बलिदान

टेबलाखाली बसलेल्या त्या मंगळ्याने मधल्या हाताची सातही बोटे जांभळ्या अल्गीच्या खारट द्रावात बुडवली, आणि त्याच्या पोटपंखातून आपसूक दाद निघाली, "वाह!"

"तू आमची भाषा शिकलास तर!" बाजूच्या खुर्चीवर बसलेली धरा हसत म्हणाली.

मंगळ्याने संयुक्त डोळे मिचकावले आणि तो म्हणाला, "ढवळ्याशेजारी बांधला..." "मंगळ्या!" त्याचे वाक्य धराने पुरे केले आणि दोघेही हसू लागले.

खऱ्या मिशनला काही काळातच सुरूवात होणार होती. त्याआधीच्या काहीशा तणावपूर्ण क्षणांमध्ये दोघांनी सख्ख्या शेजाऱ्यांची सोबत शोधणे स्वाभाविकच होते.

कॅप्टनची चाहूल लागताच सगळे सावध झाले. मिशनच्या मल्टी-सेन्सॉरी लिन्ग्वा-फ्रॅन्कामध्ये कॅप्टनने घोषणा केली, "बेस प्लॅनेटमधून आपण प्रयाण केलं तेव्हा परिस्थिती वाईट होती, पण आता अधिकच वाईट झालीय. आपल्या आकाशगंगेचा एक पाख तुटून अवकाशात भिरकावला जाईल हे आता जवळपास नक्की आहे. आपलं साध्य असलेला ऊर्जास्त्रोत लवकरच काबीज केला नाही, तर आपल्या ताऱ्यांचा आणि ग्रहमालांचा विनाश अटळ आहे. आपल्या जगांची भिस्त आपल्यावर आहे. तय्यार रहा!"

धराने आवंढा गिळला. तिचं जग - पृथ्वी – बरोबर बाराशे प्रकाशवर्षे दूर होतं. सूर्याच्या सर्वात जवळचा (सुमारे चार प्रकाशवर्षे अंतरावरचा) तारा प्रॉक्झिमा सेंटॉरी आणि मिशनचा बेस प्लॅनेट प्रॉक्झिमा सेंटॉरी बी अकराशेशहाण्णव प्रकाशवर्षे दूर होते. पृथ्वीच्या कालगणनेनुसार केवळ चारशे वर्षांपूर्वी अशा अंतरांची आणि प्रवासाची कोणी कल्पनाही करू शकलं नसतं. पण वर्महोल्सचा शोध लागल्यानंतर वैश्विक प्रवास बराच सुकर झाला होता.

वर्महोल्सची सैद्धांतिक माहिती धराला पूर्णपणे कळली नव्हती. तिच्या मनातील आकृतीत अवकाश आणि काळ यांचे एकत्रित पटल (स्पेस-टाईम फॅब्रिक) घडी घातलेल्या चादरीसारखे होते. चादरीवरील एखाद्या किड्याला चादरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी चादरीच्या प्रतलावरून आणि घडीवरून सरपटत गेल्यास बराच वेळ लागला असता. पण चादरीला भोक असल्यास त्या भोकातून चादरीच्या दुसऱ्या टोकावर पोचायला किड्याला बराच कमी वेळ लागला असता. चादरीची लांबी खूप जास्त असल्यास, प्रकाशाच्या वेगाने पण घडीवरून केलेल्या प्रवासाच्या वेळेपेक्षा, कमी वेगाने पण वर्महोलमधून केलेला प्रवास लवकर पूर्ण झाला असता. अशा वर्महोल प्रवासामुळेच मिशनचा अकराशेशहाण्णव प्रकाशवर्षांचा प्रवास पृथ्वीच्या कालगणनेनुसार केवळ दीड वर्षांमध्ये पार पडला होता.

पुढलं वर्महोल जवळ होतं. पहिल्या वर्महोलमध्ये जाताना वाटलेली भीती आठवून धराला हसूच आलं. चौदा वर्महोल्स पार केल्यावर आता त्या प्रवासात काही नाविन्य राहिलं नव्हतं.

"धरा!" बसक्या आवाजात मंगळ्या पुटपुटला आणि धरा भानावर आली.

कॅप्टनने स्वादु-शेपटी गुंडाळली आणि ती कोनाड्यात उभी राहिली. चीफ इंजिनीअर पुढे सरकलं आणि आपल्या अँटेनामधून शॉर्टवेव्ह रेडिओसारख्या माध्यमातून संदेश प्रसारित करू लागलं, "वर्महोलमधून बाहेर पडू तेव्हा सुपरनोव्हा होणारा तारा अगदी जवळ असेल. त्याचा स्फोट होण्यापूर्वी चुंबकीय पाईपलाईनची जोडणी करून आपल्याला तयार रहायचंय. ही पाईपलाईन कुठल्याही पदार्थाची नसून चुंबकीय बलाची असेल. सुरुवातीला आवश्यक ती ऊर्जा आपण पुरवू. स्फोट व्हायच्या क्षणार्ध आधी आपण परतीचा प्रवास सुरू करू. वर्महोल ते वर्महोल प्रवास करताना चुंबकीय पाईपलाईनमार्फत सुपरनोव्हाची ऊर्जा आपण खेचत नेऊ. सुपरनोव्हा स्फोट झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी ऊर्जाच पाईपलाइनचं चुंबकीय बल शाबूत ठेवायला मदत करेल. तरीही प्रचंड प्रमाणात शिल्लक राहील, ती ऊर्जा वापरून आपण आपला पाख आकाशगंगेला चुंबकीय बलाने चिकटवून ठेऊ."

क्रूच्या आठ सदस्यांनी माना डोलावल्या. बाकीच्या बावीस जणांना मान हा अवयव नव्हता पण त्यांनीही विविध प्रकारे अनुमोदन दिलं.

अंतराळयानातील दिवे लालहिरवे पेटले, आणि क्रूचे सगळे सदस्य तयार झाले. वर्महोलमधून यान बाहेर पडले. अति-जड बायनरी तारे त्यांच्या ज्ञानेंद्रियांना जाणवले. कॅप्टनने गो-अहेड दिला आणि सर्व सदस्य आपापले अंतराळसूट घालून यानाबाहेर पडले.

काही काळातच डावीकडचा तारा स्वत:च्या गुरुत्वाकर्षणामुळे आतल्या दिशेने कोसळणार होता. या प्रक्रियेत ताऱ्याच्या बाहेरील स्तरांमधील पदार्थ प्रचंड वेगाने उत्सर्जित होणार होते. या वेळी निर्माण होणाऱ्या शॉक वेव्ह मध्ये अकल्पनीय ऊर्जा असणार होती. मिशनचे ध्येय असलेला ऊर्जास्रोत हाच होता. आता गरज होती ते चुंबकीय पाईपलाईन जोडून स्फोटाच्या क्षणार्ध आधी परतीचा प्रवास सुरू करण्याची. पाईपलाईन आधीच जोडल्यास त्यावर क्रूचे नियंत्रण राहिले नसते. आणि गरजेपेक्षा एक क्षणही अधिक थांबल्यास मिशनचे अंतराळयान शॉक वेव्ह मध्ये अडकून उध्वस्त झाले असते.

सर्वजण लगबगीने, एकाग्रतेने आपापले काम करत होते. सर्वात उजवीकडे, आणि यानापासून सर्वात दूर अंतरावर मंगळ्या आणि धरा होते. धराने आपले काम पूर्ण केले आणि मंगळ्याकडे नजर टाकली. त्यानेही आपले काम पूर्ण केले होते, पण आपली उपकरणे केसमध्ये भरण्यापूर्वी त्याने सहजच उजवीकडे फिरवली.

पारदर्शक शिरस्राणतून मंगळ्याचा रंग बदलल्याचे धराने पाहिले. तो पटकन तिच्याकडे वळला आणि त्याने मे-डे संदेश प्रक्षेपित केला.

सर्व क्रू सदस्य ताबडतोब अंतराळयानात परतले. सुपरनोव्हा स्फोटाचा धोका संभवल्यास पाईपलाइनचे काम तसेच सोडून परतण्याचे त्यांना आदेश दिले गेले होते. यानाच्या दारातून आत येताना धराच्या मनात विचार आला, "डावीकडचा तारा सुपरनोव्हा होणार आहे. उजवीकडे पाहून मंगळ्याने मे-डे संदेश का दिला?"

त्याला विचारण्यासाठी ती गरकन वळली. मंगळ्या दूरवर पाईपलाइनची जोडणी पूर्ण करत होता. त्या क्षणी अलार्म वाजला, यानाचा दरवाजा बंद झाला.

मंगळ्याने उपकरणे केसमध्ये ठेवली. भयचकित होऊन बघणाऱ्या धराला त्याने 'थम्ब्ज-अप'ची खूण करून दाखवली.

चुंबकीय पाईपलाइनची जोडणी त्याने पूर्ण केली होती. पण आता अंतराळयान वर्महोलकडे निघाले होते. मंगळ्या बाहेर होता. कोणत्याही क्षणी शॉक वेव्ह मध्ये तो उध्वस्त होणार होता. धराला हुंदका फुटला.

पण त्या क्षणी, डावीकडच्या ताऱ्याचा स्फोट न होता, उजवीकडचा तारा आतल्या दिशेनी कोसळू लागला होता. उजवीकडे पाहून मंगळ्याने दिलेल्या संदेशाचा धराला तत्क्षणी उलगडा झाला.

सुपरनोव्हाच्या ऊर्जास्रोताबद्दलच्या तयारीत उजवीकडच्या त्या प्रचंड ताऱ्याकडे कोणीच लक्ष दिले नव्हते - अगदी मिशनची आखणी करतानाही. पण तो तारा वेगात कोसळू लागला होता. पण त्याच्या आकारामुळे, आणि गुरुत्वाकर्षण ऊर्जा अपुऱ्या प्रमाणात प्रक्षिप्त झाल्यामुळे, त्याचा सुपरनोव्हा स्फोट होणार नव्हता. याउलट त्या ताऱ्याचे सर्व पदार्थ आतल्या बाजूला खेचले जाऊन ताऱ्याचे रूपांतर कृष्णविवरात होणार होते.

कधीकाळी वाचलेला पदार्थविज्ञानातील हा भाग धरा आठवत असतानाच डावीकडे प्रचंड स्फोट झाला. मिशनच्या अंतराळयानाने वर्महोलमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे शॉक वेव्ह पासून त्यांची सुटका झाली.

धराला धक्का बसला होता. शॉक वेव्ह मंगळ्याला उध्वस्त करेल हे ठाऊक असूनही ती डोळे बंद करायच्याही मनस्थितीत नव्हती. पण सुपरनोव्हाचा जाळ किंवा शॉक वेव्ह मंगळ्यापर्यंत पोचण्यापूर्वी तो कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आला आणि उजवीकडे खेचला जाऊ लागला. मंगळ्याचा वेग हळूहळू कमी होतोय असे धराला भासले. याचा अर्थ तो इव्हेंट होरायझनच्या – कृष्णविवराच्या सीमारेषेच्या - दिशेने जात होता.

कृष्णविवराजवळ अवकाश-काळ पटलाचे वक्रीभवन एवढे अफाट असते, की कृष्णविवरात खेचली जाणारी वस्तू किंवा व्यक्ती इव्हेंट होरायझनपर्यंत पोचलेली दुरून बघणाऱ्या कोणालाही दिसत नाही. दुरून बघणाऱ्याला दिसतं, की ती व्यक्ती उत्तरोत्तर घटणाऱ्या वेगाने इव्हेंट होरायझनकडे चालली आहे; ती व्यक्ती खरंतर इव्हेंट होरायझनच्या पलीकडे पोचल्यावरही!

त्यामुळे, मंगळ्याचे यापुढे काय झाले, हे कोणालाही कळणार नव्हते. प्रकाशाचेही परावर्तन होऊ न देणारे कृष्णविवर आपली गुपिते कोणालाही कळू देणार नव्हते.

कॅप्टनने धराच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती भानावर आली. काही बोलण्याची गरजच नव्हती. क्रूमधल्या सर्वांची जगे वाचवण्यासाठी मंगळ्याने सर्वोच्च त्याग केला होता. पण कुणी सांगावं, तो कदाचित वाचलाही असेल. कदाचित तो एखाद्या वेगळ्या मितीत किंवा समांतर विश्वामध्ये गेला असेल. कृष्णविवरात गेलेल्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे काय होते याची कल्पना कोणालाच नव्हती.

काही काळ गेला. अंतराळयानाने काही वर्महोल्स पार केली. शेवटच्या वर्महोलजवळ आल्यानंतर क्रूने अंतराळयान सोडून दिले. त्यावर किरणोत्साराचा काही परिणाम झाला असेल तर ते प्रॉक्झिमा सेंटॉरी बी बेस प्लॅनेटवर नेणे धोक्याचे ठरू शकले असते. कमाल घर्षण निर्माण करणाऱ्या, आणि त्यामुळे अर्धनिर्वात पोकळीत वेग नियंत्रण करणे सुकर करणाऱ्या, अशा त्रिकोणी अंतराळचाकांमधून उरलेला प्रवास पूर्ण करायचा होता.
चुंबकीय पाईपलाईन उत्तम प्रकारे काम करत होती. ऊर्जेचा जवळपास अक्षय साठा आता त्यांच्या जगांसाठी उपलब्ध होता. मिशन यशस्वी झाले होते.

त्रिकोणी अंतराळचाकांचा ताफा वर्महोलमधून मजल-दरमजल करत प्रॉक्झिमा सेंटॉरी बी वर परतला. शूर बिचारा मंगळ्या मात्र या मितीत आता कधीच परतणार नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

बरे मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळ लागला कळायला जरा.
पण माझ्यातर्फे ५ तारे.
-----------------
(हादेखील देवदत्ती कोड्याचा प्रकार आहे का? शोधा म्हणजे सापडेल असा? तर कठीण आहे भाऊ....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की काय कळले?

("हे एक प्रचंड तथा विशुद्ध गॉबलडीगूक आहे", यापलिकडे मला काहीही कळले नाही. असो चालायचेच.)

----------

(अवांतर: यावरून एक विनोद आठवला.

एकदा एका मनुष्यास त्याच्या एका डॉक्टर मित्राकडून पत्र येते. आता, डॉक्टराचेच हस्ताक्षर ते; याला ते अजिबात वाचता येत नाही. म्हणून बायकोला दाखवतो; तिलाही अक्षर लागत नाही. शेजाऱ्यापाजाऱ्यांना दाखवतो, तिथेही तीच कथा.

आता काय करावे बरे? मग त्याला युक्ती सुचते. म्हणतो, या केमिस्ट लोकांना डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शने बरोब्बर वाचता येतात. चला, एखाद्या केमिस्टालाच हे पत्र दाखवावे कसे, नि त्याच्याकडून ते वाचून घ्यावे. म्हणून केमिस्टाकडे जातो, नि त्याच्या हातात पत्र थोपवतो. नि आपली अडचण त्याला सांगणारच असतो, तेवढ्यात केमिस्ट त्या पत्राकडे नजर टाकतो, नि फडताळावरची कोठलीतरी रँडम बाटली काढून याच्या हातात थोपवतो, नि म्हणतो, "बारा रुपये झाले."

अतिअवांतर: आपण व्यवसायाने केमिस्ट / फार्मसिस्ट आहात काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, केमिस्ट /फार्मसिस्ट नाही.
पण मला श्टोरी आवडली, पूर्ण समजली नाही तरी आवडली.
मराठी आंजावरचे नित्यनियमित भावनिक, ललित लेख ह्या नावाखाली खपवले जाणारे नॉस्टाल्जियाचे कढ, इतिहासाची आवर्तनं वगैरे नेहेमीच्या मराठी गोष्टींपलिकडे लिहिलेल
आणि-
सायन्स फिक्शनच्या जवळ जाणारं लिखाण कोण भोसडीचा करतो आजकाल?

तेव्हा म्हणून ५ तारे.

शिवाय कृष्णविवरात जाताना मंगळ्याचं काय झालं असेल, असा एक भावनिक पदर कथेला जोडल्याबद्दल मराठी कंप्ल्यायन्सचा १/२ ष्टार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीशीर आहे हे.

हीच कथा असं नाही, पण बलिदान ह्या संकल्पनेबद्दल सिंधुआजींचं काय म्हणणं, तेही वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाब्बो! आता एवढेच. मंगळ्याला पत्र लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्पर्य: विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ग्रहदशा टळत नाही. आपण आपली अध्यात्मिक बैठक हरवून बसत आहोत. उदा.
आता मंगळ्याला मितीसागर तरुन पार करण्यासाठी वर्महोल नव्हे तर कर्महोल हाच मार्ग आहे. किंवा भक्तीहोल, योगहोल असे मार्ग घेतले तरी चालतील पण ध्येय एकच असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0