(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-२)

(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-२)

मंडळाच्या मदतीसाठी चित्रपटाचा ‘शो’

गणपती

स्थापनेनंतर दोन-तीन वर्षांत आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास स्थैर्य आले. मुख्य म्हणजे मूर्ती, सजावट, आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक यांसारख्या खर्चाच्या प्रमुख बाबींना आम्हाला ‘स्पॉन्सर’ मिळू लागले. आमच्याच गल्लीत राहणारे श्री. नटराजन हे एअर इंडियात मोठ्या हुद्द्यावर होते. ते आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. ते आमच्या कामावर खूश झाले. मूर्तीचा खर्च करण्याची तयारी नटराजन यांनी स्वत:हून दर्शविली. नकार देण्यास काहीच कारण नसल्याने आम्ही त्यांची ‘ऑफर’ स्वीकारली व वयाचा मान ठेवून त्यांना मंडळाचे अध्यक्ष केले. णाजा एक वर्गमित्र विश्वनाथ परदेशी निष्णात मूर्तिकार आहे व गेली ३०-३५ वर्षे तो कल्याणमध्ये गणपतीचा कारखाना चालवितो. आम्ही आमच्या मंडळाच्या गणपतीची मूर्ती याच विश्वनाथकडून घेत असू. सजावटीच्या ‘थीम’नुसार आम्ही विश्वनाथला मूर्तीच्या स्वरूपाची कल्पना द्यायचो व तो आम्हाला हवी तशी सुंदर मूर्ती माफक किंमतीत तयार करून द्यायचा. या नटराजन यांनी अनेक वर्षे मूर्तीचा संपूर्ण खर्च स्वत: दिला.
आमच्याच मंडळाचा एक सदस्य भूपत चौहान कुशल सुतार होता. त्याच्या कुटुंबाचा दुकानांचे इंटिरियर व घरातील फर्निचर बनविण्याचा व्यवसाय होता. आम्ही चर्चा करून सजावटीची कल्पना ठरवायचो व त्यासाठी लागणारे सर्व सूतारकाम भूपत विनामूल्य करून देत असे. शिवाय सुचारकामासाठी लागणाऱ्या विविध सामानांच्या व्यापाऱ्याशी भूपतच्या कुटुंबाचे नेहमीचे व्यवहार होत असल्याने आम्हालाही लागणारे सामान उधारीवर मिळू शकत असे. नंतर वर्गणी जमली की आम्ही ती उधारी फेडत असू.

एके वर्षी आमच्याच मंडळाचा एक सदस्य नंदू शिदे याने सजावटीचा खर्च ‘स्पॉन्सर’ करण्याचे बैठकीत स्वत:हून जाहीर केले. त्या वर्षी सजावटीसाठी चार ते पाच हजार रुपयांचे सामान लागेल, असा प्राथमिक अंदाज होता. नेहमीप्रमाणे भूपतने उधारीवर सामान आणले व कामाला सुरुवात केली. गणपतीला २०-२५ दिवस शिल्लक असताना सजावटीचा लाकडी सांगाडा तयारही झाला. तरी नंदू शिंदे याने ठरल्याप्रमाणे सजावटीच्या खर्चाचे पैसे दिले नाहीत. आम्ही बराच तगादा लावला. परंतु केव्हाही घरी गेले तरी नंदू भेटेनासा झाला. सर्व महत्त्वाचे आणि मोठे खर्च ‘स्पॉन्सर’कडून परस्पर भागत असल्याने आम्ही घरोघरी फिरून वर्गणीही फारशी गोळ करीत नसू. गणपती जवळ येऊन ठेपल्यावर नंदूने अशा प्रकारे ठेंगा दाखविल्यावर सजावटीच्या खर्चाचा मोठा खड्डा कसा भरून काढायचा असा मंडळापुढे प्रश्न पडला. रोज रात्री बैठकीमध्ये तोच चर्चेचा विषय असे.

आमच्याच गल्लीतील मंगेश लॉजमध्ये वालावलकर नावाचा एक तरूण राहात असे. आम्ही त्याला ‘वाल्या’ म्हणत असू. हा वाल्या जवळच असलेल्या ‘ऑल्विन’ या सिनेमा टॉकिजचा मॅनेजर होता. रात्री लॉजवर जाण्याआधी तोही आमच्याशी गप्पा मारत बसत असे. नंदूने कबूल केल्याप्रमाणे सजावटीच्या खर्चाची रक्कम न दिल्यावरून अशीच चर्चा सुरु असताना ‘वाल्या’ आला. मंडळाच्या मदतीसाठी एकाध्या चित्रपटाचा विशेष ‘शो’ ठेवला तर कमी पडणारी ही रक्कम उभी करता येऊ शकेल, अशी सूचना वाल्याने केली. यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारीही त्याने दर्शविली.

वाल्याच्याच सल्ल्याने आम्ही ‘धूल का फूल’ या चित्रपटाचा विशेष ‘शो’ ऑल्विन टॉकिजमध्ये एक दिवस ‘मॅटेनी शो’ म्हणून आयोजित करण्याचे ठरविले. त्यासाठी वाल्याने टॉकिजवर नियमित शोसोबतच या ‘मॅटेनी शो’ची तिकिटे खिडकीवरून विकण्यची सोय केली. आम्हीही नातेवाईक आणि परिचितांना विनंती करून बरीच तिकिटे विकली. शोच्या आठ-दहा दिवस आधी वाल्याने आम्हाला त्या सिनेमाच्या विविध आकारातील रंगीत पोस्टर्सची भेंडोळी आणून दिली. आम्ही दोन रात्री लाकडी घोडे, शिड्या आणि खळीचे डबे घेऊन शहराच्या विविध भागांत भिंतींवर चिकटविली.

आमच्या मंडळातील मन्या (प्रकाश) प्रधान हे एक ‘अतरंगी कॅरेक्टर’. त्याने ‘धूल का फूल’ चित्रपटात कोणती गाणी आहेत. त्यापैकी ‘हिट गाणी’ कोणती व ती केव्हा आहेत हे वाल्याला विचारून घेतले. शिवाय शोच्या वेळी मंडळाच्याच मुलांनी थिएटरमध्ये ‘गेट कीपर’म्हणून काम करण्याची परवानगीही त्याने वाल्याकडून मिळविली. एवढी पूर्वतयारी झाल्यावर मन्याने आम्हाला शोला येताना खिशात बरीच चिल्लर घेऊन येण्यास सांगितले.

असे करण्याची मन्याने केलेली मल्लिनाथी भन्नाट होती : मंडळाच्या मुलांनी थिएटरमध्ये निरनिराळ्या ठिकाणी विखरून बसायचे. चित्रपटातील ‘हिट गाणे’ सुरु झाले की या कार्यकर्त्यांनी तोंडाने शिट्ट्या वाजवत खिशातील चिल्लर पडद्याच्या दिशेने उधळायची. चित्रपटाला येणारे प्रक्षेक केवळ शौकिनच नव्हे तर वेडे असतात. दुसरा कोणी आवडत्या गाण्यावर पैसे उधळतो आहे हे दिसल्यावर तेही विचार न करता स्वत: पैसे उधळतात.

मन्याची ही भन्नाट कल्पना आम्ही प्रत्यक्षात अमलात आणली व ती खूप यशस्वीही ठरली. आम्ही मंडळातील मुलांनी मिळून तो चित्रपट पाहताना विविध गाण्यांच्या वेळी आमच्या खिशातील एकूण ४०० रुपयांची चिल्लर उधळली होती. शो संपल्यावर सिनेमागृहातील सर्व लाईट लावून आम्ही खाली फ्लोअरवर पडलेली सर्व नाणी काळजीपूर्वक गोळा केली. ती रक्कम आम्ही उधळलेल्या नाण्यांच्या रकमेहून जवळजवळ दुप्पट होती! शोच्या तिकिटविक्रीतून सुमारे सहा-साडे सहा हजार रुपये मिळाले होते. अशा प्रकारे नंदू शिंदेने सजावटीच्या खर्चापोटी जेवढी रक्कम कबूल करून दिली नव्हती त्याच्या जवळजवळ दुप्पट रक्कम पर्यायी मार्गाने ऐनवेळी उभी करणे आम्हाला शक्य झाले.

भाग १

field_vote: 
0
No votes yet