ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस

सध्याच्या काळात सर्वात जॉब ओरीएन्टेड कोर्सेस म्हणून एआय, एमएल, डेटा सायंस कडे पाहिले जाते. सध्या एकूण राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक पॉलिसी बदलत आहे आणि त्याच अनुषंगाने लहानमुलांना प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे शिकवण्यासाठी जी ऑनलाईन आभासी बाजारपेठ तयार होत आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच तोटा होणार आहे. जे कधीकाळी इंजिनीअरिंग क्षेत्राचे झाले होते तसेच किंवा त्याहून भयंकर एआय, एमएल, डेटा सायंस या क्षेत्राचे होईल. कारण ज्या पद्धतीने एक मार्केटिंग केले जात आहे की नव्या भरपूर पगारांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी एआय, एमएल, डेटा सायंस चे कोर्सेस केल्याशिवाय पर्याय नाही. हा एक प्रकारचा आंधळा प्रचार केला जातोय. माझे व्यक्तिगत मत असे आहे की एम. एस. सी. आय. टी. चे कधीकाळी जसे तुडुंब कोर्सेस चालत होते तसेच काहीसे या एआय, एमएल, डेटा सायंस चे होईल. कारण एआय, एमएल, डेटा सायंस समजून घेण्यासाठी जी पार्श्वभूमी असावी लागते ती बहुतेक वेळा बघितली जात नाही. तुम्हाला कोडिंग येते का नाही येत यापेक्षा तुम्हाला काही पॉप्युलर लायब्ररीज कश्या वापरायच्या आणि कोणत्या डेटा वर कशा पद्धतीने ऑपरेशन करायचे एवढेच कामचलाऊ क्लृप्त्या शिकवल्या जातात. एम. एस. ऑफिस मधले टुल्स कसे वापरावेत एवढे शिकवले की कार्यालयीन कामकाजासाठी जे जे गरजेचे आहे ते कसे करावे ह्याची शिकवण मिळते तसंच काहीसा प्रकार आगामी काळात एआय, एमएल, डेटा सायंस वगैरे कोर्सेस बद्दल होईल.

आज कोणत्याही क्षेत्रातील लोक संशोधनासाठी एआय, एमएल, डेटा सायंस च्या माध्यमातून काही इंप्लीमेंटशन करता येईल का यासाठी बऱ्याच लायब्ररीज तयार करत आहेत आणि वापरुन त्यात बरेच बदल करून ईतरांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्यात मूलभूत संशोधन करणारे खूप मोलाचे योगदान करत आहेत. रोज नवनव्या येणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या लायब्ररीज वापरल्या जातात. काही एप्लीकेशन स्पेसिफीक फ्रेमवर्क ठरावीक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठीच वापरले जातात. काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये सपोर्टिव्ह आणि डिराइव्ह्ड पँकेजेस उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग करून प्रश्न सोडवता येतात. अर्थातच ज्यांनी एखाद्या रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला असेल तर त्यांना फार काही नवीन शिकण्याची गरज नाही फक्त एआय, एम.एल. निगडित अल्गोरिदम किंवा टेक्निक वापरता आली पाहिजे. सोबत गणिताच्या बऱ्यापैकी मूलभूत संकल्पना नीट समजल्या असतील तर त्यांचा वापर करून सोल्युशन तयार करता येते. या सगळ्यांचा विचार केला तर इथे एआय, एम.एल वगैरेंचा वापर कसा करावा याची जाण असणारा आणि ज्या ज्या क्षेत्रातील रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत त्या क्षेत्रातील बारकाव्यांची जाण असणारा असे दोन घटक प्रामुख्याने गरजेचे आहेत. सध्याची बाजारपेठ मूलभूत घटक क्षेत्रातील गोष्टींचा विचार न करता केवळ एआय, एम.एल, डेटा सायंस वगैरेंची जाण असणारी फौज तयार करण्यात गुंतलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झालेल्यांना इतके दिवस ही आभासी बाजारपेठ आमिषे दाखवून बळी पाडत होती. पण सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर लहानपणापासून कोडिंग शिकलंच पाहिजे नाहीतर काही खरं नाही पुढच्या पिढीचे वगैरे जुमलेबाजी करून जी जीवघेणी जाहिरात करून लोकांना फसवलं जातंय त्याचा अतिरेक झालाय. मुळात भारतात शहरी शिक्षित लोकच बरेचदा फसवले जातात कारण त्यांना प्रभावीपणे हिप्नोटाईज केले जाते. कारण त्यांची क्रयशक्ती खूप असते. ग्रामीण भागातील जनता आणि गरीबीमुळे पिचलेल्या लोकांना इथली व्यवस्थाच फसवत आलेली आहे. ज्या वयात प्रश्नांची समज यायला हवी, समस्या कशामुळे तयार झाल्यात त्यावर शिक्षण व्हायला हवे त्या वयात केवळ कारकुनी प्रोग्रामिंग शिकवणी देऊन गाढवी कामे करणाऱ्या भावी पिढीचे कारखाने उभे राहू लागतील.

सध्या गल्लीबोळातून उभ्या झालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून जी रोजगारक्षम नसलेल्या इंजिनिअर बेरोजगारांची फौज आहे त्यांच्या साठी प्रयत्न व्हायला हवेत.भविष्यात कोडिंग जिनियस पोराटोरांची फौज तयार होईल. जाहिरात क्षेत्रात सुखवस्तु कुटुंबातील लोकांना फशी पाडून वाट्टेल ते गळ्यात मारण्याच्या कलेत खूप लोक मातब्बर आहेत. भारतीय बाजारपेठ तर यासाठी जगात अव्वल आहे. अशा वातावरणात लहाग्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. साधे उदाहरण बघा युट्युबवर खान एकाडेमी चँनेलवर शालेय शिक्षणाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर मौलिक व्हिडीओ ट्युटोरियल्स मोफत उपलब्ध आहेत. तशाच प्रकारच्या कित्येक चँनेल्सवर बऱ्यापैकी साधर्म्य असलेला खुप कंटेंट उपलब्ध आहे तरी पण कित्येक ऑनलाईन पोर्टल शिक्षणाचा बाजार मांडून बसलेत. कोरोनोच्या कालावधीत तर अशा गोष्टींचा महापूर आलाय. कोडिंग सरावासाठी कित्येक स्पर्धात्मक वेबसाईट मोफत उपलब्ध आहेत. फक्त योग्य नियोजन आणि आवश्यक गोष्टींवर भर देऊन अभ्यास करणाऱ्या लोकांना हे करणे शक्य आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना याची गोडी लावणे गरजेचं आहे. त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर प्रॉडक्ट करू नये. भविष्यात शहरीभागातील शालेय मुले हीच मोठी ग्राहकांची बाजारपेठ होणार हे नक्की. याचा फटका ग्रामीण भागात कमी प्रमाणात बसेल कारण निरंतर चालेल अशी इंटरनेट व्यवस्था अजून पोहोचली नाही. जी आहे ती मोबाईलवर आधारलेली आहे. शहरीभागातील सुविद्य आणि सुशिक्षित पालकांची लोकलाजेस्तव स्युडो कोडिंग जिनियस स्पर्धेत उतरून फसगत होण्यासाठीची व्यवस्था तयार केली जातेय. ह्याचे फायद्यांपेक्षा दुष्परिणाम जास्त होतील. खूप पूर्वी मेडिकल ट्रान्सक्रिप्शन वगैरे क्षेत्रात काही कोर्सेस ने जो धुमाकूळ घातला होता आणि नंतर तो शमला तसा काहीसा प्रकार एआय, एम.एल. डेटा सायंस वगैरे कोर्सेसच्या बाबतीत होईल असे वाटते. दहावी, बारावी आणि नागरी सेवा परिक्षा तयारी साठीचे भुलवणारे आणि फसवणारे कोर्सेस हे राष्ट्रीय उत्पन्नात कैक दशके आघाडीवर आहेत. त्यांची बुरूजे हल्ली एआय., एम.एल, डेटा सायंस वगैरे कोर्सेसमुळे ढासळतील अशी सध्याची परिस्थिती आहे.

पुण्यासारख्या ठिकाणी खेडोपाड्यातून लोक एमपीएससी युपीएससी च्या तयारीसाठी येतात नंतर इथल्या या बाजारपेठेचे कायमस्वरूपी गिऱ्हाईक होऊन जातात. उमेदीच्या काळात केवळ मोटीव्हेशन स्पीकर्सला बळी पडून शहरात येऊन स्पर्धापरिक्षेच्या घुसमटीत अडकून बेजार होतात. तशीच काहीशी अवस्था एआय, एम.एल, डेटा सायंस वगैरे सर्टिफाईड बेरोजगारांची भविष्यात होईल. मजूर अड्ड्यावर जसे सकाळी सकाळी एक ठेकेदारांची गँग येते आणि गरजेनुसार घाऊक माल उचलावा तसे मजूर घेऊन जातात तसेच काहीसे आयटी क्षेत्रातील सर्टिफाईड मजूर अड्डे चौकाचौकात थाटले जातील. गावागावातून आलेला एखादा तरूण शहरी औद्योगिकीकरणाच्या रेट्यात भरडला जातो तशीच अवस्था कोडिंग एक्सपर्ट पोराटोरांची होईल. एखाद्या क्षेत्रातील मुलभूत संकल्पना नीट समजून त्याचा वापर कसा करावा, रोजच्या जगण्यातले प्रश्न कसे सोडवावेत आणि पुर्वलक्षी अनुभवातून वेगळ्या प्रकारे सोल्युशन कसे शोधावे ह्यांचे लौकिकार्थाने शिक्षण दिले गेले पाहिजे. मात्र आपल्याला अंधानुकरण आणि अनुसरून एखादी गोष्ट करणे यातला फरकच कळत नाही.

एआय. एम.एल डेटा सायंस वगैरेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक्सपिरियन्स डेटा, कँटेगाराईज्ड डेटा आणि प्रोसेस्ड डेटा निर्मिती कशी असते याचा अभ्यास होय. त्यावर आधारित वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी बनवलेली मॉडेल्स समजून, अभ्यासून नवीन काही विकसित करुन पुढे गेले पाहिजे. यासाठी आकलनशक्ती आणि किमान शैक्षणिक प्रगल्भता गरजेची आहे. त्यासाठी चिंतन मनन करणे महत्त्वाचे आहे. गाढवी कामे करणाऱ्या लोकांची फौज तयार करून नवी गुलामांची पिढी तयार होतेय. नैसर्गिक विचार करण्याची पद्धत जोपासली गेली पाहिजे. तीची एक प्रोसेस शालेय जीवनात तयार होत असते. ती होणे गरजेचे पण आहे. भूलथापांना बळी पडून पालक आपल्या मुलांना भविष्यातील असुरक्षिततेच्या खाईत लोटत आहेत. एआय, एम.एल, डेटा सायंस साठी केवळ संगणकीय क्षेत्राचेच नॉलेज पाहिजे असे काही नाही. मानसशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे विद्याशाखांचा अभ्यास (किंवा किमान समज) पण तेवढाच गरजेचा आहे. मल्टी डिसिप्लेनरी ब्रँचेस समजणारे लोक या क्षेत्रातील प्रॉब्लेम्स खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. कारकुनी नॉलेज असणारे लोक केवळ मलमपट्टी सारखेच कामचलाऊपणे स्लॉव्ह करू शकतात. अशी कारकुनी जनता पुढे वेगवेगळे चोखंदळ मार्ग अवलंबून शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय धुंडाळू शकतात. कारण ही आजची कारकुनी जनता किमानपक्षी डिग्री होल्डर आहे. रोजगाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ही मंडळी आपले नशीब आजमावून बघू शकतात. मात्र भविष्यात कोडिंग जिनियस पिढी तयार होईल ती असे नशीब आजमावून पाहू शकतील याची शक्यता कमी असेल. डिजिटल इंडियाच्या रेट्यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम कानाडोळा करण्यासारखे नाहीत. कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षण, इंटरनेटवर आधारित क्षेत्रात भरपुर शिक्षणाच्या संधी वगैरेंनी मोठी बाजारपेठ उभी राहत आहे. यात उपलब्ध ग्राहकांना तर कचाट्यात घेतलेच आहे. भविष्यातील ग्राहकांच्या बेजमीसाठी धुष्ट पुष्ट आयुधे तयार केली जात आहेत. भरभराटीची आमिषं दाखवून फसव्या बाजारपेठेत ग्राहकांचा हकनाक बळी देणे आपल्या देशात काही नवे नाही. सोबत स्वयंघोषीत तज्ञ मंडळी असतील तर फसवणुकीची शक्यता पराकोटीची असते. काय गरजेचे आहे आणि काय आवश्यक आहे याचा विचार करणे महत्वाचे असते. मात्र माथी मारून बळजबरीने ग्राहक बनवणे ही सध्याच्या बजारपेठेचे सूत्र. त्यामुळे ए. आय, एम. एल. डेटा सायंस क्षेत्रातील कोर्सेस बद्दल वेळीच अंकुश ठेवला पाहिजे. समज कमी असणारे आणि नको इतकी जास्त समाज असणारे लोक नेहमीच बळी पडतात आणि टाहो फोडतात. शिक्षणक्षेत्राचे म्हणाल तर कोणीही मुलांच्या भविष्याची काळजीपोटी जास्त खर्च करून चांगल्या शिक्षणासाठी खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. याचाच फायदा घेण्यासाठी बोकळलेल्या बाजारपेठेतील हापापलेले व्यावसायिक सापळे रचून सावज टिपायला बसलेले असतात. समाजमाध्यमाच्या कचाट्यात आलेल्या लोकांना प्रभावित करणे हल्ली तसे फारसे अवघड राहिले नाही. यात भरडला जातो तो पामर मध्यमवर्ग इर्षेपोटी सतत तुलना करण्यात गर्क असल्यामुळे.

आज परिस्थिति अशी आहे की कोरोनामुळे सगळीच क्षेत्रे मोडकळीस आलेली असताना उगाचंच फुगलेल्या बेडक्यासारखे व्हर्च्युअल एज्यूकेशन उभे राहू पाहत आहे. त्यात इंडस्ट्री ४.० म्हणून आता सगळीच दुनिया ए. आय., एम. एल. आणि डेटा सायंस वगैरे गोष्टीमय होऊन जाणार आहे असा एक दूधखुळा प्रचार केला जातोय. इंडस्ट्री ४.० मुळे अवघ्या जगात उलथापालथ होणार आहे हे अगदी खरे आहे. पण त्यासाठी लहान मुलांना बकरा बनवणे आणि व्यावसायिक संधी साधणे हे खूप क्रूर आहे. कोणत्याही औद्योगिक क्रांतीनंतर समाजात उलथापालथ होतेच. त्याचे काही फायदे आणि तोटे असतात. कला वाणिज्य आणि शास्त्र शाखांचा कधीकाळी बऱ्याच पिढ्यांवर खूप मोठा प्रभाव राहीला आहे. त्यामुळे इंडस्ट्री ४.० ला अनुसरून आपल्या एज्युकेशन पोलिसिमध्ये योग्य ते बदल केले आहेत. ते स्वागतार्ह नक्कीच आहेत. मात्र त्यासाठी लहान मुलांना कोडिंग शिकण्याची बळजबरी करणे योग्य नाही. तश्या आजकाल जाहीराती पण खुपश्या येऊ लागल्या आहेत. गणित आणि विज्ञान या दोन विद्या शाखा जेवढ्या तळागाळापर्यन्त पोचतील आणि ते शिकवणारे तज्ञ शिक्षक तयार करणे हे महत्वाचे आहे सर्वात पहिले. आपल्या देशाची खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या योजना खूप क्रांतीकारी असतात मात्र इंप्लीटेशन मध्येच लोच्या असल्याने फसतात. सर्वसामान्य समज असणाऱ्या लोकांना आजुबाजूला तरी असेच दिसते आहे की भविष्यात फक्त आणि फक्त ए. आय. एम. एल. डेटा सायंस वगैरे हेच राहणार आहे. उन्हाळी सुट्टीच्या शिबिरात अभिनयाच्या कार्यशाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबतीत जो एक गोड गैरसमज आईवडिलांचा होत असतो की माझा बबड्या मोठा होऊन खूप चांगला अभिनेता होईल तसंच काहीसा प्रकार हल्लीच्या कोडिंग जिनियस म्हणून लहान मुलांच्या आई वडिलांना वाटते की माझा बबड्या मोठा होऊन बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स वगैरे होईल. हे हास्यास्पद आहे. पण याला बळी पडणाऱ्यांची कीव करावी तितकीच कमी आहे. त्या त्या काळी जे जे शोध लावले गेले ते त्या त्या गरजेतून. त्यासाठी उपलब्ध परिस्थितीचा आणि साधनांचा अभ्यास केला गेला. त्यामुळे सध्याच्या आपल्या ज्या समस्या आहेत त्याचे रूट कॉज एनालिसिस करून कोणती साधणे वापरता येतील याचा अभ्यास करण्याची शिकवण गरजेची आहे. त्या साधनांपैकी ए. आय. एम. एल. डेटा सायंस वगैरे शाखांचा उपयोग होऊ शकेल ही शिकवण महत्वाची. त्याआधी जे उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर अभ्यास गरजेचा आहे. जर कोणी मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करत असेल तर डिजिटल मार्केटिंग साठी कोणी व्यवसाय वृद्धी साठी काही काम करत असेल तर या नव्या साधनांचा उपयोग करून जास्त लोकांपर्यंत जाता येईल याचा अभ्यास, कित्येक क्षेत्रात प्रेडिक्शन अनालिटिक्स साठी ए. आय. एम. एल. चा उपयोग कसा करावा याचा अभ्यास आणि शिक्षण देणे गरजेचे आहे. तसे शिक्षण जो तो गरज पडेल तेव्हा घेतोच आहे. स्किल अपग्रेड करण्यासाठी हे गरजेचेच आहे आणि सध्यातरी तेच योग्य आहे. त्यासाठी लहान मुलांना कोडिंग जिनियस बनण्यासाठी दावणीला बांधून ठेवणे योग्य वाटत नाही. काही गोष्टी शिकण्यासाठी उपजत समज यावी लागते आणि वेळोवेळी ज्याला त्याला येत असते. तेव्हाच त्या त्या स्किल साठी उपलब्ध संधीचा फायदा लोक घेतात. त्यातही त्याच तेच काम करून सँच्युरेशन आल्यावर आहे त्याच क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी एआय, एम.एल वगैरेंचा काही उपयोग आहे का? ही जाण प्रत्येकाला येते. काही जण कम्फर्टेबल झोनमधून बाहेर पडू शकत नाहीत तर बाहेर पडून नवनवे चोखंदळ मार्गाने पुढे जातात. प्रगती होते ती अशी. आत्मनिरिक्षणातून. लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी वेळ द्यावा. नाहीतर ती वेल ट्रेन्ड होती एखादी गोष्ट वापरण्यात. त्याचा तोटाच अधिक असेल. सध्यातरी लहान मुलांना कोडिंग साठी रॅटरेस मध्ये ढकलणे योग्य नाही.

©भूषण वर्धेकर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet