तमस - दुभंगाचं दस्तावेजीकरण

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

तमस - दुभंगाचं दस्तावेजीकरण

- - अवंती

सुबह सुबह इक ख्वाब की दस्तक पर दरवाज़ा खोला देखा
सरहद के उस पार से कुछ मेहमान आये हैं
आँखों से मानुस थे सारे
चेहरे सारे सुने सुनाए
पाँव धोए हाथ धुलाए
आँगन में आसन लगवाए
और तंदूर पे मक्की के कुछ मोटे मोटे रोट पकाए
पोटली में मेहमान मेरे
पिछले सालों की फसलों का गुड़ लाए थे
आँख खुली तो देखा घर में कोई नहीं था
हाथ लगाकर देखा तो तंदूर अभी तक बुझा नहीं था
और होठों पे मीठे गुड़ का जायका अब तक चिपक रहा था
ख्वाब था शायद
ख्वाब ही होगा
सरहद पर कल रात सुना है चली थी गोली
सरहद पर कल रात सुना है
कुछ ख्वाबों का खून हुआ है
- गुलजा़र

प्रत्येक समाजाची, लोकसमूहाची, प्रदेशाची आपली आपली कैफियत असते. इतिहासाचं बॅगेज असतं. आज जे भूकंप होत असतात त्याची बीजं त्या त्या ठिकाणी वर्षानुवर्षं - आणि कधी शतकानुशतकं - घडलेल्या, घडत गेलेल्या आणि घडत असलेल्या घटनांमधे असतात. अमेरिका देशामधे ट्रम्प येतो, देशातलाच एक समूह देशाच्या लोकसभेवर हल्ला करतो. "हा देश गोर्‍या लोकांचा आहे. त्यावर त्यांचं वर्चस्व असणारा आहे," असं खुलेपण बोलणारे हे लोक असतात. त्यामागे असतं यादवी युद्ध. त्यामागे असते गुलामी, शोषण. शतकानुशतकांचं.

आपल्या भारत देशावरचं बॅगेज आहे फाळणीचं. धर्मावरून कृत्रिमपणे एका देशाचे तुकडे करण्यात आले. दहशतीखाली वावरणारे लोक. हिंसाचार. वर्षानुवर्षं चाललेलं शत्रुत्व. युद्धं. जे भागधेय भारताचं तेच पाकिस्तानचंही. रक्ताचे पाट जणू आजही वाळत नाहीत.

या दुभंगावरची अपरिहार्य प्रक्रिया म्हणजे त्याचं झालेलं डॉक्युमेंटेशन. इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, निरीक्षक यांनी जे जे पाह्यलं अनुभवलं त्याचा लेखाजोखा लिहिला. निर्वासित, निराश्रित, देशोधडीला लागलेले, दहशतीखाली वावरलेले लोक - त्यातल्या लेखक, कवी यांनी जे पाह्यलं, सोसलं, अनुभवलं ते लिहिलं गेलं. अमृता प्रीतमची 'पिंजर' ही कादंबरी आठवतेय. त्यातल्या किंकाळ्या आणि आक्रोश आठवतो. खुशवंत सिंगची 'ट्रेन टू पाकिस्तान' आठवते. बापसी सिधवाच्या 'द आईस कँडी मॅन'वरचा 'Earth' हा सिनेमा आठवतोय. त्यातल्या आमीर खानने जिवंत केलेला, काळ्याकुट्ट हृदयाचा, निरागस मुलींना विकणारा माणूस आठवतो. सआदत हसन मंटोच्या कहाण्यांमधल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखा आठवतायत.

'फुटेल (होती वेडी आशा),
आभाळाचा कर्मठ सांधा;
पडेल किंवा तडा भयंकर
वसुंधरेच्या अर्ध्या अंगा'
असं जे मर्ढेकरांनी (पुढे घडलेल्या गांधीजींच्या खुनाबद्दल) लिहिलं ते इथे खरंच घडलं होतं. एका अख्ख्या उपखंडाला तडा गेला.

पृथ्वीच्या तुकड्यांनी आणि चिरफळ्यांनी कोट्यवधी लोकांची मनंही कायमची चरे उमटवून गेलेली आहेत.

प्रस्तुत लिखाण आहे याच मालिकेतल्या भीष्म सहानी यांच्या 'तमस' कादंबरीवरचं. Name your poison म्हणतात ना. तर हा 'अमुचा प्याला दु:खाचा.'

तमस जन्मशताब्दी मुखपृष्ठ
प्रतिमा जालावरून साभार

***

खिशात कोंबलेली पाच रुपयांची करकरीत नवीन नोट हातानं चाचपून बघत तो आश्वस्त होतो, अन् घराकडं चालायला लागतो. नथ्थू हा तिशीच्या आसपासचा तरुण - व्यवसायानं आणि जातीनंही चांभार. त्याचं मुख्य काम मृत जनावरांचं कातडं कमावणं. एका संध्याकाळी आपलं रोजचं कातडी कमावण्याचं काम झाल्यानंतर हातपाय धूत असणाऱ्या नथ्थूपाशी मुराद अली येतो, आणि सलोतरी साहेबांना वैद्यकीय कामकाजासाठी, अभ्यासासाठी एक मेलेलं डुक्कर हवं असल्याचं सांगतो : हुकूमच देतो. मेलेलं डुक्कर एक गाडीवान मध्यरात्रीस येऊन गाडीत टाकून घेऊन जाईल असंही सांगतो. शिवाय "इधर का इलाक़ा मुसलमानी है। किसी मुसलमान ने देख लिया तो लोग बिगडेंगे। तुम भी ध्यान रखना। हमें भी यह काम बहुत बुरा लगता है, मगर क्या करें साहिब का हुक्म है, कैसे मोड दें!" असं म्हणून निघून जातो. वास्तविक पाहता नथ्थूचं काम कातडं कमावण्याचं, परंतु तेही काम त्याला मुराद अलीमुळे मिळत असतं. त्यामुळे तो मुराद अलीला डुक्कर मारण्याकरता नाही म्हणू शकत नाही. महत्प्रयासाने अंधारलेल्या, कडबा, घाण ठेवलेल्या खोपटातील सात-आठ तासांच्या प्रचंड झटपटीनंतर नथ्थू डुक्कर मारण्यात यशस्वी होतो.

हा स्वातंत्र्यपूर्व काळ. देशभरातल्याप्रमाणेच इथेही गांधीजींच्या विचाराने आबालवृद्ध प्रभावित होते. गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते गांधीजींच्या प्रेरणेनं प्रभातफेरी आणि श्रमदान यांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी गोळा होत होते. आपलं काम संपवून नथ्थू घराकडं जात असताना त्याला काही गानमंडळाचे लोक दिसतात. गावात त्या काळात देशभक्तीपर गाणी गात, नारे देत लोक फिरत असत. त्यामुळं हे दृश्य त्याला निराळं अथवा नवखं नव्हतं. हे लोक काँग्रेस कमिटीचेच असणार हे नथ्थू त्यांच्या म्होरक्याच्या हातातील तिरंग्यावरून ओळखतो. काँग्रेस कमिटीचे हे कार्यकर्ते दिसू लागतात. यामध्ये ज्येष्ठ सदस्य बक्षीजी असतात. बक्षीजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव असतातच, शिवाय ते गांधीविचारांशी अत्यंत एकनिष्ठ असतात. त्यांनी आंदोलक म्हणून काम करत असताना जवळजवळ सोळा वर्षं तुरुंगवासही भोगलेला असतो. याच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जरासा नखरेल, ढोंगी, स्वतःला पंडित नेहरूंसारखा दिसतो असं समजणारा जिल्हाध्यक्ष मेहता असतो. तर याच्या बरोबर उलट अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता, सदैव जोशात अन् फौजेच्या वेशात असणारा 'जनरल' नावानेच ओळखला जाणारा कार्यकर्ता असतो. काश्मिरीलाल, शंकर, अजीज, रामदास, हे लोकही यांच्याबरोबर असतात. प्रभातफेरीत सारे एकत्र जमल्यानंतर गावातील गल्ल्यांमधून एकमेकांची चेष्टामस्करी करत, सफाई मोहीम राबवत, घोषणा देत, गाणी गात फिरत असतात.

"कौमी नारा!"
"बन्दे मातरम्!"
"बोल भारतमाता की-जय!"
"महात्मा गांधी की-जय!"
हे असे नारे देत कमिटीचे सदस्य फिरत असताना मुसलमान वस्तीत येऊन पोहोचतात.
"पाकिस्तान - ज़िन्दाबाद!"
"क़ायदे आज़म - ज़िन्दाबाद!"

अशा घोषणा दुसऱ्या बाजूने ऐकू येऊ लागतात. तिथे या मुस्लिम वस्तीत काँग्रेसवाल्यांनी फिरावं की नाही यावरून मुस्लिम लीगचे नेते हयातबक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात वादावादी होते. एकमेकांच्या कमिटी, लीग कशी चांगली आहे अन् स्वातंत्र्य मिळवून देण्यास आम्हीच कसे योग्य आहोत असे वाद होत असताना, कमिटीचा एक किरकोळ देहयष्टी असणारा, साधे मळलेले असे कपडे घातलेला जनरल पुढे येऊन एकाएकी म्हणतो,

"पाकिस्तान मेरी लाश पर!"
"गांधीजी का फरमान है कि पाकिस्तान उनकी लाश पर बनेगा, मैं भी पाकिस्तान नहीं बनने दूँगा!"

जनरलला कसंबसं शांत करून कमिटीचं गानमंडळ पुढे जाऊ लागताच पुन्हा एकदा लीगच्या प्रमुखाकडून अडवणूक होते, तेव्हा पुन्हा एकदा वादावादी होते. मुस्लिम लीगच्या प्रमुखांच्या मते काँग्रेस हा केवळ हिदूंचा पक्ष असल्यामुळे त्यांनी मुस्लिमांचे नेतृत्व करू नये; त्याकरता मुस्लिम लीग आहे, जी खऱ्या अर्थाने मुस्लिमांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा नेतृत्व करते. तर बक्षीजी मात्र काँग्रेस केवळ हिंदूंचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करते, हे समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करतात. बक्षीजींची कळकळ पाहून शेवटी लीगचे प्रमुख नरमाईने घेत त्यांना काही अटींवर पुढे जाऊ देतात. गानमंडळ पुढे जाऊ लागते.

कमिटीचे लोक पुढे जात असतानाच मुस्लिम वस्तीत अस्वस्थ अशा कुजबुजीला प्रारंभ होतो. 'केलों की मस्जिद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मशिदीत डुक्कर मारून फेकल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने वस्तीत पसरते अन् सारेजण अस्वस्थ होतात. कुजबुजीला, त्वेषाला, भययुक्त चिंतेला, गोंधळ अन् धावपळीला सुरुवात होते. हे वातावरण अधिक गढूळ होऊ नये, चिंतामुक्त व्हावं याकरता बक्षीजी जनरलच्या मदतीने हे डुक्कर मशिदीच्या पायऱ्यांवरून काढून फेकून देतात. पण तरीही हे काम हिंदूंचंच असणार, कदाचित काँग्रेसच्याच लोकांचं असू शकेल, असं संशयाचं बीज वस्तीतल्या मुसलमानांच्या मनात रुजवण्यात कारस्थानी लोक यशस्वी होतात. एकमेकांबद्दल अतोनात अविश्वासाची आग धगधगत वाढतच जाते. त्यातच चेहरा लपवलेला इसम एका करुणशा गायीचा पाठलाग करताना दिसतो. हे सारं पाहून बक्षीजी अतिशय चिंतित होऊन म्हणतात, "लगता है शहर पर चीलें उड़ेंगी। आसार बहुत बुरे हैं।"

दुसरीकडे वानप्रस्थीजींनी सत्संग समाप्तीनंतर एका मिटिंगकरता गावातील निवडक हिंदू, व्यापारी, नोकरदार, वकील, गुरुद्वारा आदिंच्या प्रतिनिधींना बोलावलेले असते. यामधे स्वसंरक्षणाकरता काठ्या गोळा करणे, वेळप्रसंगी शत्रूवर फेकण्याकरता उकळत्या तेलाची तजवीज करून ठेवणे, इ. क्रूर गोष्टींचा विचार केला जातो. याच सभेत एक समंजस वृद्ध व्यक्ती सल्ला देते की गावात वाढती अशांतता व असंतोषाला अटकाव घालण्याकरता डेप्युटी कमिशनरला भेटणं गरजेचं आहे. मात्र त्याकडे सारेजण दुर्लक्ष करतात. तरुणांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षित करणे हे काम आचार्य देवव्रत करत असतात. आपल्या इतिहासाचे देदीप्यमान असे दाखले देत, तरुण अन् किशोरवयीन मुलांमधे हिंदूधर्माबद्दल दुरभिमानाची भावना, टोकाचे प्रेम व मुसलमानांबद्दल तीव्र अशी द्वेषभावना निर्माण करतात. आपल्या धर्माच्या रक्षणाकरता हिंसेचा वापर करावा लागला तरी बेहत्तर, कसलाही पुढचा मागचा विचार न करता धर्मरक्षण करणे हेच ध्येय असले पाहिजे, असं कोवळ्या मनाच्या मुलांवर ठसवत असत. यापैकीच एक १४ ते १५ वर्षं वयाचा रणवीर होय. तो आचार्य देवव्रत यांच्या शिकवणीचे त्यांना हवे तसे आचरण करणारा आदर्श अनुयायी ठरतो.

इकडे शहराचा डेप्युटी कमिशनर रिचर्ड आणि त्याची पत्नी लिझा हिंडण्याफिरण्याकरिता बाहेर पडलेले असतात. पतीपत्नीच्या इतर संवादांतच तो ब्रिटिशांच्या भारतावरील सत्तेच्या यशाचं गमक तिला सांगतो. तो म्हणतो, "डार्लिंग, हुकुमत करने वाले ये नहीं देखते की प्रजा में कौन कौनसी समानता पायी जाती है, उन की दिलचस्पी तो इन बातों में होती है की, वे किन किन बातों में एक दुसरें से अलग है।" हा रिचर्ड इतिहासात, पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासात रमतो. त्याचं घर म्हणजे एखादं संग्रहालयच जणू! त्यात अनेक शिलालेख, उत्खननात सापडलेल्या मूर्ती असं बरंच काही असतं. तो म्हणतो, बंगल्यात असतानाच मी अखंड हिंदुस्थानात असतो. Divide and rule, फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या धोरणाशी तो सहमत असतो. पतीपत्नीच्या संवादात तो म्हणतो, "ये लोग धर्म के नाम पर आपस में लड़ते हैं, देश के नाम पर हमारे साथ लड़ते हैं।" परंतु लिझा त्याला अन् पर्यायाने इंग्रजांच्या धोरणाला पुरेपूर ओळखून असल्याप्रमाणे म्हणते, "बहुत चालाक नहीं बनो, रिचर्ड। मैं सब जानती हूँ। देश के नाम पर लोग तुम्हारे साथ लड़ते हैं, और धर्म के नाम पर तुम इन्हें आपस में लड़ाते हो। क्यों, ठीक कहा ना?"

गावात हळूहळू तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी डेप्युटी कमिशनरने प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रिचर्डला भेटण्याकरता येते. या शिष्टमंडळात हिंदू, मुसलमान, शिखांचे प्रतिनिधी असतात. या भेटीदरम्यान रिचर्डला जाणवल्याप्रमाणे या लोकांचे आपसात वादच होत राहतात. आपसात शांतपणे चर्चा करण्याऐवजी काँग्रेस अन् मुस्लिम लीगच्या तूतूमैंमैंमधून रिचर्डला आसुरी आनंद मिळतो अन् स्वतःच्या प्रशासकीय कामाबद्दल तो खूष होतो. हळूहळू सारा गाव धर्मांधतेच्या, द्वेषाच्या आगीत होरपळू लागतो, परंतु प्रशासन, पोलीस कसलाही हस्तक्षेप करत नाहीत.

गावात टेकडीवर शिवाला म्हणून ओळखले जाणारे एक मंदिर असते. तिथले शिवाला मार्केट नेहमीप्रमाणे गजबजलेले असते. विषारी धर्मांधतेची सावली अजून या गावरहाटीवर पडायची असते. हिंदूमुसलमानशीख सारेच अगदीच रोजच्याप्रमाणे एकमेकांशी गप्पागोष्टी करत जगरहाटी निभवत असतात. धान्य, कपडे हिंदूचं, मोटारी ट्रान्सपोर्ट शीखांचं, चप्पल जोडे मुसलमानांचे. या परस्परावलंबी व्यवस्थेत सारेजण रोजच्याचप्रमाणे व्यग्र असतात.

बाजारातून हळूहळू चालत नथ्थू आपल्या घरी जात असतो. गावात काहीतरी भीषण असं होणार आहे याची अशुभ चाहूल नथ्थूला लागते अन् तो भेदरून जातो. तो चिडचिडा होतो, घरी येऊन सतत चिडचिड करू लागतो. गावाच्या या परिस्थितीला आपण नकळतपणे जबाबदार आहोत असं त्याला वाटू लागतं, हा अपराधगंड त्याला सतत पोखरत राहतो. शेवटी न राहवून, मनावरचा ताण, आलेलं दडपण अन् अपराधी भावनेतून तो बायकोसमोर डुक्कर मारल्याची कबुली देतो. त्याची बायको अचंबित होते पण त्याला धीर देत म्हणते, "तूने बहुत बुरा काम किया है, पर इस में तेरा क्या दोष? तुझ से लोगों ने धोखे से काम करवाया है। तूने धोखे में आकर यह काम किया है।" असं म्हणून स्वतः भ्यालेली असतानाही त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते.

मुसलमान वस्तीत असलेलं एकुलतं हिंदू घर लाला लक्ष्मीनारायणचं. गावात हळूहळू दंगे वाढून दूरवर घरं पेटू लागलेली असतात. हळूहळू गाव भीतीयुक्त किंकाळ्या, त्वेष अन् द्वेषपूर्ण आरोळ्या अन् आगीत बुडू लागते. लाला लक्ष्मीनारायणला भीती वाटू लागते. मुसलमान वस्तीत आपली पत्नी अन् तरुण मुलगी विद्या यांच्यासोबत तिथं राहाणं असुरक्षित वाटू लागतं. त्यांचे शेजारी फतहदीन, त्याचा भाऊ, आणि वृद्ध वडील समोरून येत म्हणतात की, "आप बेख़बर रहो बाबूजी, आप के घर की तरफ़ कोई आँख उठाकर भी नहीं देख सकता। पहले हम पर कोई हाथ उठाएगा, फिर आप पर उठने देंगे।" तो पुढे म्हणतो, "आप बेफ़िक्र रहें, ये फ़सादी लोग फ़साद करते हैं, शरीफों को परेशान करते है। यहाँ सभी को एक ही शहर में रहना है, फिर लड़ाई-झगड़ा किस बात का? " पण हा इतका आश्वासक शेजार असूनही लाला लक्ष्मीनारायणला असुरक्षित वाटत असतं.

याच वेळी किशोरवयीन रणवीर युवा समाजासोबत धर्मरक्षणाची जबाबदारी निभावत असतो. रणवीर या लालाजींचा मुलगा असतो. लालाजी समाजाच्या मुलांसाठी, धर्मरक्षण करण्याकरता लाठ्याकाठ्या खरेदी करण्याकरता खिशातून तत्काळ पाचशे रुपये काढून देतात. मात्र आता स्वतःच्या पोटचा मुलगा या कामात हिरीरीने सहभाग घेत होता हे त्यांना खटकतं - शेवटी बापाचं काळीज! आपल्या बरोबरीच्या म्हणजेच सांपत्तिक स्थितीने उत्तम असणाऱ्या शहानवाज नावाच्या व्याह्याच्या मित्राच्या गाडीने लालाजी आपल्या पत्नी व मुलीसकट व्याह्यांकडे पोहोचतात. शहानवाज इतर कशाहीपेक्षा मैत्रीला महत्त्व देणारा असतो. त्याला हिंदूंबद्दल राग असूनही त्याचं मित्रांवरील प्रेम त्या द्वेषापेक्षा अधिक असल्याने तो लालाजींची मदत करतो.

काॅम्रेड देवदत्तला हे सारं द्वेषपूर्ण वातावरण निवळून, सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावं असं वाटत असतं अन् त्याच्या मनाची तगमगही होत असते. यासाठी तो बक्षीजींना अन् हयातबक्षना एकत्रित चर्चा करण्याकरता बोलवतो. जनरलला फाळणी नक्की होणार हे समजते व तो एका तिरमिरीत रस्त्यावरून ठिकठिकाणी थांबत भाषण देत रहातो. तो पोटतिडिकीने सर्वांना सांगू लागतो,

"साहिबान, गांधीजी ने कहा है कि हिंदू मुसलमान भाईभाई है। इन्हें आपस में नहीं लडना चाहिए। मैं आप से, बच्चे, बूढ़े, जवान, मर्द और औरतों से अपील करता हूँ कि आपस में लड़ना बन्द कर दें। इस से मुल्क को नुकसान पहुँचता है। देश की दौलत इंग्लिस्तान में जाती है। अंग्रेज याने यह गोरा बन्दर, हम पर हुक्म चलाता है। हमारा दुश्मन अंग्रेज है। गांधीजी कहते हैं कि अंग्रेज ही हमें लड़ाता है और हम भाई भाई है। हमें अंग्रेजों की बातों में नहीं आना चाहिए। और गांधीजी का फर्मान है कि पाकिस्तान मेरी लाश पर बनेगा। मैं भी यही कहता हूँ कि पाकिस्तान मेरी लाश पर बनेगा, हम एक हैं, हम भाईभाई हैं, हम मिलकर रहेंगे..."

हे असं भाषण देत जनरल गावभर फिरत असताना, आपण एकत्र राहूच शकतो असं आवाहन लोकांना करत असताना जनरलच्या डोक्यात पाठीमागून लाठीहल्ला होतो अन् त्यात त्याचा मृत्यू होतो.

एकसंध भारताचे स्वप्न बाळगणाऱ्या जनरलचा अशा पद्धतीने झालेला मृत्यू म्हणजे सामान्य भारतीयांच्या भावनेची निर्घृण पद्धतीने केली गेलेली हत्याच होय. ही हत्या कोणी केली याची कल्पनाही नसते. समाजाच्या मनात द्वेषाचं विष पसरवणारा समूह आहे की कुणी एक व्यक्ती हे कळत नसतं, पण हे जे कोणी अज्ञात आहे त्यांच्या लेखी मानवीजीवन कवडीमोलच आहे. "पाकिस्तान मेरी लाश पर" म्हणणाऱ्या जनरलचा मृत्यू ही भविष्यात होणाऱ्या अंधाधुंदीची एक झलकच असते. समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारा जनरल असो अथवा काँग्रेस कमिटीचे सदस्य, मुस्लिम लीगचे मेंबर असोत वा शिखांचा समूह, अथवा या सर्वांनाच सोबत घेऊन चालणारा काॅम्रेड देवदत्त, या सर्वांचे प्रयत्न फोल ठरावेत अशा प्रकारे धर्मांध समूहाच्या हालचाली होत असतात.

हळूहळू गावंच्या गावं पेटू लागतात, माणसं भयानं आगतिक होतात. शेजारच्या गावात डोक इलाहीबक्ष येथे राहाणारा म्हातारा हरनामसिंह त्याची वृद्ध पत्नी बन्तो हिच्यासोबत रात्रभर चालत, हातात एखादं बोचकं घेऊन शेजारच्या गावात पोहोचतात. हरनामसिंहचा शेजारपाजार सारा मुसलमानच असतो, अख्ख्या मुसलमान वस्तीत हरनामसिंहची एकट्याचीच चहाची छोटीशी टपरी व घर असते. हरनामसिंहच्या शेजाऱ्याने, करीमखानने त्याला व त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच बन्तोच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे आश्वस्त केले असते. परंतु दंगे वाढताहेत, दंगलखोर लोक गावात शिरलेत हे लक्षात येताच करीमखान अगतिकपणे त्या दोघांना रात्रीतून गाव सोडून जायला सांगतो. रात्रभर मिळेल त्या वाटेनं जात हे दोघे म्हातारे एका गावात पोहोचतात. तिथे एका अनोळखी घराचं दार ठोठावतात. नेमके ते घर एका मुसलमान कुटुंबाचेच असते. या कुटुंबातला मुलगा शेजारच्या गावात हिंदू आणि शीखांचा बदला घेण्यासाठी दंगलीत सामील झालेला असतो. अन् रातोरात या म्हाताऱ्या जोडप्याला आपल्या घरातून हाकलून देतो.

इकडे सैयदपूर नावाच्या एका लहान गावात मुसलमान वस्तीत आणि गुरुद्वाऱ्यात किशनसिंहच्या नेतृत्वात आत्मसंरक्षणाच्या नावाखाली प्रचंड शस्त्रसाठा केलेला असतो. शिखांत तेजासिंग तर मुसलमानांत शेख गुलाम रसूल या दोघांना काॅम्रेड देवदत्तने दोन्ही समाजात समेट घडवन आणण्याकरता सांगितले असते. हे दोघेही काॅम्रेड असतात. धर्मापलिकडे जाऊन माणसाचा, समाजाचा विचार करणारे असतात. पण जो बोले सो निहाल, अल्ला हो अकबर या धार्मिक नारेबाजीमधे या दोघांचेही प्रयत्न अन् म्हणणे दडपून जाते.

शीख स्त्री-पुरुषांचे हात इतिहासात मुघलांनी म्हणजेच मुस्लिमांनी केलेल्या अन्याय, अत्याचाराचा बदला घेण्यासाठी शिवशिवत असतात. यात जसबीर म्हणजेच हरनामसिंह आणि बन्तोची मुलगी सैयदपूरच्या सर्व शीख स्त्रियांना आपल्यासोबत घेऊन "वाहेगुरुच्या फते"साठी आत्मबलिदान करण्यास सज्ज असते. मुसलमान आणि शिखांच्या दंगलीत गुरुद्वाऱ्यातून साऱ्या शीख स्त्रिया आपापल्या लेकरांसहित बाहेर येऊन, मुसलमानांच्या हाती पडू नये, आपल्यावर अत्याचार होऊ नये, आपली अब्रू वाचावी या हेतूनं तब्बल तेवीस जीव विहिरीत उडी मारून आत्माहुती देतात.

तब्बल १०३ गावे या दंगलीत होरपळून गेल्यानंतर डेप्युटी कमिशनर रिचर्ड संतुष्ट होतो. आणि मग तो प्रशासकीय नेतृत्वाचा, जबाबदारीचा मुखवटा पांघरून कामाला लागतो. आता आपल्याला शांती प्रस्थापित केली पाहिजे या अविर्भावात तो सर्वत्र पोलिस तैनात करून दंगल नियंत्रणात आणण्याकरता हालचाली करतो. शेकडो मृत्यू, हजारोंच्या संख्येनी उद्ध्वस्त झालेली, जळून गेलेली घरं, आईवडलांचं छत्र हरवलेली - आता पोरकी झालेली मुलं, तर मृत मुलांचे आईवडील, आपल्या घरची माणसं जिवंत तरी आहेत की नाहीत हा प्रश्न ध्यानीमनी घेऊन सतत विवंचनेत सैरभैर होऊन वावरणारे स्त्री अन् पुरुष, बेघर, अनाथ लोक हे सारं हृदय पिळवटणारं दृश्य पाहून मनातच आनंदी होणारा अन् स्वतःच्या कामावर खूष होणारा उलट्या काळजाचा रिचर्ड! गाव हळूहळू पूर्वपदावर येतं तेव्हा रिलिफ कमिटीचे उद्विग्न कार्यकर्ते आणखीच चिडचिडे होतात जेव्हा त्यांच्यापाशी नोंदणी करायला लोक येतात. अशातच काॅम्रेड देवदत्त नोंदणी कर्मचाऱ्यापाशी जाऊन म्हणतो की यात एक रकाना जोडून घ्या, दंगलीतील मृतांमध्ये गरीब किती अन् श्रीमंत किती, हेही लिहा. देवदत्तचा हा प्रश्न 'तमस'च्या एकूणच भूमिकेचे सार वाटावे, इतका महत्त्वाचा आहे.

दंगल शांत झाल्यानंतर रिचर्ड बंगल्यात राहून कंटाळलेल्या लिझाला निवांत फिरून येऊ असे सुचवतो. तेव्हा लिझा म्हणते,

"मुझे कहाँ घुमानें ले चलोगें, रिचर्ड? मुझे जलतें गांवों की सैर कराओगे? मैं कुछ भी देखना नहीं चाहती, कहीं भी जाना नहीं चाहती।"

यावर रिचर्ड म्हणतो की आता सारं निवळलं आहे आपण फिरून येऊ.

"यहाँ का देहाती इलाका सच-मुच बहुत सुंदर है। उस दिन इसी सैयदपुर गाँव में ही फलों के बाग के पास गुजरते हुए मैंने लार्क पक्षी की आवाज़ सुनी। इस मौसम वहां लार्क पक्षी मिलता है। मुझे मालूम नहीं था, इस गर्म देश में यह पक्षी रहता होगा। और भी तरह तरह के पक्षी मिलते हैं जिन्हे तुमने पहले कभी देखा नहीं होगा।"

हे ऐकून लिझा म्हणते,
"क्या यह वही जगह है जहाँ औरतें डूब मरी है?"

ती पुढे चिडून म्हणते,
"तुम कैसे जीव हो रिचर्ड, ऐसे स्थानों पर भी तुम नये नये पक्षी देख सकते हो? लार्क पक्षी की आवाज सुनते हो?"

"इस में कोई विशेष बात नहीं है, लिझा, सिविल सर्विस हमें तटस्थ बना देती है।" रिचर्डने असं म्हटल्यावर लिझा त्यावर प्रतिप्रश्न करते की १०३ गावं जळून उद्ध्वस्त, खाक झाली तरीही हे असंच असू शकतं का? यावर रिचर्ड म्हणतो,

"यह मेरा देश नहीं है, ना ही ये मेरे देश के लोग है।" या संवादातून ब्रिटिश अधिकाऱ्यांची भारतीयांकडे पाहण्याची भावनाशून्य वृत्ती स्पष्ट होते.

हळूहळू सारीच गावे पूर्वपदाला येऊ लागतात, बाजारात नेहमीसारखी माणसे जा ये करू लागतात. शिवाला मार्केटमधून गावाला शांततेचं आवाहन करणारी एक गाडी भोंगा लावून फिरत असते, या गाडीत पुढच्या बाजूला हातात माईक व भोंगा घेऊन मुराद अली बसलेला असतो. शांतता राखा, शांती टिकवा असा संदेश तो घसा खरवडून देत असतो. हा तोच मुराद अली असतो जो कादंबरीच्या सुरुवातीला नथ्थूकडून डुक्कर मारून घेतो. तमसची सुरुवात मुराद अलीपासून होते अन् शेवटही त्याच्यापाशीच. संपूर्ण कादंबरीभर मुराद अली एक विषारी व्यक्ती म्हणून वावरताना दिसतो. वाचकाला त्याची मनस्वी चीड येते. त्याचबरोबर नथ्थूही कादंबरीभर जाणवत राहतो. समाजातील एक भाबडा, पिचलेला घटक म्हणून, स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असलेला एका क्षीण, दुबळ्या समाजाचं प्रतिनिधत्व करणारा नथ्थू.

नथ्थू, त्याची पत्नी, जनरल, बक्षी, कॉम्रेड देवदत्त, हयातबक्ष, मुरादअली, हरनामसिंह-बन्तो, रणवीर, रज्जो या सोबतच रिचर्ड आणि लिझा समाजाच्या एकेका घटकाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. नथ्थूची पत्नी, सर्वसाधारणपणे कुठल्याही भारतीय घरातील, विशेषकरून गरीब घरातील, पत्नीप्रमाणे बाहेर काय सुरू आहे याची फारशी खबर नसणारी परंतु नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी दाखवली आहे. तर जनरल गांधीवादाने प्रभावित असलेला, देशावर, राष्ट्रावर अमाप प्रेम करणारा अन् त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशा विचारांचा असलेला. बक्षी कमिटीचे सचिव, वयाने वडील त्यामुळं वडीलकीच्या नात्यानं बोलणारे. इंग्रज सत्ताधीशांचं प्रतिनिधत्व करणारा रिचर्ड अन् त्याची इथलं काहीच न कळणारी, अन् आपल्या नवऱ्याच्या मतलबी व स्वार्थी वागण्यानं आचंबित होणारी बायको लिझा.

शहानवाजचा मित्र असणाऱ्या रघुनाथच्या घरच्या नोकराच्या, म्हणजेच मिलकीच्या पाठीत शाहनवाज लाथ घालतो. कारण मिलकी मुसलमान नसून काफिर असतो. एरवी धर्मापेक्षाही मैत्रीला अधिक महत्त्व देणारा शाहनवाज इथे मात्र परधर्मातील गरिबावर अत्याचार करताना दाखवला आहे. त्याच वेळी लाठ्याकाठ्या घेण्यासाठी युवकांना लगोलग पाचशे रुपये काढून देणारे परंतु आपला कोवळ्या वयाचा मुलगाही यात सामील झालाय हे कळताच हतबल होणारे लालाजी, आयुष्यभर ज्यांच्या शेजारी राहिला, त्या वयोवृद्ध शेजारी मुसलमान आजोबांना जीवे मारताना जराही न चाचरणारा धर्मद्वेषाचं कातडं डोळ्यावर पांघरलेला कोवळ्या वयाचा रणवीर. गावात दंगल, जाळपोळ सुरू असताना हरनामसिंग आणि त्याची बायको बन्तोला घरात पुरुषमाणूस नसतानाही आसरा देणारी रमजानची आई. ते दोघे म्हातारे शीख नवराबायको रात्रभर पायपीट करून थकले असतील म्हणून त्यांना लस्सी देणारी अन् मुसलमानाच्या भांड्यातून चालत नसेल तर तुमच्याजवळील भांड्यात लस्सी काढून घ्या, पण पोटभर पिऊन घ्या, असं म्हणणारी ती बाई. हरमानसिंग अन् त्याच्या बायकोला घरातून हाकलून दिल्यावर हळूच त्यांचा पाठलाग करत जाऊन बन्तोच्या हाती बन्तोच्याच दोन बांगड्या सोपवणारी ती मुसलमान बाई, ही सारी पात्रे विध्वंसातही मानवता जिवंत असल्याचे द्योतकच म्हटली पाहिजेत.

तमसमधील एक विशेष बाब अशी की या कादंबरीतील महिला या जरी कादंबरीचं प्रमुख पात्र नसल्या तरी अनेक महिला जसं की नथ्थूची बायको, रिचर्डची बायको लिझा, रमजानची आई, हरमानसिंगची मुलगी जसबीर या सर्व बायकांची पात्रं तगडी रेखाटली आहेत. प्रसंगी या सर्व बायका आपापल्या पुरुषांच्या, घरच्यांच्या पाठीशी उभ्या आहेत तर प्रसंगी होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता, कुठल्याही धर्माचा विचार न करता माणुसकी जपणाऱ्या आहेत.

'तमस' ही कादंबरी भारत-पाकिस्तान फाळणीपूर्व काळात हिंदू, मुस्लिम, शीख या समाजांत द्वेषाचा अग्नी पेटवून शांतपणे बसण्याच्या आणि अलगद द्वेषाची फुंकर घालत राहण्याच्या इंग्रजांच्या दुष्ट प्रवृत्तीचे प्रत्ययकारी चित्रण करते. या कादंबरीत नथ्थू हे पात्र अगतिकतेच्या आगीत होरपळत जाणाऱ्या सामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. ही अगतिकता, कोणाच्या तरी- पक्षी समाजातील वरिष्ठ घटकांच्या - हातचं बाहुलं बनणाऱ्या समष्टीची आहे, ही हतबलता आपल्याला कोण वापरून घेतंय, आपल्याला कशाकरता वापरून घेतलं जातंय, आपलं हे काय होतंय ह्याचं आकलनही न होता केवळ शिकार झालेल्या लोकांची आहे. हतबल नथ्थूप्रमाणेच समाजाला तेव्हाही अन् आताही अनेक अनुत्तरित असे प्रश्न पडलेले आहेत. आपण कठपुतळी आहोत याची जाणीव होतेय पण आपला दोष काय, आपणच का, हे प्रश्न पुढे वाढत जाऊन जीवनमरणाचे प्रश्न होतात अन् त्या सर्व प्रश्नांशी अंधाऱ्या खोपटात डुक्करासोबत लढत, झुंजत राहणाऱ्या नथ्थूप्रमाणे स्वतःचा जीव दमेपर्यंत ही समष्टी लढत राहतेय.

लोकांच्या मनात परस्परांसंबधी द्वेष निर्माण कोण करतंय? का करतंय? कशासाठी करतंय? यामध्ये कुणाचं हित दडलंय? कुणाचा स्वार्थ दडलाय? सत्तेसाठी लोक इतक्या थराला जाऊ शकतातच! साम्राज्यसत्ता आपल्या हातात सुरक्षित राहावी म्हणून यांना तत्कालीन राज्यकर्ते लढवत होते? की आपल्या राजकीय हेतूंच्या पूर्ततेसाठी काँग्रेस, मुस्लिम लीग, शीख अन् इतरांच्या मनात तीव्र असा द्वेष कोण पेरत होते? लोकांना धर्माच्या नावाखाली भावनिकरीत्या कोण असुरक्षित करत होतं? जनरलला कोणी मारलं? वानप्रस्थीजींच्या नेतृत्वातील 'अंतरंग सभेत' समाजात चाललेल्या दाहकतेची जाणीव सरकारला प्रथम द्यायला सुचवणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे साऱ्यांनी दुर्लक्ष का केले? हे होणारे दुर्लक्ष कशाचे द्योतक होते? सैयदपूरमध्ये कॉम्रेड गुलाम रसूल आणि तेजासिंगच्या एकीसाठी चाललेल्या तळमळीकडे सारेच जण का दुर्लक्ष करत होते? हे अन् असे अनेक प्रश्न सामान्य लोकांसाठी गडद अंधारामध्येच हरवलेले आहेत.

तमस ही कादंबरी फाळणी काळातील स्वार्थी, धर्मांध, राजकारणी, सत्तापिपासू लोकांचं दर्शन घडवणारी अन् प्रतिनिधत्व करणारी कादंबरी आहे. त्या वेळच्या या धर्मांध लोकांनी समाजात जो वेदनादायी अंधार पसरवला त्याची जाणीव संपूर्ण कादंबरीभर होत राहते. "सामजिक, राजनीतिक और धार्मिक मूल्य काँच के बर्तनों की भाँती टूट गये थे। और उन की किरचे लोगों के पैरों में बिछी हुयी थी।" असं अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणाल्या आहेत. फाळणीची जखम, धर्मिक दंगली म्हणजे संवेदना जागृत असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनीची अश्वत्थाम्याच्या भाळावरच्या जखमेसारखी लसलसणारी, ठसठसणारी आठवण आहे.

तमस हा भीष्म सहानी यांनी चितारलेला अंधार आहे - शब्दश: आणि अर्थश:देखील. तो जरी फाळणीच्या वेळचा असला, जरी स्वातंत्र्यपूर्व काळातला असला तरी त्या वेळेपासूनच द्वेषाची बीजं या समाजात पेरली गेली आहेत. अन् आता पंचाहत्तर वर्षं होत आली, या बीजाचं द्वेषाच्या प्रचंड मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे. समाजातील द्वेषाचा तमस वाढत अन् अंधार घनगर्द होत चालला आहे. आपल्यासारख्या सामान्य समाजाची, जनतेची अवस्था नथ्थूसारखी झाली आहे, आपल्यासमोर अंधारातून अनेक प्रश्न घोंगावत येतात, पण उत्तरं मात्र सापडत नाहीत.

तमस ही एका देशाच्या दुःखद काळातील समाजाचे दर्शन घडवणारी कादंबरी आहे. यामध्ये हिंदू, मुसलमान अन् शीख या तिन्ही समाजांतील मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या हिंसाचाराला उघडे पाडले आहे. एकाच वेळी तीनही समाजांतील स्वार्थी राजकीय प्रवृत्ती जाग्या होण्याची फलश्रुती म्हणजे सामान्य लोकांचे हाल हे तमसमध्ये अतिशय परिणामकारकपणे दाखवलं आहे. यामुळे द्वेषभावना, धर्मांधता, सत्तापिपासूपणा या भावनांना काहीच अर्थ नाही, यातून भले कुणाचेच होत नाही असा काहीसा सुप्त संदेश तमसमधून मिळतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमधून जर आपण काही शिकत नसू तर तो आपला दोष असतो - समाजाचा नव्हे. तमसमधील नथ्थू, मुराद अली, लिझा, रिचर्ड, जनरल, देवदत्त, रणवीर अन् इतरही अनेकांच्या माध्यमातून याचे अनेक ताणेबाणे स्पष्टच दिसतात.

कादंबरीचा शेवट करमोच्या मुलीच्या जन्माने होतो, भीषण जाळपोळीनंतर अन् अनेक दुःखद प्रसंगांनंतर जणू आता स्वातंत्र्य मिळून नवीन पहाट होणार, असा आशेचा किरण साहनी दाखवतात. दंगलींनंतर गावे हळूहळू पूर्वपदावर येतात. दंगलींमधील हिंसाचाराचे मनात खोलवर गेलेले व्रण कायम बाळगूनही निव्वळ जिजीविषा आणि त्यापायीच्या आत्मविश्वासाने म्हणा किंवा अगतिकतेने म्हणा, लोक पुन्हा एकदा जगू लागतात. हिंसाचार चालू असतानाही मानवता पूर्णच नष्ट होत नाही. त्यातही लहानशा प्रसंगांतून चिवट अशी मानवता दिसत राहतेच. अदम्य जिजीविषा, आणि भूतदया व प्रेम यांच्या आधाराने प्रत्यक्ष मरणालाही जिंकता येते, हे तमसमध्ये थोडे खोलवर डोकावल्यावर दिसून येतेच. अस्मानी सुलतानीच्या वरवंट्याखाली युगानुयुगे पिचूनही फिरुनि नवे जन्मणाऱ्या मानवसमाजाच्या या चिरंतन गाथेतला हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. संकट कितीही मोठं असलं, त्यापासून होणारी हानी कितीही सर्वंकष वाटली तरीही शेवटी मानवाच्या रक्तातली ही एकमेकांच्या आधाराने पुन:पुन्हा जगण्याची आदिम प्रेरणा नेहमीच वरचढ होते. "संभवामि युगे युगे" हे गीतावचन अवतारासोबतच या कालातीत मानवी निर्धारालाही तितकेच लागू आहे. हा चिवटपणा खरेच थक्क करून टाकणारा आहे.

***

हिंदी संवादांचं लेखन मुळाबरहुकूम.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फाळणीचं चित्रण करणाऱ्या भारतीय लिखाणातल्या एका महत्त्वाच्या कादंबरीचा लेखाजोखा. तो आवडला. असंच ट्रेन टू पाकिस्तान, किंवा डॉमिनिक लापिअरचं "फ्रीडम ॲट मिडनाईट", रश्दीचं मिडनाईट्स चिल्ड्रन याबद्दलही लिहावं अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

परिचय आवडला. ह्याच पुस्तकावर आधारित मालिका अंधुकशी आठवते आहे. डिडी इंडियावर तिचं पुन:प्रक्षेपण झालं होतं तेव्हा तुटक तुटक बघितल्याचं आठवतंय. फाळणी आणि तत्सम घडामोडीबाबत माझी मतं वेगळी आहेत. पण हे पुस्तक गाजलेलं असल्यानं वाचायची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0