IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)

भाग ४

व्हाय डोण्ट यू जस्ट डाय!

Why Don't You Just Die! (2018)

गेले काही दिवस इथे जे काही लिहिलं जात आहे, त्याला परीक्षण नक्की म्हणता येणार नाही. ही चित्रपटाची ओळखही नव्हे. हा इफ्फीचा धावता आढावा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजर राहून दिवशी दोन किंवा तीन किंवा चक्क चार चित्रपट बघणे, तेसुद्धा सहजी बघायला मिळण्याची शक्यता नसलेले असे, विविध प्रकारचे प्रयोग असलेले चित्रपट बघणे, हा काय अनुभव आहे, हे मांडण्याचा प्रयत्न त्यात आहे.

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकेका चित्रपटाचा अनुभव अद्भुत, वेगळा, अभूतपूर्व असण्याची शक्यता अशा महोत्सवात जास्त असते. मग तो सांगावासा वाटतो. कारण इतरांनीसुद्धा हे बघावं आणि आपल्याला मिळाला तो आनंद घ्यावा, अशी इच्छा होते. पण मग बघणार्‍याच्या आनंदाचा विरस होऊ नये यासाठी कुठल्याही चित्रपटाविषयी तपशिलात लिहिताना त्यातलं रहस्य, एखादा कळीचा मुद्दा उघड न करण्याची दक्षता घ्यावी लागते. हे सोपं नसतं.

उदाहरणार्थ, आजचा ‘व्हाय डोण्ट यू जस्ट डाय!’ हा चित्रपट. चित्रपटमाध्यमाविषयी जराही रुची असलेल्याने बघावाच, असा हा चित्रपट आहे. पण त्यातल्या तपशिलांत जाणं कठीण आहे! चित्रपटात प्रचंड हिंसा आहे. कधी बघितली नसेल आणि बघायला मिळणार नाही, अशी हिंसा. रक्ताचे सडे पडतात, चिळकांड्या उडतात, फवारे उसळतात, धारा लागतात. अशा दृश्यांचा धसका असणार्‍यांनी या चित्रपटाच्या वाटेला अजिबात जाऊ नये. पण टारान्टिनोच्या चित्रपटात असतात, तशी ही पात्रं सगळी हिंसेच्या चाकोरीतली नाहीत. (काही आहेत!) पण हा चित्रपट प्रेक्षकाला हिंसेच्या विश्वात, संस्कृतीत नेऊन ठेवतो. इथे हिंसा होणार, संधी मिळताच ही पात्रं हिंसेच्या माध्यमातून व्यक्त होणार, अशी सूचना दिग्दर्शक स्पष्टपणे देतो. पात्रांचं वर्तन हिंसकपणाकडे झुकलेलं असतं, इतकंच नाही; कथानक त्यांना हिंसेच्या दिशेने ढकलत राहतं.

आणि ‘आपण हिंसानगरीत मुक्कामाला आलो आहोत, बरं का!’ असं गंभीरपणा न पांघरता कॅमेरा, संगीत रंग, सगळीकडून सांगितलं जातं. सामान्य आवाज मोठे होतात आणि पार्श्वसंगीत नॉर्मलपणाची पातळी सुटल्याची सूचना देतं. लहान वस्तू तिच्या कळकटपणासकट मोठी दिसते. कृती होते त्याच्या पलीकडून, जिथे दृष्टी जाऊच शकणार नाही, अशा बाजूकडून दृश्य दिसतं. कुत्रा जोराजोरात भुंकतो. पण एकाने दरडावून गप्प रहायला सांगताच चूप होतो. पण जीभ बाहेर काढून बघत रहातो. आणि दूर उभ्या कुत्र्याची जीभ दाखवणारा उघडा जबडा क्लोजपमधून दिसतो. पण या हिंसेचं प्रयोजन प्रेक्षकाला घाबरवून सोडणे किंवा ओंगळ, विकृत दर्शन घडवणे, असल्यापैकी नाही. प्रेक्षक हिंसाचाराशी किंवा हिंसा भोगण्याशी समरस नक्की होत नाही; पण घडणारं सगळं जगावेगळं असल्यासारखं वाटत नाही! हा कदाचित सुरुवातीपासूनच्या वातावरणनिर्मितीचा परिणाम असावा.

कथानकाबद्दल काहीही सांगणं बरोबर होणार नसलं तरी रंग, आवाज, पात्रांचं रूप आणि अभिनय, पात्रांचा वावर, कॅमेर्‍याचं निकट येणं आणि शॉट न तोडता या पात्रावरून त्या पात्राकडे जाणं, अशा सगळ्या माहोलामुळे जर प्रेक्षक सर्वसामान्य जगण्याची चौकट विसरून हिंसानगरीत प्रयाण करू शकला; तर या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकेल. वैयक्तिक विधान करायचं तर मला हिंसा बघायला अजिबात आवडत नाही आणि ते मी टाळतो. पण हा चित्रपट मी एन्जॉय केला!

इफ्फीचं हे पन्नासावं वर्ष आहे. पन्नास वर्षांत पदाधिकारी नक्कीच बदलले असतील; पण संस्था म्हटलं की एका परंपरेची, सलगतेची अपेक्षा निर्माण होते. पन्नास वर्षांच्या अनुभवातून आयोजक शहाणपणा शिकत गेलेत, असं अजिबात प्रतीत होत नाही. हा महोत्सव रसिकांना नवनवीन, वैविध्यपूर्ण चित्रपट बघायला मिळावेत, यासाठी भरवला जातो याचं भान कोणालाच असल्यासारखं वाटत नाही. सुरक्षिततेचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाचा झाला आहे आणि त्यामुळे महोत्सवाला येणार्‍यांना काही गैरसोय सहन करावी लागते, हे येणार्‍यांना मान्य असतंच; पण हा प्रेक्षक, हा रसिक म्हणजेच या महोत्सवाचं प्रयोजन होय आणि आयोजनातल्या प्रत्येक घटकाची रचना या प्रयोजनाकडे रोख ठेवूनच करायला हवी, ही जाणीव दिसत नाही.

पण ही तक्रार एका इफ्फीबाबत का करावी? आख्ख्या देशातल्या सगळ्या कचेर्‍या आणि व्यवस्था या स्वयंभू असतात आणि तिथे कामासाठी जाणार्‍या जनतेवर उपकार करत असतात, हा आपला सर्वसाधारण अनुभव आहेच.

(भाग ६)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet