कुमार सानू के हिट नगमें... तथा पल्प ऑफ नाईन्टी फोर
कुमार सानू के हिट नगमें... तथा पल्प ऑफ नाईन्टी फोर
आरंभापूर्वी...
एकोणीसशे त्र्याण्णव सालातल्या दिवाळीत आमच्या घरी डबल कॅसेटप्लेअर आणण्यात आला. फिलिप्स पाॅवरहाऊस. एसब्ल्यू सीक्सटूसिक्स. टू सिक्स्टी वॅट्स स्पीकर सिस्टिमसह. त्याच्या हायस्पीड डबींग ड्युएल कॅसेट प्लेअरचे आकर्षण आळीतल्या माझ्या मित्रांनाही होते. पण या इलेक्ट्राॅनिक वस्तूच्या आगमनानंतर वर्षभरातच शाळेत मी कॅसेटदूत बनलो. तेथे शिक्षकांपासून 'क' वर्गातल्या मुलींपर्यंत माझी वट होती. कारण रिकाम्या कॅसेटमध्ये कुणाकुणाला माझ्या आवडीची गाणी एकत्रित रेकाॅर्डिंग करून देण्यात मला फार हौस वाटायची. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र समर्थ विद्यालयातील अव्वल मवाली असलेल्या 'फुलपँटगँग', अस्सल प्रेमवेड्या असलेल्या 'वनफोरथ्रीगँग' आणि अस्वलासारख्या धिप्पाड शरीराचे असूनही अभ्यास करण्यात वाया गेलेल्या हुशार 'फट्टूगँग' या सर्वांमध्ये सहजरीत्या वावरत होतो. या तीनही भिन्न विचार आणि आचारधारेच्या मुलांना त्या वर्षात एकत्र आणता येणे अशक्य असले, तरी नापाशे सोडले, तर मुलांपैकी बहुतांश सर्वांना एकाच वयानुरूप एकाच वेळी तरुण झाल्याची जाणीव करून देणारे ते वर्ष होते. करिश्मा कपूर-गोविंदाचे 'सरकायलो खटिया जाडा लगे'मधील 'जाडा लगे'चा अर्थ हिंदीतल्या शब्दार्थानुसार 'थंडी' नसून भलताच काहीसा असल्याचा सेमीइंग्लिश आणि शंभर मार्कांचे संस्कृत घेणाऱ्या स्काॅची मुलांचा ग्रह होता, तर तो 'ड-ई-फ-ग' वर्गातल्यांनाही अचूक कळणे अशक्यच होते. 'सुपरहिट मुकाबला'मध्ये 'सेक्सी-सेक्सी' हे करिश्माचे गाणे 'बेबी-बेबी' बदलून आल्यानंतरच पालकांच्या देखरेखीखाली मुलांना पूर्ण पाहायला मिळाले. नववी 'क' वर्गामधील निळ्या डोळ्यांची स्वप्ना गद्रे आख्ख्या इयत्तेतील मुलांसाठी करिश्मा कपूर बनली होती. पोरे सलमान-शाहरुख-गोविंदा बनून तिच्यासमोर नाचायला तयार होती. पण ती कुणालाच भीक घालायला तयार नव्हती.
सोनीच्या 'सुपर ईएफ सिक्स्टी'च्या कॅसेटवर 'कुमार सानू के हिट नगमे' ही फुलपँटगँगचा म्होरक्या सुजीत गोफणची कॅसेट एक दिवसासाठी आणून मी रेकाॅर्ड करून घेतली. त्या नंतरच्या दिवसांत शाळा आणि परिसरात घडलेल्या घटनांची ही मालिका आहे. कारण नंतरच्या दिवसांत सुजीत गोफणच्याइतकाच मीदेखील कुमार शानूचा भक्त झालो होतो. अन् भवताली होत असलेल्या घटनांना त्या काळात तयार होत असलेली गाणी किती जबाबदार ठरत आहेत, याचा माग काढत होतो. ही गाणी कुमार शानू ऐकलेल्या प्रत्येकाला आज लक्षात असायचे कारण नाही. पण अनेकांच्या विस्मृतीत गेलेल्या त्या वर्षातील 'ट्रॅश' संगीताची माझी आठवण म्हणून खास आहे. म्हणूच 'साईड ए' आणि 'साईड बी'मधील गाण्यांच्या क्रमवारीनुसार त्या वर्षातील घटनांची जंत्री इथे जोडण्याचा प्रयत्न आहे.
***
गाणे क्रमांक १: जादू है जुनून है कैसी माया है अर्थात सुजीत गोफणची म्युझिकटेस्ट ...
चंदनवाडी या मारकुटीसाठी बदनाम असलेल्या भागात लहानपण काढलेला सुजीत गोफण फिल्मी संगीतप्रेमी अन् त्यातही कट्टर शानूप्रेमी कशामुळे बनला, याची माहिती मला काढता आली नाही. त्याची आई त्याच्या वडिलांपासून वेगळी राहत होती. त्या चंदनवाडीतल्या 'पितृसदन' इमारतीतून सातवी-आठवीत असतानाच बंडखोरी करून तोही वेगळा राहायला लागला होता. असे कुजबुजत सांगत की त्याच्या आईच्या ऑफिसमधला कुणी इसम त्या घरात अधूनमधून यायला लागल्यामुळे त्याने तसे केले. परशुराम लाॅण्ड्री सेण्टरच्या उत्तर प्रदेशी मालकाचे चरई चौकाजवळच्याच इमारतीला लागून तळमजल्यावर पत्र्याचे तीन खोल्यांचे घर होते. त्या चौरसिया आडनावाच्या उत्तर प्रदेशी कुटुंबाने त्याला आपला सदस्य कसा करून घेतला असेल, हे त्याला भेटायला जाणाऱ्या किंवा शाळा-क्लास बुडवून चरई चौकाजवळ तासच्या तास नाका करून उभे राहणाऱ्या आम्हा सगळ्यांना कुतूहल होते. चौरसिया कुटुंबातील अरविंद आणि अनमोल या मुलांसह तोही चरई-धोबीआळी ते राम मारुती रोडपर्यंत दुधाचा रतीब, पेपरची लाईन आदींची कामे करी. त्याची मराठी शाळा चौरसिया कुटुंबाने बदलली नव्हती. अमोल आणि अरविंद ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या हिंदी शाळेत जात. सुजीतच्या हाती पैसे खुळखुळते असत. त्यातले बहुतांश तो कॅसेट्स आणि मित्रांवर उडवी. मी जेव्हा पाचवी-सहावीत होतो, तेव्हा सुजीत मारामारी करणाऱ्या दादा-पोरांमध्ये पहिला असलेला पाहिला होता. आठवीत दोन वर्षे आणि नववीत एक वर्ष असा 'ग' वर्गातला त्याचा मुक्काम राहिल्याने मी जेव्हा नववी 'ई'मध्ये गेलो, तेव्हा शाळेत शिकविणारा शिक्षक आज हाफ चड्डीत आला की काय, असे त्याला बघितल्यावर मला वाटले होते. पण नंतर शाळेत प्रवेशाआधी आणि प्रवेशानंतर त्याला आणि 'ग' वर्गातल्या कित्येकांना फुलपँटमध्ये पाहिल्यानंतर मला सुजीतची फुलपँटगँग माहीत झाली होती. आमच्या शाळेचे प्रिन्सिपाॅल द. मा. मेहेंदळे ऊर्फ बन्या यांनी मुलांच्या पोशाखात दहावीतच फुलपँट असा कदाचित त्यांच्या दहावीपर्यंतच्या काळातला नियम घालून दिला होता. त्यामुळे नापास झालेल्या आणि पायापर्यंत केसांची माळ फुललेल्या आठवीपासूनच्या घोडवयीन मुलांना हाफ चड्डीत पाहताना सर्वांना हसू येई. त्यातल्या काहींना मिशादेखील उगविलेल्या असत. नाईलाजाने पांढरा शर्ट, हाफ खाकी पँट आणि पाठी दप्तर घेऊन संघाच्या बैठकीला जात असल्यासारखी या थोराड मुलांची फौज दिसे. पण सुजीतने शाळेच्या आवाराबाहेर 'सविनय कायदेभंग' करीत फुलपँट घालायला सुरुवात केल्यानंतर ही पोरे त्याचे अनुकरण करू लागली आणि फुलपँटगँग जन्माला आली. ते आपल्या फुलपँटच्या आत हाफ पँट घालून येत. शाळेच्या आवारात पाऊल टाकण्यापूर्वी फुलपँट काढत आणि आवारातून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या हाफ पँटवर परत फुलपँट चढवत. शाळेच्या आवारात हाफ पँटवर मग शाहरुख खानसारखा केसांचा मधला भांग पाडून वर्गातल्या-शेजारच्या वर्गातल्या आपापल्या आवडीच्या करिश्मा कपूरसदृश मुली समोरून जाण्याची वाट पाहत. त्यातल्या अर्ध्याअधिक हुशार 'क' वर्गातल्या नाकी-डोळी आणि गोळी सर्वोत्तम मुलीच असत. त्यांना घरपोच सुरक्षित सोडायची जबाबदारी कुणीतरी दिली असल्यासारखी ही मुले आणखी दोन मुलांना सोबत नेऊन चार फूट अंतर राखून पाठलाग करीत. पण या मुली आपल्या स्वैच्छिक सुरक्षारक्षकांबाबत प्रचंड कृतघ्न बनत त्यांना हाडतूड करीत. तरीही हिंमत न हारता ही पोरे सुरक्षारक्षकाची जबाबदारी पार पाडीत. आधी फुलपँटगँग आणि फट्टूगँग या दोनच गटांत नववी इयत्तेतील मुले विभागली होती. पण मग 'ग' वर्गातलाच पोलीस लाईनमध्ये राहणारा जितेंद्र देवरे आणि सुजीत गोफण यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचे कारण हे 'कुमार शानू' होते. जितेंद्र देवरेने सगळ्यांदेखत मधल्या सुट्टीत 'कुमार शानू हा नाकातून गातो. तो चक्क रेकतो.' असे मत व्यक्त केले होते. त्याला सुजीत गोफणने आक्षेप घेतला होता. त्याची परिणती आधी बोलाचालीत मग शिव्याबारीत आणि शाळा सुटल्यावर हाणामारीत झाली होती. शाळेबाहेरच्या परिसरातील हाणामारीच्या इतिहासात मुलगी, चिडवणे, सायकल धडकवणे, ठसन देणे या पारंपरिक कारणांखेरीज पहिल्यांदा वेगळ्या कारणावरून मारामारी झाली होती. तीदेखील फुटकळ कानसेनांच्या सांगीतिक अस्मितेवरून. फुलपँटगँगचे त्या दिवशी तुकडे झाले. सुजीतच्या बाजूने हाणामारी करणारेच त्या दिवसापासून खरेखुरे फुलपँटगँग म्हणून ओळखले जाऊ लागले. तर जितेंद्र देवरेच्या बाजूने हाणामारी करणारे फुलपँट घालत असूनही वनफोरथ्रीगँग म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यालाही एक कारण होते. देवरेला उदित नारायण, सोनू निगम, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, अभिजीत हे आवडत. त्याचे सर्वांत आवडीचे गाणे 'आदमी' चित्रपटातील 'बोलो वन फोर थ्री, याने आयलव्ह यू' हे होते. उदित नारायण आणि मोहम्मद अझीझ गायकाने गायलेले. त्याने त्या वर्षी 'वनफोरथ्री' म्हणत 'क' वर्गातील तीन मुलींना प्रपोज करून नकार प्राप्त केला होता. मुलींच्या पाठीमागे त्यांच्या घरपर्यंत सुरक्षारक्षकांच्या आवेशात जाणाऱ्या सगळ्या मुलांना त्यांनी 'वनफोरथ्री'चा फंडा गिरवायला लावले होते. त्यामुळे त्याच्या पाठीराख्यांना एकजात वनफोरथ्रीगँग हे नाव पडले होते.
'कुमार शानूचा आवाज' या विषयावर सुजीत गोफण १०० मार्कांचा निबंध लिहू शकला असता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासापेक्षा, युरोपमधल्या सामाजिक क्रांतीच्या सनावळ्यांपेक्षा कुमार शानूने गायलेल्या गाण्यांची वर्षे, त्याचे हिट-फ्लाॅप सिनेमे, हिट चित्रपटांतील ज्ञात नसलेली शानूगीते, फ्लाॅप चित्रपटांतील गाजलेली फक्त शानूची गाणी, ड्यूएट शानूगाणी, शानूची सॅड साँग्ज, रोडरोमियो-मव्वाली गाणी, रोमॅण्टिक गाणी अशी साऱ्या मूड्सच्या गीतांची सुजीतकडे काॅम्प्यूटरसारखी नोंद होती. त्याबाबतच्या कुठल्याही प्रश्नावर तो कुणाशीही हरू शकत नव्हता. शिवाय खूप जवळ असलेल्या मित्रांना कुमार शानूच्या आवाजाच्या नव्वद-पंच्याण्णव टक्के सारख्या आवाजात सुजीत गाणे गाऊन दाखवू शकत होता. त्यात शानूच्या 'लव्हेरिया हुवा' गाण्यातील 'उसके मुहल्ले मे जाके, धुंडो दिल मेरा खो गया' हे कडवे तो हुबेहूब म्हणत असे. 'जागू सोयाँ सोयाँ, रहू खोयाँ' या शब्दांना तो शानूहून सुंदर सादर करी. पहिल्या नववीत असताना त्याला 'क' वर्गातील मंजिरी सावंत पटली होती. 'ग' वर्गातल्या मुलाने 'क' वर्गातल्या मुलीला प्राप्त करण्याचे ते पहिले आणि शेवटचे उदाहरण. पण मंजिरी सावंतला पटविण्यासाठी सुजीतला कोणतेच कष्ट घ्यावे लागले नव्हते. तो चरईतच राहणाऱ्या मंजिरीच्या घरी सकाळी दुधाचा रतीब टाकत असे. त्या वर्षात आलेल्या दोन-तीन चित्रपटांतील 'अमीर लडकी आणि गरीब लडका'छाप प्रेमपट सलग पाहिल्यानंतरच्या करिश्मा-जुही आणि नव्याने आलेल्या तब्बूच्या झिंगेत मंजिरीने सुजीतचे 'जागू सोयाँ सोयाँ, रहू खोयाँ खोयाँ, काम करती दवा ना दुवा' ऐकले होते. त्यानंतर त्याच्या शानूसमान आवाजावर भाळून त्याला जिन्यात पाठीमागून गच्च आवळून धरले होते. पुढल्या काही दिवसांत म्हणे त्याचे आयुष्य म्हणजे 'ऐ काश के हम होशमे अब आने ना पाये' या गाण्यासारखे बनले होते. मधल्या सुट्टीत 'ग' तुकडीबाहेर उभ्या असलेल्या मुलांमध्ये मंजिरी सुजीतशी गप्पा छाटताना दिसत असे. शाळा सुटल्यावर अर्ध्या नववी इयत्तेतील मुले तिला 'वहिनी' हाक मारी. त्याचे तिला काही वाटत नसे. सुजीतचा हात धरून ती दगडी शाळेजवळच्या सरबतवाल्याकडे बर्फाचा गोळा किंवा चमच किंवा सरबत रिचवतानाचे किस्से नंतर अनेकजणांकडून मला ऐकायला मिळाले. पहिल्या नववीत नापास होऊन सुजीत दुसऱ्या नववीत गेला. तेव्हा मंजिरी पहिल्या दहावीत गेली. दुधाचा रतीब घालणारा आपल्या मुलीच्या शाळेतला मुलगा तिला प्रेमाचाही रतीब घालतो, ही गोष्ट मंजिरीच्या घरी कळाल्यानंतर त्यांच्या उघड प्रेमक्रीडा थांबल्या. सुजीतचा त्या घरातील दूधरतीब थांबला पण प्रेमरतीब घालण्याची त्याची इच्छा कायम राहिली. मंजिरीच्या घरच्यांनी शाळेत-क्लासमध्ये, घरात-घराबाहेर लावलेला कडक पहारा आणि दोघांमध्ये एका इयत्तेची भिंत पडूनदेखील लांबून एकमेकांना पाहत नजरेतून दोघांचे प्रेम टिकून होते. मधल्या सुट्टीत, शाळा भरायच्या आधी-नंतर जिन्यात नशिबाने काही सेकंदांचा कालावधी एकमेकांना पाहून, जवळून जात एकमेकांच्या हाताला स्पर्श करून त्यांची अजब प्रेमकहाणी मुरत होती. शाळेच्या गेटबाहेर तिला न्यायला तिची आई किंवा भाऊ हजर असे. क्लासच्या बाहेरही तिला मोकळीक नव्हती. स्टेशनरी-कटलरी सामान-फुलस्केपच्या बहाण्याने बाहेर पडून तिने सुजीतला भेटण्याचे केलेले प्रयत्न हाणून पाडण्यात आले होते. 'प्रेमिका आहे पण प्रेमप्रकटीकरणाचा मार्ग तुंबलेला' अशा विचित्र परिस्थितीत त्याच्या मानसिक अवस्थेचे बळकटीकरण फक्त कुमार शानूची गाणी करीत होती, हे त्याने मला सांगितले होते. त्याला 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या गाण्यातील सारे शब्द क्रमानुसार पाठ होते. 'उजली किरण नंतर बनमे हिरण' किंवा 'सुबह का रुप नंतर सरदी की धूप' किंवा 'परियो का राग नंतर संदल की आग' हे त्याला अचूक येत होते. त्याचे प्रदर्शन त्याने पहिल्या चाचणीत हिंदीच्या पेपरात केले. निबंधाचा विषय काहीतरी वेगळाच होता. या पठ्ठ्याने आपल्या मनानुसार 'मेरी प्रिय काव्यपंक्ती' अशा शीर्षकाने आख्खे गाणेच सुरेख हस्ताक्षरात लिहिले. 'फ' आणि 'ग' वर्गांतील कोळशांतून हिरे शोधण्याचा विचित्र पवित्रा घेतलेल्या तरुण असलेल्या हिंदीच्या ओजाळे सरांनी त्याबाबत त्याला न झापता त्याचे कौतुक केले होते. त्याचे हस्ताक्षर पाहण्यासाठी तो पेपर सर्व वर्गात दाखवला होता. ते गाणे कदाचित ओजाळे सरांनाही आवडत असावे, पण तसे न दाखवता 'गाण्यातील शब्दांची अचूक स्मरणशक्ती असलेल्या या मुलाला इतर विषयांत थोडे चांगले मार्गदर्शन केले, तर तो अभ्यासातही चुणूक दाखवू शकेल.' असा शेरा इतर शिक्षकांसमोर दिला होता. सुजीतचे इतर सारे विषय उत्तमच होते. पण बीजगणित आणि भूमितीने त्याचे पास होणे अवघड करून ठेवले होेते. ते समजवून सांगण्याची क्षमता कुणातच नसल्याने त्याचा शैक्षणिक भविष्यकाळ अंध:कारमय होता. याची त्यालाही जाणीव होती. त्यामुळे टेलेक्स कंपनीचा 'कॅसेट रेकाॅर्डर प्लेअर' विकत घेऊन कॅसेटचे दुकान आणि रेकाॅर्डिंग सेंटर काढण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या उथळसरमधील मित्राच्या बबलू नावाच्या मित्राचे इलेक्ट्राॅनिक्स वस्तू रिपेअर करण्याचे दुुकान होते. शिवाय तो त्यात किडे करून रेडिओ, कॅसेट रेकाॅर्डिंग प्लेअर असेम्बल करून देण्याचेही काम करी. त्याच्याकडून त्याने या साऱ्या उद्योगाला अंदाजे किती भांडवल लागेल, याचा तपशील जाणून घेतला होता. चरईत-धोबीआळीत कॅसेटचे एकही दुकान नव्हते. तिथल्या लोकांना जांभळी नाक्याचा बाजार, स्टेशन परिसर किंवा गोखले रोडच्या टोकाला 'न्यू सिम्फनी' नावाच्या दुकानात जावे लागे. हा सगळा रिसर्च करून त्याने कॅसेट रेकाॅर्डिंग सेंटर काढायचे आणि मग एकविसाव्या-बाविसाव्या वर्षी मंजिरीच्या घरचे तयार नाही झाले, तर पळून जाऊन लग्न करायचे, अशी भविष्यातील आर्थिक आणि वैवाहिक जीवनाची आखणी करून ठेवली होती.
त्याची 'कुमार सानू के हिट नगमे' ही कॅसेट त्याची म्युझिकटेस्ट स्पष्ट करणारी होती. त्यातील पहिले गाणे 'माया मेमसाब'मधील 'जादू है जुनून है कैसी माया है, ये माया है' हे होते. सोनीच्या 'सुपरईएफ : हाय रेझिस्टन्स टू हीट, एक्सलंट फिडेलिटी, मेड इन जपान' लिहिलेल्या निळ्या कॅसेटमधून सकाळी १० वेळा आणि संध्याकाळी कितीतरी वेळा मी ते लावत असे. तेव्हा माझ्या घरात आणि परिसरात 'माझी माया नावाची कुणी तरी पटलेली किंवा पटण्याची शिल्लक असलेली गर्लफ्रेण्ड आहे.' अशी अफवा पसरली होती.
मंजिरी सावंतला सुजीत 'माया' असे संबोधत असे याचा छडा मला सहामाही परीक्षेआधी लागला. तोवर माझ्या डबल कॅसेट प्लेअरवरून रेकाॅर्ड होणाऱ्या गाण्याची क्वालिटी आणि टेलेक्सच्या रेकाॅर्डर मशिनवरून होणाऱ्या गाण्यांच्या रेकाॅर्डिंगची तुलना करीत सुजीत गोफणशी माझी ओळख वाढत चालली होती. मी देखील उगाचच मोठे वय असल्यासारखे दाखवत शाळा परिसरात फुलपँट घालू लागलो होतो. सुजीतची फुलपँटगँग आणि जितेंद्र देवरेची वनफोरथ्रीगँग यांच्यातील वितुष्ट वाढत चालले होते. सुजीतच्या अडकलेल्या प्रेमकहाणीत इंधन टाकून तिला अधिक गहिरी करणारी कुमार शानूची नवनवी गाणी येत होती किंवा जुन्या गाण्यातील शब्दांना नव्या छटांसह अर्थ प्राप्त होत होता.
गाणे क्रमांक २ : दिलको छूके, तेरी याँदे अर्थात बहुतांशांचे अनोखे प्रेमयुद्ध...
पहिली चाचणी परीक्षा संपली आणि त्यात 'ई', 'फ' आणि 'ग' वर्गांचा १०० टक्के नापास असा निकाल लागला. आदल्या वर्षापर्यंत या वर्गांतील दोन ते आठ टक्के मुले तरी पास होत होती. पण त्या वर्षी नवा विक्रम झाला. 'अ' वर्गात ३० टक्के, 'ब' वर्गात ४४ टक्के मुले नापास झाली होती. सेमीइंग्लिशच्या सर्वात हुशार 'क' वर्गात ७ टक्के मुले-मुली नापास झाल्या होत्या. या वर्गाचा १०० टक्के निकालाचा शिरस्ता मोडला म्हणून बन्याने नवव्या इयत्तेतील साऱ्या मुलांची शाळेच्या पटांगणात तातडीने बैठक घेतली. 'शहरात बेडेकर शाळेनंतर दहावीचा सर्वाधिक निकाल लावणारी म्हणून ओळख असलेल्या आपल्या शाळेतील विद्यार्थांचा घसरता दर्जा' असा बैठकीचा विषय होता. याबाबत अर्धा तास त्यांनी सर्वांना माईकवरून मोठ्याने भाषण देत पिळून काढले. या भाषणाचा अंत पुढल्या रांगेत चुळबूळ करणाऱ्या 'क' वर्गातल्या फट्टूगँगमधील अमोद दांडेकरला स्टेजवर बोलावून करण्यात आला. अतिसुंदर-देखणा-उंच आणि अभ्यासासह इतर कलांत निपुण असलेल्या अमोदला पाच विषयांत पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याबद्दल जाहीर कौतुकासाठी बोलावले असा त्याचा भ्रम झाला होता. हीरोच्या आवेशात असलेला त्याचा पवित्रा बन्याने शून्य मिनिटांत पंक्चर करून टाकला. व्यासपीठावर सर्वांदेखत अमोद दांडेकरच्या कानाखाली मारलेल्या बन्याच्या हाताची जादू माईकमधून स्पीकरच्या सहाय्याने पटांगणभर दुमदुमली. 'क' वर्गातल्या पोरींसह इतर वर्गातल्या पोरीही हळहळल्या. पोरांच्या मनातील बन्याची दहशत आणखी विस्तारली. सहामाही परीक्षेत 'क' वर्गाचा आणि इतर वर्गांचाही निकाल १०० टक्के लागेल, या बन्याच्या अशक्यप्राय मागणीवर पटांगणात विद्यार्थ्यांनी सामूहिक होकार स्पीकरविना दिला.
शाळेतल्या शिक्षकांना पहिल्या चाचणीत अधिकाधिक विद्यार्थी नापास होण्याचे कारण उमगत नव्हते. आपल्या मुलांना महागड्या क्लासमध्ये टाकूनही ती नापास का झाली, याचे उत्तर प्रगतीपुस्तकावर सही करताना पालकांना कळत नव्हते. पण मुलांना या सगळ्या गोष्टींमागे घडणाऱ्या घटनांची, शरीरात उसळणाऱ्या हार्मोन्सची प्रचंड जाणीव होती. अर्ध्याहून अधिक मुला-मुलींना 'हम आपके है कौन' नावाच्या सिनेमाने आणि त्याच्या गाण्यांनी पछाडले होते. 'क' वर्गातल्या अप्राप्य मुलींचा नाद सोडून वनफोरथ्रीगँगमधील काहींनी आपापल्या वर्गातील मुलींना यशस्वीरीत्या पटवण्याची कामगिरी केली होती. 'लक्स' साबणाच्या जाहिरातीत आधी माधुरी दीक्षित, मग जुही चावला आणि अखेरीस पूजा भट यांची दाखविली जाणारी अर्धी अंघोळ म्हणजे मुलांसमोर 'मनात राहिलेले हवे ते चित्र पूर्ण करा'चा खेळ होता. त्यांची अंघोळ व्हायची आणि नंतर मुले सारखी-सारखी संडासात पळायची. हा नववीतल्या मुलांचा संडासखेळ पालकांच्या कधीच लक्षात आला नव्हता. क्रिकेट खेळात भारत कोणत्याही संघाबरोबर हरत होता. ओपनिंग बॅट्समन मिळत नसल्याने मनोज प्रभाकर या ओपनर बाॅलरलाच ओपनर बॅटिंगदेखील करावी लागत होती. त्यामुळे वर्गात क्रिकेटच्या रोमहर्षक विजयाच्या चर्चा तुरळक झाल्या होत्या आणि त्याची जागा गाण्यांनी घेतली होती. 'अ', 'ब', 'क' आणि थोड्या प्रमाणात 'ड' वर्गातील मुलांना अभ्यास करून खूप शिकण्यासाठी काॅलेजला जायचे होते. पण 'इ','फ','ग'मधील मुलांना काॅलेज ही वास्तू शिकण्यासाठी नसून प्रेमाची कारकीर्द घडविण्याची जागा आहे, असा समज चित्रपटांनी करून दिला होता. या सगळ्या वर्गांतील मुलांना नववीत पास न होता, थेट अकरावीत प्रवेश हवा होता. तिथे अजय देवगण, अक्षय कुमार बनत नायिकेसह समूहनृत्यात गाणी गायची होती. काॅलेजमध्ये खलनायकगिरी करणाऱ्यांना मारून सुजवायचे होते. या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी म्हणून नववी इयत्तेला काॅलेजसमान मानण्यात दंग झालेली 'इ', 'फ', 'ग'मधील पोरे १०० टक्के नापास नाही होणार, तर काय होणार, हा प्रश्न होता. तो 'कोळशात हिरे' शोधण्याचा कांगावा करीत आपले वेगळेपण बन्यापुढे ठसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण ओजाळे सरांनाही उमजला नाही.
वनफोरथ्रीगँगच्या सदस्यांनी बेचकीने मुलींच्या पार्श्वभागावर किंवा केसांवर गुलाबाचे फूल मारण्यासाठी तीन दिवसांचे प्रात्यक्षिक जितेंद्र देवरेच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पटांगणात केले. जितेंद्र पाटीलने चाफ्याच्या झाडावर बसलेला एक कावळा बेचकीने मारून पाडला. त्यानंतर हे प्रात्यक्षिक थांबले. बेचकीनिष्णात झाल्याच्या थाटात वनफोरथ्रीगँग पुन्हा आपापल्या 'लाईनीं'चा पाठलाग करीत त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्यासाठी घराजवळच्या कुंड्यांमधून गुलाब चोरून सज्ज राहू लागली. गुलाबाचे काटे स्वत:ला आणि आपल्या इच्छुक प्रेयसीच्या नाजूक भागाला लागू नयेत म्हणून छोट्या फोल्डिंगच्या चाकूने तासून त्यांना वापरासाठी तयार करू लागली. शाळेतून निघाल्यानंतर चहू दिशानी पांगणाऱ्या मुलींच्या पाठीमागे वनफोरथ्रीगँगचे सदस्य दिसत. देवरेचे नवे लक्ष्य खोपटमध्ये राहणारी 'ड' वर्गातील शिल्पा भोईर हे होते. त्याच्या गँगमधील सचिन कडव आणि वैभव पाठक या मुलांनी 'ब' वर्गातल्या मुलींना पटवल्यानंतर तो घायकुतीला आला होता. 'क' वर्गातील स्मिता दातार आणि पल्लवी करंदीकर यांचा नाद त्याने सोडून दिला होता. शिल्पा भोईरच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांत मोठे रस्ते तीन होते आणि छोट्या गल्ल्या चार. त्यातील शाळेजवळची डुक्कर गल्ली ही ख्रिश्चनांची. पूर्णपणे शांत. तिथे ती दोन मैत्रिणींसोबत शिरली, की 'जुते दो पैसे लो'सारखे 'गुलाब लो, गुलकंद दो' आवेशात जितेंद्र देवरेची बेचकी सपासप गुलाब सोडत राही. पुढल्या गल्ल्यांमध्ये असे तीन-चार गुलाब खर्च होत. कधी नेम चुकून शेजारच्या मुलीच्या छोट्या गुलकंदपेटीवर गुलाब बसे. मग शिल्पा भोईरसह तिच्या मैत्रिणी हसून घेत. अशी चांगली चोरलेली शंभरफुले गुलकंदपेट्यांवर अर्पण केल्यानंतर लवकरच देवरेची आराधना पूर्ण होणार होती. आपला गुलाबी पाठलाग हसून साजरा करणाऱ्या शिल्पा भोईरवर खर्च होण्यासाठी 'हजार फुले फुलू द्यावी, आपण ती चोरून घ्यावी' हा मंत्र-शिरस्ता तो रोजच मनात म्हणत होता. ज्या पोलीस ग्राऊंडलगतच्या बागेतून तो डझनाच्या आसपास फुले पळवत होता. तिथल्या माळ्याने देवरेच्या नकळत त्याची तक्रार जमदग्नी अवतार असलेल्या त्याच्या बापाकडे केली. गावठी टाकून आरोपींना फोकलून काढत गुन्हे वदविण्यात पहिला क्रमांक असलेले नौपाडा पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर विठ्ठल देवरे यांनी त्या दिवशी गावठी न टाकता पोरावर पाळत ठेवायचे ठरविले. शाळेत गुरुपौर्णिमेला शिक्षकांना गुलाबाची फुले दिली जातात, ही जुजबी माहिती त्यांना होती. पण दरदिवशी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा मुलाचा अट्टाहास का, याबाबत त्यांना पोलिसी खाक्यानुसार संशय आला होता. शाळेत शिक्षकांना जाब विचारण्याआधी पोराचा गुलाब वापर नक्की कशाकरता होतोय, याचा तपास त्यांना लावायचा होता.
खाकी पँटवर पांढरा शर्ट घालून ते शाळेसमोरच्या एका कोपऱ्यात लपल्यासारखे उभे राहिले. तेथून आपल्या मुलाने घरी जाण्यासाठी पकडलेला उलटा आणि नवाच मार्ग त्यांनी पाहिला. दोन गल्ल्यांत त्याचा मुलींमागे बेचकीने चाललेला 'विनयभंग' त्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. एसटी वर्कशाॅपच्या रस्त्याला त्या तीन मुली लागल्या, तेव्हा त्या मुलींच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या जितेंंद्र देवरेच्या पाठीत प्रचंड मोठा बुक्का बसला. त्या बुक्क्याची जन्मापासून ओळख असलेला जितेंद्र देवरे पाठी न पाहता 'अण्णा नको'चा ठोठो नारा देत खाली कोसळला. देवरेसोबत आलेले वनफोरथ्रीगँगचे सदस्य जीव घेऊन पळाले, तर तिन्ही गुलकंदपेट्यांच्या तोंडांनी रस्त्यावरून फरफटत नेल्या जाणाऱ्या जितेंद्रला पाहून त्याच्याविषयी अतुलनीय सहानुभूती व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशी जितेंद्र देवरे शाळेत येऊ शकला नाही, इतकी बापाने त्याची धुलाई केली. पहिला गुन्हा गुलाबाच्या फुलांच्या चोरीचा. तो त्याने कबूल केला. तोवर गाल सुजला होता. दुसरा गुन्हा मुलींची छेडछाड आणि विनयभंगाचा. तो कबूल झाल्यानंतर पाठ दांड्यानी सुजली, पायातून रक्त आले आणि डोळ्याखाली प्रचंड लाल फुगवटे आले. 'मुलगा आहेस, म्हणून नेमक्या जागी मारायचे सोडतोय. परत हे धंदे करताना दिसलास, तर दिसशील तिथेच त्या जागेवर मारेन.' अशी दयार्द्र तंबी बापाने दिली. तिसऱ्या दिवशी कसाबसा लंगडत दारासिंगच्या 'हनुमाना'ची भूमिका विनामेकअप करीत असल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. मधल्या सुट्टीत शिल्पा भोईर त्याच्याशी स्वत:च बोलायला आली म्हणून त्याच्या त्या वेदनांवर फुंकर बसायला सुरुवात झाली. आठवड्यात चेहऱ्यावरची सूज बरी झाली. तेव्हा जितेंद्र माझ्याकडे 'टीडीके'ची 'एमए-एक्सजी ६०' ही ब्लँक कॅसेट घेऊन आला. मग बापाचा मार खाऊन रुळावर येेऊ पाहणारी त्याची प्रेमाची गाडी मला त्याच्याकडूनच कळाली. त्याला प्रेमाची गाणी भरलेली कॅसेट शिल्पा भोईरला गिफ्ट करायची होती. त्यासाठी माझी मदत हवी होती. मी त्याला माझ्या आवडीची गाणी दिली. त्यात सुजीतच्या कॅसेटमधील अनोखा प्रेमयुद्धमधील 'दिलको छुके, तेरी याँदे' हे गाणेही भरले होते. ती माझी पोरींना इम्प्रेस करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी 'टाॅप टेन' गाणी होती. दशकातील बेस्ट गाणी होती ती. त्यांचा साधारणत: क्रम असा होता.
साईड ए
१. समा ये सुहाना, अकेले तुम हो – गुंज
२. तुम ही हमारी, हो मंजिल मायलव्ह – यारा दिलदारा
३. ओ माय स्वीटहार्ट, दिलसे दिलको जोडदे – बहारोंकी मंजिल
४. दिल को छुके तेरी याँदे- अनोखा प्रेमयुद्ध
५. पलको के तले, जो सपने पले – सैलाब
साईड बी
१. आजा मेरे प्यार, तुझे बार बार – विष्णू देवा
२. दिल तो तुमने चुराया, ऐसा जादू चलाया – इज्जत की रोटी
३. आँखोमे बंद कर लूं , साँसोमे समां जाऊं – संगदिल सनम
४. छोडो भी ये गुस्सा, जो हुवाँ सो हुवाँ - शबनम
५. पागल दिल मेरा - आजा मेरी जान
देवरेला दोस्तीखात्यात भरून दिलेल्या या कॅसेट्सच्या मला दोस्तीप्रेमातच पुढे पंचवीस ते तीस आवृत्त्या काढाव्या लागल्या. म्हणजे 'हम आपके है कौन'ची नववी इयत्तेत किती वेगवेगळी व्हर्शन चालली होती, याची कल्पना येऊ शकेल. फुलपँटगँग, वनफोरथ्रीगँग आणि फट्टूगँगच्या अमोद दांडेकरनेही माझ्याकडून याच क्रमाने गाणी भरून घेतली. '२१ अपेक्षित प्रश्नसंचा'सारखे या गाण्यांचे शाळेतील मुलामुलींमध्ये इतके प्रसारण झाले की सहामाही परीक्षेचा निकाल आणखी बोंबलण्याची परिस्थिती निर्माण झाली. या कॅसेटमधील गाणी पाहून सुजीत माझ्यावर प्रचंड वैतागला, कारण त्यात कुमार शानूचे एकमेव गाणे होते. त्याच्या मते दहाच्या दहा प्रेमगाणी शानूचीच असायला हवी होती. तशी यादीही त्याने सांगितली, जी मला पटली नाही. त्यावरून तो माझ्याशी भांडलाही. सुजीतने 'हम आपके है कौन'च्या गाण्यांना पूर्णपणे वाईट ठरवले होेते, कारण त्यात कुमार शानूचे एकमेव गाणे आलोकनाथच्या तोंडी देऊन शानूचा अपमान केला होता.
दोन दिवसांनी फट्टूगँगमधील अमोद दांडेकर सुजीतकडे काम आहे, असे सांगून मला मध्यस्थ बनवत त्याच्याकडे मधल्या सुट्टीत घेऊन गेला. मला वाटले याला फुलपँटगँगमध्ये समाविष्ट व्हायचे आहे किंवा वनफोरथ्रीगँगमधल्या कुणाला तरी फोकलायचे आहे. पण त्याची डिमांड भलतीच होती. 'आख्ख्या शाळेसमोर कानाखाली मारून अपमानाची परिसीमा गाठणाऱ्या मुख्याध्यापक ऊर्फ बन्याला धडा शिकविण्याची.'
दुसऱ्या दिवशी सुजीतने होळीत त्या वर्षी फुग्याऐवजी वापरण्यास सुरुवात झालेल्या रिकाम्या पिशव्या आणून दिल्या आणि काय करायचे ते त्याला सांगितले. त्या पिशव्यांचा वापर एप्रिलमध्ये होळीदरम्यान मुलांनी मुलींवर सूड म्हणून केला होता.
पुढले तीन दिवस अमोद दांडेकर सकाळ-दुपार-संध्याकाळ भरपूर पाणी पीत होता. मुताने भरलेल्या पंचवीस पिशव्या बांधून तो चौथ्या दिवशी शाळेत आला. पटांगणातून पहिल्या मजल्यावर असणाऱ्या बन्याच्या ऑफिसातील खिडकीच्या दिशेने अर्ध्या मिनिटात सुजीत, अमोद, मी आणि आणखी चौघांनी त्या फेकून मारल्या. तेवीस आत अचूक शिरल्या. त्या फेकून आम्ही साळसूदपणे आपापल्या वर्गात गेलो. 'मुतात ओल्या' बन्याने त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतरचा 'क' वर्गावर होणारा इंग्रजीचा तास का चुकवला, याचे रहस्य पिशव्या वायूवेगाने फेकून पसार झालेल्या आम्हा काहीजणांमध्येच कायम राहिले. नंतर बन्याचे ऑफिस साफ करणाऱ्या दोन शिपायांनी बन्याविषयी शिक्षकांत वेगळीच अफवा पिकवली. ती अफवा असल्याचेही फक्त आम्हालाच माहीत होते. पुढल्या काही दिवसांत अमोद दांडेकरसह फट्टूगँगची काही मुले फुलपँटगँगची सदस्य झाली. सहामाही परीक्षेचा निकाल आणखी वाईट लागला. पण बन्याने पटांगणात मीटिंग घेतली नाही. त्याऐवजी त्याने प्रत्येक पालकांच्या नावे काळजीचे पत्र पाठवले. ती 'ई','फ','ग'मधील पोरांनी आपल्या पालकांना अजिबातच दाखवली नाहीत. माझ्या 'टाॅपटेन लव्हसाँग' कॅसेटचा प्रसार पुढल्या काळात आणखी झाला. ज्याचा उपयोग मला पुढे खूपच झाला.
गाणे क्रमांक ३ : 'दुनिया तो यार है गजब तमासा' अर्थात स्टंटचा बुमरँग
पहिल्या चाचणीनंतर शाळेतील बहुतांश मुलांचा दिनक्रम ठरून गेला होता. माझा दिवस सकाळी साडेसात-आठ वाजता सुरू होई. साडेआठ वाजता नव्या हिंदी सिनेमांतील गाण्यांवरचा रेडिओ प्रोगाम लावून तो ऐकता-ऐकता नाश्ता चाले. पहिल्यांदाच ऐकलेल्या चांगल्या गाण्याची नोंद रफवहीच्या पाठीमागे केली जाई. दहा वाजता रेडिओ प्रोग्राम संपे. साडेदहा ते साडेअकरा वाघ सरांचा क्लास, ज्यात आम्ही कधीच बसत नसू. त्याऐवजी कोणतेही एक पुस्तक-वही पिशवीत घेऊन चरईतल्या क्लासच्या जवळ असलेल्या चौकात एकत्र जमत असू. सुजीत दूध-पेपरांचा रतीब टाकून एक झोप काढून तेथे हजर होई. क्लास बंक करणारे विजय जाधव, सचिन कडव, कैलाश भोईर, संतोष वर्मा आणि कोणकोण तेथे हजर असत. ऐपतीनुसार शाळेतील मुलांचे क्लास ठरत. वाघसरांचा क्लास सर्वात महागडा होता. त्या क्लासमध्ये मुले साठ. त्यातील पस्तीसच कायम उपस्थित राहत. बाकीचे फी भरून एक-सव्वातासाची उनाडकी करण्यास मोकळे होते. दुसरा चरईतच राहणाऱ्या गोडबोले बाईंचा. तिथे बंक मारणे कठीण होते. त्या शिस्तीच्या असल्याने आम्ही त्या क्लासपासून दूर होतो. तसेच बहुतांश पोरे-पोरीही फी कमी असून तिथे फिरकत नसत. तिसरा क्लास डी.जे. पाटील ऊर्फ काण्या पाटील सरांचा. त्याची सर्वात कमी फी. गरिबांनाही परवडेल अशी. तिथेही मुले कमी असल्याने बंक मारण्यास वाव नव्हता. बंक मारणाऱ्यांच्या घरी जाऊन ते त्यांची विचारपूस करीत. त्यामुळे सर्वार्थाने अतिगरीब-अभ्यासू मुलेच त्यांच्या क्लासमध्ये दिसत.
महाराष्ट्र समर्थ महाविद्यालयाच्या दोन मिनिटांच्या अंतरावर एम.एच आणि न्यू इंग्लिश स्कूल, बीजे स्कूल अशा आणखी जुन्या शाळा होत्या. एका शाळेने तर स्वातंत्र्यसैनिकही घडविले होते. पण या शाळांतील नववीतल्या मुलांचेही त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी जवळपास क्लास काढले होते. तिथेही आमच्यासारखे बंक मारून नाका करून उभी राहणारी पोरे होती. तशी बेडेकर, बीजे आणि न्यू इंग्लिश स्कूलचे बंकर्सनी मिळून मावळीमंडळात क्रिकेटची एक टीमही केली होती. त्यात आम्हीदेखील केव्हाकेव्हा क्लासच्या वेळेत खेळायला जायचो. काही पोरे वंदना, प्रताप आणि प्रभात सिनेमा थिएटरात 'माॅर्निंग शो' पहायला जायची. काही नुसतेच धोबी आळी-चरई-खोपट-टेंभीनाका-जांभळी नाका-तळावपाळीवर सायकलने चक्कर मारायची. बारा चाळीसला सगळ्यांची शाळा भरायची. त्याआधी घरात गिळून वगैरे पोरे शाळेजवळ हजर राहायची. आठवड्या-पंधरा दिवसांतून कुणाला तरी शाळाच बंक करण्याची हुक्की येई. मग उपवन, खारिगाव, कळवा ब्रिज, मुंब्रादेवी अशी पाच तासांची सायकलवरून पिकनिक घडायची. म्हणजे चार सायकली असल्या तर आठजण शाळा बंक मारून पिकनिकला. अडीच रुपयांत वडापाव यायचा आणि पन्नास ग्रॅम भजीदेखील. गजानन वडापावमधून पिठल्यासारखी चटणी जास्त मागून या पिकनिकला नेले जाई. घरचा डबादेखील असे. सुजीत भजी-वड्यांचे पैसे भरी. संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेत सारे शाळेजवळ हजर. तिथून साडेसहाला प्रत्येकजण आपापल्या घरी निघे. घरी नाश्ता करी. गाणी ऐकी, सेकंड चॅनलचे कार्यक्रम पाही. साडेनऊ वाजता थकून झोपी जाई. इतक्या बिझी शेड्युलमध्ये अभ्यासाचे तेवढे फक्त जमत नसे. त्यामुळे सहामाही परीक्षेत पास होण्यासाठी बन्यासमोर 'आईरक्ताची शप्पथ' घेऊनही कुणी सर्व विषयांत पास होऊन दाखवू शकला नसता.
अमोद दांडेकर हा 'क' वर्गातला मुलगादेखील फुलपँटगँगचा सदस्य सहामाही परीक्षेच्या बऱ्याच आधी झाला आणि सुजीतने त्याला पंधरा दिवसांतच तिथून हुसकावून लावला. त्याने त्याच्या मद्रासी शेजाऱ्याकडून 'मुकाबला.. ओ लैला..' इतकेच समजणारी गाण्यांची कॅसेट आणली होती.
'कुठल्याही विचित्र वाद्यापासून सुरु होणारी. कसलाही आवाज काढणारी ही काय गाणी आहेत?' असा सवाल त्याने अमोदला विचारला होता.
'जतीन-ललित, आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, अन्नू मल्लीक यांची गाणी ऐक. गाण्याची सुरुवात होतेय, हे चटकन कळणारा हळू ते मोठा होत जाणारा आवाज ऐकू येतो. अगदी सूर्य उगवून प्रकाश प्रखर होत जावा तसा. ही गाणी ऐकताना रात्र-मध्यरात्र-संध्याकाळ मग सकाळ झाल्याचा विचित्र क्रम होतोय की काय असे वाटते. ही गाणी काय हिंदीत चालणार नाहीत.' असे त्याचे ठाम मत होते.
'अरे हीच आता जगात गाजणार आहेत बघ. रेहमान आहे हा रेहमान.' अमोद दांडेकरने सांगितले होते.
'रेहमान नाहीए तो रेहमानी किडा-मकौडा आहे. 'दिल है छोटासा' हे एकच गाणे बरे आहे त्याचे. बाकी सगळी गाणी बेढब आहेत. कुमार शानूकडून गाऊन घेतली, तर जरा बरी ऐकू येतील. पण त्या जाड्या-भसाड्या एस.पीकडून तो गाणी गाऊन घेतो.' आता अमोदला रेहमानबाबत सुजीतच्या रागाचे कारण कळाले होते. त्याने फक्त येवढेच म्हटले की, 'ही या दक्षिणी संगीतकाराची गाणी हिंदीतही नक्कीच लोकप्रिय होतील बघ.' त्यावरून सुजीतने त्या दांडेकरला नाक्यावरून हुसकावून लावले होते.
शाहरूख खानचा 'अंजाम' चित्रपट चालला नाही. त्यातली गाणी अभिजीत या गायकाकडून गाऊन घेतली हे त्यामागचे कारण त्याने मला तेव्हा सांगितले.
'मग डर कसा चालला? त्यात तर उदित नारायणने गायलेय 'जादू तेरी नजर.' याकडे मी लक्ष वेधले, तर त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
“तिन्ही खानांना, दोन्ही कपुरांना आणि कोणत्याही नव्या हिरोंना कुमार शानूचा आवाज फिट होऊ शकतो. धर्मेंद्रला 'मै तुझे छोडके कहाँ जाऊंगा' गाण्यात आणि जितेंद्रला 'आईनेके सौ तुकडे, करके हमने देखे है'मध्ये इतकेच काय 'मीरा का मोहन'मध्ये अशोक सराफला पण 'जब जब तुझको देखा' ऐक. किंवा 'कभी हाँ कभी ना'मधील 'वो तो है अलबेला'. गाण्यात जितक्यांना वापरलाय, त्यांना तो फिट झालाय.”
ही आमची चर्चा सुरू असताना संतोष वर्मा नाक्यावर आला आणि त्याने 'क' वर्गातल्या स्मिता दातारला पटवण्याचा सिनेमॅटिक प्लान आमच्यासमोर उघड करून सांगितला. सिव्हिल हाॅस्पिटलच्या बरोब्बर नव्वद अंशात 'संतोष चना मार्ट' हे जे लोकप्रिय फास्टफूडचे दुकान आहे. ते त्याच्या वडिलांनी ८० साली त्याच्या जन्मानंतर सुरू केले होते. त्याच्या घरात व्हीसीआर होता. सगळ्या नव्या सिनेमांच्या कॅसेट्स भाड्याने आणून त्यांच्याकडे रोज लोकप्रिय चित्रपट पाहिले जात. सुनील शेट्टी, संजय दत्त, सनी देओल, अक्षय कुमार यांचे सगळेच. त्यांतून कल्पना घेऊन त्याने हा प्लान आखला होता. तो साधारणत: असा होता.
स्मिता दातारच्या मागे एक पोरगा लावायचा. (तो पोरगा अनोळखी कुठून तरी तयार करून आणायचा) तो तिच्या पाठीमागे दोन-तीन दिवस जाईल. क्लासला जाताना. घराबाहेर फिरताना. शाळेत येताना-जाताना. मग तिसऱ्या-चवथ्या दिवशी आपण तिघे-चौघे तो मुलगा तिला त्रास देत असताना त्याला पकडायचे. थोडे मारल्यासारखे करायचे. तो पळून जाईल. मग स्मिता दातार थँक्यू म्हणायला माझ्याशी बोलायला येईल. मी तिच्याशी आधी मैत्री करेन. मग हळूहळू तिच्याशी मैत्री वाढवेन. मग सकारात्मक परिस्थिती वाटल्यास प्रपोज.'
'हा प्लान नक्की यशस्वी होईल. पण फक्त अडचण आहे की असा छपरी ॲक्टर – दोन-तीन दिवसांसाठी कुणाला तयार करायचं?' त्याला सुजीतची याबाबत मदत हवी होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाक्यावरून सायकल घेऊन सुजीतने मला आणि वर्माला राबोडी या भागात नेले. तिथे 'केतकर घोडेवाले' असे मराठी नाव असलेला उत्तर प्रदेशी माणसाचा तबेला होता. (त्यांची घोड्यांची एक शाखा घंटाळीच्या सहयोग मंदिराशेजारीही होती. ती लहान मुलांना भाड्याने घोड्याची सवारी घडवी.) आख्ख्या तळावपाळीवर फिरणारे टांगेवाले तेथे आपल्या घोड्यांसह या राबोडीतील परिसरात राहत असल्याचे पाहायला मिळाले. सुजीतने तिथे चौकशी करीत मुश्ताक नावाच्या पोराला पाचारण केले. घोड्यांची देखभाल करणारा आमच्या वयाचाच तो खूप सुंदर मुलगा होता. केस मानेपर्यंत होते. डोळे घारे होते आणि गालाला हसताना खळी पडत होती. त्याचे कपडे मात्र वाईट होते. सुजीतने त्याला एक आठवड्यासाठी दुपारी-संध्याकाळी शाळेवर येऊन काय करायचे ते समजावून सांगितले. त्यासाठी संतोष वर्माला दोनशे रुपये त्याला द्यायला लावले. शिवाय 'देवा शर्टस'च्या दुकानात नेऊन चांगल्या कपड्यांचे दोन जोड आणि ॲक्शनचे शूजही घेऊन देण्यास सांगितले.
नाव आणि मराठी भाषाही नीट बोलता न येणाऱ्या त्या मुश्ताकला खारकर आळीतल्या स्मिता दातारचा पाठलाग करून पुढल्या आठवड्यात तिला दोन-तीन दिवस छेडायचा प्लान आखला गेला. त्या प्लानच्या अंमलबजावणीदरम्यान वर्माने कोणती वाक्ये उच्चारावीत. चेहरा किती उग्र करावा, प्लान यशस्वी झाल्यानंतर स्मिता दातार 'थँक्यू' बोलण्याच्या पवित्र्यात गेल्यावर चेहरा किती स्थितप्रज्ञ ठेवावा इतपत सारी सिनेमॅटिक स्क्रिप्ट झाली. रंगीत तालमीला मुश्ताकला वर्माला स्मिता समजून 'प्रपोज' आणि छेडण्याचे दोन राऊण्ड यशस्वी केले गेले.
मी तेव्हा सुजीतकडे काही आक्षेप व्यक्त केले.
'या मुलाहून दुसरा कुणी तुला सापडला नाही का? हा जवळजवळ केस वाढलेला पण लहानसा जुगल हंसराज वाटतोय. 'आ गले लग जा' चित्रपटातील 'तेरे बगैर' गाणे म्हणणाऱ्या त्या कलाकारासारखा मुश्ताकचा चेहरा असल्यामुळे. याची भीती वाटणार नाही स्मिता दातारला.'
'मग त्याला घाबरवायला सांगू तिला.' हे सहज उत्तर त्याने दिले.
पहिल्या दिवशी मुश्ताकने शाळेपासून आपण तिचा पाठलाग करतोय, हे स्मिताला आणि तिच्या मैत्रिणीला कळू दिले. दुसऱ्या दिवशी दातार सदनपासून तिचा शाळेपर्यंत पाठलाग केला. तिसऱ्या दिवशी तिला हाक मारली. चौथ्या दिवशी ती आणि तिच्या मैत्रिणी त्याला आपल्यासोबत बोलत आणि चालत घेऊन जाऊ लागल्या. स्मिता दातारकडून या प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने मुश्ताकची स्क्रिप्ट गडबडली. त्याहीपेक्षा स्मिता दातारला आगंतुक रोडरोमिओपासून वाचवायला धावत जाणाऱ्या वर्माचा आविर्भाव रंगीत तालमीपेक्षा ओव्हर झाला. 'मादरचोद' ही स्क्रिप्टमध्ये नसलेली शिवी उच्चारली गेली. त्याने निवांतपणे तीन मुलींसह चालणाऱ्या मुश्ताकच्या कानाखाली मारली. त्याची काॅलर धरली. तेव्हा एका बाजूने स्मिता दातारने उजव्या हाताने वर्माचा गाल लाल केला. तर नीलिमा पेंडसेने डाव्या हाताने वर्माचा गाल शेकला.
'थोबाड्या. चल इथून. आम्ही बोलतोय ना त्याच्याशी. त्याचे आमच्याकडे काम आहे.' दोन्ही गालांवर पडलेल्या थपडांपेक्षा स्मिता दातारने उच्चारलेल्या या शब्दांनी वर्मावर सर्वाधिक वार केले. त्यात मुश्ताकने 'अब क्या करनेका भाय?' असे वर्मालाच विचारून या नाटकाची रुपरेषा उघड केली. परिणामी त्या तिघींनी या दोघांना हुसकावून लावले. आमच्याजवळ हे दोघे आले, तेव्हा सुजीत आणि माझी हसून हसून वाट लागली होती. 'बरं झालं. कोणत्याही रोडरोमियोला पटू शकणाऱ्या मुलीला पटवण्याच्या फंदात आता पडू नको.' हा सल्ला सुजीतने वर्माला दिला. खारकर आळीतून घराच्या दिशेने परतताना सुजीत तंतोतंत कुमार शानूच्या आवाजात 'दुनिया तो यार है गजब तमासा, गम है कही तो कहीपे है खुसी, आशा कभी है कभी है निरासा' हे गाणे त्यातल्या किशोर कुमारच्या याॅडलिंगसह गात होता. आशिकीतली गाजलेली जोडी सात वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर आणणारा 'गजब तमाशा' हा फ्लाॅप सिनेमा कुणालाच आज आठवत नसेल. पण वर्माच्या स्टंटचा बूमरँग झाल्यामुळे आणि सुजीतच्या कॅसेटमध्ये ते गाणे असल्यामुळे माझ्या विस्मृतीत जाण्याची शक्यता नाही.
गाणे क्रमांक ४ 'दीवाना दिल ढूंडे' अर्थात प्रत्येकाची लव्हस्थिती...
त्या वर्षाच्या दिवाळीपासून मी फटाके न वाजविण्याचा निर्णय कायम पाळला. त्या वर्षी फटाक्यांचे पैसे रिकाम्या ऑडिओ कॅसेट खरेदी करण्यासाठी मी वापरले. त्यात सोनीच्या एचएफ, ईएफ नाईण्टी होत्याच. शिवाय १८० मिनिटांची हिरव्या रंगाची 'एचएफएक्स वन ट्वेंटी' हीदेखील कॅसेट होती. जे.के. इलेक्ट्राॅनिक्स या एकाच दुकानात 'एचएफएक्स वन ट्वेंटी' मिळायची. टीडीकेच्या 'ए नाईण्टी', 'डी नाईण्टी', 'सी नाईण्टी', 'एमए नाईण्टी' यादेखील कॅसेट मी खरेदी केल्या होत्या. त्यातील 'एमए नाईण्टी'चे काळे-सोनेरी कव्हर खूप सुंदर दिसे. संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीत मी सुजीतच्या कॅसेटव्यतिरिक्तही कुमार शानूची गाणी ऐकता त्या गाण्यातील शब्दांची उगाचच खिल्ली उडवत होतो. 'इम्तेहान' चित्रपटामधील 'इस तरह आशकी का असर छोड जाऊंगा' हे गाणे कुमार शानूनेही गायलेले आहे आणि अमित कुमारनेही. त्या दोघांच्या आवाजाची तुलना करताना शानूचेच गाणे सर्वांत चांगले वाटत होते. 'सैनिक' चित्रपटातील 'मेरी वफाए याद करोगे', 'मोहरा' चित्रपटातील 'ऐ काश कही ऐसा होता, के दो दिल होते सीने मे', 'इम्तेहान'मधील 'चाहा तो बहुत, न चाहे तुझे' , 'सपने साजन के'मधील 'ये दुवा है मेरी रबसे' 'प्यार का साया'मधील 'हर घडी मेरे प्यार का साया', 'सलामी'मधील 'तुम्हे छेडे हवा चंचल', 'जान तेरे नाम'मधील 'रोने ना दिजीएगा', 'दिलका क्या कसूर'मधील 'मेरा सनम सबसे प्यारा है', 'फूल और अंगार'मधील 'चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे, अपना तुझे हम बनाऐंगे', 'दिलवाले'मधील 'कितना हसीन चेहरा', 'जीता था जिसके लिए' ही सगळी गाणी सुट्टीत प्रचंड रिकाम्या वेळेत ऐकताना डोके फिरायची वेळ यायला लागली. शाळेत प्रत्येकाच्या लव्हस्थितीला किंवा लव्हएण्डस्थितीला साजेसे गाणे कुमार शानूने तोवर गाऊन ठेवले होते. फराळ खाताखाता मी शाळेतल्या फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँगमधील गर्लफ्रेण्ड करण्यास इच्छुक असलेल्या मुलांच्या लव्हस्थितीला जुळवून पाहिले. बहुतेक सगळ्यांचीच स्थिती 'एक ऐसी लडकी थी, जिसे मै प्यार करता था' या गाण्याशी जुळत होती. आणि जेव्हा माझ्या लव्हस्थितीचा शोध घ्यायला गेलो तेव्हा 'माशूक' या चित्रपटातल्या 'दीवाना दिल धुंडे, माशूक एक ऐसी' या गाण्यावर मी अडकून पडलो. 'माया मेमसाब'मधील 'एक हसीन निगाह का'नंतर दिवाळीत हे गाणे मी सतत-सतत वाजवत राहत होतो. या गाण्याचे म्युझिक नदीम-श्रवण यांचे असेल, असा माझा समज झाला होता. पण सुजीतने माझ्या ज्ञानात भर पाडत 'श्याम सुरेंदर' नावाच्या संगीतकाराने 'माशूक'ची गाणी तयार केल्याचे सांगितले होते. त्या सिनेमातील 'कौन हो तुम जो अपना बनाए जाते हो' हे गाणे सर्वात लोकप्रिय झाले होते. त्यानंतर क्रमांक या 'दीवाना दिल धुंडे'चा होता. या सिनेमात आणखी दोन गाणी कुमार शानूने गायली होती. पण ती अजिबातच चालली नाहीत. श्याम सुरेंदरने बाझीगर या चित्रपटासाठी अन्नू मलिकसोबत काम केले होते. त्यातले 'ये काली काली आँखे' आणि 'बाझीगर ओ बाझीगर' या गाण्यांत मोठा वाटा श्याम सुरेंदरचाच होता पण चित्रपटातील गाण्यांसाठी पारितोषिक मात्र अन्नू मलिकला मिळाले, अशी काहीतरी नवीनच माहिती सुजीतने मला पुरवली होती.
दिवाळीच्या एका संध्याकाळी मी चरईतल्या चौरसियांच्या घरी सुजीतला भेटायला गेलो तर त्याने पानवाल्या बंगाल्याकडून 'दिलवाले' चित्रपटातील गाण्यांची बंगाली आवृत्ती मिळवली होती. ती तो मोठ्याने ऐकत बसला होता. 'कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखे'चे ते 'मिश्टी मिश्टी चेहरा, काजल काजल आँखे' असे व्हर्शन होते. तीन चार वेळा रिवाईंड करून ऐकल्यानंतर अचानक त्याने सायकल काढली. आम्ही उथळसरमधील बाबूटीव्ही अशा विचित्र नावाच्या दुकानात गेलो. तिथे बबलू नावाचा इसम आणि त्याचे वडील टीव्ही रिपेअर करीत होते. याच बबलूकडून सुजीत कॅसेट रेकाॅर्डर मशीन असेम्बल करून घेणार होता. त्याने एक पोर्टेबल स्पीकर बनवला होता. अगदी छोटासा. त्याला वाॅकमनच्या आकाराचा कॅसेट प्लेअर जोडला होता. कॅसेट प्लेअर आणि स्पीकर पाठीमागे सॅकमध्ये ठेवला तरी खणखणीत आवाज ऐकायला येत होता. तो स्पीकर त्याने माझ्यासमोर बबलूकडून त्या संध्याकाळपुरता मागितला.
बबलूकडून स्पीकर घेऊन आम्ही सायकलवरून पुन्हा त्याच्या घरी आलो. तिथे त्याने 'फिर तेरी कहानी याद आयी'ची कॅसेट घेतली आणि ती प्लेअरमध्ये जोडली. त्यानंतर आम्ही मंजिरी सावंतच्या इमारतीच्या खाली गेलो. तेथे त्याने दोनवेळा 'तेरे दरपर सनम, चले आये' वाजवले. फटाक्याच्या आवाजात ते पहिल्या मजल्यावरच्या खिडकीपर्यंत कितपत पोहोचले कुणास ठाऊक. पण आम्ही तिथे काहीच न बोलता दहाहून अधिक मिनिटे घुम्यासारखे उभे राहिलो. मग पुन्हा त्याच्या घरी गेलो. त्याने पानवाल्या बंगाल्याची कॅसेट त्या पोर्टेबल स्पीकरच्या प्लेअरमध्ये भरली. त्यात 'ये मौसम भी गया, वो मौसम भी गया, अब तो कहो मेरे सनम, फिर कब मिलोगे' या 'बलमा'तील गाण्याचे 'से फाल्गून तो इलो' हे बंगाली व्हर्शन ऐकायला येत होते.
चरईच्या चौकातून घरी जाण्यासाठी मी त्याचा निरोप घेतला, तेव्हा पाठीमागे लाईटच्या पोलला टेकून कुमार शानूच्या गाण्याच्या बंगाली व्हर्शनमध्ये बुडून मंजिरी सावंतला आठवत बसलेला त्याचा उदासवाणा चेहरा दिवाळीच्या वातावरणाशी फारच विसंगत वाटला. घरी येऊन मी 'ये मौसम भी गया, वो मौसम भी गया' हे हिंदी व्हर्शनमधील गाणे दोनदोनदा ऐकले. सुजीतची लव्हस्थिती त्यातील शब्दांत अचूक पकडण्यात आली होती.
त्यानंतर माझी स्थिती दर्शवणारे 'दीवाना दिल धुंडे, माशूक एक ऐसी' गाणे मी झोपेस्तोवर चारवेळा ऐकले. सुट्टी संपेस्तोवर सगळ्या रिकाम्या कॅसेट 'न्यू सिम्फनी'मधून मी नव्या गाण्यांनी भरून आणल्या. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेत मला माशुक धुंडाळावी लागली नाही. आयुष्यच बदलून टाकणाऱ्या घटना घडत गेल्या. त्याला डबलकॅसेट प्लेअर आणि लव्हसाँगची टाॅपटेन कॅसेट कारणीभूत ठरली होती.
गाणे क्रमांक ५ : किसीसे मुझे प्यार हो. गाणे क्रमांक ६ : हसरते है बहुत मगर अर्थात आशिक-माशूक वातावरण
'क' वर्गातल्या स्वप्ना गद्रेला एकदा पाहणाऱ्याच्या डोक्यात जर तो कुमार सानूचा फॅन असेल तर 'कही मुझे प्यार हुआ तो नही है' हे 'रंग' चित्रपटातील गाणे त्या काळात नक्कीच वाजत असणार इतकी ती सुंदर होती. अतिपांढरेपणापासून थोडी फारकत घेतलेले गोरे गाल. कुरळे केस आणि निळे डोळे. एका नजरेत समोरची व्यक्ती विरघळून जाईल असा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यामधून डोकावे. आठवीत सर्व वर्गांतून आलेल्या कमीत कमी पंधरा प्रपोज नाकारत त्या आत्मविश्वासात वाढ झाली होती. नववीत वनफोरथ्रीगँगमधील देवरेला भर रस्त्यात थोबाडीत देऊन तिने थोपवले होते. चरईत तिच्या इमारतीच्या जवळपासही तिच्यामागे मुलांची माळ लागून होती. गणेश टाॅकीजकडून एक रस्ता टेंभी नाक्याकडे तर दुसरा हायवेकडे जातो. त्या तिठ्यावर तिचे घर होते. आमच्या चरई चौकातील नाक्याच्या अलीकडे हा तिठा होता. 'राधा-कृष्ण निवास' नावाचे दोन माळ्यांचे बंगलेसदृश असे ते टुमदार घर होते. तिने माझ्यासारख्या 'ई' वर्गातील मुलाशी बोलण्याचे मला माझ्या स्वप्नातही खरे वाटले नसते. पण एक दिवस मधल्या सुट्टीत ती थेट ई-फ-ग तुकड्यांच्या मधोमध असलेल्या व्हरांड्यात माझ्याजवळ आली. आख्खी फुलपँटगँग या चमत्काराकडे डोळे फाडून पाहत होती.
'तुझ्याकडे डबल कॅसेट प्लेअर आहे ना? आमच्याकडे गेल्या आठवड्यात आणलाय. पण मला कॅसेट रेकाॅर्ड करता येत नाही. आज घरी येऊन ते कसं करायचं ते शिकवशील काय?'
असे थेट येऊन कुरळ्या केसांवरून हात फिरवत आणि निळे डोळे आणखी वटारलेले करून माझे गोंधळलेल्या स्थितीमधील उत्तर ऐकण्याच्या प्रतीक्षेत ती उभी राहिली.
'कोणते माॅडेल घेतलंय तुमच्याकडे?'
'फिलिप्स- डीआरएटटूएट'
'मग कॅसेट प्लेअरच्या उजव्या भागाला रेकाॅर्डिंग करायची ती रिकामी कॅसेट भरायची असते. डाव्या बाजूला ओरिजनल. उजव्या बाजूच्या प्लेअरची शेवटची दोन्ही बटनं एकत्रित दाबायची. पाॅजच्या बटनासह. हायस्पीड डबिंगही होतं त्यात.'
'हे तू काय बोललास ना ते मला अजिबात कळालेलं नाही. चरई चौकातल्या नाक्यावर रोज येतच असतोस, आज दोन-पाच मिनिटं घरी येऊन दाखव की कसं रेकाॅर्डिंग करायचं ते.' नाही ऐकायची सवय नसलेला अतिआत्मविश्वास तिच्या नजरेत आणि बोलण्यात उतरला होता.
'अरे एवढं काय, दाखवून देईल की केदार.' सुुजीतने तिला आश्वस्त केल्यानंतर ती निघून गेली. पण ई-फ-गच्या व्हरांड्यात 'घरी जाऊन दाखवून दे आता तिला' या वाक्यांचे अनेकार्थी समूहनाद दणाणत राहिले.
धोबीआळीतल्या आमच्या गीता सोसायटीतून मावळी मंडळात उडी मारून चालत शाॅर्टकट घेतला तर चरई तिठ्यावर पोहाेचायला तीन मिनिटे लागत. शिमला बारच्या जवळचा रस्ता घेतला तर साडेपाच मिनिटे. मी संध्याकाळी नाश्ता न करताच शाळेचे दप्तर घरी टाकून मावळी मंडळ मैदानातून धावत म्हणजे पावणेदोन मिनिटांत तिठ्यावर पोहोचलो. तिथून दिसणाऱ्या 'राधा-कृष्ण निवास'मध्ये त्याहून वेगात दाखल झालो. जणू उशिरा पोहोचलो, तर ती आणखी डोळे वटारत रेकाॅर्डिंग समजून घेण्याचा विचार सोडूून देईल या भीतीने. तिच्या घरी पोहोचलो, तर स्वप्ना गद्रे शाळेच्या ड्रेसमध्येच चहा घेत होती.
'आई, माझ्या शाळेतला मित्र आलाय. केदार भट. त्यालाही चहा भर.' मला मित्रत्वाचा खिताब देताना माझ्या आडनावासह माझी माहिती तिला होती, याचे मला आश्चर्य वाटले.
'तुझ्या नाव-आडनावासह माहिती आहेस तू मला. तू अनेकांना प्रेमगाण्याच्या कॅसेट भरून दिल्यास. त्यातल्या दहा प्रती माझ्याकडे भेट आल्यात. मला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून. शिवाय क्लास बंक करून तुझे चौकात चालणारे निरुद्योगही या इथून गॅलरीतून दिसतात.' माझ्या मनातील एकाच नाही, तर पुढे होऊ शकणाऱ्या दोन-तीन कुतूहलांचे तिने न विचारताच थोडक्यात उत्तर दिले होते.
शोकेसमध्ये मधल्या भागात व्हिडिओकाॅनचा कलर टीव्ही होता. त्यावर फिलिप्स डीआरएटटूएट कॅसेट प्लेअर होता. पिवळ्या रंगाचा, कंपनीकडून सोबत येणारा रुमाल त्यावर लावला होता.
'हा रुमाल पहिले फेकून दे. त्याऐवजी जुन्या जाड कापडाला रुमालासारखं कापून हे रोज पुसत जा.' ही अनावश्यक माहिती मी तिला दिली.
'रिकामी कॅसेट कोणती आहे तुझ्याकडे? आणि कोणती भरायचीए?'
'रिकामी कॅसेटच आणली नाही.'
'तुला गिफ्ट आलेल्या दहा कॅसेटपैकी एक काढ मग. यात आधीची गाणी पुसून आपोआप नवीन भरली जातात. पण भरायची कोणतीए?'
'माहिती नाही. मला फक्त त्याचे मॅकेनिझम कसं चालतं ते दाखवून दे.'
'पण रेकाॅर्ड करायला ओरिजनल कॅसेट कुठे?'
'या गिफ्ट आलेल्या दहा कॅसेट आहेत. सगळ्यात एकसारखीच गाणी आहेत.'
'थांब मी आलोच. घरून आणतो.' सांगत मावळी मंडळाच्या रस्त्याने जाऊन-येऊन आठव्या मिनिटाला चहा गरम अवस्थेत असतानाच मी दोन नव्या कॅसेट तिच्यासमोर ठेवल्या. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यात ती शाळेत दिसे, त्याहून अधिक खुलून दिसत होती. रेकाॅर्ड प्लेअरवरून दुसऱ्या कॅसेटमध्ये उतरविण्याचे तिचे प्रशिक्षण पाच मिनिटांत संपले. संपूर्णच्या संपूर्ण कॅसेट उतरवायची असेल तर हायस्पीड डबिंगसाठी सोडून कशी द्यायची. वेगवेगळ्या कॅसेटमधून वेगवेगळी गाणी रेकाॅर्ड करायची, तर पाॅझ बटन केव्हा दाबावे, गाणे सुरू करून ते केव्हा सोडावे म्हणजे दोन गाण्यातील गॅप सहज कशी भरून निघते. नाॅनस्टाॅपचा इफेक्ट आणण्यासाठी पाॅझ बटनाचा वापर कसा करावा, हे सगळे तिला नीट समजावून सांगितले. रिकाम्या कॅसेट सोनी-टीडीकेशिवाय कोणत्याही कंपनीच्या वापरायच्या नाहीत. स्टर्लिंग, टिप्स, टीसीरीजच्या कॅसेट घ्यायच्याच नाहीत. आठवड्याला हेड क्लीनरने हेड साफ करायचा, ही अवांतर माहितीही तिच्या गळी उतरवली. शेवटच्या दोन बटनांचा खेळ करून तिने एक गाणे दुसऱ्या कॅसेटमध्ये यशस्वीपणे उतरविले. तेव्हा मला तिने टेचात सांगितले.
'आता तुझी टाॅपटेन लव्हसाँग विसरशील अशी गाणी भरते बघ .'
'हो, पाहूयात. पण माझी निवडलेली गाणी चांगली नाहीत?'
'इम्प्रेस झाले ना मी. 'समा, ये सुहाना', 'दिल को छूके', 'छोडो भी ये गुस्सा' गाणी भारीच आहेत. पण त्याहून चांगली गाणी असलेली यादी मी बनवू शकते.'
'सगळी लव्हसाँग्ज?'
'हो. सगळी.'
'मग मीही दुसरी यादी बनवून देतो. बघूयात आपापल्या गाण्यांची चाॅईस.'
'ये बात. शनिवारी? इथेच घेऊन ये कॅसेट. तोवर मला नीट रेकाॅर्डिंग करता येईल आणि यादीचा विचार करता येईल.' तिने शनिवारऐवजी उद्या सकाळी, आज मध्यरात्री, तीन तासानंतर असे सांगितले असते, तरी मी नवी गाणी करून दिली असती. शनिवारपर्यंत मी पाच वेगवेगळे लव्हसाँग्ज व्हाॅल्यूम बनवू शकलो असतो.
'ठीके, शनिवार तुझ्यासाठी लांब वाटत असेल, तर दोन दिवसांत किंवा जेव्हा यादी होईल तेव्हा आण.' चेहरा वाचण्याचे आणि मनातल्या भावना ऐकण्याचे डिव्हाईस तिच्या डोळ्यांत आहे की काय, हा विचार मी करीत होतो. तर तेही तिने ताडल्याचे मला लक्षात आले.
'घरी धावत जाऊ नकोस रे. सुपर एक्सायटमेंटचीही ढोपरं फोडून घेशील.'
चाॅकलेट क्रीम असलेली बिस्किटे आणि चहा संपवून वर तिच्याहून दाट निळ्या डोळ्यांच्या आणि कुरळ्या केसांच्या तिच्या आईशी जुजबी बोलून मी 'राधा-कृष्ण निवास'मधून उतरलो. घरी जातानाचा रस्ता लाँगकट घेतला. शिमला बारजवळचा. न धावता. स्वप्ना गद्रेच्या थेट घरी जाऊन तिच्याशी काय बोललो, तिच्या आईचे डोळे डिट्टो तिच्यासारखे निळे आहेत, तिचे घर प्रचंड मोठे आहे, तिला आपल्या डोक्यात काय चालतेय याचा लगेचच छडा लागतो, तिला मी बनवून दिलेल्या लव्हसाँग्जमधील तीन गाणी खूप आवडलीत हे जगाला ओरडून सांगावेसे वाटत होते. शिमला बारच्या डाव्या वळणावर डोक्यात कॅसेट-टेपरेकाॅर्डरशिवाय सुुजीतच्या कॅसेटमधील 'किसीसे मुझे प्यार हो' हे 'इश्क मे जिना, इश्कमे मरना'मधील गाणे ऐकू यायला लागले.
घरी गेल्यानंतर जेवण करण्याच्या आधी माझी सोनीची सुपरईएफ सिक्स्टीची कॅसेट तयार झाली होती. त्यात पहिली दोन गाणी सुजीतच्या कॅसेटमधील भरली. 'किसीसे मुझे प्यार हो' आणि 'आतिश' चित्रपटातले 'हसरतें बहुत मगर'
माझी टाॅपटेन लव्हसाँग यादी. फक्त स्वप्ना गद्रेला देण्यासाठीची.
साईड ए
१. किसीसे मुझे प्यार हो – इश्कमे जीना इश्कमे मरना
२. हसरतें है बहुत मगर – आतिश
३. सुन सुन सुन बरसात की धुन सुन – सर
४. तुम्हारी नजरों मे हमने देखा – कल की आवाज
५. चेहरा क्या देखते हो, दिलमे उतरके देखो ना – सलामी
साईड बी
१. दीवाना दीवाना, मैं तेरा दीवाना – गजब तमाशा
२. दीवाना तो कह दिया – सौदा
३. मुझे तुझसे कितना प्यार है – पापी गुडिया
४. तुम्हे अपना बनाने की कसम – सडक
५. तुझे ना देखू तो चैन – रंग
माझ्या यादीत सगळीच गाणी नकळतपणे कुमार शानूची भरली गेली होती, जी सुजीतला आवडली असती. पण स्वप्नाला आवडतील की नाही, हे मला माहीत नव्हते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वादहा वाजता तिच्या घरी पोहोचलो. मला इतक्या लवकर कॅसेट घेऊन आलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य दिसले नाही.
'मला वाटलेलं काल रात्री किंवा पहाटेच येशील.'
'काय?' मी.
'काही नाही. मीदेखील तयार करून ठेवली आहेत गाणी.'
तिने गिफ्ट आलेल्या कॅसेटवरच तिची गाणी भरली होती. त्यावर 'लव्ह साँग्ज व्हाॅल्यूम वन' असे लाल मार्करने इंग्रजीत लिहिले होते.
चरई चौकात पोहोचण्याआधीच त्यावर बारीक अक्षरात देवनागरीत लिहिलेली दहाही गाणी मी वाचून काढली.
तिची टाॅप टेन लव्हसाँग यादी. जी फक्त मला देण्यासाठी बनली होती.
साईड ए
१. मौसम गुनगुना रहा है – सातवाँ आसमान
२. जवाँ हो यारो – जो जिता वोही सिकंदर
३. देखा तेरी मस्त निगाहोमे – खिलाडी
४. ऐ मेरे हमसफर – बाजीगर
५. आईए आपका इंतजार था – विजयपथ
साईड बी
१. तू रुठा तो मै रो जाऊंगी सनम – जवानी
२. सात समुंदर पार – विश्वात्मा
३. ये रात और ये दूरी – अंदाज अपना अपना
४. सीनेेमे दिल है – राजू बन गया जंटलमॅन
५. तू मेरे साथ साथ आसमाँसे आगे चल – राजू बन गया जंटलमॅन
तिची यादी माझ्यासाठी थोडी गोंधळवून टाकणारी होती. दहा बारा वर्षांपूर्वीचे 'जवानी' सिनेमामधील 'तू रुठा तो' त्यात कसे आले, ते ठरवता येईना. तिला शाहरुख आवडतो की सलमान की आमिर हे कोडेच बनले. कारण तिघांची गाणी त्यात होती. 'राजू बन गया जंटलमॅन'मधील ही दोन गाणी मलाही आवडत होती. पण 'जो जIता वोही सिकंदर'मधील सर्वाधिक वाजवल्या जाणाऱ्या 'पेहला नशा'ऐवजी तिने 'जवाँ हो यारो' हे निवडल्याचा मला आनंदच झाला. सगळे लोक जे ऐकत त्या 'सातवाँ आसमाँ'च्या गाण्यांमधून आवडीचे एखादे निवडणे कठीण. त्यात तिने 'मौसम गुनगुना रहा है' हे वेगळे गाणे बाजूला केले होते. घरी लवकर येऊन जेवण होईस्तोवर ही कॅसेट दोनदा ऐकली. मधल्या सुट्टीत सुजीतला या कॅसेट देवाणघेवाण कार्यक्रमाची कल्पना दिली. तेव्हा त्याचे मला चिडवणे सुरू झाले.
'वा बेटा. फुल हायस्पीड डबिंग लव्हस्टोरी?'
'ती मला मित्र मानते. त्यामुळे तेवढंच राहू द्यावं.'
'पण तू काय मानतोस? आम्ही काय मानावं? मित्राची मैत्रीण का आमची व्हयनी?'
त्याने मला ओढत 'क' वर्गावर नेले. मधल्या सुट्टीत शिस्तीत आपले डबे रिचवणाऱ्या फट्टूगँगच्या मुला-मुलींमध्ये आम्ही नजर टाकली. अमोद दांडेकर हात उंचावत आम्हाला भेटायला आला. तर निळे डोळे वटारून माझ्याकडे बघत पोळीची घडी करून मटकावणारी स्वप्ना गद्रे सुंदर हसली.
'हसरते है बहुत मगर, तुमसे मै क्या कहू, लेके बाहोंमे मैं तुम्हें प्यार करता हूं' हे 'आतिश'मधील गाणे मधली सुट्टी संपल्यानंतर पुढल्या इंग्रजीच्या, बीजगणिताच्या आणि पीटीच्या तासालाही माझ्या डोक्यातल्या कॅसेट प्लेअरमध्ये संपूर्ण कडव्यांतील शब्दांसह वाजत राहिले. शाळा सुटल्यानंतर फुलपँटगँगमध्ये उभा असताना स्वप्ना गद्रेने थेट मला बोलावले. तसे होण्याची वाट पाहत असल्यासारखा चुंबकीय शक्तीने मी तिच्या दिशेने ओढला गेलो.
पाठीमागून 'मित्रांना विसरला, मित्रांना विसरला!' अशा फुलपँटगँगमधून घोषणा यायला लागल्या. त्यांच्याकडे निळे डोळे रोखून पाहत माझ्या वतीने उत्तर देण्यासाठी स्वप्ना पुढे आली. मग हसत त्यांना म्हणाली.
'मग तुम्हीपण विसरून जा याला आता.' सुजीतसह सर्वांची तोंडे तिने एका अनपेक्षित आणि रोखठोक वाक्यात गप्प केली. सगळ्या फुलपँटगँगनी हसून आणि टाळ्या वाजवून तिच्या उत्तराला दाद दिली.
'नक्कीच. सांभाळा आमच्या मित्राला काकू.' या सुजीतच्या उत्तराकडे तिने दुर्लक्ष केले आणि वीर सावरकर पथावरून चरईकडे जाणाऱ्या रस्त्याने ती माझ्यासोबत चालू लागली. 'राधा-कृष्ण' इमारत विद्युतवेगाने जवळ आल्यासारखे वाटले. त्या दरम्यान दोघांच्या गाण्यांच्या यादीची चिरफाड झाली. 'जवानी' सिनेमातील जुने गाणे का आले, याचे कारण तिने सांगितले. वर 'पापी गुडिया' आणि 'सौदा' चित्रपटातील गाणी वगळता माझ्या यादीतील गाणी उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रकही दिले. त्याहून सकाळी क्लास बंक करून चरई चौकातील नाक्यावर उभे राहण्याऐवजी तिच्या घरीच येण्याचे निमंत्रण मला दिले. दुसऱ्या दिवशी तिच्या फिलिप्सच्या डीआरएटटूएटची साऊंड क्वालिटीसह आमच्या दोघांची यादी असलेली गाणी आम्ही माझ्या क्लासच्या वेळेत ऐकली. गॅलरीत उभे राहून चरई चौकात पाहिले तर नाक्यावर कैलास भोईर, सुजीत, वर्मा आणि विजय जाधव कोंडाळे करून विनोद करीत, एकमेकांना टाळ्या देत असलेले दिसले. त्यांच्यामध्ये आज नसलेला मी इथून कसा दिसत असेन याचे मनात एक चित्र रंगविले. पुढल्या थोड्याच दिवसांत चरईचा नाका माझ्यासाठी कायमचा बंद झाला, त्याला वेगवेगळी कारणे आणि स्वप्ना गद्रेचा पुढाकार कारणीभूत ठरला.
गाणे क्रमांक ७ मै दुनियाँ भुला दुंगा, गाणे क्रमांक ८ जबसे तुमको देखा अर्थात शाळेतला राडा...
बाबूटीव्ही या उथळसरमधील इलेक्ट्राॅनिक वस्तू दुरुस्तीच्या दुकानातून जो पोर्टेबल स्पीकर सुजीतने दिवाळीच्या संध्याकाळी मागून आणला होता, तसाच वेगळा स्पीकर जितेंद्र देवरेने बहुदा त्याच्याकडून बनवून घेतला होता. उथळसर आणि पोलीस लाईन जवळ असल्यामुळे कदाचित बबलूला देवरे ओळखत असावा. किंवा आपल्या वडिलांचा पोलिसी धाक दाखवून त्याने तसा स्पीकर तयार करायला त्याला भाग पाडले असण्याची शक्यता होती. शाळेच्या बाहेर त्यामुळे आख्खी वनफोरथ्रीगँग त्यातल्या म्युझिकल चमत्काराने हरखून गेली होती.
बापाचा मार खाल्ल्यानंतर मिळालेल्या सहानुभूतीतून शिल्पा भोईर आणि तिच्या लघुगुलकंदपेट्या असलेल्या मैत्रिणी यांच्यासमवेत बोलत त्यांना घरपर्यंत सोडण्याचे काम आतापर्यंत तो इमाने इतबारे पाळत होता. पण या स्पीकरच्या आगमनानंतर त्याच्यात म्युझिकमॅन संचारला. त्याच्या आवडीची झागर-मागर गाणी वाजवत तो शाळेबाहेरच्या परिसरात विनोद पसरवत फिरू लागला. 'अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगडा जाय' हे गाणे त्याच्या आवडीचे होते. 'तिकी तिकी तायतकायतकाय तुमतुम पकचिक पायपपायपपाय पूमपूम' हे बाबा सेहगलचे 'सुपरहिट मुकाबला'मधील विचित्र वेगात बोलणे त्याला जमत होते. याचा त्याला जणू आपण नववीतल्या सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क कमावल्यासारखा अभिमान होता. पहिल्या दिवशी स्पीकर आणल्यानंतर त्याने शिल्पा भोईर आणि तिच्या मैत्रिणीसोबत घरच्या रस्त्याने जाताना 'रूप की रानी, चोरों का राजा'ची कॅसेट लावून प्रवास केला. दुसऱ्या दिवशी रेडिओ प्रोग्रामवर नुकतेच लागू लागलेले 'निशाना' या येऊ घातलेल्या चित्रपटातील गाणे लावून त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले. 'हाहारी बलिहारी' हे गाणे इंग्रजीतल्या गाजलेल्या 'इट्स माय लाईफ' या गाण्याचे हिंदी डान्स व्हर्शन होते, हे नंतर कधीतरी कळाले. पण त्या वर्षी ते पोरांमध्ये खूप हिट बनलेले गाणे होते.
शिल्पा भोईरला मैत्रिणीसह घरी जाताना आपल्यासोबत चालणारा हा सांगीतिक प्रवास आजूबाजूच्यांचे नाहक लक्ष वेधून घेणारा आणि नकोसा वाटू लागलेला होता. पण आपल्याच संगीतधुंदीत असलेल्या देवरेने 'अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगडा जाय' आणि या 'बलिहारी' गाण्यांना पोर्टेबल स्पीकरवर सर्वांनाच वैताग येईस्तोवर ऐकवले होते. त्याचा त्यालाच कंटाळा आला तेव्हा 'जब भी कोई लडकी देखूं मेरा दिल दीवाना डोले ओले ओले ओले.' हे 'ये दिल्लगी'तले गाणे सुरू झाले आणि वनफोरथ्रीगँगच्या उरलेल्या सदस्यांना सांगीतिक प्रपोज मारण्याच्या कालावधीसाठी हा पोर्टेबल स्पीकर मिळू लागला. त्यातून होणाऱ्या गंमतीच्या घटना मधल्या सुट्टीत फुलपँटगँगसाठी खिल्ली उडविण्याचे विषय बनले.
सहामाही परीक्षेचा निकाल लागल्यानंतर बन्याने मुला-मुलींच्या घरी पाठविलेल्या पत्रांनंतर पालकांची एक मीटिंग झाली. त्यात अ, ब,क आणि थोड्या ड वर्गातल्या मुलांचे पालकच आले होते. कारण इतर वर्गातील मुलांच्या पालकांपर्यंत पत्रे पोहोचलीच नव्हती. त्यामुळे बन्याने या वर्गांसाठी नवा फतवा काढला. नव्याने पत्रे लिहून त्यावर पालकांची पत्र मिळाल्याची पोच आणि सही आणायला सांगितली. तेव्हा या सगळ्याच पाेरांनी आपल्या वडिलांची सही स्वत:च करून बन्यापर्यंत पोहोचती केली. बन्या या वर्गांकडे फार दुर्लक्ष करी. पण त्याच्या ऑफिसमध्ये खिडकीतून पडलेला मुताचा पाऊस याच वर्गांतील मुलांनी केला असावा, अशी त्याची खात्री झाली होती. त्यात त्या घटनेनंतर त्याच्याबरोबर केल्या जाणाऱ्या खोड्या कमी नव्हत्या. बजाज स्कूटरचा आरसा दोनदा वाकवला गेला होता. शीटवर चार च्विंगम डकवले गेले होते. टायर अनेकदा पंक्चर करून ठेवण्यात आले होते. या सगळ्यामागे ई-फ-ग वर्गातील द्वाड मुले असल्याचा त्याचा संशय होता. पण पुरावा नसल्याने बन्या काही करीत नव्हता. त्याने शिपायांना लक्ष ठेवायला सांगूनही कुणाच्या नजरेत मुद्दाम खोड्या काढणारा पोरगा दिसला नव्हता.
एका सोमवारी बन्याने 'क' वर्गाच्या फळ्यावर लिहिलेल्या इंग्रजी कवितेचे अक्षर बन्यालाच साॅलिड आवडले. रवींद्रनाथ टागोरांची 'लेट माय कण्ट्री अवेक' ही कविता होती ती. समजावून सांगताना स्वत:च्या अक्षराच्या प्रेमात पडलेल्या बन्याने पुढील तासांच्या शिक्षकांना 'फळा दोन दिवस पुसू नका' आणि आख्ख्या शाळेतील नववी-दहावी इयत्तेला हे अक्षर दाखविण्यासाठी 'क' वर्गाची सहल घडविण्याचे फर्मान सोडले. आमचे पुढले सगळे तास ऑफ झाल्यासारखे आम्ही 'क' वर्गात 'लेट माय कण्ट्री अवेक' या शीर्षकाने लिहिली गेलेली आणि काहीही अर्थ न समजणारी कविता पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी गर्दी करीत होतो. वनफोरथ्रीगँगला थेट वर्गात जाऊन पोरींवर लाईन मारायची संधी मिळाली. फुलपँटगँगच्या वर्माने कवितेच्या फळ्याऐवजी स्मिता दातारच्या चेहऱ्यावर उमटणारी अक्षरे पाहण्यासाठी 'क' वर्गातील मुलांच्या बेंचचा आधार घेतला. हुशारांच्या 'क' वर्गात बसण्याचा अनुभव या निमित्ताने अभ्यासगरीब मुलांना घेता आला.
बन्याचा हस्ताक्षराचा फळा शाळेने त्याच दिवशी फ्रेम करून शाळेच्या बोर्डवर लावला असता तर बरे झाले असते, अशी परिस्थिती दुसऱ्या दिवशी निर्माण झाली. कारण बन्याच्या त्या सर्वांत सुंदर हस्ताक्षरावर गुटखा खाऊन पिंका टाकण्याचा उद्योग कुणी तरी केला हाेता. त्या अपमानाने भडकलेल्या बन्याने पटांगणात ड-ई-फ-ग वर्गातील संशयित मुलांची काठीने परेड सुरू केली होती. गुटखा खाणारे आणि न खाणारे असे बरेच संशयित त्यात होते. फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँगमधील निम्मी पोरे गुटखा आणि मावा खात. पण शाळेतल्या फळ्यावर गुटखा खाऊन पिंकायची कल्पना त्यांनी कधी केली नसती. तरी यातल्या सर्वांनाच न केलेल्या गुन्ह्याबद्दल मार पडत होता. त्यातल्या कुणी हे कृत्य केलेच नसल्यामुळे कबूल करण्याचा प्रश्न नव्हता. त्यात नेमके जितेंद्र देवरेच्या खिशात गुटख्याचे पाकीट सापडले आणि त्याला गुन्हेगार ठरवून बन्याने कुत्र्यासारखा मारला. तो मार त्याला काहीच वाटला नसता, पण घरी विठ्ठल देवरे यांच्या नावाने शिपायासह पाठवलेले पत्र थेट विठ्ठल देवरे यांच्या हाती पडल्यामुळे आपल्या कुठल्या तरी अवयवाची आज धडगत नाही, याची खात्री देवरेला झाली. गावठी टाकून त्याला क्रिकेटच्या बॅटने बडविण्यात आले. मध्ये आलेल्या आईलाही बॅटचा मार बसला. पण विठ्ठल देवरे दमेस्तोवर जितेंद्रला बाॅल समजून सेंच्युरी मारल्यानंतरच गप्प बसले.
जितेंद्र आपल्या बापाला 'अण्णा' संबोधत असे. दुसऱ्या दिवशी डोक्यावर तीन ठिकाणी बॅण्डेड आणि गाल सुजलेल्या अवस्थेत कैद्यासारखा जितेंद्रला त्याच्या अण्णांनी बन्याच्या केबिनमध्ये उभा करून त्याची माफी मागितली.'पुन्हा याने असे केले, तर इथेच त्याला गाडेन.' या भाषेत बन्याला आश्वस्त केले. जितेंद्रचा गाल सुजलेला वेदनेने भरलेला अवतार पाहून 'त्याला आज घरी घेऊन जा.' असे बन्याने सुचविले.
पुन्हा अण्णासोबत शाळेच्या आवारातून त्याला जाताना पाहताना फुलपँटगँगची पोरे चेकाळली होती.
'अण्णा देख तेरा मुंडा बिघडा जाए, बुर्रा' अशी जोरदार हाळी सुजीतने दिली, तेव्हा त्याचा संदर्भ लागलेली तिथे उपस्थित असलेली सारी पोरे-पोरी खिदळून हसली.
आठवड्याभराच्या शांततेनंतर जितेंद्र पाटीलची सूज उतरली. पण न केलेल्या गुन्ह्याबद्दल सूड उगविण्याची त्याची इच्छा जोरात उफाळली. त्याने आठवड्यातच हेर पेरून गुटखा खाऊन थुंकणारा आणि वर साळसूद बनणारा दुसरा-तिसरा कुणी नसून 'क' वर्गातला अमोद दांडेकर आहे, हे शोधून काढले. त्याला शाळा सुटल्यानंतर पकडून खाली पाडून मारायला सुरुवात केली. फट्टूगँगमधील कुणीच त्याला मदत करायला उतरले नाही, तेव्हा सुजीत मध्ये उतरला. त्यानंतर फुलपँटगँगमधील सारी पोरे अमोद दांडेकरच्या बाजूने उभी राहिली. थोड्यावेळाने दांडेकर राहिला बाजूला पण वनफोरथ्रीगँग आणि फुलपँटगँगमध्ये घमासान मारामारी झाली. मीदेखील जवळ असल्याने त्यात घुसलो. अमोद दांडेकरच्या अंगात बळ संचारल्यासारखा तोही जितेंद्र देवरेला गुद्दे मारत होता. त्याच्या तोंडावर जितेंद्र फटके देत होता. हाणामारीचा हा घोळका वीर सावरकर पथाच्या मध्यभागी पोहोचला. डुक्कर गल्लीकडे सरकला. ई-फ-ग वर्गातील पोरे आपापला गट राखून दुसऱ्यांना मारण्यात समाधान मानत होते. जवळ असलेल्या कामत फोटो स्टुडिओच्या मालकाला बन्याने सांगितले होते की, इथे मारामाऱ्या झाल्या तर तुम्ही थेट फोटो काढा. त्याचे पैसे आम्ही देऊ. मारामारी करणारी मुले कोण आहेत, हे आम्हाला कळेल आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल. या मारामारी काळातच कामत फोटो स्टुडिओमध्ये उपस्थित असलेला वृत्तपत्राचा फोटोग्राफर किस्तू फर्नांडिस याने आपला कॅमेरा बंदुकीसारखा चालविला. कामत स्टुडिओकडून फोटो बन्याकडे येण्याच्या आधीच शहरातील 'ठाणे जगन्मित्र' या दैनिकाच्या पहिल्या पानावर शाळेतील मारामारीचे छायाचित्र झळकले. शाळेची बदनामी झाली. आपल्या मुलाचा मारामारी करतानाचा फोटो पाहून विठ्ठल देवरे यांनी सुट्टी टाकून घरी जितेंद्रला दम भरत पुन्हा मारले.
'क' वर्गातला अमोद दांडेकर, 'इ' वर्गातला मी, 'ग' वर्गातला सुजीत यांच्यासह आणखी सात जणांच्या पालकांची बन्यासह एकत्रित बैठक बोलावली गेली. अमोद दांडेकरसह सगळ्यांना शेवटची संधी सांगत सोडून देण्यात आले. पण या सगळ्या प्रकारामध्ये माझा सहभाग असल्यामुळे स्वप्ना गद्रेने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थेट माझ्या घरी येऊन आई-वडिलांना क्लास बंक करून चरईचौकातील उनाडक्यांबद्दल सांगितले. वर 'याचा क्लास बदला, तिथल्या मुलांपासून लांब राहिला तरच हा सुधरू शकेल', हा आगीत तेल ओतणारा सल्लाही दिला. पुढले चार दिवस ती माझ्याशी शाळेतून बाहेर पडल्यानंतर बोलायलाही आली नाही आणि तिने मला फुलपँटगँगमधून बोलावूनही घेतले नाही. दुसऱ्या आठवड्यात शाळा सुटल्यावर माझ्याकडे रागाने पाहत मला फुलपँटगँगमधून ओढून नेले.
'पुन्हा या नाक्यावर दिसलास तर माझी ओळखच विसरायची.' या धमकीनंतर दुसऱ्या दिवशी तिने मला धोबीआळीतल्याच पानसरे सरांच्या क्लासमधे नेले. कुठल्याही शाळेत न शिकवणारा हा माणूस नापास मुलांसाठी वेगळे क्लास घेत होता. पण त्याच्या कलानुसार क्लासला येण्याची तयारी असेल, अशाच मुलांना तो शिकवी. सकाळी पावणेसहा वाजता त्याने गणिताच्या क्लासला बोलावले. 'ही वेळ कबूल असेल तरच ये.' असे सांगितले.
मी आयुष्यात कधीच पाच वाजता उठलो नव्हतो. पण त्या दिवशी पावणेसहा वाजता पानसरे सरांच्या क्लासमध्ये गेलो. माझ्या प्रगतीपुस्तकात गणितातील प्रगती पाहून त्यांनी बैजिक राशींच्या मुळापासून, म्हणजे पाचवीतल्या पुस्तकापासून गणित समजावून सांगायला सुरुवात केली. आठवड्याभरातच गणित आणि भूमिती हे विषय आपल्यालाही जमू शकतात, याचा आत्मविश्वास पानसरे सरांनी मला दिला. सकाळी पाच वाजता उठण्यासाठी रात्री साडेनऊ-दहालाच मी आपोआप झोपू लागलो. क्लास सुटल्यानंतर सकाळी स्वप्ना गद्रेच्या घरी आठवड्यातले दोन-तीन दिवस जाऊ लागलो. गाण्यांवर चर्चा करता करता तिथल्या गॅलरीतून दिसणाऱ्या चरई चौकातला नाका पाहू लागलो. नऊमाही परीक्षा येईस्तोवर गणित-भूमितीतील आकृत्या, समीकरणे आणि आलेख मला येऊ लागले. स्वप्ना गद्रेकडे पाहत राहिल्यानंतर तिचे मोठे डोळे आणखी वटारल्यासारखे होत. दामिनी चित्रपटातील 'जबसे तुमको देखा है सनम' या गाण्यात ऋषी कपूरच्या मनातून दिसणारी मीनाक्षी शेषाद्री त्याच्यावर डोळे वटारते त्याहून अधिक स्वप्नाचे निळे डोळे वटारले जात.
तिने त्या दिवशी माझ्या मनात सुरू असलेला कॅसेट प्लेअरही कसा ऐकला कुणास ठाऊक. पण 'नऊमाही परीक्षेत पास झालास, तरच तुझ्या मनातील गाण्याला अर्थ आहे.नाहीतर त्या सगळ्याला शून्य किंमत' याची जाणीव मला थेट सांगून करून दिली. ते गाणे 'मैं दुनिया भुला दुंगा, तेरी चाहत मे' हे होते. पुढल्या तीन आठवड्यात मी सुजीतला भेटायला चरई चौकात गेलो नाही. पानसरे सरांमुळे गणित, विज्ञान आणि इंग्रजीविषयी रुची वाढली. पास होणे ही माझ्यासाठी सहजगोष्ट बनली. चांगले मार्क मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली.
गाणे क्रमांक ९ यादों के सब जुगनू , गाणे क्रमांक १० किस्मत का तो अर्थात शालान्तपूर्व वर्षाचा द एण्ड…
फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँगच्या हाणामारीमुळे शाळेच्या बदनामीचा मोठा प्रकार झाला. पण त्यानंतर बन्याच्या बैठकीला आलेल्या यातील बहुतांश मुलांच्या पालकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहून नववीतल्या 'फ' आणि 'ग' तुकड्यांबाबत खरोखरच इतर शिक्षक कनवाळू झाले. या मुलांचे गणित-इंग्रजी सुधारण्यासाठी शाळा सुटल्यानंतर एका तासाचे विशेष वर्ग घेण्यात आले. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर तयार होणारे नववीच्या मुलांचे नाके बंद झाले. वाघसरांच्या क्लासमध्ये कधी नव्हे इतकी पूर्ण उपस्थिती दिसू लागली. सुजीत, वर्मा हीदेखील चरई नाक्यांवरून अदृश्य झाली. दोन-दोन दिवस एकही गाणे न ऐकता मी शिस्तीत अभ्यास करू लागलो. डोक्यातला कॅसेट प्लेअर वाजून माझ्या मनात अभ्यासात अडथळा बनू लागला की निळे डोळे वटारणारी स्वप्ना गद्रे दिसू लागे. मग तो कॅसेट प्लेअर आपोआप पाॅझ होई. तिच्या घरी जाण्याची मला मुभा होती. तिथे गच्चीवर किंवा गॅलरीत आम्ही गप्पा मारत असू. कधी माझ्या घरी ती येई. सोनी-टीडीकेच्या भरून घेतलेल्या माझ्या पाच-सहाशे कॅसेटचे कलेक्शन पाहायला आणि त्यावरची गाणी वाचत बसायला तिला आवडे. गप्पा करताना माझ्या मनात चालणाऱ्या सगळ्या गोष्टी तिला कशा कळतात, हे मला कधीच कळाले नाही.
नऊमाही परीक्षेत 'ई' वर्गाचा निकाल पंधरा टक्के लागला. सर्व विषयांत पास होणाऱ्या मुला-मुलींमध्ये अर्थातच मी होतो. 'फ' आणि 'ग' वर्गाचा निकाल १०० टक्के नापासच होता. पण त्यातल्या त्यात चार विषयांत पास होणारे आणि इंग्रजी-गणितात थोडक्यासाठी हुकलेले खूप जण होते. 'क' वर्गाचा निकाल १०० टक्के पास असा होता. 'ड' वर्गातील पन्नासच टक्के मुले पास झाली आणि 'ब' वर्गातील साठ टक्के.
बन्या अ-ब-क वर्गाच्या सुधारलेल्या निकालावर खूष होता. त्याने 'क' वर्गाचे विशेष अभिनंदन केले. 'फ' आणि 'ग' वर्गावर मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना आणखी प्रयत्न करण्यासाठी आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले. शारदोत्सवात 'ई', 'फ' आणि 'ग' वर्गातील मुलांनाही सहभागी करून घ्यावे असा नवा आणि दयार्द्र फतवाही त्याने शिक्षकांसाठी काढला.
एकही लाल शेरा नसलेले प्रगतिपुस्तक पाहून माझे मलाच आश्चर्य वाटले. शाळा सुटल्यानंतर स्वप्नाला ते दाखवताना मला जे करावेसे वाटत होते, ते कळत नसल्याचा आविर्भाव आणत तिने माझे अभिनंदन केले.
'शाळेत अभूतपूर्व हाणामारी झाली नसती आणि तुझ्याशी ओळखच झाली नसती, तर हे झालं असतं का?' हे मी तिला विचारले. तेव्हा तिने या प्रश्नावर पहिल्यांदाच डोळे न वटारता हसून प्रतिसाद दिला.
'दप्तर घरी टाकून थोड्या वेळाने रस्त्यातून अजिबात न धावता घरी ये. तुझ्यासाठी माझ्या डोक्यातल्या कॅसेट प्लेअरमधली गाणी एका कॅसेटमध्ये भरली आहेत, जी तुला कधीच ऐकवली नसती. पण पास होऊन दाखवलेस त्याची भेट म्हणून आज खास.'
तिच्या घराजवळूनच मी मावळी मंडळाचा रस्ता धावत पकडला. तेव्हा पाठून तिने जोरात ओरडून सांगितले. 'धावत जायची गरज नाही. उशिरा आलास तरी मी कॅसेट देण्याचा निर्णय बदलणार नाही.' पण मी कसला ऐकणार होतो.
तिने खास रेकाॅर्ड केलेल्या सोनी-सुपरईफ सिक्स्टीच्या कॅसेटवर 'लव्ह साँग्ज फाॅर यू' हे लाल मार्करने लिहिले होते. नेहमीपेक्षा अधिक धावत पोहोचल्यामुळे त्यातली गाणी तिच्या वटारलेल्या डोळ्यांच्या देखरेखीत मला दम खात वाचावी लागली.
साईड ए
१. होटों पे बस तेरा नाम है – ये दिल्लगी
२. साथिया तूने क्या किया – लव्ह
३. तुम किस लिए हो बेकरार – पहला नशा
४. वादा रहा सनम – खिलाडी
५. अगर जिंदगी हो, तेरे संग हो – बलमा
साईड बी
१. देखा है पेहली बार साजनकी आँखोमे प्यार – साजन (विथ झंकार बीट्स)
२. जानी जानी जानी मैं हू तेरी रानी – अशांत
३. तुमसा कोई प्यारा, कोई मासूम नही है – खुद्दार
४. ऐसी दिवानगी देखी नही कहीं – दीवाना
५. यूंही कट जाएगा सफर साथ चलनेसे – हम हैं राही प्यार के
तिच्या गच्चीवर कठड्याजवळ उभे राहून प्रत्येक गाणे वाचून तिच्याकडे पाहताना गंमत वाटत होती. थोड्या वेळाने तिने माझा हात घट्ट पकडला. त्यानंतर डोळे वटारूनच मला सांगितले.
'किमान दोन वर्षं यापलीकडे मी रोमॅण्टिक होऊ शकणार नाही. त्यामुळे ते पक्कं लक्षात ठेवायचं आणि आत्ता डोक्यात येणारे फिल्माटलेले विचार तात्काळ आवरायचे.'
'तुला काय दिसतंय माझ्या डोक्यातलं? आत्ता या क्षणाला? फिल्माटलेले म्हणजे? आणि कोणतं गाणं वाजताना ऐकू येतंय?'
'कुठलंही गाणं वाजत नसलं तरी आत्ता जे सांगते ते डोक्यात कायम वाजवत ठेवायचं. 'संभाला है मैने, बहोत अपने दिलको.' या गाण्यात जे सांगितलंय ते आणि सगळ्याच गोष्टी सांभाळून ठेवायच्या. किमान काॅलेजात जाईस्तोवर.'
तिच्या घरातून निघाल्यानंतर लाँगकटमध्येही 'जो जीता वोही सिकंदर'मधल्या आमिर खानसारखे 'पहेला नशा' गाणे स्लो मोशनमध्ये गात जाण्याची इच्छा मला झाली. शिमला बार, मधली रद्दीची दोन मोठी दुकाने, धोबीआळीतल्या पानसरे सरांच्या स्नेहल अपार्टमेंटजवळील कचराकुंडी या सगळ्याच गोष्टी सुंदर दिसत होत्या. घरी गेल्यानंतर पाच वेळा स्वप्नाने दिलेली कॅसेट डेकवर गरम होईस्तोवर मी आलटून-पालटून झोपेस्तोवर ऐकत राहिलो. 'पहला नशा'मधील 'तुम किस लिए बेकरार' हे गाणे इतके आवडले होते की, तीन वेळा रिवाइंड करून ते ऐकले होते.
पुढले पंधरा दिवस वायूवेगाने सरले. क्रीडास्पर्धा आणि स्नेहसंमेलनाची जोरदार सुरू झाली. यापूर्वी 'अ-ब-क-ड' या वर्गांतील मुलांनाच नाटक, नृत्य-गायन-वादन आदी कलांमध्ये सहभागाची परवानगी होती. 'ई', 'फ' आणि 'ग'मधील द्वाड मुले-मुली या प्रवाहापासून वंचित ठेवली गेल्यामुळे या कार्यक्रमांचे ते केवळ प्रेक्षक बनून कार्यक्रमांची खिल्ली उडवण्यासाठी सक्रिय होत.
नेहमीप्रमाणे शाळेतील क्रीडा स्पर्धांत सुजीत, जितेंद्र देवरे, कैलास भोईर यांना सर्वाधिक पारितोषिके मिळाली. त्यानंतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागाची परवानगी मिळाल्याच्या निमित्ताने फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँग यांना एकत्र आणण्यासाठी ओजाळे सरांनी या वर्गातील मुलांना आणि मुलींना रेकाॅर्ड डान्स बसविण्यास सांगितले. त्याला आधी कुणी तयारच होत नव्हते. मग मुलींनी पुढाकार घेतल्यानंतर मुले बुजत बुजत तयार झाली. तीन वर्गातील मुलींनी 'हम आपके है कौन'मधील 'मौसम का जादू है मितवा' या नृत्यास पोषक नसलेल्या गाण्यावर समूह नृत्य बसवायचे ठरविले. तर मुलांनी कोणत्या गाण्यावर नृत्य करायचे यावरून त्यांच्यात वाद झाले. शेवटी फुलपँटगँगच्या सुजीतने नृत्यासाठी वेगळे गाणे स्वीकारले आणि वनफोरथ्रीगँगच्या देवरेने वेगळे. पण ते कोणते असेल हे त्यांनी काही दिवस गुलदस्त्यातच ठेवले. नेहमी स्नेहसंमेलनातील रेकाॅर्ड डान्स स्पर्धा गाजविणाऱ्या 'अ-ब- क' वर्गातील सुंदर मुलींनी 'मोहरा' चित्रपटातील 'टिपटिप बरसा पानी'वर नृत्य करायचे योजले. त्यांच्यात स्मिता दातार ही निपुण नृत्यांगना असल्यामुळे त्या गाण्याचा चेहरामोहरा आणखी सुंदर होणार याची सर्वांना खात्री होती. या वर्गांतल्या मुलांनी 'मै खिलाडी, तू अनाडी'तल्या 'चुराके दिल मेरा' या गाण्यावर नाचायचे ठरविले. अमोद दांडेकर त्या नृत्याचा म्होरक्या होता.
आठवडा-दीड आठवडा मुलांनी शाळा भरण्याआधी-शाळा सुटल्यानंतर आपापल्या नृत्यांची प्रचंड प्रॅक्टिस केली. सुजीतने जागृती सिनेमातील 'आयेगा आयेगा, बिछडा यार हमारा' या गाण्यावर सादरीकरण करायचे ठरवले. जितेंद्र देवरेने 'राजा बाबू' सिनेमातील 'पाक चिक पाक राजाबाबू' या गाण्यावर नृत्य करायचे ठरविले. पण या नृत्याची गंमत आणखी वेगळी होती. त्याने गोविंदासारखे विचित्र-विनोदी नाचायचे न ठरवता ज्या दक्षिणी चित्रपटातून हे गाणे चोरण्यात आले होते, त्यात प्रभुदेवा नावाचा कुणी तरी जसे नृत्य करीत होता, तसे नाचायचे ठरविले होते. त्यामुळे त्याला सगळेच जण हसत होते. येता-जाता त्याची फिरकी घेत होते. 'अण्णाचा मुलगा मद्राशी अण्णांच्या गाण्यावर नाचणार', अशी त्याची खिल्ली उडवत होते. त्याची नेहमीप्रमाणे फजिती होणार अशी तो सोडून सर्वांना खात्री होती. या सर्व सहभागी मुलांना कॅसेटमध्ये गाणी भरून देण्याचे काम मी केले होते. त्यामुळे त्यांच्या काही तालमींना मी हजर होतो. पण माझे स्वारस्य स्वप्ना गद्रे 'अ-ब-क'तल्या मुलींच्या नृत्यात स्मिता दातारच्या बाजूला नाचत होती, त्यात होते. बन्याने त्याच्या ओळखीतल्या नृत्यनिपुण कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणले होते. त्यांनी मुलांना जे काही शिकवले त्याचे अंतिम फळ स्नेहसंमेलनाच्या दिवशी दिसून आले. नाटक, गायन, वक्तृत्त्व स्पर्धा आदींनंतर शेवटचा कार्यक्रम हा नृत्याचा होता. त्यासाठी पटांगण सातवी ते दहावीच्या मुला-मुलींनी भरले होते.
पोरा-पोरींनी रंगीत तालमीपर्यंत घरातील कपडे घातले होते. पण अंतिम नृत्य शहरातील अनिस ड्रेसवाला या भाड्याने कपडे पुरविणाऱ्या दुकानातून आणलेल्या पोशाखात केले. ज्यात ते सगळे खरे कलाकार म्हणून शोभून दिसत होते. त्या संध्याकाळी शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या इतिहासातील सर्वोत्तम नृत्य हे 'ई-फ-ग' वर्गाकडून झाले. ज्यांना कधी सहभागीच होऊ दिले गेले नाही, त्या वर्गाकडून बन्याला फार काही अपेक्षित नव्हते. पण त्याच मुलांनी आख्ख्या शाळेला सुखद धक्का दिला. म्हणजे सुरुवातीच्या 'अ-ब-क'च्या मुलींनी केलेल्या 'टिपटिप बरसा पानी' नृत्याला प्रचंड टाळ्या पडल्या. त्या वर्गातील मुलांच्या 'चुराके दिल मेरा'त अमोद दांडेकरने स्वत: बसविलेल्या वेगळ्या नृत्याचेही कौतुक झाले. पण आख्खा मुला-मुलींचा प्रेक्षकवर्ग आपल्या जागेवरून उठून नाचू लागला तो देवरेच्या 'राजाबाबू' गाण्याला दक्षिणी नृत्यामधून सादर केल्यामुळे. गोल फुगीर-बॅगी पँट-ढगळ शर्ट आणि टोपी या पोशाखात त्याच्या शरीर अशक्य लचकवत चालणाऱ्या उड्या आणि पदन्यास पाहून बन्या आणि साऱ्या शिक्षकांनी तोंडात बोटे घातली. त्याची नंतर प्रत्येकाने स्वतंत्ररीत्या पाठ थोपटली. पाचवीनंतरच्या शाळेच्या चार वर्षांच्या इयत्तेत सहा वर्षे राहून पाठ धोपटण्याऐवजी कौतुकाने थोपटली जाण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.
सुजीतने सादर केलेल्या नृत्यात नाचणे कमी होते पण अभिनय जबदरस्त होता. 'आयेगा आयेगा बिछडा यार हमारा'च्या नृत्यात त्याच्या बाजूला वर्मा आणि कैलास भोईर यांनी नाचणाऱ्या जोकर्सची भूमिका केली. ज्यात त्याची आणि मंजिरी सावंतचीच गोष्ट तीन मिनिटे अठ्ठावन सेकंदांत अद्भुतरीत्या मांडली होती. ती ज्यांना माहिती होती, त्यापेक्षा अजिबात माहिती नसणाऱ्यांनाही रडवणारी ठरली होती.
या सर्व नृत्यांनंतर बन्याने भावूक होत बरेच मोठे भाषण ठोकले. ई-फ-ग वर्गांवर आत्तापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या झालेल्या अन्यायाची कबुलीही दिली. जी साऱ्या शाळेला थक्क करणारी होती. बन्याने देवरेच्या सादरीकरणाला पहिल्या क्रमांकाचे, सुजीतला दुसऱ्या क्रमांकाचे आणि अ-ब-क वर्गाच्या अमोद दांडेकरला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले. या पारितोषिक घोषणेनंतर पटांगणात जो कल्ला झाला, तो त्याआधी आणि त्यानंतरही कधीच झाला नाही असे शिक्षक आजही सांगतात. त्या एकट्या संध्याकाळी शाळेतील 'स्टार कलाकार' म्हणून सुजीत आणि देवरेचे झालेले छप्परफाड कौतुक त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कौतुक म्हणून त्यांच्या मनात गोंदले गेले, हे शाळेत तेव्हा उपस्थित असलेला कुणीही सांगू शकला असता. आत्ताही त्यांना शोधून काढून विचारले, तर कुमार शानूच्या 'यादोंके सब जुगनू' गाणे म्हणत ते १९९४ सालातील स्नेहसंमेलनाच्या त्या संध्याकाळच्या आठवणीत जातील.
स्नेहसंमेलनाच्या कौतुक सोहळ्यानंतर सहामाही परीक्षेची धामधूम वाढली. जानेेवारीत दिवस लहान-लहान होत शाळा अंधारात सुटायला लागली. फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँगमधील काही जणांनी मला गणित शिकवणाऱ्या पानसरे सरांचा क्लास लावण्याची तयारी दर्शवली. दीड महिना परीक्षेला असताना सुजीतही गणित शिकवायला त्यांच्याकडे मनधरणी करू लागला. पण सकाळी पावणेसहाला पेपर आणि दुधाचा रतीब घालणाऱ्या सुजीतला त्यांच्या क्लासची वेळ जमेना. तेव्हा पानसरे सरांनी त्याच्यासह वनफोरथ्रीगँगच्या काही मुलांसाठी रात्री दहा वाजताचा वेगळा वर्ग घेतला. या सर्वांचा पाचवीपासून राहिलेला गणिताचा पाया आधी त्यांनी पक्का केला. त्यानंतरच्या दोन आठवड्यात त्यांच्य चेहऱ्यावर गणित सोडविण्याचा आत्मविश्वास ओसंडून वाहू लागला. नृत्यपुरस्कार मिळाल्यानंतर आलेल्या आत्मविश्वासाहून तो अधिक होता. परीक्षेच्या आदल्या आठवड्यापर्यंत सुजीतसह फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँग पास होण्याची शक्यता निर्माण झाली. पण परीक्षेच्या दोन दिवस आधी सुजीतबाबत वेगळी घटना घडली, जिने त्याचे परीक्षेतील स्वारस्य संपवून टाकले. पानसरे सरांनी अगदी थोड्या दिवसांत आपल्या क्षमतेपलीकडे शिकवून त्याला गणिताच्या शून्यज्ञानापासून बऱ्याच वर आणले होते. त्यानेही गणितावर लक्ष पूर्ण एकाग्र करत समीकरणांची उकल करण्याचा आनंद मिळविला होता. पण त्याच्या आयुष्याचे समीकरण कधीही न सुटणाऱ्या गुंतागुंतीचे बनले होते.
त्याच्या आईने 'चौरसिया कुटुंबाने आपल्या मुलाला पळवले' असल्याची खोटी तक्रार पोलिसात दाखल केली. चौरसिया कुटुंबाच्या आश्रयात सुखाने जगत असलेल्या सुजीतचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी त्याच्या आईने नेमका मुहूर्त साधून खूप कायदेशीर खटपटी केल्या. अठरा वर्षे पूर्ण होण्यासाठी तब्बल आठ-नऊ महिने शिल्लक असल्यामुळे पोलिसांनी सज्ञान नसल्याचा शिक्का मारत त्याचा ताबा आईकडे राहील असा निर्णय दिला. चौरसिया कुटुंबियांनाही त्या काळात पोलिसांकडून कारवाईबाबत प्रचंड धमकावण्यात आले. सुजीतने रडून-भेकून पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी त्याच्यासमोर सज्ञान होईस्तोवर डोंगरी बालसुधारगृह किंवा त्याच्या आईकडे जाण्याचा पर्याय ठेवला. तेव्हा पुढले वर्षभर त्याने आईच्या चंदनवाडीमधील घराऐवजी डोंगरीच्या सुधारगृहात राहण्यास तयारी दर्शवली. अचानक गुदरलेल्या या संकटात त्याची परीक्षा बुडाली ती बुडालीच. डोंगरीच्या सुधारगृहात गेल्यानंतर चरईतल्या नकाशावरून खोडल्यासारखे त्याचे अस्तित्त्व माझ्यासाठी नंतरचे काही दिवस 'कुमार सानू के हिट नगमे' या कॅसेटपुरते निव्वळ उरले. त्या कॅसेटमधले शेवटचे गाणे त्याने 'किस्मत' नावाच्या टीव्ही सिरियलमधले घेतले होते. 'किस्मत का तो, यही फसाना है' या शब्दांचे. त्या काळात ही टीव्ही मालिका प्रचंड गाजण्याच्या अनेक कारणांत शीर्षकगीत कुमार शानूने गायले, हेही एक होते. त्याचमुळे पहिल्यांदाच अशा टीव्ही मालिकेच्या शीर्षकगीताची कॅसेट बाजारात उपलब्ध झाली होती. त्या गाण्यातील 'हसना है कभी रोना है, खोना है कभी पाना है' हे शब्द सुजीतला प्रचंड आवडायचे. त्याच्या आयुष्याची अनेक बाबतीत आधीच शोकांतिका झाल्यामुळे असेल कदाचित, पण ते गाणेही तो अधूनमधून चरईच्या नाक्यावर तंतोतंत शानूच्या आवाजात सादर करीत असे. नववीच्या परीक्षेच्या काही दिवस आधी आमच्या परिघापासून लांब गेल्यानंतरची त्याच्या आयुष्यात घडलेल्या त्या वर्षातील शोकांतिकांची आठवण या गाण्याने पुढचा बराच काळ तेवत ठेवली होती.
नववी पास झालेल्या फुलपँटगँग आणि वनफोरथ्रीगँगच्या काही सदस्यांनी शाळेतून तर उरलेल्या सदस्यांनी सतरा नंबरचा फाॅर्म भरून पुढल्या वर्षी माझ्यासोबतच दहावी दिली. त्यांतले जे पास झाले त्यांची शिकण्याची खरी स्पर्धा त्या वर्षानंतरच सुरू झाली. अमोद दांडेकरने भाकीत केलेल्या दक्षिणी गाण्यांनी आणि जितेंद्र देवरेने ओळख करून दिलेल्या दक्षिणी नृत्याने पुढली काही वर्षे चित्रपटांवर राज्य केले. त्यात कुमार शानूची गाणी 'क्षीण क्षीण' होण्यास सुरुवात झाली. दहावीनंतर माझ्या कॅसेट कलेक्शनमध्ये स्वप्ना गद्रेच्या 'लव्ह साँग्ज फाॅर यू'चे कित्येक व्हाॅल्यूम साचून राहिले. माझ्याकडूनही तिला 'टाॅपटेन लव्ह मिक्स'चे बरेच संच सोनीच्या सुपरईएफ कॅसेट्समधून दिले गेले. कॅसेट अचानक विलुप्त होऊन त्याबाबत शोक करण्याची फुरसत न मिळालेले सीडीयुग जसे आले, तसेच आमचे सांगीतिक प्रेमही करियरसाठी धावण्याच्या वेगात शोक करण्यासाठी फुरसत न घेता लुप्त झाले. हिंदी पाॅपची लाट गेली, रिमिक्सची लाट गेली, विश्वभान जागृत होऊन ग्लोबल म्युझिकच्या प्रवाहात डुंबता डुंबता गाणी जपण्यातला आनंदही संपून गेला. कॅसेटचे दुकान काढून टेलेक्सच्या फास्टर मशीनवर कॅसेट रेकाॅर्ड करण्याचा भविष्यातील रोजगार निवडलेल्या सुजीत गोफणचा आजचा रोजगार कोणता असेल, याची ते शहरच सोडलेल्या मला कल्पना नाही. पण कामानिमित्त अनेक शहरांच्या, शहरगावांच्या भटकंतीत रिक्षात-टमटममध्ये, आडगावांच्या पानटपऱ्यांमधून जेव्हा 'दिल मेरा, चुराया क्यूं', 'जब कोई बात बिगड जाए' किंवा त्या युगातला कुमार शानूचा स्वर जिवंत होतो, तेव्हा त्या काळात ऐकू न आलेला त्याचा नाकातील सूर आता लख्ख जाणवतो. वनफोरथ्रीगँगच्या जितेंद्र देवरेचा कान त्याच्या वडिलांनी फोडून फोडून त्या काळात किती तीक्ष्ण केला होता, हे लक्षात येते. तरीही फुलपँटगँगच्या सुजीतच्या मतांच्या बाजूने राहत मी कुमार शानूच्या कोणत्याही गाण्याचा आस्वाद घेतो. त्या प्रत्येक वेळी थेट चौऱ्याण्णव सालातील शाळेत पोहोचतो. कालप्रवासासाठी त्याहून दुसरे कोणतेच पर्यायी साधन मला सापडत नाही.
प्रतिक्रिया
जबरदस्त लेख
बेडेकर शाळेत त्याच सुमारास असल्यामुळे सगळ्या गोष्टींशी प्रचंड रिलेट होता आले, असेच, सगळे अगदी असेच (स्वप्ना गद्रे सोडून) आमच्या बाबतीतही घडले.....
आणखी काही गाणी
मस्त लेख. आम्हा सगळ्यांनाही कुमार शानू आवडतो.
या गाण्यांच्या यादीत काही गाणी असती तर चांगले झाले असते.
१. ये दुवा है रब से - सपने साजन के. कुमार आणि अलका याग्निकने गायलेले मस्त गाणे.
२. तुम्हे अपना बनाने की कसम खायी है- सडक
३. इस प्यार से मेरी तरफ ना देखो - चमत्कार्
४. फिर तेरी कहानी याद आयी मधील जवळपास सगळीच
५. दो बाते हो सकती है- इम्तिहान
६. इस तरह आशीकी का- इम्तिहान
७. चांद से परदा की जीए- आओ प्यार करे
८. मेरा दिल भी कितना पागल है - साजन
९. तुमसे मिलने को दिल करता है- फूल ऑर काटे
१०. नजर के सामने जिगर के पास- आशिकी
११. तू प्यार है किसी और का- दिल है के मानता नाही
दर्जेदार कचऱ्याची मेजवानी
90तल्या समृद्ध अडगळीचे समर्पक समालोचन.
पंकज भोसले सरांकडे 2050 मधले कणेकर बनण्याचं पूर्ण मटेरियल आहे, फक्त त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे.
उदा, शेवटला परिच्छेद त्यांच्या ह्या भावी टायटलला सुरुंग लावतोय.
(लेखतली एम्बेडेड गाणी ही एक उत्तम सोय आहे.)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
माझे ह्या विषयी वेगळे मत आहे
लता,मुकेश, कुमार सानू असोत हे गायक आहेत.
लता ची गाणी,मुकेश गाणी असे म्हणता येणार नाही त्या गाण्याच्या यशात गायक म्हणून त्यांचं योगदान असेल पण खरे योगदान हे संगीतकार आणि गीतकार ह्यांचे असते.
गायक च्या नावा अगोदर संगीतकार आणि गीतकार ह्यांचे नाव आलेच पाहिजे.
कुमार सानू नी गायलेली हिट गाणी.
असा बदल शीर्षकात व्हावा असे मनापासून वाटते.
उगाच कोणाच्या मेहनतीचे फळ दुसऱ्या च कोणाला देण्यात अर्थ नाही
आय मष्ट से स्वप्ना गद्रेची
आय मष्ट से स्वप्ना गद्रेची गाण्यांची निवड (आणि म्याचुरिटी) कथानायकापेक्षा बरी आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
रुला दिया पगले.
हे ललितलेखन आहे हे माहीत आहे. तरीही यातली अनेक पात्रं मला माहीत आहेत. (स्मिता दातार काही वर्षं माझ्या वर्गातही होती.) तरीही हे बालपण माझं नाही; पाचवीपासून वेगळ्यात शाळेत हकालपट्टी झाल्यामुळे यातले अनेक भीषण प्रसंग माझ्यासाठी ललित लेखन वाचण्यापुरतेच मर्यादित आहेत.
आणि हे सगळं कमी म्हणून काय, वर इथे आदूबाळ येऊन स्वप्ना गद्रेच्या म्याचुरिटीला जास्त गुण देऊन लेखकाला आणखी ट्रोल करत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सुंदर लेख!
आवडला.
लेखकाचं नाव वाचून उघडला आणि अपेक्षापूर्ती झाली!
जुनी माणसं
आम्ही जुनी माणसं. त्यामुळे रफी,किशोर आणि मन्ना गेल्यावर मागे उरला तो निव्वळ कचरा आणि डुप्लीकेट असं आमचं ठाम मत होतंच. पण त्याही नंतरच्या काळातली पुरुष गायकांची अनैसर्गिक आवाजातली गाणी ऐकल्यावर, यापेक्षा तो कचरा आणि डुप्लिकेट बरे, असं आता वाटतं !
.
नववी-दहावीचा काळ मंतरलेला असतोच आणि समकालीन असल्याने प्रत्येक गोष्टीशी रिलेट करता आल्याने लेख खूपच आवडला. शानूच्या व इतर गाण्यांची पेरणी किंवा त्या अनुषंगाने सरकणारी गोष्ट छान रंगली आहे.
सगळ्या तुकड्यांमध्ये सगळ्यात सुंदर दिसणारी मुलगी इतकी "सॉर्टेड" असणे आणि तिची व आपली मैत्री होणे ह्या असल्या (नगरी लोकांच्या दृष्टीने तरी) अवास्तव प्रकारामुळे लेख शानूच्या गाण्यांसारखाच ट्रॅशच्या सीमारेषा न ओलांडताही आवडणेबल झाला आहे.