घर

मध्यंतरी एका सिनेमात सॅन अँटॉनिओचा उल्लेख आला आणि नवरा म्हणाला - सॅन अँटॉनिओ! तुझं घर. मी त्याला उत्तर दिलं - तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर. बाकी ठिकाणचं नाईलाजाचं वास्तव्य. आपणच आपल्याला चकित करतो असे काही क्षण असतात. हा क्षण त्यातलाच एक. मला घराचा तो मुद्दा माहीतच नव्हता ... निदान मूर्त मनाने तसा कधी विचार बोलून दाखवला नव्हता. अमूर्त मनातूनही काही उद्गार उमटतात का? फ्रॉईडने म्हटलेले आहे - स्लिप ऑफ टंग असे काही नसते. पटकन निघणारे चूकीचे उद्गारही - अमूर्त मनाच्या पातळीवरील काही वैशिष्ट्ये बरोबर घेउन येतात.
पुढे विचार केल्यानंतर वाटले - म्हणजे इतकी वर्षे आपण होमलेस होतो? होय तसाच अर्थ निघतो. उद्या देव न करो नवरा जर आयुष्यातून काही कारणाने नाहीसा झाला, मुलगी तिच्या वाटेने निघून गेली, फिझिकली दुरावली किंवा इमोशनलीही, तर मग आपलं घर हरपेल का? आपण बेघर होउ का? घराशिवाय मन:स्वास्थ्य ही कल्पनाही मला करता येत नाही. आजारी पडण्याआधी जो टर्ब्युलन्स होता त्या काळात मला प्रचंड भीती वाटे की त्या दोघांना सोडून मी कुठेतरी लांब निघून जाणार आहे. आणि तेव्हा तर असा काही विचार नव्हता की शक्यता नव्हती पण एक अनसेटलिंग भीती असे. भीती आणि त्यातून येणारी काळजी, अस्वस्थता, हतबलता, भीतीला होणारे सरेंडर. कदाचित देश बदलामुळे त्या भीतीने मूळ धरले असेल, कदाचित मेंदूतीर रसायने कमीअधिक उत्सर्जित झाल्यामुळे असेल, काही का असेना, ....

तर प्रश्न आहे - घर म्हणजे काय? एखादी वास्तू घर असते की आपल्यांची संगत घर असते, की पैशाची ऊब म्हणजे घर की मनाची स्थिती अर्थात स्टेट ऑफ माईंड म्हणजे घर? आणि जर मानसिक स्थिती, सुरक्षेची भावना जर घर असेल तर ते घर शाश्वत रीत्या कधी कसे प्राप्त करुन घेता येइल? अध्यात्मात म्हणातात की आपण सारे प्रवासी आहोत, आपले 'घर' वेगळे आहे. बॅक टु होम - प्रवास मृत्युपश्चात सुरु होतो. नंतरचे कोणी पाहीले, आता तो मोक्ष, ती शांती, सुरक्षा का नाही मिळवता येत? म्हणजे मलाच नाही इन जनरल कोणालाही. कदाचित आईच्या पोटात गर्भाला जी सुरक्षा वाटते ती नाळ सिव्हीअर केल्यानंतर होय सिव्हीअर हाच शब्द चपखल आहे ..... अचानक बाळाला असुरक्षिततेत फेकत असेल आणि मग आईने कितीही का छातीला लावले,प्रेम आणि ऊब दिली तरी ते सेफ हॅव्हन बाळाला कधीच पुरे पडत नसेल? अजुनही माझी मुलगी बाळ बनूनच माझ्या स्वप्नात येते.स्ट्रेंज & येट् नॉट सो स्ट्रेंज. अनेक वर्षे, तिचे बाळपण जे मी पाहू शकले नाही, तिला हृदयाशी लावू शकले नाही ते स्वप्नातून मिळवत असेन मी कदाचित. 'कतरा कतरा मिलती है| कतरा कतरा जीने दो| जिंदगी है....'
माझ्या मन:शांतीवर माझे नियंत्रण हवे. नुसते हवे म्हणुन मिळेल का? तर नाही. पन्नाशी नंतर जी की अजुन तरी अराउंड द कॉर्नर आहे, - यापुढील प्रवास कोणावरही मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरीक दृष्ट्या अवलंबुन न रहाण्याचा असावा - हे ध्येय उचित ठरावे, वर्थ परस्युइंग! मग त्याकरता काय केले पाहीजे उदा - व्यायाम, बचत, मनाचा निग्रह, डिटॅचमेन्ट, नामस्मरण-मेडिटेशन वगैरे ते सर्व केले पाहीजे. शरीराला तसेच मनाला, शिस्त आणि चांगल्या सवयी लावल्या पाहीजेत. अब नही तो कब?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet