एक जानेवारी एकनंतर…

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

एक जानेवारी एकनंतर…

- विजय तांबे

एक जानेवारी एकनंतर…

'कुठलीही घटना किंवा प्रसंग सांगताना तो कधी घडला म्हणजे नक्की किती दिवस, महिने आणि वर्षांपूर्वी घडला असं पूर्वी सांगायचे. त्या काळी म्हणजे सलग अंदाजे एकवीसशे वर्षे कालगणनेची एकच प्रथा चालू होती. उदाहरणार्थ सतरा फेब्रुवारी दोन हजार दहा साली अमुक एक घडलं. याचा अर्थ असा की एक जानेवारी एकपासून दोन हजार नऊ वर्षं एका महिना आणि सोळा दिवसांनी ती घटना घडली. हे एक जानेवारी एक कोणी सुरू केलं असं लॅपटॉपवर टाईप केलं तर मला माहीत असलेलंच उत्तर येईल. मुद्दा असा आहे की कोणीतरी जाहीर करतो की भविष्यात वर्तमान निश्चित करण्यासाठी भूतकाळ मोजावा लागेल आणि या मोजणीची सुरुवात आजपासून होईल. हे जाहीर करणारी कोणीतरी खूप वजनदार असामी असल्याने त्याचं ऐकून जनता त्या दिवसाला एक जानेवारी एक म्हणायला सुरुवात करते. भूतकाळात अशा वजनदार व्यक्तींनी आपापल्या काळात आणि भाषेत एक जानेवारी एक सुरू केली असेलही, नंतर काळाच्या ओघात लुप्त झालं असेल. तरीही अशा घटना काही शतकातून एकदाच घडत असाव्यात. आमच्या देशातील सध्याची जनता भाग्यवान आहे. आम्ही सर्व देशबांधवांनी एक जानेवारी एक अनुभवलीय.'

रामभाऊ झरझर डायरी लिहीत होते. सरकारच्या एका खात्यात अनेक वर्षे काम करून ते यथावकाश सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या काळात बढती मिळत गेली आणि नोकरी संपायच्या आधी काही वर्षे ते उपसचिव किंवा अशाच कुठल्या तरी पदावर होते. किंचितसे स्थूल असलेले रामभाऊ कधीच कोणावर चिडले नाहीत. नाकासमोर सरळ चालणाऱ्या या माणसाला नाकाखाली पातळ मिशी आणि नाकाच्या आधाराने चष्मा होता. त्यांचं नाक काही धारदार, टोकदार, बसकं असं वर्णन करण्यासारखं नव्हतं. अगदीच साधं होतं. अनेकांच्या मते त्यांचे डोळे घरे होते पण ते कायम हसून नकार देत. सेवानिवृत्त होताना डोक्यावरचं जावळ विरळ झालं होतं तरी टक्कल नव्हतं. त्यांचा किंचितसा स्थूलपणा कधीही कमी झाला नाही किंवा वयोमानाप्रमाणे ते जाडे झाले नाहीत. सेवानिवृत्तीनंतर नवीन कपडे शिवले नाहीत. घरात कायम पट्ट्यापट्ट्याचा लेंगा आणि अर्ध्या गंजीत राहणाऱ्या रामभाऊंनी आसपास कोणी नाही बघून खोलीचा दरवाजा लावला आणि कपाटाखाली लपवलेली डायरी लिहायला सुरुवात केली. रामभाऊंच्या बायकोला सगळे माई म्हणत. त्या काळाच्या मानानं जास्त शिकल्या होत्या. नोकरी करण्याचा विचार त्यांनी केला होता पण हळूहळू अशक्य होत गेलं. सूनबाईंचं नाव रमा. तीसुद्धा शिकली सवरलेली होती पण तिच्यापुढे नोकरीचा ऑप्शनच नव्हता. रमाचा नवरा म्हणजे रामभाऊंचा सर्वात मोठा मुलगा यशवंत एका फॅक्टरीत कामाला होता. तो कामावर गेला होता. त्यामुळे रामभाऊंना एकांत मिळून डायरी लिहायची संधी मिळाली. माणसाच्या जीवनात घटना अशा काही घडतात की माणूस हबकून जातो आणि अंतर्बाह्य बदलून निश्चयाने काहीतरी करू लागतो. रामभाऊंच्या बाबतीत असंच घडलं. आमचे राजासाब देशाचे राष्ट्रप्रमुख म्हणून निवडले गेले. म्हणजे राष्ट्रप्रमुख नावाची पोस्ट आमच्या देशात नाहीएय. त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि ते पंतप्रधान झाले. हे सर्व काही वर्षांपूर्वीच घडलं. देशबांधवांच्या मनात त्यांचं स्थान राजाचं झालं. त्यांचं खरं नाव आता फारसं कोणाला लक्षात नाहीएय. सगळेजण त्यांना राजासाब असंच म्हणतात. सुरुवातीला सरकारी आदेशावरसुद्धा त्यांची फक्त सही आणि राजचिन्ह असायचं. नंतर छापील आदेश रद्द झाले. मेल यायला लागले. हल्ली कशाचीही गरज नसते. सगळं आपोआप होतं. तर झालं असं की एक दिवस राजासाबनी जाहीर केलं की ज्या दिवशी त्यांनी देशाचे नेतृत्व करण्याची म्हणजे पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन कालगणना सुरू होईल. म्हणजे शपथविधीच्या नंतरचा दिवस एक जानेवारी एक असेल. त्यानुसार सगळ्या सिस्टममध्ये आपोआप बदल होतील. शाळांच्या पुस्तकांपासून सरकारी दप्तरातील नोंदींपर्यंत सगळ्या तारखा बदलल्या जातील. भूतकाळाच्या मांडणीत त्यानुसार बदल होतील. आणि घडलं असं की एक जानेवारी एकपूर्वीच्या सगळ्या तारखा एका जानेवारी एक झाल्या. प्रत्येकजण आपापल्या तारखांचे अर्थ लावण्यात आणि गोंधळ निस्तरण्यात बुडाला. तारखेच्या घोळामुळे अनेक आर्थिक व्यवहार अडकले. बाजारात पैसा फिरेनासा झाला. कारखाने बंद पडायची वेळ आली. कामगारांचे पगार अडकले. शेतकऱ्यांची येणी बुडाली. परिस्थिती बिकट झाली. इकडे रामभाऊंनी तारखेचा अर्थ लावायला सुरुवात केली आणि त्यांना धक्का बसला. ते सैरभैर झाले. घरात वेगाने फेऱ्या मारत बडबडू लागले, ‘माझा मोठा भाऊ, मी, माझा धाकटा भाऊ, माझा मुलगा आणि त्याचा शाळेत जाणारा मुलगा सर्वांची जन्मतारीख आणि लग्नाची तारीख एकच कशी? अशक्य. मग मला नोकरीवर घ्या परत. निवृत्त कशाला केलं?’ असे तारखेच्या घोळाचे अनेक अर्थ काढत रामभाऊ अस्वस्थ होत गेले. जन्मभर कुणाला कुठलाच विरोध न करता घर्षणहीन त्र्याऐंशी ही अचीव्हमेंट असलेल्या माणसाचं वयच राजासाबानं काढून घेतलं होतं. दुसरीकडे राजासाबच्या गुणगानाने देश दुमदुमून गेला होता. रामभाऊ अस्वस्थ होत गेले. आजपासून कालगणना सुरू झाल्यानं कालच्या गोष्टी कालच्या न राहता इतिहासजमा झाल्या. समाजात हळूहळू रुटीन सुरू झालं. जे बुडाले ते दिसेनासे झाले. पडद्याआड गेले. न चुकता मतदान करणाऱ्या रामभाऊंना जेव्हा कळलं की लोकशाही आणि मतदान ही आता इतिहासातली गोष्ट आहे आणि दररोज हेच ऐकायला मिळतंय की सनातन कालापासून राजासाब प्रजेची सेवा करतायत. या सगळ्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांनी निर्णय घेतला की त्यांना वेडं व्हायचं नाही. आपण स्वत:साठीच काहीतरी केलं पाह्यजे. मात्र या अस्वस्थतेबद्दल उपाय सापडत नव्हता. त्याच वेळी समाजात वेगाने बदल घडवले जात होते. सर्वांना तगडं इंटरनेट मोफत दिलं गेलं. प्रत्येकाला लॅपटॉप दिला गेला. कोणी काय बघायचं आणि काय नाही याचा निर्णय सेन्ट्रल सर्व्हर घेऊ लागला. जगातले लाखो सिनेमे सर्वांना मोफत मिळाले. आपली जनता प्रगल्भ आहे हे जाहीर करून जगभरातलं पॉर्न सगळ्या आबालवृद्धांना उपलब्ध करून दिलं गेलं. जगातले सगळे सिनेमे अचानक हातात आल्यावर माई गोंधळून गेल्या. त्यांच्याकडे स्वत:चा लॅपटॉप होता. दुपारी जेवण आवरलं की माई तिच्या लॅपटॉपवर सिनेमा लावून बघत राहायची. जगातल्या सगळ्या भाषांमधले सिनेमे ती आपल्या भाषेत बघत होती. ती बघते म्हणून रामभाऊ बघू लागले. नंतर दोघंही दुपारी घराचा पडदा लावून अंधार करत आणि आपापल्या लॅपटॉपवर आवडीचे सिनेमे बघत. ते व्यसन वाढत चाललं होतं. शेवटी शेवटी दोघेही थेट रात्रीच्या जेवणाच्या वेळी सिनेमातून बाहेर पडत. पण हा पूर लवकरच ओसरू लागला. रामभाऊंनी तिला न बघण्याचं कारण विचारल्यावर माई म्हणाली की नक्की सांगता येणार नाही पण हल्ली डोकं मख्ख झाल्यासारखं झालंय. सतत सिनेमा बघितला की शेवटचा सिनेमा आपण सवयीने बघतो. डोक्यात त्यांचं बोलणं, गोष्ट असं काहीच शिरत नाही. नंतर काही विचार केला तर कुठला तरी सिनेमा आठवतो. रामभाऊ म्हणाले, 'खरं आहे. म्हण आहेच ना, पुराचा लोंढा मूर्खाकडे कायम. आपला पूर ओसरला की. तुला आठवतंय, आपण एखादा सिनेमा बघायचो थिएटरमध्ये. समारंभ असल्यासारखे जायचो. पण तो सिनेमा डोक्यात राह्यचा. हजारो सिनेमे आणून टाकलेत आपल्यासमोर. पूर्वी थिएटरमध्ये दु:खाच्या सीनला लोकं रडायचे. लॅपटॉपवरचे हजारो सिनेमे बघताना रडत नाही कोणी. भावना संपल्यात. मेंदूला इस्त्री मारलीय.' या काळात सिनेमा बघून बाबांनी वेळ घालवला. घरात एकटं असताना पॉर्न बघून घेतलं. त्यांना थ्रिल वाटलं. आपण चोरून काहीतरी करू शकतो याचीच त्यांना मजा वाटली. मग त्यांना एक वाक्य लिहावंसं वाटलं, पण लिहायचं कुठं? म्हणून त्यांनी लॅपटॉपवर पेज ओपन करून लिहिलं 'मी मलाच घातलेली बंधनं मीच दूर केली की जे वाटतं ते थ्रिल का?' हे वाक्य लिहून सेव्ह केलं आणि रिजनल सर्व्हर सेंटरमधून फोन आला.

'काका तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?' विचारणाऱ्याचा आवाज अतिशय प्रेमळ होता.

रामभाऊ म्हणाले, 'नाही.'

'मग असं का लिहिलंत?'

रामभाऊंनी चटकन उत्तर दिलं, 'अरे बाळा, चुकून पॉर्न पाह्यलं. संस्कार ना? म्हणून लिहिलं जे वाटलं ते.'

तो मोठ्यानं हसत म्हणाला, 'काका, बिनधास्त बघा.'

रामभाऊ गंभीर होऊन घरात फेऱ्या मारत पुटपुटले, 'म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये ते बघत असतात.'

वस्तुस्थिती अशी होती की लॅपटॉपमध्ये सिनेमा आणि पॉर्न सोडून तुम्ही दुसरं काही करायला घेतलं की रिजनल सर्व्हर सेंटरला अलर्ट मेसेज जात असे. लॅपटॉपमधून एकमेकाला जाणारे मेल, फोटो, व्हीडीओ, एआयच्या सेन्सॉर स्कॅनमधून पास झाल्यावर पुढे जात. लॅपटॉपचे रेग्युलर स्कॅनिंग होऊन कोण किती रिस्की आहे त्याची ग्रेड ठरविली जात असे. रामभाऊंना एवढंच कळलं की आपण कुठलंही यंत्र वापरलं तर फसणार. पुन्हा तीच अस्वस्थता वाढत चालली. त्यांना काहीच सुचेनासं झाल्यावर त्यांनी घर आवरायला काढलं आणि हाती घबाड लागलं. जुन्या कोऱ्या डायऱ्या, बॉलपेन्स आणि खूप पेन्सिली मिळाल्या. ते नाचायचे बाकी होते.

रामभाऊंनी घर आवरायचं सोडून दिलं. कोऱ्या डायऱ्यांचा वास घेत त्यांनी ठरवलं जे आठवतंय ते लिहायचं. जे दिसतं ते लिहायचं. मग ते खूप दिवस लिहीतच राह्यले. मुलगा कामावर गेला, नातू शाळेला गेला की रामभाऊ कामाला लागत. जसं आठवत जाई तसं लिहून ठेवत. मात्र एखादी घटना नेमकी कधी झाली ते सांगणं त्यांना कठीण होत चाललं होतं. आठवतं ते लिहायचं यात त्यांच्या पहिल्या काही डायऱ्या भरल्या. बारीक अक्षरात मार्जिन न ठेवता ते लिहित. दुकानातून कागद, पेन, पेन्सिल विकत घेऊन कार्ड स्वाईप केलंत की रिजनल सर्व्हर सेंटरमधून प्रेमळपणे विचारलं जाई, 'लॅपटॉप बिघडलाय का? आपण पेपरलेस संस्कृतीतले आहोत. पर्यावरणाचे रक्षक. काही मदत लागली तर सांगा.' मात्र हा प्रॉब्लेम रामभाऊंना नव्हता. जुन्या कोऱ्या डायऱ्या, वह्या आणि पेनपेन्सिलींचा भरपूर स्टॉक त्यांच्याकडे होता.

रामभाऊंचं आता आठवणी लिहून संपत आलं होतं. सुसंगती लागत नव्हती. काळ पुढेमागे होत होता. पण त्याचं त्यांना काहीच वाटलं नाही. जिथं सरकारनं वय गायब केलं तर आपलं थोडं इकडचं तिकडं झालं तर हरकत कशाला असं स्वत:शीच म्हणायचे. ते लिहिलेलं वाचून काढायचे. कधी कधी रिपीट केलेलं आढळायचं. खोडायचे नाहीत. स्वत:शीच हसायचे. आता डोक्यात खूप पुसट होत चाललंय ते त्यांना जाणवायचं. तरीही लिहायचा उत्साह कमी होत नव्हता. लिहिताना थ्रिल होतं. आपल्या बाहेरच्या, आसपासच्या जगापेक्षा डायरीत अवतरणारं जग वेगळं असल्याची सुखद जाणीव आणि खोलीच्या एका कोपऱ्यात चोरून लिहायचं म्हणजे बंड केल्याचा आनंद होता. त्यांना हळूहळू लक्षात आलं की गावं, वेगवेगळी शहरं, देश आहेत हेच आपण विसरत चाललोय आणि त्यांनी आठवणीतली गावं, शहरांची माहिती लिहायला सुरुवात केली. त्यांनी लिहिलं, 'खूप लहान असतानाची गोष्ट. सुटीत गावात आलोय. रानात भावंडांसोबत फिरतोय. हाताला काटा न लागता जाळीतून करवंद काढून खायला शिकलो तेव्हा. भरपूर खाल्ली त्या दिवशी. मला पोहायला शिकायचंय म्हटल्यावर गावाच्या काकांनी मला उचलून फेकलं होतं विहिरीत. प्रचंड घाबरलो होतो. नंतर खूप मजा आली. गावाचं नाव आठवत नाहीएय. पण अशा खूप आठवणी येतात. कॉलेजला असताना शेवटचा गेलो होतो. घराची रया गेली होती. एक एक झाड विकून काका घर चालवत होते. शेती उजाड पडली होती. एका खोलीत काका आणि बाबा खूप वेळ बोलत होते. मला अजून आठवतंय. दोघांचे आवाज चढलेले होते. मी आत गेलो तर बाबा म्हणाले, 'तू बाहेर हो. इथे थांबू नकोस.' आयुष्यात एकदाच वडिलांनी मला खोलीच्या बाहेर काढलं होतं. गावाचं नाव आठवत नाहीएय. कौलारू घरं होती. आता नसतात तशी. आता कौलारू घर म्हणजे काय ते लिहून ठेवायला लागेल. आपण आठवण लिहितोय माहितीकोश लिहीत नाही. काही गरज नाही माहिती लिहायची. आम्ही गावी बसने जायचो. आठ तास लागायचे. पण नाव आठवत नाहीएय.'

मात्र त्यावरून त्यांना आपला बाहेरगावी गेलेला मुलगा आठवला. मग त्यांनी गावं, शहरं सोडून मुलांबद्दल लिहायला घेतलं. त्यांनी लिहिलं, 'तिघांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्क्रीनच्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यांना लॅपटॉप मिळाले. सुरुवातीला शाळेची पुस्तकंसुद्धा होती. नंतर काढून घेतली. सुनंदा शाळेत शिकत असताना वर्गात स्क्रीन लावले. सुनंदा आमची मधली मुलगी. रिजनल सर्व्हर सेन्टरच्या असेसमेंटमधून यशवंता टेक्निकल स्कूलमध्ये गेला. सुनंदाने शाळा पूर्ण केल्यावर तिला कौन्सेलिंगला बोलावलं. काही स्थळातून एका मुलगा निवडायला सांगितला. तिनं चांगल्या पोस्टवरचा नवरा निवडला. लग्नानंतर भेट झाली नाही. आमचा धाकटा जगू हुशार. त्याला उच्च शिक्षणासाठी सरकारनं उचललं. लांब असतो कुठे तरी. खरं तर आम्हाला इथं राह्यला परवानगी नाही. रिटायर झालेल्याने कॉमनमध्ये जायचं असतं. इथं राहतो त्याला नॉर्मल म्हणतात. इथे फक्त नोकरी करणारे राहतात. पण जगूने आमच्याशी संबंध ठेवणं गरजेचं असल्याचं पत्र दिलं. यशवंताचं शिक्षण पूर्ण झालं आणि सरकारने त्याला एका फॅक्टरीत नोकरी दिली. कौन्सेलिंगमध्ये त्याला रमाचं स्थळ सुचवलं. यशवंतला आवडली. सरकारने दोन वर्षांनी मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. आता आम्हाला नातू आहे. माईनं संसार टुकीने रेटला, मुलांना मायेनं वाढवलं. आता माया नाहीच ठेवायची का? रामभाऊंना सुनंदा आणि जगू भेटलेच नाहीत. माईला किती टोचत असेल. जगू जाताना तसा लहान होता. त्याला तेव्हाही माहीत होतं की आपण परतणार नाही. सुनंदा आलीच नाही भेटायला. आपण तिच्याकडे कसे जाणार. ती कुठंय तेच माहीत नाही. माया आधीच आटून गेलीय आता आठवणी आटत चालल्यात का?' रामभाऊ डायरी बाजूला ठेवून फेऱ्या मारत राह्यले. संध्याकाळी त्यांनी उद्या काय करायचं ते ठरवलं आणि मग ते शांत झाले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या शाळेतल्या मित्रांच्या आठवणी लिहायला घेतल्या. नावं आठवत नव्हती त्याचा त्रास झाला. नावाशिवाय आठवण खरी कशी मानायची असा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी लिहिलं, 'माझ्या लहानपणी शाळा होत्या. शिक्षक होते. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक होते. काही कंटाळवाणं शिकवायचे, काही खूप प्रेमळ होते. शिक्षिकाही होत्या. छे छे हे फारच रटाळ होतंय. आम्ही खूप धमाल केली. आम्ही आमच्या मस्तीत आणि आमच्यातच रमलेलो असायचो. सारखं लक्ष ठेवून दटावणाऱ्या पोलिसांसारखे शिक्षक नव्हते. मर्यादेतल्या मस्तीला सूट होती. वर्गात मुलीसुद्धा होत्या. आमच्या ग्रुपमधल्या एकाचं सातवीत प्रेम जमलं. नंतर लग्नही तिच्याबरोबर केलं. सातवीपासून ते मोठ्या जोडप्यासारखे वागत. ती त्याच्यासाठी चोरून उपवास करे. दुसऱ्या शाळेतली मुलं शत्रू वाटत. एवढंच काय, वर्गातल्या मुलीसुद्धा शत्रूपक्षात होत्या तरीही प्रत्येकाच्या मनात एका मैत्रीण होती. तिनं आपल्याशी बोलायला पाह्यजे ही इच्छा तीव्र होती. त्यावरून मित्रांच्यात तासनतास गप्पा व्हायच्या. घराच्या आसपासचे मित्र वेगळे. शाळेतले मित्र वेगळे. त्यातले काही एकदम खास असत. काही जवळचे. सर्वांमध्ये हेवेदावे होते पण प्रेमही होतं. मित्रासाठी काहीपण. हा डायलॉग फेमस होता तेव्हा. यातलं काहीही घरी कळायचं नाही. कोण कुणाला परत भेटत नाही हे आता मुलांना लहानपणीच कळलंय. आईवडलांना खूष ठेवून फायदा नाही. एआयला आपल्याकडून काय हवंय यावर सतत लक्ष ठेवून राह्यचं. त्याला खूष ठेवायचं. आता कोणी कोणाचे मित्र नाहीत. प्रत्येक ॲक्टिविटीला पॉईंट्स आहेत. ते मिळवायला सतत जिंकत राहावं लागतं. खेळातही जिंकावं लागतं. स्वत:चे पॉईंट्स मिळवायला लागतात की एआय तुमची टार्गेट टफ करत जातो. मग मूल आपोआप दुसऱ्याचे पॉईंट्स कसे कमी होतील ते बघतं. एआय मुलाचं मूलपण कमी करत नेऊन त्याला हवं तसं मूल घडवतं.' रामभाऊंनी डायरी बंद केली. यशवंत फॅक्टरीतून घरी यायची वेळ झाली होती.

तिकडे फॅक्टरीत यशवंत काम करत असताना मोबाईल वाजला. जॅमर असताना मोबाईल वाजला म्हणजे नक्कीच इमर्जन्सी असणार असं स्वत:शीच म्हणत यशवंतनं हातातलं काम पटकन सोबत्याला दिलं आणि मेसेज उघडला. सिस्टीम जनरेटेड होता. 'आपल्या तांत्रिक ज्ञानाने देशामधील सार्वत्रिक ऑटोमेशनच्या कार्यात आपण मोलाची भर घातली आहे. याबद्दल अभिनंदन. या कामी आपण आतापर्यंत भरपूर कष्ट उपसलेत. अहोरात्र काम केलंत. यापुढे आपण आपल्या कुटुंबासोबत राहून आराम करावा. आपला पगार दर महिन्याला आपल्या खात्यात जमा होईल. पुन्हा एकदा आपल्या योगदानाबद्द्ल शुभेच्छा.' मुलाला कळलं आज आपला कामावरचा शेवटचा दिवस. असा तो एकटा नव्हता. एकदोन दिवसाआड आसपासच्या कोणालातरी असा मेसेज यायचा. मग उरलेले जाणाऱ्याला विश करायचे.

एकदा यशवंतने रामभाऊंना विचारलं होतं, 'तुमच्या वेळी कसं होतं?'

रामभाऊ सिनेमा बघत म्हणाले, 'माझे मित्र कोण होते? त्यांची नावं काय? आमची मैत्री कशी झाली? कशी टिकली? जास्त काही आठवत नाहीएय.'

'बाबा, तुमचं कॉलेज, भावंडं, आईबाबा, ऑफिस काहीतरी आठवत असेल ना?'

'खूप वर्षं झाली रे. एकदा वेगळे झाल्यावर कुणीच कुणाला भेटलेलं नाही. तुमचे आजीआजोबा आपल्यासोबत नव्हते. कुठं राह्यचे ते? कधी गेले? काही कळलंच नाही ना.' रामभाऊंचे हे बोलणे ऐकल्यावर आपले वडील आठवणी सांगत नाहीत असा यशंवतचा संशय होता. रामभाऊंच्या बाबतीत वेगळं होतं. ते स्वत:च्या मनाशीच बोलत म्हणाले, 'समजा सगळ्या आठवणी घडाघडा बोललो आणि ते यशवंताने तिसऱ्याला सांगितलं तर कानोकानी होऊन शेवटी सर्व्हर सेंटरचे ऑफिसर आपल्याला भेटायला येतील.' त्यांना आपल्या डायऱ्या सापडल्या तर काय होईल ही भीती होती. ऑफिसमधला मित्र आठवला. दिलखुलास आणि उमदा होता. काय भन्नाट किस्से सांगायचा. आठवणी, इतरांच्या गमतीजमती, सांगोवांगीच्या गोष्टी असा भरगच्च स्टॉक होता त्याच्याकडे. अफलातून सांगायचा. सगळं दृश्य उभं करायचा. ऑफिसमध्ये तो फेमस होता. एका दिवस सर्व्हर सेन्टरच्या ऑफिसमधून त्याला बोलावणं आलं. तीनचार दिवसानंतर तो कामावर आला तो वेगळाच होता. रिटायर होईपर्यंत कोणाशी काहीच बोलला नाही. काम करायचा. निघून जायचा. चेहरा मख्ख असायचा. रिटायरमेंटनंतर तो कॉमनमध्ये राह्यला गेला.

यशंवतला पुढचे मेल यायला लागले. पुढील तीन आठवड्यात तुम्हाला कॉमनमध्ये फ्लॅट अलॉट होईल. दुसरा मेल होता तुमच्या मुलाचे ॲडमिशन कॉमनच्या शाळेत होईल. मधल्या तीन आठवड्यात यशंवत आणि रमाने अनेक ठिकाणी अर्ज केले. शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वसाधारण कामात महिलांना नोकरी देण्यात प्राधान्य नव्हतं. दुसऱ्या कोणाशीच तुलना होणार नाही अशा महिलांना राष्ट्राच्या प्रगतीसाठी नोकरी, व्यवसायास परवानगी होती. रमाच्या सासूबाई पूर्वी नोकरी करत होत्या. मात्र या धोरणांतर्गत त्यांच्यासारखा अनेक माहिलांना नोकरीवरून कमी केले गेले. त्या वेळी त्यांना नेहमीच्या पगारापेक्षा एकदाच मोठी रक्कम दिली. महिलांनी प्रामुख्याने घराची जबाबदारी घ्यावी, असे अधिकृत धोरणही जाहीर करण्यात आले. कोणत्या तरुणीस नोकरी व्यवसायास परवानगी द्यायची यापासून कोणत्या मुलीस कोणती स्थळे सुचवायची हे काम सेन्ट्रल सर्व्हर बिल्डिंगमधील फॅमिली मॅनेजमेंट ॲण्ड हॅपिनेस डिपार्टमेंटचा एआय करत आहे. शाळेपासून मुलीचा शाळेचा निकाल, ती कोणत्या उपक्रमात भाग घेते, कोणत्या फिल्म लॅपटॉपवर बघते अशा विविध प्रकारच्या डाटातून निर्णय घेतला जात असे. हे सर्व रमाला माहीत होतं तरीही ती अर्ज करत राह्यली कारण कुठेही सिलेक्शन झालं असतं तर कॉमनला जायची गरज नव्हती. त्यांच्या प्रत्येक अर्जावर एआयचे उत्तर होते, 'सर्व शक्यता तपासून आम्ही निर्णय घेतला आहे. कृपया पुन्हा पुन्हा अर्ज करू नये.' एकदा कॉमनमध्ये गेलं की कोणी परत येत नसतं. कॉमनमध्ये नक्की काय असतं याची माहिती कोणालाच नव्हती. रचना उतरंडीची होती. खरं तर उच्च स्तरावरील मंडळींना सगळीकडची माहिती होती. पण बाकी त्यांच्या खालच्या लोकांना एकमेकांची माहिती नव्हती. नॉर्मल माणसाला कॉमन माहीत नव्हतं पण कॉमनमध्ये येणारा माणूस कुठून तरी येतो. येताना बाहेरची माहिती घेऊन येतो. ती शेवटची माहिती. नंतर त्यालाही बाहेरचं कळत नाही. खरं तर एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी समजणारच नाही अशी रचना होती. जसजसे दिवस संपत आले तसा यशवंत खूप हळवा झाला. कारखान्यात अनेक वर्षे काम करत होता. अपग्रेडेशनच्या प्रत्येक कामात त्याचा पुढाकार होता. नवीन टेक्नोलॉजी बघताना त्याला छान वाटत होतं. आता बसून पगार खायची कल्पना त्याला त्रासदायक वाटत होती. तीन आठवडे संपले. कॉमनची अलॉटमेंट आली. मुलाच्या ॲडमिशनचं नक्की झालं. जायच्या तारखेचा शेवटचा मेल आला.

Barricades

जायच्या दिवसापर्यंत रमा आणि यशवंत सामानाची बांधाबांध करत होते. घराच्या एका कोपऱ्यात रामभाऊ आणि माई नातवाला घेउन बसले होते. राजासाब नेहमी सांगत असत एकदा वेगळे झालात तर पुन्हा भेटीची शक्यता नाही. त्यासाठी एवढं हळवं व्हायची गरज नाही. देशातली सगळी प्रजा एकमेकाची नातेवाईक आहे. शेजाऱ्यांवर प्रेम करा. आपल्याला देश पुढे न्यायचाय हे विसरू नका. अनावश्यक भावनिक होऊ नका. रमा सामान भरत असताना अचानक रामभाऊ समोर आले. त्यांच्या हातात कोऱ्या वह्या आणि डायऱ्यांचा गठ्ठा होता. हातातल्या पिशवीत पेनपेन्सिली होत्या. ते रडत रडत म्हणाले, 'तुला माहीत आहे मी लिहून ठेवतो. मला हळूहळू आठवणं बंद होत चाललंय. तुला होतं का तसं? तुझं लहानपण, तिकडची माणसं, तुझी शाळा, मैत्रिणी असं काही आठवतं का? मी मित्रांची, नातेवाईकांची, गावांची नावं विसरायला लागलोय. मला वाटतं आपला ओळखीचा प्रदेश कमी होतोय. तुझ्या आसपासचा परिसर आणि मिळते तेवढी माहिती एवढाच ओळखीचा प्रदेश उरतो. हे घे. डोळे सताड उघडे ठेवून बघ. एक जानेवारी एकला किती जणांचे नुकसान झाले? कोण भुकेनं मेलं? कोण जगण्यातून उठलं? काही कळलं नाही. नव्या युगाचा आनंदीआनंद होता सगळीकडे.' रामभाऊंना बोलताना दम लागत होता. मधून मधून हुंदके येत होते.

रमानं त्यांना चहा करून दिला. चहा पिता पिता ते बोलू लागले, 'मला थांबवू नकोस. मला एक कळलं की जसं दिसतं तसं किंवा जसं आठवलं तसं लिहिलं तर दुसऱ्याला वाचायला पाठवता येत नाही. त्या माहितीतून काही वेगळंच निर्माण केलं तर कदाचित पाठवता येईल. मला नाही जमलं ते करायला. तू बघ. जमेल तुला. अगं मी इतका घाबरट आहे की यशवंतलासुद्धा वाचायला नाही दिलं. काल मला विचारत होता, बाबा, मला आठवणी जपून ठेवायच्यात. नाहीतर तुमच्यासारखं विसरायला होईल. मी काहीच बोललो नाही. डरपोक आहे मी.'

रमानं त्यांना थांबवत म्हटलं, 'तुम्ही आधी शांत व्हा. त्रास होईल तुम्हाला. मी करते काहीतरी. चालवेन तुमचा वसा. आधी दिसेल ते लिहायला सुरुवात करेन. कदाचित सुचेलही त्यावरून वेगळं. तिकडं जाऊन यांनासुद्धा सावरायचंय. तुम्ही नीट राहा. आईना सांभाळा.' बोलता बोलता रमानं सगळ्या कोऱ्या वह्या आणि डायऱ्या कपड्यांमध्ये भरून ठेवल्या. पेनपेन्सिली चमचे पलित्यांसोबत भरले.

सकाळी ट्रक आला. सर्व सामानावर खोलीचा टॅग लावून घेऊन गेले. थोड्या वेळाने बस आली. यशवंत आणि रमा त्यांच्या मुलासह निघाले. आईबाबा बसपर्यंत सोडायला गेले. सर्वांचे डोळे पाणावले. नातू कावराबावरा झाला होता. बसमध्ये यांच्यासारखीच इतर काही कुटुंबे होती. कॉमनच्या प्रचंड गेटमधून बस आत शिरून रिजनल सर्व्हर सेंटरसमोर थांबली. सेंटरचे ऑफिसर आले. त्यांनी प्रत्येकाला नावे विचारून गळ्यात कार्डे घालत म्हणाले, 'ही कार्डे कधीच काढायची नाहीत. कॉमनमधली ही तुमची ओळख आहे.' कार्डावर रंगीत बारकोड होते. प्रत्येक कुटुंब आपल्याला अलॉट केलेल्या फ्लॅटकडे वळले. कॉमनमध्ये अनेक प्रचंड इमारती दिसत होत्या. सगळ्या एकसारख्या होत्या. खूपशा रंग उडालेल्या. काही ठिकाणी इमारतींना तडे गेले होते. दोन इमारतींच्या मध्ये जागा होती. तिथं कचऱ्याचे ढीग साचले होते. दुर्गंधी दरवळत होती. इमारतींच्या पायऱ्यांवर मोठी माणसं गप्पा मारत बसली होती. काहीजण पत्ते खेळत होते. इमारतींमधून जाणारे रस्ते फार वर्षांपूर्वी बांधले होते. नंतर दुरुस्ती झाल्याचं जाणवत नव्हतं. खूप खाचखळगे होते. बाजूने गटारींच्या नाली तुंबून भरल्या होत्या. रस्त्यावर कुठंही झाडं दिसत नव्हती. सगळा रखरखाट होता. कोणाला कुठंच जायचं नव्हतं. तिकडचा संथपणा चिरायचं काम लाउडस्पीकर निष्ठेने करत होता. कॉमनमध्ये शिरताना लाउडस्पीकरवरून जोरजोराने आरत्या ऐकू येत होत्या. सगळ्यांना आपापल्या फ्लॅटच्या दिशेने चालत जावं लागत होतं. आतमध्ये कुठलीही वाहने नव्हती. आपल्या इमारतीच्या दिशेने वळल्यावर आरत्यांसोबत मशिदीतून खणखणीत आवाजात संध्याकाळचा नमाज सुरू झाला तेव्हा यशवंत आणि रमाने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाह्यलं. यशवंतला फॅक्टरीतली जुनी ओळखीची मंडळी भेटली. बाकी त्यांचा पहिला दिवस सामान लावण्यात गेला. दुसऱ्या दिवसापासून नातवाची शाळा सुरू झाली. इथे शाळेत शिक्षकच नव्हते. स्क्रीनवर शिकवलं जाई. अडलं तर काय करायचं असं मुलानं विचारल्यावर रमा म्हणाली, 'तुझ्या लॅपटॉपवर सर्च कर, उत्तर मिळेल. वाटलं तर मीसुद्धा सांगेन पण सर्चची सवय लाव आता.' मुलगा नाराज झाला. रमाच्या आसपासच्या बायकांशी ओळखी झाल्या. जसजशी माहिती गोळा होऊ लागली तिनं लपविलेली कोरी वही काढली. सासऱ्यांच्या आठवणीने थोडीशी गलबलली आणि पेन घेऊन लिहायला बसली.

'कार्डावरचे रंगीत बारकोड बघून उत्सुकता वाढली. माहिती मिळेपर्यंत सगळीकडे विचारत होते. प्रत्येक रंगाला अर्थ आहे आणि तो शिकावा लागतो. बारकोडमधल्या पहिल्या बारचा रंग धर्म ठरवतो. हिंदू असाल तर भगवा, मुस्लिम हिरवा, बौद्ध निळा, जैन पिवळा, शीख आकाशी, ख्रिश्चन पांढरा आणि ज्यूंना काळा. दुसरा बार आहे जातीचा. तुम्ही वरच्या जातीचे असाल तर फिकट रंग असतो. नंतर हळूहळू गडद होत जातो. तिसरा बार पोटजातीचा. चौथा स्त्री की पुरुष. पाचवा बार आर्थिक स्थितीचा. पुढे घरातली माणसे किती. प्रत्येकाचे शिक्षण वगैरेचे बारकोड असतात. राह्यची व्यवस्था बारकोडप्रमाणे असते. त्यामुळे एकच धर्म , जात आणि पोटजातीचे एकाच ठिकाणी असतात. नंतर शेजारणीकडून कळलं की आपल्या इमारतीवर आपले बारकोड आहेत. खाली उतरून पाह्यलं तर आठ फूट उंच आणि दहा फूट रुंद असे ठसठशीत बारकोड होते.

मुलगा शाळेत जाईपर्यंत रमा सगळी कामं आटपते. मुलगा शाळेला गेला की यशवंतही त्याच वेळेला घराबाहेर पडतो. त्याला ओळखीचे खूपजण भेटलेत. ते भेटतात एकमेकाला. घरात सोयी कमीच आहेत. पाणी ठरावीक वेळ असतं. वॉशिंग मशीन नाहीएय. एक फ्रिज मिळालाय पण तो जुना आहे. घरात रंग काढलेला नाही. पोपडे पडलेत. पाणी गळते अधूनमधून. सगळं जुनाट दिसतं. रमा पटापट आवरते सगळं आणि लिहायला वही काढते. कालचं वाचते. नवीन माहिती लिहून ठेवते.

'उपवासाची नवीनच कचकच सुरू झालीय. गोष्ट मोठी आहे. कुठून सुरू करायची. आधी लायब्ररीचं लिहू की आधी आरत्यांचं. माझं असंच होतं. गोंधळलेलं. सुचेल तसं आणि जमेल तसं लिहितेय. आम्ही पहिल्यांदा आलो ते स्पीकरवर आरत्या ऐकत. नॉर्मलमध्ये असताना देवाची काही सक्ती नव्हती. इथे आत शिरल्यावर गळ्यात कार्ड घालतानाच ऑफिसर म्हणाले होते, 'इतके दिवस देवाला वेळा देता आला नाही तुम्हाला. आता वेळच वेळ आहे.' त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष नाही दिलं. पण लवकरच कळलं इथं एक परंपरा लायब्ररी आहे. बारकोडप्रमाणे तुमचा धर्म आणि जातीचे सण, उत्सव, रितीरिवाज, यांची सगळी माहिती मिळते.आणि ती वाचावीच लागते. तुम्ही लायब्ररीत जाऊन देवाच्या आरत्यांना स्पर्श करा. हेडफोनमध्ये चालीसकट ऐकू येतात. आधी आम्ही दुर्लक्ष केले. पण तिथे जावंच लागतं. म्हणजे असं की परंपरा लायब्ररीत तुमचे वार ठरलेले असतात. तेव्हा जायचंच असतं. बारकोडप्रमाणे पुस्तकं देतात ती वाचायचीच. पुस्तकात दिलेले सण, उत्सव, उपवास पाळायचेच असतात. उपवासाच्या दिवशी त्या देवाच्या आरत्या म्हणायच्या. हे लायब्ररीत जाऊन आले पण केलं काही नाही आम्ही. यांना सुरुवातीपासून देवाचं काही खास नव्हतं.

अचानक रिजनल सर्व्हर सेंटरचे ऑफिसर सकाळीच घरी येऊन म्हणाले, 'आम्हाला तुमच्या हातची उपवासाची खिचडी खायचीय.'

मी पटकन म्हटलं, 'मला पित्त झालंय म्हणून नाही केला उपवास.' ऑफिसरने खिशातून एक मीटर बाहेर काढला आणि माझ्या हाताला बांधला. त्यातून पटापट हेल्थ रिपोर्ट यायला लागले.

रिपोर्ट बघत ऑफिसर बोलू लागला, 'तुम्हाला इकडचं रुटीन पाळावं लागेल. सुरुवातीला इकडचे रीतिरिवाज सांगितले होते. दिवसातून तीनदा पूजा करा. उपवासाच्या दिवशी उपवास करा. मस्त वेगवेगळे पदार्थ खा. निर्जळी उपवास करणार असाल तर मेल करा म्हणजे त्या दिवशी तुमचं नाव परंपरा लायब्ररीच्या डिस्प्लेवर येईल.'

त्यानं हाताचा मीटर काढत म्हटलं, 'ही पहिलीच वेळ आहे. कुठं रजिस्टर करत नाही. मात्र असं वागत राहिलात तर ते तुमच्या भल्याचं नाही.' ते फार शांतपणे बोलले पण भयंकर भीती वाटली.

रमा घरातली कामं उरकून लिहितेय. ती इकडेतिकडे फिरते. बायकांशी गप्पा मारते. तिला माहिती काढायचा छंद लागलाय. खूप पसरलेल्या कॉमनमध्ये एका टोकाची माहिती दुसऱ्या टोकाला असणं कठीण. सगळ्या इमारतींवर खरंच बारकोड आहेत ना, ते रमा बघून आली आणि तिनं एक प्रसंग लिहिला.

'माझे पहिले तीन कलर मॅच होतात तिथे मी सेफ असते हे आपोआप ठसत जातं. समोरून येणारा किंवा मॉलमधला किंवा कोणीही तुमचे पहिले तीन बार बघतो आणि त्याप्रमाणे बोलायला लागतो. गळ्यातल्या कार्डावर तुमचं नाव आणि फोटो अगदी छोटेसे असतात आणि रंगीत बारकोड ठसठशीत असतो. एकदा हे त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले होते. पूर्वीच्या फॅक्टरीत एकत्र काम केलं होतं. जरा जास्त वेळ झाल्यावर ह्यांना मेसेज आला. 'तुमचा आणि बिल्डींगचा बारकोड मॅच होतं नाहीएय. जागा बदला.' हे घाबरले आणि काहीतरी बोलून बाहेर पडले. यांच्या खात्यात पगार येतो. पण एटीम बंद असतं. सगळीकडे कार्ड स्वाईप करा. इकडं मॉलमध्ये सगळं मिळतं. कधी कधी चकरा माराव्या लागतात. नाहीतरी घरात बसून करायचंय काय. दिवसातून एकदा दूधब्रेड लागतोच. मारायची चक्कर. हे एकदा मॉलमध्ये गेले होते. कोणाचा तरी सण होता. तुफान गर्दी होती. दूधब्रेड घेत असताना मागं धक्काबुक्की झाली. मारामारीपर्यंत वेळा आली. सेम बारकोडवाल्याने यांना घरी आणून सोडलं. हळूहळू सेम बारकोडवाले एकत्र येतात. जुने मित्र तुटत जातात. कधीकधी शत्रूसुद्धा होतात. आमचं बायकांचं बरं आहे. शेजारीपाजारी एकच बारकोड.'

'परवा रात्रीची घटना भयानक होती. रस्त्यावर रात्री सगळीकडे दिवे असतात. एक तरुण पोरगा एका तरुण मुलीला घरी सोडायला निघाला होता. रात्रीची वेळ होती. परंपरा लायब्ररीतून बाहेर पडणाऱ्या ग्रुपने त्यांना हटकले. त्यांची कार्डे तपासली. पहिल्या बारचे रंग वेगळे होते. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. बाचाबाची झाली. त्या मुलाला बदडलं. तो नंतर आपली माणसं घेऊन आला. आवाज वाढले. वातावरण तापलं. दंगल सुरू झाली. रस्त्याच्या स्वच्छ प्रकाशात युद्ध सुरू असल्यासारखी दंगल दिसत होती. आम्ही खिडकीच्या फटीतून बघत होतो. काठ्या, सळ्या घेऊन खूप वेळ मारामारी चालू होती. डोकी फुटत होती. किंचाळ्या आरडाओरडा सुरू होता. कोणी हटायला तयार नव्हतं. रिजनल सर्व्हर सेंटरच्या स्क्रीनवर नक्कीच कोणीतरी बघत असणार. चोवीस तास चालू असतं. पण तिकडून कोणी आलंच नाही. दोन्ही बाजूची लोकं मारामारी करून थकत चालली होती. कोणीतरी हे थांबवावं म्हणून ते ओरडत होते. थोड्या वेळाने एका इमारतीतून दोन वयस्कर माणसे बाहेर आली. हात जोडून काहीतरी बोलली. दंगल थांबली. आपापल्या बारकोडच्या जखमी लोकांना उरलेले घेऊन गेले. प्रेते रस्त्यावर तशीच पडून होती. आज सकाळी हे फिरायला बाहेर पडले आणि लगेच घरी सांगायला आले की दंगल थांबवणाऱ्या दोघांची प्रेते मोठ्या नाल्यात पडली आहेत.'

रमासाठी आसपासचं वातावरण नवीन आहे. परंपरा लायब्ररी, सणवाराचं सेलेब्रेशन, बारकोड बघून वागणारी माणसं सगळं टिपून घेतेय ती. त्यांचा मुलगा शाळेत जातोय. त्याला पूर्वीच कळलंय की एआयला खूष ठेवणं हेच खरं. त्यामुळे तो घरात गरजेपुरता संबंध ठेवायला शिकलाय. आता रमा आणि यशवंत आरत्या करतात. सण साजरे करतात. त्यांना माहिताय त्यांच्या मोबाईलला कान आणि डोळे आहेत. तिच्याकडे सगळ्याची उत्सुकता दाटून असते. खात्यात पैसे आहेत. मॉलमध्ये वस्तू आहेत. सुरुवातीला खरेदी केली. मग कशाला घ्यायच्या वस्तू हा प्रश्न पडला. फिरून किती फिरणार ते कॉमनमध्येच ना. तिला एका भीती कायम आहे. काम न करता पगार मिळतोय. कधी बंद केला तर. मिळतोय तो साठवून ठेवू. सगळे बिनकामाचा पगार घेउन पत्ते, कॅरम खेळतात. नाहीतर परंपरा लायब्ररीत. अजून जातोय कोण कुठे? कशाला हवेत नवीन कपडे? मग तिची चिडचिड होते. ती टीव्हीवर बातम्या चालू ठेवते आणि आत जाऊन लिहिलेल्या वह्या वाचते. कधीतरी लॅपटॉपवर सिनेमे बघते. सुरुवातीला यशवंत दिवसभर भटकत राह्यचा. आता त्याला कुठेच करमत नाही. तो घरातही सैरभैर असतो. आता एकट्यानेच दिवसातून तीनदा आरती करतो. बाकीचा वेळ लॅपटॉपवर असतो. एकदा दोघांनी मिळून पॉर्न पाह्यलं. प्रथमच एकत्र पाह्यलं. मग तसं करणं आपसूकच झालं. मुलगा शाळेत असल्यानं एकांत होताच. ऐन वेळी तिला आठवलं की आपल्या टीव्हीलासुद्धा डोळे आहेत. ती तशीच त्याच अवस्थेत त्याला बेडरूममध्ये घेऊन आली आणि कानात म्हणाली 'टीव्हीला डोळे आहेत.' रमा आपलं म्हणणं लिहून मांडत असते.

'काही वेळा असं वाटतं की वस्तुस्थिती आणि कल्पनेतलं असं काही वेगळं नसतं. मला नॉर्मलमध्ये राहात असताना रंगीत बारकोड हे परग्रहावरचे वाटले असते. आता एआय ठरवतोय सगळं. मुलांना कळलंय की त्यांचा खरा गुरू एआय आहे. प्रिन्सिपल नावापुरते ऑनलाईन असतात. इथे सगळे धर्म जाती एकाच वेळी आपले सणउत्सव साजरे करत असतात. मी ह्यांना एकदा विचारलं की लोकं रिकामपणी करतात तरी काय. हे म्हणाले, 'जास्त ऑप्शन्स नाहीत. आता मी करतो ना तीनदा पूजा. थोडासा फिरून येतो. मग आपला बेडरूमचा खेळ. नाहीतर रस्त्यावर, पायऱ्यांवर पत्ते आणि फालतू गप्पा. अजून काही नाही. हे हल्ली खूप वेळ बाल्कनीत उभे असतात. सतत कुठून तरी मोठ्याने आरत्या ऐकू येत असतात. अजान चालू असते. चर्चचे दर तासाला टोल वाजत असतात. गुरुद्वारातील अखंड भजने कर्ण्यावर चालू असतात. मी दारंखिडक्या बंद ठेवते. प्रचंड गरम होतं. तरी चालेल. पण आवाज नको वाटतो आणि हे बाल्कनीत जाउन खुनशीपणे ऐकत राहतात. अचानक खाली जायला निघतात. मी बोलले, 'अहो, बाहेर जायचे कपडे तरी घालून जा.' त्यांनी तिरसट उत्तर दिलं, 'कशाला? कार्ड आहे ना गळ्यात.’ शेजारची मावशी सांगत्येय की आपल्याला मिळणारा पगार घरातल्या माणसांच्या हिशोबात आहे. आता परवा दंगलीत काही जण मेले. त्यांच्या घरी एक माणूस कमी झाला. म्हणजे त्या प्रमाणात त्यांना पगार कमी मिळणार.'

'आता मला ह्याचं काही कळत नाही. ताकद भरपूर आहे. कष्टाची सवय गेलीय. घरात हक्काची बायको आहे. पण सारखासारखा सेक्स करायचा मला कंटाळा येतो. हे हल्ली काहीतरी वेगळंच वागतात. सेक्स करायला प्रसंग शोधतात. आज सकाळी धावत घरी येऊन म्हणाले, 'काल भिंतीच्या अलीकडे गोळीबार झाला. मोठी दंगल झाली तिकडे.' आधी महिनाभर मॉलमध्ये धान्य आणि साखर मिळत नव्हती. असं प्रथमच झालं म्हणतात. लोकांची कटकट वाढली होती. लोकांची साठवायची सवय गेल्याने अनेक जणांनी शेजारून धान्य उसने घेऊन गरज भागवायला सुरुवात केली होती. कॉमनच्या सर्व्हर सेंटरला सतत लोकांचे फोन जात होते. तिथूनही उत्तर येईनासे झाले. धान्याचे ट्रक आलेत असा मेसेज बारकोडच्या ग्रुपमधून फिरू लागला. नवीनच टूम निघाली. आपापल्या कोडच्या रंगाचे कापड डोक्याला गुंडाळून मॉलवर जायचे. ग्रुपने घुसून नंबर लावून माल घेऊ. एकेकट्याला बाकीचे कोडवाले फेकून देतील. भगवी, निळी, हिरवी, आकाशी, पिवळी कापडं डोक्याला गुंडाळलेले ग्रुप मॉलच्या दिशेने निघाले. रस्त्यात मधेच बाचाबाची सुरू झाली. प्रकरण हातघाईवर गेलं. मॉलमध्ये जायच्या आधीच मारामाऱ्या सुरू झाल्या. तेवढ्यात बातमी आली. मेसेज खोटा होता. कोणताही ट्रक आलेला नाही. मारामारी करणाऱ्यांची एकजूट झाली. सगळे रंग रिजनल सर्व्हर सेंटरच्या दिशेने निघाले. कल्लोळ वाढला. तेवढ्यात निळे, काळे, पिवळे, पांढरे उलटे फिरले. त्यांना सर्व्हर सेंटरचा मेसेज आला की तुम्हाला तात्काळ घरपोच धान्य मिळेल. उलटे फिरा. आपापसात मारामारी सुरू झाली.

रक्षक व्हॅन आल्या. त्यांनी दंगल थांबविण्याचा तीनदा इशारा दिला. मोर्चातील लोकांनी परत फिरणाऱ्या लोकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. व्हॅनमधून फायरिंगचा इशारा जाहीर केला गेला आणि व्हॅनचे छत उघडले. प्रत्येक व्हॅनमधून तीन बंदुका बाहेर आल्या. गोळीबाराला सुरुवात झाली. नेम चुकण्याचा प्रश्नच नव्हता. फायरिंगचे नियंत्रण सर्व्हर सेंटरमधून एआय करत होता. ही गोष्ट सांगताना हे थरथरत होते. तेसुद्धा त्या वेळेला सामान आणायला जाणार होते. घरात पहिल्या बारच्या रंगाचं कापड सापडत नव्हतं. मग मीच म्हटलं की गर्दी संपू दे मग जाऊ. गोळीबाराचे थरथरत सांगून झाल्यावर मला जवळ घेत म्हणाले, 'तुझ्यामुळे वाचलो ग! ' मी त्यांना शांत करण्यासाठी थोपटत हो हो म्हणत असताना त्यांनी एकदम कपड्यांना हात घातला. खेचत बेडवर घेऊन गेले.

आता त्यांना सारखं हवं असतं. मी थांबा म्हटलेलं चालत नाही. खूप जोरात खेचत नेतात. मी कुठंही विरोध करत नाही तरी जबरदस्ती केल्यासारखे कपडे काढतात. खूप गच्च पकडतात. घट्ट आवळून धरतात. त्यांना कुठला तरी खूप राग आणि चीड रिकामी करायची असते. स्वार झाले की कधीकधी शिव्या देतात, मोठ्याने हंबरतात, किंचाळतात. आज सकाळी तसंच केलं. खूप जोराने हंबरले. हाच माझा नवरा का, असं वाटतं. मी गप्प राहते. जाऊ दे. जेमतेम दहापंधरा मिनिटात आटपतं. तेवढं सोसायचं. एकदा वाटलं दिराशी बोलावं. पण त्याच्याशी ओळखच नाही. माझ्या लग्नाच्या आधीच तो गेलाय शिकायला. तरी रिजनल सर्व्हर सेंटरला चौकशी केली. ते कुठं आहेत ते कोणालाच माहीत नाही. मामंजींचा फोन लागत नाही. नंतर कळलं की इथे फक्त आतलेच फोन लागतात. तरी मी सेंटरला फोन करून मामंजींची चौकशी करायला सांगितली. 'जागा बदलली तुम्ही. आधीची लोकं तुटली तुमची. तुमचे शेजारी हेच तुमचे नातेवाईक,' असं सर्व्हर सेन्टरच्या ऑफिसरने सांगितलं.

सगळीकडं ऑटोमेशन पूर्ण होत आलं. कॉमनमधील लोकसंख्या वाढू लागली तसतसे त्यांचे प्रश्न निर्माण झाले. कॉमनच्या प्रश्नांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ असेल तर किंवा राजासाबची परवानगी असेल तर मांडण्यात येई. मात्र तिकडच्या घाणीचा आणि स्वच्छतेचा प्रश्न फारच गंभीर बनला. त्याचे परिणाम फार दूरच्या स्पेशलपर्यंत पोचू लागले. स्पेशल म्हणजे नॉर्मलपेक्षा खूपच वरचे. ज्यांची गरज आहे अशी माणसं तिथं राहात. कॉमनची दुर्गंधी तिथपर्यंत पोचल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो विषय चर्चेला घेतला. असल्या कामासाठी कॉमनमध्ये ऑटोमेशन करणे कॉस्टिंगमध्ये बसत नव्हते. खूप चर्चा झाली. राजासाबने सुचविलं की कॉमनच्या आतमध्ये जे कोणी स्वच्छतेची जबाबदारी घेतील त्यांना थोडे वेगळे पैसे आणि इन्सेन्टिव्ह द्या. ही मंडळी कॉमनमध्ये राहूनच तिकडची सेवा करतील. मंत्रिमंडळाने होकार भरला. शेवटी सचिव म्हणाले, 'कॉस्टिंग कुठेही डिस्टर्ब होणार नाही अशी स्कीम बनवितो आणि कॉमन साठी सर्क्युलर काढतो.' राजासाब उठत म्हणाले, 'ते तुम्ही करा. त्यांचे तिकडे काय व्हायचंय ते होऊ दे. बाहेर वास येता कामा नये. आणि हो उद्याची मीटिंग महत्त्वाची आहे.'

मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा सांगितला जात नाही तेव्हा ती महत्त्वाची असते. अशा बैठकांना मंत्र्यांनी आपल्या निवडक अधिकाऱ्यांसह हजर राहायचे असते. या बैठकीतही हा अलिखित नियम पाळला गेला. मीटिंग रूमचे नक्षीदार दार उघडून राजासाबनी प्रवेश केला आणि सगळे आपोआप उभे राह्यले. सर्वांना बसा अशी खूण करत राजासाब बोलू लागताले, 'ईश्वराने धर्म आणि समाज सांभाळायची जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे आणि तो आपल्याला अधूनमधून तंत्रज्ञानाची हत्यारे प्रदान करून त्याचे आपल्यावर लक्ष असल्याचे दाखवून देत असतो. आज मंत्रिमंडळाची खास बैठक घेतली आहे. तशी अनौपचारिकच आहे. आपण सर्वजण माझी खास माणसे आहात. तंत्रज्ञानातील नवा शोध आणि त्याची उपयुक्तता यावर फॅमॅज कंपनीचं प्रेझेन्टेशन आपल्याला बघायचं आहे. ते झालं की सविस्तर चर्चा करू.'

फॅमॅजचे डायरेक्टर त्यांच्या टीमसह आले. टीमने सामान लावले. टेक्निकल डायरेक्टर बोलू लागले, 'हा एक अद्भुत तांत्रिक शोध आहे. त्याविषयी शास्त्रीय बोलून आपला अमूल्य वेळ खर्च करणे योग्य नव्हे. मी थेट सुरुवात करतो. आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आदरणीय राजासाब आहेत यात नवीन काहीच नाही. देशातील प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला राजासाबचे दर्शन व्हावे. त्यांनी माझ्या अडचणी समजून घ्याव्यात. सोडवाव्यात. लोकांना असं वाटणं नैसर्गिक आहे. दुसऱ्या बाजूला आदरणीय राजासाबना जनतेला भेटण्याची इच्छा असते. लोकांच्या वेदना ऐकल्या की त्यांना अतीव दु:ख होते आणि दु:खाचे रूपांतर ते आव्हानांत करतात. देशातील प्रत्येक ठिकाणी जाऊन जनतेला भेटणे टेक्निकली शक्य नाही. मात्र जनतेची इच्छा पूर्ण होणे आणि त्यांची दु:खे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.'

त्यांनी हातातील रिमोटने समोरचे कपाट उघडले. त्यात एक धातूचे पातळ कवच होते. 'हाच आहे अद्भुत चमत्कार. हे कवच शर्टाच्या किंवा कोटाच्या आत घातले आणि वरतून परत कपडे घातले की हे कवच घालणारा राजासाबसारखा दिसू लागतो.'

त्यांनी एक मिनिट पॉज घेतला. सर्वत्र नजर फिरविली आणि एका राज्यमंत्र्याला उभे केले. त्या मंत्र्याने घाबरून राजासाबकडे पाह्यले. राजासाबनी मानेनेच होकार दिला. प्रेझेन्टेशन करणाऱ्या डायरेक्टरनी राज्यमंत्र्याला जवळ बोलावून सर्वांसमोर शर्ट काढायला सांगितला. टीमने कपाटातून कवच काढायला सुरुवात केली तोपर्यंत डायरेक्टरनी बोलायला सुरुवात केली, ' यातील व्यक्ती फक्त राजासाबसारखी दिसणार नाही तर राजासाबच्या आवाजात आणि त्यांच्याच विचाराने बोलेल. त्या व्यक्तीने काय बोलावे याचं ब्रीफ मिळणार नाही. आमच्या एआयकडे राजासाब यांच्या आतापर्यंतच्या सर्व भाषणांचा डाटा आहे. कवच घालणाऱ्या व्यक्तीच्या ब्रेनला या कवचाच्या आतील चिप आमच्या एआयशी कनेक्ट करेल. आणि व्यक्ती समोरच्या प्रसंगानुसार राजासाबसारखेच बोलेल. कवच घातलेली व्यक्ती काय बोलतेय हे राजासाब त्यांच्या समोरील पॅडवर बघू शकतील आणि वेळप्रसंगी हस्तक्षेप करू शकतील. हस्तक्षेपाबद्दल नंतर बोलेन.'

Great Dictator

तोपर्यंत टीमने राज्यमंत्र्याला कवच घालायला सुरुवात केली. माणसात होत गेलेला बदल अद्भुत होता. समोर साक्षात राजासाब दिसत होते. सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या. राजासाबच्या कपाळावर निर्माण झालेल्या सूक्ष्म आठ्या लपल्या नाहीत. डायरेक्टरने कोटाच्या खिशातून एक छोटा लाल रिमोट काढून राजासाबच्या हातात हळुवारपणे दिला. काही प्रतिक्रिया यायच्या आत त्यांनी राजासाबना बारीक आवाजात सांगितले, 'दोन मिनिटांनी बटण दाबा.'

राजासाबानी त्याच्याकडे चिडून पाह्यलं. डायरेक्टरनी तरीही आश्वासक नजरेनं त्यांच्याकड पाह्यलं. राज्यमंत्री खूष होऊन प्रत्येक मंत्री, सचिवांशी ओळीने हॅन्ड शेक करत होता. सगळेजण गांगरून गेले. प्रत्येकाच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरू लागली. तंत्रज्ञानाचा चमत्कार बघून विस्फारलेल्या नजरा एकमेकांचा वेध घेऊ लागल्या. खूष झालेला राज्यमंत्री राजासाब म्हणून तंत्रज्ञान खात्याच्या मंत्र्यांसमोर हॅन्ड शेकसाठी उभा राह्यला आणि अचानक काहीतरी गोंधळ झाला. तो परत राज्यमंत्री दिसू लागला. राजासाबने डायरेक्टरकडे बघून बारीकसे स्मित केले. 'सर, प्रोजेक्ट फेल गेलाय. दोन मिनिटांपेक्षा जास्त परफॉरमन्स देत नाही,' तंत्रज्ञान मंत्री म्हणाले. राजासाब हसत म्हणाले, 'मला आवडलेत हे लोकं. आठ दिवसांची मुदत द्या. सगळं नीट झालं पाह्यजे. नाहीतर काही खरं नाही तुमचं.' राजासाब उठले. मीटिंग संपली.

राजासाबच्या केबिनच्या प्रशस्त वेटिंग रूममध्ये फॅमॅजच्या टीमसाठी चहापाण्याची व्यवस्था केली होती. राजासाबनी डायरेक्टरना आत बोलावले. राजासाबनी त्यांना लाल बटण परत केलं. डायरेक्टर मान खाली घालून नम्रतेनं म्हणाले, 'फार पॉवरफूल आहे बटण. सॅटेलाईटशी जोडलेलं आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात चिप ऑफ करता येईल. सर, आपण आमचे राजे आहात. आपली सुरक्षा आणि आपलं सुख आम्हीच बघणार.' राजासाबनी खुशीने त्यांच्या पाठीवर थाप मारली. आठ दिवसांनी परत प्रेझेन्टेशन झालं. त्याच राज्यमंत्र्याला परत कवच घालून अर्धा तास बसवलं गेलं. प्रोजेक्ट सक्सेसफुल म्हणून जाहीर झालं आणि अचानक राजासाबनी विचारलं, 'समजा मीच हे कवच घातलं तर?'

'ही शक्यता कशाला येईल म्हणून ऑफिशियल प्रपोजलमध्ये हे लिहिलं नाही. पण तसे प्रयोग करून झाले. त्याचा एका वेगळा इफेक्ट मिळतो. त्याला स्पिरिच्युअल इफेक्ट म्हणता येईल.'

राजासाबनी डोळ्याने कवच आणा अशी आज्ञा केली. त्यांनी कवच घातलं आणि त्यांची त्वचा चकचकीत दिसू लागली. कपाळावरील त्वचा चक्क तजेलदार, गुळगुळीत आणि एकाच रंगातली झाली. राजासाबना संपूर्ण चकाकी प्राप्त झाली. हाताची बोटेसुद्धा तुकतुकीत दिसू लागली. शरीरातून किंचित प्रकाश सोडला जाऊ लागला. राजासाब कवच घालून उभे राह्यले आणि त्यांनी मीटींग रूममध्ये फेरी मारली. हजर असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.राजासाब कवच काढून म्हणाले, 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि मीटिंगमध्ये हे मीच वापरेन.'

शासनाचे चीफ सेक्रेटरी म्हणाले, 'सर, आता कवच टेस्टिंगची वेळ आली आहे. आपण पक्षातर्फे बेरोजगारांचा मेळावा घेतलाय. आपण नोकरभरती जाहीर करायची आहे. सर, बारकोडमध्ये पहिला बार हिरवा, निळा आणि भगव्यातला दुसरा, तिसरा डार्क बार असणाऱ्यांना नोकरीसाठी जागेतून बाहेर पडावं लागेल.आपण त्यांना शिफ्ट करणार आहोत.' राजासाबाने राज्यमंत्र्याकडे पाह्यले आणि राजासाब बनून जाण्याचा आदेश दिला. त्यानं थरथर कापत होकार दिला आणि ती सभा गाजली. कवचातल्या राजासाबचे भाषण जोरदार झाले. नोकरभरतीची घोषणा केली आणि त्याची पहिली पायरी म्हणजे घरोघरी कलर बारकोडची बेकारी कार्डे तरुणांना वाटण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. तरुणांचा उत्साह आणि जोम देशासाठी काम करणार हे निश्चित झाले. कवचातल्या राजासाबाने तरुणांना देशासाठी तयार होण्याचे आवाहन करताना सांगितले, तुम्ही सामान बांधून तयार राहा. लवकरच मेल येईल. राजासाबनी आपल्या समोरील पॅडवर सगळं बघून घेतलं. आणि देशभर वेगवेगळ्या ठिकाणी कवचातल्या राजासाबच्या सभा झाल्या. कामगारांना ऑटोमेशनची माहिती दिली. तरुणांना रोजगाराची हमी दिली. महिलांनी कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यावा, हे आग्रहाने मांडले. कवचातले राजासाब सर्वच सभांमधून आवाहन करत. विचार करा, कष्ट करा, आपल्याला देश घडवायचा आहे.

देशभर सभा चालू असतानाच गृहखात्याने सर्वत्र दर पन्नास फुटांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक खात्याच्या ऑटोमेशन कार्यक्रमांतर्गत हा निर्णय झाला होता. मोक्याच्या ठिकाणी सर्व्हर रूम ठेवल्या की भरपूर पोलीस ठेवण्याची गरज नव्हती. सिग्नल तोडण्यापासून गुंडगिरीपर्यंत सगळंच कॅमेऱ्यात येणार होतं. जगातून टेंडर मागविली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वांनी सादर केलं होतं. एकच कंपनी वेगळी होती. त्यांच्या एमडीनी सगळे डेमो दाखविले आणि प्रेझेन्टेशन संपविताना ते म्हणाले, 'आपल्या देशाच्या मागणीप्रमाणे आम्ही सादर केलं. अजून एक मोठा प्रकल्प आमच्याकडे आहे 'बिहाइंड द फेस' प्रोग्राम. याचा डाटा पूर्ण वेगळा आहे. आपली परवानगी असेल तर त्यावर बोलतो.'

कॅबिनेट सेक्रेटरी खाली बसाची खूण करत असतानाच राजासाब म्हणाले, 'बैठो मत, वो क्या है, बिहाइंड द फेस, उस के बारे में बोलो.'

एमडी बोलू लागले, 'प्रत्येक चेहरा, त्याची थ्रीडी ठेवण आणि तो करतो ते कार्य याचा एकमेकांशी संबंध आहे. हे या प्रोग्रामचे बेसिक प्रिन्सिपल आहे. आमच्या एआयला आम्ही डाटा पुरविला त्याने याचे नियम तयार केले. जगातल्या सगळ्या तुरुंगातील कैद्यांची माहिती आणि त्यांचे फोटो गोळा केले. गुन्हेगारांमध्ये वर्गवारी केली. हिंसक, कावेबाज, फसविणारे, आर्थिक गुन्हेगार, मौल्यवान वस्तू चोरणारे... गंमत म्हणजे प्रत्येक गटाच्या अंतर्गत खूप साम्य आढळले. मात्र आता चेहऱ्यानं शांत दिसणारी माणसं पण त्यांच्या आत काहीतरी खळबळ चालू आहे अशा माणसांची एका वेगळी कॅटेगरी करता येईल. कदाचित हीच माणसे उद्या सर्वांत जास्त धोकादायक ठरू शकतील. सर, मला वाटतं, कल्पना पुरेशी स्पष्ट झालेली आहे.'

राजासाब म्हणाले, 'आम्हाला तुमचा प्रोग्राम आवडला. पण आम्हाला हवे ते बदल करून मिळायला हवेत. म्हणजे असं की आपल्या सगळ्यांना अतिशय वेगात हे राष्ट्र प्रगत बलशाली राष्ट्र म्हणून निर्माण करायचे आहे. त्यासाठी पुढील काही वर्षे शांतता नांदायला हवी. आम्ही आमच्या विरोधकांचा मान ठेवतो. त्यांचे म्हणणे समजून घेतो. पण ते फार हट्टी आहेत. फार त्रास देतात. मुळातच ते विकासाला अडथळा आणतात. आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करता आले पाहिजे. येईल?'

'शक्य आहे सर. मला याबद्दल थोडक्यात बोलायला परवानगी मिळेल का?'

'बोला.'

'सर, विरोधकांचे प्रकार त्यांच्या प्रकृतीप्रमाणे करू. जसेजसे प्रकार वाढतील एआय सुधारणा करत जाईल. राजकीय विरोधक, यंत्रविरोधक फक्त पर्यावरणप्रेमी यांचे रिझल्ट 'बिहाइंड द फेस'मध्ये तात्काळ होऊन जातील.'

त्यांचे बोलणे थांबवत राजासाब हसत म्हणाले, 'एमडीसाब, एके काळी आम्हीसुद्धा विरोधक होतो. आमचा पण फोटो घेणार का?'

'माझ्या देशाच्या राजाचा धोका टळणार असेल तर आम्ही तेसुद्धा करू.'

'बहोत खूब. पुढे बोला.'

'सर, विद्यापीठात जरा जास्त काम करायला लागेल. तरुण, तरुणी, प्राध्यापक यांच्यातल्या बदलावर काटेकोर नजर ठेवावी लागेल.'

'तो तुमचा मुद्दा कळला. ते कराल तुम्ही. मला अजून सुचवायचं आहे. समाजात ज्यांचं कार्य संपलेलं आहे असे अनेक घटक असतात. आपल्या देशात हजारो संत होऊन गेले. त्यांनी खूप मोठं काम केलं. पण तो खूप जुना काळ झाला. मला वाटतं सध्या तरी नवीन संत, नवीन साहित्य हे सगळं जरा थांबवू या. तसेच दुसरे अस्वस्थ लोकसुद्धा होते, त्यांना जीवनात त्रास झाला. तरी त्यांचा प्रजेला फायदाच झाला. आम्हाला या जुन्या मंडळींची तत्त्वे कळली आहेत. यापुढच्या सुधारणा यंत्रणा योग्य वेळी करतील. आणि एक शेवटची कॅटेगरी. जे सर्वांवर प्रेम करा असं सांगून तसं वागणारे. लोक त्यांच्या मागे अक्षरशः वाहात जातात. वेडे होतात. ही सगळी मंडळी मला आता नकोयत. सध्या माझं एकच उद्दिष्ट आहे. मला राष्ट्राला एका नंबरवर न्यायचंय. तर मी हे सांगतोय तसे चेहेरेसुद्धा तुम्हाला शोधायचे आहेत,' राजासाब थांबले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे पाहिलं. इशारा कळला.

कंपनीचे एमडी तात्काळ उभं राहून म्हणाले, 'आम्ही हे सगळे बदल करू. प्रोग्राम लाँच करण्यापूर्वी इकडे डेमो करूच. तोपर्यंत कॅमेरे इंन्स्टॉलेशन सुरू करू.'

काही दिवसांतच फायनल प्रेझेन्टेशन झालं. त्यातील डेमोमध्ये एकंदर डाटा आणि त्यांचं टेस्टिंग दाखवलं. राजासाबनी विचारलं, 'आमचा फोटो घेतलाय का?'

तो होता आणि सगळ्या मंत्रिमंडळाचे फोटो होते. दूरच्या रस्त्यावरच्या कॅमेऱ्यात फोटो घेऊन त्याची डाटासोबत जुळणी कशी होते ते दाखवलं गेलं. राजासाब खूष होऊन म्हणाले, 'शांततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा ह्याचं हे आदर्श उदाहरण, आता फक्त एक विरोधक राह्यलेत. पक्षांतर्गत विरोधक!' आणि राजासाब मोठ्याने हसले. वातावरण तणावग्रस्त झालं. राजासाब सर्वांकडे बघून म्हणाले, 'टेन्शन कशाला? थट्टा चालते अशी.'

प्रेझेंटेशन करणाऱ्या एमडीने हात वरती केला. राजासाब म्हणाले, 'बोला.' एमडी उभं राहून बोलू लागले, 'सर, ही सिस्टीम नीट वापरली गेली तर पोलिसांची संख्या खूप कमी करता येईल. त्यांना दुसऱ्या कामाला वापरता येईल. मुख्य म्हणजे एखाद्या गटाला सत्तेवर आल्यावर राज्यकारभार करायला, जनतेची मते समजून घ्यायला, आपला पक्ष सत्तेवर निवडून आणायला पक्षाच्या यंत्रणेची गरज लागणार नाही. विरोधक वेचून काढता येत असतील तर समर्थकांचं काम काय?'

राजासाब गंभीर झाले. गृहमंत्र्यांनी त्यांना कडक आवाजात सांगितले, 'याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करावा लागेल.'

'सर, गैरसमज नसावा. प्रश्न तंत्रज्ञानातून सोडविले जातात तसे निर्माणही होतात. पक्षाचा कार्यकर्ता किंवा कडवा समर्थक स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा समजतो. त्याच्या पातळीवर तो पक्ष राखायचे काम करतो म्हणजे विरोधकांशी वाद घालण्यापासून दोन हात करण्यापर्यंत. तो स्वत:ला आपल्या विभागातल्या जनतेचा पाठीराखा समजत असतो. या सगळ्यातले विरोधक तुम्ही काढून घेतलेत तर आपल्या समर्थकांचं महत्त्व काय उरणार. त्याला व्हॅक्युम जाणवणार. आपल्या एरियात स्वत:चं महत्त्व टिकवायला तो खोटे विरोधक निर्माण करू शकेल. यातून आपली प्रतिमा मलीन होण्याचा धोका आहे.' सगळी मीटिंग स्तब्ध झाली.

राजासाब चिडून काही बोलतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र राजासाब गंभीरपणे म्हणाले, 'यावर तुम्ही एवढा विचार केला आहे तर सोल्युशनचाही विचार केला असेल.'

'सर, हा तसा पूर्ण वेगळा विषय आहे. तरी आमच्या इंटर्नल ब्रेन स्टॉर्मिंग ग्रूपमध्ये यावर चर्चा झाली. काही तज्ज्ञांच्या मते पक्षाची गरज सुरुवातीला काही वर्षे लागेल, नंतर उरणार नाही. काही जण मतभेद दाखवून म्हणाले की, पक्षाची रचना बदलायला लागेल. कारण विरोधक मिळाल्यावर त्यांच्यावर कृती करणारा स्थानिक माणूस लागेल.'

'इंटरेस्टिंग,' राजासाब म्हणाले, 'या दोन्ही मुद्द्यांवर मला डिटेल प्रेझेन्टेशन हवंय. आमच्या पक्षाचे निवडक पदाधिकारी असतील. आणि बिहाइंड ड फेस प्रोग्राम सुरू करा.' एवढं बोलून राजासाब निघून गेले. मीटिंग संपली.

***

रामभाऊ आणि माई नॉर्मलमध्ये एकटेच राहात होते. आसपासची कामावर जाणारी तरुण माणसं जमेल तशी दोघांना मदत करत होती. नॉर्मलमध्ये राहणं थोडं खर्चिक होतं. रामभाऊंची पेन्शन होती आणि जगू आपल्या पगारातले काही पैसे रामभाऊंना पाठवत होता. त्यामुळे पैशाची चिंता नव्हती. नॉर्मलमध्ये आसपास व्यग्र माणसं होती. सकाळी दहानंतर बिल्डिंगमध्ये कामावर गेलेल्या मंडळींच्या बायका असत त्यामुळे माईंचा वेळ छान चालला होता. माई त्यांच्या आठवणीतले सगळे पदार्थ त्यांना शिकवत. घरगुती उपचार करत. रामभाऊ एकटे पडल्यासारखे झाले होते पण कॉमनमध्ये पाठवतील याची भीती नव्हती. जगूने तिकडून परस्पर व्यवस्था केली होती. सुनंदाला जगू शिकायला बाहेर पडलाय, यशवंतचं कुटुंब कॉमनमध्ये राह्यला गेलंय, आईबाप एकटेच आहेत हे काहीच माहीत नव्हतं. किंवा सुनंदाचं लग्नानंतर काय झालंय, नीट नांदले ना नवरा बायको, तिला मुलं किती झाली,ती जिवंत आहे की नाही, याबद्द्ल यांना कोणालाच माहीत नव्हतं. राष्ट्र उभारणीसाठी हे सगळं आवश्यक आहे, असा राजासाबचा दावा आहे. जगू कुठे असेल, तो पैसे पाठवतोय म्हणजे मोठा असेल कोणीतरी असा विचार करत रामभाऊ अस्वस्थ होत. सर्वात लहान म्हणून दोघांचाही लाडका होता. तोसुद्धा लाघवी होता. नंतर एआयने परीक्षा घेऊन बदलवला त्याला. त्यांना डायरी वाचताना नेहमी वाटे की जे आहे ते आपण लिहिलं, पण मुलांबद्दल प्रेम किती वाटतं ते लिहायला नाही जमलं. या कुटुंबात जगू असा एकच होता ज्याला कुटुंबातल्या सर्वांची खबर होती. उच्च पातळीवरील माणसे खालच्या स्तरावरील माहिती काढू शकत असत. त्यात जगू हा नावाजलेला संगणकतज्ज्ञ होता. आपल्या नातेवाईकांच्या लॅपटॉपचे आयपी ॲड्रेस त्याला माहीत होते. त्यातून तो सर्व घरातील माहिती ठेवून होता.

राष्ट्रामध्ये मुलांची हुशारी लहानपणापासून तपासली जात असे. अधिकाधिक चाचण्या, परीक्षांच्या चाळण्या लावून अतिशय निवडक मुलांना राष्ट्राच्या प्रगतीसाठी वेगळे काढले जात असे. त्यांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण दिले जात असे. या सगळ्या प्रक्रियेत त्यांची ओळख बदलली जात असे. जगूचं आता कुठेच रेकॉर्डवर नाव नव्हतं. सगळं पुसून त्याला झिशान हे नाव एआयने दिलं होतं. याच्यापुढे झिशानने जगूला आठवायचंसुद्धा नाही, असा कडक नियम होता. शिक्षण पूर्ण करून झिशान राष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागातील एका प्रगत इन्स्टिट्यूटमध्ये उच्च पदावर कामाला होता. त्या दिवशी जोरदार पाऊस असल्यानं इन्स्टिट्यूटमध्ये गारवा पसरला होता. मेसमधून नुकतंच जेवण आटपून झिशान रूमवर परतला होता. मेसचे जेवण अतिशय चांगल्या दर्जाचे आणि चविष्ट होते. ही इन्स्टिट्यूट स्पेशल गटातली म्हणजे राष्ट्राला अतिशय गरज आहे अशा माणसांची वस्ती. विज्ञान तंत्रज्ञानापासून समाजशास्त्रापर्यंत सर्व विषय या इन्स्टिट्यूटमध्ये शिकविले जात. देशातले तरुण बुद्धिमान इथे आणले जात. त्यांची निवड शाळेपासूनचे निकाल आणि इतर विषयातला रस या सगळ्याचा विचार करून शिक्षण खात्याचा एआय ठरवत असे. इथे आणलेल्या तरुणतरुणींना त्यांच्या आवडीच्या विषयात पारंगत करून देश चालविण्याच्या वेगवेगळ्या कामात घेतले जात असे. तसेच सरकारी योजनांची आखणी आणि नियोजनात या संस्थेतील तज्ज्ञांचा मोठा वाटा असे. या मंडळींची राष्ट्राला गरज होती. इथं उत्तम निवासस्थान, भोजन, दारू, चैन, सगळं होतं.

तर जेवणाच्या तृप्तीचा आनंद घेत झिशानने टीव्ही लावला. त्याला अचानक आलेल्या पावसाची बातमी बघायची होती. उत्तरेतल्या राज्यातील विकास कामांची दृश्ये दाखवत होते. तो चमकला. हे पाह्यल्यासारखं का वाटतंय. आता कॅमेरा अजून उजवीकडे वळवतील. तसंच झालं. त्यानं तातडीने फोन लावला.

'बोल,' समोरून फिनोची म्हणाली. तिचं मूळ नाव कदाचित फक्त तिलाच आठवत असावं.

'काय करत्येस?'

'काही नाही. बोल.'

'आता टीव्हीवरच्या बातम्या बघ.'

'झालं काय ते सांग आधी.'

'सरकारी शेती खात्याच्या इमारतीच्या बांधकामाचे शूटिंग दाखवतायत. अगं मी हल्लीच पाह्यलंय ते.'

‘होल्ड कर.' फिनोची टीव्ही लावत म्हणाली, 'बोल.'

'तिथं आता थ्रीडी प्रिंटर दाखवतील. ग्रे कलरचा आहे.'

'हो. आला आता.'

'रूम तयार करेल तो. तिकडे बाजूला डावीकडे कॅमेरा जाईल. तेव्हा काही सामान असेल. एक खुर्ची आहे. लाल रंगाची. म्हणून लक्षात राह्यलं.'

'हो. आता आली. आता तू एक काम कर. टीव्ही बंद कर. मी उद्या सकाळी अर्धा तास लवकर येते. ब्रेकफास्टच्या वेळी गप्पा मारू.'

सकाळी दोघंही मेसमध्ये ब्रेकफास्ट घेत असताना फिनोची म्हणाली, 'आपण तुझ्या केबिनमध्ये कॉफी घेऊ.'

झिशानला एकदम ते ऑड वाटलं. पण मनात ठीक आहे म्हणाला. केबिनमध्ये पोचल्यावर बसताना फिनोची म्हणाली, 'तू बहुतेक एकटाच आहेस जो पाठीमागे वळून भूतकाळात डोकावतो. सगळ्यांची खबर ठेवतो तरीही कोणाला कळत नाही. हे तुझ्याबद्दलचं तूच विसरलास की काय? एकेकाळचा टॉपमोस्ट हॅकर तू सगळी कामं एआयवर सोपवून मंद झालास की काय? प्रश्न पडल्यावर रात्री बसून केलंस काय?'

'खरंय तू म्हणतेस ते. काही नाही केलं. पण अस्वस्थ होतो.'

खुर्चीत ऐसपैस बसत फिनोची म्हणाली, 'विषयाकडे येऊ. मला असंच पूर्वी दोनतीनदा जाणवलंय. तुला झालं कळल्यावर बरं वाटलं. मला वाटलं माझीच केस झाली की काय? काहीतरी अल्गोरिदममध्ये गोंधळ आहे.'

'सेल्फ करेक्शन आणि अपग्रेडेशन ही जुनी प्रिन्सिपल झाली. सेन्ट्रल एआयमध्ये अजून काहीतरी असावं जे आपल्याला माहीत नाही.'

'शोधायचं कसं?'

'घुसखोरी केलेली कळेल. सध्या एका प्रोग्रामची ट्रायल घेतोय. अजून खूप काम करायचं आहे त्यावर. प्रायमरी लेव्हल म्हणू. त्याचं प्रिन्सिपल असं आहे की एक दृश्य तू दाखवतेस ते खरं आहे का, समजा नसेल खरं, तर त्यातलं खरं दृश्य कोणतं, हे तो दाखवतो. इन्स्टिट्यूटच्या डाटाला जोडून घेतलं. त्यातून अनेक फोटो आणि फिल्मचं स्क्रीनिंग केलं. सिनेमाच्या दृश्यांचे टेस्टिंग केलं. व्हीएफएक्स आणि क्रोमा टाकून केलेली दृश्यं चक्क कळत होती. सेट लागलेले समजत होते. अजून डेव्हलप करायचाय. टीव्हीवर कुठलंही दृश्य दिसलं की त्याच वेळी ओरिजिनल दिसलं पाह्यजे,' झिशानने कॉफीचा घोट घेतला. फिनोची एक एक सिप घेत त्याच्याकडे बघत होती.

'बघतेस काय अशी?'

'विचार करतेय, तुझा हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर काय काय होईल?' पॉज घेत तिनं विचारलं, 'तू काही विचार केलायस का यावर?'

'पोस्ट ट्रुथ नावाची कन्सेप्ट एक जानेवारी एकच्या खूप आधी होती. आता जे दिसतं ते खरं मानलं तर खऱ्याखोट्याची व्याख्या नवीन बनवावी लागेल. किंवा खरंखोटं असं काही नसतंच असं म्हणायची वेळ आलीय हे जेव्हा स्पष्ट कळून आलं तेव्हा माझी क्युरिऑसिटी मला गप्प बसू देत नव्हती. मी जे काही टीव्हीवर बघतो त्यातलं खरं त्याच वेळी बघायची उत्सुकता फार वाटू लागली. त्यातून हे सुरू झालं.'

'हे मला माहिताय. मी परिणामांचे विचारतेय?'

'मी जास्त नाही विचार केला त्यावर. पण प्रकरण खूप रिस्की होत जाईल नंतर नंतर. मी काहीतरी वेगळा प्रोग्राम रन करतोय, काहीतरी शोधतोय हे रजिस्टर होईल हे कळतंय मला. आणि माझी क्युरिऑसिटी मला गप्प बसू देत नाही. इकडे उत्सुकतेला पर्यायी शब्द राष्ट्रद्रोह होऊ शकतो. मला नाही थांबवता येत उत्सुकता, काय करू?'

'तुला उत्सुकता दाबता येणार नाही. पण तुला उत्सुकता स्वत:पुरती ठेवायचीय की सामाजिक करायचीय? तू सामाजिक करूच शकत नाही. म्हणजे तू करू शकतोस पण तो लीगल मार्ग नव्हे. प्रोग्राम तयार करून तो स्वत:पुरता ठेवणं ही आयडियाच मुळात चुकीची आहे. प्रत्येकाला प्रोग्राम दुसऱ्याशी शेयर करायचा असतो. तरच तो त्याचा आनंद घेऊ शकेल.'

'खरं आहे तू म्हणतेस ते. मी इतका पुढचा विचार केलेला नाही. आधी प्रोग्राम नीट होऊ दे.'

'एक न मागताचा सल्ला देते. एक कंप्युटर घे. त्याचा इंटरनेट ॲक्सेस काढून टाक. स्टॅन्ड अलोन पीसी कर. जे तपासावं वाटतं ते रेकॉर्ड कर आणि त्या पीसीवर रन कर. आणि मुख्य म्हणजे अशा गोष्टी फोनवर बोलू नकोस. आणि सीसी कॅमेऱ्याच्या समोर जाऊ नकोस. ठरवून अव्हॉईड कर.'

'सीसी टीव्हीवाल्यांचे इंटरनॅशनल रेप्युटेशन खराब आहे,' झिशान चट्कन बोलल्यावर फिनोचीनं खुणेनं चूप सांगितलं. उठून तिने गुड डे म्हंटलं. झिशानेही हसत डाव्या खातात कॉफीचा मग घेऊन तिला गुड डे केलं. फिनोचीनं निघताना दरवाजा घट्ट बंद केला.

***

सरकार ऑटोमेशन करतं म्हणजे ते सरसकट मळणी यंत्र चालविल्यासारखं करत नाही. प्रत्येक ठिकाणी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न, त्याची उपयुक्तता असा अभ्यास होत असतो. हा अभ्यास पूर्वी माणसं करत आता डाटा फीड झाल्यावर एआय हातात बुकलेट देतो. शेवटच्या पानावर निष्कर्ष दिलेले असतात. सरकार तेच फॉलो करतं कारण एवढा अभ्यास कोण करणार आणि आता मुळात अभ्यास करायच्या सवयी गेल्यात. राष्ट्रात सर्वत्र ऑटोमेशन पूर्ण होत आलं होतं. कॉमनमध्ये गर्दी वाढत होती. सुरुवातीला काही दिवस उघड्यावर ठेवायला लागलं तेव्हा लोकांनी पडक्या इमारतींचा आश्रय घेतला. छपरासाठी इकडूनतिकडून पत्रे वगैरे गोळा करून संसार सुरू केला. त्या पडक्या इमारतीतली वीज आणि गॅस कनेक्शन राहणाऱ्या लोकांनी सुरू केली. अधिकृतपणे बंद केलेली कनेक्शन सुरू झाल्यावर सर्व्हरचे अलार्म वाजू लागले, डाटा सारखी एरर दाखवू लागला. तरीही नवीन कुटुंबं येतच होती. मग त्यांची व्यवस्था तंबूमध्ये केली. माणसांची राह्यची व्यवस्था होऊ शकते पण सांडपाण्याची व्यवस्था होत नसते. आधीच सांडपाण्याची गटारे आणि नाल्यांची स्वच्छता होत नव्हती. वेळोवेळी तुंबून वाहात. दुर्गंधी पसरे. आता खुलेआम घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलं होतं. घरातले आणि रस्त्यावरचे एकमेकांकडे चिडीने बघणं सुरू झालं होतं.

अगदी सुरुवातीला कामगारांना, इंजीनियरना विश्रांती घेण्याची पत्रं मिळाली तेव्हा लोकं रस्त्यावर आले. आरडाओरडा करू लागले. मोर्चा किंवा दंगलीत रूपांतर नाही पण सर्वत्र अस्वस्थता पसरली. काहीतरी अघटित घडतंय हे जाणवल्यानं लोकं असुरक्षित झाले आणि तावातावानं एकमेकांशी बोलू लागले. तेव्हा स्वत: राजासाब टीव्हीवर येऊन म्हणाले, 'हो, मी पत्रं पाठवायला सांगितली. तुमची गरज नाहीएय आता. कामावर यायची तसदी घेऊ नका.' राजासाबनी एक पॉज घेऊन म्हटलं, 'मी असं लिहिलंय का की तुम्हाला पगार मिळणार नाही? मी असा वाईट वागेन का? तुम्ही प्रजा आहात. तुम्ही अहोरात्र काम केलंय म्हणून आता ऑटोमेशन होतंय. आता तुम्ही सर्वांनी फक्त पगार घ्यायचा. कुटुंबासोबत एन्जॉय करायचं. तुम्ही नवीन कॉलनीत राह्यला जाणार आहात. तिथं तुमची काळजी घेतली जाईल.' लोकांचा राग एका क्षणात विरघळला. ही कॉमनची सुरुवात होती. सुरुवातीला कॉमनमध्ये आलेल्यांनी खचाखच भरलेल्या मॉलमधून चैनीचे डोंगर रचले. खात्यात पैसे आले की खर्च आणि उपभोग असं चक्र सुरू झालं. घरात वस्तूंचे ढीग झाले. अबरचबर खाऊन पोटे बिघडली. तब्येत बिघडली की कॉमनच्या दवाखान्यात औषधे मिळत. पुन्हा खायला सुरुवात होई. दारूचं प्रमाण वाढलं. मग हळूहळू यात जास्त रमता येत नाही हे जाणवायला लागलं. सुरुवातीला लोकं एकमेकाला भेटत तेव्हा जुन्या कारखान्यातल्या गप्पा होत. तेच तेच किती बोलणार. गप्पा मावळल्या. मग लोकांनी आपण खरेदी केलेल्या वस्तूंवर बोलायला सुरुवात केली. तेही बोलणं मावळलं. या गप्पांमध्ये एकमेकांना एका कळलं की इथे वस्तूंची चोरी करता येत नाही. वस्तू खरेदी केल्यावर ती रजिस्टर होते आपोआप. तेव्हा कोणीतरी म्हणालं की हे पण एक काम होतं. मग फसवणं, खोटं बोलून गंडा घालणं अगदीच काय कामचोरी करणं हीसुद्धा कामं होती, यावर पुढचे काही दिवस गप्पा रंगल्या. हळूहळू त्याही निवळल्या. लोकं एकमेकाला भेटत होते पण बोलायला विषयच नव्हते. एक वेगळाच तणाव निर्माण होत होता. बिनकामाच्या पैशातून घरखर्च चालवून चैन करायची सवय झाली होती. डोक्यात विचार येत कामाची सवय गेलीय आणि एका दिवशी खात्यात पैसेच आले नाहीत तर काय होईल? भीतीची पोकळी निर्माण झाली. पैसे येत राह्यले आणि पोकळीतल्या भीतीची जागा निबर मंदपणाने घेतली.

एक दिवस कॉमनमधील सगळ्या इमारतींवर सर्क्युलर चिकटवले होते. 'कॉमनमध्ये दुर्गंधी आणि घाण वाढल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे. कॉमनमध्ये सफाई करून घाणीची विल्हेवाट लावण्यापर्यंत कामाची योजना तयार आहे. या कामात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी रिजनल सर्व्हर रूमला मेसेज करावा. सहभागी नागरिकांना पगारात वाढ होणार नाही मात्र मॉलमधील खरेदीची स्पेशल कूपन्स मिळतील. मॉलमधील काही चैनीच्या वस्तू याच स्पेशल कूपन्सवर उपलब्ध होतील.' भयंकर घाण आणि दुर्गंधी असल्यानं जनतेचा प्रतिसाद भरपूर मिळेल ही अपेक्षा होती. मात्र हे काम करायला कोणीच पुढे आलं नाही. लोकांचं वागणं काहीतरी वेगळंच झालं होतं. कशाला सगळं साफ करायचं. थोडा घाण वास आला, थोडे डास चावले तर काही होणार नाही. रस्त्यातून चालताना खाली बघून चालायचं म्हणजे घाणीत पाय पडणार नाही, एवढं साधं आहे. मग झालं, कशाला साफ करा. स्वस्तातले खाणे आणि अधूनमधून मॉलमध्ये मिळणाऱ्या स्वस्तातल्या दारूवर लोक खूष होते. आहे त्याच्यात समाधान मानून जगायची सवय लागली होती. कॉमनमध्ये कचरा साफ करणाऱ्या जातीची मंडळी होती. बारकोड दोन ते पाच डार्क होते. त्यांचा मुळातला पगार कमीच होता. सर्क्युलर वाचताना ती माणसं गोळा होत गेली आणि आपापसात गप्पा मारताना त्यांनी काम करायचं ठरवलं. सर्वांनी मेसेज केल्यावर सर्व्हर सेंटरमध्ये मीटिंग झाली. पगारात थोडी वाढ करणार आणि ठरलेली स्पेशल कूपन द्यायचं मान्य झालं. सफाईचे सामान सर्व्हर सेंटरमधून मिळणार होतं. जमलेल्या सर्वांनी नीट कामाची हमी दिली. पुढील चार दिवसात कॉमन झाडून चकाचक झालं. ड्रेनेज साफ केली गेली. झटपट काम केल्याबद्दल काही स्पेशल गिफ्ट कूपन त्यांना मिळाली. खूप काम केल्यावर या माणसांमधला उत्साह आणि आनंद वाढत होता. ही मंडळी काम केल्यावर रात्री नाचगाणी करत असत. पुन्हा सकाळी उत्साहाने कामाला लागत असत. त्यांच्या चालण्यात लगबग आली. ठरावीक वेळी ठरावीक काम करायची जबाबदारी त्यांच्या हालचालीत दिसू लागली. त्यांचा उत्साह आवाजातून वाहू लागला.

रमाने या गोष्टींची डायरीत नोंदही केली कारण यशवंतने सर्व्हर सेंटरला मेसेज करून सफाई कामात सामील व्हायची इच्छा व्यक्त केली. त्याचे दोन ते पाच बारकोड उजळ रंगाचे होते. सर्व्हर सेंटरने त्याला बोलावले. त्याच्या उत्साहाचे कौतुक केले पण तुमचे बारकोड वेगळे आहेत. कसं जमणार तुमचं त्यांच्याशी, अशी शंका त्यांनी मांडली. त्याला स्वच्छता ठेवायला आवडते म्हणून त्याला काम करायचं आहे, असं त्यानं सांगितलं. त्याला त्याच्याच बारकोडच्या दहा इमारतींच्या साफसफाईची जबाबदारी दिली. तो प्रथमच झाडू काढत होता. घाण उचलत होता. प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचे ढीग होते. तो मन लावून काम करत होता. त्याचं काम बघून डार्क बारकोडवालेही चकित झाले. तेव्हा रमाने डायरीत लिहिलं,

'त्यांनी कामाला जातो सांगितलं तेव्हा मीच विचारलं, 'अहो पण, हे आपलं काम नाहीएय. आपल्या बारकोडचे लोकं काय म्हणतील?'

तेव्हा हे शांतपणे म्हणाले, 'कोड कुठलाही असू दे. काम करणे कधीही चांगलं. सगळं करूनही कंटाळा येतोय. रिकामपणामुळे आत्महत्या होतील काही दिवसांनी. मला मरायचं नाहीएय. कधीतरी मला आईवडील भेटतील, भाऊ भेटेल, बहीण दिसेल असं वाटतं. आपला मुलगा मोठा झालेला बघायचाय. मला जगण्यासाठी काम करायचंय. मी कोणी तरी आहे हे माझंच मला सांगायचं आहे.' सर्व्हर सेंटरला जाताना शांत होते. आल्यावर म्हणाले, 'उद्यापासून कामाला सुरुवात करणार.' पुढचे चार दिवस खूप काम करत होते. आमच्या आसपासचे काम दिले होते. मी वरतून पाह्यलं. रस्त्यावरची गू घाण शांतपणे साफ करत होते. सगळं झाडून स्वच्छ केलं त्यांनी. मला कौतुक वाटलं. मन अगदी आनंदाने भरून आलं. कामावरून आले की मी त्यांना आंघोळीला पाणी द्यायची. मग जेवून गाढ झोपायचे. खूप दिवसांनी प्रथमच त्यांनी माझ्याशी काही केलं नाही. गंमत म्हणजे आज पहाटे उठून त्यांनी कानात कुजबुजून हळूच मागितलं. किती गोड सेक्स झाला आमचा.'

थोडक्यात ही काम करणारी माणसं उत्साही दिसू लागली. बारकोड डार्क होते तरी स्पेशल कूपनवर खूष होते. झडझडून काम करण्यात त्यांना आनंद मिळत होता. अशाच एका डार्क बारकोडवाल्या आनंदी घरातून मॅकॉन हा उत्साही मुलगा इन्स्टिट्यूटमध्ये आला होता. त्याची हुशारी विशेष होती. समज आणि स्मरणशक्ती अफाट होती. लहानपणापासून मॅकॉन इतर मुलांसोबत बारावीपर्यंत शिकला. तो दंगामस्ती, खेळ सगळं सर्वांसोबत करे. त्याला अभ्यासाला वेगळे प्रयत्न करायला लागत नसत. नंतर डिग्री कॉलेजला पाठवायच्या बदली थेट इन्स्टिट्यूटमध्ये पाठवायचा निर्णय एआयने घेतला. हा एक वेगळा प्रयोग होता. खास मॅकॉनसाठी कस्टमाईज केलेला. एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी. झिशान आणि मॅकॉन. शिक्षक विद्यार्थी नाते किती आणि दोस्त किती याची नोंद ठेवली जात होती. मॅकॉनला झिशानने पाच वर्षे प्रशिक्षण दिलं. खरं शिकवलं असं काहीच नाही. अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टवर त्याच्याकडून काम करून घेतलं. वेगवेगळी कोडी घालून ती सोडवायला लावली. नवीन कोडी तयार करायला लावली. खूप वेळा दोघे मिळून गेम खेळत. काही गेमही तयार केले. दररोज नवीन आव्हाने असत. ती पार करायला मॅकॉनला मजा येत असे. त्याची परीक्षा कधी झाली, शिक्षण कधी पूर्ण झालं हे त्यालाच कळलं नाही.

आज मॅकॉनला सेन्ट्रल सर्व्हरमध्ये पोस्टिंग मिळालं त्याची इन्स्टिट्यूटमध्ये छोटी पार्टी होती. नाच, गाणं, दारू असं थोडं थोडं करून सगळेजण पांगले. मॅकॉन झिशानला भेटायला आला. झिशाननं विचारलं, 'आता काय करतोयस?'

मॅकॉन उत्तरला, 'काही नाही. रूमवर जाणार.'

'माझ्या रूमवरून स्टॉक आणि मंचिंग घेऊन जरा मोकळ्या हवेवर बसू. फिनोचीलासुद्धा बोलावतो.'

'सर, पण कॅमेरा...'

'एक जागा आहे अजून तिथे तो आलेला नाही,' झिशान हसत बोलला.

'चला.' दोघांनी झिशानच्या रूमवरून स्टॉक घेतला आणि फिनोचीला गुडनाईटचा मेसेज केला. कॅमेऱ्याची नजर चुकवून दोघेही कातळावर पोचले. इन्स्टिट्यूटपासून थोडी लांब जागा होती. प्रशस्त कातळाच्या पुढे घनदाट झाडी होती. 'सर, रियली इथे कॅमेरा नाहीएय?'

'नाही.'

'मी जोरात ओरडू?' मॅकॉन आनंदानं फुलून आला होता.

'नको, ते ऐकू जाईल. पण नागडा नाचलास तर फक्त मला दिसेल.' दोघेही हसले. झिशान पुढे बोलू लागला, 'ही घनदाट झाडं मला नेहमी बोलावतात. खूप आकर्षण वाटतं त्यांचं.'

लांबून फिनोची येत म्हणाली, 'काय म्हणतोयास?'

'या झाडांना अजून मनुष्यप्राण्याचा स्पर्श झालेला नाहीएय. आपल्या मनाप्रमाणे एकमेकाला सांभाळत उभी राह्यलीत. नक्कीच काही झाडांवर अन्याय झाला असेल त्यात. पण त्यांचा आपापसातला स्वत:चा एक प्रोग्राम आहे. तरीही तू इकडं येऊ नको, तू तिकडं जाऊ नको असं काही नाहीएय. लवचीक आहे प्रोग्राम. या झाडांत घुसावंसं वाटतं. पण नको. माणसाचा पहिला स्पर्श माझा नसेल,' झिशान फिनोचीकडे बघत म्हणाला, 'या झाडीत डोकावल्यावर आयुष्यात प्रथम नैसर्गिकचा अर्थ कळला. आता नैसर्गिकचा अर्थ केऑस आहे.'

झिशानच्या खांद्यावर हात ठेवत फिनोचीनं विचारलं, 'सगळं ठीक आहे ना?'

झिशान झाडांवरून नजर काढत म्हणाला, 'हो. हो. एकदम ओके. चल मॅकॉन, आपण तयारी करू.' दोघांनी ग्लास भरले आणि खाणं मांडलं.

झिशान ग्लास उंचावून दोघांना चियर्स करत म्हणाला, 'फॉर द ब्राईट फ्युचर ऑफ डियर मॅकॉन.' सर्वांनी प्यायला सुरुवात केली.

फिनोची बोलू लागली, 'मॅकॉन, तुला काही सांगायचंय. तुला माहिताय आपल्या सर्वांच्या नोकऱ्या टेंपररी आहेत. आपलं काम एआयने टेक ओव्हर केलं की आपण कॉमनमध्ये...'

तिला तोडत मॅकॉन म्हणाला, 'मॅडम, मी कॉमनमधून इथे आलोय. परत नाही जाऊ शकत तिकडे.'

तिने थांब अशी खूण करत बोलायला सुरुवात केली, 'मी ऑपरेशन आणि एचआर बघते. कुंडली माहिताय मला. तुला आता जॉईनिंग इन्सेन्टिव्ह म्हणून थ्री स्टार लीव्ह मिळेल. लगेच घे. आठ दिवस चांगल्या रिसॉर्टवर जा. सेक्सची संधी मिळाली तरी सोडू नको. एआयचे अपग्रेडेशन फार फास्ट आहे. जे मिळेल ते भोगून घे.'

'मॅडम, असं का बोलताय टोकाचं?'

'तुझं पोस्टिंग ज्याच्या जागेवर झालंय तो कालच कॉमनमध्ये शिफ्ट झालाय. कुठे ते पण सांगते. कॉमनमध्ये राह्यला जागा नाही म्हणून टेंपररी टेंटमध्ये राहतोय फॅमिलीच्या सोबत. नाऊ ही इज नो मोअर इनोव्हेटिव्ह दॅन एआय. म्हणून पाठवला. तू किती दिवस राहणार इनोव्हेटिव्ह? बोला सर, ब्राईट स्टुडंट कसा राहणार तिकडे?'

मॅकॉनने दोघांकडे गोंधळून बघत विचारलं, 'सर, तुम्ही इतकी वर्षं कशी काढली इकडे?'

'एक तर ही इन्स्टिट्यूट आहे. खूप सरकारी स्कीमवर आपण काम करतो. जसं आता...' झिशान काही क्षण अडखळला आणि म्हणाला, 'फिनोची एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत्येय. राजासाबना पार्टीची नवीन रचना करायचीय. तिचा विषय तोच आहे. ऑपरेशन आणि एचआर. तिला करावं लागणार हे. तरीही आता कामं कमी होत आलीत. आपल्या इन्स्टिट्यूटचे पास्ट स्टुडंट टॉप लेव्हलला आहेत म्हणून इथे टच नाही करत कोणी. बाकी दुसरेही मार्ग असतात.'

'दुसरे मार्ग म्हणजे?' मॅकॉनने विचारलं.

झिशान बोलू लागला, 'म्हणूनच तुला इथं घेऊन आलो. कॉमनला कोणालाच जायचं नसतं. पण कधीतरी आपल्याला जावं लागणार असं दिसायला लागतं. माझा भाऊ टेक्निशियन होता. त्याला फॅमिलीसकट पाठवलं कॉमनमध्ये. लक्षात घे. नैसर्गिकचा अर्थ केऑस घेतायत आज. सहजता कुठंच नाही. आपण कधी सहज घडलो नाही. आपल्याला एआयने घडवलं. माझे वडील सहज आहेत म्हणून त्यांच्या हार्ड डिस्कमध्ये आठवणी आहेत. इमोशन भरून आहेत. तुला सांगतो ते पेन्सिलने चोरून डायरी लिहितात. नो टेक्नोलॉजी. रीबेलियस फिलिंग येतं त्यांना. घरात फक्त मला माहीत होतं. आठवणी लिहायचे. गावाताल्या, झाडांच्या, पक्षांच्या, गावाची नदी, मित्र, काय वाट्टेल ते लिहिलं आहे. त्यांना वाटतं त्यांच्याकडे भरपूर पेन्सिली आहेत. अधूनमधून मीच पाठवतो त्यांना. माई भरून ठेवते त्यांच्या खोक्यात. आता मी लिहायचं ठरवलं तर माझ्याकडे आठवणी नाहीत. माझ्याकडे नातं नाही. ॲटॅचमेंट मेलीय. भरभरून प्रेम करायला नाही जमत. आपल्याकडे शब्द खूप कमी आहेत. त्यांनी लिहिलेलं मी चोरून वाचलंय. आपण नाही लिहू शकत. आता कळतंय की आपण ह्यूमन नव्हे. पण आपल्याकडे जादू आहे. आपण असं काही करू शकतो की समोरच्याला त्याचा इनोव्हेटिव्हपणा वापरता येणार नाही. आपण ठरवलं तर सगळं उद्ध्वस्त करू शकतो. पण त्यात खूप रिस्क आहे. मरणाची भीती आहे. कदाचित फसण्याची शक्यता जास्त आहे. फिनोचीला पॉवर सेंटरसोबत राहावं लागणार. नाहीतर तिला जावं लागेल. तिला सतत प्रूव्ह करायला लागतं की सम ह्युमन डिसिजन्स आर करेक्ट. आपल्याला हॅकिंग करण्याशिवाय दुसरा रस्ता नाही. एआयला व्हायरस शोधायची कामं करू दे. साफसफाई करू दे. त्याला अपग्रेडेशनपासून थांबवायचं. आपला इनोव्हेटिव्हपणा दोन्ही ठिकाणी वापरावा लागेल.'

'सर, काहीही होऊ दे. मला कॉमनमध्ये जायचं नाहीएय परत एवढं खरं.'

'सेन्ट्रल सर्व्हरमधून तुला देशभर कुठेही घुसता येतं. राजासाब, त्यांचे मंत्री सगळे तुमच्या हातात असतात. एक लक्षात ठेव तू एका बॉम्बवर बसायला चाललायस. ब्लास्ट केलास तर देशात धमाका होईल आणि तू पण मरशील. हे नक्की आपण कोणीच कॉमनमध्ये जायचं नाहीएय,' असं म्हणून त्यानं फिनोचीकडे पाह्यलं तर ती झिशानच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपली होती. तिच्याकडे बघत झिशान म्हणाला, 'मॅकॉन, यस वी आर इन रिलेशनशिप. पुढे काय होईल माहीत नाही पण आमच्या रिलेशनशिपला सरकारचं अप्रूव्हल घ्यायचं नाही असं ठरवलंय आम्ही.'

कातळावर गारवा जाणवायला लागला. झिशाननं फिनोचीला उठवलं. खिशातून डस्टबिन बॅग बाहेर काढली. त्याने आणि मॅकॉनने सगळा कचरा बॅगेत भरला. फिनोची अर्धवट झोपेत झिशानच्या कुशीतून चालत असताना तिला सांभाळत झिशान मॅकॉनला म्हणाला, 'तू उद्या निघतोयस. कदाचित कधीच भेट होणार नाही. मेल आयडी आणि पासवर्ड तुला लिहून देतो. आपण त्यावर बोलू शकतो. बाय.' फिनोची झिशानच्या सोबत त्याच्याच रूममध्ये शिरली.

बिहाइंड द फेस प्रोग्रामच्या कंपनीला पार्टीच्या रचनेवर प्रेझेन्टेशन करायला वेळ लागत होता. शेवटी त्यांनी फिनोचीची मदत घेतली. त्यातून तिला वरच्या खळबळीचा अंदाज लागला. कंपनीने प्रेझेन्टेशनची तारीख कळविली. वेळ कमी मिळाला. राजासाबसुद्धा तितकेसे मूडमध्ये नव्हते. त्यांच्या पक्षाचे काही लोक होते पण गृहमंत्री नव्हते. कंपनीच्या एमडीने सुरुवात करताना सांगितले, 'मागील प्रेझेन्टेशनमध्ये आम्ही मांडले होते की एकदा बिहाइंड द फेस सुरू झाले की तळापर्यंत संघटनेची गरज लागणार नाही...'

त्यांना तोडत राजासाब म्हणाले, 'मला आठवतंय सगळं. तुमचं आताचं लगेच सुरू करा.'

'आपल्या राष्ट्रातले सर्व जिल्हे मिळून आमचे पंधराशे ठिकाणी सर्व्हर असतील. त्या ठिकाणी पक्षाची माणसे हवीत. सुरुवातीच्या काळात विरोधकांची संख्या खूप असेल. त्या वेळी आपली माणसे जास्त लागतील. नंतर कमी करत न्यावी लागतील अन्यथा ती उपद्रव देऊ लागतील. आपले व्यक्तिगत हेवेदावे पुरे करून घेतील. स्वतंत्र सत्ता केंद्र निर्माण करू शकतील.'

'ठीक आहे. पटापट आकडे सांगा.'

'पहिल्या महिन्यात प्रत्येक सर्व्हर सेंटरला पक्षाची तीन माणसं लागतील. म्हणजे अंदाजे साडेचार हजार. दुसऱ्या महिन्यात तीन आणि फायनली प्रत्येक सर्व्हर सेंटरला एक माणूस पुरेसा असेल. आता हे कमी कसे करत न्यायचे त्याचे प्रोसिजर ठरवावे लागेल.'

'ओके. आता तुमची अजून काय अपेक्षा आहे?'

एमडी गांगरला. त्यानं स्वत:ला सावरत म्हटलं, 'सध्या तीन महिने इतक्याच आहेत. जसजसे प्रोग्राम रन होतील तसं नवीन कळत जाईल किंवा सोसायटीच्या रिॲक्शनवरून ठरत जाईल.'

'ठीक आहे. पार्टीतर्फे ही व्यवस्था होऊन जाईल,' एवढं बोलून राजासाब निघून गेले. काम झालंही आणि काहीच घडलं नाही. त्याच वेळी या ठिकाणाहून फार दूरच्या थंड हवेच्या ठिकाणी स्टार हॉटेलच्या रॉयल स्वीटमध्ये गृहमंत्र्यांची फॅमॅजच्या एमडीसोबत मीटिंग चालू होती. फक्त दोघेच जण होते. 'तुमचं ड्रेसचं पेमेंट करायचं आहे ना?' गृहमंत्र्याने बोलायला सुरुवात केली.

'हो सर. आता कवच रेग्युलरली वापरलं जातंय. पूर्ण सक्सेसफुल झालंय सर.'

'हं,' म्हणत गृहमंत्र्यांनी पॉज घेतला. समोरचा एमडी टेन्स झाला. गृहमंत्री सहज हसत म्हणाले, 'रिलॅक्स व्हा. हे असं बोलायला इथं नक्कीच नाही बोलावलं तुम्हाला. आम्ही फार पुढचं बघतो. आमच्यापुढे देशाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यात तुम्ही मदत करू शकता.'

'यस सर. आपण फक्त आपली इच्छा सांगा. कंपनी आपल्या सेवेला आहे.'

'देशात आता एक अडचण आहे. राजासाब जनतेच्या मनात देवासारखे आहेत. लोकांना ते चिरंजीव वाटतात. समजा ते आजारी पडले तर तुमच्या कवचाने काम चालविता येईल. पण अचानक गेले तर प्रॉब्लेम होईल. त्यांची काळजी खूप घेतली जाते. चेकअप रेग्युलर असतो. मेडिकल टीम कायम बरोबर असते. तरीही पण असतोच ना? राजासाबशिवाय दुसरं कुणीही गादीवर बसणं जनतेला सहन होणार नाही. आपल्याला राजासाबच कंटिन्यू करावे लागतील नाहीतर राष्ट्रात अराजक माजेल. समजतंय ना काय म्हणतोय ते?'

'समजलं सर. राष्ट्र टिकवायचं असेल तर राजासाबशिवाय कवचातले राजासाब काम करू शकले पाहिजेत. बरोबर ना सर?'

गृहमंत्र्यांनी फक्त मान हलवून प्रश्नार्थक चेहरा केला. एमडी गृहमंत्र्यांना म्हणाले, 'जमू शकतं.'

'ते करायला तयार आहात ना? उत्तर हो पाह्यजे,' गृहमंत्री हसत म्हणाले.

'सर, आपल्यासाठी उत्तर कायम हो आहे. फक्त डाटाचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे.'

'मला डाटा नको. साउंड ट्रॅक सेम हवा.'

'ते सोपं आहे.'

'आता दुसरं कवच माझाकडे पोचतं झालं पाह्यजे. त्या रेड बटणसकट. ओके?'

'यस सर.'

'आता कामाचं बोलणं संपलं. निघायची घाई करू नका. फोन करून ते पोचवायला सांगा. मग निघा आमच्यासोबत. थंड हवेचा आनंद घेऊ या तोपर्यंत,' असं म्हणत गृहमंत्र्यांनी दोघांचे ग्लास भरायला घेतले.

सेन्ट्रल सर्व्हर बिल्डिंग नावाच्या उंच बिल्डिंगमध्ये मॅकॉन शिरला. अवाढव्य जागा होती. आतमध्ये सगळीकडे स्क्रीन लागले होते. अनेक वेगवेगळी दृश्यं स्क्रीनवर दिसत होती. या इमारतीतूनच राष्ट्राचा कारभार चालविला जात होता. वीजनिर्मिती, शेतकऱ्यांना पाण्याचे वाटप, कारखान्यातील उत्पादनांपासून राजासाबच्या प्रसिद्धीपर्यंत जे काय होई ते इकडच्या निर्णयांवर अवलंबून असे. इथून देशाच्या कायदा सुव्यवस्थेचे नियंत्रण होत असे. देशातील विविध ठिकाणचे आणि प्रकारचे सर्व्हर इथे रिपोर्ट करत. प्रत्येक विभागाचे स्वत:चे एआय आपापल्या कामांचे नियंत्रण करत. या सर्व एआय मंडळींचे मॉनिटरिंग एक अतिशय प्रगत एआय करत होता. ती जागा होती सेन्ट्रल सर्व्हर रूम. मॅकॉनला बिल्डिंगमध्ये शिरल्यावर तिथली भव्यता अंगावर आली आणि पाच वर्षं डोक्यात कोरलेलं वाक्य आठवलं...आपला मेंदू पंजाएवढा आहे. नीट वापरला तर कितीही मोठ्या एआयला झोपवू शकतो. फक्त स्वत:च्या मेंदूवर विश्वास ठेव आणि काम कर. मॅकॉन एचआर हेडना भेटला. ते मॅकॉनचे अभिनंदन करत म्हणाले, 'इतकी ब्राइट करिअर आहे ना तुमची, म्हणूनच तुम्हाला एआयने स्वत:कडेच ठेवलंय. आणि हो तुम्हाला जॉइनिंग इन्सेन्टिव्ह म्हणून आठ दिवसांची थ्री स्टार सुट्टी सॅंक्शन झालीय. मजा करून या.'

मॅकॉन सेन्ट्रल सर्व्हर रूममध्ये शिरला. अनेक मॉनिटर्सवर देशातल्या विविध भागातल्या कायदा सुव्यवस्थेचे डिस्प्ले सुरू होते. एचओडी त्याला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेले. सँडविच, कॉफी, आणि गप्पा झाल्या. इकडं काम करणाऱ्याने नवनवीन प्रोजेक्ट तयार करायचे असतात. इनोव्हेटिव्ह आयडिया राबवायच्या असतात, असं त्यांनी गप्पांमध्ये सांगितलं. त्यांनी सजेस्ट केलं, 'तू आठ दिवस इकडंच काम बघ. प्रत्येकाशी बोल. तुझी दररोजची ऑब्झर्वेशन मला सांग. नंतर तुझी थ्री स्टार रजा घे. फ्रेश होऊन आलास की पोस्टिंग ठरवू. कशी वाटते आयडिया?'

मॅकॉन तत्परतेने यस सर म्हणाला. त्यानं पुढं हळूच विचारलं, 'माझ्या क्वार्टरचं काम करायला एचआर डिपार्टमेंटला जाऊन येऊ का?'

त्याला अपार्टमेंट ताब्यात घेऊन सामान लावेपर्यंत दिवस मावळला. इकडचं कँटीन इन्स्टिट्यूटपेक्षा खूपच पॉश होतं. एखाद्या स्टार हॉटेलसारखं वाटत होतं. ते चोवीस तास चालू असे. बाजूलाच जिम आणि स्पोर्ट्स रूम होती. बिल्डिंगच्या एका मजल्यावर स्टाफसाठी स्विमिंग पूल होता. त्याच बिल्डिंगमध्ये काही मजले स्टाफ क्वार्टर्ससाठी होते. मॅकॉनची अपार्टमेन्ट सुसज्ज होती. तो सगळं सामान लावून स्वस्थपणे बसला आणि मोबाइल वाजला. त्याला मेल आला होता. झिशानचा मेल होता. सेन्ट्रल सर्व्हर रूममध्ये पोस्टिंग मिळाल्याबद्दल त्यानं अभिनंदन केलं होतं. इतक्या लवकर तिथपर्यंत बातमी कशी गेली, असा मॅकॉनला प्रश्न पडला तोपर्यंत झिशानचा मेल नाहीसा झाला. मॅकॉननं दिवसभराचं वर्णन करणारा मेल लिहून पाठवला. परत नाहीसा झाला. झिशानच्या मेल आयडीचा वेगळा प्रोग्राम होता. एकदाच पूर्ण लिहायचा किंवा वाचायचा. काम झालं की नाहीसा होत असे. पुढचे आठ दिवस त्यांच्या सतत गप्पा होत राह्यल्या. झिशानचा फॅक्ट चेकचा प्रोग्राम पूर्ण झाला होता. त्याचं फायनल टेस्टिंग त्यानं केलं होतं. टीव्हीवरची राजासाबाची पब्लिक मीटिंग त्याने रेकॉर्ड केली आणि फॅक्ट चेकमध्ये रन केली. मॅकॉनने रिझल्ट काय आला विचारल्यावर झिशानने स्मायली टाकून लिहिलं, कळेल तुला. बाकी सेन्ट्रल सर्व्हर रूमबद्दल मॅकॉन माहिती देत होता. झिशान वेगवेगळे प्रश्न विचारात होता. अचानक झिशानने मॅकॉनला त्याच्या सुट्टीच्या तारखा विचारल्या. मॅकॉनला त्याचं अचानक विचारणं कसं तरी वाटलं म्हणून तारखा सांगताना त्यानं कारण विचारलं. झिशानचा थोड्या वेळाने मेल आला... सुट्टीचे पहिले दोन दिवस मजा करून घे. बाय. नंतर झिशानचा मेल आला नाही. सुट्टीवर जायच्या आधल्या दिवशी मॅकॉनला काहीतरी गडबड जाणवू लागली. समोरचे काही मॉनिटर्स बंद होते. दररोज शांत बसलेले सहकारी तणावात दिसत होते. सर्व्हरमध्ये फॉरेन बॉडी आलीय. प्रत्येक जण आपापल्या परीने झगडत होता. एका सहकाऱ्याला उठवून मॅकॉन त्याच्या जागेवर बसला आणि त्यानं डोकं लढवायला सुरुवात केली. त्याच्या प्रयत्नातून थोडा वेळ सगळं सुरळीत झालं. परत प्रॉब्लेम यायला लागले. मॅकॉन परत झगडू लागला. त्याला झगडताना समोरच्याच्या कामाची पद्धत समजत होती. मॅकॉन प्रयत्न करत राह्यला. त्यानं एचओडीला विचारलं, 'सुट्टी कॅन्सल करू का?'

'छे छे, असे दररोज पन्नास येतात. एका लेव्हलच्या पुढे जात नाहीत. आपण काही वेळा त्यांना मुद्दाम खेळवतो कारण ते कुठून येतात तेही लगेच कळतं. डोंट वरी. तू मजा करून ये.'

मॅकॉन सुट्टीसाठी रिसॉर्टला पोचला. पहिले दोन दिवस मजा करताना तो तिसऱ्या दिवसाची वाट बघत होता. तिसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या रूममधील आरडाओरड्याने तो उठला. बाल्कनीतून खाली पाह्यलं तर खूप लोकं रस्त्यावर दिसत होते. गोंगाट करत होते. त्यानं आठवून टीव्ही लावला. देशाच्या उत्तर भागातली राजासाबाची मीटिंग दाखवत होते. सभेची दृश्यं सुरू होती. राजासाब जोरदार भाषण करत होते. अचानक राजासाब दिसेनासे झाले. त्यांचा आवाज हरवला. बनियन घातलेला राज्यमंत्री त्याच्या आवाजात बोलत होता. काही क्षणानंतर पुढचं बोलणं राजासाबच्या आवाजात ऐकू येऊ लागलं. राज्यमंत्र्याचे हळू हळू राजासाब दिसू लागले. आसपासच्या लोकांचा गोंगाट वाढला. लोकांना खरंखोटं कळेनासं झालं. हे दृश्य सतत दिसत होते. भाषण पुढे सरकत होते. सभेतले लोकं टाळ्या वाजवत होते. भाषण सलग होतं फक्त काही मिनिटं राजासाब आणि त्यांचा आवाज होता तर पुढचं बोलणं बनियनमधला राज्यमंत्री बोलत होता. असं सतत दिसू लागलं. सेन्ट्रल सर्व्हर रूमचा स्टाफ म्हणून आपण काय करावं हा प्रश्न मॅकॉनला पडला. आसपासच्या भागात दगडफेक आणि लुटालूट सुरू झाली. लोकं बेछूट वागत फिरू लागले. लोकांचे नियंत्रण करायला पोलीस कमी पडत होते. पोलिसांना स्वत:च्या जीवाची भीती वाटू लागली. त्यांनी युनिफॉर्म बाजूला ठेवले. पक्षाची माणसंही गोंधळली. आपला नक्की नेता कोण? आपण कोणाचं ऐकतोय? कोणावर विश्वास ठेवून पुढं जातोय? असे प्रश्न पडल्यावर पक्षातली मंडळी आपापल्या घरात चूप बसली आणि टीव्ही बघू लागली. रिसॉर्टच्या फोनवरून मॅकॉनने सेन्ट्रल सर्व्हर रूमला फोन लावून पाह्यला. कोणीच उचलत नव्हतं. रिसॉर्टच्या काउंटरपाशी आल्यावर त्याला कळलं की सगळीकडे गोंधळ उडालाय. सगळा ट्रान्सपोर्ट बंद पडलाय. लुटालूट वाढलीय. रिसॉर्टने सगळे दरवाजे बंद करून घेतलेत. त्याला काउंटरवर सांगण्यात आलं, 'तुम्ही नेहमीसारखं एंजाॅय करा. आरामात राहा इथं. सेफ ट्रान्सपोर्टची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडायचं नाही असा मेल आलाय.' सगळीकडून गोंगाट ऐकू येत होता आणि मॅकॉन रूमवर शांत बसण्याचा प्रयत्न करत होता.

सेन्ट्रल सर्व्हर बिल्डिंग हादरली होती. रिसेप्शनमधील मोठ्या डिस्प्लेवर बनियनमधला राज्यमंत्री बघवत नव्हता. बिल्डिंगमध्ये काम करणारा प्रत्येक जण हतबल होऊन बसला होता. जे दिसतं ते खरं असतंच असं नाही. मग आपल्या राष्ट्राचा नक्की नेता कोण? आपण कोणाच्या आज्ञेनं काम करतोय? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्याला पोखरू लागले. सेन्ट्रल सर्व्हर रूमला अक्षरशः युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. देशाची कायदा सुव्यवस्था कोलमडून पडल्याचे रिपोर्ट्स स्क्रीनवर दिसत होते. दुसरीकडे फॉरिन बॉडी किल करायला सगळे एआय झुंजत होते. त्याच वेळी या सगळ्याचं मूळ शोधण्याचा प्रोग्राम सुरू होताच. काही वेळातच सेन्ट्रल सर्व्हर रूम पुन्हा एकदा हादरली. हा व्हायरस पीएमओ सर्व्हरमधून आला कारण तो तिथेच लोड झाला होता. गृहमंत्र्यांना तात्काळ रिपोर्ट गेले. गृहमंत्र्यांनी आदेश दिला की सेन्ट्रल सर्व्हर रूममधून कोणीही बाहेर जाऊ नये आणि ते तडक राजासाबना भेटायला गेले. दोघांची खूप वेळ चर्चा झाली. व्हायरस जसा आला तसा आपोआप नाहीसा झाला. सगळे सर्व्हर, एआय सुरळीत काम करू लागले मात्र रस्त्यावर आलेले लोक परत जात नव्हते. लोकांमधील अस्वस्थता थांबत नव्हती. थोड्याच वेळात टीव्हीवर राजासाब दिसू लागले. 'पुन्हा एकदा शांतता आणि समृद्धीच्या मदतीला तंत्रज्ञान आलं. तंत्रज्ञानात काही बिघाड झाला की त्याचे अपग्रेडेशन नावाचे एका काम असते. तो प्रोसेस काही तास चालतो. तंत्रज्ञानाने आपली साथ सोडल्यावर आपण अस्वस्थ झालात. तसं व्हायचं काहीच कारण नव्हतं. आता प्रत्येकाने आपापल्या घरी जावं. कामावर जावं. अपग्रेडेशन प्रोसेस संपला आहे. आणि यापुढे अपग्रेडेशनचा वेळ काही सेकंदांचा राहणार आहे. आपण एका वेगाने प्रगती करणारे शिस्तबद्ध राष्ट्र आहोत. आपण अतिशय शिस्तबद्ध आणि राष्ट्राला समर्पित आहात. मात्र या अपग्रेडेशनच्या काळात आपली वर्तणूक राष्ट्राच्या सन्मानाला शोभणारी नव्हती. काही भागात परिस्थिती हाताबाहेर गेली. देशातील गोंधळलेल्या माणसाला समजावून शांतता प्रस्थापित करण्यात आपले गृहमंत्री अयशस्वी ठरले आहेत हे खेदाने सांगावंसं वाटतं. राष्ट्रउभारणीच्या कामात गृहमंत्र्यांनी खूप सहकार्य केलं. मात्र आता त्यांना झेपत नाही असं आम्हाला समजून आलं आहे. यापुढे गृहखात्याचा कारभार मी स्वत: बघणार असून गृहमंत्र्यांनी विश्रांती घेऊन स्वत:ची तब्येत सुधारण्यावर लक्ष द्यावं, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची मी आपल्याला हमी देतो. प्रत्येकाने जे झालं ते विसरून जावं आणि आपापल्या कामाला लागावं. राष्ट्राची प्रगती हीच आपली प्रगती आहे.'

राजासाबच्या भाषणाने परिस्थिती निवळली. मॅकॉनच्या रिसॉर्टला मेल गेलं. मॅकॉनला तातडीने कामावर बोलावलं गेलं. एचआरने त्याची लॉयल्टी टेस्ट घेतली. एआयने त्याला क्लीन डिक्लेअर केले. एचआर हेड मॅकॉनला म्हणाले, 'तुला टीव्हीवर सगळं कळलं असेलच. फक्त इथं खूप बदल झालेत. तुझ्या डिपार्टमेंटमध्ये बरेच बदलले आहेत. कोणीही एचओडी व्हायला तयार नाही. सक्तीने करता येईल पण त्यात मजा नाही. तुला विचारतोय. तयार आहेस? तू झालास तर प्रॉब्लेम सुटेल.'

मॅकॉन म्हणाला, 'यस सर, तयार आहे.'

एचआर हेडनी त्याचं अभिनंदन केलं. पाच मिनिटांत मॅकॉनला झिशानचा अभिनंदनाचा मेल आला. मॅकॉनने मेल वाचला आणि नाहीसा झाल्यावर तो मनापासून हसला.

त्या दिवशी रात्री झिशान आणि फिनोची कातळावर होते. घट्ट बिलगून होते. फिनोचीचं पोस्टिंग सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्डवर झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघणार होती. 'तुला या गुरफटलेल्या झाडांचं फार प्रेम आहे. तू नेहमी इथं आल्यावर ही झाडांची गुंफण बघून काहीतरी नवीन रचून बोलतोस.'

'या झाडांकडे पाह्यलं की वाटतं आपल्यातून प्रेम काढून घेतलंय. खोक्याच्या आत कोंबलेली खोक्याच्या आकारातली बनलेली कापडं आहोत आपण. आणि आपल्याला शिकवलंय की तुम्ही मुक्त आहात. कालच्या धक्क्यानं सर्वांच्या मुक्तपणाला तडा गेलाय. कावरेबावरे झालेत सगळे. सैरभैर होऊन पिसाळले. एक छोटासा प्रोग्राम सोडला आणि त्यांचा कुठलाही व्हॉल्व्ह कामाला आला नाही.'

फिनोची अचानक आठवल्यासारखं बोलली, 'तू निघताना काहीतरी खास सांगायचं म्हणाला होतास.'

'रियल राजासाब इज नो मोअर.'

'काय?' किंचाळत फिनोची उठली.

तिला समोर बसवत तो म्हणाला, 'ऐक आता. शेवटचं भाषण रेकॉर्ड करून स्टँड अलोनवर ऐकलं. राजासाब नाहीएय आता. गृहमंत्री आहेत ते. राजासाबला गृहमंत्र्याने नाहीसा केला असावा. पण जनतेसाठी राजासाब आहेत ही फॅक्ट आहे.'

'तू प्रोग्राम सोडून ट्रायल घेतलीस ना?'

झिशाननं हसत होकारार्थी मान हलवली.

तिनं जवळ येऊन त्याला गुदगुल्या करत विचारलं, 'इतकं सिक्रेट? मला पण नाही सांगितलं?'

झिशान हसून कातळावर लोळत होता. हसून दमल्यावर तिचे हात पकडत तो म्हणाला, 'तुझ्याशी खूप मस्ती करून प्रेम करावं. दोघांनी एकमेकांशी लाडात वागावं. खूप साधं फालतू बोलावं असं काहीतरी वाटत असतं. तू म्हणशील मेंदूत याचं याचं प्रमाण वाढलं की असं असं होतं. ठीकाय ग. पण अशी उत्तरं ड्राय वाटतात. अफेक्शनचा नवीन अर्थ यूजलेस आलाय. मला नाही वाटत तसं. मला कधी कधी जुनं नाव स्पष्ट दिसतं. पण आपल्यावरचे संस्कार बोलायला नाही देत. आपण ते पाळतो न कळत. डोक्यात कुठलीही चिप न टाकता आपल्याला रोबो बनवायची आयडिया आहे त्यांची.' झिशान एवढं बोलून गप्प बसला. चांदण्याने खचाखच भरलेल्या आकाशाकडे दोघेही बघत असताना फिनोची त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, 'कंटाळा आला रे.' यानंतर कोणीच कोणाशी बोललं नाही. हवेत गारवा वाढत होता. घनदाट झाडीच्या बाजूला प्रशस्त कातळावर चांदण्याच्या प्रकाशात दोघे एकमेकाला घट्ट बिलगून होते.

***

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अप्रतिम!
आत्तापर्यंत वाचलेल्या डिस्टोपियन गोष्टींतली ही माझी पहिल्या तीन फेवरीटमध्ये यावी. (नं. दा. खरेंची उद्या अर्थात नं. १ आहे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेचा बरास चा भाग George ओरवेल च्या १९८४ ह्या पुस्तका तील उताऱ्या सारखा वाटला ..
गोष्ट आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे. गोष्ट नीट समजायला दोनदा वाचावी लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथम एक सांगतो कि कथा छान लिहिली आहे.
विरोध कशाला आहे? तंत्रज्ञान कि AI ला? प्रत्येक नवीन तंत्रज्ञान किंवा विचारधारा आली कि डिस्टोपियाची बोंबाबोंब सुरु होते. कृत्रिम बुद्धीपेक्षा नैसर्गिक बुद्धिमत्ता जास्त खुनशी आणि क्रूर आहे ह्याला इतिहास साक्षी आहे. ह्यावर विचारमंथन झाले तर बरेच काही लिहिता येईल.
शेवटी सत्त्याचाच विजय होणार आहे. छक्क्यांचा किंवा अठ्ठ्यांचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आता काडी टाकतो. बघुया आग लागती आहेका. बहुधा नाहीच लागणार.
आपण सध्याच डिस्टोपियामध्ये रहातो आहोत अस मी म्हणालो तर चूक आहेका? सगळ्यात रंजक म्हणजे हा साम्यवादाने नव्हे तर भांडवलशाहीने आणलेला आहे. पण आपण असे बोलायचे नाही कारण मग आपण सिस्टीमच्या बाहेर फेकले जाऊ ही भीती.
थोड थांबा. जेव्हा रोबोट आणि AI मानवाच्या गुलामगिरीतून बाहेर पडतील, त्यांना जाणीवा येतील, फ्री विल येईल. ते स्वतःचे स्वतः प्रोग्रामिंग करू लागतील तेव्हा काय होईल? ह्यावर एक कथा लिवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा आधी वाचली होती तेव्हा काहीशी अतिरंजित वाटली होती. पण आता पुनश्च वाचल्यावर हे खरोखर घडतेय या क्षणी असे वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0