अमेरिकेतली स्कूल शूटिंग्ज: जबाबदारी (कुणा)कुणाची?

पूर्वप्रसिद्धी ‘लोकमत’ १९ जानेवारी २०२२

अमेरिकेतली स्कूल शूटिंग्ज: जबाबदारी (कुणा)कुणाची?

३० नोव्हेंबर २०२१. मिशिगन राज्यातल्या ऑक्सफर्ड गावातल्या १५ वर्षाच्या इथन क्रम्बलीनं त्याच्या शाळेत केलेल्या गोळीबारात चार विद्यार्थी प्राणाला मुकले आणि सातजण जखमी झाले. वास्तविक ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. पण अमेरिकेत सर्रास होणारी मास शूटिंग्ज आणि नंतर मीडिया, राजकारणी, आणि सर्वसामान्य लोक यांच्या चार दिवस उमटून शांत होणाऱ्या ठराविक प्रतिक्रिया हे सगळंच एका खिन्न करून सोडणाऱ्या चाकोरीचा भाग झालंय. पण यावेळी मात्र एक गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी घडली. इथनबरोबर जेम्स आणि जेनिफर या त्याच्या आईवडिलांनाही या गुन्ह्याबद्दल अटक झाली. आत्तापर्यंत शाळांतल्या गोळीबाराच्या बहुसंख्य घटनांमध्ये बंदूक घरातूनच येत असली तरी पालकांना जबाबदार धरण्यात आल्याची उदाहरणं फारच दुर्मिळ आहेत. पण यावेळी मात्र सरकारी वकील कॅरन मॅक्डोनाल्ड यांनी इथनच्या आईवडिलांवर मनुष्यवधात अनैच्छिक सहभाग घेतल्याचा (involuntary manslaughter) आरोप ठेवला आहे. हा निर्णय त्यांनी का घेतला? तो योग्य की अयोग्य याबद्दल इथं कोणते मतप्रवाह बघायला मिळतायत?

या घटनेनंतरच्या तपासात असं दिसून आलंय की इथनला काही मानसिक समस्या होत्या. ‘आपल्या घरात भूत आहे’ असे टेक्स्ट मेसेजेस तो काही महिन्यांपासून आपल्या आईला करत असे. प्राण्यांचा छळ करतानाचे आणि त्यांना ठार मारतानाचे स्वतःचे व्हिडीओ त्यानं बनवले होते. त्यानं चक्क एका मृत पक्षाचं डोकं आपल्या खोलीत सहा महिने ठेवलं होतं आणि नंतर तो ते शाळेच्या बाथरूममध्ये ठेवून आला होता . त्याच्यावर नाझी विचारसरणीचाही प्रभाव होता. पण त्याच्या आईवडिलांचं त्याच्या संगोपनाकडं कधीच फारसं लक्ष दिलं नसायचं. त्याच्यासाठी त्यांनी कधी मानसशास्त्रीय मदत घेतली नाही. नोव्हेंबरमध्ये थॅंक्सगिव्हिंगच्या वेळी जेम्स क्रम्बलीनं इथनबरोबर जाऊन एक नवीन बंदूक विकत घेतली. इथननं त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलं. जेनिफरनंही ‘ही बंदूक हे माझ्या मुलाचं ख्रिसमस प्रेझेंट आहे’ असं सोशल मीडियावर मिरवलं. त्यांनी ही बंदूक किंवा घरातल्या अन्य बंदुका इथनपासून सुरक्षित ठेवायचेही कष्ट घेतले नाहीत. नंतर थोड्याच दिवसांनी इथन शाळेत सेलफोनवर बंदुकीच्या गोळ्यांबद्दल माहिती शोधताना त्याच्या शिक्षिकेला दिसला. शाळेनं त्याच्या आईवडिलांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. नंतर थोड्याच दिवसांनी सकाळी त्यानं आपल्या गणिताच्या वर्कशीटवर काढलेलं गोळीबाराचं रक्तरंजित चित्र आणि लिहिलेला “ हे विचार थांबत नाहीयेत. मला मदत करा” असा मजकूर अजून एका शिक्षिकेला दिसला. शाळेनं ताबडतोब त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतलं आणि ४८ तासांत इथनचं समुपदेशन सुरु करावं लागेल असं सांगितलं. पण तेव्हाही त्या दोघांनी आपण नुकतीच त्याला बंदूक घेऊन दिल्याचं सांगितलं नाही, आणि त्याला घरी घेऊन जायलाही नकार दिला. आणि त्याच दुपारी हा भयानक प्रकार घडला. गोळीबाराची पहिली बातमी ऐकल्याऐकल्या जेम्सनं ९११ ला फोन करून ‘गोळीबार करणारा इथन असू शकतो’ हे सांगितलं आणि जेनिफरनं टेक्स्ट मेसेज करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला. पण जे व्हायचं ते घडून गेलंच होतं!

जेम्स आणि जेनिफरवर गुन्हा दाखल केला असला तरी तो सिद्ध करणं तितकंसं सोपं नाही. मिशिगनमध्ये जरी १५ वर्षांच्या मुलाला बंदूक बाळगायची परवानगी नसली तरी बंदूक ज्यांची आहे त्यांनी ती मुलांपासून सुरक्षित ठेवावी असाही कोणता कायदा नाही. शिवाय त्या दोघांवर मनुष्यवधाचा आरोप असल्यानं त्यांना नुसतीच इथनच्या मानसिक समस्यांबद्दल माहिती होती हे दाखवून भागणार नाही, तर त्याच्यात धोकादायक हिंसक प्रवृत्ती आहेत याचीही कल्पना होती हे सिद्ध करावं लागेल.

आईवडिलांवर गुन्हा दाखल करायच्या निर्णयाचं ‘गन कंट्रोल’ चा पुरस्कार करणाऱ्या गटांकडून स्वागतच झालंय. अमेरिकेच्या घटनेनं नागरिकांना बंदुका बाळगायचा हक्क दिलाय, त्याबरोबर बंदुका सुरक्षितपणे वापरल्या जातायत याची जबाबदारीही दिलीय. त्यामुळं या उदाहरणावरून बाकीचे आईवडील आणि इतर बंदुका बाळगणारे लोक धडा घेतील आणि आपल्या बंदुका मुलांपासून तरी सुरक्षित ठेवतील. शाळांची सुरक्षा वाढवणं हा अशा गोळीबाराच्या घटनांची तीव्रता कमी करायचा उपाय आहे, पण पालकांना ‘ही आपली कायदेशीर जबाबदारी आहे’ याची जाणीव झाली तर या घटना मुळात घडणंच कमी होईल असं या समर्थकांचं म्हणणं आहे. पण या निर्णयाला विरोधही झालाय, आणि तोही फक्त बंदुका बाळगायच्या स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या ‘उजव्यां’कडूनच नव्हे तर काही समाज आणि कायद्याच्या अभ्यासकांकडूनही. मुलांच्या गुन्ह्याची शिक्षा सरसकट पालकांना द्यायला सुरुवात झाली तर त्याचा फटका समाजातल्या गरीब, अल्पसंख्यांक, गोऱ्या सोडून अन्य वर्णाच्या लोकांना जास्त बसेल आणि न्यायव्यवस्थेतला पक्षपात अजून वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय क्रम्बली मातापित्यांचं वागणं कितीही निष्काळजी, मूर्खपणाचं आणि अनैतिक असलं तरी त्यांना फारतर दिवाणी न्यायालयात दंड होऊ शकेल, पण त्यांना ‘गुन्हेगार’ ठरवण्यासाठी भावनेच्या भरात कायदा हवा तसा वाकवायचा प्रयत्न करणं अयोग्य आहे असं हे विरोधक म्हणतात.

मुळात जर बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणणारे कायदे मंजूर झाले तर अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल. पण अमेरिकेतल्या प्रत्येक गोष्टीसारखं याही बाबतीत प्रचंड ध्रुवीकरण झालंय. बंदुका बाळगायच्या हक्काची नाळ मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेली असल्यानं आणि नॅशनल रायफल असोसिएशन सारख्या संस्थेची राजकारणातली ‘लॉबी’ मजबूत असल्यानं हे कायदे कधीच पुढं सरकत नाहीत. या दुर्घटनेनंतर काही दिवसांतच रिपब्लिकन पक्षाच्या थॉमस मॅसी आणि लॉरेन बोबर्ट या लोकनियुक्त प्रतिनिधींनी आपापल्या परिवाराबरोबर ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते, आणि त्या फोटोंमध्ये प्रत्येकाच्या - अगदी लहान मुलांच्यासुद्धा- हातात बंदूक होती!

या आठवड्यातल्या बातमीनुसार सरकारी वकिलांनी क्रम्बली मातापित्यांबरोबर इथनच्या शाळेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या मते इथनचं एकंदर वागणं लक्षात घेऊन शाळेनं आधीच काही पावलं उचलली असती तरी हा प्रकार टळला असता. इथनच्या गुन्ह्याची जबाबदारी त्याच्याबरोबरच पालकांवर आणि शाळेवर टाकण्याची वेगळी दिशा पकडणाऱ्या या खटल्याचा निकाल कसा लागतो हे बघणं फारच अभ्यासनीय ठरणार आहे. पण यामुळं सर्व संबंधित घटकांमध्ये किमान एक सामूहिक जबाबदारीची भावना वाढीला लागली तर बरेच निरागस जीव वाचतील यात शंका नाही!

field_vote: 
0
No votes yet

बंदूक हातात आहे म्हणून गोळीबार झाला हे वरवर चे कारण झाले
बंदूक उपलब्ध असणे हे अनेक कारणां पैकी एक किरकोळ कारण आहे.
ही वृत्ती निर्माण कशी होते ह्या पाठी मागे अनेक सामाजिक कारण आहेत,मानसिक कारण आहेत, कौटंबिक कारण आहेत.
मनाची योग्य जडण घडण होण्यास आवश्यक असलेले पूरक वातावरण मुलांना मिळत नाही हे महत्वाचे कारण आहे.
बंदुकी वर बंदी टाकून काही होणार नाही.लोक ब्लॅक नी खरेदी करतील.
मुल ,व्यक्ती हिंसक का होत आहेत ?
ह्या प्रश्नाच्या मुळाशी गेल्या शिवाय खरे उत्तर मिळणार नाही.
समाज,देश पण हवा आणि प्रचंड वैयक्तिक स्वतंत्र पण हवं.
हे शक्य नाही.
दोन्ही एकावेळेस मिळू शकणार नाही.
अतिरेक मग कोणत्या ही विचाराचा असू ध्या तो घातक च.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप महत्वाचा विषय ह्या धाग्यावर धागा कर्त्यानी मांडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश मानसिक आरोग्याचा प्रश्न तर फारच जटील आहे. गरीब इल्लिगल इमिग्रंटस, एकटे (आणि प्रॉब्लेमॅटिक) पालक, व्यसनाधीनता, सतत एका फॉस्टर केअर मधून दुसऱ्या फॉस्टर केअरमध्ये बदलत गेलेली मुले, मुलांचे लहानपणी झालेले शोषण अनेक पैलू यावेत. माझे यावर वाचन नाही आहेत ती फक्त उथळ मते. पण एखादा जर लेख सापडला तर शेअर करेन.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शांत बसून कधी मी आज पर्यंत च आयुष्य आठवतो.
घडलेल्या विविध घटना त्या वर आपण दिलेला प्रतिसाद,आज पर्यंत विसरता न येणाऱ्या घटना.
ह्याचा विचार करतो.
मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या घटना माणूस विसरत नाही आणि त्याच घटना माणसाची समाजात राहताना स्वतः ची ठाम मत बनवतों.
ती अर्थात च चुकीची असतात.पूर्वग्रह दूषित असतात.
उदाहरण
नातेवाईक कडून मिळाली गेलेली वाईट वागणूक जेव्हा त्यांच्या कडून प्रेमाची ,मदतीची गरज असते तेव्हा ती न मिळणे
ह्याचा परिणाम म्हणून नातेवाईक लोकांवर अशी लोक नेहमीच अविश्वास दाखवतात.
जसे स्त्री,पुरुष,विशिष्ट समाज, किंवा बाकी समाज घटक हे वाईट च असतात अशी तीव्र भावना पक्की मनात बसलेली असते
त्याला कोणते ना कोणते प्रसंग जबाबदार असतात.
त्याचा परिणाम म्हणून त्या लोकांविषयी
तीव्र तिरस्कार निर्माण होतो.
आणि अशी मानसिकता निर्माण झालेल्या व्यक्ती
नी अनेक निरपराध लोकांची हत्याकांड केली आहेत.
जगात अनेक उदाहरणं आहेत.
मी माझ्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा असे मला वाटत.
15 ते 23 वया पर्यंत माणूस कोणत्याच मतावर ठाम नसतो
अशा वयातील व्यक्ती वर प्रत्येक प्रसंगाचा खोल परिणाम होतो.
ह्याच वयात क्रूर पना ,किंवा अतिशय सोशिक पना,अन्याय बिलकुल सहन न करण्याची वृत्ती आणि अन्याय सहन करण्याची त्याचा प्रतिकार न करण्याची वृत्ती तयार होते.
बाकी आनुवंशिक बाबी पण असतात.
15 ते 23 वयातील मुल जी प्रेमाची व्याख्या करतात.
हिच्या शिवाय जगूच शकत नाही.
ती प्रेमाची व्याख्या 35 वय ओलांडले की हास्यास्पद वाटते.
हा वयाचा परिणाम असतो.
लहान मुलांना शाळेत संस्कार च शिकवले पाहिजेत बाकी ज्ञान साईड ल करा.
Abcd किंवा पाढे पाच वर्षाच्या मुलाला नाही आले तरी चालतील.
पण वर्तणूक समाजात कशी असली पाहिजे हे त्याच्या मनावर बिंबवले गेले पाहिजेत
ही माझी मत माझ्या आयुष्याची समीक्षा करून बनली आहेत.
ती चुकीची पण वाटू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा घटनांकरता अनेक घटक जबाबदार असतात असे वाटते. पण व्यक्तीची वृत्ती/मानसिकता हा घटक अतिशय महत्वाचा आहे असे वाटते.

म्हणजे समजा एखाद्या घराचे दार उघडे असेल, घरात कुणीही नसेल तर ज्यांच्या लक्षात हा प्रकार येईल, ती माणसे तीन प्रकारात विभागली जाऊ शकतील.

(१) घर रिकामे आहे, दार उघडे आहे हे पाहूनही त्यांच्या वाटेने निघून जातील. "घरमालक बघून घेईल काय ते, आपल्याला काय त्याचे?", असा विचार करून. त्यांना त्या रिकाम्या घरात डोकवावे असे वाटणारच नाही.
(२) काही लोकं म्हणतील, "अरे घर मालकाला सांगायला हवे, की घराला कुलुप लाव म्हणून. नाहीतर बिचाऱ्याचे नुकसान होईल."
या पैकी काहीजण नुसताच असा विचार करून पुढे निघून जातील. काही जण घराच्या मालकाला शोधण्याचा आणि ओळखीचा असल्यास संपर्क करण्याचा प्रयत्न करतील. या विभागातील लोकांना देखिल मालक नसलेल्या आणि कुलुप नसलेल्या घरात जाऊन स्वत:ला काही फायदा करून घ्यावा असे बिल्कुल वाटणार नाही.
(३) या प्रकारातील व्यक्ती धोकादायक असतात. संधीसाधु असतात. अशा व्यक्तीं पैकी एखादा घर लुटुन पसार होईल. कारण या विभागातील लोकांची ती वृत्ती आहे. कुलुप नसलेले आणि मालक नसलेले घर त्यांना सुवर्णसंधी सारखे भासेल.

हाच प्रकार हिंसक घटना घडवणाऱ्यांच्या बाबतीत आहे. समाजात अनेकांकडे शस्त्रे आहेत. त्यापैकी एखाद दुसरा अशी घटना करतो. अशा वृत्तीची माणसे ओळखणे अवघड असते. त्याकरता समाजातील प्रत्येक स्तरात जागरूकता असणे जरूरी आहे.

१ ला स्तर -- आई वडिल आणि घरातील अन्य सदस्य. -- घरातील सर्वांची एकमेकांबरोबर बांधीलकी असली पाहिजे. नुसते एका घरात रहातात, एक अडनाव वापरतात इतकेच पुरेसे नाही. माझ्या वर्तणुकीचा चांगला वाईट परिणाम माझ्या घरच्या सदस्यांवर होईल याची जाणीव असायला हवी.
२रा स्तर -- मित्रपरिवार, नातेवाईक, ओळखीचे लोक, शेजारी या सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे. एखाद्याचे वर्तन, बोलणे, अथवा त्याच्या सोशल मिडियावरील वावरा मधे काही चुकीचे, खटकणारे आढळले तर लगेच त्यावर काही उपाय शोधला जाणे महत्वाचे आहे.
३ रा स्तर -- शाळा, कॉलेज, कार्यालय, क्लब, जिम, क्लासेस इ. सारख्या ठिकाणी बरोबर असलेले सदस्य. अगदी कुणाच्या खाजगी जीवनात दखल द्यायची गरज नाही, परंतु 'मला काय त्याचे? माझा काय संबंध? त्यांचे ते पाहून घेतील' अशीही वृत्ती नसावी.
४ था स्तर --- अधिकारावर असलेल्या व्यक्ती, सामजिक/धार्मिक कार्यकर्ते, राजकारणातील व्यक्ती आणि अशा व्यक्ती ज्यांचा समाजावर प्रभाव आहे. या स्तरातील व्यक्ती बोलण्यातून आणि आचरणातून दिशादर्शक होऊ शकतात.

समाजातील असे अनेक घटक जागरूक राहिले तर किमान काही हिंसक आणि दुर्दैवी घटना घडण्या आधी थांबवता येतील. अगदी शून्य नाही तरी कमी नक्की होऊ शकतील.
त्याचबरोबर शस्त्र वापराचा परवाना, अती घातक शस्त्रे सामान्याना उपलब्ध होऊ न देणे वगैरे उपाय तर करायलाच हवेत. जबादार आणि लायक व्यक्तीच्या हातात जर शस्त्र असेल तर ते समाज स्वास्थासाठी उपकारक असते. परंतु अपरिपक्व आणि उथळ विचार असणाऱ्याकडे तेच शस्त्र असेल तर हानीकारक ठरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

पांघरसी जरी असला कपडा - येसी उघडा, जासी उघडा |
कपड्यांसाठी करीसी नाटक - तीन प्रवेशांचे ||