सवय

साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्‍या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय

मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय

हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लसीबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय

field_vote: 
0
No votes yet