पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग 1

पहिले महायुद्ध! प्रकरण १
विषय प्रवेश
११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्चमधून घंटानाद करून हे वर्तमान लोकाना सांगितले गेले. लंडनचे प्रसिद्ध बिग बेन हे घड्याळ १९१६पासून बंद होते. त्याने सकाळी ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण,.... ती भेसुरच होती.सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या ह्या नरमेधातून जे वाचले ते स्वत:ला सुदैवी समजत होते कि नाही, हे नक्की सांगता येणार नाही पण त्यानी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, सौंदर्य, चेहरा अन आयुष्यावरचा, एकूणच सौन्दर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा,आणि इतरही बरेच काही. “पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही...” असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षात परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले. का झाले असेल असे? काय कारण असेल? ह्याचा इतिहास रंजक आहे हे तर खरेच. तसाही युद्धाचा इतिहास रंजकच असतो पण मग दूरवरच्या युरोप नावाच्या खंडात शंभर एक वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यावे? काय गरज आहे?
आपण अनेकदा ‘युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, हिंसाचाराने मूल्यांचा ऱ्हास होतो, संस्कृती नाश पावते’ अशा प्रकारची विधाने ऐकतो आणि त्यात तथ्यांश आहेच पण त्याबरोबर मानव जेव्हापासून आपली संस्कृती / सभ्यता म्हणून जे काही स्थापत आला आहे तेव्हापासून युद्ध आणि हिंसा त्याबरोबरच आहेतच. इतिहासातला असा एकाही कालखंड नसेल ज्यात मानव समूह आपसात लढले नसतील.तेव्हा युद्ध आणि हिंसाचार,आक्रमणे ही दरवेळी टाळता येत नाहीत हा इतिहासाचाच धडा आहे त्यामुळेच ती दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नक्कीच नाहीत. सर्व युद्धांचा नाश करणारे अंतिम युद्ध म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते पहिले महायुद्ध सर्व युद्धांचा नाश तर करू शकले नाहीच पण पाव शतकापेक्षा कमी काळात दुसऱ्या एका अशाच महाभयनक संगराची सुरुवात व्हायला मात्र कारणीभूत झाले.फ्रांस इंग्लंड सारखी जी साम्राज्य ह्या झन्झावातातून वाचली त्यांनाही इतका जबर तडाखा ह्या युद्धाने दिला कि त्यांच्या साम्राज्याचा पाया त्यामुळे भुसभुशीत झाला. भारत पाकिस्तान सारखे अनेक देश ह्या युद्धामुळेच पुढे स्वतंत्र होऊ शकले. आतापर्यंत मायभूमी, देव आणि धर्मासाठी, धन्याच्या खाल्ल्या मीठाला जागून लढणाऱ्या लोकाना पुन्हा नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी सत्ताधाऱ्याना राष्ट्र,राष्ट्रवाद,देशभक्ती अशा नव्या संकल्पना सापडल्या. सध्याचा काळ भारत देशासमोर मोठा धामधुमीचा आणि संक्रमणाचा आहे. धर्म,जात, प्रांत, भाषा ह्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींबरोबरच लोकशाही, हुकुमशाही, देशभक्ती, देशप्रेम, देशद्रोह, संविधान, संविधानावरची निष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अशा नव्या अवजड शब्दांच्या आणि संकल्पनाच्या गदारोळात भारतीय समाज मन गोंधळून गेलेले आहे. राष्ट्रवाद ही शक्ती आहे हे खरेच, पण हि शक्ती शुभ कधी असते? आणि अशुभ कधी होते? शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजाला देखिल अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य ह्या संकल्पनात कोठून येते?सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्वाकांक्षा आणि अहंकार, कशाप्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात?समाजवाद,साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावर निष्ठा? भारतासारख्या शतकानुशतके सरंजामशाही आणि व्यक्तिपूजा रक्तामांसात भिनलेल्या, प्रेरणास्थानांना मर्मस्थान बनवून ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचे सतत कढ आणणाऱ्या समाजात लोकशाही नक्की रुजणार कशी? तिचे स्वरूप आणि कार्य नक्की कसे काय असेल? आपण मूळ उद्दिष्टापासून भरकटत तर चाललो नाहीत ना हे कसे ओळखायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडायला ह्या इतिहासाने मदत होईल अशी मला अशा वाटते.
दुसरे असे कि मराठीत एक दि वी गोखले ह्यांनी लिहिलेला इतिहास आणि नवाकाळ मध्ये युद्ध चालू असतना त्यानिमित्ताने खाडीलकरानी लिहिलेली लेखमाला ह्यापेक्षा ह्या विषयावर फार काही कुणी लिहिलेले नाही. खाडीलकरांच्या लेखमालेचे पुढे पाच सहा खंड प्रकाशित झाले होते. पण आज तरी ते वाचकाना सहज उपलब्ध नाहीत. तेव्हा मराठीत ह्या विषयावर काही लिहावे असे मला अनेक दिवस वाटत होते म्हणूनही हा लेखन प्रपंच...
यंदा म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्त ही लेखमाला, त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास.
तर मग करायची सुरुवात!
पहिले महायुद्ध!
प्रकरण पहिले – संघर्षाचा आरंभ
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते.मानवी संस्कृतीच्या / सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञानाची, कृषीपासून वैद्यकीय आणि इंजिनियरिंग पासून ते अवकाश संशोधन,अशा सर्वच क्षेत्रातली झंझावाती प्रगती आणि त्यानेच निर्माण केलेले असंख्य अक्राळ विक्राळ प्रश्न हे तर ह्या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या ह्याच गोष्टी विसाव्या शतकात महत्वाच्या ठरल्या नाहीत तर एकूणच औद्योगिकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हे देखिल पाहायला मिळाले.(बाय द वे हुकुमशाही जरी राजेशाहीचेच एक “भेस बदला हुआ रूप” असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकुमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले हि विशेष उल्लेखनीय बाब.तसेही हुकुमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले त्याधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.) विसाव्या शतकातच हि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली कि इथे अब्राहम लिंकन च्या १९व्य शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही
The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise -- with the occasion. As our case is new, so we must think anew, and act anew. We must disenthrall ourselves, and then we shall save our country.
-Abraham Lincoln
Washington, D.C.
December 1, 1862
Speech at Annual Congress meet
भावार्थ
गत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे पडत नाहीत.परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते कि आपल्याला बऱ्याचदा नवा विचार/ नवे उत्तर, नवी समीकरण शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरु होतं.
ह्या विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्ध पहिली. खरे पाहू जाता पहल्या महायुद्धाचेच extension दुसरे महायुद्ध होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पहिला, अनुभवला, नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला.कोणत्याही प्रकारचे उच्च तत्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरु झाले नाही, (अर्थात तसा दावा ह्या युद्धातल्या जेत्यांनी केलाच जसा तो दुसऱ्या महायुद्धाबाबत देखील केला.) तरीदेखील ह्या युद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला,एक अंटार्क्तीका हे खंड सोडलं तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र ह्या युद्धात सामील झाले. युद्ध संपे पर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्य लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार साडे चार महिन्यातच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील असे सगळ्यानांच वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्ष हे युद्ध चालले आणि ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले तर २ कोटी १२ लाखाच्यावर लोक जखमी झाले. १९१४चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे.ह्या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २% लोक ह्या युद्धात कामी आले. १९व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था हादरून गेली...हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशात लढले गेले.प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हे देखील जणु एक युद्ध क्षेत्रच बनवले गेले, मशीनगन सारख्या शस्त्राचा वापर आधीही माहिती होता पण चाल करून येणाऱ्या सैनिकाच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या साह्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे ह्या आधी वापरले गेले नव्हते.साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौर्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवाती पासून भरडली जाऊ लागली.
पण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्राज्ञान, उद्योग, उड्डयन, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली.वैद्यकीय क्षेत्र हे ह्या साडेचार वर्षात आधी कधीच झाले नव्हते इतक्या झपाट्याने विकसित झाले.सेवा शुश्रुषा सर्जरी प्लास्टिकसर्जरी , कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, प्रत्यारोपण,मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या असंख्य शाखांचा विकास झाला. युद्धाआधीही लोकाना विमान, मोटारी माहिती होत्या रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या पण ह्या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली.आफ्रिका आशियातल्या अनेक देशाना/ मानव समूहाना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल ही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकाराठीचे/ स्वातन्त्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरीहक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना)हे देखील अंशत: ह्या युद्धाचेच फलित.
वसाहत वाद आणि त्या वसाहतीतून मिळणार्या उर्जेवर इंग्लंड फ्रांससारखे युरोपियदेश आपले उच्चतर मानवी संकृतीचे मळे फुलवत होते. तर इटली जर्मनी सारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला ह्या आधीच जुन्या भिडूनी बळकावलेल्या वसाहतीताला हिस्सा कसा लाटता येईल ह्या विवंचनेत होते.खरेतर त्यामुळेच ह्या युद्धाचा वणवा पेटला होता. ह्या युद्धाने प्रचलित साम्राज्यावादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला.अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले.तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातीलच राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो ह्यात वरचढ ठरत असे तोच सगळ्या जगाच्या सत्ता सामातोलावर प्रभाव टाकत असे. ह्या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नाही तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघा सारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यालाही मर्यादितप्रमाणात का होईना पण यश मिळाले.

दिवे मालवू लागले ...
“Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.”
सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत कि आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत...
-सर एडवर्ड ग्रे – ब्रिटनचे परदेश सचिव (तत्कालीन)

परिस्थिती इतकी स्फोटक बनली कशी ?
आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारण झाले ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स)आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांचा २८ जुन १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला खून. बोस्निया हा त्यांच्या-ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून वाचून असतात त्याना ही एवढी माहिती असतेच असते. आणि म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थिती पासून सुरुवात करूयात.
१९व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी
ज्याप्रमाणे १८५७च्या बंडाची कारण शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही तसेच पहिल्या महायुद्धाचे कारण शोधताना आपल्याला इतिहासात कमीतकमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते.१९व्या शतकातल्या युरोपचा विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीच्या इतिहासतर इतका गुंतागुंतीचा आहे कि ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटला होता कि जगात फक्त तीन लोकाना ह्या प्रश्नाची खरोखर माहिती आहे एक म्हणजे प्रिन्स अल्बर्ट ( इंग्लंडच्या राणी विकटोरीयाचा नवरा) पण तो आता हयात नाही, एक जर्मन प्रोफेसर आहे पण तो वेडा झालाय आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.
मुळात १९व्या शतकाचा बराचसा काळ( साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषक फुटकळ राज्य. इसवीसनाच्या १५व्या शतकापासूनच कधी पोलंड कधी फ्रांस, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. ह्याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले कि प्रशिया मध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणत कि काय असे आपल्याला वाटावे! असो तर ह्या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट( फ्रेडरिक दुसरा ) ह्याने पोलंड, फ्रांस आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य( खरेतर राज्य!) स्थापले.साल होते १७७२. इतक्या दीर्घ काल म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्धरत राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक थोडक्यात युद्धखोर बनला असल्यास नवल नव्हते. मात्र पुढे जेव्हा फ्रांस मध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विलियम दुसरा. हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्वकाही लाभली पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले. हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलीयनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलीयनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता.१७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषक असा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विलियम तिसरा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलीयनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलीयनने अक्खा प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला. ह्या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्य सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलीयनने ह्यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकात विलय करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी हि छोटी छोटी राज्य नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रू मुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली. पुढे १८१५ साली जरी नेपोलीयनचा वाटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव् झाला असला तरी ह्या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड.ह्या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला, प्रशिया स्वतंत्र झाला आणि फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे हे ओळखून प्रशिया आणि हि ३९ जर्मन भाषक राज्ये एकत्र येऊन त्यानी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला. सुरुवातीला ह्यात ऑस्ट्रियादेखिल सामील झाला होता पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला. १८४० साली प्रशियाच्या गादिवर आला फ्रेडरिक विलियम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आता पर्यन्त आपण जी भांडणे लढाया गटतट शहप्रतीशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. ( kingdom.) देश राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्यास्वरुपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरेतर १८व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्य क्रांतीनातर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते पण नेपोलीयनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ घातली.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
अर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता ह्यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले. जरी हे सगळे उठाव फ्रेडरिक विलियम चौथा ह्याने मोडून काढले असले तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलीयानिक युद्धातून(१८०३-१८१५) युरोप मध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होताच पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात.(अर्थात इंग्लंडचा अपवाद) अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती चालीरितींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला( सन १८४९) पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठे पण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षानी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विलियम चौथा ह्याने गादी सोडली अन त्याचा भाऊ विलियम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला( आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.
जर्मनीचा पोलादी चान्सेलर बिस्मार्क
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क हा अतिशय कणखर वृत्तीचा धोरणी, मुत्सद्दी पण विधीनिषेधशून्य असा संसदपटू/राजकारणी होता. सर्व लहान मोठ्या जर्मन भाषक राज्यांचे अस्तित्व मोडून काढून एक विशाल जर्मन राष्ट्र उभे करायचे हा त्याचा पक्का निश्चय होता. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करायची इच्छा विल्हेल्मला सुद्धा होती त्यामुळे राजा आणि प्रधानाची एक उत्तम युती तयार झाली (आणि ती सुदैवाने टिकली देखील दीर्घकाळ.) बिस्मार्क ने प्रथम प्रशियात अंतर्गत शांतता प्रस्थापित केली. १८४८पसुन चाललेली बंडाळी अजून पुरती शमली नव्हती आणि समाजवादी, स्वातंत्र्यवादी, राजेशाहीविरोधी असंतोषाचे निखारे अजून धुमसतच होते पण बिस्मार्कने त्यांचे सरसकट दमन न करता त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून, त्यांना चुचकारून त्या बदल्यात राजेशाही, सामन्तशांहीला पराकोटीचा असलेला त्यांचा विरोध सोडायला लावला. अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित केली. एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने मग जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली. खरेतर हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे पण फार विषयांतर नको म्हणून थोडक्यात संपवतो.
वर सांगितल्या प्रमाणे बिस्मार्क कणखर वृत्तीचा, धोरणी पण विधीनिषेध शून्य असा कसलेला संसदपटू / राजकारणी मुत्सद्दी होता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याला युद्ध छेडणे, भांडण उकरून काढणे. हिंसा हे वर्ज्य नव्हतेच पण त्याची उद्दिष्ट आणि धोरण स्पष्ट असत.(ह्यालाच त्याने लोह-रुधीर धोरण- Blood & iron policy असे गोंडस नाव दिले.) आयुष्यात तो कधीही ह्याबाबत चुकला नाही. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण ३ युद्धे छेडली. पहिले युद्ध डेन्मार्कशी झाले. प्रशियाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील श्लेसविग आणि होलस्टीन हे जर्मन बहुल प्रांत डेन्मार्कच्या अधीन होते आणि त्याचां ताबा मिळवण्यासठी त्याने डेन्मार्काशी युद्ध केले. ह्याला अर्थातच प्रशियन राज्यसंघाताल्या जर्मन राष्ट्रवादी लोकांचा मोठा पाठींबा लाभला आणि ही मोहिम फत्ते झाल्यावर उत्तर जर्मन राज्यातल्या राष्ट्रीय चळवळी आणि नेत्यांना पाठींबा देऊन उत्तरेकडील सगळी जर्मन भाषक राज्य प्रशियात सामील करून घेतली.
ह्या एकाच युद्धाने प्रशियाचे पारडे जड झाले हे ओळखून ऑस्ट्रिया आता अस्वस्थ झाला आणि त्याने दक्षिणेकडील जर्मन राज्ये स्वत:च्या पंखाखाली घ्यायला सुरुवात केली.ऑस्ट्रियाला नुकत्याच जिंकलेल्या श्लेसविग आणि होलस्टीन ह्या प्रान्तापैकी होलस्टीन प्रांताचा ताबा हवा होता. ही मागणी म्हणजे ‘प्रशिया आणि उत्तरेकडील जर्मन भाषक प्रशियावादी राज्य ह्यात ऑस्ट्रियाची ची पाचर बसावी म्हणून खेळलेली एक चाल आहे’ अशी भुमका उठवून आणि ऑस्ट्रियाला फशी पडून बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध केले. हे करताना फ्रांस तटस्थ राहील ह्याची काळजी घेतलीच पण ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला असलेला इटलीचा पाठींबा मिळवून वेळ पडल्यास तो आपल्याला मदतही करेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे ऑस्ट्रियाला इटलीच्या सीमेवर संरक्षणाची तरतूद करावी लागली आणि प्रशियाच्या विरोधात सर्व ताकद पणाला न लावता आल्याने त्यांचा निर्णायक पराभव झाला. ह्यानंतर बिस्मार्कने जर्मन राज्य संघातून ऑस्ट्रियाची बोळवण केली आणि मग अर्थातच राज्यसंघात फक्त प्रशिया हाच एक प्रबळ देश उरला.अर्थात ऑस्ट्रियाचा पराभव झाल्यावरही त्यांच्या अधिपात्याखालाच्या भूमीचे लाचके न तोडता दूर अंतरावरच्या मैत्रीचे संबंधच ठेवल्याने ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियन जनता जी बहुसंख्येने जर्मन भाषकहोती ती जर्मनीची पक्की वैरी बनली नाहीत. अजून प्रशियाच्या कच्छपी न लागलेली जी दक्षिण जर्मन राज्य होती त्याना प्रशियाची सार्थ भीती वाटत होती पण यापेक्षा जास्त भीती त्याना फ्रांसची वाटत होती. ५०-६० वर्षापूर्वीच तर फ्रांसने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून त्याना मांडलिक बनवले होते आणि १८१५मध्ये जरी नेपोलीयनचा पराभव झालेला असला तरी लगेच काही फ्रांस हे राष्ट्र कमकुवत झालेले नव्हते उलट नेपोलीयनने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे ते सामर्थ्यवान आणि त्याहूनही अधिक आत्मविश्वासाने भरलेले बनले होते. त्यांच्या जगभर वसाहती होत्या आणि इंग्लंड नंतर क्रमाक दोनची वसाहतवादी सत्ता तेच होते. जर्मन बहुल प्रांत आल्सेस आणि लोरेन हे नेपोलीयनने जिंकून फ्रान्सला जोडले त्यावरचा ताबा अजूनही त्यांनी सोडला नव्हता ही गोष्ट जर्मन लोक विसरले नव्हते.
त्यातून १८५२ साली नेपोलियन तिसरा हा पुन्हा फ्रान्सच्या गादीवर आला आणि त्याने सत्ता काबीज करून दुसरे फ्रेंच साम्राज्य स्थापन केले म्हणजे फ्रांस आता पुन्हा एकदा प्रजासत्ताक न राहता एका राजाची राजवट बनला होता, आणि ह्याचे प्रत्यंतर युरोपला १ वर्षातच तेव्हा आले जेव्हा फ्रांसने रशियाविरुद्ध क्रिमियन युद्धात सक्रीय सहभाग घेतला. असो तर आता साम्राज्यवादी फ्रांस हा पुन्हा एकदा नेपोलीयनप्रमाणे आपला शत्रू म्हणून आपल्या उरावर बसला आहे आणि त्याच्या पासूनच आपल्या अस्तित्वाला खरा धोका आहे हे दक्षिणेकडच्या जर्मन राज्यांवर ठसवण्याकाराता फ्रान्सकडून काही आगळीक होणे जरुरीचे होते. नाहीतर फ्रांस पेक्षा बिस्मार्कच्या म्हणजेच प्रशियाच्याच खऱ्या हेतूचे पितळ उघडे पडले असते. त्यामुळे बिस्मार्क योग्य अशी संधी शोधतच होता जी त्याला लवकरच मिळाली.
फ्रांको प्रशियन युद्ध १८७०-७१
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
१८७० साली स्पेनची राणी इझाबेला हिला अंतर्गत बंडाळीमुळे गादीवरून पायउतार व्हावे लागले आणि स्पेनची गादी रिकामी झाली. प्रशियाचा राजा विल्हेल्म चा पुतण्या प्रिन्स लिओपोल्ड ह्याला स्पेनचा राजा होण्याची शिफारस केली गेली. बिस्मार्काचा ह्याला पाठींबा होता नव्हे त्यानेच त्याचे लागेबांधे वापरून लिओपोल्ड चे नाव पुढे करवले होते. स्वत: लिओपोल्ड आणि त्याचा काका सम्राट विल्हेल्म ह्यांची लिओपोल्द्ने स्पेनचा राजा व्हायला फारशी इच्छा नव्हती. फ्रांस नाराज झाले असते हेतर झालेच पण गेली १०० एक वर्षे स्पेन मध्ये सतत कुरबुरी, बंडाळ्या, उठाव चालूच होते ही असली सुळावरची पोळी खाण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते पण बिस्मार्कने मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांचे मन वळवले. कारण लिओपोल्ड स्पेनचा राजा झाल्यावर फ्रान्सच्या पश्चिमेकडून प्रशियाला अनुकूल असणारे एक राज्य तयार होणार होते. अखेर १९जुन १८७० रोजी लिओपोल्ड तयार झाला आणि तशी तार ( सांकेतिक भाषेतली )त्यानी स्पेनला केली कि त्याने राज्यग्रहण करण्याचा ठरवला उपस्थित राहायला तो २९ जून ला येत आहे. इथे मात्र एका छोट्याश्या घटनेने बिस्मार्कच्या सगळ्या योजनेवर पाणी पडले. झाले असे कि सांकेतिक भाषेतली तार भाषांतरीत करणारा जो कुणी होता त्याने २९ जून ऐवजी चुकून ९ जुलै केले. त्यामुळे स्पेनमधील मंत्री मंडळ/ कायदेमंडळाची सभा त्यानी तो पर्यंत तहकूब केली आणि इकडे लिओपोल्ड तर २९ जूनला पोहोचला तेव्हा सगळा गोंधळ उडाला आणिती बातमी साहजिकच बाहेर फुटली. तो राजा होईपर्यंत ही बातमी गुप्त विशेषत: फ्रांस पासून लपून राहणे गरजेचे होते, पण आता सगळेच बिंग फुटले आणि फ्रांस मध्ये खळबळ उडाली. त्यांनी ह्यावर तीव्र नापसंती दाखवली आणि भांडण नको म्हणून राजा विल्हेल्मने त्यांचे म्हणणे मान्य करत लिओपोल्डला असलेला आपला पाठींबा काढून घेतला. लिओपोल्डने देखील लगोलग आपली उमेदवारी मागे घेतली आणि तसे स्पेन आणि फ्रान्सला कळवले. हा खरेतर फ्रान्सचा राजनयिक विजयच होता (आणि बिस्मार्कच्या मनसुब्याचा पराभव) पण तेवढ्यावर समाधान मानायला ते तयार नव्हते. त्यामुळे ह्या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी फ्रांसने पाठवलेला राजदूत काउंट बेनेडेटी ह्याने चक्क राजा विल्हेल्मकडे त्याने प्रिन्स लिओपोल्डला दिलेला पाठींबा काढून घेण्याचे आणि पुढे भविष्यात देखिल आपण स्पेनच्या मामल्यात लुडबुड करणार नाही असे लिखित आश्वासन मागितले.
खरेतर ह्याताली पहिली गोष्ट आधीच झालेली होती आणि असा काही विषय परत येणे संभव नव्हते.( लोकाना राजा व्हायची ऑफर काही रोज रोज मिळत नाही. ) पण अशा प्रकारे लिखित आश्वासन मागणे ते सुद्धा एक राजदूताने राजाकडे अशी मागणी करणे हे अपमानजनक होते आणि राजा विल्हेल्मने त्याची दुसरी मागणी साफ धुडकावली. जे काही घडले ते सांगणारी तार सम्राट विल्हेल्मने शिष्टाचार म्हणून बिस्मार्काकडे पाठवली. बिस्मार्क अशा एका संधीची वाटच पाहत होता त्याने त्या तारेतले फक्त काही शब्द असे काही फिरवले कि त्यातून फ्रेन्चान्चा उद्दामपणा तर अधोरेखित झालाच पण प्रशिया अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नसुन आता उलट स्पेनच्या मामल्यात नक्कीच हस्तक्षेप करणार आहे असा देखावा तयार झाला, इतिहासात ही तार म्हणजेच टेलिग्राम एम्स टेलिग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. ( ही भेट झाली तेव्हा राजा विल्हेल्म एम्स राजवाडा, ऱ्हाईनलंड इथे होता म्हणून हा एम्स टेलिग्राम, तारीख होती २३ जुलै १८७०) झाले, आता फ्रान्सचे पित्त ह्याने खवळले आणि त्याने ही म्हणजे प्रशियाची आपल्याला दोन बाजुने घेरण्याची एक चाल आहे असे ओळखून प्रशियाविरुद्ध सरळ सरळ युद्ध पुकारले. बिस्मार्कची हीच इच्छा होती.ह्या एका गोष्टीमुळे त्याने एकाच दगडात किती पक्षी मारले पहा. ह्यामुळे युरोपात आगळीक फ्रान्सनेच काढली हे सिद्ध झाले, फ्रांस आपल्याला शांतपणे जगू देणार नाही ह्याची दक्षिण जर्मन राज्याना खात्री पटली, नुकतेच हरल्यामुळे नाराज असलेल्या पण जर्मनच असलेल्या ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या उद्दामपणामुळे गप्प बसावे लागले आणि आपली तार पाहून फ्रांस असा आततायी पणा करणार ह्याची पूर्ण कल्पना असल्याने युद्धाच्या पूर्ण तयारीत असलेला प्रशिआ आता अगदी शड्डू ठोकून युद्धात उतरला. तार प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे फ्रेंच सैन्याची तशी लगोलग युद्धाला जायची तयारी नव्हती. त्यामुळे युद्ध पुकारल्यावर पूर्ण तयारीत असलेल्या प्रशियाने फ्रांसची अगदी धुळदाण केली. वैझेन्बार्ग, ग्रेवेलोट,मार्त्झ नदीजवळ, अशा ठिकाणी लढाया झाल्या मुख्य लढाई सेदान इथे झाली आणि त्यात मात्र फ्रान्सचा पूर्ण पराभव झाला चक्क राजा नेपोलीयनच स्वत: कैद झाला आणि त्याला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले.तीन वर्षानी तो निर्वासित अवस्थेत इंग्लंड मध्ये मरण पावला. प्रशियन सैन्य तिथे थांबले नाही. झाले असे कि स्वत: राजा नेपोलियन कैद झाल्याने फ्रांस मध्ये गोंधळ झाला आणि फ्रांस मध्ये तत्पुअरते हंगामी सरकार स्थापन केले गेले . त्यानी लगोलग प्रशियाशी बोलणी करायला हवी होती पण नक्की किती नुकसान झालेले आहे , सध्या आपल्या राखीव सैन्याची अवस्था काय आहे ह्याबाबत गोंधळ असल्याने त्यांच्यातच एकमत होत नव्हते.इकडे मोल्टके काही शांत बसला नव्हता. त्याच्या अधिपत्याखालील प्रशियन सैन्याची आगेकूच चालूच होती त्यानी चक्क फ्रेच राजधानीलाच वेढा घातला आणि तो चांगला १३० दिवस चालला. ५ दशकांपूर्वी अख्ख्या युरोपला धूळ चरणाऱ्या फ्रांसची केवढी मानहानी! आणि ती पण अजून पुरते राष्ट्रदेखील न झालेल्या जर्मन-प्रशियाकडून. सगळा युरोप बोटे तोंडात घालून पाहतच राहिला. आता प्रशियाच्या सामर्थ्यापुढे बोलायची कुणाची टाप नव्हती. अखेर २४ जाने १८७१ रोजी फ्रन्कफुर्ट इथे तह झाला आणि सर्व जर्मन राज्यांचा प्रशियात विलय होऊन जर्मनी हे नवे राष्ट्र उदयाला आले. त्याचा राजा होता विल्हेल्म पहिला, त्याने कैसर (सम्राट)ही पदवी धारण केली. पराजित फ्रांसने मागे बळकावलेले अल्सेस आणि लॉरेनहे प्रांत परत केले शिवाय युद्धखोरीची भरपाई म्हणून ५ अब्ज रुपयांची भरपाई दिली. अशा प्रकारे मोठ्या मुत्सद्देगिरीने आणि चलाखीने बिस्मार्कने आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. पण ह्याबरोबरच स्वत:च्या सामर्थ्याबद्दल भरमसाट गर्व आणि युद्ध करून आपल्याला हवेते पदरात पडून घेता येईल हा आंधळा विश्वास जर्मन जनतेच्या मनात भरला गेला.
बिस्मार्क जितका धोरणी आणि काळाची पावले ओळखणारा होता तितके मुत्सद्दीपण पुढील पिढीतल्या कुणात असणार नव्हते . अगदी ५०-५५ वर्षापूर्वी ज्याना आपण मंडलिक केले होते त्यानी आपला लाजीरवाणा पराभव केलाच पण अल्सेस आणि लॉरेन प्रांत हाताचे गेल्याने, आणि चक्क राजधानी प्यारीसला ५ महिने वेढा पडल्याने झालेला अपमान फ्रेन्चान्च्या जिव्हारी लागला.(खरेतर सेदान आणि वेर्डून इथे पराभव झाल्यावर बिस्मार्कने थांबायला हवे होते पण पुढे त्याने जे केले त्यामुळे फ्रांस जर्मनीचे कायमचे वैरी बनले आणि हे वैर पुढचे जवळपास ७५ वर्षे आणि दोन महायुद्धे, दोघानाही पुरले...असो हे आपण आता म्हणतो आहोत.).ह्या एका युद्धाने युरोपचा भूगोलच नाही तर सत्ता समतोल पार बदलून/बिघडून गेला. पहिल्या मह्युद्धाचे बीज इथे पडले आणि आता सर्वनाश, संहाराकडे वाटचाल सुरु झाली. ह्या युद्धात जर्मनीचा सेनापती होता हेल्मुट फॉन मोल्टके.पहिल्या मह्युद्धात भाग घेतलेल्या जर्मन सेनापती हेल्मुट फॉन मोल्टकेचा काका.
अशाप्रकारे एकीकृत जर्मनीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर मात्र बिस्मार्कने कोणतेही विस्तारवादि धोरण आखले नाही. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या जर्मनीची भरभराट, प्रगती साधण्यासाठी त्याला स्थैर्य आणि शांती हवी होती. देशातल्या स्वातंत्र्य प्रेमी समाजवादी राष्ट्रवादी अशा निरनिराळ्या गटाना शांत करण्यासाठी म्हणून का होईना, त्याने काही प्रमाणात लोकशाही आणली.१८७१ सालीच जर्मन संसद म्हणजे राईश्टागस्थापन करून २५वर्षे वयवरील प्रत्येक जर्मन नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला गेला. हे तेव्हाच्या इंग्लंड मध्ये ही नव्हते. आरोग्य विमा आणि कामगाराना पेन्शन अशासारख्या योजना त्याने आणून जर्मन देश हे एक कल्याणकारी राज्य आहे असे ठसवले. राजेशाही जरी पूर्ण बरखास्त नाही केली आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या भाषेत चान्सेलर जरी लोकनियुक्त नसला तरी लोकांचा राज्य्कार्भाराताला सहभाग लक्षणीय रीत्या वाढला.कायदे करणे, करप्रणाली आणि एकूण शैक्षणिक आणि आर्थिक धोरण ठरवणे अशा बाबीत लोकाना सहभाग दिला गेला. औद्योगिकरणाला प्रोत्साहन आणि कल्याणकारी कामगार धोरण ह्यामुळे लवकरच जर्मनी एक बलाढ्य औद्योगिक राष्ट्र बनले. शेतीवर अवलंबून लोकांची संख्या उद्योगधंद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांपेक्षा कमी झाली. २० लाख लोकसंख्या असलेले बर्लिन १९१२ पर्यंत ४० लाख लोख संख्या असलेले मोठे शहर बनले. ते जगात चार नंबरचे मोठे शहर होते. एकीकरणानंतर जर्मनीच्या औद्योगिकरणाला नवे बळ मिळाले आणि जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १० वर्षात तिपटीने वाढले. औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग शहरात, ओउद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात संघटीत झाला त्यातून कामगारहक्क चळवळी मूळ धरू लागल्या त्यामात्र त्याने निष्ठुरपणे मोडून काढल्या. राजेशाही आणि सामंत शाही हे कालबाह्य झालेले असून शेतकरी कामगारांचे लोकसत्ताक राज्य हे आजची गरज आहे असले विचार त्याला खपत नसत.असले विचार व्यक्त करणाऱ्या पक्षांवर त्याने बंदी आणली , नेत्याना तुरुंगात टाकले, हद्दपार केले पण त्या पक्षाच्या अनुयायाना मतदानाचे अधिकार तर होतेच ना. त्याचे तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून का होईना त्याने कामगार पेन्शन , अपघात विमा , सुट्ट्या कामाचे साप्ताहिक तास अशा मुलभूत सुधारणा केल्या. खरेतर कल्याणकारी राज्य होण्याच्या दिशेने पडलेले एक पुरोगामी पाउल होते पण समाजवादी चळवळीना शह देऊन जनतेत उदारमतवादी राजेशाहीची लोकप्रियता वाढवण्याचा छुपा उद्देश त्याच्या अंगलट आला. पक्षावर बंदी आलेली असली तरी ह्या लोकांचे मताधिकार शाबूत होते. बिस्मार्कने धर्माला देखील राज्ययन्त्रापासून दूर ठेवले होते. इतिहासाचा दाखला घेतला तर मोठ मोठ्या कटकटीना, संहाराला राज्य यंत्र आणि धर्म ह्यांची अभद्र युती कारणीभूत असते ह्या मताचा तो होता.(त्यात तथ्य होतेच आणि आहेही...)त्यामुळे बिस्मार्क वर नाराज असलेले चर्च चे लोक आणि त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आणि हे वर उल्लेखिलेले समाजवादी लोक ह्यांची बिस्मार्क विरोधात एक अघोषित युती झाली आणि १८७०-८० मध्ये राईश्ताग मधले त्यांचे एकूण मताधिक्य जे ६ टक्क्यापेक्षा खाली होते ते वाढून १८९० येईतो २५ टक्के पर्यंत गेले.चान्सेलर जो लोकनियुक्त नसून राजनियुक्त होता त्याच्या सार्वत्रिक अधिकाराला ह्याने खीळ बसली. आता गेली १७ वर्षे तो जर्मनीचा चान्सेलर -पंतप्रधान होता( आणि प्रशियाच्या पंतप्रधानकिचा काळ जमेला धरला तर २६ वर्षे) पण त्याचा खंदा आधारस्तंभ कैसर विल्हेल्मही थकला होता. ९ मार्च १८८८ रोजी तो वारला. त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला.नवीन राईश्ताग जे कैसर विल्हेल्म दुसरा ह्याच्या अध्यक्षते खाली सुरु झाले त्याचे त्यावेळी काढलेले हे चित्र मोठे सूचक आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
चित्रात दाखवल्या प्रमणे कैसरच्या पायाशी एकटाच उभा असलेला चान्सेलर बिस्मार्क खरोखर एकटा पडला होता. त्याला राईश्तागमध्ये बहुमत नव्हते आणि नव्या राजाचा पाठींबा नव्हता.कैसर विल्हेल्म ला जुना आणि त्याच्यावर प्रभाव गाजवणारा चान्सेलर नको होता. मार्च १८९० मध्ये म्हणजे गाडीवर आल्यावर दोनच वर्षात त्याने बिस्मार्काची बोळवण केली.अगदी एक दिवसाच्या नोटिशीवर त्याला हाकलले गेले.बिस्मार्क त्यानंतर निवृत्त होऊन हाम्बुर्ग जवळ आपल्या वडिलोपार्जित इस्तेतीवर जाऊन राहिला . पुढे तो आणखी ८ वर्षे जगला.त्याचे जर्मनीच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणे हे एका युगाचा अंत आणि आणि इतिहासाच्या प्रवाहाला एक निश्चित वळण देणारे ठरले. तसे युरोपात मानलेही गेले, इंग्लंड मधील पंच नावाच्या मासिकात २९ मार्च १८९० रोजी Dropping The Pilot ह्या नावाने एक व्यंग चित्र प्रसिद्ध झाले जे मोठे भविष्य दर्शक आहे.शिडात वारे भरलेले हे जर्मनीचे जहाज आता चाणाक्ष, अनुभवी पायलट(!) नसल्याने कसे आणि कुठे जाणार ह्याविषयी अनेकांना त्यावेळी सार्थ शंका वाटली असणार.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
१८५३-५६ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात रशिया विरोधात इंग्लंड फ्रांस ह्यांनी एकत्र येऊन तुर्कस्तानला मदत केली होती आणि रशियाचा युरोपातल्या वाढत्या प्रभावाला खीळ घातली होती. ह्या वेळी रशियाने ऑस्ट्रियाकडे मदत मागितली होती पण ऑस्ट्रियाने नकार दिला. ही त्यांची चूक झाली. युरोपात ऑस्ट्रिया एकटा पडला असताना त्याना रशियाच्या मदतीची गरज होती आणि तसेही १८४९ मध्ये हन्गेरीशी युद्ध करून त्याला आपल्या साम्राज्यात सामावून घेताना एकट्या रशियाने त्याना समर्थन दिले होते ज्यामुळे इतर युरोपियन देश गप्प बसले होते. असो, ह्या क्रिमियन युद्धाच्या निमित्ताने रशियाच्या अनेक मऱ्यादा आणि कमतरता उघड झाल्या, इंग्लंडला अफगाणिस्तानात युद्धात गुंतवून चांगलेच दमवलेल्या रशियाबद्दल युरोपात भीतीचे अन संशयाचे वातावरण होते. अनेकांची खात्री झाली होती कि रशिया आणि इंग्लंडचे युद्ध अटळ आहे.ह्या क्रिमियन युद्धाने मात्र बऱ्याच शंका भीत्या दूर झाल्या.
चान्सेलर असताना बिस्मार्कने मात्र रशियाशी सामंजस्य राखण्याचे धोरण ठरवले होते. जसे फ्रांस चे जर्मनीशी वैर होते तसेच नेपोलियानिक युद्धे आणि क्रिमियन युद्धामुळे फ्रांस आणि रशियाचेही वैर होते त्यामुळे फ्रांस विरुद्ध हे दोघे देश एकत्र आले आणि १८७९ मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला. दक्षिणेकडे जर्मन भाषक ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याशी देखील बिस्मार्क ने सामंजस्य पूर्ण व्यवहारच ठेवला होता.तसा मैत्रीचा करार १८७९ सालीच केला गेला. स्पेन इटली तुर्कस्तानशी भांडण उकरून काढायची गरजच नव्हती. १८८२ साली ऑस्ट्रिया हंगेरी, जर्मनी आणि इटलीने एकत्र येऊन मैत्रीचा करार केला.(हा पहिले महायुद्ध सुरु होई पर्यंत टिकला पण युद्ध सुरु झाल्यावर इटलीने त्यातून अंग काढून घेतले.) युरोपातला आजारी मरणासन्न म्हातारा म्हणून हिणवले जाणारे ओट्टोमान साम्राज्य खिळखिळे झाले होते त्याच्या पासून फुटून वेगळे स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या राज्यांवर रशिया आणि ऑस्ट्रिया दोघांचही डोळा होता त्यामुळे अर्थात ऑस्ट्रिया आणि रशियात तणाव वाढू लागला तेव्हा ह्या रस्सीखेचीत फ्रांसने रशियाच्या बाजूने उडी घेऊन सत्तेचा समतोल आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला पण बिस्मार्कने शिताफीने रशियाशी १८८७ मध्ये गुप्त करार करून, ऑस्ट्रियाला समजावून गप्प केले आणि फ्रांसला दूर ठेवले.ह्यामुळे तुर्की समुद्रात तसेच बाल्कन प्रदेशात नव्याने स्वतंत्र होऊ घातलेल्या राष्ट्रांवर रशियाचा प्रभाव वाढला. ही गोष्ट जशी ऑस्ट्रियाला फारशी आवडली नाही तशीच जर्मनीतही अनेकांना आवडली नाही. .(खरेतर असा मैत्री करार करून रशियाला तंत्रज्ञान, लष्करी, औद्योगिक, शैक्षणिक सुधारणात होऊ शकणारी युरोपातील इतर देशांची मदत बिस्मार्कने अडवली. ह्या क्षेत्रात रशिया मागासलेला होता. नैसर्गिक साधनसम्पत्तीने समृद्ध, प्रचंड भूविस्तर आणि अमऱ्याद मनुष्यबळ असलेला रशिया जर तंत्रज्ञान,पायाभूत सोयी, अवजड उद्योग आणि लष्करी दृष्ट्या बलवान झाला असता तर ते भयावह ठरणार होते. त्यामुळे ही त्याची उपलब्धी मोठी होती पण ती कुणाला समजली नाही.)
इंग्लंडला, त्यांच्या साम्राज्याला आणी त्यांच्या सागरी प्रभुत्वाला आव्हान दिले जाईल अशी कुठलीही योजना त्याने आखली नाही, तसे कुठलेही कृत्य केले नाही. बिस्मार्कने अशा प्रकारे १८७१ पर्यंत असलेले आक्रमक धोरण बदलून पूर्णपणे सामंजस्यवादी, सलोख्याचे धोरण बिस्मार्कने आखले आणि अमलात आणले. ह्या मिळालेल्या १७ वर्षांच्या काळात त्याने जर्मनीच्या अंतर्गत बाबीत काय केले त्याचा उल्लेख वर आलेलाच आहे.एका अर्थी आर्थर बाल्फोर ह्याने म्हटल्या प्रमाणे बिस्मार्क खरोखर जर्मनीचा नव्हे तर अख्ख्या युरोपचा पंतप्रधान होता.पण १८८८ साली गादिवर आलेल्या कैसरने ह्या सगळ्या व्यवस्थेला सुरुंग लावायला सुरुवात केली.
एकंदरीत बिस्मार्क हे मोठे गुंतागुंतीचे रसायन होते. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे त्याने आरोग्य विमा. अपघात विमा आणि कामगाराना पेन्शन अशासारख्या कल्याणकारी योजना आणल्या पण मुख्यत्वे करून त्या समाजवादी गटांना मिळणारा पाठींबा कमी करायला वापरल्या. कामगार संघटनांवर बंदी घातली पण कामगारांचा मतदानाचा अधिकार शाबूत ठेवला.अशा प्रकारे राजेशाही आणि पुरातन समाज व्यवस्था समाजवादी, लोकशाहीवादी गटाना थोड्याफार सवलती देऊन किंवा त्यांच्या मागण्या अंशत: मान्य करून आपण टिकवू शकतो असे त्याला वाटले. एक प्रकारे उदारमतवादी राजेशाही किंवा सामंतशाही म्हणाना! अर्थात ती चूक होती.आंतरारष्ट्रीय राजकारणात जर्मनीचे हितसंबंध जपताना त्याने ज्या राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले त्या रशिया इटली ऑस्ट्रिया सारख्याना ना कमजोर किंवा मागास कसे ठेवता येईल हे पहिले. ह्याचा दोष त्याला द्यायचा कि श्रेय हे आज ठरवणे मोठे कठीण काम आहे पण एका गोष्टीचा दोष त्याला नक्की देता येईल कि त्याच्या कडे व्यापक दूरदृष्टी होती आणि तरीही आपण गेल्यानंतर आपले धोरण शिताफीने चालवू शकेल असा कुणी उत्तराधिकाकारी तो तयार करू शकला नाही. बिस्मारक नसलेल्या जर्मनीचे युरोपात काय होणार होते ह्याचा त्याला अंदाज आला होता पण त्याने काही केले नाहे किंवा करू शकला नाही. कदाचित हे जाणवले तेव्हा फार उशीर झाला असावा.
आता वाचून ऐकून आश्चर्य वाटेल पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी इतका प्रभावी बनला होता कि जर्मन्मय युरोप ही संकल्पना इतर युरोपीय राष्ट्रात पसरू लागली होती. आणि जर्मन्मय म्हणजे पुढे बळाच्या जोरावर हिटलरने जवळपास संपूर्णपणे पादाक्रांत करून मांडलिक बनवलेला युरोप नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जर्मन प्रभावाखाली असलेला युरोप. फ्रेडरिक न्यूमन ह्याचे ‘मिटलयुरोपा’ हे पुस्तक वाचले तर समजून येते कि आज आपण जी युरोपियन युनियन पाहत आहोत त्याची रुपरेषा त्याने त्यात तपशीलवार मांडली आहे आणि आश्चर्य म्हणजे त्यात इंग्लंडला स्थान नव्हते आणि आता हल्लीच इंग्लंड युरोपियन युनियन मधून बाहेर पडतोय.( brexit), असो... पण तेव्हा हि संकल्पना काही फलद्रूप झाली नाही कदाचित काळाच्या खूप पुढे असल्याने असेल.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
बिस्मार्कने मोठ्या हिकमतीने १८७१सालि सर्व जर्मन भाषकांचे एकसंघ जर्मन राष्ट्र निर्माण केल्यावर, (अर्थात ऑस्ट्रिया हंगेरीला बाहेर ठेवून) अल्पावधीतच हा जर्मनी समृद्ध, संपन्न प्रचंड प्रबळ आणि मग साहजिकच महत्वाकांक्षी बनला. राष्ट्रवादाचे वारे शिडात भरलेले त्याचे जहाज अगदी सुसाट निघाले पण त्याला पाय उतार व्हायला हक्काची बाजारपेठ कुठे होती.
ह्या नव्याने स्थापित झालेल्या जर्मन राष्ट्राला सुरुवातीला तरी इंग्लंडचा पाठींबा होता. युरोपात सत्तेचा समतोल राहायचा असेल तर रशिया आणि फ्रांस ह्या तुल्यबळ सत्तांच्या मध्ये एक, दोघानाही टक्कर देऊ शकेल असे ( आणि एव्हढेच- ते महत्वाचे) सामर्थ्यवान जर्मनसंघराज्य असेल तर ते इंग्लंडला हवे होतेच. १८३० पर्यंत जर्मन संघराज्य अजुंनही ओद्योगिक क्षेत्रात मागेच होते पण हळू हळू फरक पडू लागला होता.१८७१ नंतर प्रशिया, साक्सनी, ओस्टररिश अशा जर्मन घटक राज्यांनी भूसुधार कायदे केले, जमीन शेतकऱ्यांसाठी मोकळी केली. फ्रांस आणि अमेरिकेतल्या तज्ञांच्या मदतीने पिक पद्धतीत सुधारणा करून कृषी क्रांती घडवली. आता शेतावर कमी माणसात भरपूर उत्पन्न होऊ लागल्याने, उद्योग क्षेत्रात काम करायला मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले. १८व्या शतकाची अखेर येई पर्यंत उद्योग, कला, शिक्षण, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात जर्मन लोक आघाडीवर येऊ लागले होते. अल्पावधीतच हे नवीनच जन्माला आलेले जर्मन राष्ट्र भरभराटीला आले. व्यापार आर्थिक सामाजिक सांस्कृतिक, कला सर्व क्षेत्रात त्याने घेतलेली झेप नेत्रदीपक होती इतकी कि थोड्याच काळात जर्मनी, त्याची राजधानी बर्लिन ही युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली. कुणालाही काहीही गंभीर, मूलगामी संशोधन करायचे असेल अध्ययन करायचे असेल तर त्याची पावले बर्लिन च्या विद्यालयाकडे वळू लागली. उद्योग धंद्यात – औद्योगिक उत्पादनात तर जर्मनी लवकरच इंग्लंडला टक्कर देऊ लागला.
मात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी त्यातून १८१५ आणि नंतर १८७० साली फ्रान्सचा पराभव करून तसेच यांचे आल्सेल आणि लोरेन हे प्रांत जिंकूनच तर जर्मनीचा जन्म झालेला होता पण वर सांगितल्याप्रमाणे फ्रांस काही अगदी पुचाट राष्ट्र नव्हते उलट इंग्लंड नंतर युरोपात तेच सगळ्यात जास्त वसाहती असलेले साम्राज्यवादी राष्ट्र होते . इंग्लंड म्हटले तर युरोपियन म्हटले तर युरोप बाहेरचे राष्ट्र पण त्याना युरोपातल्या सत्ता संघर्षात फारसा रस नव्हता फक्त युरोपातील कोणतीही शक्ती त्यांच्या साम्राज्याला , आरमाराला आणि सामूद्री व्यापारावरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतकी प्रबळ होत नाहीना हे फक्त ते पाहत.
थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे तर इंग्लंड हे जरी युरोपीय राष्ट्र असले तरी ते भौगोलिकदृष्ट्या मुख्य युरोपीय भूमी पासून जसे तुटून आहे तसेच मानसिकरीत्याही... ते युरोपच्या मुख्य भूमीतल्या सत्तास्पर्धेपासून गेली अनेक शतके दूरच होते(व आहे). पण आंतराष्ट्रीय राजकारणातली त्यांची भूमिका ,त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जगभर पसरलेले साम्राज्य बिनबोभाट सांभाळणे आणि त्याकरता व्यापार व समुद्री संचारावर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व कायम ठेवणे.गेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते कि इंग्लंड ने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एक होऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे.त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यानी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला. ह्यात त्याना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले.बाकी न्याय, लोकशाही, दमनाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढा, मानवतेचा कैवार ह्या फक्त बाता. आजही युरोपियन युनियन मध्ये राहायचे कि बाहेर जायचे ह्याचे निर्णय इंग्लंड ह्याच सूत्राने घेते. खेळ्या बदलल्या तरी तत्व अपरीवर्तनियच आहे-गेली किमान ५०० वर्षे
असो तर परत जर्मनी कडे – मागे सांगितल्या प्रमाणे ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९०व्या वर्षीजर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. खरेतर फ्रेडरिक तिसरा हा एक समंजस माणूस होता आणि युद्ध, त्याचे भयावह दुष्परिणाम, राष्ट्रवादाचा अगदी उगम ते हिंसक राष्ट्रवादापर्यंतची उत्क्रांती ह्याचा तो साक्षीदार होता. त्याला काही काळ अगदी १०-१२ वर्षे राज्य करायला मिळाली असती तर युरोपचा आणि जर्मनीचा इतिहास वेगळा असता पण जर तर च्या गोष्टीना इतिहासात अर्थ नसतो म्हणून हे स्वप्न रंजन बाजूला ठेवून आपण परत १८८८ मधल्या जर्मनी कडे येऊ
कैसर विल्हेल्म दुसरा
हे पहिल्या महायुद्धातले कदाचित सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल आणि तो एक पात्रच होते म्हणाना.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
कैसर विल्हेल्म दुसरा – विकलांग आणि काहीसा छोटाच राहिलेला डावा हात झाकून घेत – ह्याचे बहुतेक सगळे फोटो तसेच आहेत
विल्हेल्म दुसरा ही व्यक्तिरेखा आपल्याला इतिहासात कैसर विल्हेल्म दुसरा म्हणून माहितीं आहे.हा जर्मनीचा शेवटचा कैसर. ह्याचा जन्म झाला २७ जाने१८५९ रोजी. वडील होते फ्रेडरिक तिसरा तर आई विक्टोरिया. तिला विकी म्हणत आणि ती इंग्लंडची सुप्रसिद्ध राणी विक्टोरिया हिची थोरली मुलगी तसेच तिचे वडील म्हणजे राणी विक्टोरियाचे पती होते जर्मन भाषक छोटे राज्य साक्स-कोबर्ग-साल्फिल्ड ह्या जर्मन राज्याचा प्रिन्स अल्बर्ट. आहे कि नाही गम्मत! तर हा कैसर विल्हेल्म दुसरा पायाळू म्हणून जन्मला आणि जन्म होताना डॉक्टरच्या चुकीमुळे ह्या विल्हेल्मचा डावा हात कायमचा जायबंदी झाला.
आई विक्टोरिया(विकी) करता हा मोठा धक्का होता. जर्मन राष्ट्राचा भावी सम्राट आणि डाव्या हाताने अधू! ही कल्पना त्या कर्मठ स्त्रीला सहन झाली नाही. त्यामुळे लहानपणापासून विल्हेल्मवर आधी अनेक प्रकारचे औषधउपचार- ज्यातले अनेक क्रूर वेदनादायी आणि तरी परिणामशून्य होते आणि मग नंतर व्यंगावर मात करण्याकरता कडक शिस्तीतले प्रशिक्षण ह्यांचा मारा केला गेला. त्यातून इंग्लंडच्या राणीचा पहिलाच नातू असल्याने आणि त्यात असा अपंग असल्याने आजीने मग त्याचे अती लाड केले लहान वयाच्या विल्हेल्म करता हे सगळे फार जास्त झाले आणि त्याचा स्वभाव हेकट, शीघ्रकोपी, दुसर्यांचे न ऐकणारा असा झाला. आईच्या अतीशिस्तीमुळे असेल किंवा जन्माच्या वेळी त्याचा हात ज्याच्या चुकीने दुखावला गेला तो डॉक्टर इंग्लिश असल्यामुळे असेल पण विल्हेल्म तरुणपणी इंग्लिश द्वेष्टा बनला. असे सांगतात कि एकदा शिकार करताना त्याला जखम होऊन रक्त वाहू लागले जे लवकर थांबेचना तर तो म्हणाला कि जाऊदे वाहून जितके जायचे तितके, हे घाणेरडे इंग्लिश रक्त.
युरोपच्या रंगमंचावर ह्या कैसर विल्हेल्म नंबर २ चे आगमनत झाल्यानंतरच्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या महत्वाच्या काही घडामोडी आपण पाहू पुढच्या भागात.
क्रमश:
आदित्य

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. 11 नोव्हेंबर 1918 रोजी पहिले महायुद्ध संपले. अजूनही फ्रान्समधल्या 11 वार्षिक सार्वजनिक सुट्यांच्या यादीत ही तारीख असते. हे मात्र विशेषतः दुसरं महायुद्धही घडल्यानंतर अप्रस्तुत वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख.

(म्हणूनच तक्रार. प्रमाणलेखनाच्या साध्या चुका टाळत्या आल्या आणि दोन परिच्छेदांमध्ये मोकळी ओळ सोडली तर वाचन खूप सोपं होतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्कंठावर्धक लेखन. फक्त लेखामध्ये जर्मनीची बिस्मार्क च्या काळातील भरभराटीचे वर्णन सलग आहे असते तर ही दुरूक्ती टाळली गेली असती. आणि लेख आणखी सलग झाला असता.

मागे सांगितल्या प्रमाणे ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९०व्या वर्षीजर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला.

दोन परिच्छेदांमध्ये मोकळया ओळींबाबत आदितीशी सहमत. त्यामुळे काही वाक्ये ही भागांची शिर्षक आहेत हे जरा वेळाने समजते.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते कि इंग्लंड ने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एक होऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे.त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यानी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला. ह्यात त्याना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !