पडसाद

मऊ सांजवेळी प्रभा दाटलेली, दिसे आसमंतात आता धुके
तुझ्याही मनी तेच कल्लोळते का? जशी मंदिरातील घंटा घुमे!

स्फुरे का इथे मंत्र बीजाक्षरांचा जरी अंतरंगी जळे वेदना
नुरे शब्दमालेतला प्राण तरिही गमे मालकंसातली सांत्वना

सरे शुद्ध भावातली सत्यसाक्षी कळा शब्द गीतात साकारता
उदासी उगा आर्द्र चित्ती उरावी नदीच्या प्रवाही दिवे सोडता

झणत्कारता त्या स्मृतींची नुपूरे, क्षणांची द्युती शुभ्र तेजाळते
जणू ते दरीतील अंधारलेल्या अरण्यातले क्षीणसे काजवे

उरी सावल्यांच्या निखारे व्रणांचे, भृगुच्या पदांचे विरागी टिळे
कदंबासही का वृथा मोहवावे अनादि चिरंजीव काही निळे?

अता पार्थिवाची सराईत वसने लेऊ कसा? सांग जेंव्हा मला
दिसे ह्या गुहेतील अस्तित्व माझे, जळे भास, मंत्रातली वंचना!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अन्वय लागतोही आहे आणि निसटतोही.
कविता सुमंदारमाला या वृत्तात1 आहे, अपवाद झंकारता.. या ओळीचा. तिथे "नूपुरे" ऐवजी "नुपूरे"ला आधी अडखळले. मग पाहिलं तर तेवढ्या एकाच ओळीत मंदारमाला2 आहे.

1. सात वेळा य (लघु, गुरु, गुरु), लघु, गुरु
2. सात वेळा त (गुरु, गुर, लघु), गुरु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओरिजनली 'झणत्कारता' होतं वृत्तात, पण 'झंकारता' सोपं वाटलं त्यापेक्षा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकापुढे एक शब्द लिहून काही अनाकलनीय कारणाने तो शब्दसमुच्चय 'कविता' या सदरात टाकतात लोकं. पण तरीही मी चिकाटीने कविता बघतो कारण कधीकधी त्या कर्दमात, चित्तवृत्ती सुखावणाऱ्या वाऱ्याची झुळूक यावी त्याप्रमाणे हे असं काही वाचायला मिळतं. अहाहा, काय सुरेख रचना आहे, व्वा! वर उज्जवलाने बरोब्बर म्हंटलंय - "अन्वय लागतोही आहे आणि निसटतोही." .... निसटतोही - अगदी समर्पक.

"झंकारता...." ओळीला मीही थोडा अडखळलो. द्युती = ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

धन्यवाद उज्ज्वला आणि मिसळपाव! आवर्जुन कवितावर अभिप्राय नोंदवल्याबद्दल.

द्युती=तेज, किरणवलय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0