खूप सारा पसारा

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

खूप सारा पसारा

- आरती रानडे

घरातल्या अनावश्यक गोष्टी, क्लटर, पसारा हा विषय निघाला की मला हमखास आठवतं ते जेरी साईनफेल्डचं गारबेज किंवा कचरा या विषयावरचं २ ते ३ मिनिटांचं विनोदी भाष्य. जेरी साईनफेल्ड हा माझा आवडता स्टँड-अप कॉमेडीयन. अमेरीकेला आल्यानंतरच्या पहिल्याच वर्षात 'जेरी साईनफेल्ड शो'ची चटक लागली. अमेरीकन जीवनात मुरतामुरता त्याच्या शोमधली पात्रं, किस्से आजूबाजूला दिसायला लागले.

माझ्या विद्यार्थीदशेत पहिल्यांदा जेव्हा मी साईनफेल्डचं गारबेज या विषयावरचं भाष्य ऐकलं तेव्हा त्याच्या इतर विनोदांना हसते तशी खदखदून हसले. मनसोक्त दाद दिली. एपिसोड संपला. विषय संपला.

शिक्षण, नोकरी, लग्न, गाडी, घर, छंद, अमेरिकेतील उच्चशिक्षित, समृद्ध मराठी माणसाचं सार्वजनिक आयुष्य … सर्वार्थानं 'अमेरीकन ड्रीम' प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया कळत-नकळत होत राहिली.

बर्फ पडत असताना कुडकुडत युनिव्हर्सीटीला बसनं किंवा चालत जायचो, त्याची जागा गाडीनं घेतली.

घर घेतलं आणि रूममेटबरोबर अपार्टमेंट, इंटरनेट आणि वाणसामान शेअर करण्याचे दिवस गेले.

गाण्यांच्या कॅसेट किंवा आवडत्या सिनेमाची डीव्हीडी, एखादं मनात भरलेलं कॉफी टेबल बुक, सोफा, टीव्ही, पहिला कॅमेरा अशा सगळ्या लहानमोठ्या गोष्टी एकेकाळी आपण विचारपूर्वक, पैसे साठवून वगैरे घेतलेल्या आहेत याचा विसर पडावा इतक्या या गोष्टी 'पिछले जनम की बात' असल्यासारख्या वाटायला लागल्या.

सर्वार्थानं समृद्धी आली. पंधरा वर्षापूर्वी फिटनेसबद्द्ल आजच्या इतकी जागरूकता नसल्यानं ही समृद्धी घरी-दारी आणि शरीरावर दिसण्याचीदेखील फेज येऊन गेली.

'फार कंफर्ट झाला की मी अनकंफर्टेबल होते', असा मी अनेकदा स्वतःवरतीच विनोद' करत जरी म्हणत असले तरी ते खरं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत तरी ही समृद्धी एकटी आली नाही.... येताना ती तिच्या जोडीला बेचैनी घेऊन आली.

काही वर्षापूर्वी परत एकदा साईनफेल्डचा तोच 'कचरा' या विषयावर भाष्य करणारा एपिसोड कोणीतरी व्हॉटसअ‍ॅपमधून फॉर्वर्ड केला म्हणून पाहिला गेला. पण तो पाहून पूर्वीसारखं हसून सोडून नाही देऊ शकले. ते भाष्य, तो विचार मनात परत परत आठवत राहिलं. जेरी म्हणतो, 'आपलं घर म्हणजे फेकण्यापूर्वी विविध टप्प्यातला कचरा साठवून ठेवण्याचं ठिकाण असतं. सगळ्यात नवीन गोष्ट आपण टेबलवर ठेवून उघडतो. सगळ्यांना दाखवतो. काही काळ ती गोष्ट घरातल्या दर्शनी भागात असते. मग या गोष्टीची उपयुक्तता कमी होते, ती जुनी होते किंवा नवीन गोष्ट येते. मग आधीची गोष्ट कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये जाते. आपण नीट लेबल लावून गोष्टी ऑरगनाईझ करत राहतो. मग काही काळानं गोष्टी खोक्यात जातात. मग तिथून गॅरेजमध्ये (किंवा भारतातल्या घरांतल्या माळ्यांवर). गॅरेजमध्ये गेलेली गोष्ट परत कधीच वापरण्यासाठी घरात येत नाही.'

माझ्यासाठी हे भाष्य अंतर्मुख करणारं, विचार करायला भाग पाडणारं आहे असं वाटायला लागलं.

भारतातून दोन बॅग्स घेऊन आलेली मी... बघता बघता गोष्टी खोक्यात घालून, त्यावर लेबल लावून गॅरेजमध्ये ठेवण्याच्या टप्प्यापर्यंत आले देखील. अवघ्या १२-१३ वर्षात ही परिस्थीती येईल असं वाटलंही नव्हतं.

या सगळ्या वाढवलेल्या पसार्‍यातला फोलपणा जसाजसा समजायला लागला, क्षणभंगुरता लक्षात यायला लागली आणि प्रश्न पडायला सुरुवात झाली.

या इतक्या सगळ्या गोष्टींची खरंच आपल्याला गरज आहे का, इथपासून आपण या भौतिक सुखाचे, विविध गोष्टींचे गुलाम तर होत नाही ना?, ते आपली ओळख किंवा दर्जा हा फक्त आपली आर्थिक स्थिती, आपण वापरतो ते ब्रँड्स यावरून तर ठरवली जात नाही ना, अशा अनेक प्रश्नांवर माझ्या आणि नवऱ्याच्या - मुकुलच्या चर्चा व्हायला लागल्या. आम्ही जवळच्या मित्रमंडळीशी या विषयांवर बोलायला लागलो.

घरातल्या वाढलेल्या अनावश्यक गोष्टी तर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतच होत्या. पण त्याचबरोबर डोक्यात साठत गेलेल्या विचारांचं, विषयांचं, गोष्टींचं काय? ते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नसलं तरी जाणवायला लागलं होतं. खासकरून जेव्हा आम्ही सायकलींग करायला जायचो तेव्हा लांब पल्ल्याच्या राइड्स असल्या की सहा-आठ-दहा तास सायकलींग व्हायचं. त्यावेळी सायकलच्या चाकाला जसजशी गती यायची तशी विचारांनाही. शिवाय 'मल्टायटास्कींग' करत नसल्यानं शांतपणे विचार करायला वेळ मिळायचा. जो वेळ इतर वेळी आपण सतत काही ना काही करून 'भरायचा' प्रयत्न करत असतो, असा मोकळा वेळ. हातात फोन नाही, सतत मेसेजेस - बातम्या - कोण काय करतय पाहणं नाही, काही वाचन नाही, कोणाशी बोलणं नाही, काही पाहणं नाही, घरातली - ऑफिसची कामं नाहीत. सायकलच्या चाकांची गती, चकचक चकचक असा चाकांचा रिदम, मागे पडणारी आजूबाजूची दृश्य, मोकळी हवा आणि मनात स्वतःशी संवाद.

कधीकधी तर वाटायचं माझ्या मेंदूचं 'रेल्वे जंक्शन' झालंय. वेगवेगळ्या गाड्या येताहेत, लोकं उतरताहेत - नवीन चढताहेत, सामानांची ओझी. एकाच वेळी ४ गाड्या सुटताहेत आणि २ येताहेत असा काहीसा सगळाच गलका. मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला की माशा जशा गुणगुण गुणगुण करत चौफेर विखुरतात तशी काहीशी डोक्यातल्या विचारांची अवस्था. अर्थात हे काही एका रात्रीत नक्कीच घडलं नव्हतं. पण हळूहळू, थोडंथोडं साठत साठत आता ते जाणवण्याच्या पातळीपर्यंत आलं होतं.

मी स्वतःकडे कमालीची तटस्थतेनं पाहू शकण्याचा एक फायदा की मी सामान्यतः 'जस्टीफिकेशन मोड' मध्ये जात नाही. त्यामुळे या सगळ्याला माझ्याच सवयी, आवडीनिवडी थोडक्यात मीच जबाबदार आहे याची मला जाणीव झाली. लहानपणापासूनच्या घरातल्या वातावरणामुळे अनेक विषयांची गोडी निर्माण झालेली. पुढे मोठं होताना अनेक छंद जोपासले, वाढवले. त्यानिमित्तानं विविध क्षेत्रांतली - विविध विषयांवर बोलू शकणारी जगभरातली माणसं जमवली. मित्रपरिवार वाढला. गप्पांचे, अभ्यासाचे विषय विस्तारले.

आणि त्यात एकूणच इंटरनेटमध्ये क्रांती झाल्यापासून जगभरातली कोणतीही माहिती सतत अक्षरशः अ‍ॅट द फिंगरटिप्स उपलब्ध झाली. मग अजूनच जोमानं आवडीच्या विषयांत संचार सुरु झाला. अजून माहिती - अजून जास्त माहिती - अजून जास्त आदानप्रदान - अजून जास्त चर्चा - अधिक लोकांशी संपर्क. एक न थांबणारी साखळीच. आणि या साखळीची हळूहळू भरभक्कम बेडी कशी झाली माझं मलाही कळलं नाही. एका ट्प्प्यावर तिचं वजन मात्र जाणवायला लागलं.

कंप्यूटरचा वेग, मेमरी आणि क्षमता यांत काही दशकांत अतिप्रचंड वेगानं प्रगती झालीये. पण माहिती साठवण्याची, त्यावर विचार करण्याची, त्यातल्या निवडक माहितीचं ज्ञानात रूपांतर होण्याची, अनुभव -अनुभूती घेण्याची माझ्या मेंदूची क्षमतामात्र कंम्प्युटरसारखी वेगानं वाढलेली नाही किंवा वाढणारदेखील नाही. माझ्यातली 'बायोलॉजीस्ट' मला सांगत होती, पण जीवनाचा वेग आणि पसाराच इतका वाढलेला की हे ऐकायला मला उसंतच नव्हती बहुतेक. मात्र हा वेग, पसारा मनाला, शरीराला थकवणारा होता.

यासाठी मी माझ्यापरीनं उपाय करायचा प्रयत्नही केला. विपश्यनादेखील करून पाहिली. तेवढ्यापुरतं चांगलं वाटायचं. पण नक्की कसलं ओझं बाळगतोय आपण? याचं नेमकं उत्तर मात्र मिळत नव्हतं.

या सगळ्यातच रोजचं प्रयोगशाळेतलं काम करताना विविध प्रकारच्या पेशी, त्यांची लाईफसायकल, पेशींची प्रमाणाबाहेरची वाढ, कॅन्सर हे सगळे माझ्या संशोधनाचे, कामाचे विषय. या प्रयोगशाळा ह्या आयुष्याकडे वेगळ्या प्रकारे बघायला शिकवणार्‍या जिवंत शाळाच आहेत असं मला वाटतं.

अगदी एक साधी पेशी जरी घेतली, तरी पेशींतल्या प्रत्येक घटकाचं विशिष्ट कार्य असतं. गोष्टी स्वीकारणं, त्याचा वाढीसाठी उपयोग करणं आणि वेळोवेळी साठलेल्या गोष्टी, कचरा, बायप्रॉडक्टस बाहेर टाकणं, त्याची विल्हेवाट लावणं या सगळ्या गोष्टी पेशी करत असतात.

कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली की ती टॉक्सिक किंवा अपायकारक होते. निर्मिती - वाढ, कार्य - शेवट हा बॅलन्स राखण्याचं उपजत ज्ञान जीवनाच्या सगळ्यात साध्या, सिंपल घटकाला पेशीलादेखील असतं; मग आपण इतकं सगळं का साठवतो? आपण गोष्टी साठवतो, पैसे साठवतो, ज्ञान साठवतो, आठवणी साठवतो, माणसं जमवतो. वाढता वाढता वाढे या न्यायानं सगळ्याच गोष्टी वाढत राहतात. 'अजून.. अजून..'ची ही न संपणारी मालिका आहे.

त्यामुळे फिजिकल, वैचारिक, भावनिक या सगळ्याच पातळ्यांवर अनावश्यक असलेल्या गोष्टींचा पसारा थोडाथोडा करत कमी करायला हवाय असं वाटायला लागलं.

गुडबाय थिंग्ज

'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं' किंवा 'प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते' वगैरे वगैरे जे म्हणतात ते खरं वाटावं इतक्या योगायोगानं त्याच वेळी एका पुस्तकाच्या दुकानात सहज पुस्तकं चाळत असताना फुमियो सासाकी या जपानी लेखकाचं 'गुडबाय थिंग्स' हे पुस्तक माझ्या हाती पडलं. अतिशय साधं कव्हर. आपसूकच उत्सुकतेपोटी पुस्तक चाळायला घेतलं, आणि 'प्रीफेस' वाचल्यावर पुस्तक, विषय इंटरेस्टिंग वाटला म्हणून पुस्तकाच्या नावाची नोंद करून ठेवली. पुस्तकाचं नावंच 'गुडबाय थिंग्स'. त्यामुळे भावनेच्या, उत्साहाच्या भरात लगेच पुस्तक खरेदी करणं योग्य होणार नाही म्हणून पब्लिक लायब्ररीमधून वाचायला हे पुस्तक घेऊन आले. पुस्तकाची प्रस्तावना वाचली 'माझंही असंच होतंय का? आपणही अशाच अनेक बारीक बारीक गोष्टींमध्ये, सवयींमध्ये, आपल्या इमेजमध्ये अडकलोय का?' असं वाटायला लागलं.

'आयुष्यात फार पसारा झालाय', 'आयुष्य सुटसुटीत पाहिजे', डोक्यात फार गर्दी झालीये, क्लॅरीटी कमी होतीये, गोष्टी सॉर्ट करायला हव्यात, असं जे आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं त्यावर 'गुडबाय थिंग्स' हा उपाय असू शकतो का?

डोक्यात विचारचक्र चालू झालं.

वास्तविक भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानापासून ते गांधी, विनोबा भावे या सगळ्यांनी आपल्याला वेगवेगळ्या मार्गानी हेच सांगायचा प्रयत्न केलाय. 'संचय करू नका'पासून 'गुलामगिरीपासून मुक्तता' हे आपण लहानपणापासून या ना त्या मार्गानं शिकत येतो. पण स्पष्टच सांगायचं तर सगळे सुविचार, शिकवणूक पुस्तकात आणि सगळं तत्त्वज्ञान म्हातारपणासाठी जपून ठेवलेलं अशी आपली अवस्था आहे. 'तत्त्वज्ञान' ही आपल्या रोजच्या आयुष्यात, आचारणात आणण्याची गोष्ट आहे; तो रोजचं आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हे आपल्याला कोणीही सांगत नाही, शिकवत नाही.

फुमीयो सासाकीसारखा लेखक खरं तर तुम्हाला यापेक्षा वेगळं काहीच सांगत नसतो. किंबहुना तोदेखील गांधींचेच विचार त्याच्या पुस्तकात लिहितो. पण काही गोष्टी 'बाहेरच्या' माणसांनी सांगितल्या की पटतात तसं काहीसं माझंही 'गुडबाय थिंग्स' वाचल्यावर झालं.

जसंजसं पुस्तक वाचत गेले तसतसं 'आपण हा प्रयोग करून पाहायचा … ' असं माझ्यातली संशोधक मला सांगायला लागली.

आणि माझ्या आयुष्यातल्या 'पसारा… आवरा! ' या प्रयोगाला सुरुवात झाली.

गेल्या पाच वर्षापासून म्हणजे २०१७पासून मी घरातल्या 'अनावश्यक' गोष्टी कमी करायला सुरुवात केली. कपडे, भांडी, जुनी इलेक्ट्रॉनिक्स, रीसर्च नोटस, स्टेशनरी, खेळाचं सामान, आणि असंख्य 'मिसलेनियस' गोष्टी.

अमेरीकेत आल्यानंतर घेतलेलं काळाठिक्कर पडलेलं पहिलं चहाचं भांडं, भारतातून येताना शिवून घेतलेला आणि आता पूर्णतः: कालबाह्य झालेला फॉर्मल सूट, हाताने लिहिलेले परीक्षेचे पेपर्स - त्यातही ज्यात वर्गात आपल्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते तो जपून ठेवलेला खास पेपर, नंतर कधीतरी लागतील म्हणून ठेवलेल्या वर्गातल्या नोट्‌स अशा अनेक भावनिक गुंता असलेल्या गोष्टी. हजारो ऑडीयो कॅसेटस, जुन्या काळातल्या प्लॉपी डीस्क्स, वॉल्कमन, पेजर, प्लिप फोन्स अशा अनेक अँटिक व्हॅल्यू असलेल्या गोष्टी. रोल भरायचे कॅमेरे असलेल्या जमान्यातले दुरून काढलेले 'प्राण्यांचे आणि पक्षांचे' फोटो, चुकलेले चित्रकलेचे, ओरिगामीचे प्रयोग…इथपासून उगाच पिअर प्रेशर वाटण्याच्या काळात घेतलेले आणि लेबलसुद्धा न काढलेले काही कपडे, उंच टाचांचे बूट, अमेरिकेतल्या बहुतेकांच्या घरात दिसणाऱ्या 'पिअर वन इंपोर्टस' सारख्या दुकानातून घेतलेल्या घरातल्या शोभेच्या वस्तू!

अशा अनेक अनेक गोष्टी!

या प्रत्येक गोष्टीची काही ना काही आठवण होतीच. त्या त्या गोष्टी घरातून बाहेर काढण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा त्या आठवणीही आल्याचं. अनेकदा त्या आठवणीनं छान वाटलं. अनेकदा प्रचंड हसलो. 'तेव्हा आपण किती बावळट्ट होतो' असंही वाटून स्वतःची, एकेमेकांची चेश्टा केली. काही गोष्टी टाकून देण्याचे, गुडविलला डोनेशन देण्याचे निर्णय झटक्यात झाले. काही गोष्टी देताना चलबिचल झाली. तर काही गोष्टी 'पुढच्या खेपेस' असं म्हणत परत खोक्यातही गेल्या.

'गोष्टी कमी करण्याच्या' या प्रयोगादरम्यान अनेक मजेशीर गोष्टी देखील घडल्या. 'कपडे विकायचा प्रयत्न' करतानातर आयुष्यात पहिल्यांदाच १०० % अपयश किंवा सपशेल फेल हा अनुभव घेतला. आपल्याकडे असलेल्या नव्याकोऱ्या, लेबल देखील न काढलेल्या कपड्यांपेक्षा वापरलेल्या पण ब्रॅण्डेड चड्यांना सध्याच्या जगात जास्त मागणी आहे, हा साक्षात्कार होण्याचा क्षणदेखील अनुभवला.

ऑरगनायझेशन म्हणजे डिक्लटरींग नाही यावर 'गुडबाय थिंग्स' या पुस्तकात एक लहानसा चॅप्टर आहे. मला तर तो पुरेपूर पटला.

मला सगळ्या गोष्टी प्रचंड नीटनेटक्या ठेवलेल्या लागतात. 'मी कचरा देखील नीट आवरून टाकते' असं मला घरचे, मित्रमैत्रिणी चिडवतात ते योग्यच आहे. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी आधीच जागा ठरवणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं यावर माझा भर असल्यानं एखादी गोष्ट अमुक एक ठिकाणी असणार म्हणजे तिथेच असणार.

त्यात प्रयोगशाळेत काम करणार्‍याचं माझं आयुष्य आणि सवयी. प्रयोगादरम्यान वेळ हा अनेकदा इतका महत्त्वाचा घटक असतो की आयत्यावेळी काही शोधायला लागता कामा नये. आणि कोणाच्याही अनुपस्थितीत कोणतीही गोष्ट कोणालाही गोंधळ न उडता सापडली पाहिजे या आमच्या कामाच्या स्वरूपातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी. शिवाय जर लेबल लावलं नसेल समोरच्या ट्यूबमधलं रक्त किंवा डीएनए माणसाचा आहे की उंदराचा आहे की सेललाइनचा आहे हे सांगताही येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लेबल लावायची सवय.

त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टींची जागा ठरलेली आणि कपड्यांपासून (हायकिंगचे कपडे, भारतीय कपडे, फॉर्मल्स, इत्यादी,इत्यादी) खेळाचं साहित्य, किंवा जास्तीची स्टेशनरी किंवा जुने इलेक्ट्रॉनिक्स अशा सगळ्या गोष्टी नीट लेबल लावलेल्या बॉक्सेसमध्ये.

त्यामुळे केव्हाही घर पाहिलं तर पसारा असा कुठेच कधीच दिसणार नाही. कायम आवरलेलं. मोकळं. स्वच्छ.

मात्र जेव्हा गोष्टी कमी करायला घेतल्या तेव्हा घरात 'दडलेल्या' निरुपयोगी गोष्टी एक-एक करत बाहेर पडल्या.

याच्याही पुढची आणि अधिक महत्त्वाची गोष्ट अशी की (सुदैवानं का दुर्दैवानं हे मला माहीत नाही !) माझी फोटोग्राफिक मेमरी खूप चांगली आहे. मला पाहिलेल्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहतात. त्यामुळे घरातल्या प्रत्येक खोक्यातली बारीकशी गोष्टदेखील मी जर पाहिली असेल तर माझ्या लक्षात राहते.

'गॅरेजमध्ये दाराकडून पहिल्या शेल्फ वरच्या मधल्या कप्यात तीन बॉक्सेस आहेत. त्यातल्या मधल्या बॉक्समधे खालच्या बाजूला एका पिशवीत आकाशकंदील लावायचा बल्ब कनेक्टर मिळेल';

किंवा

'वरच्या मजल्यावरच्या लाकडी कपाटातल्या पहिल्या कप्प्यात डावीकडे प्लास्टीक बॉक्स आहे. त्यात ट्रायपॉडचा स्पेअर शू मिळेल';

हे मी जगात कुठेही असले तरी सांगू शकते आणि त्या त्या ठिकाणी त्या गोष्टी असतात.

थोडक्यात, घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीची माझ्या मेंदूमध्ये इमेज साठवली जाते.

'हे कुठे असेल?' असा मला प्रश्न विचारला की जशी कॉप्युटरवर सर्च मारला की प्रोसेसर एक एक फोल्डर शोधतो, तशी प्रक्रिया माझ्या मेंदूत चालू झालेली मला जाणवते. एक एक इमेज मेंदू स्कॅन करतोय, मेमरीचे वेगवेगळे कप्पे शोधतोय हे मला जाणवतं.

घरात जितक्या जास्त गोष्टी तितक्या माझ्या डोक्यात इमेजेस. एका दृष्टीनं मेमरी भरवणारा कचराच.

डिक्लटरींग किंवा अनावश्यक गोष्टी कमी करताना मला जाणवायला लागलं की घरातूनच काही गोष्टी फिजीकली कमी झाल्या, तर त्या गोष्टींच्या इमेजनं व्यापलेली माझ्या मेंदूतली, डोक्याच्या हार्ड डिस्कवरची जागा रिकामी होतीये. घरातल्या गोष्टी कमी करता करता, डोक्यातला पसारा आपोआप हळूहळू कमी होत गेला.

एक तर आधीच आपल्याकडे नेहेमीच्या वापरातल्या गोष्टीच मुळात मुबलक असतात. त्यात अमेरीकेसारख्या देशात राहात असताना ज्या गोष्टी दुकानात २४ तास मिळू शकतात, त्या गोष्टींचा उगाच घरात आणि पर्यायानं मेंदूत साठा कशाला करायचा; असा विचार व्हायला सुरुवात झाली आणि हे आचरणातही आणायला सुरुवात केली.

घरातले आणि मेंदूतले अनेक कप्पे मोकळे व्हायला लागले... हे कप्पे मोकळेच ठेवायचे, त्यात लगेच काही नवीन, दुसरं भरायचं नाही हेही पक्कं झालं. मला सुटसुटीत, हलकं वाटायला लागलं.

स्वत:चं आयुष्य बदलून टाकणारा असा कोणताही प्रयोग करताना आपल्या गरजा, आवडीनिवडी, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक-भौगोलिक-आर्थिक परिस्थिती, राहत असलेला देश या सगळ्यानुसार त्यात बदल / मॉडीफिकेशन / कस्टमायझेशन करायला लागणार याचं भान मी पहिल्यापासून ठेवलं होतं.

एकदम गाभ्यापर्यंत पोचता येणं खूप अवघड आहे. शिवाय तिथे धक्का लागला तर इजाही जास्त. त्यामुळे निदान एक एक करत आधी बाहेरची कमी महत्त्वाची, अनावश्यक आवरणं तर बाजूला करून बघू, असा एकदम प्रॅक्टीकल आणि बऱ्यापैकी सुरक्षित मार्ग घ्यायचा असा विचार केला.

कपडे, भांडी, चपला-बूट या तशाही माझ्या फारशा इंटरेस्टच्या गोष्टी नाहीत. ही माझ्यासाठी बाह्य आवरणं. या प्रयोगाला सुरुवात केली तेव्हा जवळचे मित्रमंडळी विचारायचे - ज्या गोष्टी तुला महत्त्वाच्या वाटतात, जवळच्या वाटतात, म्हणजे पुस्तकं-सिनेमे-गाणी यांचं काय?

काही वर्षांपूर्वी आम्ही घर बदललं तेव्हा सामान शिफ्ट करायला मूव्हर्स बोलावले होते. आमच्या घरातलं सगळ्यात जड आणि भरपूर सामान म्हणजे पुस्तकं. खोकी भरून भरून पुस्तकं उचलून मुव्हर्स सुद्ध थकले. “इ-बुक नावाचं काही असतं हे तुम्हाला माहित आहे ना!' त्यातला एकजण गमतीनं म्हणालादेखील.

हळूहळू गोष्टी कमी करणे या प्रवासात एक दिवस आम्ही पुस्तकांपर्यंतदेखील पोचलो. इथे अमेरीकेत अतिशय उत्तम सार्वजनिक वाचनालयं आहेत. आधीही आम्ही लायब्ररी वापरत होतोच, पण इंग्लिश पुस्तकं विकत घेणं आता जवळजवळ थांबवलं आहे. आता लायब्ररीचा अधिकाधिक वापर करतो. सगळीच पुस्तकं लगेच मिळतात असं नाही. पण आठवडा- दहा दिवस उशीर झाला तर 'वाचायलाच काही नाही' अशी अजिबातच वेळ आलेली नाहीये, त्यामुळे पुस्तकं होल्डवर ठेवणं, एखादं पुस्तक आवडलं तर लायब्ररीला अधिक प्रती संग्रही ठेवण्यासाठी शिफारस करणं असा वाचनालयाचा उत्तम वापर होतो. शिवाय एकेकाळी मी पिटर्सबर्ग - फिनिक्स अशा दोन ठिकाणी राहात असताना, प्रवासात पाठीवर पुस्तकांची ओझी वाहून वाहून पाठीची वाट लावून घेतली होती. त्यामुळे इ-बुक्स जेव्हापासून मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली, तेव्हापासून तर मी जास्तीत जास्त इ-बुक्स वाचायला लागले. शिवाय एका वेळी अनेक पुस्तकं हातातल्या आय पॅडमध्ये, ओझ्याशिवाय!

याचाही पुढचा भाग म्हणजे दरवेळी एका जागी बसून वाचायला हवा तितका वेळ होईलच असं नाही असं जाणवू लागल्याने गेल्या काही वर्षापासून मी अनेक पुस्तकं ऑडियो बुक्स या स्वरूपात ऐकते. याचाही आता इतका सराव झालाय की हातात पुस्तक घेऊन जसं लक्षात राहतं तितकंच मला ऑडियो बुक सुद्धा व्यवस्थित लक्षात राहतं, त्यातले भाषेचे बारकावे, फॉर्म, वाक्यरचना लक्षात येते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी पुस्तकं, जगभरातल्या विविध भाषांमधली इंग्रजीमध्ये भाषांतरित उत्तमउत्तम पुस्तकं इ बुक्स किंवा ऑडियो बुक्स या प्रकारात उपलब्ध असल्यानं, आणि कुठेही जरा वेळ मिळाला की ही पुस्तकं हाततल्या फोनमध्येही असल्यानं माझं इंग्रजी किंवा एकूणच आंतररास्ट्रीय लेखकांचं वाचन खूपच वाढलं आणि समृद्ध झालं.

मराठी पुस्तकं मात्र अजून भारतातून आणली जातात आणि त्यामुळे त्यांच्या खरेदीवर आपसूकच वजनाचं नियंत्रण येतं.

आमच्या भारतातल्या घरात आम्ही शब्दशः पुस्तकांमध्ये वाढलोय. एका वयानंतर मनानं कितीही इच्छा असली तरी ती पुस्तकं नीट ठेवणं, त्यांची देखभाल करणं, हवं ते पुस्तक नेमकं हवं त्या वेळी सापडणं या गोष्टी हळूहळू अवघड व्हायला लागतात हे आई-बाबांकडे पाहिलं की आम्हांला दिसतं, जाणवतं. पुस्तकांचा मोह माझ्याकडे वंशपरंपरेनं, जेनेटीकली आला आहे. अतिशय तटस्थतेनं माझ्यातली संशोधक या गोष्टीकडे पाहू शकते. म्हणूनच जसं वंशपरंपरेनं येणारा मधुमेह थोपवण्यासाठी आपण योग्य वेळीच साखर खाण्यावर संयम ठेवतो, तसा मी पुस्तकं संचय करण्यावर आत्तापासूनच संयम ठेवायला सुरुवात केली आहे.

पुस्तकं वाचणं आणि त्याचा संचय करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत हे मी गेल्या काही वर्षातल्या अनुभवातून शिकलीये. आजच्या डिजिटल, ई- युगात तर घरात पुस्तकांची कपाटं भरलेली नसतानाही एखाद्या व्यक्तीचं पुस्तकवाचन तगडं आणि विपुल असू शकतं अशी परिस्थिती आहे. 'डिक्लटरींग, कमी संचय' या प्रयोगादरम्यान माझ्याच विचारांत, सवयींत झालेला हा बदल मला खूप समाधान देणारा आहे.

एक काळ असा होता की मी प्रत्येक हिंदी, मराठी सिनेमा पहायचे. माझी नैतिक जबाबदारी असल्यासारखी. मित्रमैत्रिणींच्या गप्पांमध्ये 'अमुक एक सिनेमा पाहिलाय का?' यावर कायम 'हो' असं माझं उत्तर असायचं. पण याची दुसरी, टॉक्सिक बाजूही मला हळूहळू जाणवायला लागली की एखादा सिनेमा पाहिला नसेल तर नाही असं उत्तर देताना आपल्याला त्रास होतो. आपणच आपली जी इमेज तयार केलीये आपल्या मनात त्याला धक्का लागतोय या जाणीवेनं आपण अस्वस्थ होतो.

माझ्यातच झालेला अजून एक मोठा बदल म्हणजे आता मी फार मोजके हिंदी, मराठी सिनेमे पाहते. आणि मुख्य म्हणजे 'एखादा सिनेमा मी पाहिला नाहीये, तुम्ही सांगा मला त्याबद्दल' असं म्हणताना मला माझी लाज वाटत नाही की त्याचा त्रास होत नाही.

आपण गोष्टींचे, साधनांचे, सवयींचे अगदी आपल्या इमेजचे गुलाम तर होत नाही ना हा जो प्रश्न मला वारंवार पिडायचा त्या प्रश्नाचं थोडं थोडं उत्तर मिळायला मला डिक्लटरींगच्या प्रयोगाचा नक्कीच उपयोग झाला.

या सगळ्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'कमी गोष्टी, सुटसुटीत साधं आयुष्य' या बाबतीत माझं आणि मुकुलचं एकमत आहे. दोघांपैकी एकाचं जरी मत वेगळं असतं, किंवा आयुष्यातल्या आनंदाच्या, सुखाच्या, यशाच्या संकल्पना एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या असत्या तर हा प्रवास इतका आनंददायी कदाचित झाला नसता. किंबहुना अनावश्यक गोष्टी कमी करण्याच्या या प्रक्रियेमध्ये मला हे ही समजलं की या मार्गावर मुकुल माझ्यापेक्षा चार-सहा पावलं पुढेच आहे.

'आपण जसे २ बॅग्स घेऊन आलो अमेरिकेला तसे परत एकदा एका रिकाम्या घरात जाऊन राहू शकतो. एका फटक्यात सगळं कमी करून टाकायचं …' यावरही मी आणि मुकुल बऱ्याचदा बोललो. वास्तविक हे सहज शक्य होतं/ आहे. आयुष्यात वयाच्या विसाव्या - एकविसाव्या वर्षी 'झटक्यात सगळं सोडून शून्यातून सुरुवात' केलीच होती की इथे आलो तेव्हा. पण आपणच एक एक करत गोळा केलेल्या गोष्टी आपल्याच हातानं बाजूला करणं, या प्रक्रियेतून जाणं, हा रस्ता चालणं खूप आवश्यक आहे यावर आमचं एकमत झालं. कारण या प्रक्रियेत यश-अपयशाचे मापदंड, आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं? काय आवडतं? आपले विचार काय? कशातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळतं, इथपासून आपण किती दुसऱ्याच्या नजरेतून आयुष्य जगतो अशा अनेक गोष्टींची जाणीव आम्हांला होत गेली. आपले विचार आणि आपण जगत असलेली लाइफस्टाईल यांत तफावत आहे असं आम्हांला जाणवलं. विचार-आचारातली तफावत जितकी कमी तितकी ओढाताण कमी, शांतता - समाधान जास्त, याची जाणीव झाली.

गुडबाय थिंग्ज

घरातल्या गोष्टी कमी करणं, अनावश्यक गोष्टी मुळात खरेदीच न करणं, आहेत त्या गोष्टी पूर्णतः आनंद घेऊन वापरात आणणं या फिजिकल किंवा प्रत्यक्ष गोष्टीबद्दलचा मार्ग आता स्पष्ट आहे.

पण 'गोष्ट इथेच संपत नाही'. घरातल्या गोष्टी आटोक्यात आणणं फारच सोपंय. आपण निर्माण करत असलेल्या आणि साठवत असलेल्या डिजिटल पसार्‍याचं काय? तो पसारा डोळ्याला दिसत नाही, की पायात येत नाही. फोटो, सिनेमे, गाणी, मेसेजेस, इमेल्स, नंतर वाचूयात/पाहूयात म्हणून बुकमार्क करून ठेवलेल्या असंख्य लिंक्स, लेख, कविता... डिजिटल पसार्‍याची यादीची ही तर नुसती सुरुवात आहे.

गोष्टी वाढल्या की गुंतणं आलं मग त्या फिजिकल गोष्टी असोत किंवा डिजिटल गोष्टी असोत.

फिजिकल पसारा, डिजिटल पसारा आणि या सगळ्यांत गुंतल्यामुळे होणारा मानसिक पसारा... खूप सारा पसारा !

अश्या वेळी मग डोंगरदर्‍या हाक मारायला लागतात. डोंगर चढताना, भटकताना mountains make you empty असं म्हणतात त्याची खरोखर प्रचीती येते.'फिजिकल, डिजिटल सगळ्या गोष्टींपासून दूर, कमीतकमी गोष्टी बरोबर घेऊन, निसर्गात भटकणं यासारखं दुसरं सुख नाही... जरा संधी मिळाली की आम्ही डोंगरदर्‍यात भटकतो ते कदाचित empty होण्यासाठीच!

लहानपणी माझा आणि बाबांचा एक आवडता, मजेशीर संवाद असायचा.

'तू कशी आहेस?' असा त्यांनी मला प्रश्न विचारला की 'मी आहे ही अशी आहे' असं बिनधास्त उत्तर द्यायला त्यांनी मला शिकवलं होतं. मोठ्या ठसक्यात आमचा हा छोटासा सीन बर्‍याचदा घरात सादर व्हायचा.

आता परत एकदा आयुष्याच्या या टप्यावर, साधी- सुटसुटीत लाईफस्टाईल स्वीकारल्यावर, घरात कमीत कमी गोष्टी बाळगण्याच्या मार्गावर असताना, अमेरीकेत राहूनही समृद्धीच्या बबलमध्ये जायचं नाकारताना, एका अर्थी सध्याच्या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचा प्रयत्न करत असताना 'मी आहे ही अशी आहे' हे मी स्वीकारू शकते, म्हणू शकते. डिक्लटरींग, पसारा कमी करणे या प्रयोगातलं, या प्रवासातलं आजवरचं हेच फलित, हेच समाधान.

आम्ही संशोधक जेव्हा प्रयोगशाळेत प्रयोग करायला सुरुवात करतो, तेव्हा आम्ही फक्त प्रयोग करतो. तो यशस्वी झाला किंवा चुकला हे प्रयोग केल्याशिवाय कळत नाही. अपयश आलं प्रयोगात तर योग्य त्या सुधारणा करून आम्ही परत प्रयोग करतो. रोजरोज यश मिळत नाही, हे पक्कं ठाऊक असूनही आणि याचा अनुभव येत असूनही आम्ही नव्या जोमानं, उमेदीनं प्रयोग करत राहतो.

फक्त प्रयोगशाळेत प्रयोग करायचे, प्रश्न विचारायचे, हायपोथिसिस - समजुती - पूर्वानुमान यांची तपासणी करायची आणि प्रयोगशाळेतून बाहेर आलं की झापडं लावून प्रश्न न विचारता वावरायचं असं होत नाही. कोणताही प्रयोग करताना, मग तो ‌विज्ञानामधला असो, व्यायामामधला असो, खाण्याच्या सवयीबद्दल असो किंवा हा असा पसारा कमी करण्याच्या लाइफस्टाइल बदलांमधला असो. मला माझ्या या युनिव्हर्सिटीमधल्या पहिल्याच वर्षात एका सीनीयर प्रोफेसरनं रीसर्च माईंडसेट, पेशन्स आणि रिअ‍ॅलीटीबद्दल जे सांगितलं ते कायम आठवत. प्रयोग करताना जितकी स्वप्नं बघणं आवश्यक आहे, तितकंच वास्तवाचं भान असणंदेखील आवश्यक आहे याची ती जाणीव होती. पहिल्याच दिवशी वर्गात त्यांनी आम्हाला सांगितलं, 'कोणतीही नवीन संकल्पना मनात तयार होत असते तेव्हा ती १०० % असते. त्यावर अधिक विचार केला, लिटरेचर शोधलं, आधी कोणी काय काम केलंय ते पाहिलं, त्यासंबंधी अधिक वाचलं की त्यातले थोडे टक्के कमी होतात. त्यावर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करायला लागता, डेटा गोळा व्हायला लागतो, प्रॅक्टिकल समस्या यायला लागतात - त्या सोडवण्यावर कष्ट घ्यावे लागतात - अजून थोडे टक्के कमी होतात. मग सगळं काम करुन, जेव्हा तुम्ही ती पब्लिश करता, इतर लोकं त्यांच्या कामात ती गोष्ट वापरायला लागतात तेव्हा त्यातले अजून काही टक्के कमी झालेले असतात. म्हणजे १००% नावीन्यपूर्ण वाटणारी गोष्ट - विचाराअंती - आचाराअंती पूर्णपणे हाताशी येत नाही, अंशत: हाताशी येते. म्हणून नैराश्य वाटून काम थांबवायाचं नाही. पहिले १००% हा स्वप्नाचा भाग आहे आणि तो आहे म्हणून सुरुवात आहे. पण शेवटी हाताशी जे येणार ते वास्तव आहे.'

त्यामुळे कोणतीही गोष्ट करायला सुरुवात केल्यावर त्यातलं काय काय गळू शकतं, आणि किती मागे उरू शकतं याचा अंदाज घेतल्याशिवाय, प्रयोग करून पाहिल्याशिवाय त्याबद्दल लिहू नये. हे सगळं आज इथे आठवायचं कारण म्हणजे माझ्या डिक्लटर प्रवासालाही हे लागू होतं.

मनातला पसारा कमी करायचा हे संकल्पना माझ्या डोक्यात गेल्या अनेक वर्षांपासून घोळतीये. काही वर्षांपासून त्यावर काम करायची वेळ आली आहे हे जाणवायला लागलं. त्यादृष्टीनं विपश्यनेपासून ते भटकंतीपर्यंत बरेच मार्ग चाचपडून पाहणंही चालू होतंच. पण एका पॉईंटला जाणवलं डायरेक्ट मन आवरणं वाटत तितकं सोपं नाही - तितकं सोपं असतं तर काय हवं होतं. त्यासाठी बाह्य गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. आणि मग २०१७पासून प्रत्यक्ष डिक्लटरींगला मी सुरुवात केली. वास्तविक माझ्या काही ओळखीच्यांनी मला लगेच लिहायचा सल्ला दिला. काहींनी लगेच फोटो टाक, सीरीज चालू कर, लोक कदाचित प्रेरणा घेतील असंही सांगितलं, ग्रुप करू, एकत्र करू, त्याबद्दल लिहू, बोलू असंही सांगितलं. काहींनी लिहिलं - त्यांचे लेख, ब्लॉग छापूनही आले.

पण माझ्याकडून ढिम्म काही लिहिलं जाईना. कारण मला माझ्या प्रोफेसरचं बोलणं आठवतं सतत.

मनात १००% आहे, पण करायला लागल्यावर जी गोष्ट मुळात मला जमणार आहे का नाही हे मला माहीत नाही आणि जमली तरी लाँग टर्म किंवा ती लाईफस्टाईल होईपर्यंत जमणार आहे की नाही याचा अंदाज आल्याशिवाय कसं लिहायचं, हा माझा मलाच पडलेला प्रश्न होता. मात्र आज पाच वर्षांनी या निवडलेल्या रस्त्यावर मी थोडं तरी अंतर पुढे आले आहे असं मला वाटतंय. अनुभवातून थोडा डेटा जमा झालाय. त्यामुळे आता या विषयावर मी लिहायला, बोलायला हरकत नाही असं वाटतंय.

आता इतपत अंतर पार झालंय की मागे परतण्याचे मार्ग बहुधा बंद झालेत. साधी- सुटसुटीत लाईफस्टाईल हाच आता मार्ग. पुढचा रस्ता खूप दूरवर जाणारा आहे. या रस्त्यावर अजून बरंच चालत जायचंय.

पण हा एक प्रवास आहे आणि कुठे मुक्कामाला पोचण्यापेक्षा या प्रवासातच खूप गंमत आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. प्रेरणा घेऊन कालपासून दोन मोठ्ठया पिशव्या सामान घराबाहेर काढलं. अजून प्रेरणा घेण्यासाठी आज पुन्हा वाचला. हा एक प्रवास आहे हे खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरय तुमचे ...,

खूप जास्त वस्तू जमल्या, की घरात वावरणे मुश्कील होते.

मी देखिल वेळोवेळी घरातला पसारा कमी करण्याचा प्रयत्न करते.. पण परत परत वस्तू जमा होतात.

काही वस्तू, कपडे, चादरी वगैरे सुस्थितीत असतात, फारशा वापरलेल्या नसतात (काही तर लेबल देखिल न काढलेल्या स्थितीत असतात). अशा वस्तू आम्ही इथे कार्यरत असणाऱ्या साल्व्हेशन आर्मी कडे नेऊन देतो. ते लोक त्या वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात.

जेव्हा घर बदलण्याचा प्रसंग येतो, तेव्हा अनेक वस्तु उगाचच घरात आहेत याचा साक्षात्कार होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

छान! मी सुद्धा 2017 पासून कटाक्षाने वस्तू कमी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाच वर्षांनंतर मलाही आपण असे जगू शकतो ह्याचा आत्मविश्वास आला आहे.
ह्याच स्थळावर मी लिहलेला एक जुना लेख
https://aisiakshare.com/node/6067

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-गौरी

सुंदर लेख, सहजीवनात कोणती वस्तू अनावश्यक हे ठरवणे हाच तर कळीचा मुद्दा आहे. कुठली वस्तू कधी उपयोगाला येइल हे सांगता येत नाही या विचाराने पसारा कमी होत नाही. मला चार कपडे पुरतात पण बायकोला शेकडो ड्रेसेस भरलेली कपाटे लागतात. प्रत्येकाला वाटते की माझी गरज ही योग्यच आहे.
संचयाबाबत असे असते की पुढचे आयुष्य पुर्वसंचितावर जगायचे असते त्यामुळे किती पैसे पुरेसे हा अनुत्तरीत प्रश्न निर्माण होतो.
मनातला कचरा हा तर अत्यंत अवघड विषय आहे. तो साफच होत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी ह्यासाठी रोष ओढवून घेणार आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.
तरीही
स्त्रिया वस्तूंचा फार साठा करतात, आणि निर्जीव वस्तूंवर प्रचंड लोभ ठेवतात.
हे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसा चांगलाय, पण थोडा लांबच. tldr; ( भमोवाना: भला मोठ्ठा वाचला/वाचवला नाही) टाईप काहीतरी छोटं लिहिल्यास बरं. असो.. आं जा वर सहज धुंडाळलं / डोकावलं तर होर्डिंगची तीन कारणं सापडली - भावनिक गुंतवणूक, वस्तू सौंदर्य (अस्थेटिक-स ), आणि उपयुक्तता. अजून एक - उपलब्धता, खूळ-खुळणारा पैसा? पूर्वी परिवार मोठा, घरं छोटी होती - आता, परिवार छोटा आणि घरं मोठ्ठी - तस्मात, माणसांची जागा सामानाने घेतली एवढंच. माणसं अडगळीत टाकण्यापेक्षा वस्तू टाकणं सोपं नाहीं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0