रेषेच्या पलीकडचे बाळ ठाकूर

पुस्तकांसाठी आणि नियतकालिकांसाठी देखणी आणि सार्थ चित्रं चितारणाऱ्या रेखाचित्रकार बाळ ठाकूर यांचं नुकतंच निधन झालं. त्या निमित्तानं त्यांची मुलाखत संक्षिप्त रूपात दैनिक 'प्रहार'मध्ये पूर्वी प्रकाशित झाली होती. 'ऐसी'च्या वाचकांसाठी ती इथे पुनःप्रकाशित करत आहोत. परवानगी देण्याबद्दल दैनिक 'प्रहार'चे आभार.

'आप्तवाक्य' नावाच्या एका वाचकगटानं नुकताच ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रंथनिर्मितीशी निगडित चित्रकारांची होणारी उपेक्षा लक्षात घेता बाळ ठाकूर यांना बोलतं करणं, हा नक्कीच स्वागतार्ह उपक्रम होता. मुळात मितभाषी असलेल्या आणि केवळ रेषांनी बोलण्यावर विश्वास असणाऱ्या बाळ ठाकूर यांना सार्वजनिक मुलाखतीमध्ये बोलतं करणं, हे एक आव्हानच होतं. पत्रकार व कलासमीक्षक असलेल्या श्रीराम खाडीलकर यांनी ते पेललं आणि एका चित्रकाराचं रेषांच्या पलीकडलं मनोगत मुलाखतीतून व्यक्त झालं. या मुलाखतीचा हा संपादित अंश.

बाळ ठाकूर
बाळ ठाकूर (प्रतिमा जालावरून साभार)

चित्रकलेची सुरुवात नेमकी कधी झाली? शाळेत असल्यापासून चित्रं काढत होता का?
आमच्या पिढीच्या शाळेत स्लेटची पाटी होती. पत्र्याची पाटी नंतर आली. वर्षाच्या सुरुवातीला ही स्लेटची नवी पाटी मिळायची. दोन-तीन महिन्यांत तिचे तितकेच तुकडे व्हायचे. त्यातला मोठा तुकडा दप्तरात घालून शाळेत न्यायचा. बाकी कागद माहीतच नव्हता. चौथीपर्यंत कागद नव्हता. त्यानंतरही फक्त परीक्षेच्या वेळी कागद मिळायचा. मात्र पाटीच्या तुटलेल्या तुकड्यांमध्ये मी चेहरे काढायचो एवढं आठवतं. चेहरा काढणं हा आवडीचा छंद. फुलं-पानं काढल्याचं काही आठवत नाही.

तुम्ही मूळचे कोकणातले. कोकणातला माणूस शक्यतो लॅण्डस्केप चित्र काढून सुरुवात करतो. तुम्ही तसं केलं नाही. त्याची काय कारणं?
लहानपणी एकदा कोल्हापूरला गेलो होतो. तिथे डॉ. काटे म्हणून प्रसिद्ध डॉक्टर होते. शिवाजी पुतळ्याजवळ त्यांचा दवाखाना होता. तिथे त्यांच्याकडे लॅण्डस्केप चित्रं लावलेली असायची. चित्रकलेचा किंवा चित्रं बघण्याचा पहिला संस्कार तिथेच झाला. पण लॅण्डस्केप काढली मात्र नाहीत.

मग मुंबईला जेजेला येणं कसं झालं?
जेजेमध्ये चित्रकलेचं शिक्षण वगैरे मिळतं, अशी काही कल्पना नव्हती. मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर चौकशी सुरू केली. तेव्हा ही परीक्षा जरा लवकर म्हणजे मार्चमध्येच व्हायची आणि जून महिन्यापर्यंत निकालाची वाट बघायला लागायची. त्या काळात जेजे स्कूलची चौकशी केली. त्यांचा फॉर्म मिळवला. त्यावर कमर्शिअल आर्टबद्दलचा मजकूर होता. भरून फॉर्म पाठवून दिला. त्यांचं पत्रही आलं. मग मुंबईला जाण्याचा उद्योग. तेव्हा कोल्हापूरहून मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. कोल्हापूरला दोन डबे होते. पण ते प्रवाशांना न उतरवता थेट पुढच्या गाडीला लागत. त्यामुळे उभं राहायला जागा मिळणं हाच आनंद होता. तिथून पुणे आणि मग पुणे-मुंबई एक्सप्रेसने मुंबई. या प्रवासात गांगण नावाचे एक गृहस्थ सोबत होते. त्यांनी मग उतरल्यावर फणसवाडीपर्यंतचा रस्ता दाखवला. खालून त्यांनी दुसऱ्या मजल्यावरचा डालड्याचा डबा दाखवला आणि सांगितलं, "तिथे ढवळे राहतात. जाल ना! ठीक आहे", म्हणून मी वरती गेलो. अशा रीतीने मुंबईत आलो.

इथे आल्यानंतर लोकांना प्रकाशकांकडे खेटे घालावे लागतात. तुम्ही आलात ते थेट प्रकाशकाच्या घरात..
ढवळ्यांचा (वा. रा. ढवळे) आणि माझ्या काकांचा राजापूरपासूनचा जुना परिचय होता. माझे वडीलही तिथेच उतरायचे. आमच्याकडे कुणीही मुंबईला आलं की, त्यांच्याकडेच यायचे. मीही बॅग घेऊन त्यांच्याकडेच मुक्कामाला आलो. तोपर्यंत तिथे कुणीही मला ओळखत नव्हतं. सगळी पुरुषमंडळी कामाला गेली होती. बायकाच होत्या. ढवळेंच्या आईनेच माझी विचारपूस केली आणि मुंबईत प्रवेश झाला.

मुंबईत आल्या आल्या तुम्हाला तुम्ही प्रकाशन व्यवसायाशी निगडित काही करणार आहात याचे संकेत मिळाले होते का?
त्यापूर्वीच ‘साहित्य’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. (ढवळे मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘साहित्य’ द्वैमासिक संपादित करायचे.) तो अंक जपून ठेवण्यासारखा होता, असं माझं अजूनही मत आहे. मल्हार ढगेंनी नंतर पुन्हा एकदा या पहिल्या अंकाची आठवण ठेवून नवा संपादित अंक काढला होता. पहिल्या अंकातली निवडक शीर्षकं तेव्हा गोडशांनी (द. ग. गोडसे) केली होती. ढवळ्यांकडे जाण्यापूर्वी आमच्याकडे गावाला घरी ‘पारिजात’ येत असे. रघुवीर सामंत ते प्रकाशित करत असत. त्यानंतर ‘ज्योत्स्ना’. ते उत्तमच मासिक होतं. बंद होईपर्यंत ते येत होतं. ज्योत्स्ना मासिकाचा तो काळ आणि माझा येण्याचा काळ एकच होता. त्यामुळे माझ्यावर चांगल्या मासिकांचा संस्कार जो व्हायला पाहिजे होता तो नक्कीच झालेला असावा, असं वाटतं.

ग्रंथ प्रकाशनाची कामं असोत की जाहिरात विश्वातली, बाळासाहेब ठाकूर ओळखले जातात ते त्यांच्या शैलीमुळे. बऱ्याच जणांना लांब रेषा काढायची सवय असते. तुमची रेषा कधी तुटक दिसली नाही. एखाद्या गाइडेड मिसाइलसारखी ती त्यांना हवी त्या ठिकाणी ठरवल्याप्रमाणे जाऊन थांबायची. या रेषेनेच रसिकांची मनं जिंकली. म्हणूनच तुम्हाला विचारावसं वाटतं की, ही रेषा जी तुमची ओळख आहे ती नेमकी सापडली कुठे आणि कशी?
मुंबईत आल्यावर मासिक-पुस्तकांची कामं घेणं, भेटणं असं होत होतं. प्रामुख्याने मी द. ग. गोडसेंच्या चित्रांच्या स्टाइलने प्रभावित होतो. ती आपल्याला यावी असा प्रयत्न मी करत असे. त्यानंतर मधुकर जोमराज या आमच्या प्राध्यापकांचाही प्रभाव होता. त्यांचं ड्रॉइंग खूप चांगलं होतं. ते कुठल्याही स्टाइलने चित्रं काढत असत. त्यांच्या ब्रशच्या रेषेचं आकर्षण होतं. ‘उल्का’ या जाहिरात एजन्सीत काम करताना एचएमव्ही – इएमआय या कंपन्यांच्या जाहिराती केल्या. सतारवादक रविशंकर, शहनाईवादक बिस्मिल्ला खान आदी संगीतक्षेत्रातील दिग्गजांच्या पाच जाहिराती तेव्हा मी केल्या होत्या. या जाहिरातींची फारच चर्चा आणि वाहवा झाली. काय व्हायचं ते झालं. या जाहिरातींच्या कॅम्पेनपासून रेषेची सुरुवात झाली.

एखाद्या गोष्टीतलं नेमकं काय पकडायचं, याची प्रोसेस कशी असते?
ते शब्दांत पकडू शकू, असं वाटत नाही. वाचताना एखादं कॅरेक्टर महत्त्वाचं वाटतं. मुद्दाम विचार करत नाही. पण वाटत राहतं. मग कागद घेऊन स्क्रिबल करतो. त्याचं असं आहे की, फ्री हॅण्ड हा एरवी खूप अ‍ॅप्रिशिएट होणारा विषय असतो. पण जाहिरातीच्या क्षेत्रात थोडं वेगळं असतं.

जाहिरातक्षेत्रात काम करताना समाधान मिळतं का?
समाधान असं नसतं. कारण कादंबरी, कथा वगैरेंची चित्र काढताना तो आपला विषय असतो. तिथे कुणी डिक्टेट करत नसतं. इथे आपल्या सवडीनुसार आपल्याला भावतं ते कॅरेक्टर आपण घेतो. ते व्यक्त होत राहतं. मनात एकाचवेळी अनेक गोष्टी घडत असतात. त्यातून चित्र तयार होतं. थोडा बदल करावासा वाटला तर तो आपल्याला करायचा असतो. एखादी गोष्ट कमी करायची किंवा वाढवायची सारं आपल्या हाती असतं. कथा समोर असते... लेखक नसतो. त्यामुळे मनासारखं काम करता येतं. प्रकाशकालाही चित्र दाखवलं की, तो काखोटीला मारून घरी घेऊन जातो. चित्र कसं आहे एवढं जाणण्याची त्याची पात्रता असतेच असं नाही. (हशा!) प्रकाशक कसाही असला तरी त्याची एक दृष्टी विकसित झालेली असते. त्यांनीही वाचून काही काम केलेलं असतं. मार्केटचा विचार केलेला असतो. नेहमीच्या वाचकमंडळींचाही विचार असतो. विषयानुरूप गोष्टी आहेत की नाहीत, याची दृष्टी विकसित झालेली असते.

जाहिरातक्षेत्रात तुम्ही फारसे रमला नाहीत?
त्यातही काही वर्षं काढली; गरज म्हणून काढली. जाहिरात क्षेत्र आणि सिनेमा क्षेत्र यांच्यात किती अंतर आहे? अधिक क्षमता असणारा माणूस कमी क्षमता असणाऱ्या माणसासोबत राहाणं कठीण असतं. त्यामुळे बाहेरचा रस्ता पकडावा हे उत्तम.

त्याचा काही परिणाम तुमच्या करिअरवर झाला का?
काहीही नाही.

प्रकाशनक्षेत्रातील अनेक लोकांबरोबर तुम्ही काम केलंत, आम्हा वाचकांना चित्रसाक्षर केलंत. मासिकांसाठी पहिलं काम कधी केलं?
ना. वि. काकतकर यांच्यासाठी केलं. केशव भिकाजी ढवळ्यांकडे काही गडबड झाली. काही लोक निघाले. काकतकरही त्यात होते. नंतर त्यांनी स्वत:चं प्रॉडक्शन सुरू केलं. ‘रहस्यरंजन’ काकतकरांनी चालवायला घेतलं होतं. काही काळ तिथे संपादकांमध्ये सदानंद रेगेही होता. पण नंतर तो फेलोशिप घेऊन परदेशात गेला. त्यानंतर अशोक शहाणे प्रमुख संपादन सहाय्यक म्हणून आले. त्यांच्यासोबत खूप चांगलं काम झालं. चिं. त्र्यं. खानोलकर त्या मासिकासाठी लिहायचे. त्यांची कादंबरीही ‘रहस्यरंजन’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. जितेंद्र अभिषेकीही यायचे. तेव्हा ते आकाशवाणीवर होते. मधल्या सुट्टीत लेख देण्यासाठी धावत धावत यायचे. जवळच असल्याने मीही मधल्या सुटीत ‘उल्का’मधून तिथे जायचो. ‘रहस्यरंजन’ने खूप मोकळीक दिली. त्यामुळे काम करायला मजा आली. मधल्या काळात अशोक शहाणेंनी फोन करून ती एका रंगातली मुखपृष्ठं एकत्रित करता येतील का, असं विचारलं होतं. ती आता कुठेतरी लायब्ररीत असतील. मात्र या कामाची चांगली चर्चा झाली. एकदा श्रीपुंकडे सायनला गेलो असताना ते म्हणाले, "तुम्ही मौजेसाठी काम करणार का", असं पत्रच लिहायला घेतलं होतं. दोन ओळी लिहून झाल्या होत्या. या कामाची दाद दिल्यासारखंच ते होतं.

आजच्या काळात अशी दाद मिळते का?
अशी संवेदनशील माणसं आजच्या काळात आहेत का? इतक्या जाणिवा जोपासल्या जातात?

मौजेच्या सुरुवातीच्या दिवसांत तिथे काम करताना काय घडायचं? तुम्हीच चित्रं काढा म्हणून लेखक आग्रह धरायचे का?
असं काही घडायचं नाही. सध्याही नाही आणि तेव्हाही.. अगदी सत्यकथा वा मौजेतही असं काही घडायचं नाही. सुरुवातीला पटवर्धन ठरवायचे. नंतर विशेष लेख असेल तर बोलावून घेतलं जायचं. तेव्हा झेरॉक्स वगैरे नव्हतं. त्यामुळे कथा गहाळ होण्याचा धोका असायचा. त्यामुळे बोलावूनच घेतलं जायचं.

वेगळ्या पद्धतीने काम करावंसं वाटलं का?
मी वेगवेगळ्या स्टाइलने काम करायचो. पुण्यात एक प्रेस होता... पटवर्धनांचा. त्यांनी एकदा सांगितलं होतं की, माझ्या वेगळ्या स्टाइलच्या चित्रांची ते वाट पाहायचे.

तुमच्याकडे कथा आली की तुम्ही नेमकं काय करता? विषयाकडून आशयापर्यंत जाण्याचा तुमचा प्रवास कसा असतो?
सगळंच वाचावं लागतं. काही जण कथेचा भाग पाठवतात. जमणार नाही म्हणून सांगतो. संपूर्ण कथा वाचणं महत्त्वाचं असतं. कुठला भाग अपील होईल हे सांगता येत नाही. कुणी सांगितलं दोन परिच्छेद आहेत त्यावरून चित्रं काढा, तर त्यावर न्याय होईल की अन्याय होईल, हे सांगता येणं कठीण आहे. वाचावं तर लागतंच. अख्खं वाचल्यावरच डोक्यात येतं. ते माझ्या सवयीचं झालंय.

वाचल्यावर लेखकाने दाद दिलीय किंवा तुम्ही लेखकाला दाद दिलीय, असं काही झालंय का?
शंकर पाटील, माडगूळकर दाद द्यायचे. ‘बनगरवाडी’ची जी आताची एडिशन आहे ती नव्याने करताना सात-आठ वर्षापूर्वी माडगूळकरांशी संपर्क केला गेला होता. त्यांनी नव्याने चित्रं काढावीत, असा विचार होता. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी संभाषण झालं तेव्हा ते सांगत होते की त्यांना आता पूर्वीसारखी चित्रं काढता येत नाहीत. ज्या गावाचं चित्रण केलं ते गावच राहिलं नाही; ती माणसं, ती मेंढरं वगैरे काहीच राहिले नाहीत. काढणार काय? मात्र श्रीपुंनी मला ती चित्रं पूर्ण करण्यास सांगितली. रवी मुकुल आणि मी होतो. रवी मुकुल यांनी फोटो काढले आणि मग मी ती चित्रं केली. पण तो माझ्यासाठी आनंदाचा भाग होता.

सत्यकथा, जाहीरनामा ते विवेकपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीच्या नियतकालिकांसाठी तुम्ही कामं केलीत. कधी वैचारिक संघर्षाची वेळ नाही आली?
मी प्रत्येक मजकूर प्रामाणिकपणे वाचला. मात्र मानसिक संघर्ष होईल असा मजकूर कधीही माझ्यासमोर आला नाही. त्यामुळे वैचारिक संघर्ष झाला नाही. तटस्थपणे मजकूर वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. मग साम्यवादी, समाजवादी की हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक असो, राष्ट्रविरोधी वाङ्‌मय कधीच माझ्या हाती आलं नाही.

संगणकामुळे सध्या यांत्रिक आणि तांत्रिक भर वाढला आहे. पण त्या काळात या गोष्टी नसताना आव्हानं कशी होती आणि त्या मर्यादेतही नेमका आशय विकसित करणं कसं शक्य झालं?
तंत्रामध्ये फार काही बदल झाले आहेत, असं वाटत नाही. मॅपलिथो जाऊन ऑफसेट आलं. पूर्वी जी बंधनं होती ती गेली. प्रकाशकही आता कागदाच्या आकारमानाप्रमाणे समजून घेतात. पण आता प्रॉडक्शन अधिक सफाईदार झालं आहे. रिझल्ट कसा असेल, हे आधीच समजतं. रंगांचं मिश्रण काय होईल, हे आधीच कळतं. पूर्वीच्या काळी रंगीत प्रूफ काढणं म्हणजे काय आव्हान होतं, हे प्रिंटरच सांगू शकेल. हा रंग थोडा वाढवून, थोडा हा कमी करून सहा-सात वेळा प्रयोग करून मग त्याची रंगीत प्रूफं काढणं हे काय दिव्य होतं, हे आता सांगूनही कळणार नाही.

प्रकाशन व्यवसायात प्रकाशकच सर्वेसर्वा असतो. तो चित्रकाराला केवळ एक साधन म्हणूनच वापरतो का?
मला स्वत:ला तसा अनुभव आलेला नाही. इतरांचं मला माहीत नाही. रद्दी विकून जे प्रकाशक झालेत, त्यांचा मला काहीच अनुभव नाही.

मुखपृष्ठासाठी चित्रं काढणं आणि कथेसाठी इलस्ट्रेशन्स यात काय फरक असतो?
मुखपृष्ठाचा संदर्भ आणि आतली इलस्ट्रेशन्स या वेगवेगळ्या गोष्टी असतात. कुणीतरी सांगितलं आहे की, मुखपृष्ठ हे पोस्टरसारखं असतं. अंगुलीनिर्देश करण्यासारखं असतं. सगळा भाव त्याच्यात आणावा लागतो. मात्र इलस्ट्रेशन ही स्टोरीतल्या वेगवेगळ्या कॅरेक्टरशी निगडित असतात. त्यांचा अ‍ॅप्रोच वेगळा असतो.

मुखपृष्ठासाठी तुम्ही काही वेगळा प्रयोग केला आहे का? पूर्वी बोल्ड टायटल्स असायची, मग टोन, टेक्स्चर, लाइन्स यात काही बदल केले का?
आपण बदलत जातो. डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ते होतं. त्यामुळे वेगवेगळे फॉर्म वापरावे लागतात.

लोकांना हे आवडतं म्हणून काही केलं का?
असं कधी झालं नाही.

एखाद्या गॅलरीत चित्रांचं प्रदर्शन करावं, असं वाटलं नाही का?
वर्षापूर्वी कुणीतरी संपर्क केला होता. त्यांना बाळ ठाकूर यांची सगळी चित्रं एकत्रित करून एक पुस्तक काढायचं होतं. मी अलीकडेच काही वर्षातली कामं एकत्र करून ठेवली आहेत. प्रदर्शन भरवू शकतो.

तुमचं कुठलं काम तुम्हाला आवडलं होतं?
दळवींच्या ‘चक्र’ या पहिल्या कादंबरीसाठी मी तीन ते चार चित्रं काढली होती. माझ्या कल्पनेप्रमाणे मी वेगळ्या पद्धतीने ती केली होती. तेव्हा शा. शं. रेगे नावाचे एक ग्रंथपाल होते. ते उत्तम वाचक होते. समीक्षक होते की नाही, माहीत नाही. पण त्यांनी त्या चित्रांवर कुठेतरी पत्र लिहून असा उल्लेख केला होती की टोपोल्स्कीप्रमाणं ही चित्रं आहेत. अजूनही मला आठवलं की, मी दचकून जागा होतो. त्याला कळलं तर तो आत्महत्या करेल.

रेषांचा रियाज तुम्ही कसा केला?
करावा लागतो आणि तो केला. वर्तमानपत्रांची पानं घेऊन केला. तेव्हा क्रुकवील नावाचा स्पेशल टाक मिळायचा. बाकी काम मी ब्रशने केलं. ब्रशवर खूपच अभ्यास केला. ब्रशवर कमांड असेल तरच रेषा कुठे जाड तर कुठे कमी करता येते. मी कुणाची तरी नक्कल करतो, असेही आरोप तेव्हा झाले होते. पण रियाज करावा. ब्रशने काम करणारे आता खूप कमी राहिले आहेत.

(शब्दांकन : पराग पाटील)

field_vote: 
0
No votes yet

मुलाखत फारच आवडली. काय authentic कलावंत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!