IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)

(भाग १)

दर वर्षीच्या तुलनेत या वेळी मी थोडे कमी, म्हणजे २३ चित्रपट पाहिले. त्यातले तब्बल नऊ, म्हणजे ४० टक्के चित्रपट ‘बायकांचे’ होते. ‘बायकांचे’ म्हणजे काय, या तपशिलात अगोदर न जाता एकेका चित्रपटाचा परामर्श घेऊ आणि त्यातून हाती काय लागतं, ते पाहू. महोत्सवातल्या सगळ्या चित्रपटांची एक एक्सेल शीट बनवावी आणि अमुक, तमुक, ढमुक वैशिष्ट्यांच्या उभ्या स्तंभात एकेक कसा बसतो हे पाहिलं तर अगदी शास्त्रीय मूल्यमापन होईल, असा विचार स्पर्श करून गेला; पण मग लक्षात आलं की चित्रपटासारख्या कलेच्या बाबतीत हे सोयीचं ठरण्याऐवजी अडचणीचं ठरेल. म्हणून ते रद्द केलं. केवळ बायकांच्या नऊ चित्रपटांसाठीसुद्धा तसं केल्यास अन्याय होईल, भेदभाव होईल, म्हणून तिथेही रद्द केलं. त्यापेक्षा एक एक करून चित्रपट घ्यावा आणि चर्चा करता करता काहीतरी जसं सापडत जाईल, तसं मांडत जावं, असं ठरवलं.

पहिला चित्रपट ‘हिडन इन द स्पॉटलाइट’. या चित्रपटाचा दिग्दर्शक पुरुष आहे; पण लेखक म्हणून त्याच्याबरोबर दोन बायकांची नावं आहेत. त्यापलीकडे जायचं तर मूळ एक कादंबरी आहे आणि तिचा लेखक पुन्हा पुरुष आहे. चित्रपट ‘बाई’ या विषयाभोवती (पुरुष नाही, बाईपणा या ठसठशीत अर्थी) फिरतो. चित्रपट डच भाषेत आहे.

चित्रपट एका मुलीच्या नजरेतून मांडला जातो. तीन बहिणींमधली ती सर्वात मोठी. तिच्याखाली एक आणि मग काही अंतराने तिसरी. त्यांचा बाप निधन पावलेला आहे. आईला दुसरा पुरुष आवडू लागतो आणि ती त्याच्याशी लग्न करते. हा सावत्र बाप खेळकर असतो, मदत करणारा असतो आणि तीनही बहिणींशी सेक्स करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. बळजबरी करत नाही; पण अगदी अकरा बारा वर्षांपासूनच्या मुलीला कसं भुलवायचं, तिला कसं फशी पाडायचं आणि संबंध कसे गुप्त ठेवायचे, यात हुशार असतो. दोन समवयस्क बहिणींमध्ये अर्थातच स्पर्धा होऊ लागते. दोघी त्याच्या डावाला बळी पडतात. जेव्हा तिसरीवरही तो तसाच प्रयत्न करू लागतो, तेव्हा मोठी ते होऊ देत नाही. त्यासाठी अडथळे आणते, कधी स्वत:च त्याच्या भोगासाठी पुढे होते. मधलीला दिवस जातात आणि ती मूल होऊ देते. मोठी वेगळी होते आणि तिचं एक गायक म्हणून करियर बनतं. अचानक मधलीचा अपघाती मृत्यू होतो आणि मोठी येऊन तिच्या मुलीला स्वत:कडे घेऊन जाते. मग या छोट्या मुलीचा बाप मुलीची भेट घेतो. मोठीच्या कडव्या विरोधाला न जुमानता ही मुलगी तिच्या जन्मदात्या बापाला भेटते. ‘का भेटायचं नाही? का त्याच्याकडे रहायचं नाही?’ असे प्रश्न उभे करते. मोठी आडमुठी वागू लागते. मग तो बाप मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टात जातो. कठीण स्थिती असते. बाप कसा आहे, हे मुलीला सांगायचं की नाही? कसं पटवून द्यायचं? कोर्टाला काय सांगायचं? तिचा ताबा बापाला मिळाला, तर पोटच्या मुलीवरही तो तोच प्रयोग करणार, ही मोठीला खात्री असते.
अशा रीतीने कथा अगदी बाईपणाला मध्यभागी ठेवणारी आहे. मला यात अनेक प्रॉब्लेम झाले. एक म्हणजे तो सावत्र बाप असा पूर्ण खल, पाताळयंत्री का? एरवीच्या कुठल्याही वागण्यात तो विकृत वागत नाही. बायकोला धमक्या, मार देतो. ते चूक असलं तरी विकृत म्हणता येत नाही. त्याचे हेतू साध्य करण्यासाठी, तिचं तोंड बंद करण्यासाठी तसं तो करतो. बाहेरच्या जगात तो कसा वागतो – बायकांशी, अल्पवयीन मुलींशी आणि इतरांशी याबद्दल चित्रपट चकार शब्द काढत नाही. अशामुळे ही कथा एक ‘टेस्ट केस’ होते. ‘अमुक परिस्थितीत सापडलेल्या मुलीचं काय होतं,’ याच्या खोलात जाणारी.

Hidden in the Spotlight (2020)

ठीक आहे, ते मान्य केलं. गोष्ट हॉलंडमध्ये घडते! तिथेही बायका-मुली अशाच असहाय्य? अशाच भोळ्या, अल्लड? बहिणी आणि आईसुद्धा? हेदेखील मान्य करायचं, तर या कुटुंबातल्या बायका काहीशा जास्त बिचकणाऱ्या, घाबरट म्हणाव्या लागतील. असं नुसतं म्हणून पुरत नाही. त्या तशा आहेत, याच्या खुणा त्यांच्या इतर वागण्यात दिसून यायला हव्यात. तसं जाणवत नाही. घरातलं घरात ठेवण्यासाठी, ‘अब्रू जपण्यासाठी’ ती आई सर्व काही सहन करते आणि मुलींकडूनही तशीच अपेक्षा ठेवते.

हे अती झालं! मला मीरा नायरचा ‘मान्सून वेडिंग’ आठवला. पंजाब्यांना त्याचा भयंकर राग आला होता. पण त्याच वेळी पंजाबी कुटुंबांमध्ये अल्पवयीन, निरागस मुलींना सर्रास लैंगिक शोषणाला तोंड द्यावं लागतं, असंही हिरिरीने मांडलं गेलं. ‘हिडन इन द स्पॉटलाइट’ हा चित्रपट २०२० सालचा, म्हणजे अगदीच नवा आहे. त्याचं परीक्षण, त्यावर टीकाटिप्पणी सापडत नाही. (डच भाषेत आहे; त्याचा काय उपयोग!) डच-बेल्जियन यांनी मिळून काढला आहे. चित्रपट रसिकांना, पत्रकारांना, समाजशास्त्रज्ञांना या चित्रपटाविषयी काय वाटतं, हे जाणून घ्यायला आवडेल. त्यातून कदाचित काही प्रकाश पडेल. दिग्दर्शकाला काहीतरी म्हणायचं असेलच. तेही शोधलं पाहिजे. तोपर्यंत चित्रपट नापास. कलाकृतीची गुणवत्ता ठरवताना विषयनिवडीचे मार्क मोजू नयेत, असं मी केव्हाच ठरवून टाकलं आहे.

पण चित्रपटाच्या सादरीकरणाला बरेच पैलू असतात, त्यांची दखल तर घ्यावीच लागेल. चित्रपट हे माध्यम बहुआयामी आहे, असं म्हणताना चित्रपटकलेच्या एकेक अंगाचा उपयोग आशय व्यक्त करण्यासाठी, आशयाकडे निर्देश करण्यासाठी, आशय फुलवण्यासाठी व्हायला हवा. ज्या चित्रपटाचा विषय अगदी अल्पवयीन मुलींचं थेट त्यांच्या सावत्र बापाकडून होणारं लैंगिक शोषण, हा आहे, त्याचं एकंदर दर्शन प्रसन्न असू नये. या चित्रपटात कॅमेऱ्याच्या हालचालींना आशयामुळे काही दिशा मिळाली आहे, असं प्रतीत होत नाही. कॅमेरा नाही, लोकेशन नाही, नेपथ्य-प्रकाशयोजनादेखील नाही. असल्यास माझ्या नजरेतून सुटलं. मोठी पुढे लोकप्रिय गायिका होते. त्याचा चित्रपटाच्या धाग्याशी सेंद्रीय संबंध नाही.

एक शक्यता अशी, की मूळ कादंबरीत हे सगळं काही असेल; पण चित्रपटाची पटकथा करताना निसटून गेलं असेल. दुसरीही एक शक्यता आहे. ती म्हणजे, ‘या समाजात हे असं राजरोस चालू असतं पण ते जणू ऐन प्रकाशझोतात दडलेलं असतं!’ चित्रपटाचं शीर्षक तरी असंच म्हणतं. पण तसंही विधान व्यक्त झाल्यासारखं वाटत नाही. शेवट तर अगदी सोयीस्कर आहे. ‘खळबळजनक विषयावर काढलेला सरधोपट, धंदेवाईक सिनेमा,’ असं कोणी याचं वर्णन केलं, तर खोडणं कठीण होईल.

पण सर्वांचा अभिनय उत्तम आहे! वेगळ्या शब्दात म्हणायचं, तर पात्रयोजना नेमकी आहे. विशेषत: लहानपणची मोठी बहीण. तिचे डोळे, तिच्या चेहऱ्यावरचा तणाव, तिचा गप्पपणा हे सगळं प्रत्ययकारी आहे. पण ती मोठी, गायिका झाल्यावर .तिचा तीक्ष्णपणा हरवतो! अगोदर तो इतका असतो की ते हरवणं प्रकर्षाने जाणवतं.

महोत्सवात वयात येणाऱ्या मुलींवरचे आणखी तीन चित्रपट होते. ‘हिडन इन द स्पॉटलाइट’ नंतर लगेच पाहिला, तो ‘द फर्स्ट डेथ ऑफ जोआना’. हा मला आवडला. याची कथाकल्पना लहानशी आहे एका शाळकरी मुलीच्या आजीची बहीण नुकतीच ७०व्या वर्षी वारलेली आहे. आणि या मुलीला, म्हणजे जोआनाला असं कळतं की तिचा कोणी बॉयफ्रेंडच नव्हता! तिला ते खरं वाटत नाही. तिने काहीतरी लपवलेलं असणार, अशी तिची खात्री पटते. मग ते रहस्य ती शोधू लागते. १३ वर्षांची जोआना हुशार असते, धाडसी असते आणि एकदा मागे लागली की न सोडणारी असते. एका मैत्रिणीला मदतीला घेऊन ती काय काय करते, याची ही कहाणी.

The First Death of Joana (2021)

पण कुठल्याही ‘चांगल्या’ चित्रपटाप्रमाणे हा चित्रपट एवढ्या वर्णनात मावत नाही. जोआनाची शाळा, शाळेतले इतर विद्यार्थी, मुलगे आणि मुली यांच्यातलं नसलेलं-अस्फुट फुलू लागलेलं नातं, त्याला तिचा प्रतिसाद, तिची मैत्रीण, ‘मुलग्यांच्या गर्लफ्रेंड्स पळवणारी’ अशी त्या मैत्रिणीची ख्याती, हे वर्णन जोआनाला अजिबात आवडत नाही; पण मैत्रिणीकडे पाठही फिरवता येत नाही. जोआनाला मैत्रीण एकदा विचारते, तुझा कोणी किस घेतलाय? प्रथम ती नाही म्हणते. नंतर ‘हो’ करते. कोणी घेतला, त्या मुलग्याचं नावही सांगते. पण घरी आरशासमोर स्वत:च प्रतिबिंबाचा किस घेत, ते काय असतं, हे जाणू पहाते.

कथा गावात घडते. जोआनाला बाप आहे पण ती आईबरोबर रहाते, बाप वेगळा रहातो. एका डिलिव्हरी देणाऱ्या तरुणाशी तिच्या आईचं सूत असतं, जे जोआनाला माहीत असतं. तिच्या आजीचेसुद्धा असेच शरीरसंबंध आहेत, हेसुद्धा तिला कळतं. जोआना स्कँडलाइज होत नाही. तिच्या कोमल मनाला कसलाही धक्का बसत नाही. भारतीय प्रेक्षकाला बसायला हवा. कारण आपण, आपला समाज बायकांच्या शारीरिक गरजांना नाकारतो. बायकांना देव्या बनवून डोक्यावर घेतो आणि त्यांना माणूसपणा नाकारतो.

जोआना आणि तिची मैत्रीण जंगलात जाऊन एका ढोलीतली मेणबत्ती तपासतात. आजीच्या बहिणीच्या घरात चोरून शिरतात आणि कपाटं, टेबलं वाचकरतात. दूर टेकडीवर पवनचक्क्या असतात. जणू गावातल्या मुलींच्या आवाक्याबाहेर. जोआना कोणाकोणाला प्रश्न विचारते. एक उत्तर मिळतं, ‘तिला तिच्यावर सत्ता गाजवलेली आवडत नव्हती.’ दुसरं: ‘परक्याशी जुळवून घेणं तिला कधी जमलं नाही.’

चित्रपटात कुठे स्वप्नाळू डोळे नाहीत की मंद, हळुवार संगीत नाही. तरी चित्रपटाला एखाद्या कवितेचा फील आहे. जोआनाचं मन प्रेक्षकासमोर हळूहळू उलगडत जातं. असं, की शेवट काहीसा सांगण्यासारखा असला तरी जेव्हा तो घडतो, तेव्हा समाधान वाटतं. समलिंगी आकर्षणाची इतकी सुंदर, निरागस मांडणी मी पाहिलेली नाही.

बाईने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा एक विशेष मला जाणवला, तो म्हणजे संपूर्ण चित्रपटात केवळ बायकांवरच फोकस आहे. पुरुष जणू प्रॉप्स. बायकांना वावरण्यासाठी सोयीचे भोज्ये. हे मी बोलून दाखवल्यावर एक मुलगी म्हणाली, मुख्य भूमिकेत पुरुष असलेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये असंच असतं ना? बायका पुरुषांसाठी भोज्यापुरत्या असतात!

मी विचारात पडलो. या अंगाने विचार केला पाहिजे. या अंगाने चित्रपटांकडे बघितलं पाहिजे!

(क्रमशः)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet