हम आपकी आँखों मे |

‘हम आपकी आँखोंमे’
गुरुदत्तच्या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये शक्यतो आधी संगीत सुरु झालं आणि मग गाण्याचे बोल आले असं होत नाही पण प्यासा पिक्चरमधलं ‘हम आपकी आँखोंमे इस दिल को बसा दे तो’ गाण त्याला अपवाद आहे. असं म्हणतात की ‘ It does not happen by accident but it happens by design.’ हे गाणं, गाण्याच्या आधीचा आणि नंतरचा सीन पाहिला की या गाण्याची संपूर्ण रचना उलगडते. ज्यांनी प्यासा पाहिलाय त्यांच्या हे लगेच लक्षात येईल.
गाण सुरु होण्याआधीच्या सीनमध्ये बेरोजगार कवी विजय खाली जाणाऱ्या लिफ्टमध्ये आत येतो तेव्हा तिथे त्याची जुनी प्रेयसी मीना त्याला भेटते. लिफ्टच्या गर्दीत दोघं शेजारी उभे राहतात. मीनाच प्रतिबिंब लिफ्टच्या भिंतीवर पडलय, त्या प्रतिबिंबातून आपण flashback मध्ये जातो. त्या सीनमध्ये मीना आणि विजय कॉलेजमध्ये आहेत. समोर कॉलेजमधले कपल्स नाचतायेत पण हे दोघे त्यांच्यापासून दूर उभे आहेत. त्यांच्यावरच्या काळ्या पांढऱ्या सावल्या त्यांच्या नात्याची अनिश्चितताच दाखवतात. मीना विजयशी काही बोलायचा प्रयत्न करते पण विजयचं पूर्ण लक्ष त्या नाचणाऱ्या कपल्सकडे आहे. तो मीनासोबत याच नात्याचं स्वप्न बघतोय. यातूनच आपण आता एका स्वर्गीय स्वप्नाळू जगात प्रवेश करतो आणि तिथं हे गाण सुरु होतं.
स्मोक गन ने सगळीकडे पसरलेला धूर आणि ड्रीमी सेट.. या सेट ला पायऱ्या आहेत. गेटही आहे. एखादी अप्राप्र्य परी वाटावी अशी मीना त्या पायऱ्यांवरून खाली येते. याच सेटच्या गेटमधून सुटाबुटातला विजय आत येतो. विजय आत येताना त्याच्यावर अंधार आहे. त्याच्या background ला ही अंधार जास्त आहे याउलट मीना खाली उतरताना तिच्या background ला प्रकाश जास्त आहे. हा खेळ पूर्ण प्यासा चित्रपटातच गुरुदत्त खेळत राहतो.
गाण्याच्या कोरियोग्राफीचा विचार केला तर इथे डान्स फॉर्म हाच निवडला आहे जो मगाशीच्या सीनमध्ये कॉलेजमधले कपल्स करत असतात. त्याचबरोबर पूर्ण गाण्यात विजय तिच्या मागे मागे जातो आहे. खरं म्हणजे ती देखील विजयच्या प्रेमात आहेच, आणि लाडिकपणे मान्य करतेच आहे पण विजय तिच्याकडून या प्रेमाची मान्यता मिळवायचा प्रयत्न करतो आहे.
आता हे प्रेम असफल राहणार आहे. गाण मात्र स्वप्नाळू आहे. डान्स romantic आहे. या सगळ्यात हे प्रेम तुटणार आहे, किंवा मीना त्याच्या प्रेमाला नकार देऊन जाणार आहे हे लाडिकपणे गाण्याच्या लिरिक्समधूनच येतं.
हम आपकी आँखोंमे इस दिल को बसा दे तो
हम मूँद के पलको को इस दिल को सजा दे तो..
किंवा
हम आपको ख्वाबों में, ला ला के सतायेंगे
हम आप की आँखों से, नींदें ही उड़ादें तो..
पहिल्या ओळीत त्याची इच्छा आहे, दुसऱ्या ओळीत ती इच्छा तेवढ्याच लाडिकपणे मीनाने ठोकरून लावली आहे. त्यामुळे या गाण्याचा फील रोमांटिक असला तरी या गाण्याला नेमकं असं म्हणावं का हाच प्रश्न पडतो. त्यामुळे खरं तर this is ‘bad dream’. प्यासा हा सगळा अशा कुस्करलेल्या स्वप्नांचाच चित्रपट आहे. जे शब्दात तेच कोरियोग्राफीमध्ये येतं. पूर्ण गाण्यात गुरुदत्त मीनाच्या मागे जातो. एकदाही मीना स्वतःहून त्याच्या जवळ येत नाही. गाण्यात असलेली background हा contrast अजून जास्त स्पष्ट करते. ध्रुवपदात ‘हम आपकी आँखोंमें’ संपल्यानंतर दोघेही स्क्रीनवर आहेत पण पुढच्या दोन्ही कडव्यात मात्र त्या ओळीनंतर दोघेही एका अंधारात जातात मग स्क्रीनबाहेर जातात. पहिल्या कडव्याच्या ओळीनंतर फक्त मीना त्या अंधाराकडे जाते आणि तिच्यामागून विजय जातो. नंतरच्या कडव्यात मात्र दोघेही त्या अंधाराकडे जातात. हा एका अर्थाने क्राफ्टचाही भाग आहेच पण त्यात अंधाराच्या वापरामुळे एकूणच गाण्याची थीम enhance होते असं मला वाटत. अगदीच bluntly बोलायचं झालं तर दोघही अंधारात! गाण्यातली कडवी प्रकाशात, त्यांची शेवटची ओळ अंधाराकडे खेचून नेणारी.
गाण्याच्या शेवटी ती पुन्हा ज्या पायऱ्यांवरून आली तिथेच वर चढून निघून जाते. विजय मात्र जिथून आला तिथून जात नाही. तो तिच्या मागे जायचा प्रयत्न करतो पण जात नाही. ती वर निघून जाते. त्या स्वप्नातून ती निघून गेली. bad dream. आणि गाण्याच्या सुरुवातीला जी व्हायोलीनची धून वाजली तीच पुन्हा गाण्याच्या शेवटी वाजते. सुरुवातीला किंचित उदास पण रोमांटिक वाटलेली ती धून आता पूर्णपणे तीव्र उदासीचा फील देते, अगदी melancholic. गाण संपल्यावर आपण पुन्हा विजय आणि मीना ज्या बाकड्यावर बसले होते तिथे येतो. पण आता तिथे फक्त विजय आहे, त्याच्या हातात मीनाने दिलेली चिट्ठी आहे. या भूतकाळातल्या सीनमधून आपण पुन्हा वर्तमानकाळात म्हणजे लिफ्टमध्ये येतो. लिफ्टच्या भिंतीवरच्या मीनाच्या प्रतिबिंबातून कॅमेरा मीनावर जातो. मीना आणि विजय लिफ्टमध्येच आहेत. मीना त्याला विचारते “कैसे हो”. तो म्हणतो “जिंदा हु!” त्यानंतर अजून ते काही सेकंद बोलतात तेवढ्यात लिफ्ट थांबते. मीना म्हणते ‘अरे मै तो भूलही गयी, मुझे उपर जाना है’.. विजय लिफ्टच्या बाहेर पडतो. लिफ्टचं दार लागत. त्यात अडकलेली मीना दिसत राहते. लिफ्ट वर निघून जाते.
इथे ‘मुझे तो उपर जाना है’ हे वाक्य खूप अर्थाने महत्वाचं आहे. गाण्यात मीनाची एन्ट्री ही पायऱ्यांवरून आहे. आणि शेवटी ती पुन्हा वरच गेली आहे. त्याचप्रमाणे इथेही लिफ्ट मध्ये ती खाली येते आणि पुन्हा वर जाते. तर गाण्याची रचना आणि सीनची रचना ही जाणूनबुजून अशा प्रकारची आहे. ज्यात मधल्या टप्यात त्यांचं अल्पकाळ टिकलेलं प्रेम आहे.
‘लिफ्ट- कॉलेजचं बाकड- स्वप्नाळू गाण’ अशा तीन स्तरांवर/ स्पेसेसमध्ये हा पूर्ण सिक्वेन्स घडतो. ज्या क्रमाने जातो, त्याच क्रमाने आपण पुन्हा लिफ्ट मध्ये येतो. तीनही स्पेसेसमधलं संगीत निराळं आहे आणि ते या जागांना आणि काळाला सुद्धा वेगळं करत. विजय मीनाने दिलेली चिट्ठी वाचत असताना संगीत चालू होतं आणि लिफ्टच्या खटक्याचा आवाज आपल्याला वास्तवात आणतो. तर संगीत, ध्वनी या सगळ्यांचा वापर करून हा सिक्वेन्स डिजाईन केला आहे.
हा सिक्वेन्स घडवताना होणारं गुरुदत्त आणि मीना यांच्यातल लिफ्टमधलं संभाषण क्लोजअप्स मध्ये शूट केलेलं आहे. यामुळे त्या दोघांची एक वेगळी स्पेस त्या माणसांनी भरलेल्या लिफ्टमध्ये तयार होते. अर्थात गर्दीचा एक long शॉट प्रेक्षकाच्या मनात तयार होत असलेली दोघांची इंटीमेट स्पेस तोडून टाकतो.
पटकथाकार कोणत्याही प्रसंगाचं स्थळ असं निवडतो जे त्या प्रसंगाच्या रचनेला, त्यात घडणाऱ्या घटनेला, थीमला देखील योग्य असेल. लिफ्टसारख्या ठिकाणी अडकलेपण आहे आणि हा प्रवास काही मिनिटाचा, तेवढच अत्यल्प काळ टिकलेलं हे विजय - मीनाच्या नात्याचं हे स्वप्न लिफ्टच्या छोट्या प्रवासात लेखक अब्रार अल्वी आणि गुरुदत्त आपल्याला सांगून जातो. शेवटी ‘‘ It does not happen by accident but it happens by design.’

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet