लोकसंगीताची दशा आणि दिशा - प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

लोकसंगीताची दशा आणि दिशा

- प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

महाराष्ट्र ही संत तंत आणि पंताची भूमी आहे. इथल्या लोकसंस्कृतीची पाळेमुळे अगदी खोलवर रूतलेली आहेत. इथली प्राचीन संस्कृती धर्म-धर्मिकतेशी जोडलेली असून भक्तिनाट्य, विधीनाट्य आणि रंजनप्रधाननाट्य या त्रिसूत्रीच्या डोलाऱ्यावर ही परंपरा उभी आहे. प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळांत इथल्या लोकपरंपरा यज्ञयाग, क्रिया, यातूक्रिया, उत्सव, महोत्सव तितक्याच भक्तीभावे आणि आनंदाने साजरा करतात. लोकसंगीत लोकजनाच्या मनाचा ठाव घेणारे आहे. आत्मानंदासाठी उदयाला आलेले लोकसंगीत परमानंदासाठीसुद्धा काम करते. आणि म्हणूनच चित्रपट, दूरचित्रवाहिन्या, नाटक यांना लोकसंगीताची भुरळ पडल्यासारखी वाटते. शास्त्रधाटी आणि लोकधाटी या कृष्णा-कोयनेच्या संगमासारख्या जुळ्या बहिणी आहेत. त्यात चित्रपट संगीताची भर पडली.

शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि चित्रपट संगीत या तिन्हींतही शास्त्र असते. पण शास्त्रीय संगीतावर संगीताच्या व्याकरणाचा प्रभाव असतो; तर्काचा प्रभाव असतो. तर लोकसंगीत आणि चित्रपट संगीत हे भावनाप्रधान संगीत असते. लोकसंगीत हे मूलतः पारंपरिक संगीत असते. त्याच्या चालींचे परंपरेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे निर्वहन होते. लोकसंगीताचा हेतू हा इष्ट देवतांना संतुष्ट करणे, आध्यात्मिक उद्बोधन करणे, समाजप्रबोधन करणे, निखळ मनोरंजन करणे असा असतो. लोकसंगीताच्या सादरीकरणातील संरचना परंपरेने बद्ध केलेली असते. या पारंपरिक लोकसंगीतातून ऊर्जा घेऊन त्या-त्या काळातलं समकालीन संदर्भांचं जे लोकसंगीत तयार होतं, त्याला लौकिक संगीत असं म्हणतात. याचं उदाहरणच द्यायचं म्हणलं तर असं म्हणता येईल; खंडोबाच्या जागरणातील वाघ्या-मुरळ्यांचे एखादे पारंपरिक गीत असेल आणि ते जनमानसात अधिक लोकप्रिय असेल, तर त्या चालीची लोकप्रियता लक्षात घेऊन एखादा कलावंत त्या चालीवर आपल्या शब्दकलेतले दुसरे गीत बांधतो. शाहीर साबळे यांच्या आवाजातील 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या' हे गीत, छगन चौगुले यांच्या आवाजातील 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' हे गीत, साकराबाई टेकाळे यांच्या आवाजातील 'गणबाई मोगरा गणाची जाळी' ही गीते मूळची लोकसंगीताच्या बाजाची. त्यांचा समावेश लौकिक संगीतात करता येतो. विठ्ठल उमप यांनी गायलेले 'ये दादा अवर ये' यासारखी कोळी लग्नगीते यांचा समावेशही लौकिक संगीतात करता येतो. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, स्नेहल भाटकर अशा गायकांच्या कंठातून उतरलेली अनेक भक्तिगीते व त्यांच्या चाली या मूळच्या अभंगांच्या पारंपरिक चाली आहेत. 'चल गं सखे चल गं सखे पंढरीला', 'पाऊले चालती पंढरीची वाट', 'श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा', 'दुमदुमली पंढरी' ही व अशी अनेक भक्तिगीते लौकिक संगीतात मोडतात. कारण त्यांचा बाज जरी लोकसंगीताचा असला तरी ती कुणीतरी लिहिलेली आणि कुणीतरी गायलेली असतात. या लौकिक संगीताचा फार मोठा प्रभाव आपल्या मराठी चित्रपट संगीतावर आहे. अनेक चित्रपटांततर लौकिक संगीत जसेच्या तसे वापरलेले आढळते.

जानपद गीतांचा फार मोठा संस्कार मराठी चित्रपट संगीतावर आहे. जानपद गीते परंपरेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे मुखर होत आलेली असली, तरी या जानपद गीतांमध्ये समकालीन संदर्भांची पेरणी केलेली असते. 'सुंदर माझे जाते गं फिरते बहुत' या संत जनाबाईच्या जात्याची घरघर प्रपंच आणि परमार्थाचं दळणकांडण, चिंता, क्रोध दूर सारून ज्ञानाची ताटी उघडायला सांगणाऱ्या मुक्ताबाईचं आर्जव आणि पुढे खानदेशच्या कवयित्री बहिणाबाईंनी संसाराची मांडलेली व्याख्या - 'अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर। आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर।' या सर्वांच्या संस्कारांतून चित्रपट संगीतात जानपद गीते आली. जात्यावरच्या ओव्या, झिम्मा, फुगड्या, पिंगा, मंगळागौर आदींचे दर्शन मराठी चित्रपटांतून होऊ लागले. 'नाच गं घुमा नाचू मी कशी', 'नागपंचमीच्या सणा', 'पोरी घालती धिंगाणा', 'धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा', 'किसबाई किस दोडका किस', 'चल गं सये वारूळाला', 'नागोबाला पूजायला' ही काही उदाहरणे.

मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करता पौराणिक चित्रपटांनी प्रारंभ झालेल्या मराठी चित्रपटांचा आधीचा तोंडवळा मध्यमवर्गीय जीवनाशी संबंधित अशी कौटुंबिक चित्रपटांचा होता. नंतर मराठी चित्रपटांत तमाशापटांचे वारे वाहू लागले. तसेच होनाजी बाळा, राम जोशी अशा शाहीरांवर चित्रपट बेतले गेले. तेव्हापासून खऱ्या अर्थी शाहिरी वाङ्‌मय म्हणजे फटका, सवाल-जबाब आदींचा वापर मोठ्या खुबीने चित्रपटात होऊ लागला. 'सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली' यासारखी शाहिरी कवने चित्रपट गीते म्हणून ओळखू येऊ लागली. बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, छत्रपती शिवराय यांच्या शौर्यगाथांवरील चित्रपटांत हमखास पोवाड्यांच वापर होऊ लागला. तो एकेकाळच्या ऐतिहासिक चित्रपटातील शिवकालीन स्फूर्तीदायी पोवाड्यांपासून ते 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यासारख्या चित्रपटातील नंदेश उमप यांनी गायलेल्या अफजल खानाच्या पोवाड्यापर्यंत. पोवाडा, कटाव, सवाल-जबाब यांचा अतिशय चपखल वापर चित्रपटात केला गेला. शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर फरांदे, शाहीर बाबासाहेब देशमुख, शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे यांच्या पोवाड्यांचा अतिशय विलक्षण प्रभाव त्या-त्या काळांत लोकमानसावर होता. त्याचे दर्शन चित्रपटांमधून घडले इतकेच नव्हे, तर काही ग्रामीण चित्रपटात लोकसंगीताचा गळा असणाऱ्या शाहीर साबळेंचाही पा़र्श्वगायनासाठी वापर करून घेण्यात आला. 'जीवा-शिवाची बैलं जोडं'सारखे गीत 'तांबडी माती' चित्रपटात मंगेशकर भावंडांनी शाहीर साबळेंकडून गाऊन घेतले. एकूणच विसाव्या शतकाच्या मध्यावर साहित्य, नाट्य, संगीत, लोकसंगीत आणि चित्रपट यांचा हृदयंगम संगम अनेकदा पाहायला मिळतो.

वीररसप्रधान पोवाड्यांसारखेच जागरण, गोंधळ, जोगवा आदी विधिगीतांचे संस्कार मराठी चित्रपटांवर होते. या विधिगीतांच्या पारंपरिक चाली चित्रपटांमधून ऐकायला मिळतात. 'जय मल्हार'सारख्या चित्रपटामधून वाघ्या-मुरळ्यांच्या गीतांचे दर्शन झाले. 'मुरळी गं माझी मुरळी चारचौघांत तुला हेरली' हे चित्रपटगीत खंडोबाच्या जागरणाची आठवण करून देणारे आहे.'गुणगान गाई आदी, आई उदे गं अंबाबाई' हे चित्रपट गीत अंबाभवानीच्या गोंधळाची आठवण करून देणारे आहे. 'कौल दे खंडेराया', 'आई उदे गं अंबाबाई' या चित्रपटांच्या नावांवरूनदेखील आपणास प्रत्यय येईल तो अनुक्रमे खंडोबा आणि अंबाबाई या देवातांच्या कुळधर्मांचा. अगदी अलीकडच्या काळात प्रदर्षित झालेल्या जोगवा मधील नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगुर हे चित्रपटगीत जोगतिणीच्या पारंपरिक गीतांची आठवण करून देणारे आहे. 'अगं बाई अरेच्चा'! चित्रपटात शाहीर साबळेंच्या मल्हारवारीचे चित्ररूप दर्शन त्यांचा नातू केदार शिंदे याने घडविले आहे. वाघ्या-मुरळ्यांचे जागरण, अंबेचा गोंधळ, यल्लम्माच्या जोगतिणींच्या जोगवा यांचे दर्शन चित्रपटात घडवताना पारंपरिक चालींचा बाज चित्रपटातील गीत-संगीताने कायम ठेवला आहे. पण अनेक वेळा मुरळीच्या पायांत घुंगरू आणि अंबाबाईचा उदोकार करताना स्त्री आणि पुरूष उपासक एकत्र अशी गमतीजमतीही रूपेरी पडद्यावर पाहायला मिळाल्या.

तमाशापटांचा फार मोठा प्रभाव मराठी चित्रपटांवर होता आणि आजही आहे. तमाशातले पारंपरिक संगीत मग ते लावणीचे असो अथवा गण-गवळणींचे या संगीताचे संस्कार मराठी चित्रपट गीतांवर झाले. भृंगावर्ती गेय रचना म्हणजे लावणी पद पद लावत जाणे म्हणजे लावणी लास्यरसाचे दर्शन घडविणारी म्हणजे लावणी असे लावणीच उपपत्तीचे अनेक अर्थ सांगितले जातात. ही लावणी म्हणजे चित्रपटसंगीताच्या नभांगणावरती शुक्राची चांदणी भूपाळी ते लावणी असा मराठी चित्रपट संगीताचा प्रवास आहे. 'घनश्याम सुंदरा'पासून ते थेट 'सुंदरा मनामध्ये भरली'पर्यंतचा हा प्रवास भक्ती आणि शृंगार या दोन्ही रसांचे दर्शन घडविणारा आहे. लावणी नाही असा एकही तमाशापट संभवत नाही.

'पिंजरा' चित्रपटातील लावण्या आणि गवळणी राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनातून उतरल्या आहेत. स्वतः राम कदम बॅण्डच्या परंपरेतून पुढे आले. त्यामुळे ते लोकसंगीतात आकंठ बुडाले होते. ग. दि. माडगूळकर, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर आदी गीतकारांच्या लावण्यांची तसेच वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई, राम कदम, बाळ पळसुले, विश्वनाथ मोरे अशी संगीत दिग्दर्शकांची अतिशय वैभवशाली परंपरा चित्रपट संगीतात लोकसंगीताला प्राधान्य देणारी अशी होती. 'तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं सोळावं वरीस धोक्याचं', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला तुझ्या उसाला लागल कोल्हा', 'कसं काय पाटील बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का' या सुलोचना चव्हाण यांच्या लावण्यांचं सुवर्णयुग कोण विसरू शकेल! 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा', 'भरलं आभाळ पावसाळी पाहुना गं' या अलीकडच्या काळातील लावण्या आणि 'नटरंग'मधील लावण्या म्हणजे लोकसंगीत आणि चित्रपट संगीताच्या कलमी आंब्यावरची आंबटगोड फळंच म्हटली पाहिजेत. अलीकडच्या काळात 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातून 'चला जेजुरीला जाऊ' ज्ञानोबा उत्पातांची लावणी गायली गेली. ही लावणी भक्तिरसातील असूनही फार गाजली.

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळी स्थित्यंतरे आली आणि गेली तशी इथल्या लोकसंस्कृतीने आपली कुस बदललेली एकविसाव्या शतकात फार मोठे बदल घडताना आपल्या पिढीने आणि आपल्या अगोदरच्या पिढीने सगळ्याच क्षेत्रांत पाहिले; जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाचे नवीन युग उदयाला आले आहे. जागतिकीरणात औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्रांत जसे बदल जाणवतात तसे मनोरंजनाच्या क्षेत्रातही बदलाचे वारे वाहायला लागलेले आहेत. त्यात चित्रपटक्षेत्र आणि पारंपरिक लोककला यासुद्धा बदलताना दिसतात. अगोदर आपण लोकसंगीतातून चित्रपट संगीत कसे समृद्ध झाले याचा धुंडाळा घेतला. आजची परिस्थिती त्याच्याविरूद्ध दिशेने जाताना दिसते. या उलट प्रवाहातून लोकसंगीत काहीसे भ्रष्ट होते की काय अशी एक भीती माझ्यासारख्या लोककलावंतांला वाटते.

पारंपरिक प्रयोगात्मक लोककलांमध्ये पारंपरिक लोकवाद्ये दिसत नाहीत. जागरण-गोंधळांसारख्या विधीनाट्यात संबळ, दिमडी, तुणतुण्याऐवजी सिंथेसायझर, फायबरचे ताशे आणि कच्ची ढोलाचा वापर लोककलावंत आपल्या कार्यक्रमांमधून सर्रास करताना दिसतात. पारंपरिक खंडोबा-बाणायी-म्हाळसादेवीच्या पारंपरिक गीतांना चित्रपटांच्या चालीवरची गाणी अथवा चित्रपटाची गाणी गाताना दिसतात. चित्रपटांमध्ये संस्कारक्षम शृंगारीक लावणीऐवजी लावणी म्हणून आयटम साँग दाखविण्याचा प्रघात अलीकडच्या काळात दिसायला लागला आहे; ते परंपरेला मारक आहे असे वाटते. चित्रपटांची अनेक गाणी आपण लोकसंगीताच्या चालीवरची असतात असे म्हणतो पण हा प्रवाह उलटा वाहायला लागला आहे. तमाशासारखा निखळ रंजनासाठी उदयाला आलेल्या कलाप्रकाराने एके काळी लोकांचं मनोरंजनाबरोबरच प्रबोधन-उद्बोधन केले. आज मूळ पारंपरिक तमाशातील गण, गौळण, लावणी, टाकणी, शिलकार यांनी चित्रपटाच्या संगीताची जागा घेतली. 'आदी गणाला रणी आणा हो' अशी गणांनी 'मोरया मोरया'ची जागा घेतली. तर 'सोड जाऊ दे मला' या गौळणीऐवजी 'आज राधा को शाम याद आ गया' अशी चित्रपटातील गीते तमाशाच्या बोर्डावर सादर व्हायला लागली आहेत. पारंपरिक घटकांऐवजी ऑर्केस्ट्रा प्रस्तुत व्हायला लागला. ढोलकी, हलगी, तुणतुणं, टाळ, मंजिरी यांऐवजी ऑक्टोपॅड, सिंथेसायजर, काँगो, बोंगो, ढोल, ड्रम यांचा वापर व्हायला लागला.

चित्रपटांचा प्रभाव हा लोकपरंपरेतील लोकसंगीतावरच पडला नाही तर वेशभूशेवरसुद्धा पडला. तमाशामध्ये लावणी नृत्यांगना पूर्ण अंग झाकूण, नऊवारी साडीमध्ये नृत्य करत असते. पण आज तसे दिसत नाही. आज मात्र अंगावर तोकडे कपडे घालून त्यात जास्त बेगडीपणा आणला जातो. नृत्याची अदाकारी कमी आणि अंगप्रदर्शनाला जास्त महत्त्व दिले जाते. चित्रपटाच्या अनुकरणामुळे मूळ बाज लुप्त होत असताना दिसतो. याबरोबर लावणीच्या जागी पारंपरिक लावणी न करता आयटम साँग जास्त प्रमाणात दिसून येते.

लोकरंगभूमीवरील कलाप्रकारांमध्ये मूळ कथानकाला धक्का न लावता त्याला अनुसरून अनेक पारंपरिक अविष्कार सादर होत असत. पण आज मुळ कथानक राहिले बाजूला, आणि डीजेच्या धूमधडाक्यात शब्दांना जणू मूठमातीच दिली की काय असे अनुभवास येते. पूर्वी चित्रपटाच्या कथानकानुसार गीतांची रचना केलेली असायची त्या रचना भावभावनेशी निगडीत असायच्या. आता मात्र डिस्कोच्या जमान्यात त्या भावनांना तिलांजली दिली आहे. ओढूनताणून कथानकांची मागणी नसतानाही चित्रपटात गाणी घुसवली जातात; ती दीर्घकाळ चालत नाहीत. पूर्वीची गाणी आजही स्मरणात राहतात; परंतु आजमितीला महिनाभरापूर्वी आलेलं गाणं आठवतही नाही. हा तंत्रज्ञानाच्या युगाचा परिणाम आहे की संस्कृती एका वेगळ्या दिशेने चाललेली आहे हेच कळायला मार्ग नाही. लोकसंस्कृतीचा उपासक या नात्याने घेतलेला हा आढावा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

संस्कारक्षम शृंगारीक लावणीऐवजी लावणी म्हणून आयटम साँग दाखविण्याचा प्रघात अलीकडच्या काळात दिसायला लागला आहे; ते परंपरेला मारक आहे असे वाटते

संस्कारक्षम शृंगारीक लावणी म्हणजे कशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

…हे यासारखे काहीतरी?

नक्की काय, ते अर्थात लेखकच सांगू शकेल, परंतु तरीही, ‘संस्कारक्षम’ या शब्दाचा काही अर्थ लागत नाही, हे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लावणी म्हणजे स्त्री शरीर, नजरेने पिणे, नेत्रसुख, अंगप्रदर्शन, कामुकता चाळवणे ... इ

बाकी सगळी अंधश्रद्धा आहे.

---

भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक संगीत ह्या शब्दात च त्याचा पूर्ण अर्थ आहे.
. आदरणीय विठ्ठल उमप ,आदरणीय शाहीर साबळे,आदरणीय सुलोचना चव्हाण अनेक गायकांनी खूप महान कार्य केले आहे
लोकसंगीत मध्येच समाजाचे प्रतिबिंब आहे.
लावणी ल नाव ठेवणारे दो तोंडी आहेत.
शृंगार रस हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
शृंगार रस हा पवित्र च आहे.
लैंगिक चाळे करणे हे गैर आहे.
. एक भीती आता मला वाटते
मराठी भाषे चेक पूर्ण ज्ञान असेल तर च लोकसंगीताचा सुंदर अनुभव घेता येईल
आताच्या पिढी लं मराठी भाषा .विविध बोली भाषेत बोलली जाणारी ह्याचे ज्ञान नाही.
. मी पश्चिम महाराष्ट्र मधील असून पण कोळी गीता मधील प्रतेक शब्दाचा अर्थ समजून घेतो आणि मला त्या शब्दांचे अर्थ पण माहीत आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0