पुस्तक वाचन आणि मी

संकल्पनाविषयक

पुस्तक वाचन आणि मी

लेखक - शशिकांत सावंत

मला वाचनाची आवड कधी लागली ते सांगणे अवघड आहे. पण अगदी पहिलीत असताना मी रोज सिनेमाच्या गाण्यांचे पुस्तक म्हणजे एका सिनेमाची आठ पानांवर छापलेली गाणी या प्रकारचे आणि देवादिकांचा फोटो या गोष्टी खरेदी करायचो. पाच पैशांत हे काम व्हायचे. मग रस्त्याने गाणी वाचत जायचो. खेरवाडी म्युनिसिपल शाळा क्र. ६ मध्ये.

पुस्तकांशी माझे नाते कसे आहे; खरेच अशा प्रश्नांचे उत्तर काहीश्या दोनेक हजार शब्दांत देता येईल का? तसे पुस्तकांच्या पलीकडे फारसे आयुष्य आता तरी उरले नाही. एक काळ असा होता की मी अनेक गोष्टी करत असे, प्रवास, हे-ते. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पुस्तकेच; म्हणजे बहुतेकवेळा सकाळी उठून चहा प्यायला मी हॉटेलमध्ये जातो, ते पुस्तक घेऊन. थोडेसे पेपर चाळून एक-दीड तास पुस्तक वाचतो. मग ऑफिसमध्येसुद्धा पुस्तकाच्या अनुषंगाने कुठलातरी लेख लिहिण्यासाठी ते वाचणे किंवा ते घेऊन फिरायला जाणे. पेन्सिल घेऊन ऑफिसात येऊन मग डिक्टेशन करणे. परत गंमत म्हणून एखादे मनोरंजक पुस्तक वाचणे. परत मग संध्याकाळी पुस्तके, रात्री घरी आल्यावर पुस्तक. आता गेले तीन-चार दिवस वीज गेलेली आहे. त्यामुळे जिन्यात बसून दोनेक तास वाचायचे. त्यामुळे दिवसभरात पुस्तके नाहीत असे होत नाही. ऑफिसमध्ये नऊ आणि घरात साधारणपणे तेरा-चौदा रॅक आहेत. जवळ जवळ दहा-अकरा हजार पुस्तके. म्हणजे ऑफिसात झोपायचे तर डोक्यावर खुर्ची ठेवावी लागते. कारण हार्डबाऊंड पुस्तके वर ठेवली आहेत, ती कवटीवर पडली तर ज्या मेंदूपर्यंत पोचण्यासाठी ती घेतली आहेत त्याला भौतिक स्पर्शच व्हायचा.

पुस्तकाचा भौतिक स्पर्श ही खरेच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझी जी आवडती पुस्तके आहेत, पुन्हा पुन्हा वाचायची, मग ते विनोबांचे 'गीता प्रवचन' असेल किंवा गॅरी लार्सनची कार्टूनची पुस्तके असतील; '१,२,३... अनंत'सारखी पुस्तके असतील, वुडहाऊसच्या कादंबऱ्या असतील किंवा मलीनर कथा असतील किंवा जॉन चीव्हरचे पुस्तक असेल, या साऱ्यांमध्ये जी पुस्तके मी अनेक काळ हाताळत आलो तीच मला वाचता येतात. म्हणजे जॉन चीव्हरची नवीन प्रत मिळत होती पण ती पाहून मला असे वाटले की ती मी वाचू शकणार नाही. कमवायला लागलो तेव्हा सुरुवातीला घेतलेल्या थोड्याथोडक्या पुस्तकांत जॉन चीव्हरचे पुस्तक घेतले होते; लाल रंगाचे पाठीमागे त्याचे चित्र, तो विशिष्ट टाईप. नंतर मग मला बंगळुरुला हार्डबाऊंड पुस्तक मिळाले. वाचण्यासाठीचे पुस्तक हेच. अलीकडे त्याची एक प्रत मी आशुतोष गोवारीकरला दिली आणि म्हटले, “आता माझ्याकडे केवळ फाटलेली एक प्रत उरली आहे.” किंवा गीता प्रवचनाची नवीन ऑफसेट प्रत मिळाली आहे; ती मी अर्थात वाचतो, पण मला ती जुनी प्रतच आवडते. पाने पिवळी पडलेली. किंवा रिचर्ड फाईनमनचे पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेले छायाचित्र असलेले मुखपृष्ठ असलेले पुस्तक वाचायला आवडते. मध्यंतरी दुसरी प्रत निघाली; ती मी विकत घेतली, पण ती मला वाचवेना. त्यामुळे ती मी विकली. तर मला असे वाटते की पुस्तकांचे भौतिक स्वरूप महत्त्वाचे असते.

पुस्तकांशिवाय इतर गोष्टींना जीवनात थाराही उरत नाही, म्हणजे जसे ड्रिंकिंग वगैरे गोष्टी आवडतात, सिनेमा पाहणे अर्थात आवडते, पण तरीही सर्वोच्च जर काही आनंद किंवा समाधान असेल तर तेतो पुस्तकात वसलेले आहे असे वाटते. लहानपणी पहिले वाचलेले मोठे पुस्तक म्हणजे पांडवप्रताप. शेजारच्या नारंगरेकरांकडे दीर्घ रामायण होते. त्याच्या आधी रामायण कथास्वरूपात माहीत होते. असे झाले की, मी बालवाडीतच सगळे वाचायला लागलो. (ह्याविषयी मी आधी लिहिलेले आहे.) पण डांगे यांचा संप सुरू झाल्यामुळे कधीतरी १९७२-७३ साली सगळे कामगार घरी बसले होते आणि सगळे अशिक्षित होते. त्यामुळे वर्तमानपत्रातील बातम्या आणि अग्रलेख वाचून दाखवण्याचे काम माझे असायचे. आणि अक्षरशः, तीस-चाळीस वर्षांची माणसे माझ्यासारख्या सात-आठ वर्षांच्या मुलासाठी खोळंबून असायची, की कधी हा येतो आणि पेपर वाचतो. त्यामुळेच कदाचित वाचनाच्या पुस्तकबाह्य ताकदीची मला जाणीव झाली.

आणखी एक म्हणजे एखाद्या चित्रपटात एखाद्या पुस्तकाचा जर उल्लेख आला तर मी ते कधी एकदा मिळवतो असे होते. एखाद्या लेखात किंवा एखाद्याने बोलता बोलता एखाद्या पुस्तकाचा उल्लेख जरी केला, तरी ते कधी सापडते असे मला होते. पुस्तकाचा टाईप, त्याचा कागद, त्याचे मुखपृष्ठ किंवा ज्याने हे केले आहे त्यानेच ते केले आहे का, हे ओळखण्याचा खेळ फारच सुंदर असे. इंग्रजी पुस्तकांकडे ओढले जाण्याचे कारण म्हणजे त्याची मुखपृष्ठे. भाऊ चित्रकार होता आणि घरात चित्रांची पुस्तके होती. म्हणजे माझ्या चित्रकलेच्या बाईंना 'मास्टरपिसेस ऑफ द वर्ल्ड' हे रीडर्स डायजेस्टचे पुस्तक मी दिले. घरी पॉल क्लीची पुस्तके होती. एक जाणीव व्हायची ती अशी, की मराठी पुस्तकांची आणि इंग्रजी पुस्तकांची मुखपृष्ठे यांत पहिले वेगळेपण जाणवायचे : म्हणजे इंग्रजी पुस्तकांवर लेखकांचे नाव मोठ्या अक्षरात असायचे, उलट मराठीत पुस्तकाचे नाव मोठे. मी खारला जिथे राहायचो तिथून दोनेक आठवड्यातून एक राऊंड तिथल्या चर्चमध्ये व्हायची. जिथे सगळी लग्ने लागत तिथे बाहेर एक माणूस पुस्तकांचे दुकान लावत असे, आणि मी टकाटका त्यांची पुस्तके पाहत बसे.

भाऊ नॅशनल लायब्ररीतून पुस्तके आणायचा. त्यातली कितीतरी मुखपृष्ठे आज आठवतात. विशेषतः जेम्स हॅडली चेस आणि अॅगाथा ख्रिस्तीची. एक दिवस काय कसे माहीत नाही पण भाऊ अनेक पुस्तकांची कव्हरे घेऊन आला. बहुतेक ती लायब्ररीत काढली जायची आणि बाइंडिंग केले जायचे म्हणून असेल, आणि त्याला स्वतःला दोन मुखपृष्ठे करण्याचे काम आले असेल. अनेक दिवस ते चालले. भावाने आवडीने केलेल्या मुखपृष्ठांच्या कादंबऱ्या मी वाचल्या. काही थोर नव्हत्या, पण लेखन-प्रकाशनाशी पहिल्यांदा आलेला थेट संबंध तोच. दोन्ही पुस्तके स्वस्तात छापायची होती; त्यामुळे मुखपृष्ठे निळ्या आणि पांढऱ्या अशा दोनच रंगात छापलेली होती एवढेच. अर्थात सर्वांप्रमाणे माझी वाचनाची सुरुवात लहानपणी झाली शाळेत असतानाच. 'मृत्युंजय' हे आकाराने सर्वात मोठे पुस्तक, ते मी पाचवीत असताना वाचले. माझा भाऊ आणि मी ते एकाच वेळी वाचत होतो. पुस्तकाच्या चिंध्या झाल्या होत्या. त्यामुळे पोथीसारखे घेऊन आम्ही एकाच वेळी वाचत होतो. तो सातवीत होता, मी पाचवीत होतो.

कुठेही गेले तरी पुस्तके शोधायचा तेव्हा छंद होता. बाबुराव अर्नाळकर मिळतील तेवढे सगळे वाचून काढले नंतर मग पु.ल. पहिल्यांदा हे वाचले तेव्हा खूपच लहान होतो. हे काय चाललेय - म्हणजे विनोद नावाची गोष्ट कळत नव्हती. मग फडणीसांच्या चित्रांनी भुरळ घातली होती. मग पु.ल., रमेश मंत्री, व.पु.काळे, अगदी जी.ए.देखील अगदी. गंगाधर गाडगीळ : लोकसत्तामध्ये त्यावेळी गंगाधर गाडगीळात्यांची येणारी 'चंदू'सारखी मालिका अधाश्यासारखा वाचायचो. काँग्रेस आणि शिवसेनेची भरपूर कार्यालये होती तिथे भरपूर पुस्तके यायची. तिथे सगळ्यात आधी जाऊन वाचायचे. त्यासाठी भरपूर रांगा असायच्या. मग आम्ही घरी पेपर आणू लागलो.

आमच्या बीपीएम शाळेमध्ये शाळेचे स्वतःचे असे मोठे आणि फार सुंदर वाचनालय होते. मकरंद देशपांडेची आई तिथे होती. अगदी छतापर्यंत कपाटे भिडलेली होती. 'आपली सृष्टी - आपले धन'चे खंड लायब्ररीत होते. मला आठवतेय, लठ्ठ मराठी शब्दकोश मी इथेच पाहिले. त्या काळात वर्गातल्या बऱ्याच मुलांकडे फॅन्टम कॉमिक्स असे. घरी जाताना कमलाबाई निमकर वाचनालय लागायचे. त्यात मोफत भरपूर कॉमिक्स वाचायला मिळत आणि किशोरचे अंकही. वर्गात पहिला येणारा यतीन भगत आणि दुसरा येणारा अभय अवचट यांनी छोटे नाटुकले लिहिले होते, मला आठवते. अजय गद्रे या मित्राकडे पुस्तकांचा प्रचंड साठा होता. सोव्हिएत देशातून तेव्हा जी पुस्तके येत त्यात डेनिसच्या गोष्टी व इतर साहस कथा होत्या. शिवाय अनेक अनुवादित पुस्तके, डॉन किहोते, डेव्हिड कॉपरफील्ड किंवा फ्रँक वोरेलसारख्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र, जॉर्ज गॅमॉचे '१, २, ३ … अनंत'. अशी बरीच पुस्तके त्यात होती. घरी आणि शेजारीपाजारी एक-दोन पुस्तके तरी असत. कित्येक घरांत जाऊन मी ती वाचायचो. लहान मुलांना तेव्हा कुठल्याच घरात अटकाव नसे. बऱ्याच कमी वयात मी चंद्रकांत काकोडकरांच्या कांदबऱ्या वाचल्या. त्या कळल्या मात्र नंतरच. पण राजाराम राजे नावाच्या त्यांच्या गुप्तहेरांच्या कथा छान असत.

जेम्स बाँडच्या कादंबऱ्या चक्क २५ पैशांत मिळत. बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके तसेच 'गरुड' कथा, 'फलंदाज' कथा अशी पॉकेटबुक्स तेव्हा भरपूर मिळत. शेजारच्या चाळीतील राणेंनी लायब्ररी लावली होती. ते पुस्तक आणायला मला पाठवत. पुस्तक आणताआणता मी ते वाचून काढी. 'झुंजार', 'काळा पहाड' यांच्या कितीतरी कादंबऱ्या मी वाचल्या. 'झुंजार'ची एक कादंबरी दोन भागांत होती. 'सायप्रसचे युद्ध' असे त्याचे नाव होते. मला एकच भाग मिळाला. मी खूप वर्षे दुसरा भाग शोधत होतो.

भाऊ नॅशनल लायब्ररीतून पुस्तके आणत असे. एक पुस्तक आणि एक मासिक अशी पद्धत होती. 'मोहिनी', 'नवल' ही माझी आवडती मासिके होती. वुडहाऊसच्या कथांचे अनुवाद मी पहिल्यांदा 'मोहिनी'त वाचले. त्या मासिकांचा तो विशिष्ट कागद, आतली चित्रे हे सारे माझ्या मनावर अजब गारूड करीत असे. अभ्यास सोडून पुस्तके वाचलेली भावाला आवडत नसे. त्यामुळे कॉटवर कोपऱ्यात पुस्तक धरून मी वाचत असे. त्याच्या पावलांचा आवाज आल्यावर मी ते खाचेतून टाकून देत असे.

माझे वडील पूर्वी मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीतल्या अनेक जवानांप्रमाणे त्यांनी प्रभादेवीच्या स्टँडर्ड मिलमध्ये वॉचमनची नोकरी पकडली. खाऊनपिऊन सुखी अशी तेव्हाची कामगार कुटुंबे असत. आईच्या मानसिक आजारामुळे आम्ही त्रस्त होतो. ती कशी वागेल याचा काहीच भरवसा नव्हता. आम्ही पत्र्याच्या बैठ्या चाळीमध्ये राहायचो. पक्क्या भिंतीची घरे तेव्हा दुर्मीळ होती. या चाळीची दुरुस्ती दोन-तीन वर्षांनी एकदा व्हायची. त्यावेळी सर्व कौले काढून टाकायचे. हा कार्यक्रम मला आवडायचा. कारण त्यात लहान मुलांना वाव होता. आमच्या शेजारच्या नारिंगीकरांकडे रेडिओ होता. आम्ही त्यावर श्रुतिका ऐकायचो. श्रुतिकांमध्ये काम करणारे बाळ कुरतडकर हे घरोघरी पोचलेले नाव होते. रविवारी रेडिओवरची नाटके ऐकणे, रेडिओ सिलोनवरची हिंदी गाणी आणि शाळेला जाताना ११ वाजता मुंबईवरचे संगीत – जे शाळेला जायची आठवण देई. आयुष्य असे रेडिओभोवती गुंफलेले होते. आजूबाजूला चार-पाच जणांकडेच टी.व्ही. होता. त्यातल्या किरीस्ताव मामी चार आणे घेऊन सिनेमा आणि क्रिकेटची मॅच पाहू देत. एकूणच वाचन सगळ्यात स्वस्त मनोरंजन होते.

दहावी होईपर्यंत माझे सारे वाचन दिव्याच्या उजेडात चालायचे. कधी कधी प्रत्यक्ष घटनेपेक्षाही पुस्तकातील मजकूर जास्त हेलावून टाके. 'श्यामची आई'पेक्षाही त्याच्या पुढच्या भागाने मला विलक्षण रडवले. श्यामची धडपड, त्याचे शेजाऱ्यापाजाऱ्यांना कमी पैशांत भाजी आणून देणे कुठेतरी जवळचे वाटत होते. खार स्टेशनवर रस्त्यावरच्या एका दुकानात पुस्तके मिळत. अॅलिस्टेअर मॅकलीन, जेम्स हॅडली चेस यांची काही पुस्तके मी हिंदीतूनच वाचली. 'नेमेसिस' ही अॅगाथा ख्रिस्तीची कादंबरी मी हिंदीतून वाचली. ललित साहित्य ज्याला म्हणतात त्यात काही गोष्टींनी मनावर परिणाम केल्याचे मला आठवते. श्री.ज.जोशी यांच्या एका कथासंग्रहात सापांच्या मैथुनाचा उल्लेख आहे. तो संग्रह किंवा नववधूचे स्वागत, (स्टीफन क्रेनचा कथासंग्रह - The Bride Comes to Yellow Sky), विशेषत: त्यातील अक्राळविक्राळ माणसाची गोष्ट हे सारे मला कुठे, केव्हा, कधी वाचले या तपशिलासकट आठवते. अशोक शहाणे यांनी अनुवादित केलेली मोती नंदी यांची 'इवले इवले राक्षस'सारखी कथाही आठवते. 'सत्यकथा' हे तसे माझ्यासाठी जड मासिक होते. त्यातही काही अंक मी वाचायचो. उदाहरणार्थ, खानोलकर गेल्यावर निघालेला विशेषांक – ज्याच्या वाचनातून नेहमीच एकातून दुसऱ्या प्रवासाला सुरुवात होते हे माझ्या हळूहळू लक्षात आले. तरी पुस्तकांचा शोध इकडून तिकडून घ्यायचो. पुस्तक घेणे परवडायचे नाही. माझ्या भावाने दोन कादंबऱ्यांची मुखपृष्ठे केली होती. त्यातील एक गायकाच्या जीवनावरील कादंबरी होती. त्याही कादंबऱ्या मी वाचल्या.

मिरासदार, चिं.वि.जोशी, वपु, पुलं जेव्हा गवसले तेव्हा खूप आनंद झाला. पुलंची पुस्तके उत्तम कागदावर हार्डबाऊंड स्वरूपात छापली जात. मी आठवीत गेलो तेव्हा शाळेत य.दि.फडक्यांचा मुलगा अनिरुद्ध माझ्या वर्गात आला. त्यालाही वाचनाची आवड होती. त्याने शाळेच्या हस्तलिखितात पुलंच्या भेटीवर लेख लिहिला. एकदा नारायण सुर्व्यांची कविता वाचून तो म्हणाला, 'शेवटची ओळ अशी आहे – मी कारखान्यांना म्हणालो चला आपल्याला आता निघायला हवे.' त्या ओळीचा अर्थ त्याने मला समजावून सांगितला. 'ललित'मधील 'ठणठणपाळ' वाचून आम्ही चर्चा करायचो. ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी हेही त्यानेच मला सांगितले. अनिरुद्धची आई म्हणजे फडकेबाई आम्हांला संस्कृत आणि भूगोल शिकवायच्या. आम्ही दहावीत गेलो तेव्हा आंतरराष्ट्रीय बालक वर्ष होते, त्या निमित्ताने महाराष्ट्र टाईम्सने एक स्पर्धा घेतली होती. तीत उल्लेखनीय निबंध म्हणून अनिरुद्धच्या निबंधाचा गौरव झाला. त्याने खरे तर लेखन करायला हवे होते. तो आता मोठा डॉक्टर आहे. काही काळ त्याने वैद्यकीय विषयावर सदरही चालवले.

शाळेतले दिवस हे तसे एकूणच झपाटलेले होते. कवितांमधून चावट अर्थ काढायचे, सतत मिळेल ते वाचायचे, एकमेकांना सांगायचे, हे नेहमी चालायचे. वर्गात दहावीत एक तास मोकळा असायचा. त्या वेळात आम्ही विनोद सांगायचो. तेव्हा आम्ही विनोदाची पुस्तके खूप वाचली. 'प्रभंजन' दिवाळी अंकात शेकडो विनोद असत. साहित्यातले विनोद, तमाशातले विनोद, नाटकातले विनोद वगैरे वगैरे. ते तेव्हा मी वर्गात सांगायचो. अनिरूद्ध, अजय गद्रे, अभय अवचट, मकरंद देशपांडे, मिलिंद कुलकर्णी असे अनेकजण सतत विनोद सांगत. काही वेळा कथाही. मिरासदारांची 'माझ्या बापाची पेंड' मला पाठ होती. द. पां. खांबेटे, मतकरी यांच्या कथा तोंडपाठ होत्या. शाळेचा काळ जितका सुखाचा तितका संघर्षाचा होता. खार हायवेपासून पश्चिमेचे स्टेशन, मग लांबलचक पूल ओलांडणे, मग १६व्या रस्त्यावर असलेल्या शाळेपर्यंत जाण्यासाठी तीन-चार किलोमीटर चालणे, असे सगळे कष्ट, तेही अनेकदा पोटात काही नसताना. मुले डबा आणत. मला घरून डबा मिळत नसे. त्यामुळे निर्लज्जपणे मी मित्रांचे डबे खायचो. त्यामुळे वर्गातील मुले भेटतात तेव्हा मला कृतज्ञता वाटते. वर्गात मी खूपदा कथा, कादंबरी वाचत असे. फडकेबाईंच्या ते लक्षात आले. ड्रॉवरच्या आत धरून मी एक कादंबरी वाचत होतो. मालती बेडेकरांनी अनुवादित केलेली सिंक्लेअर लुईसची अॅरोस्मिथ ही ती कादंबरी. मराठीत ती अनुवादित झाली, तिचे नाव 'डॉक्टर'. तेव्हा मी ज्या पानावर थांबलो तिथून पुढचा मजकूर कधीच वाचला नाही.

लहानपणी शाळेची पुस्तके विकत घेण्याचा दिवसदेखील महत्त्वाचा वाटायचा. एकदा असाच पुस्तके घ्यायला माझा मोठा भाऊ दिनकर याच्याबरोबर जात होतो. पाइपलाइन ओलांडून जावे लागायचे. तर एका पाईपवरून दुसऱ्या पाइपवर उडी मारताना पाय निसटला आणि सरळ काचेवर पडला. पण पुस्तके घेणे रद्द होऊ नये म्हणून मी हूं का चू न करता चालत होतो. रस्त्यात एका माणसाने भावाला थांबवले आणि रक्ताचे ठसे दाखवले. मग अर्थात घरी आणि नंतर डॉक्टरकडे गेलो. चांगलेच कापले होते.

नववी-दहावीच्या वर्गात सर्वप्रथम मी इंग्रजी पुस्तके वाचू लागलो. त्याआधी खारच्या नॅशनल लायब्ररीच्या छोट्या शाखेतून पुस्तके आणत असे. ती शाखा संध्याकाळी सुरू व्हायची. त्यात दिवसाला दोन पुस्तके मिळत. एक मोठ्यांचे, एक लहानांचे. दिवाळीच्या आणि मेच्या सुट्टीत ही लायब्ररी जॉईन करायला परवानगी होती. रोज दोन पुस्तके मी त्या काळात आणायचो आणि ती संपवून अनेकदा लायब्ररीच्या दारात ग्रंथपालाची वाट बघत उभा राही. कधीकधी तर त्या दोन-अडीच तासात, मी उभ्या उभ्याच एखादे छोटे पुस्तक वाचून काढायचो. दहावीपर्यंत मराठीतले सर्व लेखक मी वाचले. रा.भा.पाटणकरांचे 'सौंदर्यमीमांसा' हे पुस्तकही वाचायचा मी प्रयत्न केला. मे.पुं.रेगे व ग.ना.लवंदे यांचा पुस्तकावरचा जाहीर वादही वाचला.

महाराष्ट्र टाईम्स हे तेव्हाचे प्रतिष्ठित दैनिक होते. रोज आल्या आल्या मी महाराष्ट्र टाईम्स आणि त्यातही तळवलकरांचा लेख वाचायचो. तो पेपर घरी येई. बाकीची वर्तमानपत्रे सद्गुरू रहिवासी हितवर्धक कमिटीच्या कार्यालयात वाचत असे. लोकसत्ताचा रविवारचा अग्रलेख हा संस्कृत सुभाषिते, विनोद, शब्दच्छल यांचे मिश्रण असे. विद्याधर गोखले तो लिहायचे. महाराष्ट्र टाईम्सची रविवारची पुरवणी म्हणजे मेजवानी असायची. पुलंचे विनोदी लेख आणि मृत्युलेख मटामध्येच येत. 'प्रिय बाईंस', 'बलुतं' या पुस्तकावरचे लेख आधी मटामध्येच येत. इंदिरा संतांचा कुमारांवरचा लेख, वि.वि.करमरकरांचे खेळावरचे लेखन व विशेषत: 'ना खंत ना खेद'सारखे सदर, बुधवारची विज्ञान पुरवणी, चित्रपट-नाट्यसमीक्षा, गोविंद तळवलकरांचे 'वाचता वाचता'सारखे सदर हे सारे त्या काळात बघायला लावे. 'वाचता वाचता'च्या लेखांचे पुस्तक झाले तेव्हा त्याची समीक्षा विद्याधर गोखले यांनी चक्क रविवारच्या अग्रलेखातून लोकसत्तामध्ये केली होती व 'वाचस्पती म्हणजे तळवलकरांसारखे असावेत' असे शेवटचे वाक्य त्यात होते.

'नवशक्ती'मधील 'लोलक' हे सदर, माधव गडकरींचे 'सकाळ'मधील 'चौफेर' हे सदर, 'नवाकाळ'च्या काही अग्रलेख मालिका वाचनीय असत. दहावी संपताना माझा वाचनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. तो म्हणजे इंग्रजी वाचनाचा. लहाणपणापासून मी अनुवादित पुस्तके भरपूर वाचली होतीच आणि मराठी, हिंदी साहित्याच्या दर्जातील फरक उघड होता. घराजवळच्या कार्यालयात नेहमी लग्ने होत. तिथल्या कार्डिनल ग्रेशिअस शाळेजवळ पुस्तकांचा स्टॉल असायचा. पुस्तकांची मुखपृष्ठे, पॉकेटबुकवर मोठ्या अक्षरांत लेखकांची नावे, फोटोंचा वापर, डिझाईन सारे मला खूप आवडे. 'कॅट अमाँग द पिजन्स' ही अॅगाथा ख्रिस्तीची कादंबरी वाचताना अनेक शब्द मला जड गेले पण मी ती चिकाटीनं संपवली. त्यानंतर एचएमएस युलिसिस ही अॅलिस्टेअर मॅकलिनची कादंबरी वाचायला घेतली. ती वाचता आली नाही. जेम्स हॅडली चेसची कादंबरी वाचली. पी.जी.वुडहाऊस वाचायचा प्रयत्न केला. 'मॅन अपस्टेअर्स' ही त्याची कथा मी वाचली तेव्हा मी कॉलेजात होतो. आता पॉकेटमनीचे पैसे मिळत. शिवाय ट्रेनने दूर फिरता येई. त्यामुळे मी एखाददुसरे पुस्तक विकत घेई. हेन्री मिलर वगैरे वाचले. विशेषत: हॅरॉल्ड रॉबिन्सच्या कादंबऱ्या सोप्या व आकर्षक असत. त्या मी वाचून काढल्या. तळवलकरांमुळे ज्यांचे नाव ऐकले त्या कोस्लरची पुस्तके विकत घेतली. हिचकॉकने संपादित केलेल्या कथा मिळत, त्या वाचल्या. डेल कार्नेगी, नॉर्मन व्हिन्सेंट पील, नेपोलियन हिल यांची व्यक्तिमत्त्व विकासावरील पुस्तके वाचू लागलो. हेन्री डेव्हिड थोरो मूळ इंग्रजीतून वाचला. बारावीनंतर मी दहावीच्याच मार्कांवर डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतली. आधी ठाणे पॉलिटेक्निक, मग चेंबूरच्या विवेकानंद पॉलिटेक्निकमध्ये गेलो. तिथल्या लायब्ररीत कथा, कादंबऱ्या नसत पण 'इंडिया टुडे', 'संडे' यांसारख्या मासिकांपासून 'केअर'सारख्या साप्ताहिकापर्यंत अनेक नियतकालिके येत. 'रिडर्स डायजेस्ट' हे तेव्हाचे लोकप्रिय मासिक मी नियमित वाचायचो. ज्यांना इंटरनॅशनल बेस्टसेलर म्हणतात अशी 'जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल', खलील जिब्रानचं 'प्रॉफेट', जॅकलीन सुसॅनची 'व्हॅली ऑफ द डॉल्स', सिडने शेल्डनची 'अदर साईड ऑफ मिडनाईट', 'द गॉडफादर', 'पॅपिलॉन' अशा कितीतरी कादंबऱ्या मी त्या काळात वाचल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम मी करू लागलो. प्रभाताई पुरोहित या समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या आमच्या विभागाच्या अध्यक्षा होत्या. त्यांची मुलगी डाव्या चळवळीत होती. तिचा स्वतःचा संग्रह होता. तिच्या कपाटात प्रथम मी जे. कृष्णमूर्तींची पुस्तके पाहिली. विद्यार्थी परिषदेत विनय सहस्त्रबुद्धे, शरदमणी मराठे, डॉ. अशोक मोडक, बाळासाहेब आपटे अशी चांगली वाचणारी मंडळी होतीच. राजेंद्र फडकेसारखा वाचकमित्रही तिथे भेटला. हळूहळू मी इंग्रजी अभिजात साहित्य वाचू लागलो. ज्यात ओ हेन्री, सॉमरसेट मॉम, मार्क ट्वेन असे लेखक होते. मिलन कुंदेराची 'बुक ऑफ लाफ्टर अॅन्ड फरगेटींग', काम्यूची 'आऊटसाईडर', स्टाईनबेकचे 'ट्रॅव्हल्स विथ चार्ली'सारखे पुस्तक, वुडहाऊसच्या कादंबऱ्या, मार्केझची 'लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा', रश्दीची अर्धवट वाचून सोडलेली 'मिडनाईट्स चिल्ड्रन', 'ताओ ऑफ फिजिक्स', कोसलरचे 'अॅक्ट ऑफ क्रिएशन' अशी पुस्तके मी तेव्हा वाचायचो. काही वेळा इतर ठिकाणांहून त्या पुस्तकांची माहिती मिळे. उदाहरणार्थ, फ्रित्जॉफ काप्राबद्दल माहिती मिळाल्यावर 'ताओ ऑफ फिजिक्स' वाचायला घेतले. असे अनेकदा व्हायचे. 'झेन अँड आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स' हे पुस्तक मी चार दिवसांत वाचून काढले. ६०-७०च्या दशकात याचा खूप बोलबाला होता. मी तेव्हा मराठीही वाचत होतोच. नेमाडेंच्या कादंबऱ्या, श्याम मनोहर, अरुण कोलटकरांच्या कविता, दिलीप चित्रे, विलास सारंग, भाऊ पाध्ये यांचे लेखन मला जवळचे वाटायचे.

अर्थात लहान वयात खूप जड जड वाचण्याचा परिणाम म्हणजे माझा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. माझा स्वभावही बराच अंतर्मुख होऊ लागला. कृष्णमूर्तींचे लेखन वाचताना मनाला विलक्षण शांतता लाभू लागली. मी शिकवण्या करीत असल्याने पैसे असत. शिवाय छोटी पुस्तके विकत घेऊन लायब्ररीत किंवा मित्रांना विकायची, अशी द्रौपदीची थाळीही मी तयार केली. मी सांताक्रूझच्या योगा इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला. योगावरची पुस्तके वाचली. अनेकदा मला शरीराला आतून अशी एक पोकळी जाणवायची ती जाणवेनाशी झाली. तो योगाचा परिणाम. लोम विलोम, प्राणायाम, ध्यान यांतून आपल्या आतल्या विश्वाचे अस्तित्व व त्याच्याशी संवादाची जाणीव झाली. कृष्णमूर्तींची शिकवण वाचून मी पार्ल्यात त्यांची व्हिडिओ फिल्म पाहायला जायचो. कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या दुकले नावाच्या गृहस्थाना भेटलो. त्यांनी 'भावी जीवन' हे पुस्तक दिले. कृष्णमूर्तींची शिक्षणपद्धत समजवणारे ते पुस्तक होते. अनेक शंका यातून मिटत. पण रोजच्या जीवनातील राग, लोभ, आर्थिक विवंचना याचे काय करायचे हे समजत नसे. परिषदेतील राजू पटवर्धन, गीताताई गुंडे, चंद्रकांत पाटील, विनय नवरे अशांशी चर्चा व्हायची. परिषदेत बोलणीही खूप खावी लागत.

अभाविपचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मी रायगडमध्ये गेलो. महाड येथे राहून जिल्ह्यात संघटनमंत्री म्हणून काम करायचे होते. संघ कार्यालयात प्रचारक मिलिंद ओक यांच्याबरोबर मी राहायचो. त्यांना जेम्स बाँडच्या कादंबऱ्या आवडत. जे.कृष्णमूर्तींचे ते चाहते होते. रोज सकाळी वाचनावर चर्चा व्हायची. महाडच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात मी दासबोध रोज एकेक समास करत वाचला. ज्ञानेश्वरीचे वाचन सुरू केले. रामकृष्ण परहंसांबद्दल पहिल्यांदा बरेच वाचले व गोळवलकर गुरूजींच्या लेखनाचे सातही खंड वाचून काढले. शिवाय मार्क्सवादाचे वाचन सुरू केले. रायगडचा निसर्गरम्य परिसर आणि सावित्री नदीकाठची शांत जागा (शेजारीच स्मशान होते).

मुंबईला आल्यावर मी वाशीला राहू लागलो. सुरुवातीला भावाबरोबरच, मग एकटाच. वाशीला मुख्य म्हणजे माळवे या गृहस्थांचे शेकडो पुस्तकांचे दुकान होते. तिथे स्वस्तात सेकंडहँड पुस्तके मिळत. दोन-तीन चांगल्या लायब्रऱ्या होत्या. कडकीत असलो की मी अनेकदा स्वतःकडची वुडहाऊस वगैरे पुस्तके विकून टाकायचो. सुरुवातीला काही काळ नोकरी केली. पॉलिटेक्निकच्या वर्षांत मी व्यंगचित्रे काढू लागलो. त्यामुळे 'पंच' आणि 'न्यूयॉर्कर' विकत घ्यायचो. व्यंगचित्रांचे अनेक संग्रह मी विकत घेतले. 'प्लेबॉय'मधील व्यंगचित्रांचे अनेक संग्रह माझ्याकडे होते. अलीकडेच मी ते प्रशांत कुलकर्णींना देऊन टाकले.

'मार्मिक' आणि 'किस्त्रीम'सारख्या मासिकांनी माझी व्यंगचित्रे प्रकाशित केली. 'मार्मिक'मध्ये ह.मो.मराठे संपादक होते. सेनाभवनात एका मोठ्या खिडकीपाशी त्यांची खिडकी होती. शिल्पा सरपोतदारही त्यांच्याबरोबर काम करीत. ह.मो.मराठे चित्रकार व लेखक यांना बरेच प्रोत्साहन देत. व्यंगचित्रामुळे मी त्यावरची पुस्तके सतत विकत घेई. एक दिवस एक माणूस खांद्यावर काही नव्या व सुस्थितीतील पुस्तकांचा भारा घेऊन जाताना मला दिसला. त्याला विचारल्यावर ती विकायला नेत असल्याचे त्याने मला सांगितले. मी बघायला मागितली. ती सारी व्यंगचित्रांची पुस्तकं होती. एका भारतीय व्यंगचित्रकाराच्या मालकीची. त्यातील एक-दोन पुस्तकांवर लेखकाच्या सह्या होत्या. किंमत एकूण ८००रू असल्याचे त्याने मला सांगितले. माझा मासिक स्टायपेंड ८०० रू. होता. तेव्हा कॉम्प्युटर सेल्समन होतो. पाच महिन्यात मी ती नोकरी सोडली. आता जवळपास सगळा वेळ मी वाचनात घालवू लागलो. एकदा पुस्तकांच्या दुकानात विवेक मेहत्रे भेटले. त्यांनी दोन मासिके काढली होती. मार्केटिंगचे काम करणार का, असे त्यांनी विचारले. तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करू लागलो. त्यांचाही छान संग्रह होता. विनोदी पुस्तकांवर आमच्या चर्चा होत. 'गंमत', 'सोडवा ही शब्दकोडी' अशी त्यांची दोन मासिके होती. 'गंमत' हे लहान मुलांचे मासिक होते. त्यासाठी मी जाहिरात मिळवायचो. बऱ्याचदा शनिवार-रविवार पुण्यात आणि आठवडाभर जाहिरात संस्थांमध्ये खेटे घालायचो. पुण्यातल्या एंजल्स या दुकानाने रंगीत जाहिराती अगदी दिवाळी अंकालाही दिल्या. मुंबईतल्या खर्चाचे मी पैसे घेत नसे. माझ्याकडची पुस्तके विकून मी तो खर्च भागवीन, असे त्यांना सांगायचो.

पुण्यात एके ठिकाणी पहिल्या मजल्यावर एक गृहस्थ दुर्मीळ पुस्तके विकतात असे दिसले. एक दिवस त्यांच्याकडे अनेक संस्कृत ग्रंथ खाकी पाकिटात पॅक केलेले दिसले. ते म्हणाले, 'ही सगळी न्यायशास्त्रावरची पुस्तके आहेत आणि ती जपानला पाठवत आहे.' हे ऐकून मला वाईट वाटले. आपल्या देशातील महत्त्वाचा ठेवा जाणार या विचाराने मन विषण्ण झाले. पण तिथे कदाचित ती सुरक्षित राहतील असा दिलासा मी माझ्या मनाला दिला. पण त्यानंतर मिळतील ते संस्कृत ग्रंथ मी विकत घेतले.

'परेड' नावाचे नवीन मासिक नारी हिरा यांनी सुरू केले. जगभरातील नियतकालिकांतील लेख वाचायला द्यायचा त्यांचा प्रयत्न होता. हेही 'रीडर्स डायजेस्ट'सारखे मासिक होते. पण लेख 'डायजेस्ट'सारखे बाळबोध नव्हते. मानसशास्त्र, विज्ञान, साहित्य, चित्रपट, कला या विषयांवरील लेख त्यात असत. मुख्य म्हणजे रिचर्ड फाईनमनचे 'शुअर्ली यु आर जोकींग मिस्टर फाईनमन'सारखे पुस्तक त्यांनी संक्षिप्त स्वरूपात दिले होते. हे पुस्तक तात्काळ बेस्टसेलर ठरले यात नवल नव्हे.

फाईनमनचे पुस्तक हे संस्कार करणारे पुस्तक होते. 'एक, दोन, तीन ... अनंत', 'एका काडाची क्रांती', 'कोरा कॅनव्हास', अनिल अवचटांचे 'माणूस'सारखे लेखन, 'बलुतं'सारखे आत्मचरित्र, 'टीकास्वयंवर', 'मराठी साहित्यावर क्ष-किरण'सारखे लेख, आर्वीकर महाराजांचे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावरील त्रिखंडीय पुस्तक, 'रामकृष्ण वचनामृत' हे तीन भागांचे पुस्तक, कार्ल पॉपरचे आत्मचरित्र, जॉर्ज ऑर्वेलचे निबंध, धर्मानंद कोसंबींचे आत्मचरित्र, आंबेडकरांचे 'भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म', गांधीजींचे, विनोबाजींचे आत्मचरित्र, सावरकरांचे 'माझी जन्मठेप', निवडक श्रीपु, नवभारतचे विशेषांक, विटगेनस्टाईनचे चरित्र ही सारीच पुस्तके संस्कार करणारी आहेत. अर्थात निव्वळ मजेसाठी व वेळ घालवण्यासाठी अनेक पुस्तके आहेत. उदा. जॉर्ज मेकॉश, वुडहाऊस, जेम्स बाँडवरच्या कादंबऱ्या, जेम्स हॅडली चेस, पेरी मेसन, अॅगाथा ख्रिस्ती, रुथ रेंडेलच्या कादंबऱ्या… ही यादीही मोठी आहे. मध्यंतरी बराच काळ ही टाईमपास पुस्तके वाचायचे मी थांबवले, पण अलीकडे मला ली चाईल्डच्या कादंबऱ्या आवडू लागल्या आहेत.

मॅक्सम्युल्लर भवन, ब्रिटीश काऊन्सिल, मेट्रोजवळची फ्री रिडींग लायब्ररी, वांद्र्याची नॅशनल लायब्ररी, दादर सार्वजनिक वाचनालय, पार्ल्याचे टिळक स्मारक वाचनालय हे सारेच पुस्तकांचे अड्डे आहेत. यातील ब्रिटीश काऊन्सिल आणि मॅक्सम्युल्लर भवन या लायब्रऱ्या इतिहासजमा झाल्या आहेत. मुंबईत म्युझियममागे पहिल्या मजल्यावर छोटेखानी लायब्ररी होती. निशा जोशी या मराठी बाई तिथे काम करत. सुरुवातीला काही काळ मला त्या जर्मन वाटायच्या. ही लायब्ररी मोफत होती. फक्त डिपॉझिट घेतले जाई. पाश्चात्य संगीताच्या कॅसेट, सिनेमा इत्यादींची सोय होती. या वाचनालयात विटगेनस्टाईनचे 'ट्रॅक्टॅटस' हे पुस्तक जर्मन भाषेत होते. इंग्रजीत नव्हते. मी ते आणायला सांगितले. त्यांनी जर्मनीहून ते पुस्तक मागवले. माझ्या मागणीमुळे हे घडले याचे मला खूप अप्रूप वाटले.

फोर्टचा सारा परिसरच सांस्कृतिक समृद्धता वाढवणारा आहे. इथून केवळ चालण्याच्या अंतरावर ब्रिटीश लायब्ररी होती व एनसीपीएचे वाचनालय होते, ते अजून आहे. बाजूलाच जहांगीर आर्ट गॅलरी आहे आणि तिथे पहिल्या मजल्यावर कलेला वाहिलेल्या पुस्तकांची समृद्ध लायब्ररी होती आणि त्याच मजल्यावर केमोल्ड आर्ट गॅलरी होती. बाजूलाच असलेल्या 'वे साईड इन' या रेस्तराँमध्ये अरुण कोलटकर दर गुरुवारी चहा घेत बसलेले असत. सी.पी. सुरेंद्रनसारखा कवी किंवा जयंत पवारसारखा नाटककार यांना मी त्यांची ओळख करून द्यायला घेऊन गेलो. कोलटकर मी काय लिहितोय ते विचारून, आवर्जून तो लेख वाचत.

९३-९५ च्या काळात मी 'महानगर' वर्तमानपत्रात होतो. तिथे बरीच चांगली वाचणारी मंडळी होती. सर्व विचारांचे लोक होते. कोरी करकरीत पुस्तके वाचता यायची हा फायदा विशेष होता. 'बुकशेल्फ'सारखे सदर मी लिहायचो व शनिवार पुरवणीचे काम बघायचो. सांस्कृतिक कार्यक्रमांचे रिपोर्टींग करायचो, केळवा साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमांचे रिपोर्टींग करताना खरेच मजा आली. पण मराठीतील सांस्कृतिक चळवळ या सुमारास क्षीण होऊ लागली होती. वर्तमानपत्रांना टी.व्ही. चॅनल्सने आव्हान दिले. साहित्यासाठीही बरे दिवस नव्हते. त्यामुळे साहित्य, संस्कृती, वर्तमानपत्रे, मासिके यांचे समृद्ध जग हळूहळू संपते आहे, ही जाणीव कुणालाही होऊ शकली असती. त्याच काळात मला प्रभाकर बरवे भेटले. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी ते तासन्‌तास गप्पा मारत. त्यांच्यामुळे मी चित्रकलेवर वाचन करायला लागलो. त्यांच्या मृत्यूनंतर का कोण जाणे, कलेचे आकलन वाढल्याचा अनुभव झाला. एक प्रकारे आध्यात्मिक अनुभवाला (Transcendental) सामोरे जायला सुरुवात झाली होती. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने काही काळ मी पूर्णतः त्यात समरस झालो.

राजू श्रीखंडे, 'नवी क्षितिजे'कार विश्वास पाटील, 'पानिपत' लिहिणारे विश्वास पाटील अशा अनेकांशी पुस्तकांमुळेच मैत्री झाली. आदिल जसावालाने सुरू केलेल्या 'लोकेशन्स' या कवितागटाचे काम मी काही काळ केले, त्यातूनच आधुनिक, अभिजात इंग्रजी कवितांची समज वाढली. पण इंग्रजी संभाषण शिकायला, इंग्रजी भाषा शिकायलाही त्याची मदत झाली. वाचनाने मला काय दिले नाही? अनेक चांगले मित्र, लेखक, कवी, विचारवंत यांचा सहवास, कुटुंबाबाहेरही निरपेक्ष प्रेम, अमित कुंभार, प्रीती वाघ, अमोल देठे, मानसिंग, निखिल जाधव, मिलिंद देसाई, श्रीकांत आगवणे अशा अनेकांनी माझ्याबरोबर काम केले. श्रीकांत आगवणेनेतर नंतर फिल्म इन्स्टिट्यूट जॉईन केली. किशोर कदम, दिलीप रानडे, माधव इमारते, इब्राहिम अफगाण, सतीश तांबे, हेमंत कर्णिक, जयराज साळगावकर, मुकेश माचकर असे किती तरी मित्र वाचनामुळेच लाभले. ही यादीही खूप मोठी आहे.

मी महाराष्ट्र टाइम्समध्ये १९९६ मध्ये 'वैचारिक आळसाची परिणती'असा लेख लिहिला. अर्थात कुमार केतकर यांच्यामुळेच माझ्यासारख्या नवख्या माणसाचा लेख संपादकीय पानावर आला. तो वाचून दुर्गा भागवतांनी मटाला पत्र लिहिले. त्यांच्या पत्रामुळे ज्यांनी तो लेख वाचला नव्हता त्यांनीही वाचला. दुर्गाबाईंनी फोन करून भेटायला बोलावले. त्यांनीच विश्वास पाटील यांना भेटण्यास सांगितले. पाटील यांचे पूर्ण घर पुस्तकांनी भरलेले होते. मी थोडेसे शिस्तीने व क्रमाने वाचन सुरू करावे, असे त्यांनी सुचवले. नंतर अनेक लेखकांचा परिचय घडला तो त्यांच्यामुळेच. पाटील 'नवी क्षितिजे' सारखे मासिक संपादित करीत. अनेक अभ्यासक त्यांना भेटायला येत. ज्यांत प्रा. शेषराव मोरे यांचा समावेश होता. पाटील यांनी सौंदर्यशास्त्रावरचे एक पुस्तक लिहिले. त्याची वही मला देऊन ते म्हणाले, 'हे तू तुझ्या नावाने प्रसिद्ध कर.' पण मी नकार दिला.

त्यांच्या सहवासामुळे मी तत्त्वज्ञान वाचू लागलो. 'कांटची सौंदर्यमीमांसा' या पुस्तकाच्या साहाय्याने त्याची पुस्तके वाचली. समजून घेतली. त्याला तब्बल सहा महिने लागले. माझा बराचसा काळ एकट्याने वाचनात गेला. पण २०००नंतर इतर लेखक, कवी, वाचक यांच्याशी संपर्क वाढला. फेसबुकमुळे तो अधिक वाढला. सध्या मी शेक्सपिअरची पुस्तके वाचतोय. त्याची नाटके पाहून तो समजावून घेतोय. माझ्या पुस्तकसंग्रहावर सीएनबीसीने स्टोरी केली. इंडियन एक्सप्रेस, मिड डे, लोकप्रभा, आयबीएन लोकमत, इटीव्ही अशा अनेक माध्यमांतून इतरांना माहिती होत गेली. २००७ मध्ये दीप्ती नागपाल यांनी 'मुंबई मिरर' या वृत्तपत्रात एक लेख लिहिला. त्या लेखात माझा फोन नंबर आणि ई-मेल होता. त्यानंतर मला इतके फोन येत की सकाळी ८ ते १०, रात्री ९ ते १० फोन सतत वाजत असे. फोन करणाऱ्या अनेकांना कोणते ना कोणते तरी पुस्तक हवे होते. त्या नंबरांनी व पुस्तकांच्या नावांनी डायरी भरली. मागच्या वर्षी मलबार हिलच्या मोदी कुटुंबीयांना ग्रंथसंग्रह विकायचा होता तेव्हा त्यांनी मला फोन केला तो २००७ च्या कात्रणावरून. मोदींचा सर्व संग्रह मी विकत घेतला. त्यातील 'आईना ए अकबरी' हे १८०० साली प्रसिद्ध झालेले पुस्तक मी ४०,००० हजार रुपयांना विकत घेऊन ५०,०००ला विकले. त्याची बातमीही 'मिरर'ने दिली. थोडक्यात पुस्तकवाचन व खरेदी-विक्री हेच माझे करिअर झाले आहे.

अलीकडेच मी विल ड्युरांटच्या 'स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन'चे ११ खंड विकत घेतले. हे दुर्मीळ पुस्तक कित्येक वर्षे शोधत होतो. १६००० पानांची ऑक्सफर्ड डिक्शनरी, कॉम्पॅक्ट डिक्शनरी या स्वरूपात ऑक्सफर्ड प्रकाशनाने ४००० पानांत बसवली आहे. एका पानात चार पाने बसवली आहेत. भिंग घेऊन ती वाचायला लागते. मूळ इंग्रजी कोशाबरोबरच भिंगही दिले जाते. मला हा दोन पुस्तकांचा सेट सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानात मिळाला. याचबरोबर शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरी हा चार हजार पानांचा कन्साईज डिक्शनरीपेक्षा मोठा कोशही अलीकडेच घेतला. तर अनेक वर्षे हातातून निसटलेली ही पुस्तके अलीकडेच मिळाली. पुस्तकवाचनावर व पुस्तकसंग्रह करण्यावर मी भरपूर लिहिले आहे. इतके लिहूनही काहीतरी सांगायचे राहतेच.

'लोटस' हे वांद्रे पश्चिम येथील दुकान आणि काळबादेवीचे 'न्यू अँड सेकंड हँड' ही दोन्ही दुकाने पुस्तकसंग्राहकांची मंदिरे होती. ती दोन्हीही आता नाहीत. काही अंशी स्ट्रँडही यातच येते. मुंबईच्या फुटपाथवरील बरीच पुस्तक दुकाने हलवण्यात आली. पण आजही तिथे जुनेजाणते विक्रेते आहेत. कधीकधी तिथे चांगली पुस्तके मिळतात. छबिलदाससमोर धुरू हॉलच्या तळमजल्यावर स्वस्तातील रशियन पुस्तके मिळत. 'रोड्स टू लाईफ' चे भाषांतर, 'फिजिक्स फॉर एन्टरटेनमेंट', 'मॅथेमॅटीक्स कॅन बी फन', टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्कीच्या कादंबऱ्या स्वस्तात मिळत. तिथे आता दुकान आहे पण ही पुस्तके मिळत नाहीत. 'लँडमार्क' हे दुकान खूप गाजावाजा करत सुरू झाले. त्यांनीही चांगली पुस्तके उपलब्ध केली. परळमधील 'लँडमार्क' बंद झाले. 'दानाई' हे खार पश्चिमचे दुकानही बंद झाले आहे. एकूण पुस्तकांचे दुकान नावाच्या इन्स्टिट्युशनला आता वाव नाही असे दिसते आहे. माझे मित्र आणि पुस्तकसंग्राहक कुमार केतकर सांगतात, "आजकाल अनेक ठिकाणी मागवले की पुस्तके मिळतात हे खरे आहे, पण ते तुम्हाला माहीत असलेले पुस्तक असते. उलट पुस्तकांच्या दुकानात अनपेक्षित खरेदी होते." हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. याच कारणाने पुस्तकांच्या दुकानात वेळ कसा जातो हे कळत नाही. असे शेकडो तास मी घालवले आहेत. पण त्याचमुळे इतर कितीतरी गोष्टी करता आल्या नाहीत उदा. बुद्धिबळात करियर; मित्र नातेवाइकांना वेळ देणे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या चुलत/मावसबहिणींना मी दहा-दहा वर्षे भेटलेलो नाही. एकदा मला फोन आला. आवाज तरुण मुलीचा. ती म्हणाली, "मामा मी तुझे नाव ऐकते पण मी कधीच तुला पाहिलेले नाही." ती माझी बहीण सविता हिची मुलगी होती. ती आयुर्वेदिक डॉक्टरकीचा कोर्स करत होती. तिला मी तान्हे बाळ असतानाच पाहिले होते. नंतर मी तिला भेटून आलो. पण मला वाटते बहुतेक जणांचे असे होत असावे. सतत काहीतरी वाचत राहणे हा एक चाळाही ठरू शकतो. एकदा दुपारी मी कंटाळून घराजवळच्या संजय बारमध्ये गेलो तर वेटर म्हणाला, “क्या, आज बुक नाही लाया?”

मला आयुष्यात जे काही थोडेफार कळले ते पुस्तकांतून - मग ते माझ्या अभ्यासाच्या, वेस्टर्न म्युझिक, उत्तरआधुनिकता या सारख्या विषयांवर असेल किंवा जगण्यावर. उदाहरणार्थ, 'डेबोनेर'च्या एका अंकात मी वाचले, की तुम्ही जर एकटे राहिलात तर तुमची सलग नाती राहत नाहीत ती तुटत राहतात. याचा मी आयुष्यात चांगलाच अनुभव घेतला. खूप चांगल्या आणि प्रेमळ मुलींशीही माझे नाते टिकू शकले नाही. मुलीच काय, अलीकडे तर एका मित्राने भलेमोठे पत्र लिहून मी कसा अप्पलपोटा आहे; केवळ स्वतःमध्येच रममाण असतो वगैरे सांगितले. आता इतकी माणसे म्हणत असतील तर ते खरेच असणार. अलीकडे मी एका चित्रकारावर पुस्तक करतोय तर त्याच्या बायकोचीही मुलाखत घेतली. ती म्हणाली, "ह्यांना दिवस आणि रात्र याच्यातला फरकही कळत नाही दुसरा माणूस काय बोलतोय तेही यांना कळत नाही. हे सारखे त्यांच्या कामातच असतात." मला वाटते, मी लग्न केले असते तर माझेही असेच झाले असते.

पण पुस्तकांच्या या एका नात्यामुळे आयुष्यात इतर नात्यांना वाव राहिला नाही हे मात्र खरे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

तुम्ही जर समोर असताना नक्की सांगतो
तुम्हाला कडकडीत मिठी मारुन भेटलो असतो.
तुम्ही मित्र वाटता मला हक्काचे मित्र.
ओळखीची परीचयाची अर्थातच गरज नाहीच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

आधीचे काही दिवस ऐसीवरचा साहित्य फराळ आधाशासारखा खाल्ल्याने पोटास किंचित तडस लागलेली आहे. सावकाश वाचून प्रतिक्रिया देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदर इसम भन्नाट आहे. "वाचनाचे व्यसन" हा घासून गुळगुळित झालेला शब्द इथे वापरणे भाग आहे. शब्दशः , खरोखर हा इसम वाचनव्यसनी आहे. म्हंजे "अट्टल बेवडा " म्हटल्यावर कसा खरोखर 24x7 नशेतच असणार अशी जी इमेज येते; त्या अर्थाने हा प्राणी वाचनाच्या नादी लागलेला आहे. सकाळी उठलं की बाटली, लंचपूर्वी आणी नंतरही एकेक बाटली ; पुन्हा डिनरपर्यंत एखाद बटली, नि झोपतानाचा एखादा डोस ;अशी दिनचर्या असलेल्या लोकांबद्दल ऐकलेलं आहे. हा/हे त्याच पट्टीचा वाचनबेवडा/वाचनबेवडे आहे/आहेत.

पाटील यांनी सौंदर्यशास्त्रावरचे एक पुस्तक लिहिले. त्याची वही मला देऊन ते म्हणाले, 'हे तू तुझ्या नावाने प्रसिद्ध कर.' पण मी नकार दिला.

हे मात्र समजलं नै. पाटील असं का म्हणाले ? किंवा कुणीही असं कुणालाही का म्हणेल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0