कंदवार्ता : राजकीय घडामोडींना वेग, पंचमीपर्यंत बदलू शकते सरकार?

बॉयसी - आयडाहो वार्ताहर : देशातले आणि राज्यातले राजकीय वातावरण वेगाने बदलत असुन येत्या धनत्रयोदशीपर्यंत नविन राजकीय भुकंप होण्याची शक्यता दिसते आहे. असे असले तरी रिश्टरस्केलवर ह्या भुकंपांची नोंद १.२० ते १.२१ असण्याचीच शक्यता जास्त असल्याचे दिसून येत आहे. शेजारच्या काकूंच्या घरासमोर असलेल्या मंगलकार्यात झिंगझिंग झिगांट वाजले तरी काकूंच्या परसातला पितळी बंब २.३ असे रिडींग दाखवितो त्यामुळे ह्या राजकीय भुकंपांचा सामान्य जनतेवर पडणारा प्रभाव हा नगण्य असेल असे काहींचे म्हणने आहे.

नुकत्याच हाती असलेल्या सर्वेक्षणात राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना कोव्हीड होण्याचे प्रमाण हे सामान्य जनतेला होणाऱ्या कोव्हीड होण्याच्या शक्यतेपेक्षा बरेच जास्त असल्याचे आढळून आले आहे. समाजातल्या सर्व प्रकारच्या राजकीय कार्यकर्त्यांचे मनोबल ह्यामुळे खालावले असुन आपल्या हुजूरांनी याची दखल घेत सर्व प्रकारच्या राजकीय कार्यकर्त्यांना पंजरीची पाकीटे मोफत द्यावित अशी मागणी केली आहे.

दरम्यान कम्प्युटरचे जुजबी ज्ञान असणाऱ्या काही हौशी विचारवंतांनी सांस्कृतिक क्रांती घडविण्याच्या अशक्य दुर्दम्य दिवास्वप्नांच्या समर्थनार्थ काढलेल्या संकेतस्थळांवरती XXXखाउंची गर्दी होउ लागली आहे. अशा संकेतस्थळांना स्वातंत्र्यकाळात छापल्या जाणाऱ्या भूमिगत वर्तमानपत्रांचा आदर प्राप्त झाला असुन महत्वाच्या राजकीय पक्षांनी आपल्या पदरी असणाऱ्या अनेक सेमी विचारवंतांना ह्या संकेतस्थळांवरती पुर्णवेळ लेखन करण्याचे आदेश दिले आहेत. ह्या सेमी विचारवंतांपैकी अनेकांना PPPच्या समस्येने ग्रासले असुन काहींना श्वसनासही त्रास होत होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थीत संकेतस्थळांवरती आपल्या राजकीय पक्षाविरोधात कुणी गैरसोयीचे लिखाण केल्यास त्याच्या उत्तरार्थ आख्खी सुटी वाया जाउ शकते अशी भीती अनेक आयटीसेल कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. सामान्य जनता सत्तेविषयी सणाच्याही दिवशी बोंबाबोंब करीत असली तरी ट्रोलिंग करुन त्यांची तोंडे बंद करायला सत्तेचे ट्रोल नेमके त्याचदिवशी अनुपस्थीत रहात असल्याचे दिसून आले आहे.

आपल्या कणभर अकलेचे मणभर प्रदर्शन करुन बहुतांश राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या खचून गेल्याचे आढळून आले आहे. पैकी देशसत्तेतले काही लोक राज्यसत्तेतल्या लोकांवर कुर'घोडी' करीत असुन राज्यसत्तेतले काही लोक देशसत्तेतल्या लोकांना मजबूत 'घोडा' लावित आहेत. अटीतटीच्या ह्या लढाईत कधी राज्यसत्तेतल्या लोकांना दोन दिवसातनं एकदाचं झोपायला मिळते तर कधी देशसत्तेतल्या. परंतु ह्या सत्तांसाठी काम करणाऱ्या डिजीटल हुजऱ्यांना मात्र बरेच दिवसात झोप मिळाली नसल्याचे संशोधनांती दिसून आले आहे. ह्यासंबधात कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता 'झक मारली नी आयटीसेल जॉइन केली' असे उद्गार अनेंकांनी काढले आहेत. बहुतेक सर्व पक्षांच्या आयटीसेल कर्मचाऱ्यांना ह्यावर्षीही बोनस न देता फक्त हल्दीरामची सोनपापडीच मिळाली असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असुन लवकरच देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ह्यामुळे प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

XXX - फुकट
PPP - बद्धकोष्ठता

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू