"आय लव्ह मर्डर!" – क्लोद शाब्रोल
"आय लव्ह मर्डर!" – क्लोद शाब्रोल
'फ्रेंच न्यू वेव्ह'मुळे सिनेमाची भाषा बदलली असं एक ठोकळेबाज विधान नेहमी केलं जातं. बदललेल्या भाषेतल्या 'जंप कट' वगैरे गोष्टींबद्दलही थोडंफार बोललं जातं. पण ह्या भाषा बदलण्याला जे वेगवेगळे पैलू होते, त्यांपैकी एक महत्त्वाचा भाग अभिरुचीशी संबंधित होता. सदभिरुचीविषयी फ्रेंच सिनेमातले आधीचे अनेक संकेत 'न्यू वेव्ह'नं मोडले. उदाहरणार्थ, १९५०च्या दशकापर्यंत फ्रेंच चित्रपटांत शीर्षकांसोबत किंवा मुख्य थीम म्हणून अभिजात पाश्चात्य संगीत वापरलं जात असे, कारण अभिजात संगीत सदभिरुचीशी निगडित होतं. पण नव्या सिनेमानं जॅझ संगीताचा वापर सुरू केला. (आधीच अमेरिकन, त्यात काळ्या लोकांचं संगीत!) आधीच्या चित्रपटांमधले संवाद प्रमाणभाषेतले, आलंकारिक आणि नाट्यमय असत. नव्या सिनेमानं तरुणांची रस्त्यावरची भाषा तिच्यातल्या शिव्या आणि लैंगिक संदर्भांसह पडद्यावर आणली.
पूर्वीपासून चित्रपटांत स्थान असणाऱ्या एका विधेबाबतही (genre) 'न्यू वेव्ह'नं क्रांती घडवली. ती विधा म्हणजे गुन्हेपट. फ्रान्समध्ये गुन्हेपटांची परंपरा आधीपासून होती. मात्र, हे मुख्य धारेतले लोकप्रिय चित्रपट असत. ते हीन अभिरुचीचे मानले जात. त्यामुळे मुख्य धारेतल्या वर्गव्यवस्थेतही गुन्हेपट 'ब' किंवा 'क' दर्जाचे मानले जात. महोत्सवांमध्ये गाजणारा, पुरस्कार मिळवणारा 'अ' दर्जाचा कलात्मक सिनेमा तर वेगळाच असे. 'न्यू वेव्ह'मधल्या अनेक दिग्दर्शकांनी गुन्हेपट ही विधा गांभीर्यानं घेतली आणि रंजक सिनेमातूनही काही विधान करता येतं हे दाखवून दिलं. 'लोकानुनयी' फ्रेंच गुन्हेपटांचा 'न्यू वेव्ह'मधला बादशहा म्हणजे दिग्दर्शक क्लोद शाब्रोल.
'फ्रेंच न्यू वेव्ह'चा विषय निघाला की आपल्याकडे (किंवा अगदी आंग्लभाषिक जगातही) प्रामुख्यानं उल्लेख होतो तो गोदार आणि त्रुफो या जोडगोळीचा. १९५९ साली त्रुफो दिग्दर्शित पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'फोर हंड्रेड ब्लोज' प्रदर्शित झाला आणि १९६० साली गोदार दिग्दर्शित पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'ब्रेथलेस' प्रदर्शित झाला. हीच 'फ्रेंच न्यू वेव्ह'ची सुरुवात होती असा अनेक लोकांचा समज आहे. मात्र, शाब्रोलचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'द हँडसम सेर्ज' १९५८ सालीच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे फ्रान्समध्ये 'न्यू वेव्ह'ची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय शाब्रोलला दिलं जातं.
चित्रपट दिग्दर्शन सुरू करण्याच्या आधीपासूनच शाब्रोलला सामान्यजनप्रिय (पल्प) गुन्हेगारी कथांमध्ये आणि गुन्हेपटांमध्ये रस होता. १९५२ साली तो 'काईए द्यु सिनेमा' या सिनेनियतकालिकासाठी समीक्षा लिहू लागला. येऊ घातलेल्या 'न्यू वेव्ह'मधले गोदार, त्रूफो, ऱ्होमरसारखे समीक्षक-दिग्दर्शक तिथे त्याचे सहकारी होते. ऑक्टोबर १९५४चा 'काईए'चा अंक हिचकॉकला समर्पित होता. त्यामागची मुख्य प्रेरणा त्रूफो आणि शाब्रोल यांची होती. पुढे त्यांनी हिचकॉकची एक प्रदीर्घ मुलाखतही घेतली. नंतर १९५७ साली शाब्रोल-रोमर या जोडगोळीनं लिहिलेलं हिचकॉकविषयीचं पुस्तक प्रकाशित झालं. हिचकॉकनं आधी इंग्लंडमध्ये आणि मग अमेरिकेत अनेक यशस्वी गुन्हेपट दिग्दर्शित केले होते. त्याच्या सिनेमाला लोकप्रियताही लाभली होती. मात्र, त्यात काही कलात्मक मूल्य असू शकेल अशी शंकाही त्या देशांत आली नव्हती. एकंदरीत गुन्हेपटांचाच उच्चभ्रू कलात्मक वर्तुळाशी संबंध नव्हता. त्या विधेला त्यामुळे प्रतिष्ठाच नव्हती. हिचकॉकचा सिनेमा कसा कलात्मक आहे हे या फ्रेंच समीक्षकांनी जगाला दाखवून दिलं तेव्हा उच्चभ्रू आंग्लभाषक जगाला आपल्याकडे एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे ह्याचा शोध लागला. हिचकॉकची कलात्मकता उलगडतानाच या फ्रेंच समीक्षकांनी गुन्हेपटांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोनही दिला. पुढे 'न्यू वेव्ह'मधल्या काही दिग्दर्शकांनी आपल्या काही चित्रपटांसाठी गुन्हेपटांचा ढाचा वापरला; पण, शाब्रोल त्यात सातत्यानं, म्हणजे कारकिर्दीच्या अखेरपर्यंत कार्यरत राहिला.
'द कझिन्स'सारखे (१९५९) शाब्रोलचे सुरुवातीचे चित्रपट गुन्हेपट नाहीत; पण मानवी मनात दडलेली आणि योग्य वेळ येताच फणा काढणारी हिंसा त्यात आहे. सुसंस्कृत असण्याचा आव आणणाऱ्या मध्यमवर्गावर (बूर्ज्वा) टीकाही त्यात आहे. अभिजात शास्त्रीय संगीताचा वापर ह्या समाजाचा ऱ्हास दाखवण्यासाठी शाब्रोलनं इथे आणि नंतरही अनेकदा केला. 'द कझिन्स'मधला हा प्रसंग पाहा -
पॅरिसमधल्या उच्छृंखल तरुण वर्गाचं चित्रण या चित्रपटात आहे. वरच्या प्रसंगात वाग्नरचं संगीत लावून नाझी सैनिकी टोपी घालून वावरणाऱ्या पॉलची व्यक्तिरेखा रुढार्थानं खलनायकाची नाही. गावाकडून पॅरिसमध्ये शिकायला आलेल्या आपल्या हुशार, संवेदनशील, निरागस कझिन चार्ल्सला त्यानं पॅरिसमध्ये आधार देणं अपेक्षित असतं, पण पॉल उलट चार्ल्सला पॅरिसमधली प्रलोभनं दाखवत दाखवत विनाशाकडे नेतो. उच्च अभिरुची बाळगणारा, फॅशनेबल पॉल अभिजात संस्कृतीचा गंध नसलेल्या आपल्या मित्रमंडळींपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण प्रत्यक्षात त्याची व्यक्तिरेखा सैतानाप्रमाणे आहे. पॅरिसमधल्या बूर्ज्वा वर्गाचं यातलं चित्रणही सॉफिस्टिकेटेडपणाच्या आवरणाखाली आपला धूर्तपणा, कोतेपणा, अनैतिकता आणि स्वार्थ लपवणारा वर्ग असं आहे. या जगात चार्ल्ससारख्या संवेदनशील माणसाचा विनाश अटळ आहे.
'द गुड गर्ल्स'मध्ये (१९६०) विजेच्या उपकरणांच्या दुकानात विक्रेत्या म्हणून काम करणाऱ्या मुलींची गोष्ट आहे. आधुनिक जगात या मुली स्वतंत्र आहेत. काम संपलं की त्या रात्रीच्या पॅरिसमध्ये मौजमजा करतात. मागे लागणाऱ्या पुरुषांना त्या भुलवतात; त्यांच्याविषयी आपसात चर्चाही करतात; पण त्या 'चांगल्या घरातल्या' आहेत, त्यामुळे विशिष्ट मर्यादा ओलांडत नाहीत. त्यांची स्वप्नंही मुख्यतः 'चांगल्या घरातल्या' मुलींना साजेशी आहेत, पण प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे आणि त्यानुसार त्यांची आयुष्यंही वेगवेगळी वळणं घेतात.
त्यांपैकी एकीचा प्रियकर तिला आपल्या आईवडिलांना भेटवण्यासाठी म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जातो. उच्च अभिरुचीचा तिला गंधही नसतो, पण आईवडिलांना मुलगी पसंत पडावी म्हणून तो तिला मायकेलँजेलो आवडत असल्याची थाप मारायला सांगतो. विश्वकोशात सहज मिळेल इतपत माहिती तो तिला पढवतो. ह्याचा अर्थ त्याच्या आईवडिलांची अभिरुची खरंच उच्च आहे असा नव्हे, तर त्या समाजाच्या दांभिकपणावर शाब्रोलनं केलेली ती टिप्पणी आहे. 'चांगल्या' भवितव्यासाठी चांगल्या घरातल्या मुलीनं दांभिक असायलाच हवं, कारण चांगल्या घरातले सगळेच लोक या ना त्या प्रकारे तसेच असतात.
त्या मुलींना जेव्हा मनासारखं वागायचं असतं, मजा करायची असते तेव्हा काय होतं हे दाखवणारे दोन कळीचे प्रसंग चित्रपटात आहेत. एका प्रसंगात त्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला जातात, पण त्यांच्या मागे लागलेले दोन मध्यमवयीन पुरुष पूलमध्ये उतरून त्यांना तिथे त्रास देतात. दुसऱ्या प्रसंगात त्या प्राणिसंग्रहालयात जातात. लहान मुलींप्रमाणे त्या तिथे मुक्त उधळतात आणि मजा करतात, पण वाघाच्या डरकाळीने घाबरतात. त्या मुलींना जे स्वातंत्र्य उपभोगायचं आहे त्याला दिले गेलेले हे छेद बोलके आहेत. दोन्ही प्रसंगांत त्यांना जे करायचं आहे आणि जसं वागायचं आहे ते उन्मुक्त आहे; 'चांगल्या घरातल्या' मुलींनी सार्वजनिक ठिकाणी जी मर्यादा पाळणं सामाजिक अभिरुचीनुसार अपेक्षित असतं ती त्यांना पाळायची नाही. 'चांगल्या घरातल्या' पुरुषांच्या आत जो पशू वावरत असतो त्याला मात्र त्यांचं हे उन्मुक्त वागणं आवडतं आणि ते पुरुष पशुवत त्या मुलींवर तुटून पडतात. जणू मोकळं वागून त्या मुली पुरुषी हिंसा ओढवून घेतात. इथे हे लक्षात घ्यायला हवं की त्या मुलींनी तथाकथित मध्यमवर्गीय सदभिरुचीची पातळी सोडली नसती, तर त्यांना त्या पुरुषांमधल्या पशूचं दर्शन घडलं नसतं, आणि आपल्या स्वातंत्र्याला काय मर्यादा आहेत हेही त्यांच्या लक्षात आलं नसतं.
'लाँद्र्यू' (१९६३) हा चित्रपट पहिल्या महायुद्धादरम्यान घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. एक कुख्यात सीरियल किलर अनेक स्त्रियांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचे पैसे लाटत असे, त्यांची हत्या करत असे, त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते शेगडीत जाळून त्यांची विल्हेवाट लावत असे. चॅप्लिननं आधी ह्याच कथेवर आधारित 'मस्य व्हेर्दू' (१९४७) हा चित्रपट केला होता, पण शाब्रोलचं अर्थनिर्णयन वेगळं आहे. तो रंगीत चित्रपटात मध्येच युद्धातल्या हिंसेच्या वार्तांकनातले कृष्णधवल तुकडे दाखवतो. एकीकडे महायुद्धात मोठ्या प्रमाणावर लोक मारले जात होते, पण त्याच वेळी फ्रेंच समाजाचं वर्तन कसं विधिनिषेधशून्य होतं ते शाब्रोल विविध प्रकारे दाखवतो. पैसे कमवण्यासाठी आपला पती करू नये असं काही तरी करतो आहे ह्याची खुन्याच्या पत्नीला कल्पना असते. पण ती जणू काही आपण त्या गावच्याच नाही असं दाखवते; मुलांवर सुसंस्कार करू पाहते. खुन्याच्या तावडीत सापडणाऱ्या स्त्रिया एकाकी, पुरुषाच्या सहवासासाठी आसुसलेल्या असतात, पण त्या चांगल्या घरातल्या असल्यामुळे लग्नाशिवाय पुरुषाशी संबंध ठेवणं त्यांच्या नीतिकल्पनेत न बसणारं असतं.
अनेक गोष्टींमधून समाजाच्या अधोगतीचं चित्र शाब्रोल उभा करतो. सर्वांचे कपडे, घरातले वॉलपेपर, फर्निचर, काचसामान वगैरे गोष्टी अतिशय बटबटीत आहेत. खुद्द खुनी एखाद्या अर्कचित्राप्रमाणे रंगवला आहे. त्यामुळे सबंध चित्रपटाला ब्लॅक कॉमेडीचं रूप येतं. जेव्हा खुनी पकडला जातो तेव्हा पहिलं महायुद्ध संपलेलं असतं; पंतप्रधानाला सरकारवर होणाऱ्या टीकेवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं असल्यामुळे तो वृत्तपत्रांना ह्या सनसनाटी खटल्याला पहिल्या पानावर द्यायला भाग पाडतो.
'अनफेथफुल वाइफ'मध्ये (१९६९) पॅरिसजवळ एका शांत उपनगरात राहणारं नवरा-बायको-मुलगा असं सुखी कुटुंब दाखवलं आहे. नवरा एका कंपनीत मोठा अधिकारी आहे. तो रोज नोकरीसाठी पॅरिसला जातो. बायको-मुलाची व्यवस्थित काळजी घेतो. अधूनमधून घरी येणारी त्याची आईही प्रेमळ आहे. सुनेशी छान वागते. मुलगा अभ्यासात हुशार आहे. अभिजात संगीत ऐकणं आणि टीव्हीवरचे संथ रटाळ कार्यक्रम पाहणं ही नवऱ्याची विरंगुळ्याची कल्पना आहे. बायकोला आवडतं म्हणून तो तिला कर्तव्य म्हणून पॅरिसला नाइट क्लबमध्येही घेऊन जातो. ती बेभान होऊन नाचते. नवरा बसून दारू पीत राहतो. केवळ कर्तव्य म्हणून थोडा वेळ बायकोसह नाचतो, पण त्यात बेधुंदपणा काही नाहीच. त्याचं सगळं काही इतकं छानछान, गोडगोड, सदभिरुचीचं आणि आदर्श आहे की साहजिकच बायकोला त्या संसाराचा कंटाळा येतो. (गंमत म्हणजे सासूमध्येही ह्याची झलक दिसते. जणू काही तिच्या कंटाळवाण्या संसारात रुचिपालट म्हणून तिला बेभान वेगात गाडी चालवायला आवडते.) कंटाळवाणा नवरा आणि कंटाळलेली बायको ह्यांच्यातला हा प्रसंग –
('मला गरम होतंय' म्हणत ती खिडकी उघडते. जणू तिचा जीव त्या नात्यात गुदमरतोय.)
हे पाहणाऱ्या बूर्ज्वा प्रेक्षकांसमोर आरसा धरतो, कारण त्यांचंच आयुष्य शाब्रोल पडद्यावर दाखवतो.
तर, अशा सुखी संसारात गुदमरणारी पत्नी एकदा पॅरिसमध्ये सिनेमा पाहायला गेलेली असताना तिची एका पुरुषाशी नजरानजर होते आणि दोघांच्या भेटीगाठी सुरू होतात. दर दोन-तीन दिवसांतून एकदा ती काही तरी निमित्त काढून पॅरिसला जाते आणि आपल्या या मित्राला भेटते. बाकी पत्नी आणि आई म्हणून आपली कर्तव्यं पार पाडत राहते. एकदा मुलगा जिगसॉ पझल सोडवत असतो, पण एक तुकडा त्याला काही केल्या सापडत नाही, तेव्हा तो वैतागतो. एवढाच त्या कुटुंबातला नाट्यमय प्रसंग!
'द बुचर' (१९७०) हा चित्रपट एका छानशा छोट्या गावात घडतो. इथे कधीच काहीच सनसनाटी घडू शकणार नाही असं दिसणारं ते गाव आहे. गावातल्या एकमेव शाळेची मुख्याध्यापिका असलेली हेलन हुशार, मनमोकळ्या स्वभावाची आणि विद्यार्थिप्रिय शिक्षिका असते. ती मूळची पॅरिसची आहे आणि तिथे तिचा प्रेमभंग झाल्यामुळे त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिनं ह्या छोट्या गावात नोकरी पत्करलेली असते. गावात तिची ओळख पॉल नावाच्या खाटकाशी होते. दोघांची पार्श्वभूमी अगदी भिन्न असते. हेलनचं व्यक्तिमत्व बहुश्रुत आणि बहुआयामी आहे. ह्याची साक्ष तिच्या घरातली पुस्तकं, पेंटिंग्ज आणि तिच्या एकूणच राहणीमानातून मिळते. याउलट पॉल अगदी साधा कष्टकरी असतो. खाटिक म्हणून मात्र तो अतिशय तरबेज असतो. आणि माणूस म्हणून सभ्य, विनम्र, सुस्वभावी आणि निर्मळ असतो. असे हे दोन जीव एकमेकांकडे आकर्षिले जातात. पॉल हेलनच्या प्रेमात पडतो आणि तिच्यापाशी त्याची कबुलीही देतो. हेलनला पॉल आवडतो, ती त्याला भेटते, त्याच्याशी गप्पा मारते, पण आधी आलेल्या कडू अनुभवामुळे ती त्याच्याशी शारीरिक जवळीक मात्र टाळते.
कथा घडते त्या गावाच्या परिसरात प्रागैतिहासिक गुफाचित्रं असतात. शाब्रोल आपल्याला ती दाखवतो. ती कल्पनेहून सुंदर चित्रं काढणाऱ्या प्रागैतिहासिक माणसाविषयी हेलन आपल्या विद्यार्थ्यांना जे सांगते, त्यातून शाब्रोल आपल्याला पॉलविषयीचं तिचं मतही सांगतो – 'हजारो वर्षांपूर्वीचा प्रागैतिहासिक माणूस आपल्याएवढा प्रगत नव्हता, पण त्याच्या प्रेरणा, भावना आपल्याहून वेगळ्या नव्हत्या. आजही आपल्या वर्तनामागे त्याच आदिम प्रेरणा दिसतात.' तिच्यासारखी स्त्री पॉलसारख्या साध्या माणसाशी मोकळेपणाने वागते. मात्र, शारीरिक जवळीक नाकारल्यामुळे त्याच्यातल्या आदिम प्रेरणा कोणतं रूप धारण करतील ह्याचा तिला अंदाज येत नाही. पॉलचे वडील हिंसक असतात. त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून तो एके काळी सैन्यात भरती झालेला असतो. इंडोचायना आणि अल्जीरियाच्या युद्धांत लढलेल्या पॉलनं खूप हिंसा पाहिलेली असते. त्यामुळे झालेले मानसिक आघात पॉलनं आतल्याआत दाबून ठेवलेले असतात. व्यवसायानं खाटिक म्हणूनही तो रोज रक्तामांसाच्या सान्निध्यात असतो. तो प्रेमाचा भुकेला असतो, पण हेलनच्या शारीर दुराव्यामुळे हे सगळं उफाळून येतं आणि तो गावातल्या मुलींचे खून करू लागतो. एका साध्यासुध्या, निर्मळ माणसाच्या आत दडलेली ही हिंसा अशी बाहेर पडते. हेलनला हे कळूनही पॉलविषयी अनुकंपा वाटत राहते. त्याच्यासारख्या आदिम माणसात एकाच वेळी कमालीचा स्नेह आणि हिंसा दाखवून जणू शाब्रोल आपल्याला आरसा दाखवत असतो आणि सांगत असतो, की आधुनिक माणूस बाहेरून कितीही सॉफिस्टिकेटेड, बहुश्रुत, उच्च अभिरुचीचा असला तरी त्याच्या अंतर्मनात हे सगळं असंच आदिम असतं; आणि कदाचित आहार-भय-मैथुनाच्या अतिसामान्य पातळीवर जगणारी पॉलसारखी माणसं जो विशुद्ध स्नेह देऊ शकतात तो स्वीकारण्याची क्षमताच आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली 'प्रगत' मानवजात गमावून बसली आहे.
'बुचर'ची सुरुवात एका लग्नाच्या मेजवानीनं होते. तिथे हेलन आणि पॉलची प्रथम भेट होते. मेजवानीला दोघे शेजारी बसलेले असतात. जेव्हा समोर रोस्ट सर्व्ह केलं जातं, तेव्हा पॉल सफाईनं त्यातला एक लालबुंद, लुसलुशीत तुकडा कोरून हेलनला वाढतो. कथेत नंतरही तो हेलनला उत्तमोत्तम मांसाचे तुकडे आणून देतो. त्यांच्यातलं नातं हे असं रक्तामांसाच्या सान्निध्यातच फुलत जातं. एकदा पॉल मांसाऐवजी सिरपमधल्या लालबुंद चेरीज आणून देतो. आणि त्या लाल चेरीज दोघं अतिशय आवडीनं फस्त करतात. लाल रंगांतल्या या प्रसंगांत मादकता आहे, पण हिंसेचीही पूर्वसूचना आहे. दुसऱ्या एका प्रसंगात हेलन विद्यार्थ्यांना घेऊन गुहांच्या सहलीला गेलेली असते. जेवणाच्या वेळी सगळे जण आपापले डबे उघडून निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिकचा आनंद घेत असतात. एका मुलीच्या हातात शुभ्र पांढऱ्या ब्रेडचं सँडविच असतं. अचानक तिला त्यावर लालभडक थेंब पडताना दिसतात. वर कड्यावर शाळेतल्याच एका शिक्षिकेचं प्रेत असतं. तिच्या रक्ताळलेल्या हातातून ते लाल थेंब टपकत असतात. जी प्रागैतिहासिक गुफाचित्रं पाहायला सहल आलेली असते त्या चित्रांतही लाल नैसर्गिक रंग वापरलेले असतात.
(प्रागैतिहासिक गुफाचित्र)
लालभडक रंगाचा असा वापर उच्च अभिरुचीच्या कलात्मक सिनेमात करायचा प्रघात नव्हता. पण त्याद्वारे शाब्रोल कथानकाला साजेशी सनसनाटीही निर्माण करतो आणि पॉल-हेलनच्या मनातल्या (पण हेलनच्या हट्टामुळे प्रत्यक्षात येऊ न शकलेल्या) लैंगिक प्रेरणा आणि त्या पूर्णत्वाला न गेल्यामुळे पॉलच्या मनात उसळणारी हिंसा पडद्यावर आणतो.
शाब्रोलच्या सिनेमात भडक रंग किंवा अन्नपदार्थांचा असा वापर अनेकदा होतो. अनेक कळीचे प्रसंग जेवणाच्या टेबलाभोवती घडतात. फ्रेंच लोक खाण्यापिण्याचे कितीही शौकीन असले तरीही सिनेमात खातापितानाचं असं समीप चित्रण सदभिरुचीचं मानलं जात नसे. पण शाब्रोल आपला आशय मांडण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करतो. उदा. 'द बीस्ट मस्ट डाय'मधलं (१९६९) हे दृश्य. (याला सबटायटल्स नाहीत म्हणून त्याचा सारांश थोडक्यात दिला आहे) घरी आलेल्या पाहुण्यांसमोर पती आपल्या पत्नीवर डाफरतो. पदार्थ नीट रीतीनुसार केलेला नाही त्यामुळे त्याची चव बिघडली आहे असं म्हणत तो सर्वांसमोर पत्नीची कानउघाडणी करतो; चांगलं खायला मिळावं म्हणून मी इतके पैसे खर्च करतो अशी शेखीही मिरवतो. हे सगळं कमी पडलं म्हणून तो वर हेही सांगतो की नीट स्वयंपाक करायचा सोडून माझी पत्नी आपल्या खोलीत बसून अशा कविता करते : आणि खिशातून कागद काढून तो पत्नीची कविता वाचून दाखवतो. त्याची आई खिदळते. पाहुण्यांना काय करावं कळत नाही. पत्नीला मेल्याहून मेल्यासारखं वाटू लागतं. ती रडू लागते. जेवणातलं चांगलं-वाईट कळणं आणि चांगलं जेवण करता येणं हे फ्रेंच रसिकपणाचं एक लक्षण आहे. इथे मात्र हा रसिक माणूस रासवट आहे. त्या एका माणसामुळे कुटुंबातलं वातावरण किती नासलेलं आहे ते शाब्रोल दाखवतो.
पॅट्रिशिया हायस्मिथ किंवा रुथ रेंडेलसारख्या विख्यात गुन्हेगारी कथालेखकांच्या पुस्तकांवर आधारित चित्रपट शाब्रोलनं केले. १९६८चा 'ले बीश' हायस्मिथच्या कादंबरीवरून प्रेरित आहे, पण त्यातल्या पुरुष व्यक्तिरेखांऐवजी इथे स्त्री व्यक्तिरेखा आहेत. एका श्रीमंत मुलीच्या आयुष्यात आलेली प्रेयसी आणि प्रियकर यांच्यातला तिढा यात आहे. पैसे असले तर प्रेम मिळतं, पण त्याची किंमत मोजावी लागते. जिच्यापाशी पैसा नाही अशा व्यक्तीशी प्रतारणा केली तर त्याचा परिणाम पैसेवाल्या व्यक्तीशी प्रतारणा करण्यापेक्षा कमालीचा वेगळा असू शकतो; त्याची कल्पना पैसेवाल्या व्यक्तीला येऊ शकत नाही, असं काहीसं त्याचं सूत्र आहे. त्यातले काही तुकडे पाहून शाब्रोलच्या ब्लॅक कॉमेडीचा जसा अंदाज येऊ शकतो, तसाच तो प्रसंगी तलमही होऊ शकतो याचा अंदाज येतो.
त्याचे काही चित्रपट खऱ्या घटनांवरही आधारित आहेत. साधारणतः सनसनाटी गुन्ह्यांच्या छोट्या बातम्या (Fait divers) वृत्तपत्रांत दिल्या जातात आणि लोक त्या चवीचवीनं वाचतातही. गुन्हेगारी गोष्टी सांगणारं पल्प साहित्य किंवा अशी वार्तांकनं बऱ्याचदा सनसनाटी असतात. शाब्रोलचा सिनेमाही वरवर पाहता तसाच आहे. बाहेरख्याली, प्रेमाचे भुकेले, संशय, असूया किंवा असुरक्षिततेनं ग्रासलेले, असे लोक त्याच्या चित्रपटांत आढळतात. बटबटीत पण दिलखेचक आकर्षकता त्यात असते. त्यामुळे हे चित्रपट लोकप्रिय झाले. शाब्रोलसाठी मात्र अशी एखादी सनसनाटी घटना म्हणजे मानवी मनाची उकल करण्याचा एक मार्ग होता. त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये गुन्हेगार कोण आहे, हे लपवून ठेवलेलं नसतं. उलट, गुन्हेगार होऊ घातलेल्या किंवा असलेल्या व्यक्तिरेखेचे मनोव्यापार शाब्रोल अशा रीतीनं समोर आणतो, की गुन्हेगाराविषयी प्रेक्षकाच्या मनात अनुकंपा निर्माण होते. हे गुन्हेगार अनेकदा समाजाच्या रूढ चौकटीत जगताना अवघडलेले असतात. त्यांच्या जगण्याच्या धडपडीत कुठे तरी त्यांचा तोल सुटतो. ज्यांचा खून होतो त्यांच्या आयुष्यातला पोकळपणा, ऱ्हास किंवा बेगडीपणाही शाब्रोल अनेकदा सूचित करतो. काही वेळा त्याचे पुरुष गुन्हेगार आपली असुरक्षितता आणि असाहाय्यता झाकण्यासाठी वर्चस्ववादी आणि हिंसक होतात. अशा कथानकांत मात्र (उदा. 'द बीस्ट मस्ट डाय') शाब्रोल गुन्हेगारांची बाजू घेत नाही, तर तटस्थपणे त्यांची मानसिक आंदोलनं दाखवतो. सदभिरुचीच्या आणि रसिकतेच्या आवरणाखाली आपली मूळ हिंसक आणि क्रूर मनोवृत्ती झाकणारी माणसं शाब्रोल दाखवतो. टीव्हीसारख्या गोष्टींचा प्रभावी वापर त्यासाठी होतो. उदा. 'अनफेथफुल वाइफ'मधला टीव्ही पाहणारा नवरा. 'मास्क्स'मधला (१९८७) खलपुरुष टीव्हीवरच्या एका विख्यात गेम शोचा सूत्रधार असतो. रुथ रेंडेलच्या 'अ जजमेंट इन स्टोन' ह्या कादंबरीवर आधारित 'द सेरेमनी'चा (१९९५) उत्कर्षबिंदू घडतो तेव्हा एक श्रीमंत चौकोनी कुटुंब टीव्हीवर मोझार्टचा 'डॉन जिओव्हान्नी' ऑपेरा पाहायला बसलेलं असतं.
शाब्रोलच्या चित्रपटांत हिंसा असली तरीही अनेकदा त्यात एक खेळकरपणा, खट्याळपणा किंवा खोडकरपणाही असतो. जणू लब्धप्रतिष्ठित समाजाच्या आत खोलवर दडलेली (किंवा दडवलेली) हिंसा आणि रासवटपणा उकरून दाखवताना शाब्रोल समाजाला वाकुल्या दाखवत असतो : पाहा, तुम्ही चांगल्या घरातले असूनही अशा कथेत गुंतून जाल आणि ती 'एन्जॉय' कराल. कारण तुमच्या आसपास असे लोक आहेत. तुम्हीही कदाचित तसेच आहात.
इजाबेल यूपेर या विख्यात फ्रेंच अभिनेत्रीनं शाब्रोलच्या अनेक चित्रपटांत काम केलं. अनेकदा ती गुन्हेगाराच्या भूमिकेत असे. ग्युस्ताव फ्लोबेरच्या 'मादाम बोव्हारी' ह्या कादंबरीवर आधारित चित्रपटात (१९९१) तिनं 'बाहेरख्याली' एमा बोव्हारीची भूमिका केली. 'अ विमेन्स अफेअर'मध्ये (१९८८) गिलोटिनखाली शिरच्छेद झालेल्या अखेरच्या फ्रेंच स्त्रीच्या भूमिकेत ती आहे. गर्भपात बेकायदेशीर असताना ती स्त्रियांसाठी गर्भपाताचं केंद्र चालवत असे हा तिचा गुन्हा होता. तत्कालीन कायद्याच्या चौकटीत अशा व्यक्तिरेखा निर्दोष अर्थातच नव्हत्या. आपल्याला त्या भूमिका का करायला आवडल्या, ते इजाबेल एका मुलाखतीत सांगते – तिच्या मते शाब्रोलच्या स्त्री व्यक्तिरेखा फ्रेंच चित्रपटात तेव्हा रूढ असलेल्या स्त्री-प्रतिमेपेक्षा वेगळ्या आहेत. त्या परिस्थितीशरण नसतात किंवा परिस्थितीत अडकलेल्याही नसतात, तर त्या कृतिशील असतात. त्या स्वतंत्र वृत्तीच्या असतात. त्यांचे हेतू नेहमीच सुस्पष्ट नसतात; त्या स्खलनशील असतात; त्यांच्या हातून प्रमादही घडतात; पण त्यांच्या वर्तनातून (यात त्यांचं लैंगिक वर्तनही आलं) त्या पुरुषवर्चस्ववादी जगाला शह देत असतात. हे सगळं करत असताना अर्थातच त्या 'चांगल्या घरातल्या' स्त्रियांनी जसं वागणं त्या त्या काळातल्या समाजाला अपेक्षित होतं तशा वागत नसतात, आणि त्यामुळे समाज त्यांच्याकडे किळस, घृणा किंवा संशयानं पाहतो. शाब्रोल उलट आपल्याला त्यांच्या जगण्याच्या इतकं जवळ नेतो, की त्या सह-अनुभूतीमुळे आपण त्यांच्याकडे आपले पूर्वग्रह दूर सारून, डोळे उघडे ठेवून पाहू शकतो; त्यांना समजून घेऊ शकतो.
लौकिकार्थानं यशस्वी माणसं आणि त्यांच्या जगण्यातला पोकळपणा किंवा ऱ्हास हे सूत्रही शाब्रोलच्या अनेक चित्रपटांत दिसतं. 'बेलामी' (२००९) ह्या त्याच्या अखेरच्या चित्रपटातही हा धागा आहे. विख्यात फ्रेंच गुन्हेलेखक जॉर्ज सिमेनोंच्या एका कादंबरीवर हा आधारित आहे. जेरार दपार्दिअ हा फ्रेंच सुपरस्टार त्यात इन्स्पेक्टर बेलामीच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. पत्नीच्या माहेरच्या वारसाहक्कातून मिळालेल्या घरात बेलामी पती-पत्नी सुटी घालवत असतात. एक माणूस त्याच्याकडे येतो आणि आपल्या हातून खून झाल्याची कबुली देतो. बेलामी गुन्ह्याचा तपास करू लागतो तेव्हा त्या कथित खुन्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांना तो भेटतो. बेलामी हा सर्वार्थाने यशस्वी असतो – व्यक्तिगत आयुष्यातही आणि व्यावसायिक आयुष्यातही – तर त्याउलट त्याचा भाऊ सर्वार्थाने 'लूजर' असतो. दोन भावांच्या आणि बेलामीच्या पत्नीच्या गोष्टीचा धागा गुन्ह्याच्या तपासाला समांतर चालू राहतो. अखेरीला गुन्ह्यामागचं सत्य सापडलंय असं बेलामीला वाटतं खरं, पण त्याविषयी त्याच्या मनात शंका आहेत. मात्र, शाब्रोल तिथे थांबत नाही. ह्या तपासाची मुख्य परिणती म्हणजे आतापर्यंत आत्मविश्वासानं स्वतःला यशस्वी मानणाऱ्या बेलामीला अंतर्मुख व्हावं लागतं. आपल्या जगण्यातला पोकळपणा त्याला जाणवू लागतो आणि एकूण आयुष्याविषयी अस्तित्ववादी प्रश्न पडू लागतात.
ज्या बूर्ज्वा वर्गावर शाब्रोल टीका करत होता त्याच वर्गातून तो स्वतः आलेला होता. म्हणजे ही टीका तो एक प्रकारे स्वतःवरच करत होता. 'फ्रेंच न्यू वेव्ह'च्या सौंदर्यतत्त्वांना हे साजेसंच होतं. जर्मनांनी हिटलरचे अनुयायी होणं स्वीकारलं आणि दुसरं महायुद्ध घडवलं. ह्यामुळे जग त्यांच्याकडे अपराधी म्हणून पाहतं. मात्र, त्या काळातला फ्रेंच बूर्ज्वा वर्गही मोठ्या प्रमाणात तशा विचारांचा होता. महायुद्धादरम्यान फ्रान्सनं देश म्हणून खूप काही सोसलं असलं तरीही ह्या वर्गानं जर्मन सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून आपला स्वार्थ त्याही काळात साधून घेतला होता. युद्ध संपून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा हा वर्ग सत्ताधारी गोटात किंवा सत्तेजवळ राहिला. जणू राजकीय परिस्थिती काही का असो, यांना कुणी हातच लावू शकत नव्हतं. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा त्यांचा स्वभाव, आणि त्यांच्या जगण्यातला सडका-कुजका भाग शाब्रोलनं दाखवला. तसंच एकीकडे रूढ चौकटीनुसार जगण्याचा बूर्ज्वा समाजाचा अट्टहास आणि विकाराधीन होण्याची मूलभूत मानवी प्रेरणा (जी वर्गविभागणीच्या पल्याड असते) यांतली द्वंद्वंही त्यानं दाखवली. स्खलनशील, विकारी मानवाला शाब्रोलची सहानुभूती मिळते, तर चौकटीत अडकलेले लोक त्याला केविलवाणे वाटतात; तरीही तो तुच्छतावादी होत नाही. हे सगळं दाखवण्यासाठी कलात्मकतेची किंवा अभिजाततेची तेव्हापर्यंत रूढ झालेली चौकट मोडून त्यानं हेतुपुरस्सर कमी प्रतिष्ठेच्या, हीन अभिरुचीच्या गुन्हेपटांच्या विधेचा आधार घेतला. ("आपण राहतो त्या जगात पिझ्झा लवकर येतो; पोलीस उशिरा येतात." - शाब्रोल) ह्या गुन्हेगारी कथांतून तो बूर्ज्वा सौंदर्यशास्त्र नाकारत होता आणि स्वतःचं एक नवं सौंदर्यशास्त्र घडवत होता. अशा सिनेमाला आता फ्रेंचमध्ये 'शाब्रोलियन' सिनेमा असंच विशेषण वापरलं जातं. ऑस्करविजेत्या 'पॅरासाइट' चित्रपटाचा दिग्दर्शक बॉंग जून-हो आपल्यावर शाब्रोलचा प्रभाव आहे असं सांगतो.
गुन्ह्याच्या छोट्या बातम्या लोक चवीचवीनं वाचतात, पण त्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नसतात. शाब्रोलचं तसंच होतं. आपले चित्रपट श्रेष्ठ म्हणून वाखाणले जावेत अशी त्याची अपेक्षाही नव्हती, मात्र ते लोकांना आवडतील याची काळजी तो घेत असे. त्यामुळे तो तिकीट बारीवर कमालीचा यशस्वी होता. कित्येक अभिनेत्यांना त्याच्या चित्रपटांनी 'स्टार' बनवलं, पण लोक सिनेमा पाहायला यायचे ते शाब्रोलचा म्हणून, त्या स्टार्ससाठी नव्हे. चवीनं खायला शाब्रोलला आवडायचं म्हणून तो खायचा; तसंच सिनेमा करायलाही त्याला आवडायचं म्हणून तो सिनेमा करायचा. १९५८-२००९ या ५१ वर्षांच्या काळात त्यानं जवळपास साठ चित्रपट दिग्दर्शित केले (शिवाय लघुपट, टीव्ही मालिका वेगळ्याच). आणि हे सगळं 'प्रतिभेचा मनोज्ञ आविष्कार' वगैरे जड शब्द न वापरता. "स्वतःला फार गांभीर्यानं घेणं टाळायला हवं." असं म्हणणाऱ्या शाब्रोलचं आवडतं वाक्य – "आय लव्ह मर्डर!"