आजच्या राजकारणाविषयी - आलँ बादियु (भाग २)

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

"जिथं बदल हाच नियम आहे अशा जगाला आपण बदललं पाहिजे." - आलँ बादियु

- निवड आणि संपादन - वैभव आबनावे

- भाषांतर: साकेत कानेटकर

फ्रेंच तत्त्वज्ञ आलँ बादियु यांच्या तीन लेखांचं भाषांतर

भाग २ : आजच्या राजकारणाविषयी

प्रस्तुत लेख हा आलँ बादियु लिखित आणि डेव्हिड ब्रॉडर ह्यांनी इंग्रजीत भाषांतर केलेल्या Greece and the Reinvention of Politics (London: Verso, 2018) या पुस्तकातील 'On Politics Today' ह्या प्रकरणातील संकलित भागाचे मराठी भाषांतर आहे.

(भाग १ इथे वाचता येईल.)

सुरुवातीला फ्रान्समध्ये आज 'न्यूई दबू'1 या नावाने काय घडत आहे यावर दृष्टिक्षेप टाकायला मला आवडेल, शासनाच्या प्रतिगामी कामगार कायद्यांविरुद्ध पॅरीसमधील एक मोठा चौक ताब्यात घेऊन तिथे ठिय्या धरणारी ही चळचळ आहे. या चळवळीत सहभागी किंवा त्याचा पाईक नसताना देखील मी या चळवळीविषयी तुमच्याशी कसा बोलू शकेन? आणि मला तिच्याविषयी पत्रकारांसारखे बोलायचे नाही अथवा एखाद्या न्यायाधीशाच्या भूमिकेतून तिचा निकालही लावायचा नाही. किंबहुना, मला तिच्याकडे एका ठाम प्रश्नाद्वारे यायचे आहे, जो पुढीलप्रमाणे आहे : अशा स्थळ-काळाने बद्ध असलेल्या चळवळीचे – जिला बरेचदा लोकचळवळ असेही म्हणले जाते – आणि जिला डावपेचाची राजकीय प्रक्रिया असे मी म्हणेन या दोघांचे परस्परांशी नेमके नाते काय असते? जगाच्या नियमांच्या परिवर्तनाची प्रक्रिया, भलेही ते नियम आर्थिक, सामाजिक वा राज्यसंस्थेचे असोत, याविषयी मी बोलत आहे. किंवा, प्रश्न असाही विचारता येईल : जेव्हा एखादी घटना ऐतिहासिक, अभूतपूर्व, अपवादात्मक ठोस वास्तव म्हणून सामोरी येते, तेव्हा ती कोणत्या अर्थाने राजकीय विचाराचा टप्पादेखील होते, म्हणजेच समूहाचा, समूहाच्या अस्तित्वाचा, विसंगतींचा, प्रतिमांचा (figuration) विचार होते?

या मुद्द्यावर एक मत बऱ्याच काळापासून प्रचलित आहे. ते तुम्ही आधीच जाणून असाल यात शंका नाही, कारण गेल्या दहा वर्षांपासून ग्रीसमध्ये बऱ्याच लोकचळवळी होत आलेल्या आहेत. हे मत आपल्याला असे सांगते की अशा चळवळी, ज्यांत चौक ताब्यात घेणे, ठिय्या धरणे किंवा प्रतीकात्मक स्थळांचा बचाव करणे, या गोष्टींचा समावेश होतो, त्या आपला राजकीय विचार मूलभूतपणे बदलण्यास समर्थ असतात. या मतानुसार असाही दावा केला जातो, की या चळवळींअंतर्गत राजकीयतेचा भिन्न प्रघात पाडला जात आहे किंवा तिचे दमन केले जात आहे. म्हणजेच, या मतानुसार, चळवळ म्हणजे राजकीयतेचा बिगर-राजकीय प्रघात, किंवा असे राजकारण, ज्याने राजकीयताच नाहीशी होते.

पण मला विचाराल तर, या अर्थाने राजकीय – आणि सामान्यतःसुद्धा राजकीय – असे काही अस्तित्वात नसते. तो आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाने लावलेला शोध आहे. खरोखरीच ना 'राजकीय' असते, ना 'राजकारण असे काही' (politics as such) असते. खरे अस्तित्वात असते ते म्हणजे बहुविध राजकारण, जे विचारात आणि कृतीत प्रवेश करते. हे लक्षात घ्या की मी ज्याला 'राजकारण' म्हणतो ते खरे तर कायमच भिन्न राजकारणांमधील संघर्ष असते. राजकारण ही कधीच सोपी संकल्पना नसते. ती मुळातच एक द्वंद्वात्मक (dialectical) संकल्पना आहे, कारण राजकारण जेव्हा एक व इतर अनेक राजकारणांशी संघर्षात असते तेव्हाच ते अस्तित्वात असते. त्यामुळे कोणतीही चळवळ राजकारण नाहीसे करू शकत नाही, कारण ज्या 'राजकारणाला' कथितपणे नाहीसे होण्यास भाग पाडले जाते ते मुळातच अस्तित्वात नसते. राजकारण नाहीसे होण्यासाठी राजकारणांमधील संघर्ष नाहीसा होणे जरुरीचे आहे. आणि एका राजकारणाला इतरांविरुद्ध उभे करण्याचा प्रघात वगळता असे होणे अशक्य आहे.

या दृष्टिकोनातून पाहता, प्रत्येक लोकचळवळ तिच्या अंतर्गत एकीने झपाटलेली असते, हीच चळवळींची अक्षमता आहे. लोकांना असे वाटते, की एकी, ही मुक्त आणि समताधिष्टीत चर्चा, ज्यांमध्ये अंतर्विरोध विसर्जित होतात, त्या आपसूक लोकशाहीवादी असतात. पण वास्तविक पाहता तसे नाही. हे आपल्या देशातील राज्यसंस्थेच्या सत्तेचे प्रतिबिंब आहे. ही सत्तादेखील स्वतःला लोकशाहीवादी म्हणवते. चळवळी असा विचार करतात की त्या त्यांच्या अबाधित एकीद्वारे – म्हणजेच आपण सर्व एकत्र आहोत, एक आहोत – राज्यसंस्थेचा प्रतिकार करू शकतात, जी एकमात्र राजकारणाने लोकांच्या एकीचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करते. याच संसदीय-निवडणुकीच्या राजकारणाला 'लोकशाहीवादी' राजकारण असेही म्हणले जाते. अशाप्रकारे आपल्यासमोर एक कृत्रिम विरोध आहे, ज्यामध्ये एका बाजूला चळवळीची लोकशाहीवादी एकी असते आणि दुसऱ्या बाजूला राज्यसंस्था, जी स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेणाऱ्या एकमात्र राजकारणाचे रूप धारण करते.

मी आधी उल्लेख केलेल्या साध्या कारणामुळे हे सर्वच निकामी ठरते. जेव्हा कुठेही एकमात्र राजकारण असते तेव्हा याचा अर्थच असा की वस्तुतः तिथे राजकारण नसते, कारण राजकारण म्हणजेच इतर अनेक राजकारणांशी असलेला संघर्ष. राजकीय शून्यता आणि चळवळीची एकी या विरोधात आपण राजकीय शून्यतेत अडकतो : म्हणजेच असे की, विचारशून्यतेत अडकतो, अखेरीस कृती असफल ठरते.

“असेच काही नाही – आज संसदीय लोकशाहीमध्ये अनेक प्रकारची राजकारणे आहेत; उजवे आहेत, डावे आहेत.'' असे तुम्ही म्हणाल. खरे तर, प्रचलित संसदीय व्यवस्थेमध्ये भिन्न व विविध राजकारणांचे अस्तित्व ही एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तवात केवळ एक राजकारण आहे. आणि १९८०च्या दशकापासून ही स्थिती स्पष्ट होत आहे. खरे तर, उजवी आणि डावी सरकारे एकसारखेच राजकारण अंमलात आणत आहेत, जी पूर्णपणे युरोप आणि जगाच्या भांडवली अत्यल्पलोकसत्तेसमोर (oligarchy) झुकत त्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत. अशा बनावटी, एकमात्र राजकारणाला – जे भांडवली अत्यल्पलोकसत्तेचा कारभार चालवते – भांडवली-संसदशाही म्हणावे असा माझा प्रस्ताव आहे. हे काही राजकारण नाही, ही मोकाट भांडवलशाहीची राज्यसंस्था-व्यवस्थापित रचना आहे; यात निवडणुकांची पूर्वअट अशी आहे की शासन चालवणारे सर्व पक्ष हे उदारमतवादी जागतिक भांडवलशाहीला स्वीकारणारे व पाठिंबा देणारे असावेत.

भांडवलशाहीची शिकवण, विचार आणि प्रघात यांचे प्रचलित स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे आहे; ते आहे उदारमतवाद. आजकाल आपण नव-उदारमवादाविषयी बोलण्यास उत्सुक असतो, पण हे म्हणजे काहीच न म्हणता बोलल्यासारखे झाले. म्हणजे अशा चर्चांनी ज्याला नवउदारमतवाद म्हणतात तो एकोणिसाव्या शतकाच्या उदारमतवादापेक्षा सपशेल वेगळा आहे, अशी धारणा लोक बनवतात. पण नवउदारमतवादाची शिकवण, मागण्या, गोष्टी करायची पद्धत, त्याचे शत्रू इत्यादी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तयार व तैनात झालेल्या उदारमतवादाहून अजिबात वेगळे नाहीत. नवउदारमतवाद म्हणजे १९१७ची रशियातील बोल्शेविक क्रांती ते चीनमधील १९७६च्या सांस्कृतिक क्रांतीचा अंत या दरम्यानच्या हादरवणाऱ्या कालखंडानंतरची उदारमतवादाची वापसी आहे. पण उदारमतवादाला एवढे हादरे बसावेत असे या सहा दशकांत काय होते? सरळ आहे, जगभरात अस्तित्वात असलेले अन्य राजकारण : कम्युनिस्ट राजकारण2.

कम्युनिस्ट राजकीय गृहीतप्रमेयाला (hypothesis) वरवरचा धक्का लावून भांडवलशाही अगदी नैसर्गिकरीत्या तिच्या तत्त्वप्रणालीकडे परतली आहे, जी आहे उदारमतवाद. कम्युनिस्ट पक्ष सर्वत्र लयाला जात आहेत आणि समाजवादी पक्ष – जे अनेकदा स्वतःला 'उदारमतवादी समाजवादी' वा 'सामाजिक उदारमतवादी' म्हणवून घेतात – यांचा मोर्चा जागतिक भांडवलशाहीबाबत एकमताच्या दिशेने चालू आहे. या कारणामुळे पश्चिमेत सर्वत्र आता निव्वळ एक राजकारण आहे; अर्थात राजकारण नाहीये .

बऱ्याच लोकांना हे कमीअधिक प्रमाणात स्पष्ट झाले आहे की ज्याअर्थी भांडवली संसदशाही हे एकच राजकारण आहे, त्याअर्थी ते अजिबात 'राजकारण' नाही. पण नवीन कम्युनिस्ट राजकारण रचण्याच्या दिशेला वळण्यापेक्षा ते बऱ्याचदा राजकीय नास्तिक्यबुद्धीवादाकडे (scepticism) वळतात. आपल्याला याची स्पष्ट लक्षणे न्यूई दबू अथवा स्पेन, ग्रीस, तुर्कस्तान, अमेरिका, हाँगकाँग, इजिप्त देशांतील लोक चळवळींमध्येही आढळून येतात. जेव्हा चळवळी आपली सच्ची लोकशाही रचण्याच्या धारणेने भांडवली संसदशाहीच्या बनावटी लोकशाहीविरुद्ध उभ्या ठाकतात, आणि आज इतर कुठलेही राजकारण नसल्याने, चळवळी जेव्हा अखेरीस असा विचार करतात की राजकारणाविरुद्ध त्या एकट्या उभ्या आहेत, तेव्हा त्या साधारणतः राजकारणविरोधी होतात. जेव्हा फक्त एक राजकारण असते – म्हणजे राजकारण नसते – तेव्हा लोकचळवळींचा कल राजकीय नास्तिक्यबुद्धीवादाच्या प्रघाताकडे झुकतो. आपण राजकारण टाकून दिले पाहिजे असा विचार आपल्याला न्यूई दबू व इतरत्रही फिरताना दिसतो. उदयास येत असलेल्या नकारात्मक घोषणा आपण पाहू शकतो, 'आपल्याला राजकारण नाही करायचे, ते नवे असो वा जुने.' किंवा अत्यंत संदिग्ध अशा सकारात्मक घोषणा, 'आपले आयुष्यच बदलून टाकू, आयुष्याची नवी रूपे निर्माण करू .'

हा राजकारणविरोधी कल भांडवली-संसदशाहीच्या राजवटीत नाहीशा झालेल्या राजकारणाचा अनियंत्रित परिणाम आहे. चळवळीला 'भांडवली हिताचे व्यवस्थापन' हे वाक्य बदलून 'आमच्या स्वतःच्या आयुष्याचे व्यवस्थापन' असे करायचे आहे, पण एका अर्थाने, राजकारण नाहीसे होणे याच गोष्टीकडे हेही अंतिमतः परत फिरते. एक सत्य आपण कायम लक्षात घेतले पाहिजे की राजकारण दडपण्याचे काम सर्वप्रथम आजचे प्रबळ जगच – म्हणजेच उदारमतवादी वर्चस्व – करत असते. विसाव्या शतकातील प्रस्थापित समाजवादी राजवटींनीदेखील अखेरीस हेच केले. माओच्या सांस्कृतिक क्रांतीचा अपवाद वगळता, स्टॅलिनपासून त्यांनी परिस्थितीचे निर्राजकीयकरण (depoliticisation) केले. आज ज्या तऱ्हेने परिस्थितीचे निर्राजकीयकरण केले जात आहे अगदी तसेच. सर्व सत्ता काही शासनसंस्थेच्या सत्तेवर केंद्रित केले आणि या सत्तेचे व्यवस्थापन आणि राजकारण यांत फरक ठेवला नाही. आणि समाजवादी देशांत शासनसंस्था ह्या अर्थव्यवस्थेच्या धनी असल्याने, आजच्या उदारमतवाद्यांप्रमाणे, ते इथवर गेले की ते राजकारणाची ओळख अर्थव्यस्थापनासोबत करू लागले. नेमक्या याच कारणामुळे समाजवादी देशांमध्येसुद्धा – विशेषतः १९३०च्या उत्तरार्धातल्या आणि त्यानंतरच्या सोव्हियत युनियनमध्ये – फक्त एक राजकारण होते, म्हणजेच राजकारण नव्हते. राजकारणाचा असा अभाव हे समाजवादी व पाश्चात्त्य संसदीय राज्यसंस्थेतील साम्य आहे, कारण त्यांनी राजकारणापेक्षा निर्राजकीय शासनसंस्थेच्या निर्देशाखाली अर्थव्यवस्थापनाला प्राधान्य दिले. समाजवादाखाली अनेक अटळ राजकीय अंतर्विरोध (contradictions) असल्याचे प्रत्यक्षात दाखवून माओने मात्र राजकारण राखण्याचा प्रयत्न केला. पण १९६०च्या शेवटाला हा प्रयत्नदेखील अयशस्वी झाला. तेव्हापासून फक्त एक राजकारण, आणि पर्यायाने राजकारणाचा अभाव जगभर राज्य करतो आहे. म्हणूनच जगभर आज राजकीय नास्तिक्यबुद्धीवादाचा वरचष्मा आहे.

परिणामी, आज खरी विरोधी भूमिका, खरा उठाव, 'आता राजकारण नको, राजकारणाबद्दल बडबड पुरे!' असे म्हणण्यात नक्कीच नाही. किंबहुना, आपण आपल्याला असे काम नेमून दिले पाहिजे जे पक्के याच्या अगदी उलट म्हणेल : अखेर राजकारण, अस्सल राजकारण! राजकारणाच्या बहुलतेसाठी एक पुनर्रचित अवकाश. लांबच्या पल्ल्याचे राजकारण, ज्याचे अस्तित्व भांडवली-संसदशाहीने व चीन, रशिया या समाजवादी राज्यसंस्थांनी पूर्णपणे रद्द केले होते! जिथे केवळ चळवळी कल्पनाशक्तीची लक्षणे असतात, तिथे फक्त राजकीय शोधच खऱ्या संघर्षमय जगाची पुनर्निर्मिती करू शकतो. आर्थिक सत्तेचा प्रत्यक्षात वापर करताना जो राजकारण-अभाव उद्भवतो, त्याला विरोध म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक आयुष्यातील राजकारण-अभावाला बढावा देण्याचा प्रयत्न करणे, या बनावट अंतर्विरोधापासून आपण दूर गेले पाहिजे. या अंतर्विरोधामध्ये अजिबात रुतून न जाता – अजिबात रुतून न राहता– आपण त्यापासून दूर गेले पाहिजे. आपल्याला संघर्षाच्या खऱ्या अवकाशाची, भांडवलशाहीविरुद्ध राजकारणाच्या, भांडवली-संसदशाहीविरुद्ध राजकारणाच्या अवकाशाची पुनर्स्थापना करावीच लागेल. याचाच मूलभूत अर्थ राजकारणाविरुद्ध राजकारण असाही होतो. जेव्हा उदारमतवादी राज्यसंस्थेच्या नकली राजकारणावर हल्ला होईल, तेव्हा आपले अस्तित्व वाचवण्यासाठी त्याला एखाद्या राजकीय विचारनिष्ठेचा (subjectivation) प्रस्ताव मांडावा लागेल. सध्या राजकीय नास्तिक्यबुद्धीवादामध्ये शांतपणे स्थिरस्थावर झाल्यामुळे त्या नकली राजकारणाला आज तसे करावे लागत नाही.

चळवळी म्हणजे स्वयंपूर्ण व नेमके राजकारण नाही, हे कोणत्याही परिस्थितीत सत्य आहे. चळवळी सुरू होतात आणि संपतात, त्यांमध्ये काही घोषवाक्यांचा समावेश शक्य आहे, पण शेवटी त्या केवळ एक ऐतिहासिक प्रहर असतात. अर्थातच अशा ऐतिहासिक प्रहरांशिवाय राजकारणाची पुनर्निर्मिती व नूतनीकरण शक्य नाही. इतिहासावर राजकारण कोरणे हे अशा स्थळ-काळात स्थित असलेल्या लोकचळवळींच्या कल्पनेशिवाय शक्य नाही, हेही तितकेच खरे. मी स्वतःदेखील तथाकथित 'अरब स्प्रिंग'सारख्या3 चळवळीचे स्वागत करतो, त्या 'इतिहास पुन्हा जागा झाला' असे सूचित करतात. पण 'इतिहास पुन्हा जागा झाला' याचा अर्थ 'राजकारण पुन्हा जागे झाले' असा होईल हे जरुरी नाही. लोकचळवळ ही कदाचित राजकारणाची पूर्वअट असू शकेल, पण पुन्हा नमूद करतो, की लोकचळवळ आपणहून राजकारण घडवत नाही. आजच्या ठोस उदाहरणांच्या आधारावर आपण असेही म्हणू शकतो की, ऐतिहासिक चळवळी या फक्त अपयशी होत नाहीत तर राजकारणाअभावी त्या पूर्णपणे उलटमार्गी फिरू शकतात.

महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठाल्या चौकांचे व इतर स्थळांचे लोकांनी घेतलेले ताबे ही काही ताजी उदाहरणे आहेत. हे आपण इजिप्त आणि ट्युनिशियामध्ये पाहिले. स्पेन, अमेरिका व ग्रीसमध्येसुद्धा पाहिले. काही महत्त्वाची ठिय्या आंदोलने हाँगकाँग आणि इस्तंबूलमध्येही झाली. खरे पाहता आपण हे अगदी जगभर पाहिले. न्यूई दबू चळवळीबरोबर आणि त्यानंतर आपण या इतर सर्व ठिय्या धरणाऱ्या चळवळी तोलून पाहू शकतो, आणि पाहिले पाहिजे. फ्रान्सच्या राजधानीत घडणाऱ्या चळवळीपेक्षा इतर चळवळी या साधारणपणे संख्येने, बळाने अधिक प्रबळ आणि प्रभावी ठरल्या आहेत. या उदाहरणांची यादी पुरेशी असल्याने आपण या चळवळींची वस्तुस्थिती अभ्यासू शकतो. 'गेल्या पाच वर्षातील ठिय्या-चळवळींची बलस्थाने आणि कमतरता' या शीर्षकाखाली हा अभ्यास आपल्या हिताचा होऊ शकतो. या चळवळींचे ऐतिहासिक स्वरूप आणि त्यांनी जागी केलेली सहानुभूती पुरेशी स्पष्ट आहे. पण नेमके काय घडले आहे याचे विश्लेषण आता आपल्याला शक्य आहे, ज्यात राजकारणाचाही समावेश होतो. आपण जे पाहू शकतो आणि निरपेक्षपणे म्हणू शकतो ते असे की, समग्रपणे विचार करता या चळवळी राजकीय परिस्थिती किंवा शासनसंस्थेची परिस्थिती बदलण्यास अपयशी ठरल्या आहेत. त्यांच्यातील ऐतिहासिक ऐवजाचा अभाव हे या अपयशामागचे कारण नाही, अशी भरही यात आपण घालू शकतो. त्या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक घटना होत्या. एकीचे, टिकाव (duration)4 निर्माण करण्याचे , अंतर्गत लोकशाहीचे विविधरूपी उल्लेखनीय प्रस्ताव त्यांनी मांडले. त्यांचे महत्त्व हे निर्विवाद होते.

या चळवळी नवीन राजकीय धोरणे व डावपेचांना जन्म न देऊ शकल्यामुळे त्यांचा शेवट हा पराभवाचा प्रहर होता. ज्याद्वारे जुन्या राज्यसंस्थेचे तीव्र स्वरूपात पुनरागमन झाले. आणि याचाच अर्थ राजकारण-अभावाचेही पुनरागमन झाले.

इजिप्तचे उदाहरण या बाबतीत धक्कादायक आहे. खरोखरीच, ही अनेक चळवळींमधील सगळ्यात गुंतागुंतीची चळवळ होती, आणि सामाजिक संघटनेच्या बाबतीत सर्वात खुली होती. केवळ तरुणांनी किंवा एका धर्माच्या अनुयायांनी वेढलेली ही चळवळ नव्हती, किंबहुना तिने आपली मुळे विविध सामाजिक आणि धार्मिक स्रोतांत शोधली. ती दृढ आणि टिकाऊ होती. किमान धोरणात्मक पातळीवरती तिने विजय संपादन केला असे आपण मानू शकतो. या चळवळीत कैरोमध्ये उपस्थित लोकांचे ऐक्य 'मुबारक, राजीनामा दे!' या घोषवाक्याने दृढ झाले, आणि त्याने राजीनामा दिला.

आता, जनरल अल् सीसी इजिप्तच्या अपरिवर्तित राज्यसंस्थेचा आणि उठावापूर्वीपेक्षा अधिक निर्राजकीय परिस्थितीचा प्रमुख कसा झाला? या प्रश्नावर आपण विचार करणे गरजेचे आहे. हा माणूस काही अंशी मुबारकसारखाच आहे आणि त्याचवेळी त्याहून थोडा अधिक वाईट. नुकत्याच घडलेल्या चळवळीच्या लक्षणीय वैशिष्ट्यानंतरही असे कसे होऊ शकले?

हे अगदी सहज घडले, कारण चळवळीत एकमात्र राजकीय बळ शिल्लक होते, 'मुस्लिम ब्रदरहुड'. जे केवळ ऐतिहासिक – म्हणजेच घटनोद्भव (evental) – नव्हते तर परिस्थितीशी रूढार्थाने व दीर्घकाळ संलग्न असलेले होते. आणि एकटे ब्रदरहुड या दूरून येणाऱ्या राजकारणाचे वाहक असल्याने, या ऐतिहासिक चळवळीच्या यशातून जी काही कमाई झाली ती ब्रदरहुडला मिळाली. शासनसंस्था व सत्तेच्या प्रश्नावर निर्णय गरजेचा असल्याने सर्वांनी त्यांचा मोर्चा 'लोकशाही मार्गा'ने निवडणुकीच्या दिशेला वळवला, विशेषतः लोकप्रिय आणि ग्रामीण प्रभागांमध्ये ब्रदरहुडला जोरदार बहुमत मिळाले. अर्थातच, आधुनिक तरुणाई आणि पाश्चात्त्य 'स्वातंत्र्या'साठी आतुर असलेला मध्यमवर्ग यांसारख्या चळवळीतील मोठ्या घटकांना ब्रदरहुडविषयी खास प्रेम नव्हते. स्वतंत्र राजकीय योजनेअभावी, या जनसागराने पुन्हा ऐक्याचे प्रदर्शन केले, पण यावेळी ते मुस्लिम ब्रदरहुडच्या सरकारविरुद्ध होते. अशा विरोधाभासग्रस्त जनसागरात लष्कराचा हस्तक्षेप होऊ शकला : जणू लष्कराला नुकत्याच घडलेल्या प्रदर्शनांचा 'संदेश समजला होता'. आधी ब्रदरहुड तोडून, मग जे काही चळवळसदृश आहे त्या सगळ्याची मोडतोड करत, निर्राजकीय राज्यसंस्थेच्या रूपाने हुकूमशाही पुनर्प्रस्थापित झाली.

चळवळीचे ऐतिहासिक एकत्रीकरण याचा अर्थ चळवळीचे राजकीय एकत्रीकरण नाही असा इजिप्शियन धडा आहे. याच कारणाने, राजकीय परिस्थितीचा टिकाऊमार्गी बदल, भले तो राज्यसंस्थाप्रणित कार्य करण्याचा मार्ग असला तरी, तो पुरेसा होत नाही आणि होणारही नाही. असे कशामुळे? आता याचे उत्तर इजिप्तमध्ये अगदी स्पष्ट आहे – जे आजच्या फ्रान्ससकट इतर सर्व ठिकाणी लागू होते. जर चळवळीचे राजकीय एकत्रीकरण होत नसेल (जे चळवळीअंतर्गत संघर्षाने होणारे तिचे विभाजन गृहीत धरते व मान्य करते) आणि चळवळीत जर फक्त ठोस ऐतिहासिक एकत्रीकरण किंवा, ज्याला आपण वर्तमानात प्रचलित असलेली सहानुभूती म्हणू ती असेल, तर एकीचे तयार होणारे दर्शनी रूप हे केवळ संकुचितपणे नकारार्थी असू शकते. अशाप्रकारे, जी चळवळ विशेषतः ऐतिहासिकदृष्ट्या संघटित होते, आणि राजकीयदृष्ट्या होत नाही, ती चळवळ तिच्या सगळ्या हेतू आणि उद्देशांसकट राजकीयदृष्ट्या विभागलेली असते. आणि चळवळीला हे विभाजन मान्य करायचे नसते. याउलट एकी आणि 'एकत्रितपणा' साजरा करायचा असतो. त्यामुळे ती चळवळ कोणत्याही सर्जक राजकीय चर्चांना वाचा फोडू शकत नाही आणि पर्यायाने फक्त नकारात्मक सिद्धांतांवरती एकसंमत होऊ शकते. म्हणजेच, जे लोक सकारात्मक राजकारणाचा शोध अपेक्षित असलेल्या राजकीय निर्मितीच्या मुद्द्यांवर एकत्र येत नाहीत, ते नक्कीच संमतीपत्रावर सही करू शकतात – पण या अटीवर की, हे संमतीपत्र त्यांच्या सामायिक शत्रूला निशाण्यावर ठेवून केलेल्या विधानांपुरते मर्यादित असेल, एवढेच. म्हणजे 'मुबारक, राजीनामा दे!' हे उत्तमच आहे, पण ज्या लोकांना मुबारकचा राजीनामा हवा होता, त्यांच्यात हे चित्र साकार करणे म्हणजे काय, याबद्दल शून्य साम्य होते. या नकारामागचा सकारात्मक आशय सामायिक नव्हता. चळवळीच्या धोरणसूचीमध्ये त्याची दखलदेखील नव्हती, कारण त्याने चौक ताब्यात घेण्याऱ्या उत्सवी एकीला तडा गेला असता. खऱ्या अर्थाने राजकारण फक्त तेव्हाच सुरू होते जेव्हा सकारात्मक एकत्रीकरण होते, आणि जे कधीच एकसंमत असू शकत नाही. तुमच्याकडे जेव्हा नकारार्थी एकी असते तेव्हा तुमच्याकडे प्रबळ ऐतिहासिक एकीदेखील असते; पण मग राज्यसंस्था, सामाजिक संघटन, मालमत्तेची व्यवस्था इत्यादी भविष्यातील प्रश्नांवर तुमचे विभाजन होत जाणार. आणि जाणिवेत अथवा नेणिवेत तुम्हाला हे माहीत असते. म्हणून चळवळ ज्यांना गुंतवू पाहते त्या विचारनिष्ठतांच्या5 (subjectivities) नकारात्मक भागांपुरती ती स्वतःला मर्यादित ठेवते. पण हा नकार केवळ लोकांचा मोर्चा एकत्र आणू शकणाऱ्या डावपेचापुरता राहतो, तो लोकांना केवळ चळवळीच्या कार्यरत क्षणापुरता एकत्र आणू शकतो. त्यापलीकडे तो शत्रू आहे - ज्याला सत्तेचा आणि एकमात्र राजकारणाचा – किंवा बिगर-राजकारणाचा – फायदा होतो असा शत्रू, जो चळवळीविरुद्ध प्रतिगामी मोर्चा नेण्यास सक्षम आहे असा शत्रू. फ्रान्समध्ये मे १९६८ वेळी देखील, जून मधल्या निवडणुकींनी प्रतिगामी शक्तींना जोरदार बहुमत दिले6.

दुसरे, पूर्णपणे वेगळे उदाहरण उद्धभवते ते म्हणजे, चळवळ जेव्हा अंतर्गत एकीच्या हव्यासापोटी (म्हणजे, तिच्या शक्तीच्या विभाजनाची किंमत मोजून तयार केलेल्या एकीकरणासाठी) राजकारण-अभावाकडे वापसी केलेल्या प्रतिनिधींना स्वीकारते. ग्रीस आणि स्पेनमध्ये हेच झाले. शेवटी सिरिझा आणि पोडेमॉस या फक्त संसदीय संघटनांपेक्षा अधिक काही नाहीत7. शरणागती पत्करून सिरिझाने हे आधीच शाबित केले आहे. आणि पोडेमॉसचा तर हाच उघड कार्यक्रम आहे : भांडवली-संसदशाहीच्या साधारण नियमांना कोणतेही आव्हान न देता, आधीच्या पक्षांपेक्षा राज्यसंस्थेचे व्यवस्थापन कमी वीट आणणारे व अधिक 'इमानी' मार्गाने जाणारे असावे, म्हणजेच एकमात्र राजकारण. मी यापूर्वीही सुचवले आहे की, स्पेनच्या इंदिग्नादोससारख्या लोकप्रिय चळवळी आपल्याला असे दर्शवतात की जुने, व भ्रष्ट सामाजिक-लोकशाहीवादी पक्ष हे इतके कमकुवत आणि तडजोडी केलेले आहेत की, इथे नवीन सामाजिक लोकशाहीची गरज आहे. आपल्याला थोडा जरी बळकट आणि भक्कम मागण्या असलेला संसदीय विरोध हवा असेल – जी भांडवली संसदीय एकमत राखण्याच्या दृष्टीने कदाचित वाईट गोष्ट नसेल – तर मग सिरिझा आणि पोडेमॉस यात उत्तम बसतात. त्या संघटना लोकचळवळींच्या ऐतिहासिक टेकू वरती उभ्या राहत असतानाच चळवळी नाहीशा झाल्या. पण शेवटी, याचा खऱ्या राजकीय सर्जनाशी काही संबंध नाही, संसदवादाच्या व विशेषतः अभूतपूर्व प्रमाणात 'डावी आघाडी' भ्रष्ट होण्याच्या – स्पेन, ग्रीस आणि काही प्रमाणात फ्रान्समध्येही असलेल्या – परिस्थितीत केलेली ही केवळ एक तडजोड अथवा सुधार आहे.

ताज्या चळवळींची व त्यांनी ताब्यात घेतलेल्या चौकांची उदाहरणे सांगताना आपण त्यांचा इतिहास आपल्याला राजकारण आणि इतिहास यांच्या नात्याबद्दल काय सुचवतो हे नीट लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पांघरलेली लोकशाहीची किंवा अति-लोकशाहीची चादर पाहता, आपण कदाचित अशी कल्पना करू की चळवळींची नकारात्मक एकी – ऐतिहासिक एकी – ही स्पष्ट राजकीय बदलाचे (rupture), राजकीय बदलाच्या आरंभाचे संघटन करण्यास पुरेशी ठरेल, पण ताज्या चळवळींचा आढावा असे दर्शवत नाही. खरे तर त्यांची ऐतिहासिकता ही सोज्वळ व सोप्या राजकारण-अभावावर येऊन अडखळते. त्यांचे एका स्वरूपाच्या अथवा वर्चस्व असलेल्या एकमात्र राजकारणाच्या खेळीत विघटन होणे याचा परिणाम म्हणजे, युरोपीय आणि जागतिक भांडवली अत्यल्पलोकसत्तेचे मोकाट वर्चस्व, अर्थात राजकारण अभाव.

बादियु चित्र

वरील आकृती अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी चौकट पुरवते, एक सार्वत्रिक नकाशा ज्यात आपण काय घडते आहे व त्याबद्दल काय म्हणले जाऊ शकते याचे मूल्यमापन करू शकतो. समकालीन जगाच्या परिस्थितीच्या विचारनिष्ठतेचे परिणाम, जे १९८० च्या दशकापासून टिकून आहेत, ते कोण्या एकाच अंतर्विरोधाच्या आधारावर समजून घेतले जाऊ शकत नाहीत, या गृहीतप्रमेयावर ही आकृती बेतलेली आहे. म्हणून, गुंतागुंतीच्या दोन परस्परव्यापी विरोधांना ही आकृती साधारण स्वरूपात सादर करते : आधुनिकता आणि पारंपारिक विश्व यांच्यातील पहिला विरोध (उभ्या अक्षावरील), आणि दुसरा, भांडवलशाही आणि कम्युनिझममधील विरोध. 'कम्युनिझम' हा शब्द जर तुम्हाला अजूनही अडचणींचा वाटत असेल, तर 'मुक्तीदायी राजकारण', 'नवीन राजकारण' या पर्यायी संज्ञा तुम्ही वापरू शकता, थोडक्यात, खाजगी मालमत्तेने समस्त मानवतेवरती लादलेल्या असमान, जाचक आणि निंदनीय व्यवस्थेच्या अंताची गरज जे जे सघन करते, ते ते सर्व काही यात येते. तर हे दोन अक्ष आहेत. जिथे दोन्ही अक्ष परस्परांस मिळतात, त्या केंद्रबिंदूमध्ये, मी ज्याला समकालीन विचारनिष्ठतेची संदिग्धता (ambivalence) म्हणेन, ती आकाराला येते. ती फक्त दोन निर्धारांकडे नाही तर चार निर्धारांमध्ये खेचली जात आहे. या चार निर्धारांच्या मिश्रणातूनच खऱ्या अर्थाने आपल्या समकालीनांशी नाते सांगणारी विचारनिष्ठता आकाराला येते. काय आहेत हे चार निर्धार?

सर्वप्रथम – मी ते इथे कोणत्याही अग्रक्रमाच्या उतरंडीत मांडत नाही – परंपरांचा अस्मिताकेंद्री (identitarian) हव्यास, जो अजूनही जिवंत आहे आणि जास्त प्रखर होत आहे. मी एक फ्रेंच उदाहरण घेतो, जे तुम्ही सहजपणे ग्रीक परस्थितीला लावू शकता : 'फ्रेंच असणे', 'फ्रान्सची मूल्ये', आणि या मूल्यांचा आदर न करणाऱ्या लोकांची आपल्या राष्ट्रातील उपस्थिती, ते 'परके परदेशी' ... हा अस्मिताकेंद्री घटक हे परंपरांचे कायमचे वैशिष्ट्य आहे. परंपरा म्हणजे संकल्प – संवर्धनाचा, पुनरुत्पादनाचा, पुनरावृत्तीचा. समकालीन परिस्थितीत अशी हजारो उदाहरणे तुम्हाला सापडतील.

दुसरा, आधुनिकतेचे आकर्षण. इथे आणि आपल्या देशामध्ये याचा अर्थ होतो क्रयवस्तू, पैसा, पर्यटन, चालीरीतींचे स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्था … हेसुद्धा समकालीन विचारनिष्ठेतेचे प्रखर घटक आहेत.

तिसरा, भांडवलशाहीशी असणारी प्रबळ निष्ठा, जी सामाजिक संघटनेचा हाच एकमेव मार्ग आहे असे म्हणते. ज्याला मी 'विचारनिष्ठित नैसर्गिक भांडवलशाही' (subjectively natural capitalism) असे म्हणेन. इतर काहीही शक्यच नाही असे सर्व रयतेला खात्रीने पटवण्यात यश मिळाल्याने हा त्यांचा दुसरा स्वभाव बनलेला आहे. या मुद्द्याचे महत्त्व आपण कमी लेखता कामा नये. आपण एकाचवेळी औपचारिकरीत्या भांडवलशाहीविरोधी, व इतर पर्याय अशक्य आहेत आणि आपल्याला भांडवलशाहीच्या चौकटीतच कार्यरत असावे लागेल अशी तीव्र खात्री पटलेले असे असू शकतो.

चौथा, मुक्ती, कम्युनिझम – किंवा कोणतेही अबाधित मूल्य जे तुम्हाला पसंत असेल – म्हणजे अशा गोष्टी ज्यांचा विचार केला आणि स्वप्ने पाहिली, पण ज्या शेवटी संपवण्यात आल्या, सरल्या, वारल्या.

या आकृतीत दिसणारा चौकोन माझ्या मते समकालीन विचारनिष्ठतांभोवती घुमत राहतो. परस्परसंयोगानुसार त्यांचा जोर बदलतो. अस्मिताकेंद्री हव्यास, आधुनिकतेचे आकर्षण, भांडवलशाहीचे असे आकलन जे तिला नैसर्गिक बनवते, आणि स्वप्नवत, इतिहासजमा झालेली मुक्ती – यांनी हा चौकोन तयार झालेला आहे. आणि अशाप्रकारे, यातील शेवटचा निर्धार अजूनही विचारनिष्ठता म्हणून दिसून येतो, म्हणजे 'हे जग योग्य नाही, गोष्टी वेगळ्या असायला हव्यात' असे म्हणणारे लोक. माझा असा विचार आहे की, हे निर्धार एकत्रित घेतल्यास ते आजच्या विचारनिष्ठतांचे प्रातिनिधिक एकीकरण करतात.

आकृतीभोवती आपण आता घड्याळाच्या उलट्या दिशेने जाऊ. सर्वप्रथम चौकोनाच्या बाहेरील (डाव्या) कडेला भांडवलशाहीने आधुनिकतेच्या इच्छेबाबतीत साधलेली मक्तेदारी आढळते. हा मुद्दा आज अत्यंत महत्त्वाचा आहे की आजमितीस शोध, बदल, स्वातंत्र्य, नवीन स्वातंत्र्य, नवीन चालीरिती इत्यादींसाठी, भांडवलशाही स्वतःला समकालीन आधुनिकतेचा एकमेव शक्य आधार अशी सादर करण्यास सक्षम आहे. स्वतःला आधुनिकतेचा एकमेव वाहक म्हणून सादर करणे हेच भांडवलशाहीचे व्यापक मूलतत्त्व आहे. आणि त्या कारणास्तव भांडवलशाहीकडून आधुनिकतेकडे जाणारा एक अक्ष दिसतो, ज्याला मी 'पश्चिम' (the West) असे संबोधतो, आणि ही मार्गाभिमुखता (orientation) म्हणजेच पश्चिमेसाठीची इच्छा (desire for the West). वस्तुतः, ही अशी इच्छा आहे जी कोठे तरी भांडवलशाही आणि आधुनिकतेचे संधान बांधते, ही अशी इच्छा आहे जी आधुनिकतेला भांडवलशाहीचा सगळ्यात मोठा साथीदार बनवते, आणि असा आदेश जारी करते की या साथीदारीशिवाय भीषण पारंपारिक अस्मिता बळावतील.

ही पहिली बाजू. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाणे सुरू ठेवले, तर भांडवलशाही आणि परंपरा यातील अक्ष दिसतो. जो भांडवलशाहीला अस्मिताकेंद्री, धार्मिक, राष्ट्रीय, कुटुंब-केंद्रित आणि अशा इतर धाग्यांबरोबर परस्परसंबंध जोडण्याच्या लक्षणीय प्रलोभनांच्या अस्तित्वाकडे सूचित करतो. याला मी फॅसिझम म्हणतो. भांडवलशाही आणि आधुनिकता यांतील परस्परसंबधाऐवजी भांडवलशाही आणि परंपरा यांच्यातील वरकरणी विरोधाभासी परस्परसंबंध ही फॅसिझमची साधीसोपी आणि नेमकी व्याख्या आहे.

इतिहासात या दोन्हीमध्ये संघर्ष झालेला असला तरी, ऐतिहासिक भांडवलशाहीने फॅसिझमला कायमच सहन केलेले आहे. भांडवलशाही जशी अस्तित्वात आली तशी ती कायमच पूर्णपणे हुकूमशाही आणि अत्याचारी राज्यसंस्थांच्या सेवेत राहत आलेली आहे आणि अजूनही त्यांच्या सेवेत आहे. जेव्हा तिला खासकरून कोण्या इतर गोष्टीपासून धोका असतो, तेव्हा ती स्वतःला या नात्याशी जुळवून घेते. या कारणाने, जरी फॅसिझम हा उदारमतवादी लोकशाहीचा दर्शनी शत्रू असला, तरी त्याच वेळी उदारमतवादी लोकशाही तिची शुद्ध आर्थिक पार्श्वभूमी ही फॅसिझमसमान आहे हे ओळखू शकते. म्हणून, फॅसिझम आणि लोकशाही यांच्यातील अंतर्विरोध हा ऐतिहासिकदृष्ट्या कम्युनिझम आणि फॅसिझम या विधायक विरोध-संबंधापेक्षा कमी महत्त्वाचा आहे.

घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने पुढे जाता, परंपरा आणि कम्युनिझम यांच्यातील परस्परसंबंध दर्शवणारा विशेष अक्ष मी सुचवतो, जो समाजवादी राज्यसंस्थांचे रूप धारण करतो. या राज्यसंस्था आणि त्यांच्यासोबत ओळखल्या जाणाऱ्या कम्युनिस्ट पार्ट्या यांनी भांडवलशाहीविरहित सत्तेला स्थैर्याचे आश्वासन दिले. त्यांनी नक्कीच खाजगी मालमत्तेची मक्तेदारी मोडली, पण त्यांनी स्वतःची आधुनिकता वगळता बाकी सर्व आधुनिकतेवर पद्धतशीर अविश्वास दाखवून स्वतःच्या आधुनिकतेला अंशतः जोपासले. तरीही ती एक – आणि मला या मुद्द्यावर जोर द्यायला आवडेल – आधुनिक निर्मिती होती. खाजगी मालमत्तेची मक्तेदारी तोडणे हे इतिहासात हजारो वर्षांत दिसले नव्हते. जे या – रशिया, चीन – देशांमध्ये घडले तो एक अभूतपूर्व ऐतिहासिक बदल होता, कारण हजारो वर्षे प्रत्येक सामाजिक संघटनेचे रूप हे खाजगी मालमत्तेच्या मक्तेदारीवर आणि तिच्या मालकवर्गाच्या रचनेवर विसावलेले होते, हा वर्ग राज्यसंस्थेचा नैसर्गिक सत्ताधारी वर्ग होता.

ह्या अभूतपूर्व परिवर्तनाने जगभर सामाजिक संघटनेची बेटं निर्माण केली, जिथं खाजगी मालमत्ता आणि भांडवलशाही हे 'नैसर्गिक' समजले जात नव्हते. वास्तविक पाहता, लोकमत आणि विचारनिष्ठतेच्या बाबतीत ही बेटं बऱ्याच अंशी परंपरेशी बांधील राहिली, विशेषतः त्यांच्या भांडवलशाही आणि आधुनिकतेच्या परस्परसंबंधाबाबत असलेल्या अविश्वासामुळे. कम्युनिस्ट पार्ट्यांनी गर्भपात कायदेशीर करण्याविषयी उघड वैर, याचबरोबर समलैंगिकतेबद्दल सर्वदूर पसरलेली अनाठायी भीती (homophobia) बराच काळ बाळगली आणि आकारिक रूढीवादाला (formal conservatism) झाकण्यासाठी समाजवादी वास्तववादाचा वापर केला8. कुटुंबे जोपासली आणि त्यांना बढावा दिला, शेवटी राष्ट्रीय अस्मितेची वापसी झाली … लुई आरागॉं एकदा म्हणाले होते, 'माझ्या पार्टीने मला फ्रान्सचे रंग परत मिळवून दिले'; छान ओळ आहे, पण काही बाबतीत त्याचवेळी वर्णद्वेषी प्रवृत्तीदेखील उपस्थित असल्याचा संशय आपण घेऊ शकतो. यहुदी-विरोधाचे (anti-Semitism) आणि दबलेल्या लोकांबद्दल वसाहती तिरस्काराचे अंशही त्यांच्यात होते. या सगळ्यांमुळे समाजवादी राज्यसंस्था पारंपरिक व्यासपीठाशी बांधील राहिल्या, ज्याने त्यांचे एक नवीन आधुनिकता पसरवण्यापासून प्रतिबंधन केले. अशी एक आधुनिकता जी भांडवलशाहीबरोबर स्पर्धा करेल, केवळ पद्धती, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या शोधांबाबतच नाही तर, अगदी सामान्यतः जगाबद्दलची दृष्टी देऊ करेल, विचारनिष्ठतांची बांधणी करेल, मूल्यांची अशी रचना करेल जी आधुनिकच असेल पण भिन्न असेल. कम्युनिझमने स्वातंत्र्याची अशी नेमकी व्याख्या करायला हवी होती, जी भांडवलशाहीच्या 'उदारमतवाद' या शिक्क्याखाली देऊ केलेल्या व्याख्येबरोबर प्रतिस्पर्धी होण्यास सक्षम झाली असती.

पण कम्युनिझमने तसे केले नाही आणि आज उदारमतवादी आधुनिकतेने (मी ज्याला पश्चिमेसाठीची इच्छा म्हणतो अशा) आसक्तीला जगभर बढावा दिला. हे ऐतिहासिक कम्युनिझमच्या अपयशामागच्या अनेक मोठ्या कारणांपैकी एक आहे. या कारणान्वये राज्यसंस्थेच्या प्रामुख्याचा पुनर्शोध लावण्यात आला, यामागे अशी धारणा होती की राज्यसंस्थेला मिळालेल्या लाभांचे संरक्षण करण्यासाठी – राजसंस्थेच्या सामूहिक मालमत्तेचे, भांडवलशाहीविरुद्धच्या भौतिक आणि आकारिक घटकांचे संरक्षण करण्यासाठी – समाजाचे निर्राजकीयकरण करण्यास सक्षम असणारी निरंकुश राज्यसंस्था आवश्यक होती. त्यासाठी स्टॅलिनवादाची आणि ज्यातून कोणत्याही विचारनिष्ठ राजकारणाची अभिव्यक्ती वजा करता येईल अशा राज्यसंस्थेच्या निरपेक्ष सर्वोच्चतेची आवश्यकता होती. कुठल्याही अस्सल नव्या आधुनिकतेच्या अभावामुळे पारंपारिक तुकड्यांचे पुनर्संघटन करणे त्यासाठी आवश्यक होते. अत्यंत सक्रियपणे या नव्या आधुनिकतेचा शोध १९२०च्या यू एस एस आर मध्ये घेण्यात येत होता. यू एस एस आर मधील सर्व प्रकारच्या शोधांच्या आणि अस्सल नव्या कम्युनिस्ट प्रस्तावांच्या दृष्टीने ही काही वर्षे महान होती. पण त्याचवेळी स्टॅलिनवादाने त्याची पकड आवळली. स्टॅलिनवाद हा एकाचवेळी राज्यसंस्थावादी, राजकारणविरोधी आणि अंतिमतः, विचारनिष्ठतेच्या बाबतीत परंपरावादी होता.

या कारणास्तव, आकृतीची चौथी बाजू ही बिंदूंनी बनलेली रेषा आहे. जी नवीन राजकीय सत्याच्या शोधाने जोडली गेली पाहिजे – एक दिवस तसे होईल – जे सत्य एकाच वेळी भांडवलशाही आणि कम्युनिझम या प्रमुख अंतर्विरोधाला सामोरे जाताना, दुसऱ्या बाजूला नव्या आधुनिकतेचे संघटन आणि विस्तार करेल.

शेवटी याच्यासाठी आपण काम केले पाहिजे : एकाच वेळी एक अशी गोष्ट जे नवे राजकारण असेल, ज्याची छाप ऐतिहासिक लोक-संघटनांवर आणि शोधांवर पाडता येईल, आणि एक अशीही गोष्ट जी नव्या, स्पर्धेत असणाऱ्या आधुनिकतेला अस्तित्वात आणेल. सगळ्यानंतर – हे थोडे हिंसकपणे म्हणायचे झाल्यास – आज आपल्याला पश्चिमेसाठीच्या इच्छेचा पगडा मोडावा लागेल. जोवर ही इच्छा जागतिक पातळीवर कार्यरत राहील, ज्यात जागतिक भांडवलशाहीच्या बळींचाही समावेश आहे, तोवर या बळींचा प्रचंड जथ्था आधुनिकतेचे प्रतीक बनलेल्या पश्चिमेत आसरा शोधत राहील, पण कोणत्या किमतीवर!

कोणत्याही परिस्थितीत आपण एक असा आकडा लक्षात ठेवूया, जो आजच्या जगाची खरी परिस्थिती सांगतो. ताज्या आकडेवारीमुळे हे शक्य आहे. आज २६४ लोकांकडे एवढी मालमत्ता आहे, जेवढी सुमारे तीन अब्ज लोकांकडे आहे. असे आकडे हे ऐतिहासिकदृष्ट्या अभूतपूर्व आहेत. कोणतीही बेलगाम राजेशाही अशा तफावतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेली नाही. आपण हे जणू काही नैसर्गिकच आहे अशा अर्थाने मान्य करू शकतो … पण तरीसुद्धा! जगाची अर्थव्यवस्था कार्यरत ठेवण्याकरिता हे पूर्णपणे आवश्यक आहे का, याविषयी आपल्याला शंका असूही शकते. ते कसेही असो, हे राक्षसी आहे. आणि याला येणाऱ्या उदासीन प्रतिक्रिया पाहून मी कधी कधी आश्चर्यचकित होतो. कम्युनिस्ट गृहीतप्रमेयाच्या तात्पुरत्या नाहीशा होण्याची आपण ही किंमत मोजत आहोत. ही उदासीनता कशामुळे? कारण शेवटी लोक असा विचार करतात, 'बरं, हो, जे आहे ते काही थोर नाही, पण त्याच वेळी ही माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याची पूर्वअट आहे, ज्यामुळे माझे फार काही वाईट चालू नाहीये, आणि शेवटी जरी तसे असले तरी इतरत्र गोष्टी अजून वाईट आहेत.' इतरत्र गोष्टी वाईट असल्याने आपल्याला असे म्हणावे लागेल की, जे लोक 'तिथे' आहेत त्यांना 'इथे' यायचे आहे. कारण, निर्वासितांचा प्रश्न हा एका मोठ्या भानगडीतील केवळ एक प्रकरण आहे - एक असे प्रकरण ज्याच्या संदर्भात पश्चिमेसाठीची इच्छा जगभर कार्यरत राहते. आणि ५० टक्के लोकांकडे काहीच नसल्याकारणाने असे होते. आज २६४ लोक असे आहेत ज्यांच्याकडे जवळपास सर्वकाही आहे, आणि ५० टक्के लोक असे आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही. सामान्यतः आपण ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांना दोषी ठरवतो (ते जोमाने काम करत नाहीत, ते अजून इतिहासाच्या आगगाडीत चढलेले नाहीत, त्यांनी तसे करायला हवे.) पण असा क्षण त्यांच्या आयुष्यात कायम येतो, जेव्हा नेमक्या आणि ठोस कारणांमुळे – कदाचित कुटुंब आणि मुलंबाळं असल्याने – जिकडे इच्छा घेऊन जाते त्या दिशेने ते निघतात, युरोपात किंवा अमेरिकेत. आणि ते तिथे पोहचतात, जिथे दारातच सशस्त्र पलटणीबरोबर नागरी युद्धे चालू असतात, सर्वत्र छळ चालू असतो आणि बाजारांवर बाँब पडत असतात, हा संचार (movement) केवळ वाढतच जातो. पण हा एक संरचनात्मक संचार आहे. आफ्रिकी वंशाचे कामगार फ्रान्समध्ये आणि तुर्की वंशाचे कामगार जर्मनीमध्ये दशकानुदशके येत आहेत, हे आपल्याला माहीत आहे; ही केवळ गेल्या एक दोन वर्षांतली बाब नाही. जर आज फ्रान्समध्ये सहा दशलक्ष मुस्लिम आहेत, तर याचे कारण ते कामगार इथे पोहचले होते, हे आहे. असे नाही की आपल्याकडे उत्स्फूर्तपणे मुस्लिम तयार झाले! पश्चिमेसाठीच्या इच्छेच्या कथनाला आणि दबावाला बळी पडत ते तग धरण्यासाठी इथे आले; कारण आपण त्यांना असे सांगितले होते की, उत्पादक समाजाचे नैसर्गिक मूलतत्त्व कोणालाही इथेच सापडू शकते.

ही आकृती वरील सर्व दर्शविते आणि काही इतर गोष्टी सुद्धा :

– तिला ऐतिहासिक मूल्य आहे. ती स्पष्टपणे आधीचे टप्पे समजावते. उदाहणार्थ, दुसऱ्या महायुद्धाने पाश्चात्त्य उदारमतवादी आणि समाजवादी राज्यसंस्थांची फॅसिझम विरोधातील युती पाहिली, हे ती दर्शवते. त्यानंतर लगेचच आलेले शीतयुद्ध हे उदारमतवादी पश्चिम आणि समाजवादी राज्यसंस्था यातील अंतर्विरोधाची वाढ असल्याचे ती दर्शवते.

– तिला भाकीतीय मूल्य देखील आहे. सद्यकालीन परिस्थितीत पाश्चात्त्य किंवा उदारमतवादी स्वरूपाची जागतिक भांडवलशाही आणि फॅसिझमच्या सद्यकालीन स्वरूपांमध्ये सहज युती असू शकते, असे ती दर्शवते. सर्वात महत्त्वाचे, ती असेही दर्शवते की या ना त्या प्रकारे आपण जर चौरसाची चौथी बाजू भरीव अर्थाने रचू शकलो नाही – म्हणजेच, आपण पश्चिमेसाठीच्या इच्छेशी स्पर्धा करू शकणारी अजून एक इच्छा निर्माण करू शकलो नाही किंवा असे राजकारण निर्माण करू शकलो नाही, ज्याची अभिव्यक्त नियती जागतिक भांडवलशाहीचा अंत करणारी असेल – तर ही चौथी बाजू निकामी ठरेल आणि अस्तित्वात येणार नाही. याचाच अर्थ पृथ्वीभर तीव्र लक्षणे असणाऱ्या विकृतीची (pathology) प्रस्थापना. दाट शक्यता अशी की तिसरे महायुद्ध होईल.

– नवीन कम्युनिस्ट राजकारणासमोरची तीन मोठी आव्हाने ती दर्शवते. पहिले, जागतिक भांडवलशाहीबरोबर प्रमुख अंतर्विरोध टिकवून ठेवणे. याचाच अर्थ असा की प्रमुख डावपेचात्मक शत्रू – ज्याच्या या ग्रहावरील वर्चस्वाला आव्हान द्यायलाच हवे – तो म्हणजे भांडवलशाही, ही भूमिका सातत्याने सर्व प्रसंगांत टिकवून ठेवणे. म्हणजेच भांडवली अत्यल्पलोकसत्तेविरुद्ध, शोषणाविरुद्ध, आणि समतेसाठी कम्युनिझमच्या मुलभूत कार्यक्रमाचा प्रस्ताव कठोरपणे मांडणे. दुसरे, समाजवादी राज्यसंस्थेच्या कालखंडाचे टीकात्मक मूल्यमापन करणे. स्टॅलिनवादाची कारणे स्पष्ट करणे. कम्युनिस्ट विचार10 (idea) आणि उतरती कळा लागलेल्या त्याच्या मरणोन्मुख स्वरूपांना वेगळे काढणे. केवळ राज्यसत्तेच्या कारभारात कम्युनिस्ट राजकारण गुंतले तर त्याचा लगेच अंत होतो हे दाखवून देणे. तिसरे, फॅसिझमविरुद्धच्या लढाईत पुढाकार घेणे, जे युरोपात कम्युनिस्टांनी दुसऱ्या महायुद्धावेळी केले.

या शेवटच्या मुद्द्याबाबत, आज आपण दोन त्रासदायक लक्षणे बघू शकतो. पहिले, वेगाने आणि मोठ्या प्रमााणावर डोके वर काढू लागलेल्या फॅसिस्ट शक्ती — मध्यपूर्व आशियामध्ये, पुष्कळ माजी कम्युनिस्ट राज्यसंस्थांमध्ये, तसेच वरवर पाहता अधिक 'समंजस' वाटणाऱ्या पश्चिम युरोपच्या राज्यसंस्थांमध्येदेखील. आणि दुसरे लक्षण म्हणजे, प्रचंड प्रमाणात स्थलांतरात झालेली वाढ. लोक ज्या जागी आता राहू शकत नाहीत त्या जागा सोडून, ज्या जागी त्यांना राहणे शक्य आहे असे सांगण्यात आले आहे, अशा जागी वाट्टेल त्या मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे हळूहळू युद्धाची परिस्थिती निर्माण करते.

आपल्याला या ऐतिहासिक चक्रीवादळादरम्यान स्वतःला स्थित करावे लागेल. म्हणून मला प्रामाणिकपणे चळवळी — त्या कुठल्याही असल्या तरी — चांगल्या गोष्टी असतात असे वाटते. या सगळ्यासकट, चळवळ ही कायमच वर्तमान परिस्थितीबाबत चिंता किंवा असंतोष व्यक्त करते. पण तिच्यात किमान पातळीवरचे दृढ ऐक्य हे कार्यरत असायला हवे — या ग्रहाच्या पातळीवरचे दृढ ऐक्य! फक्त इतरत्र कुठेतरी जाण्यासाठी, बुडण्याची दाट शक्यता असताना डळमळीत जहाजात चढण्यास तयार असलेल्या लोकांपासून आपल्या अडचणी अजून फारच दूरच्या आहेत.

म्हणून आपल्याला त्यांचा विचार करावाच लागेल. आपल्याला त्यांचा विचार करावा लागेल कारण आपल्या स्वतःबाबत विचार करण्याचा तो न्याय्य मार्ग आहे. जर आपण तसे केले नाही तर एका सार्वत्रिक प्राणघातक असमानतेच्या विकृतीत गुंतण्यापुरते आपण मर्यादित राहू.

मला हे माहीत आहे की ग्रीक लोकांनी — ज्यांचे स्वतःचे दुःख लक्षणीय आहे – बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात विस्थापितांचे प्रेमळ आणि परिणामकारक स्वागत केले आहे. हे अगदीच प्रशंसनीय आहे. या बाबतीत तुम्ही फ्रान्ससारख्या देशाची लाज काढता. गरीब लोकांनी इतर जास्त गरीब असलेल्या आणि मृत्यूशी झगडत असलेल्या लोकांच्या घेतलेल्या काळजीला सलाम करूयात. ही संवेदनेची आणि कृतीची वैश्विकता नवीन राजकारण शांतपणे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने चांगला मार्ग आहे.

हे सत्य उरतेच, की चळवळीला डावपेचासंबंधीच्या विचाराची (idea) नक्कीच गरज असते, जो प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींचे मूल्यमापन करण्यास मदत करतो आणि हेच कोणत्याही विचाराचे उद्दिष्ट असते. याचाच अर्थ, प्रत्यक्षात जे घडते ते, आपण ज्याला डावपेचाचा विचार म्हणत आहोत त्याच्या समोर आव्हान उभे करते की त्याला पुष्टी देते, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला चळवळ हवीच आहे, पण आपल्याला अधि-चळवळीचा (meta-movement) विचारही हवा आहे; म्हणजेच, चळवळी अंतर्गत केलेला विचार, जो ती काय आहे याचा ऐतिहासिकदृष्ट्या निर्णय घेऊ देतो. चळवळीचा फक्त स्वतःचा विचार असणे पुरेसे नाही; आपल्याकडे त्या विचारांबद्दलचे विचार असायला हवेत. आपण वर्णन केलेल्या परिस्थितीमध्ये चळवळीच्या जागेची ओळख, तिची उद्दिष्टे आणि तिची नकारात्मक प्रलोभने यांना स्थित करण्याची क्षमता कार्यकर्त्यांकडे असायला हवी. हा डावपेचाचा विचार आपण चार चिरकालीन (classic) तत्त्वात्मक मुद्द्यांकडे परत वळवू शकतो असे मला वाटते. हे मुद्दे भविष्याकरीता केवळ आशेच्या वस्तू (objects of hope) घडवत नाहीत तर निर्णयाचे वाहक तयार करतात. या चार मुद्द्यांनी आपले विचार आणि कृतींचे खऱ्या अर्थाचे मूल्यमापन करण्यात मदत केलीच पाहिजे. तर इथे मी त्या चार शक्यता चार मुद्द्यांच्या स्वरूपात फक्त नमूद करतो.

इथे आपण पुन्हा एका सूत्रवाक्याकडे येतो जे मी नेहमीच या ना त्या स्वरूपात विस्ताराने मांडले केले आहे; ते असे की, खरे राजकारण हे कायमच असे राजकारण असते जे काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे याचा निर्णय स्वतःच घेते, ते शत्रूशी या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारच्या एकमतात सामील होणे फेटाळते. सरतेशेवटी, तुम्हाला चांगलेच माहीत असेल की वर्चस्व हे 'काय शक्य आहे' आणि 'काय अशक्य आहे' यासंबंधीच्या निर्णयाने आणि लोकांना गोष्टी खरोखरच अशा आहेत, हे पटवून देण्याने बनते.

याचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे, 'फक्त भांडवलशाही हीच शक्यता आहे, तुम्ही कम्युनिझम पाहिला, तुम्ही स्टॅलिन पाहिला, तुम्ही छळछावण्या पाहिल्या…' हा दावा. भांडवलशाही ही आत्ता आणि कायमच आधुनिक समाजाचे नैसर्गिक स्वरूप असते अशी कल्पना हा प्रचार स्थापित करू पाहतो. शक्य आणि अशक्यातील भेद करणे जेव्हा आपण सुरू करतो, शत्रूच्या संमतीने ते करणे जेव्हा आपण बंद करतो, त्या घडीपासून राजकारण सुरू होते. याचाच अर्थ, आपला शत्रू जे नियम लादण्याचा प्रयत्न करतो त्यांनुसार शक्य आणि अशक्याचे मूल्यमापन आम्ही करत नाही हे जाहीर करणे. शत्रूपासून मुक्त होण्याची ही बिनशर्त मूलभूत कृती आहे. आपली शक्य-अशक्येतची धारणा निम्मी पृथ्वी ताब्यात ठेवणाऱ्या २६४ व्यक्तींसारखी नाही. नाही, आपल्यात हे सामायिक नाही. कारण त्यांना असे वाटते की ते स्वतःच एक शक्यता आहेत. ते इतके सात्विक आहेत की त्यांच्यासाठी निश्चित असा मतप्रचारसुद्धा केला जातो, जो आपल्याला असे सांगतो की ते 'नोकरी निर्माते' आहेत… धन्यवाद महोदय! कदाचित, आपले अशा प्रकारच्या नोकरी निर्मात्यांशिवायही जमेल. नोकऱ्या तयार करण्याकरीता तुम्हाला ज्यांच्याकडे नोकरी नाही आणि काहीच नाही अशा तीन अब्ज लोकांएवढी मालमत्ता जमवण्यापासून जर सुरुवात करावी लागत असेल तर नक्कीच काहीतरी विरोधाभास आहे.

तर, चार शक्यतांविषयी. या शक्यतांना आपण खऱ्या चळवळीत, संघर्षात कसोटीस लावू शकतो, जे घडते आहे त्याआधारे या शक्यता जिवंत आहेत की नाहीत हे तपासून पाहू शकतो. ते मूल्यमापनाचे निकष आहेत.

१. खाजगी मालमत्ता आणि नफा यांच्याव्यतिरिक्त इतर गोष्टींभोवती सामूहिक आयुष्य संघटित करणे शक्य आहे. मार्क्सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मधील निर्णायक विधानाकडे आपल्याला परत जावे लागेल, जिथे तो एकाएकी जाहीर करतो की त्याच्या सगळ्या म्हणण्याचे सार एका मुद्द्यात काढता येऊ शकते : खाजगी मालमत्तेचे संपूर्ण निर्मूलन. या विचाराची हजेरी इतिहासात कायमच सर्वत्र होती. तो आपल्याला काही प्रमाणात प्लेटोमध्येही दिसतो आणि खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकातील सर्व मुक्तीदायी राजकारणाला त्याने प्रेरित केले. आज मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात विसर पडलेला आहे. पण आपल्याला शक्य ती किंमत मोजून त्याचे पुनरुज्जीवन करावे लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, भांडवलशाही हा इतिहासाचा अंत नाही आणि तिने तसे असणे जरुरी नाही. त्याच्यानंतर, मूल्यमापन कसे करायचे, कशाचे करायचे इत्यादी प्रश्न हा एक वेगळा विषय आहे.

२. विशेषज्ञता आणि श्रमाचे विभाजन यांच्याव्यतिरिक्त इतर गोष्टींभोवती उत्पादन संघटित करणे शक्य आहे. विशेषतः, वैचारिक श्रम आणि शारीरिक श्रम किंवा व्यवस्थापनाची कामे आणि अमलात आणण्याची कामे यांच्यातील भेद टिकवून ठेवण्याचे कारण नाही. मार्क्स ज्याला बहुरूपी श्रमिक (polymorph worker) म्हणतो अशा श्रमिकांच्या युगात प्रवेश करणे अशक्य आहे, असे अगोदरच निर्धारित करता येणार नाही. एक आफ्रिकन एकीकडे रस्त्यात खड्डे खणतो आणि त्याचवेळी एक वेगळा गोरा माणूस रोजंदारी करणाऱ्यांना आदेश देतो, हे निश्चितपणे विवेकी आहे असे मानण्याचे काही कारण नाही.

३. राष्ट्र, भाषा, धर्म आणि चालीरीती अशा बंदिस्त अस्मिताकेंद्री एककांव्यतिरिक्त इतर आधारांवर सामूहिक आयुष्य संघटित करणे शक्य आहे. राजकारण हे विशेषतः सर्व मानवतेला या संदर्भ-बिंदूंपलीकडे एकत्र आणण्यास सक्षम असते. हे सर्व भेद अस्तित्वात असू शकतात आणि असावेत. ते रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही, उदाहरणार्थ, सर्वानी एकच भाषा बोलली पाहिजे वगैरे. भेद हे अस्तित्वात असू शकतात आणि असावेत, पण ते राजकारणाच्या पातळीवरील सर्व मानवतेला एकत्र करणारे, खरोखर उत्पादनक्षम मार्गाचे असावेत. आणि या दृष्टिकोनातून भविष्य हे सर्वतोपरी आंतरराष्ट्रीयवादाचे आहे. राष्ट्रीय अस्मितांना भेदून जाणाऱ्या मार्गाचे राजकारण अस्तित्वात असू शकते, आणि असावे यावर आपण ठाम राहिले पाहिजे. परत सांगतो, ते भेद अस्तित्वात असूच नयेत असे म्हणण्याची ही बाब नाही, पण त्यांनी भेदाची तत्त्वे स्थापित करण्याऐवजी सह-अस्तित्वात असले पाहिजे.

४. राज्यसंस्था – जिची हिंसेवरती, पोलिसांवरती, आणि लष्करावरती स्वतंत्र मक्तेदारी असते – क्रमाक्रमाने नाहीशी करणे शक्य आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, माणसांचे मुक्त मैत्र (free associations) आणि त्यांच्यातील सामायिक विवेक, हे कायदा आणि जुलूम यांची जागा घेऊ शकतात आणि त्यांनी ती घेतली पाहिजे.

थोडक्यात, नेमक्या अर्थाने पाहिल्यास ही चार तत्त्वे एक कृती कार्यक्रम नाहीत. काय घडते आहे याचे मूल्यमापन करण्यासाठीची ती तत्त्वे आहेत, ती आपल्याला पुढील प्रश्नाचे उत्तर देऊ करतात : जे इथे घडते आहे ते या चारपैकी कोणत्याही एका मुद्द्याशी संलग्न आहे का? असल्यास कोणत्या मुद्द्याशी आणि कुठल्या परिस्थितीत? आणि जर यातले कोणतेच मुद्दे कुठल्याच मार्गाने परिस्थितीस लागू होत नसतील, तर मग आपण असा निर्णय घेऊ की, जे घडते आहे ते नवीन राजकारणाच्या निर्मितीसाठी गरजेचे असणाऱ्या सर्वसामान्य डावपेचाच्या दिशेला जाणारे नाही.

ऐतिहासिकता (historicity) जर नवीन राजकारणाच्या वाढीचे कारण होत नसेल, तर मी त्याची व्याख्या या चार मूलभूत तत्त्वांच्या चलनशीलतेच्या (mobility) संदर्भात करेन; वास्तविकपणे ही तत्त्वे विचारनिष्ठतेत, प्रसंगात मुक्तपणेच वावरली पाहिजेत, आणि आपण कायमच याचे मूल्यमापन करू शकतो की यातील कोणत्या मुद्द्यांवर जोर दिला पाहिजे. या भिन्न मुद्द्यांमधील परस्परसंबंधाची, आणि सक्रिय विचारनिष्ठतांमध्ये त्या मुद्द्यांचा असणारा सर्वसामान्य संचार याची काळजी सर्व प्रसंगात घेतली पाहिजे. या मुद्द्यांची चलनशीलता आणि मूल्यमापनाची हत्यारे म्हणून असलेले त्यांचे अस्तित्व हे नवीन राजकारणाची पात्रता ठरवते. त्यामुळेच जिथे जिथे लोकप्रिय आणि नवीन स्वरूपाच्या संघटना असतील तिथे तिथे हे मुद्दे मांडणे आवश्यक आहे.

पायाभूतपणे या चार मुद्द्यांच्या मूर्त अभिसरणाचे सघनीकरण कुठे होईल? घोषवाक्यांमध्ये. अंतिमतः घोषणा चळवळींचे प्रतिनिधित्व करतात, आणि जर ती खरेच मुक्तिदायी राजकारणाची घोषणा असेल, तर मग तोच या चार मुद्द्यांच्या सघनीकरणाचा बिंदू असेल. संकुचित अर्थाने नकारार्थी घोषणांच्या पार जाणे सर्वात महत्त्वाचे आहे. या सगळ्यानंतर मी पुन्हा सांगतो, नकारार्थी घोषणा या चार धोरणात्मक मुद्द्यांचे – जे भांडवलशाहीपासून मुक्तीच्या राजकारणासाठी अत्यावश्यक आहेत – अभिसरण करू शकत नाहीत. सर्व गोष्टी लक्षात घेता, चळवळ तिच्या मूर्त परिस्थितीतील होकारार्थी प्रस्तावानुसार कायम पारखली जाईल.

सरतेशेवटी, आपण अशा राजकीय आधुनिकतेच्या शोधाची बांधणी केली पाहिजे जी एकाच वेळी सामाजिक, वैचारिक, कलात्मक आणि तंत्रज्ञानात्मक आहे. अशी राजकीय आधुनिकता जी उत्पादन आणि काम या दोन्हींमध्ये अस्तित्वात असतानाच भांडवलवादी आधुनिकतेच्या असमान, प्राणघातक आणि समकालीन युद्धसदृश मक्तेदारीची स्पर्धक होण्यास सक्षम असेल.

--

(भाग ३ इथे वाचता येईल.)

तळटिपा:

1. फेब्रुवारी २०१६मध्ये फ्रान्सच्या कामगार मंत्री मिरियम एल खोमरी यांनी कामगार कायद्यातील बदलासंबंधीचे विधेयक सादर केले. या विधेयकानुसार कंपनीसाठी कामगारांना कामावरून काढून टाकणे, जादा कामाचा मेहनताना कमी करणे, कामावरून काढून टाकल्याबद्दलचा मोबदला (severance package) कमी करणे सुकर झाले. कामगारांच्या सुरक्षिततेवर आणि न्याय्य हक्कांवर गदा आणणाऱ्या या विधेयकाच्या आणि हे विधेयक ज्याचे प्रतिनिधीत्व करते त्या नवउदारमतवादी जगाविरुद्ध २०१६ च्या मार्चमध्ये फ्रान्समध्ये छेडलेली सामाजिक चळवळ 'न्यूई दबू' (शब्दशः रात्र-जागर) नावाने प्रसिद्ध झाली. तिची सुरुवात पॅरिसमधील प्लास द ला रिपब्लिक या भव्य चौकात भरणाऱ्या रात्र-सभांमधून झाली.

2. इथे Communist साठी साम्यवदी हे पर्यायी मराठी भाषांतर उपलब्ध असूनही 'कम्युनिझम' हे विशेष नाम (proper noun) म्हणून तसेच ठेवले आहे. बादियु यांच्या लेखी कम्युनिझम हे केवळ विशिष्ट ऐतिहासिक मार्क्सवादी राजकारणाचे वा विचारप्रणालीचे नाव नसून तो एक विचार (idea), एक गृहीत -प्रमेय (hypothesis) आहे. याची विस्तृत चर्चा The Communist Hypothesis (London: Verso, 2010) ह्या पुस्तकात वाचायला मिळते. बादियु यांच्या लिखाणातील Idea ह्या शब्दाच्या भाषांतराच्या चर्चेसाठी ‘बदलाचा प्रश्न’ या लेखातील तळटीप क्र. ९ पहा.

3. २०१० च्या सुरवातीस भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीविरोधात ट्युनिशियामध्ये सुरु झालेल्या नागरी संघर्षाचे लोण लिबिया, येमेन, इजिप्त, सीरिया आणि बहारीन या नजीकच्या अरब देशांमध्ये पसरले आणि या पाचही देशात सरकारविरोधी उठावांना सुरुवात झाली. ह्या उठावांच्या लाटेला एकत्रितपणे 'अरब स्प्रिंग' असे संबोधण्यात येते, ज्यादरम्यान आंदोलकांचे प्रमुख घोषवाक्य होते 'सत्ताधाऱ्यांना पदच्युत करणं ही लोकांची इच्छा आहे'.

4. इथे durationचे भाषांतर केवळ 'कालावधी' असे न करता 'टिकाव निर्माण करणे' असे केले आहे, ज्या योगे duration ह्या शब्दातून बादियु यांना अभिप्रेत असणाऱ्या 'to endure in time' म्हणजेच 'to give duration to something' या अर्थछटेकडे निर्देश करता येईल.

5. Subjectivityचे भाषांतर 'व्यक्तीनिष्ठता'' असे न करता 'विचारनिष्ठता' असे करण्यामागील भूमिकेच्या चर्चेसाठी 'बदलाचा प्रश्न' ह्या लेखाची तळटीप क्रमांक ४ पाहा.

6. १९६८च्या मे महिन्यात फ्रान्समध्ये जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांची, बुद्धिजीवींची आणि कामगारांची अभूतपूर्व एकी 'घडून' आली, तेव्हा पार्टीकेंद्रित पारंपरिक क्रांतिकारी दृष्टीच्या (classical revolutionary vision) परिघाबाहेर समतावादी राजकारणाच्या नव्या शक्यता खुल्या झाल्या. पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या संसदीय निवडणुकीत, ज्यांच्या सत्तेविरुद्ध फ्रान्स पेटून उठला होता त्या शार्ल द गॉल यांच्या नेतृत्वाखाली नव्याने नामकरण झालेली 'युनियन ऑफ द डेमोक्राटस फॉर द रिपब्लिक' ही उजव्या पक्षांची युती बहुमताने निवडून आली. मे १९६८ च्या समकालीनतेविषयी बादियु यांचे विस्तृत विवेचन त्यांच्या The Communist Hypothesis (London: Verso, 2010) या पुस्तकातील 'May 68 Revisited, 40 Years On' या प्रकरणात वाचायला मिळते. बादियु स्वतःला 'मे १९६८' दरम्यान पारंपरिक क्रांतिकारी दृष्टीच्या मर्यादा उल्लंघत खुल्या झालेल्या समतावादी राजकारणाच्या नव्या शक्यतांचा 'पाईक' (subject) मानतात, ज्या शक्यतांची धग त्यांच्या विचारात, लिखाणात, असण्यातही सतत जाणवत राहते.

7. ग्रीसमध्ये २००४ साली नव-उदारवादी सुधारणांना विरोध करणाऱ्या समाजवादी, पुरोगामी, लोकानुनयवादी संघटनांची, तसेच कडव्या डाव्या पक्षांची जी राजकीय युती आकाराला आली ती 'सिरिझा' या नावाने ओळखली जाते. 'सिरिझा' हा संक्षेप (abbreviation) ग्रीक भाषेतील 'मुळापासून' वा 'मूलभूत' अशा अर्थाच्या क्रियाविशेषणावरील कोटी आहे. २०१२ साली ह्या युतीचे रूपांतर संसदीय राजकीय पक्षात झाले आणि पक्षाध्यक्ष अलेक्सि सिप्रास हे २०१५ ते २०१९ दरम्यान ग्रीसचे पंतप्रधानही होते. त्याचप्रमाणे २०११-२०१२ दरम्यान भ्रष्टाचार, काटेकोरवादी (austerity) योजना, वित्तीय आणिबाणी आणि प्रस्थपित शासनव्यवस्थेविरुद्ध स्पेनमध्ये 'इंदिग्नादोस' नावाची लोकचळवळ उभी राहिली, त्यातूनच पुढे 'पोडेमॉस' या डाव्या, लोकानुनयवादी संसदीय पक्षाचा उदय झाला आणि २०१४पर्यंत सदस्यसंख्येच्या कसोटीवर तो स्पेनमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. भारतातील २०११च्या दरम्यान झालेले लोकानुनयवादी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, त्याचे एकीकडे 'आप' पक्षामध्ये झालेले पर्यवसान आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यासाठी त्याचा झालेला फायदा हा एकंदर प्रवास सिरिझा आणि पोडेमॉस यांना एकाच वेळी समकालीन आणि समतल देखील आहे. ह्या समांतर आणि समतल प्रवासाची विस्तृत चर्चा Abnave, Vaibhav, ''Europe's South and Global South: Historical Difference and Global Conjuncture', Social Scientist Vol. 44, No. 9/10 (September–October 2016), pp. 35-45 (दुवा: https://www.jstor.org/stable/2489030) ह्या निबंधात वाचायला मिळेल.

8. स्टालिनच्या काळात सोविएत युनियनमध्ये कलेच्या क्षेत्रात 'सामाजिक वास्तववादाला' (socialist realism) शासनमान्य अधिकृत दर्जा मिळाला. सामाजिक वास्तववादाशी फारकत घेणाऱ्या अभिव्यक्तीवादी (expressionist), अति-वास्तववादी (surrealist), भविष्यवादी (futurist), संरचनावादी (constructivist) इत्यादी कलाप्रयोगांना 'रूपवादी' (formalist), म्हणजेच आशयाकडे दुर्लक्ष करणारे आणि त्यामुळेच बूर्ज्वा, क्रांती-विरोधी, जनविरोधी, अभिजनवादी आणि पाश्चात्यधार्जिणे म्हणून पद्धतशीरपणे दडपण्यात आले. ह्या दडपणुकीचे पडसाद ग्योर्ग लुकाश, थिओडोर अडोर्नो, अर्न्स्ट ब्लॉख, बेर्टोल्ट ब्रेश्त आणि वॉल्टर बेन्यामिन यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत पडलेले दिसतात. ही चर्चा संकलित स्वरूपात Aesthetics and Politics (London: Verso, 2010) या पुस्तकात वाचायला मिळते.

9. लुई आरागॉं (१८९७-१९८२) हा फ्रान्समधील अति-वास्तववादी चळवळीतील आघाडीचा कवी होता. तो कादंबरीकार, संपादक आणि दीर्घकाळ कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य देखील होता.

10. Idea ह्या शब्दाच्या भाषांतरासंदर्भातील चर्चेसाठी 'बदलाचा प्रश्न' या लेखातील तळटीप क्र. ९ पाहा.

field_vote: 
0
No votes yet