मिसळ आपलं लौ आहे!
शक्यतो खायप्यायच्या ठिकाणचे रिव्ह्यूज् मी लिहित नसते. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे टेस्ट बड्स निराळे त्यामुळं मला जे लै भारी वाटेल ते जगाला लै भारी वाटेलच किंवा वाटलंच पाहीजे असं नाही (खरंतर तेच लैच भारीच असतंयच यात शंका नाहीच ) पण आज लिहायचं कारणपण खास आहे. मिसळ आपलं लौ आहे. जन्म गेला कोल्हापूरात मिसळ आवडत नाही असं तर होणं शक्य नाही. कोल्हापूरात जन्मल्या जन्मल्या पोरं डोळे उघडतात ते पातळभाजीच्या खमंग वासानंच (अतीशयोक्ती आहे माहिताय पण प्यार मै इन्सान को इतनी मुभा तो देनीच पडती हय (कंसात कंस घालून स्वतःला आवरा म्हणतेय) ). तर खूप दिवस झाले चांगली मिसळ खायला मिळाली नव्हती. लग्न होऊन पुण्यात आल्यापासून तर हा योग कमीच येत होता. नाही म्हणायला डाव्या भुसारीत आमच्याच कोल्हापूरच्या एका पोरानं स्वाद मिसळ म्हणून एक छोटेखानी मिसळ सेंटर सुरु केलं होतं पण त्याला काही कारणानं ती जागा सोडायला लागली. ती मिसळ छान होती चवीला. पण त्यानं दुकान बंद केल्यापासून आमचे हालच व्हायला लागलेवते. त्यात आम्ही राहणार हडपसरात तिकडं कोल्हापूरी स्टाईलची मिसळ आयती मिळणार म्हणजे दिव्यच! जगभरातले पदार्थ आमच्या हडपसरात मिळतील पण कोल्हापूरी मिसळ काय आम्हाला घावायला नाही. तर आतापर्यंत अजूनहीपर्यंत मुद्द्याला येईनाच मी म्हणून आता यायलेय. त्याचं झालं असं दोघातिघांनी फोटो शेयर केलेले बघितले शाहू मिसळीचे. दिसायला तर नादखुळा दिसत होती. तितक्यात धाकटी बहीण आणि नवीन दाजी जाऊन पण आले. आल्याआल्या बहिणीचा फोन की तायडे मिसळ भारीय जायला लागतंय परत सगळ्यांनी.
काल आमच्या फॅमिली व्हाॅट्सॅप ग्रुपवर दादा म्हटला हिकडं मिसळ चांगली मिळती असं ऐकायलोय जायला लागतंय. मी लै सॅड स्मायल्या टाकल्या. कसं बाई मला पाऽऽऽप की मिळतच नाही हिकडं कोल्हापूरी मिसळ म्हणून आणि परत पन्नास सॅड स्मायल्या टाकल्या. भाऊ म्हटला उद्याचाच प्लॅन करूया. (इथं मेलोड्रामा जिंकलंय ) पहाटे दर पाच मिन्टाच्या अंतरानं असा पाचसहावेळाचा गजर लावून उठून आवरून मिसळ खायसाठी अक्षरशः उपाशीपोटी, काॅफीसुद्धा न घेता कोथरूडात आम्ही पोचलो. मिसळ नप्रेमी असणारा नवराही माझ्याखातर आला बाई पहाटे उठून (इथं कानशिलावर बोटांनी आलाबाला काढणारी किरण खेर डोळ्यासमोर आणायला हरकत नाही ). तर कोथरूडात अलकापुरी सोसायटीत असलेल्या शाहू मिसळीच्या दारी उतरल्यावर मला आमची सगळीच माणसं दिसली. आईशप्पथ सांगायले कसलं भारी वाटलं. मी डायरेक्ट फ्लॅशबॅक कोल्हापूरातच पोचले.
आम्ही काॅलेजात जायला लागलो तोपर्यंत दादा नोकरीत नीट सेटल बिटल झालेला. दिवाळीच्या आदल्या रात्री नाही तर मग पहाटे दादा पुण्याहून कोल्हापूरला येत असे. आम्ही सगळे आवरून बिवरून, नवीन नवीन छानछान ड्रेस घालून थोरल्या घरी देवाला आणि काकूकाकांना वगैरे नमस्कार करायला जात असू. मग आम्ही सगळी पोरं घरातून चालत आंबाबाईला जात असू. ज्यांना देवाचं दर्शन घ्यायचं नाहीये ते चपलांपाशी थांबून बाकीचे लोक यायची वाट बघत असू. तिथून परत पायी कुंभारआळीच्या दत्ताला आणि मग येताना चोरगेच्यात मिसळ खात असू. सुरुवातीला दादाच आमची सर्वांची मिसळ स्पाॅन्सर करत असे. नंतर ज्याला नवीनच नोकरी लागलेय किंवा ज्याचं नुकतंच लग्न झालंय त्यानं त्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची मिसळ स्पाॅन्सर करायची पद्धत सुरु झाली. प्रचंड कल्ला, दंगा मस्ती करत, खिदळत समोरच्या गरम खमंग चरचरीत मिसळीवर यथेच्छ आडवा हात मारून आम्ही परत खिदळत गप्पा मारत घरी येत असू.
अलकापुरी सोसायटीत असलेल्या शाहू मिसळच्या दारात उतरले आणि मला हे सगळं आठवलं. यात भर म्हणजे आमची गोंडस नातही होती. (होय मी आज्जीही असतेय एका अतीगोंडस हुशार शहाण्या सुंदरीकल्प मुलीची ) आणा ते वर्षाचं बाळही मिसळ खायला आलेलं. (ते पण कोल्हापूरीच आहे, ए धताड धताड!) सगळी भावंडं, भाचरं, जिजाजीज्, आणि हे पिल्लू आम्ही सुमारे दोन अडीच तास बसून गप्पा मारत मिसळ चापली आणि नंतर आमच्या कोल्हापूरचंच राजमंदिरचं आईस्क्रिमही खाल्लं. आईशप्पथ सांगायले आत्माराम थंड होणं काय असतंय ते आता कळलं. (आता मी मेले तरी हरकत नाही पिंडाला कावळा नक्की शिवेल हे वाक्य मी घरचेलोक ओरडतील म्हणून घाबरून लिहित नाहीय)
मिसळीबद्दल जरा लिहायला लागतंय म्हणून लिहायलोय. मिसळ म्हणाल तर ना उगंच तिखट जाळ ना उगंच तेलाचा तवंग. व्यवस्थित तिखट, व्यवस्थित तेलकट, व्यवस्थित मट्रेल. मट्रेल परफेक्ट शेवचिवडा. उगंच फरसाण अन् गाठी असलं काय टाईमपास नाही. परफेक्ट चवीचा कमी तेलकट आणि एकदम कुरकुरीत शेवचिवडा, कांदालिंबूपण चिंगूसपणा न करता नीट दिलेलं. पाव तेवढा हिकडं कोणतर सुरु करायला पाहीजेल बाबा. आमच्याहिकडं मिळतोय तसला पेटीपाव या कोल्हापूरी मिसळीसाठीच खास असतोय. त्याबरोबर आणिएवढी मजा आली असती. बाकी ते पापड, आणि सोलकढी आणा थाळीबिळीचं अप्रूप आम्हाला नाही. नुसती चांगली मिसळ असली की काम झालंच. असो पण.
पण आजपण काय कमी मजा आलेली नाही. पोटभर मिसळ खाऊन, भरपूर गप्पा करून नेक्ष्ट टैम तांबडा पांढरा खायला कुठतर असंच भेटायचं ठरवलंय आता. (स्वर्गातली पितरं आम्हाला माफ करतीलच खाटखूट खाण्याबद्दल)
आज रंगा लै खूष हाय. भावांनो लै थॅन्क्स!
~अवंती
हा हा हा मस्त!
हा हा हा मस्त!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुमच्या गावातल्या दोन-तीन
तुमच्या गावातल्या दोन-तीन तुम्हाला वाटणाऱ्या चांगल्या मिसळी सांगता का? लै वेळा जात नाही मी कोल्हापूरला. पण गेलो तर टेस्ट करायला विचारलं. चोरगे एक. अजून?
चोरगे पूर्वी चांगली होती आता
चोरगे पूर्वी चांगली होती आता बिघडली, म्हणजे काय तर चहाची बशीही खोल वाटेल इतक्या सपाट प्लेटीतून मिसळ देतात साले. चव तशीच आहे चांगली पण हा फाजीलपणा काय सुरु केलाय भो..च्यानी कुणास ठाऊक. सध्या कोल्हापूरात चांगली मिसळ म्हणाल तर करवीर मिसळ म्हणून आहे दैवज्ञसमाज बोर्डींग(मंगळवार पेठ) च्या शेजारी तिथं चांगली असते, दुसरं ठिकाण म्हणजे यलम्मा चौकात कोल्हापूर मिसळ म्हणून आहे (मठपती म्हणून मालक आहे दुकानाचं नाव बदललं असेल तर आठवत नाही) आणखी मार्केटयार्डापाशी एक साळोंखे मिसळ म्हणून आहे फार जुनी आणि चांगली आहे. उद्यमनगरात लक्ष्मी मिसळ आहे ती पण चांगली आहे. फडतरेकडं चुकूनपण जाऊ नका.
आम्ही अस्सेच आहोत
धन्यवाद.
धन्यवाद.
मिरजकर तिकटीजवळ आहार हॉटेल
मिरजकर तिकटीजवळ आहार हॉटेल आहे. तिथली मिसळ माझी फेवरेट. दसरा चौकाच्या जरा अलिकडे एक शिव मिसळ मिळते. ती पण चांगली आहे.
- ओंकार.
हे मस्त लिहिलंय.
हे मस्त लिहिलंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त
मस्त
दोन्ही फोटो बाजू-बाजूला लावले
दोन्ही फोटो बाजू-बाजूला लावले आणि विषय "मस्त-मस्त" असा दिला तर?
बाकी बेडेकरांनी सँपल अतितिखट
बाकी बेडेकरांनी सँपल अतितिखट करुन मिसळीच्या चवीची आई घातली आहे असे नोंदवून खाली बसतो.
(अवांतर शंका)
सहसा मिसळीबरोबर दिल्या जाणाऱ्या नुसत्याच तर्रीला 'सँपल' अशी जी संज्ञा आहे, तिची व्युत्पत्ती काय असावी? तसेच, तिचे चलन केवळ पुण्यापुरते मर्यादित आहे, की अधिक व्यापक भौगोलिक क्षेत्रात आहे?
मोफत मागायला लाज वाटत
मोफत रस्सा मागायला लाज वाटत असल्याने सॅम्पल म्हणून मागणे असं असू शकेल. अमेरिकेत की कुठल्याश्या देशात भिकारी भीक मागताना (भीक मागण्याऐवजी) "चेंज" मागतो असं कुठेसं वाचल्याचं स्मरतं. पुलं किंवा अवचट किंवा अन्य कोणाचं अनुभव कथन. चुभुदेघे.
...
'शर्ट बरोबर प्याण्ट घाला TROUSER नको.'
पाव हा पोर्तुगीज शब्द आहे, तर ब्रेड हा इंग्रजी शब्द आहे, याव्यतिरिक्त त्या दोहोंमध्ये नक्की काय फरक आढळला त्या पाटी घेऊन उभ्या राहिलेल्या मावळ्याला?
('स्लाइस' म्हणायचे असावे काय त्यास?)
आणि, बेडेकर मिसळीबरोबर ('मिसळ बरोबर' नव्हे.) ब्रेड देतील नाहीतर पुरणपोळी देतील. (आणि तर्रीऐवजी कटाची आमटी नाहीतर पातळ वरण देतील.) तो सर्वस्वी बेडेकरांचा प्रश्न आहे. त्यांना शहाणपण शिकवणारे हे सद्गृहस्थ कोण? (बेडेकर टी स्टॉल हा पुणे ३०मध्ये (मुंजाबाच्या बोळात?) आहे. यायचे तर या, नाही तर चालू लागा, विसरलेत?)
तसेही, शटर बंद केलेल्या बेडेकर टी स्टॉलसमोर फलक घेऊन उभे राहिल्याने नक्की काय साधते? स्टंट नुसता!
सामान्य लोकांत
प्याण्ट म्हणजे आतली, ट्रूजर म्हणजे बाहेरची.
-- इंग्लिश शिकल्याली, अदिती
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मिरर इमेज चालेल.
मिरर इमेज चालेल.
-----------
बाकी लेखनाला ++++
छान आहे.
छान आहे.
मिसळीसोबत पावाऐवजी स्लाईस उर्फ सिलेस अजिबात वाईट लागत नाही, उलट कधीकधी सोयीचा पडतो हे वैयक्तिक मत. शिवाय उत्तम मिसळीसोबत पाव अथवा ब्रेड हा केवळ थोडा चवीत ब्रेक म्हणून नाममात्र (एकच पाव किंवा स्लाईस) घ्यायचा असतो हेही वैयक्तिक मत. दोन चार किंवा जास्त पाव घेऊन रस्सा वाढवून घेत त्यात बुडवून अगदी पोटभरीचे जेवण उरकणे हे मिसळीबाबत आदर्श नाही.
हो. पण कोल्हापूरात नुसताच
हो. पण कोल्हापूरात नुसताच स्लाईस नसतो. मिसळीसाठी, कटवड्यासाठी, वडापावसाठी स्पेशल 'पेटीपाव'असतो. स्लाईस ब्रेडसारखाच पण जाड लुसलुशीत आणि खरपूस कडांचा असतो. इथं पातळभाजी जास्त खाल्ली जाते मग ब्रेडही जास्त लागतो. पातळ भाजी 'सोक'करून घेण्यासाठी हा ब्रेड परफेक्ट असतोय. (पातळभाजी म्हणजे कट)
आम्ही अस्सेच आहोत
हो. पण कोल्हापूरात नुसताच
हो. पण कोल्हापूरात नुसताच स्लाईस नसतो. मिसळीसाठी, कटवड्यासाठी, वडापावसाठी स्पेशल 'पेटीपाव'असतो. स्लाईस ब्रेडसारखाच पण जाड लुसलुशीत आणि खरपूस कडांचा असतो. इथं पातळभाजी जास्त खाल्ली जाते मग ब्रेडही जास्त लागतो. पातळ भाजी 'सोक'करून घेण्यासाठी हा ब्रेड परफेक्ट असतोय. (पातळभाजी म्हणजे कट)
आम्ही अस्सेच आहोत
गवि पाव म्हणजे पावभाजीतला पाव
गवि पाव म्हणजे पावभाजीतला पाव नव्हे.
खरं म्हणजे फोटो पत्रकारिता
खरं म्हणजे फोटो पत्रकारिता झाली.
मीही मिसळीबाबत भारी फिनिकी
मीही मिसळीबाबत भारी फिनिकी आहे.
मला व्यक्तीश: पावच आवडतो मिसळीबरोबर!
दही मिसळ सुद्धा आवडते.
पण दही+ मिसळ + पाव नव्हे!
का कुणास ठाऊक पण मिसळ रात्री खाऊ वाटत नाही.
सोलकढी / पापड / तन्दूर /बार्बेक्यु/चीज मिसळ वगैरे फॅन्सीगिरी झेपत नाही.
कोल्हापूरात मिसळ खायचा योग नाही आला अजून.
पुण्यातली काटा-किर्र पण फार नाही आवडली.
मुम्बईत शेट्टी हॉटेलाऺत पांढर्या वाटाण्याची उसळ आणि जाड फरसाण असलेली मिसळ मिळते.
ती ओरिजिनलपेक्षा थोडी वेगळी असली तरी लहानपणापासून खात/बघत आल्याने आवडते.
ही मिसळ, एक्स्ट्रा उसळ आणि बारा-पंधरा पाव हा काबाडकष्ट करणार्या गरीब लोकांचा आणि कडकीतल्या कॉलेजीयन्सचा स्वस्त आणि मस्त आधार आहे.
का कुणास ठाऊक पण मिसळ रात्री
का कुणास ठाऊक पण मिसळ रात्री खाऊ वाटत नाही.
बरोबर. कोल्हापुरात मिसळ सकाळीच खायची पद्धत आहे कारण रोज सकाळी ताजा कट बनतो. पण आजकाल कोल्हापूरला धावत्या भेटींमूळे वेळ मिळेल तेंव्हा जातो.
- ओंकार.
ताई ! कोल्हापूर त्यातून मिसळ
ताई ! कोल्हापूर त्यातून मिसळ आणि त्यात परत चोरगे मिसळ! किती किती प्रेम !
एक चोरगे मिसळ खाऊन परत आणि दोघात एक शेअर करायचो मी आणि बाबा. एकदा आई बाबा दोघंच गावात (म्हणजे गावभागात. आम्ही ताराबाई पार्कात राहतो. ) काहीतरी कामाला गेलेले आणि येताना चोरगे मिसळ खायला थांबले. थांबले तर थांबले पण मी घरी असताना मला सोडून एकट्याने मिसळ काही बाबांच्या घशाखाली उतरेना. मग शेजारच्याच वणकुद्रे भांडी दुकानातून एक छोटा गंजासारखा डबा घेतला , त्यातून मिसळीचा कट आणि बाकीचं पार्सल पुडा बांधून आणलं. तिकडं नवीन भांड्यावर मशीनने नाव कोरायची पद्धत असते तर त्या आमच्या डब्यावर "सिद्धी मिसळ" असं कोरलंय तारखेसह.
वयाची १६-१७ वर्षं कोल्हापुरात घालवूनही चोरगेशिवाय कोणती मिसळ खाल्ली नाहीये अजून, अगदी चोरगेंच्या अलीकडच्या गल्ली मोहन मिसळ आहे तीपण नाही.
मस्त लिहिलंय. अजून अजून लिहा. खूप प्रेम.
-सिद्धि
चोरगे मिसळीत कांदाच घालतात का
चोरगे मिसळीत कांदाच घालतात का केशर?
.
सोन्याचा वर्खसुद्धा घालतात.
Aphrodisiac!
धमाल लिहीले आहे.
धमाल लिहीले आहे.
मिसळायन आवडलं पण मिसळ हा
एक कल्पनादारिद्र्याचा overhyped अविष्कार वाटतो मला.
...
पावभाजी या प्रकाराबद्दल काय वाटते आपल्याला?
पावभाजी आपलं
लौ/हेट आहे.
तितक्यात धाकटी बहीण आणि नवीन
तितक्यात धाकटी बहीण आणि नवीन दाजी जाऊन पण आले. >> हे काय आनि?
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
.
परसाकडे जाऊन आले!
तुम्हाला हो चौकश्या?
कुठे गेले याबद्दल उत्सुकता
कुठे गेले याबद्दल उत्सुकता नसून ती
याबाबत असावी असे वाटते.
- ओंकार.
तरीसुद्धा?
?
मिसळपुराण
मिसळपुराण आवडायलेय !
नवीन दाजी जुने दाजी असा
नवीन दाजी जुने दाजी असा प्रकार असतोय व्हय?
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
नवीन
लग्न नवीन असतं तेव्हा दाजी पण नवीन असतात, मग ते जुने होतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नावात काय नवीन?
किंवा 'नवीन' हे दाजींचं नावही असू शकतं. त्यामुळे ते जुने झाले तरी नवीन दाजी म्हणूनच ओळखले जातील.
(No subject)
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
थोड्या दिवसांनी मक्याच्या
थोड्या दिवसांनी मक्याच्या पिठाच्या चकोल्याही ( हल्ली त्यांच्या पदार्थांची हाटंलं फार चालतात ना) घालतील कटात/ सांपलात. शेवचिवडा विसरतील।
ह्याह्! मिसळ फाॅण्ड्यू, चीज
ह्याह्! मिसळ फाॅण्ड्यू, चीज मिसळ, मिसळ सिझलर असे खाॅन्ठिन्हेंठल पदार्थ मिळतात म्हटलं ऑल्रेडी.
आम्ही अस्सेच आहोत
...
जैन मिसळ मिळते काय?
यस
ही घ्या
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
मराठी विश्वात मोजकेच दमदार फुड असल्याने
राजस्थानी गुजराथी सारखी समृद्ध फुड परंपरा महाराष्ट्रात नसल्याने मराठींकडे जे अगदी मोजकेच उत्तम हिट पदार्थ फुड डिशेस आहेत पुरणपोळी श्रीखंड मिसळ वडापाव वगैरे
त्यावरच लिहीणे त्याचीच पुनरावृत्ती होणे हे स्वाभाविकच आहे.
पण त्यात ही ते बिचारे काय करणार
त्यांची झोळीच् फाटकी
असो
जरा राजस्थानी मारवाडी समृद्ध
जरा राजस्थानी मारवाडी समृद्ध 'फुड'परंपरेबद्दल एनलायटना इकडं.
आम्ही अस्सेच आहोत
एकदा गावरान- एक खरी चव या
एकदा गावरान- एक खरी चव या यूट्यूब चॅनल वर जाऊन बघा. समृद्ध फुड परंपरा बघायला मिळेल. खास कोल्हापूरकडची.
- ओंकार.
-साबुदाणा खिचडी / वडा
-साबुदाणा खिचडी / वडा
-मटार करंजी
-दहीपोहे/ दडपे पोहे/ भुजिंग / गूळनारळ पोहे / मेतकूट पोहे /तर्रीपोहे (रस्सा पोहे)/ पोपटपोहे
- मेतकूट घावन / घावणे चटणी / आंबोळी
- डांगर पोह्याचे / उडदाचे
- कोथिंबीरवडी/ अळू वडी/ पुडाची वडी / पाटवडी
- थालीपीठ भाजणीचे / वांग्याचे / साबुदाणा / उपासाचे / भोपळ्याचे गोड
-भाजणीचे वडे / बटाटे वडे / भोकाचे वडे, कोंबडी वडे फेम
- धिरडी, घाटले
- पानगी
-पातोळे
-खांडवी
- उकड तांदळाची
-गव्हाचा चीक
- खेकडा भजी/ वांगे भजी / ओवा भजी
-शेंगोळ्या
-उकडपेंडी
-भडंग / नाशिक चिवडा
-मटार करंजी
-वाटली डाळ / कैरीची डाळ
-सांजा / कणकेचा, रव्याचा, तिखट, गोड
- आप्पे
-मक्याची उसळ
-फणसाच्या पानातल्या इडल्या
-धोंडस / धेंडसं
-सांदण
-निनावं
-भोपळा घारगे
-मिसळ
-कटवडा
-पावभाजी
-कोबी वडी
- रताळ्याचा कीस / बटाट्याचा कीस
-गूळपोळी / पुरणपोळी / साखरपोळी / तेलपोळी
-लाडू रवा / बेसन / डिंक / राघवदास / तंबीट / कडक बुंदी / शेवलाडू / मेथी लाडू / कणीक लाडू
-शिकरण
-मस्तानी , पियुष, मठ्ठा
-बाजरी खजुऱ्या
-बाकरवडी
-पेरू कायरस
-कोयाडं
-अळूचं फतफतं
-गव्हले खीर / शेवया खीर / तांदूळ खीर / गव्हाच्या सत्वाची खीर
-पंचामृत आमटी
-सोलकढी, कोकम सार, टोमॅटो सार
-बिरड्या (डाळिंब्या) उसळ
-फणस भाजी, नीरफणस
-वरणफळे उर्फ चकोल्या
-वडाभात
सध्या तरी शाकाहारी लिस्टवर ब्रेक.. त्यातही बरेचसे फक्त नाश्त्याचे झाले. जेवण अजून बरेच बाकी.
मांसाहार बाकी.
इच्छुकांनी आणखी ऍड करावेत.
इतकं असूनही हॉटेलात व्यावसायिक हिट पदार्थ दुर्दैवाने कमीच. पण मुळात महाराष्ट्र खाद्य जगत समृद्ध आहे.
सही यादी!!!
सही यादी!!!
अजुन काही - रुमाली वड्या, अळूवड्या, कोथिंबीरीच्या वड्या, मसालेभात
भारी.
एक नंबर भारी. मी बायकोला दिली लिस्ट. ऑनलाईन बघून करता येणेबल किती आहेत माहित नाही पण तिला आवडतं नवं काही बनवायला. ह्या लिस्टने भारी काम केलं बघा.
वडाभात खाण्याचा योग आला नाही
वडाभात खाण्याचा योग आला नाही अजून. नागपुरकडचा आहे.
ही माझी लिस्ट
ही माझी लिस्ट
पोळी
फुलके , घडीच्या पोळ्या, तिखटामिठाच्या पोळ्या, खव्याच्या पोळ्या, मिश्र भाज्यांचे पराठे, सान्जोऱ्या, नारळाच्या रसातल्या पोळ्या, दशम्या, भाकऱ्या, उकडपोळी,
पाकातल्या पुऱ्या, तिखटामिठाच्या पुऱ्या, पालक / मेथी पुऱ्या
भाज्या
वांग्याचे भरीत, शेंगांचे पिठले, पाटवडी, मांसवडी, ऋषीची भाजी, खतखते, नारळाच्या दुधातल्या अळूवड्या, शहाळ्याची भाजी, मुंगवडया, पालकाची / मेथिची ताकातली भाजी (यात आम्च्या घरी खाराच्या मिरच्यांची फोडणी घालतात), फणसाच्या गऱ्यांची खोबरेल तेलातली भाजी
आमटी
करंज्यांची आमटी, चिंगू आमटी, वालाची आमटी, मटकी ची हिरवी आमटी, टॉमेटोचे सार / आमटी, भेंडीची आमटी, मसूर (अक्खा, डाळ), दालीतॉय, सासव, गावरान पिकलेल्या आंब्यांची कढी, ताकाची कढी, गोळ्यांची आमटी, कढी गोळे, तिवळ, चिंचेचे सार
काप, भरीत, कोशिंबिरी
वांगी, सुरण, कच्ची केळि, भेंडी, बटाटा यांचे काप
वांग्याचे भरीत, भोपळ्याचे भरीत
खमंग काकडी, गाजराची कोशिंबिर, दही मुळा
भात
रावण भात, कांदे भात (छोट्या अक्ख्या कांद्यांचा), साखरभात, नारळीभात,फोडणीचा दही भात, पुलावा
------------------------
बा द वे
खांडवीला सुरळीच्या वड्या म्हणतात, पावभाजी मराठी आहे असे वाटत नाही.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
उत्कृष्ट लिस्ट. धन्यवाद..
उत्कृष्ट लिस्ट. धन्यवाद..
ते वायलं. खांडवी हे कोंकणातलं एक पक्वान्न आहे.
एक दुवा सापडला खांडवीबद्दल:
https://www.loksatta.com/vishesha-news/shravan-food-recipes-konkan-1279115/
कृतीही दिली आहे त्यात.
पावभाजी उगम मुंबईत असं ऐकलं आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र.
आपले महाराष्ट्रीयन पदार्थ
आपले महाराष्ट्रीयन पदार्थ निगुतीने बनवावे लागतात. हॉटेलमध्ये अस्सल चव मिळणं कठीण आहे. त्यामुळे बाहेर मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
पॉइंट आहे. नुसते तळकट नसतात
पॉइंट आहे. नुसते तळकट नसतात आपले, बरीच यातायात असते - अनारसे, करंज्या, सोलकढी , गव्हाचा चीक
गोराक्का फार भारी लिस्टंय.
गोराक्का फार भारी लिस्टंय. परत परत जन्मावं हे पदार्थ खाण्यासाठी.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।