मला नट का व्हायचं आहे? - माधुरी पुरंदरे

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मला नट का व्हायचं आहे?

- माधुरी पुरंदरे

हा प्रश्न थोडा दुरुस्त करावा लागेल, कारण माझ्या मते होण्याबिण्याचा प्रश्नच नाही, मला आठवतंय तेव्हापासून मी नट आहेच.

मी नट आहे, कारण मला खोटं असणं आवडतं. म्हणजे आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळं असायला आवडतं. थोड्या वेळापुरतं खऱ्या जगातून कल्पनेतल्या खोट्या, जादुई जगात जाणं आणि पुन्हा खऱ्या जगात परतणं हा खेळ मला फारच थरारक वाटतो. खोटं कशाला बोलू; खरं जग मला बऱ्याचदा कंटाळवाणं वाटतं, कारण ते खरं असतं. म्हणजे खऱ्या जगातली खरी खुर्ची ही कायमची खुर्चीच असते. खरं झाड हे नेहमी झाडच असतं. आपले आईबाबा हे आपले आईबाबाच असतात आणि आमच्या नाटकाच्या ग्रुपमधल्या, मला अजिबात न आवडणाऱ्या, मंदिरा आणि सानियासुद्धा मंदिरा आणि सानियाच असतात. खऱ्या जगात ह्यांपैकी कशाचंही आणि कुणाचंही दुसरं काहीही होऊ शकत नाही.

उलट, नाटक करण्यासाठी आपण जी जागा निवडतो, तिथं कुणाचंही आणि कशाचंही काहीही होऊ शकतं. ऑनलाईन मागवलेल्या सामानाच्या रिकाम्या खोक्याचं सिंहासन होऊ शकतं. मंदिरा दर दोन दिवसांनी तालमीला दांडी मारते. अशा वेळी चहा घेऊन येणाऱ्या आणि तालीम पाहत रेंगाळणाऱ्या बारकुड्या लकीलाच आम्ही तिच्या जागी उभं करतो. मग तो तिच्यापेक्षा आपोआप सुंदर दिसायला लागतो. असं काही होणं खऱ्या जगात शक्यच नसतं. म्हणूनच त्या नाटकी जागेत पाऊल ठेवल्याबरोबर मी जमीन सोडून चार बोटं वर हवेत तरंगायला लागतो.

खऱ्या जगातून खोट्या जगात जा-ये करण्याचा खेळ मी अगदी लहान असल्यापासून खेळत आलो आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर 'आज मी मुंगी आहे' किंवा 'आज मी सर्दी झालेला उंट आहे' किंवा 'दुधावरची साय आहे' किंवा 'नाडी हरवलेली चड्डी आहे' असं जाहीर करून घरच्यांना वात आणणाऱ्या 'बिम्म टाइप' चमकदार बाळलीला असतात ना, त्या इतर लहान मुलांप्रमाणे माझ्याही करून झाल्या. त्यांचं झालं तेवढं कौतुक माझंही झालं. नंतर मात्र, बालवर्गातून पहिलीत गेल्यावर बहुतेक मुलांचा वेळ अक्षरं गिरवण्यात आणि आकडे मोजण्यातच जायला लागला. त्यामुळे त्यांच्या बाळलीलांची चमक फिकी होत होत लवकरच पुरती विझून गेली. सकाळी उठल्यावर 'आज मी कोण आहे?' हा प्रश्नच त्यांना पडेनासा झाला.

माझं मात्र तसं झालं नाही. अक्षरं मीही गिरवली, आकडेही मोजले; पण, त्यामुळे मला सकाळी उठल्यावर प्रश्न पडणं थांबलं नाही. त्याला कारण होता माझा सख्खा काका. नाटक हा शब्दसुद्धा मला माहीत नव्हता तेव्हापासून त्यानं नाटकाच्या खोट्या आणि जादुई जगाचं वेड माझ्या मनात पेरलं आणि खतपाणी घालून ते जिवंत ठेवलं. मुख्य म्हणजे हे माझ्या आणि त्याच्या स्वत:च्याही नकळत होत गेलं. रोज आसपास घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधलं नाटक शोधायला आणि पाहायला मी काकाकडून शिकलो. 'आज मी नट आहे' असं जाहीर करावं न लागताच मला ते व्यवस्थित कळत गेलं.

हा माझा काका तेव्हा भारतीय सैन्यात अधिकारी होता. माझ्या घरची आणि शेजारपाजारची जी अघळपघळ मोठी माणसं होती, त्यांच्यापेक्षा तो वेगळा होता. त्याचं वागणं, कुणाशीही खालच्या सुरात अदबीनं बोलणं, त्याचे कडक इस्त्रीचे कपडे, चालण्यातला रूबाब, त्याच्या अंगाला वेढून राहिलेला अनोळखी पण हवाहवासा वाटणारा सुगंध हे सगळंच वेगळं होतं. जमिनीवर फतकल मारून बसलेला किंवा मोठा आवाज करत जांभई देणारा किंवा खाऊच्या डब्यात थेट हात घालून खाणारा काका आम्ही कधीच पाहिला नाही. आमच्यासारख्या बावळट घरात त्याचं वावरणं परीकथेतल्या एखाद्या पात्रासारखं वाटायचं. बाबांपेक्षा तो धाकटा आहे, पण आसपास तो असला की बाबा अजूनही गोंधळलेलेच असतात.

काकानं लग्न केलं नाही. नोकरी धोक्याची असल्यामुळे असेल. आजही तो एकटाच आहे. स्वत:चं मूलबाळ नसल्यामुळे माझ्या ताईवर आणि माझ्यावर त्याचा फार जीव आहे. तो आमचा काका कमी आणि मित्र जास्त – तेव्हाही होता आणि आजही आहे. नाही; असं म्हणणंही बरोबर होणार नाही. तो आमचा काकाही होता आणि मित्रही होता. पुरावा म्हणून एक आठवण सांगतो : मी दुसरी-तिसरीच्या वयाचा असेन, तेव्हा एकदा त्याला विचारलं, "काका, तुला मुलं का नाहीयेत?"

ताई मला टप्पल मारत म्हणाली, "मॅड आहेस का रे तू? काकाचं लग्नच झालेलं नाहीये तर मुलं कशी असतील त्याला?"

माझा ओशाळलेला चेहरा पाहून काका शांतपणे म्हणाला, "हे बघा, मी लग्न केलेलं नाहीये हे खरंय. मला मुलं नाहीयेत हेही खरंय, पण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कारण मुलं होण्यासाठी लग्न करावंच लागतं असं काही नसतं."

मी ताईकडे पाहिलं, काही क्षण ती विचारात पडली. मग तीही शांतपणे म्हणाली, "खरंच की!"

असं आहे काकाचं आणि आमचं. आमच्याबरोबर खेळताना, गप्पा मारताना काका आपला लष्करी रुबाब, शिस्त, अदब वगैरे सगळं खुंटीला टांगून ठेवतो आणि वेगळाच होतो. नेहमी असतो त्यापेक्षा अगदी वेगळा. एक्झॅक्टली हेच मला फार भारी वाटतं – आहे त्यापेक्षा वेगळं होता येणं.

***

तेव्हा, म्हणजे नोकरीत असताना, सुट्टी मिळाली की काका घरी यायचा; पण अगोदर न कळवता. त्याचं असं अचानक येणं ही घटना म्हणजे नाटकातला लहानसा प्रवेशच असायचा. तोही प्रत्येक वेळी वेगळा.

उन्हाळ्याची सुट्टी. दुपारची शांत वेळ. जेवणं उरकून आणि दारंखिडक्या ओढून घेऊन सारी घरं सुस्तावलेली असायची. रस्तेसुद्धा झाडांच्या थंड सावल्या पांघरून पेंगत असायचे. अशा वेळी काका यायचा. घराच्या दरवाजावरची घंटी वाजवण्याऐवजी अंगणात उभा राहून बिगुल फुंकायचा; अगदी बेंबीच्या देठापासून. असा काही भेसूर आवाज काढायचा त्यातून, की सगळी गल्ली खडबडून जागी व्हायची.

एकदा तर काकानं कसा कोण जाणे, पण लग्नाच्या वरातीसाठी आणतात तसा एक घोडा त्याच्या मालकासकट मिळवला आणि त्या घोड्यावर बसून तो घरी आला. एक तर घोडा म्हातारा; त्यात डोक्यापासून शेपटापर्यंत नाही नाही त्या रंगीबेरंगी वस्तू वापरून सजवल्यामुळे बावळट दिसणारा. त्याच्या पाठीवर कडक लष्करी युनिफॉर्म घातलेला काका आणि मागं त्याची सूटकेस डोक्यावर घेऊन बसलेला घोड्याचा मालक. अविस्मरणीय दृश्य होतं ते.


Natki Kaka on Horse

***

तर, अशा ह्या काकानं मला नाटक पाहायला शिकवलं.

तो अनेकदा गोष्टी सांगायचा, पुस्तकातल्या राजाराणीच्या किंवा परी, राक्षस वगैरेंच्या नाही. सहज गप्पा मारता मारता एखाद्या लहानशा, अगदी साध्या घटनेवरून हातभर लांब गोष्ट तो रचायचा. तीच गोष्ट पुन्हा सांग असं कधी म्हटलं तर ते त्याला जमायचं नाही. तेव्हा घटना तीच, पण काही तरी वेगळीच कथा रचून सांगायचा.

काका प्रवास खूप करायचा. सैन्यात होता तो. त्याच्या सतत, आणि आम्ही कधी ज्यांची नावंही ऐकली नव्हती अशा ठिकाणी, बदल्या व्हायच्या. भारत उभाआडवा अनुभवला होता त्यानं. बारीकसारीक गोष्टी त्याला दिसायच्या, घटना आणि प्रसंग लक्षात राहायचे, नकला करणं जमायचं. आमच्यासाठी भारताचा भलामोठा नकाशा त्यानं आणला होता. ताईच्या शाळेतही नव्हता एवढा मोठा. त्यावरची ठिकाणं दाखवत तो हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि नागालॅण्ड, मेघालयापासून राजस्थानापर्यंत सगळीकडे आम्हाला हिंडवून आणायचा. अन्‌ हे सगळं गोष्टी सांगत चालायचं. आमच्या अख्ख्या घराचा अशा वेळी रंगमंच व्हायचा. सगळ्या खोल्यांमध्ये, अगदी बाथरूममध्येही गोष्टीतले प्रसंग घडायचे. पात्रं कोणतीही आणि कितीही असोत, नट एकटा काकाच. शिवाय तोच ध्वनिसंयोजक, तोच प्रकाशयोजनाकार आणि तोच नेपथ्यकार. गाद्यांचे पर्वत, पांघरुणांच्या नद्या, दोन पलंगांमधल्या जागेत दऱ्या किंवा खंदक किंवा भुयार… काकाला काहीही चालायचं, किंवा काही नसलं तरी चालायचं. ह्या खेळाच्या बळावर मी पुढे भूगोलाच्या परीक्षांना निधड्या छातीनं सामोरा जाऊ शकलो हे काकाचं आणखी एक ऋण.

काकासाठी एकच गोष्ट अत्यावश्यक होती, ती म्हणजे प्रेक्षक. पीटर ब्रूक नावाच्या जगप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शकानं म्हटलं आहे : 'नाटकाला काय लागतं? एक मोकळी जागा, त्या जागेतून चालत जाणारा एक जण आणि ते पाहणारा एक जण, बस्‌. नाटक सुरू होतं.' हे आमच्या काकानं वाचलेलं किंवा ऐकलेलं असणं शक्य नाही; पण त्याचं त्याला ते आपोआपच कळलेलं होतं. अनेकदा काही कारणानं आई-बाबा आणि ताई घरात नसले की मी त्याचा एकुलता प्रेक्षक असायचो, आणि तरीही नाटक – म्हणजे तो सांगत असलेली गोष्ट – तुफान रंगायची. प्रेक्षक आपली जागा सोडून नटाच्या मागे मागे फिरत नाटक पाहतो आहे, अधूनमधून नकळत त्यात सामीलही होतो आहे असा अद्भुत अनुभव मी लहान वयातच अनेकदा घेतला.

ह्या गोष्टींमधला नायक – म्हणजे स्वत: काकाच – धाडसी, शूर वगैरे कधीच नव्हता. सिनेमातल्या चार्लीसारखा धांदरट, बावळट, भाबडा, वेंधळा, स्वत:हून खड्ड्यात पडणारा आणि संकटं ओढवून घेणारा होता. कुणीही त्याची फजिती करत असे. अगदी जंगलातले प्राणीही त्याची टिंगल करत. आम्ही सगळे, म्हणजे आईबाबांसकट आम्ही असे चार प्रेक्षक, आणि अगदी घराच्या भिंती अन् दरवाजेसुद्धा, ते पाहून खदखदून हसत असू. पण कधी कधी नं, मला ते आवडायचं नाही. एकदा मी आईला म्हटलंसुद्धा : "हा असा कसा गं आपला काका! कुणीही त्याची टोपी उडवतं. हॅट्‌! ह्याला सैन्यात घेतलं तरी कुणी? लढाई झाली तर काही उपयोग होणार नाही ह्याचा."

माझी तक्रार ऐकून आई हसायलाच लागली. म्हणाली, "अरे, तो गोष्ट सांगतो. कुठल्याही गोष्टीत ओंजळभर खोटं आणि चिमूटभरच खरं असतं. म्हणून तर आपण इतके हरवून जातो त्या गोष्टीत. माणसाला किनई, निव्वळ खरं फार वेळ झेपत नाही. मला सांग, टीव्हीवर फक्त खऱ्याच बातम्या सांगितल्या तर काय होईल? कुणीसुद्धा त्या बघणार नाही. भटकंतीच्या गोष्टी करून न सांगता नुसत्या बातम्या करून सांग, असं काकाला सांगायचं का?"

"नको!!" मी घाबरून ओरडलो.

***

वर्षं वेगानं पुढं सरकत होती. माझी हुशार ताई कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होती आणि मी दहावीतून अकरावीत सुखरूप पोचलो होतो. ताईचं डोकं अभ्यासातून वर निघत नव्हतं. मला आंतरशालेय नाट्यस्पर्धा गाजवणे, बक्षिसं मिळवणे, संमेलनात चमकणे अशा उद्योगांमधून फुरसत मिळत नव्हती. आमच्याही गोष्टी तयार होत होत्या : काही घरी सांगण्यासारख्या, बऱ्याच लपवण्यासारख्या. अर्थातच, आमचा पाय घरात ठरेनासा झाला होता. 'ह्या मुलांचं ना, काही कळेनासंच झालंय हल्ली', अशी आई-बाबांची दबक्या आवाजातली कुरकुर वरचेवर कानावर पडत होती. आम्ही ती सहजपणे कानाआड करत होतो.

पूर्वीप्रमाणे काका अधूनमधून घरी येत होता, मात्र आता रीतसर दारावरची घंटी वाजवून येत होता. पूर्वीप्रमाणे गोष्टीही सांगत होता; पण घरभर धावतपळत नाही, रात्री टेबलाशी बसून निवांतपणे जेवता जेवता. आमच्याप्रमाणे त्या गोष्टींचंही वय वाढलेलं होतं, त्यामुळं अजूनही मजा येत होती ऐकताना. काका आला की आई-बाबा खुशीत असायचे, कारण सतत घराबाहेर सटकण्याचं निमित्त शोधणारे आम्ही त्याच्यासाठी स्वत:हून घरात रेंगाळत होतो. पण असे प्रसंग हळूहळू कमीकमी व्हायला लागले होते खरे.

बारावीची परीक्षा संपली. सुट्टी लागल्यानंतरचे पहिले काही दिवस मनसोक्त ऊतमात करून झाल्यावर आईनं जरा दरडावूनच खोली आवरण्याचा हुकूम सोडला. पलंगाखालचं गबाळ आवरताना घट्ट गुंडाळी करून मागे भिंतीपाशी ढकलून ठेवलेला भारताचा नकाशा दिसला. धुळीचे कित्येक थर त्यावर चढले होते. मी ती गुंडाळी अंगणात नेली, धूळ झटकून ती नीट पुसली. मग घरात आणून ती उलगडून जमिनीवर पसरली.

आई बाहेर गेली होती, ती परतल्याची चाहूल ऐकून मी म्हणालो, "आई, बघ काय सापडलं! काकानं आणलेला नकाशा!"

"हं," आई म्हणाली.

"काका आला नाही बऱ्याच दिवसांत," मी म्हणालो.

"हं."

मी वळून तिच्याकडे पाहिलं. "नुसतं 'हं' काय! का नाही आला काका?" मी जरा तिरसटूनच म्हणालो.

"येईल."

"आहे कुठं सध्या?"

"मुंबईला."

"मुंबईला? का?" मी आश्चर्यानं विचारलं.

"काका रिटायर झाला, गेल्या वर्षी," आई थंडपणे म्हणाली.

"रिटायर? मला का सांगितलं नाहीस?"

"सांगितलं. तेव्हा तू म्हणालास 'हं'," खवचट सुरात आई म्हणाली अन् आत निघून गेली.

पडलेल्या चेहऱ्यानं मी नकाशाकडे नुसताच बघत बसलो.

रात्री ताईला मी नकाशाबद्दल सांगितलं. काका रिटायर झाल्याचं तिला माहीत होतं. "खूप वर्षांपासून त्याला जतनशास्त्र शिकायचं होतं, ते तो शिकतोय," ती म्हणाली.

"ते काय असतं?"

"जुन्या, मूल्यवान, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू खराब होण्यापासून वाचवण्याचं, म्हणजेच त्यांचं जतन करण्याचं शास्त्र."

मी एक बारीकसा उसासा टाकला. हे सगळं ठीक होतं; पण मला उगीचच कसलीतरी रुखरुख लागून राहिली. काहीतरी जीव लावून जपलेलं हरवलं की वाटतं तसं बेचैन वाटायला लागलं.

***

दोनतीन आठवडे उलटले असतील. रोज पहाटे सगळे झोपेत असताना उठून टेकडीवर जायचं; परतताना एका चहाच्या टपरीवर रोज जमणाऱ्या आजी-आजोबांच्या टोळीशी थोड्या गप्पा मारायच्या आणि घरी यायचं, असा माझा सुट्टीतला सकाळचा कार्यक्रम होता. त्या दिवशी गप्पा जरा लांबल्या. उशीर झाला म्हणून आई ओरडणार ह्या भीतीनं दबकतच घरात शिरलो, तर सोफ्यावर बसून पेपर वाचत असलेला काका दिसला. जुन्या सवयीप्रमाणे अपरात्री आला असणार. मी समोरच्या खुर्चीवर बसलो. पायांतले बूट काढता काढता पहिल्यांदाच बघत असल्याप्रमाणे काकाकडे बघायला लागलो. रिटायर झालेला काका म्हातारा दिसायला लागलाय असं मला एकदम जाणवलं. डोक्यावर अधूनमधून पांढरे केस चमकत होते. वजन वाढलं होतं, सैल झालेलं पोट पेपराखालूनही चांगलंच पुढं आलं होतं.

"काका!" न राहवून मी जरा मोठ्यानं हाक मारली.

काकानं पेपर डोळ्यापुढून बाजूला केला आणि चश्मा नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली ओढत तो म्हणाला, "अरे, आलास वाटतं! मला कळलंच नाही."

काकाला चश्मा लागला, म्हणजे आता कन्फर्म म्हातारा.

"टेकडीवर जाऊन आलोय; रोज जातो," मी म्हणालो.

"हो, सांगितलं मला वहिनीनं. गुड. चांगली सवय आहे."

मी म्हटलं, "तू नाही जात? म्हणजे, व्यायाम… नाही करत?"

काकानं नजर खाली वळवून स्वत:च्या देहाकडे पाहिलं. मग म्हणाला, "कळतंय ना रे, पाहिल्याबरोबर?"

"कळतंय म्हणजे? खुपतंय डोळ्यांना! काय हे, काका, कसं दिसतंय!"

"काय कसं दिसतंय?"

"पोट तुझं, दुसरं काय? आरशात बघत नाहीस का स्वत:ला?"

काका काही क्षण बोलला नाही. मग म्हणाला, "सैन्यात होतो तेव्हा आळस हा शब्द मनातल्यामनात उच्चारण्याचीही सोय नव्हती. निवृत्त झालो आणि आळस करण्यातलं सुख कळलं. मग त्याची चटकच लागली. रोज सकाळी आरशात पाहिल्यावर 'उद्या नक्की' असं ठरवायचो. तो 'उद्या' काही उजाडेना अन् पोट वाढायचं थांबेना."

ऐकता ऐकता माझे कान ताठ झाले. डोक्यापासून पायांपर्यंत एक लाट सरकत गेली.

"एका भल्या पहाटे न ठरवता, उगीचच मला जाग आली. ताबडतोब उठलो, वेगानं तयार झालो. खुशीत दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकलं. तेवढ्यात कुठूनशी एक माशी आली. गूंऽऽ गूंऽऽ करत तिनं माझ्याभोवती दोन चकरा मारल्या, माझ्या नाकासमोर काही क्षण फडफड केली; मग ती सटकन शिंकली आणि मला कळण्याआत नाहीशी झाली."

"मग?" मी उत्सुकतेनं विचारलं.

"मग? मग काही नाही. अपशकुन झाला म्हणून मी परत फिरलो, कपडे बदलले, अंथरुणात शिरलो. क्षणात मला गाढ झोप लागली."

"मग?"

"जेव्हा जेव्हा मी पहाटे उठून बाहेर पडायचो तेव्हा तेव्हा ती माशी यायची…" काका म्हणाला.

"तीच माशी?"

"होय, तीच माशी, ती यायची, माझ्या नाकासमोर नाचत नाचत सटकन शिंकायची आणि अदृश्य व्हायची. मी आपला पुन्हा अंथरुणात. एकदा मात्र भलतंच घडलं. भल्या पहाटे जाग आली. थंडीचे दिवस होते, तरीही मी तयार झालो, निर्धार करून दरवाजा उघडला. बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी ती माशी कुठे नाही ना याची खात्री करून घेतली. पाऊल बाहेर टाकलं, तितक्यात गार वाऱ्याचा झोत अंगावर आला आणि… आणि मीच जोरात शिंकलो. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, सटासट सात वेळा शिंकलो."

"अरे बाप रे! मग?"

"त्या दिवशी मी ठरवलं : हे नाटक आता बंद. प्रसन्न सकाळ, टेकडीवरची ताजी हवा, उगवता सूर्य हे काहीच आपल्याला झेपणारं नाही. यापुढं दिवसानं केव्हाही उजाडावं, सूर्यानं हवं तेव्हा उगवावं किंवा उगवूही नये; आपण त्या शिंकणाऱ्या माशीच्या नाकावर टिच्चून मस्त झोप काढावी. आरशात पाहणं टाळावं म्हणजे झालं."

एवढं बोलून काकानं नाकावरचा चश्मा वर सरकवला आणि पेपर उघडून शांतपणे तो वाचायला लागला.

मला मात्र खऱ्या जगात परत यायला थोडा वेळ लागला. पण काही दिवसांपासून डोक्यात गुणगुणत असलेला बेचैनीचा भुंगा आता शांत झाला होता. नाटक अभी भी बाकी आहे ह्या जाणिवेनं मला पिसासारखं हलकं हलकं वाटत होतं.

***

चित्र : माधुरी पुरंदरे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं आहे.
Sometimes as an adult, we tend to lose the meaning of magic in the harsh reality.
ह्याउलट मोठेपणीसुद्धा भवतालची जादू दिसली तर आपण मोठ्यांच्या जगातून 'कटाप' होतो.

आवडलंय!!!