तुझे आहे तुजपाशी

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

तुझे आहे तुजपाशी

- भ्रमर

"पॉप" असा आवाज करत साहिलनं शँपेनची बॉटल उघडली आणि फेसाळती शॅंपेन संजनाच्या आणि आपल्या ग्लासामध्ये ओतली. "हॅपी ॲनिव्हर्सरी स्वीटहार्ट!" तो तिला म्हणाला आणि ग्लास धरलेले आपले हात एकमेकांत गुंफून दोघं एकमेकांच्या हातानं शॅम्पेन पिऊ लागले. त्या दोघांसारखीच देखणी आणि सुंदर दिसणारी त्यांची मुलगी मेहेर त्यांच्यामध्ये आली. तिनं दोघांना गालावर किस करून शुभेच्छा दिल्या. आजूबाजूला असलेल्या त्यांच्या बॅचमेट्सनी टाळ्या वाजवून साहिल आणि संजनाला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापले ग्लासेस भरले.

बँक्वेट हॉलच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बारपाशी बसलेल्या दिनेशनं हे बघितलं आणि ग्लासातल्या 'नीट' व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला. घसा जाळत व्हिस्की खाली उतरली. दारू फुकट मिळत असेल तेव्हा जास्तीत जास्त पिऊन घ्यायची, उगाच त्यात काही मिसळायचं काय कारण? च्यायला आपण नेहमी असेच - स्वतःच्या पैशानं प्यायला परवडत नाही, म्हणून मिळेल तेव्हा अशी अधाशासारखी पिऊन घेतो.

हॉलमध्ये आता म्युझिक सुरू झालं होतं. रियुनियनला आलेले बरेचसे बॅचमेट्स डान्स करत होते. साहिल संजना आणि मेहेरबरोबर नाचत होता. तिघांचे हसरे, आनंदी, एकमेकांवरच्या प्रेमानं निथळणारे चेहरे… त्यांना बाकी कशाची फिकीर नव्हती, बाकी कुणाची गरज नव्हती - दे वेअर अ परफेक्ट फॅमिली! काही लोक जन्मतःच नशीबवान असतात. साहिल आणि संजना दोघंही श्रीमंत घरांत जन्माला आलेले, देखणे, हुशार, हायस्कूलमध्ये सगळ्यांच्या गळ्यातले ताईत, त्यांच्या वर्गाचे सुपरस्टार्स. शाळेतच त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं, पुढं आपापल्या व्यवसायांत दोघं तळपले, लग्न झालं, दोघांची नावंही अगदी यशराज फिल्म्सच्या एखाद्या चित्रपटातल्या जोडप्याला शोभून दिसावी अशी. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मेहेरसुद्धा शाळेत चमकत असल्याचं दिनेशनं ऐकलं होतं. बॅचच्या रियुनियनची तारीखही साहिल आणि संजनाच्या लग्नाच्या वाढदिवसाशी जुळून यावी, रियुनियनमध्ये खास त्यांच्यासाठी वेगळी शॅम्पेन उघडण्यात यावी, बाकी कुणाच्याही मुलांना बोलावलेलं नसताना मेहेरला खास आमंत्रण मिळावं हे त्यांच्या खास स्टेटसला साजेसंच! नाहीतर साले आपण… रियुनियनला आलो नसतो तरी कुणाला काडीचा फरक पडला नसता. लहानपणापासूनच घरची परिस्थिती, बुद्धी, व्यक्तिमत्त्व - सगळंच सुमार. ग्रॅज्युएशन कसंबसं पूर्ण केल्यावर एक फडतूस नोकरी लागली त्यातच अजून रखडतोय. आपली बायको मनीषासुद्धा आपल्यासारखीच - साधी, सर्वसामान्य, किरकोळ नोकरी करणारी. अशा सामान्य आईबापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा तरी का वेगळा असावा? निखिलही तसलाच - घुम्या, हडकुळा, चष्मिस, हलकं कुबड काढून चालणारा, अभ्यासात जेमतेम, सारखी हवेत बोटं फिरवत असतो - विचारलं की म्हणतो पियानोची प्रॅक्टिस करतोय. अशा दळभद्री आईबापाच्या मुलाचं पोट काय पियानो वाजवून भरणार आहे का? कुठं साहिल, संजना आणि मेहेरचं रसरशीत, चकाकतं, उत्फुल्ल आयुष्य आणि कुठं आपलं तिघांचं दर रात्री ताटात पडणाऱ्या वरणभातासारखं कोमट, मिळमिळीत आयुष्य…

"आर यू ओके?" खांद्यावर थाप पडली आणि दिनेशची तंद्री मोडली. त्यानं वर बघितलं - हा तर प्रसाद! 'अ' तुकडीत पहिल्या बेंचवर बसणारा स्कॉलर मुलगा. आता सायंटिस्ट झालाय असं दिनेशनं ऐकलं होतं.

"तू दिनेश नं?" शेजारी बसता-बसता प्रसादनं विचारलं. याला आपलं नाव लक्षात आहे? त्यानं मान डोलावली.

"काय झालं? मी तुला लांबून बघत होतो. तू फार त्रासल्यासारखा दिसत होतास. असं वाटत होतं की यू डोन्ट वॉन्ट टू बी हिअर!"

"खरंय. मला असंच वाटत होतं की मी रियुनियनला यायलाच नको होतं!"

"का? इतक्या वर्षांनी सगळे भेटले - आनंद नाही झाला तुला?"

"अजिबात नाही! उलट या सगळ्यांच्या तुलनेत माझं आयुष्य किती फडतूस आहे हे लक्षात येऊन त्रासच झाला!" कधी शाळेतही ज्याच्याशी बोलायची वेळ आली नाही अशा प्रसादला इतक्या वर्षांनी भेटल्यावर आपण एकदम मनातलं का सांगतोय? का ही चढलेली व्हिस्की बोलतेय?

"कमॉन! असं का म्हणतोयस? काहीतरी चांगलं असेलच तुझ्या आयुष्यात - कुटुंब, मुलं…"

दिनेश कडवट हसला. "एक मुलगा आहे. आमच्यासारखाच ऑर्डिनरी. असल्या आईबापाच्या पोटी जन्माला आलेलं मूल अजून कसं असणार म्हणा! काय देऊ शकलो आम्ही त्याला, आणि काय देणार आहोत? आजच्या जगातल्या स्पर्धेत कसा टिकाव लागणार त्याचा?" साहिलच्या उच्चवर्गीय मित्रांशी सहजतेनं गप्पा मारत उभ्या असलेल्या मेहेरकडं बघत दिनेश म्हणाला.

"दुसऱ्या मुलाचा विचार केलायस?"

दिनेश हसला. "विचार केलाय, पण ते परवडायला नको का? आणि शिवाय आमच्यासारख्या चिंधी मातापित्यांनी अजून एक चिंधी अवलाद कशाला जन्माला घालायची?"

"आणि जर मी तुला सांगितलं की तुला हवं तसं दुसरं मूल आपण जन्माला घालू शकतो, तर? हुशार, देखणं, ताकदवान - म्हणशील तसं बाळ मी तुमच्या पोटी जन्माला आणू शकतो…" प्रसाद त्याच्याकडं रोखून बघत म्हणाला.

"तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये! नक्की मला चढलीये की तू नशेत बोलतोयस?"

"दिनेश, मी जेनेटिक्समध्ये रिसर्च करतो. तू जेनेटिकली मॉडिफाइड बेबीजबद्दल ऐकलंयस? म्हणजे ज्यांच्या जीन्स जन्माआधी हव्या तशा बदलण्यात आल्या आहेत अशी बाळं?"

"प्रसाद, मी शाळेत बॅक बेंचर होतो. मला समजेल अशा भाषेत बोल रे…"

"तू असं कर. तुझी उद्या उतरल्यावर माझ्या लॅबला कॉल करून माझी अपॉइंटमेंट घे. माझं नाव गूगल केलंस की तुला लॅबचा नंबर मिळेल. आपण सविस्तर बोलू. पण लक्षात ठेव - इफ यू वॉन्ट युवर चाईल्ड टू बी बेटर दॅन अदर्स, आय कॅन रिअली हेल्प यू!"

***

शहराच्या बाहेर असलेल्या रिसर्च सेंटरमधल्या प्रसादच्या प्रशस्त ऑफिसमध्ये दिनेश आणि मनीषा बसले होते. लॅबकोट घातलेला प्रसाद घाईघाईनं आत आला.

"सॉरी… लॅबमध्ये एक्स्पेरिमेंट चालू होता, त्यामुळं उशीर झाला," असं म्हणत तो त्याच्या खुर्चीत बसला आणि नमस्कारचमत्कार झाल्यावर त्यानं विषयाला हात घातला.

"सो, तुम्ही इथं आलात याचा अर्थ तुम्हांला जेनेटिकली मॉडिफाइड बेबी जन्माला घालण्यात इंटरेस्ट आहे, राईट?"

दिनेश आणि मनीषानं एकमेकांकडं बघितलं.

"आम्ही थोडंसं ऑनलाईन वाचलं याबद्दल. पण ते जरा डोक्यावरूनच गेलं. तू प्लीज पुन्हा सांगशील का?"

"ऑफ कोर्स! हे बघा, "समोरच्या कागदावर आकृत्या काढत प्रसाद सांगू लागला," पुरुषाचं स्पर्म आणि स्त्रीचं एग यांच्या संयोगातून एंब्रियो तयार होतो. स्पर्म आणि एग यांच्यामधून आईबाबांचे जीन्स, त्यांचा वारसा एंब्रियोमध्ये जातो आणि त्या एंब्रियोचे स्वतःचे जीन्स तयार होतात. हाच एंब्रियो आईच्या गर्भात वाढतो आणि बाळ म्हणून जन्माला येतो. बरोबर?"

"बरोबर!"

"दिनेश, तू त्या दिवशी म्हणालास की तुमच्या पोटी जन्माला येणारं बाळ सामान्यच असणार वगैरे. समज तुझं स्पर्म आणि वहिनींचं एग यांचा लॅबमध्ये संयोग करून एंब्रियो तयार केला आणि मग त्याच्या जीन्समध्ये हवे ते बदल करून मगच त्याला वहिनींच्या पोटात ट्रान्स्फर करता आलं तर? मग तुम्हांला पाहिजे तसं बाळ जन्माला घालता येईल. बरोबर ना? अरे याच आहेत जेनेटिकली मॉडिफाइड बेबीज…"

"हे शक्य आहे?"

"हो, आता शक्य झालंय - २०१२मध्ये शोधल्या गेलेल्या 'क्रिस्पर' नावाच्या तंत्रज्ञानामुळं!" प्रसादनं लॅपटॉपवर एक चित्र उघडलं. कात्रीनं डीएनएच्या दोन हेलिकल नागमोडी स्ट्रॅन्ड्सचा एक तुकडा कापून तिथं दुसरा तुकडा जोडण्यात येतोय असं ते चित्र होतं. "समज शंभर पानी डॉक्युमेंटमधला एखादा शब्द तुला बदलायचा असेल तर तू 'फाईंड-रिप्लेस' ही आज्ञा वापरून तो शब्द शोधशील, डिलीट करशील आणि त्या जागी दुसरा शब्द टाईप करशील, बरोबर? त्याप्रमाणं 'क्रिस्पर' तंत्रज्ञान वापरून इच्छित पेशींमधल्या डीएनएचा फक्त हवा तेवढाच तुकडा कापता येतो किंवा हवं तिथं नवा तुकडा घालता येतो. आणि हे तंत्रज्ञान आपल्याला एंब्रियोवर वापरता येतं…"

ते दोघं थक्क होऊन त्याच्याकडं बघत होते. तो हसत म्हणाला, "अरे असं काय बघताय? हे टेक्निक साधंसुधं नाहीये. हे शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल प्राईझ मिळालंय!"

क्रिस्पर
(चित्र इंटरनेटवरून साभार)

मनीषानं घसा खाकरला, "मी एक प्रश्न विचारू का?"

प्रसादनं मान डोलावली.

"मी असं वाचलं की जन्माआधी बाळाच्या जीन्समध्ये असे बदल करून आपल्याला हवी तशी बाळं जन्माला घालणं हे नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे म्हणून! म्हणजे सगळेच पालक असं करायला लागले तर त्यांच्यात काँपिटिशन वगैरे सुरू होईल…"

दिनेशनं तिच्याकडं आश्चर्यानं बघितलं. प्रसादलाही तिच्याकडून हा प्रश्न अनपेक्षित असावा. तो तिच्याकडं रोखून बघत म्हणाला, "होय, हे टेक्निक बरंच वादग्रस्त आहे. नीतितज्ज्ञांनी अशा बाळांना 'डिझायनर बेबीज' असं नाव दिलंय - मुद्दाम डिझाईन केलेली बाळं. पण वहिनी, या पाश्चात्त्य नीतितज्ज्ञांचं ऐकायची काय गरज आहे आपल्याला? ते त्यांच्या देशात क्रिस्पर वापरून उगवलेल्या जेनेटिकली मॉडिफाइड भाज्या, फळं सर्रास खाणार, बाकी अनेक गोष्टींसाठी क्रिस्पर वापरणार आणि वर जगाला फुकटचे धडे देणार! मला सांगा, आपल्या मुलांना जास्त मार्क्स मिळावेत म्हणून आपण महागाचे क्लास लावतो, शर्यतीत वेगात पळता यावं म्हणून चांगले ब्रँडेड शूज घेऊन देतो. मग आयुष्याच्या शर्यतीत मूल मागं पडू नये म्हणून जन्माआधीच पालकांनी त्याच्यात थोडे बदल केले तर कुठं बिघडलं?"

"पण काय रे, नक्की कसले बदल करता येतात जीन्समध्ये? म्हणजे होणाऱ्या बाळात कायकाय गुण आधीच घालता येतात?" दिनेशनं अधीरतेनं विचारलं.

प्रसादनं हसून लॅपटॉपवरची दुसरी विंडो उघडली. त्यावर एका 'कोऱ्या' बाळाचं चित्र होतं आणि खाली बाळात घालता येणाऱ्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची छोटी चौकोनी चित्रं होती. त्यातल्या एकेका चित्राला टच केल्यावर ते ते वैशिष्ट्य त्या कोऱ्या बाळाच्या चित्रात यायला लागायचं. प्रसाद भराभर टच करत गेला आणि बाळाची चित्रंही बदलत गेली. निळ्या डोळ्यांचं बाळ, लांब केसांचं बाळ, उंच बाळ, ताकदवान बाळ, अवघड गणित सोडवणारं बुद्धिमान बाळ, लवचिक शरीराचं बाळ- बदलत्या चित्रांबरोबर दिनेशच्या चेहऱ्यावरची हावसुद्धा वाढत गेली!

"पाहिलंस? आम्ही आमच्या लॅबमध्ये अशी भरपूर जेनेटिक टारगेट्स शोधून काढलीयेत. त्या त्या जीन्स बदलल्या की अगदी हव्या त्या प्रॉपर्टीज असलेलं बाळ जन्माला घालता येईल आपल्याला. अरे अगदी सुपरमॅनलासुद्धा जन्म देऊ आपण!" प्रसाद हसत म्हणाला.

मनीषा पुन्हा खाकरली, "मी अजून एक प्रश्न विचारू का?"

दिनेशनं तिच्याकडं रागानं बघितलं, पण प्रसादनं हातानंच 'विचारा' अशी खूण केली.

"मी असंही वाचलं होतं की सध्या हे टेक्निक अगदी मर्यादित प्रमाणात वापरायला परवानगी आहे म्हणून- तेही जेव्हा आईवडिलांकडून एखादा आनुवंशिक रोग मुलात जायची शक्यता असते तेव्हा फक्त त्या रोगाच्या कॅरियर जीन्स बदलण्यासाठीच. आणि त्यालाही बऱ्याच परवानग्या मिळवाव्या लागतात. पण तसा कुठला रोग आम्हांला नाहीये, आणि तुम्ही आत्ता दाखवलेले गुणधर्म - जे होणाऱ्या बाळात घालता येतील - ते कुठल्या रोगाशी संबंधित नाहीयेत. त्या एक प्रकारच्या 'एन्हान्समेंट्स' आहेत. मग त्यांना परवानगी कशी मिळणार?"

"वहिनी, मी या क्षेत्रातला एक्स्पर्ट झालोय, ही मोठी लॅब थाटून बसलोय ते सगळं उगीच का? तुम्हा दोघांचं जेनेटिक टेस्टिंग आपण इथंच करायचं. मग तुमच्या रिपोर्टमध्ये काय लिहायचं, तुमच्या एंब्रियोमधल्या कुठल्या आनुवंशिक रोगांच्या जीन्स बदलायची गरज आहे ते दाखवायचं आणि त्यासाठी परवानग्या कशा मिळवायच्या ते तुम्ही माझ्यावर सोडा. त्याची काळजी तुम्हांला कशाला? तुम्हांला आयुष्यात जे मिळालं नाही ते तुमच्या बाळाला मिळावं अशी तुमची इच्छा आहे नं? मग त्यासाठी तुम्हांला हवं तसं 'कस्टमाईझ्ड' बाळ जन्माला आणून दिल्याशी कारण!"

"आणि याला साधारण खर्च किती येईल?" दिनेशनं विचारलं.

"ते तुम्हांला बाळामध्ये कायकाय हवंय त्यावर ठरेल. आमच्याकडं वेगवेगळी पॅकेजेस आहेत - बेसिक जीएम बेबीज, ॲडव्हान्स्ड जीएम बेबीज, सुपर-कस्टम बेबीज वगैरे. ते सगळं माझी असिस्टंट तुम्हांला सांगेल. तुमचा निर्णय झाला की मला कळवा. ओके?"

***

निखिल जिन्याच्या पायऱ्या झपाझप चढत होता. आपली आनंदाची बातमी कधी एकदा आईबाबांना, विशेषतः बाबांना, सांगतो असं त्याला झालं होतं. त्याची शाळेतली प्रगती जेमतेम होती आणि त्यामुळं बाबा त्याच्याबाबत नेहमीच नाराज असायचे, पण ती नाराजी नक्की त्याच्यावर की स्वतःवर असायची हे त्याला कळायचं नाही. पण मागचे काही दिवस बाबा कुठल्यातरी वेगळ्याच विचारात होते. त्याच्याशी नीट बोलत नव्हते. त्याच्याबद्दलच्या सगळ्या आशा अगदी सोडूनच दिल्यासारखं वागत होते. त्यामुळं आजची बातमी सांगून त्याला त्यांना खुश करायचं होतं.

घराचं दार हलकेच उघडून तो आत आला. बेडरूमचा दरवाजा बंद होता, पण आतून आईबाबांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता.

"तुम्ही खरंच या सगळ्याचा सिरियसली विचार करताय?"

"किती वेळा एकच प्रश्न विचारशील?"

"दिनेश, मी इंटरनेटवर वाचलंय की त्या क्रिस्पर टेक्निकचा मानवी एंब्रियोवरचा वापर किती सेफ आहे, त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हेही अजून नीट सिद्ध झालेलं नाहीये. बाळ जन्माला यायच्या आधी त्याचे जीन्स बदलले तर त्याचा परिणाम त्या बाळावरच नव्हे तर पुढच्या पिढ्यांवरही होऊ शकतो… मग आपण इतका धोका का घ्यायचा?"

"मनीषा, तू डॉक्टर आहेस का? प्रसाद म्हणालाय नं सेफ आहे, मग माझा त्याच्यावर विश्वास आहे."

"अहो, पण प्रसाद आपण क्वालिफाय व्हावं म्हणून खोटे रिपोर्ट द्यायलासुद्धा तयार आहे. अशा माणसावर आपण कसा विश्वास ठेवायचा?"

"पुरे मनीषा! मला हे करून बघायचंय. मला आपल्या सामान्य, इंपरफेक्ट जगण्याचा उबग आलाय. आणि त्यात आपल्याकडून काही बदल होऊ शकणार नाही हेही मला माहितीय. अगं आपली तेवढी कुवतच नाही! जर कुणी बदल घडवून आणू शकेल तर ते जन्मतःच परफेक्ट असलेलं आपलं बाळ! त्याला जन्माला घालायचं आणि कुठलीही कसूर न ठेवता वाढवायचं हेच आता माझं ध्येय आहे."

"आणि निखिलचं काय? या बाळाला वाढवताना निखिलकडं दुर्लक्ष झालं तर? आपल्याकडून दोघांमध्ये भेदभाव झाला तर? त्याचं निखिलला वाईट वाटलं तर?"

"मूर्खासारखं बोलू नकोस तू मनीषा! हे जन्मतःच आदर्श जीन्स घेऊन येणारं बाळ आपल्या सगळ्यांनाच - अगदी निखिललासुद्धा - कुठल्या कुठं घेऊन जाईल हे समजत नाहीये का तुला? त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे?" दिनेशचा आवाज चढत चालला होता.

"अहो पण पैशांचं काय? प्रसादचं बेसिक जीएम पॅकेज पन्नास लाखांचं, बाळात अजून स्पेशल कस्टमायझेशन्स हवीत तर कोटीच्या वर खर्च! निखिलला साधा पियानो घ्यायचाय तर पैसे नाहीत म्हणून तुम्ही नकार देत असता आणि आता इतके पैसे आणणार कुठून?"

"पुन्हा तेच! काय सारखं 'निखिल, निखिल' लावलंयस? आपल्याच जीन्स आहेत त्याच्यात मनीषा - असं काय खास पोटेन्शियल दाखवणार आहे तो? आणि पियानो शिकून काय पुढं पोट भरणार आहे का त्याचं? त्याच्या भविष्याची काहीतरी सोय बघीन मी, पण मला जेनेटिकली मॉडिफाइड बाळ हवंय म्हणजे हवंय! त्यासाठी पैशाची सोय कशी करायची ते मी बघेन, पण तू त्यात अजिबात मोडता घालू नकोस, समजलं?"

रागारागानं दिनेशनं बेडरूमचा दरवाजा उघडला. त्याच्या एकच क्षण आधी त्यांचं बोलणं ऐकून पाण्यानं डोळे डबडबलेला निखिल तिथून निघून गेला होता.

***

ऑफिसच्या दारावरचं नाव वाचून दिनेशनं दार वाजवलं.

"कम इन," आतून हसरा आवाज आला. डोक्यावरच्या पांढऱ्याजर्द केसांना मॅचिंग अशी पांढरी साडी नेसलेल्या सौम्य पण रुबाबदार स्त्रीनं दिनेशचं स्वागत करून त्याला बसायला सांगितलं.

"मीच डॉक्टर दीक्षित. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन शाळेत मला भेटायला आलात त्याबद्दल थँक्स," ती स्त्री म्हणाली.

"हे बघा मॅडम, निखिल अभ्यासात ढ आहे हे मला माहीत आहे, पण त्याबद्दल तक्रार करायला तुम्ही मला बोलावलं असेल तर मी काही करू शकत नाही. अहो त्याचं डोकंच…" दिनेश पुढं काही बोलणार इतक्यात दीक्षित बाईंनी त्याला हातानं थांबवलं.

"दिनेश, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुम्ही याआधी कधी शाळेत आला नसाल, म्हणून तुम्हांला कदाचित माहीत नसावं, पण मी निखिलची वर्गशिक्षिका किंवा प्रिन्सिपॉल नाही. त्याच्या अभ्यासाबद्दल कसलीही तक्रार करायला मी तुम्हांला बोलावलेलं नाही. मी शाळेतल्या मुलांची सायकॉलॉजिस्ट आहे, आणि निखिलबद्दल मला खास तुमच्याशी बोलायचंय." त्या क्षणभर थांबून पुढं म्हणाल्या, "मागचे काही दिवस निखिल खूप निराश, उदास वाटला म्हणून मी त्याच्याशी मुद्दाम बोलले. तो म्हणाला की तुमची ठाम खात्री झालीये की तो आयुष्यात काहीही खास बनू शकणार नाही. त्याच्याकडून तुम्हांला काहीही होप्स नाहीयेत. आणि याचं त्याला खूप वाईट वाटतंय. त्यानं असंही सांगितलं की तुम्ही एक स्पेशल गुण असलेलं जेनेटिकली मॉडिफाईड बाळ 'ऑर्डर' करण्याकडं लक्ष केंद्रित केलंय."

दिनेशचा पारा अचानक चढला, "हे बघा मॅडम, तो सर्वस्वी आमचा कौटुंबिक निर्णय आहे. त्यात ढवळाढवळ करायचं तुम्हांला काहीही कारण नाहीये. आणि आम्ही जे काही करू ते रीतसर परवानग्या घेऊनच करू."

"तुमचा पुन्हा गैरसमज होतोय! तुम्हांला हवं असलेलं जेनेटिकली मॉडिफाइड बाळ कायद्याच्या चौकटीत बसतं का हा माझा प्रश्न नाहीये. कारण ते तसं नसलं तर त्याचे परिणाम तुम्हांला भोगावेच लागतील."

"हो ना? मग झालं तर! त्याचा विचार आम्ही करू. आमच्या एका अपत्याला चांगलं भविष्य मिळावं यासाठी ही रिस्क घ्यायची आमची तयारी आहे," दिनेश ताडकन म्हणाला.

"आणि त्याचा दुसऱ्या अपत्यावर विपरीत परिणाम झाला तरी? दोन अपत्यांमध्ये अंतर निर्माण झालं तरी?" दीक्षित बाई शांतपणे म्हणाल्या.

दिनेश काही बोलला नाही.

"दिनेश, मी स्वतः जेनेटिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलंय. मी या विषयावर खूप वाचत असते. क्रिस्परचे बाकी गोष्टींसाठी असलेले अनेक फायदे मला माहीत आहेत. अानुवंशिक आजार बाळात जाऊ नयेत म्हणून त्याच्या जीन्समध्ये एंब्रियो अवस्थेतच बदल करणंसुद्धा मी समजू शकते. पण त्या नावाखाली पालकांना 'डिझायनर बेबीज' बनवून देणारी जी क्लिनिक्स सुरू होतायत त्याला माझा आक्षेप आहे. मला सांगा, याच्या मागं लागून तुम्ही अगदी सर्वात बेस्ट डिझायनर बेबी बनवू शकणार आहात? तुमच्या क्लिनिकनं तुम्हांला वेगवेगळी पॅकेजेस दाखवलीच असतील - लांब केसांची मुलगी हवी असेल तर इतके पैसे, पण त्या लांब केसांना वेगळी चमक हवी असेल तर एक्स्ट्रा पैसे, जन्मतःच गणितात हुशार बाळाची एक फी, पण गणित आणि भाषा दोन्ही हवं असेल तर जादा पैसे- हो नं? म्हणजे तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी तुमच्या बाळापेक्षा ॲडव्हान्स्ड बाळ कुणीतरी बनवेलच. मग ही हाव कधी संपणार? आधीच वर्ण, जात, रंग, पैसा यावरून आपल्यात काय कमी भेदभाव आहेत का? मग त्यात ज्यांना जीएम बेबीज परवडतात त्यांची 'डिझायनर' मुलं आणि बाकीच्यांची 'कॉमन' मुलं यांच्यातल्या फरकामुळं हे भेद वाढले आणि त्यातनं आपसात संघर्ष सुरू झाला तर? घाबरवायचं म्हणून सांगत नाही, पण असे रिपोर्ट्स आलेयत की काही देश लोकांमध्ये जेनेटिक बदल करून जगावर सत्ता गाजवायच्या दृष्टीनं 'सुपर ह्युमन्स' किंवा 'सुपर सोल्जर्स' तयार करायच्या प्रयत्नात आहेत. मानवजातीसमोर हा केवढा मोठा धोका उभा आहे! अशा वेळी प्रत्येकानं या तंत्रज्ञानाचा वापर विचारपूर्वक करायला नको का?"

दिनेश लक्षपूर्वक ऐकत होता. रियुनियनच्या वेळी आपल्यात जाग्या झालेल्या इन्सिक्युरिटीज आणि त्याला प्रसादनं घातलेलं खतपाणी यामुळं सारासार विचार न करता आपण वेड्यासारखे वहावत तर गेलो नाही?

"पण अशा डिझायनर बेबी तयार करणं जर चुकीचं असेल तर काय आमच्यासारख्या सामान्य लोकांनी सामान्य जीन्स असलेली आणि तसलंच सामान्य आयुष्य नशिबी असलेली मुलं जन्माला घालत राहायची?" त्यानं विचारलं.

"तुम्हांला असं वाटत असेल की एकदा जन्माला आल्यावर आपल्या जीन्स बदलतच नाहीत, तर तसं नसतं दिनेश! जन्मतः मिळालेल्या जीन्सची मूळ संरचना जरी बदलली नाही तरी त्या जीन्समध्ये साठवलेली माहिती आपल्यावर कसा परिणाम करणार आहे, ते - ज्याला जीन एक्स्प्रेशन म्हणतात - आपण जगताना बदलू शकतं. 'एपिजेनेटिक्स' नावाची बायोटेक्नॉलॉजीची एक पूर्ण शाखा याच्या अभ्यासाला वाहिलेली आहे! अगदी सोपं करून सांगायचं तर एखादं मूल भले हुशारीची जीन घेऊन जन्माला येईल, पण कदाचित ती जीन आयुष्यभर 'टर्न ऑन' होणारच नाही आणि त्या मुलाकडून विशेष काहीच अचिव्ह केलं जाणार नाही. याउलट दुसरं मूल कष्टाळूपणाची, चिकाटीची जीन घेऊन जन्मलं असेल, ती जीन वयाबरोबर अधिकाधिक एक्प्रेस होईल आणि त्या जोरावर ते मूल बरंच काही मिळवेल."

"पण हे जीन एक्प्रेस होणं किंवा टर्न ऑन होणं कशावर अवलंबून असतं? तो काय लाईट स्विच थोडाच आहे?"

"तुम्ही अगदी बरोबर उपमा दिलीत! स्विचसारख्याच या जीन्स ऑन-ऑफ होऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हा स्विच बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातात असतो! आपलं खाणंपिणं, व्यायाम, आजूबाजूचं वातावरण, मनावरचा स्ट्रेस, नात्यांमधला तणाव, विचारांतली आणि वागण्यातली सकारात्मकता अशा अनेक घटकांचा परिणाम जीन एक्सप्रेशनवर होत असतो. लहान मुलांच्या बाबतीत तर हे अजूनच महत्त्वाचं आहे. लहानपणी त्यांची डेव्हलपमेंट चालू असताना पालकांचा त्यांना सपोर्ट असणं, मुलांवर कुठला अनावश्यक ताण नसणं, शिकण्याच्या वेगवेगळ्या संधी त्यांना उपलब्ध असणं या गोष्टींचे 'सिग्नल्स' त्यांच्या कोवळ्या जीन्समध्ये साठवले जातात. या सिग्नल्समुळं मोठं झाल्यावर त्यांचं जीन एक्स्प्रेशन बदलू शकतं आणि आलेल्या अडचणींचा मुकाबला करायला, आपल्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायला आणि समाजाचे सक्षम नागरिक बनायला त्यांच्या जीन्स त्यांना मदत करू शकतात."

"म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जन्मतःच चांगल्या जीन्स घेऊन येणं म्हणजे सगळी लढाई जिंकणं असं नाहीये, उलट मुलांना आपण कसं वाढवतो याचाही त्यांच्या जीन्सवर परिणाम होतो?"

"१००% बरोबर, इट इज 'नेचर अँड नर्चर' बोथ! आणि हे माझं म्हणणं नाही, तर विज्ञानानं सिद्ध केलेली गोष्ट आहे, "दीक्षित बाई हसत म्हणाल्या," आणि म्हणून मी तुम्हांला विनंती करते, दुसऱ्या बाळाचं काय करायचंय ते तुम्ही ठरवा पण निखिलकडं दुर्लक्ष करू नका. त्याच्या कोवळ्या मनाची आत्ता व्यवस्थित मशागत केलीत तर त्याच्या आयुष्याचं रोप कसं तरारून येईल बघा!"

दिनेशनं खूप काही समजल्यासारखी मान हलवली.

"आणि तुम्हांला बघायचं असेल की पॉझिटिव्ह वातावरण, नवनवीन संधींची उपलब्धता मुलांना कुठल्या कुठं घेऊन जातात, तर आत्ता खाली आमच्या म्युझिक रूममध्ये जा - तिथं निखिल पियानो वाजवायची प्रॅक्टिस करत असेल. सहा महिन्यांपूर्वी त्याला पियानोचा एक सूरसुद्धा माहीत नव्हता. त्याच्या बुजरेपणातून, एकटेपणातून बाहेर काढायला, त्याला व्यक्त होण्यासाठी मदत करायला आम्ही त्याला पियानो शिकायला सांगितलं आणि आता तो फार सुंदर वाजवायला लागलाय. इतका सुंदर की एका प्रतिष्ठेच्या इंटरस्कूल म्युझिक काँपिटिशनसाठी आम्ही शाळेतर्फे त्याला पाठवतोय! हे ऐकल्यावर त्याला इतका आनंद झाला होता की आधी तुम्हांला बातमी देण्यासाठी तो उतावीळ होऊन घरी उड्या मारत गेला होता, पण…" दीक्षितबाई बोलायचं थांबल्या.

"पण मी त्याच्या उत्साहावर पाणी फिरवलं!" दिनेश स्वतःशीच पुटपुटला.

***

म्युझिक रूमचा दरवाजा दिनेशनं हलकेच उघडला. पियानोचे मधुर सूर त्याच्या कानावर पडले. एका कोपऱ्यात निखिल एक ग्रँड पियानो वाजवत होता. हडकुळा, लांबुडका, नेहमी अवघडल्यासारखं वावरणारा, खुर्चीवर काहीसा वाकून बसणारा निखिल पियानोसमोर मात्र एकदम नैसर्गिक वाटत होता. घरी तो हवेत बोटं फिरवत बसायचा, ते दिनेशला वेड्यासारखं वाटायचं, पण आता पियानोच्या पट्टयांवरून चपळाईनं आणि लालित्यानं फिरणारी त्याची बोटं विलक्षण सुंदर दिसत होती. आजूबाजूला बसलेले काही विद्यार्थी, शिक्षक मंत्रमुग्ध होऊन त्याचा पियानो ऐकत होते. दिनेश आपल्या लेकाच्या या वेगळ्या अवताराकडं दारातूनच डोळे भरून बघत राहिला.

इतक्यात त्याचा सेलफोन वाजला. डॉक्टर प्रसादचा कॉल येत होता. त्यानं कॉल डिक्लाईन केला, आणि मनीषाला फोन लावला.

"काय हो, कशाला बोलावलं होतं तुम्हांला शाळेत? निखिलबद्दल काही तक्रार वगैरे आहे का?" मनीषानं पलीकडून काळजीनं विचारलं.

पियानो वाजवण्यात तल्लीन झालेल्या निखिलकडं अनिमिष नेत्रांनी बघत दिनेशनं हलकेच विचारलं, "मनीषा, नवीन पियानो साधारण केवढ्याला येतो गं?"

***

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अरे वा हा तर माझ्या आवडीचा विषय! एके दिवशी मी पण एखादी कथा लिहीन. अगदी नवीन विषयाला हात घालून सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या भाषेत हि कथा लिहिल्याबद्दल अभिनंदन.ज्यांना ह्या विषयात रस आहे त्यांनी डॅॅनिएल सौरेझ ह्या विज्ञान कथा लेखकाने लिहिलेली "चेंज एजेंंट" Change Agent (2017) ISBN 978-1-101-98466-6 ही कादंबरी अवश्य मिळवून वाचावी.
पुन्हा एकदा अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा खुप आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************