मोरी, दगडी जातं, उखळ, तुळया, खुंट्या, मोठमोठाली पितळी भांडी असे सर्व होते. मी ही खोली दहावीच्या अभ्यासासाठी वापरली. नंतर माझ्या भाचीचा जन्म झाल्यावर पाहिले काही दिवस माहेरवाशीण बहिणीचा मुक्काम ह्या खोलीत होता. एकदा रात्री त्या खोलीत भिंतीतल्या कपाटातून खवड्या जातीचा साप निघाला होता. तो साप मी आणि आमच्या राखणदाराने मारला होता. पुढे त्या खोलीशेजारीच असलेल्या बोळीत (जांभळी खाली) त्या राखणदाराला नाग चावला होता. त्यातून तो बचावला पण नंतर आयुष्यभर बिचारा लंगडत चालत होता. ह्या खोलीशेजारी अजून एक अगदी तशीच खोली. तिचा उपयोग शेतीचे सामान, धान्य, खत आणि इतर अडगळ साठवण्यासाठी करत. एकदा खेळता खेळता मला ह्या खोलीत खूप जुनी तलवार सापडली होती. बरीच वर्षे ती होती. मध्ये कधीतरी घरी चोरी झाली तेंव्हा चोरांनी इतर सामनाबरोबर ती पण नेली.

शिक्षणासाठी वयाच्या १८व्या वर्षी मी ही स्वप्ननगरी सोडली. निघण्याच्या दिवशी घरातल्या काही बुजुर्ग मंडळींच्या डोळ्यात पाणी आले होते. पण मला त्यावेळी त्या प्रसंगातली तिव्रता समजली नाही. हे असे उपजीविकेसाठी घरातून बाहेर पडणे बऱ्याच वेळेला परत न येण्यासाठीच हे माहीत नव्हते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. असे अंगण असलेल्या घरातून बाहेरचा परिसर दिवस रात्रीच्या सगळ्यावेळी वेगवेगळा दिसतो.
" हे असे उपजीविकेसाठी घरातून बाहेर पडणे बऱ्याच वेळेला परत न येण्यासाठीच हे माहीत नव्हते."असा शेवट मनाला भावला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो मस्त आहे! (आमच्या गावची आठवण झाली.)

घरात तलवार!! खूपच जुनं घर असलं पाहिजे तुमचं?

शेवटाबद्दल सहमत आहे - पण घर सोडल्यावर मग जशी वर्षं उलटली तशी घराची ओढ बरीच कमी झाली, असं वाटतं का? म्हणजे नोस्टाल्जिया म्हणून नक्कीच घर आवडतं पण तो गतकाळातला एक क्षण आहे- आता घरही तसं नाही आणि घरातले लोकही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0