ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं फलित !

तीन दिवसात देशी/विदेशी तीस चित्रपट +लघुपटांची भरगच्च मेजवानी घेऊन आलेला,नागपुरातला पहिला ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच उत्साहात साजरा झाला.मानवी मर्यादांमुळे एका दिवसात कमाल चार चित्रपट पाहणंं शक्य होतं.गाजलेले वर्ल्ड सिनेमे एकाच वेळी 3 ठिकाणी दाखवणार असल्याने निवड करणं कठीण होतं.फेस्टिव्हलचं वेळापत्रक अभ्यासून आणि सिनेगुरुजींचे सल्ले घेऊन दोन दिवस पीव्हीआर आणि शेवटचा दिवस पर्सिस्टंटच्या सभागृहात दाखवले जाणारे असे एकूण १२ चित्रपट बघण्याचं नक्की केलं. प्रत्यक्षात स्क्रीनिंग करताना आलेल्या तांत्रिक अडचणी,मेंदू तरतरीत रहावा यासाठी चहा किंवा खाण्याचा वाजवी पर्याय उपलब्ध नसणे किंवा त्यासाठी वेळच नसणे अशा क्षुल्लक कारणांमुळे १० चित्रपट आणि एक लघुपट + चर्चा अशी कसरत साध्य केली. दिवसभर पीव्हीआरमध्येच मुक्कामाला असल्याने आम्हाला खाद्यपदार्थ नेण्याची मुभा असती तर वेळ वाचला असता शिवाय जंक फूडचा सहारा घ्यावा लागला नसता.

पीव्हीआरच्या 3 नंबर स्क्रीनवर पहिल्या दोन दिवसात बहुतेक सगळे सिनेमे बघितल्याने पाच नंबर स्क्रीनवर एक सिनेमा बघायचा आहे याचा विसर पडला.शेवटच्या चित्रपटाआधी, पोटातल्या निष्पाप कावळ्यांचा भूकबळी पडू लागल्याने जंक फूड स्वाहाकारून उशिरानेच स्टुडंट कॉम्पिटीशन लघुपट बघायला आलो, तर थेटरातली गर्दी पाहून नवल वाटलं आणि संशयाची पाल चुकचुकू लागली. मराठी लघुपट सुरु असावा म्हणून बघत बसलो.लघुपट कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखा संपेचना म्हणून वेळापत्रक काढून बघितलं तर तिथे 'चिठ्ठी' नावाचा मराठी चित्रपट सुरु होता.बघायचं ठरवलेले लघुपट शेजारच्या स्क्रीनवर होते पण अंगात प्राण आणि त्राण नसल्यानं तिथेच उरलेला चित्रपट पाहून आम्ही मैत्रिणी एकमेकींची नजर चुकवत मुकाट्याने घरी परतलो.पर्सिस्टंटमधल्या स्क्रीनवर चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सतत तांत्रिक संकट येत असल्याने तो मधला कितीही काळ वगळून पुन्हा दिसू लागे. त्यामुळे नायिका प्रेग्नन्ट होते की नाही हा सस्पेन्स कायम राहिल्याचे आमच्या स्नेह्यांकडून कळले.

महोत्सवात बघितलेल्या पहिल्या जर्मन चित्रपट 'गुडबाय बर्लिन' मध्ये भावनिक दुर्लक्ष झालेला माईक आणि अनाथ निर्वासित मुलगा त्शिक या दोघांची, कार चोरून केलेल्या धमाल प्रवासाची प्रेडीक्टेबल कथा आहे.मुलांची कामे अफलातून आहेत.चित्रपटाची फोटोग्राफी नेत्रसुखद आहे.' दारुड्या आईपेक्षाही दुःखदायक गोष्टी जगात आहेत' असे म्हणणारा माईक आपल्या आईला सांभाळून घेतो. आई घरी दिसली नाही तर तिला शोधून सायकलवर डबलसीट बसवून घरी घेऊन येतो.

'लेथ जोशी' हा पुण्याच्या फेस्टिव्हलमध्ये गाजलेला बहुचर्चित मराठी चित्रपट अतिशय आवडला. लेथ मशीन शिवाय दुसरं आयुष्यच नसलेले जोशी, पस्तीस वर्षांची नोकरी गेल्यावर,झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने भांबावून जातात. त्यांची बायको केटरिंगचा व्यवसाय सांभाळत आपल्या मुलाशी आणि बदलत्या काळाशी सहज जुळवून घेते.जोशी मात्र काळातच अडकून पडतात. चित्रपटातलं आजीचं पात्र एकदम झकास आहे.

बल्गेरियन सिनेमा 'गॉडलेस' मधली नायिका गाना ही भावनारहित, दगडी चेहेऱ्याची तरुण फ़िजिओथेरपिस्ट आहे.म्हाताऱ्या पेशंटवर उपचार करत तुटपुंज्या मिळकतीवर एका बर्फाळ गावात ती रहात असते. असहाय्य पेशंटचे आयडेंटिटी कार्ड चोरून ते विकून ती आणखी थोडे पैसे मिळवते.प्रेमहीन,भावनाहीन आयुष्य जगत असताना तिला योहान नावाच्या,चर्च संगीत शिकवणाऱ्या म्हाताऱ्या पेशंट बद्दल प्रथमच सहानुभूती वाटते. संगीतामुळे तिच्या वैराण आयुष्यात किंचित कोवळा आणि आध्यात्मिक बदल होऊ लागतो. तिच्या दगडी चेहऱ्यावर कोमल भाव उमलताना दिसतात तेंव्हा नायिकेच्या अद्वितीय अभिनयाची प्रचीती येते.सिनेमा समजायला कठीण होता.मला शेवट कळला नाही.

'लाइनर्स, द सिम्पल लाईन ऑफ थिंग्स' हा अर्जेन्टिनाच्या व्यंगचित्रकारावर केलेला माहितीपट बघितला. जास्त तपशीलात माहिती देण्याच्या ओघात शब्दबंबाळ झाल्याने सबटायटल्स वाचताना थकले.व्यंगचित्रं व्यवस्थित बघणं शक्य झालं नाही.इतकी सबटायटल्स देण्यापेक्षा इंग्लिशमध्ये डब केला असता तर जास्त सोयीचं आणि आनंदाचं झालं असतं असं वाटलं.

'विला ६९' या इजिप्शियन चित्रपटात हुसेन नावाच्या वयस्कर,आकर्षक, तिरसट आणि आजारी आर्किटेक्टची मजेशीर कथा आहे. एकांतात,आपल्याच मस्तीत जगत,रुहानी संगीताचा आनंद लुटत आणि नाईलाजाने औषधं घेत असताना हुसेनची बहिण नातवासह रहायला येऊन त्याला डिस्टर्ब करून टाकते.त्याला भेटायला येणारी तरुण प्रेयसी ,नर्स आणि वाद्यसंगीतवाली मंडळी यांच्याशी असलेले त्याचे नाते आणि अफलातून संवाद धमाल विनोदी आहेत.

मातीमधली कुस्ती हा प्रथमच फिल्मफेअर लघुपट पुरस्कार मिळालेला, प्रांतिक देशमुख या मूळ यवतमाळच्या तरुणाचा लघुपट बघितला. त्यानंतर प्रांतिक देशमुख याच्याशी प्रा.विश्राम ढोले आणि प्रा.समर नखाते यांनी उदबोधक चर्चा केली.

'लॉस्ट इन म्युनिख' या झेक चित्रपटात, म्युनिख मिटिंगमध्ये हिटलर आणि चेम्बरलेन सोबत ददलीयर यांचा चार्ली नावाचा पोपट उपस्थित असतो.या अजूनही जिवंत असलेल्या ९० वर्षांच्या पोपटाला घेऊन झेक पत्रकार पळून जातो असं मजेशीर कथानक आहे. ही कथा खरी आहे कि या कथेचा फ्रांस -झेक चित्रपट करताना किती अडचणी आल्या हे खरं आहे असा प्रश्न पडतो. हा अॅब्सर्ड चित्रपट मला आवडला.

'द लँड ऑफ द एनलायटंड' हा युद्धाने पोळलेल्या अफगाणिस्तानातला, माहितीपटाच्या शैलीने केलेला किंचित काल्पनिक चित्रपट आहे.पॉपीच्या फुलांची मोहक शेती,उत्तुंग हिरवेगार पर्वत आणि लापीस लाझुली या निळ्या प्रेशस स्टोनच्या खाणी यांचे अप्रतिम छायाचित्रण आहे.अमेरिकन सैनिकांचा गोळीबार, लँडमाईन्स अशा दैनंदिन संकटांशी सामना करणाऱ्या सामान्य नागरिकाचे खडतर आयुष्य पाहून अपार दुःख होतं.

लेडी ऑफ द लेक हा मणिपुरी चित्रपट आधुनिक विकासाच्या तडाख्यात मानवी अस्तित्व कसे धोक्यात येते आहे हे कमीत कमी संवादातून दाखवतो. विशाल तलाव,नावेतला प्रवास,स्थानिक कोळ्यांचं दैनंदिन जीवन यांचे अतिशय परिणामकारक ,सुरेख छायाचित्रण केलं आहे.
डेप्थ २ या अगदी डिप्रेसिंग ,उदास सर्बियन चित्रपटाने या महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल समस्त आयोजकांना हार्दिक धन्यवाद.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अभिप्रायाबद्दल आभार.

'गॉडलेस'

>> सिनेमा समजायला कठीण होता.मला शेवट कळला नाही. <<

(ज्यांना चित्रपट पाहायची इच्छा आहे त्यांचा रसभंग होऊ नये इतपत काळजी घेऊन दिलेला प्रतिसाद) चित्रपट सुरू होतो तेव्हा एका ज्येष्ठ नागरिकाला विशिष्ट ठिकाणी सोडून काही लोक परतताना दाखवले आहेत. त्याच्याशी अखेरच्या प्रतिमांची तुलना केलीत तर काही साम्यस्थळं आढळतील. त्यामुळे दोन्ही प्रसंगांतल्या व्यक्तींची परिणती एकाच दिशेनं होते असं समजायला वाव आहे.

लिनिएर्स (स्पॅनिश येत असेल तर चित्रपट इथे पाहता येईल.)
सबटायटलिंग संदर्भात प्रयत्नांची पराकाष्ठा होण्याचं इथे आणखी एक कारण होतं. व्यंगचित्रकारही बोलत होता आणि त्याची जी चित्रं दाखवली जात होती त्यांतही संवाद किंवा शीर्षकं होती. दोन्हींची सबटायटल्स येत होती आणि दोन्ही - चित्रकार आणि चित्रविषय - गमतीशीर होते. ह्यावर उपाय म्हणून गोदार नावाच्या फ्रेंच दिग्दर्शकाचे चित्रपट पाहा असा सल्ला देईन. त्यांत पात्रं खूप बोलतात. त्यामुळे झरझर सबटायटल्स वाचण्याचा सराव होईल आणि पुढच्या ऑरेंज सिटी फेस्टिव्हलपर्यंत सखुबाई रेडी झाल्या असतील Wink

व्यंगचित्रकाराबद्दल अधिक माहिती -
'न्यू यॉर्क टाइम्स'मधून लेख
व्यंगचित्रकाराची मुलाखत आणि सोबत काही चित्रं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शेवट असा असू शकेल असे वाटले होते . पण स्कीईंग करणारा मनुष्य बेपत्ता होणे हे अधून मधून दिसत असल्याने गोंधळ झाला.

<स्पॅनिश येत असेल तर> जंतू गुर्जी ही सुचना माझ्यासाठी नसेल अशी आशा आहे ,कारण इतके कष्ट कोण करेल प्रभो ?

< झरझर सबटायटल्स वाचण्याचा सराव> या साठी सोपा पर्याय आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'व्हिला ६९' यूट्यूबवर सापडला; सबटायटल्ससकट. लवकरच बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा! छान शोधलस अदिती. मीही पहाणारे या वीकेंडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारुड्या आईपेक्षाही दुःखदायक गोष्टी जगात आहेत' असे म्हणणारा माईक आपल्या आईला सांभाळून घेतो. आई घरी दिसली नाही तर तिला शोधून सायकलवर डबलसीट बसवून घरी घेऊन येतो.

बाप रे!!! Sad तो सिनेमा पहावासा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0