"गावाकडची अमेरिका"

डॉ. संजीव चौबळ यांचं "गावाकडची अमेरिका" हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि दोनशे-सव्वादोनशे पानी असलेलं हे पुस्तक पटकन् वाचून झालंसुद्धा. अमेरिकेतल्या मराठी जीवनाची चित्रणे करणार्‍या कथा/कादंबर्‍या/प्रवासवर्णने (आता यात दैनिक सकाळ मधल्या मुक्तपीठ सदरातलं लिखाणही आलंच!) , "फॉर हिअर ऑर टू गो?" सारखी इमिग्रंट-स्टडी ची पुस्तकं आता मराठीमधे रुळली आहेत. या सर्व पुस्तकांचा कमी अधिक फरकाने दृष्टिक्षेप हा, अमेरिकेत येऊन राहिलेल्या मराठी लोकांवर आहे. त्यांमधली अमेरिकेची वर्णने येतात ती इमिग्रंटस् च्या संदर्भातली असतात. अमेरिकेत साठी-सत्तरीमधे आलेले डॉक्टर-आर्किटेक्ट्स असोत की नव्वदीनंतर आलेले आयटी कर्मचारी असोत, त्या सार्‍यांचं वास्तव्य बहुतांशी शहरांमधलं. शहरी वस्त्यांमधे काम करतानाचे सहकर्मचारी , उपनगरी वास्तव्यादरम्यान मुलांच्या मित्रमैत्रिणींचे पालक , डॉक्टरादि व्यावसायिक इत्यादि घटकांमार्फत दिसलेली अमेरिका आता वाचकांना काहीशी परिचित झालेली आहे.

प्रस्तुत पुस्तक लिहिलं आहे अमेरिकास्थित मराठी माणसानेच. मात्र डॉ. चौबळ आणि त्यांचं कुटुंब दाटीवाटीच्या मराठी वस्तीमधे क्वचितच राहिलं. त्यांचं वास्तव्य बहुतांशी राहिलं आयोवातल्या एका अतिशय छोट्या लोकवस्तीच्या ठिकाणी. आयटीच्या नोकर्‍यांची लाट आली त्या काळात अमेरिकेत ते आले खरे, परंतु पशुवैद्यकीच्या डॉक्टरकीची पदवी घेऊन. गावात जेमतेम दोन भारतीय कुटुंबे आणि जे दुसरं कुटुंब होतं ते काही कालावधीत गाव सोडून गेलेलं.

चौबळांच्याच शब्दांत सांगायचं तर "न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजेच काही अमेरिका नाही. या मोठ्या, अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक – अशी ही ग्रामीण अमेरिका. "

मला स्वतःला चौबळांचं हे छोटेखानी पुस्तक विशेषतः अन्य इमिग्रंट राईटींगच्या संदर्भात अधिक आवडलं याचं प्रमुख कारण म्हणजे चौबळांची चौकस दृष्टी, एकंदर ग्रामीण व्यवस्थेचं वर्णन करताना दिलेली आकडेवारी , त्या आकडेवारीमधून निर्देशित केलेले वास्तवाचे निरनिराळे पैलू, त्या आकडेवारीपलिकडच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा. या खंडप्राय देशातल्या प्रचंड मोठ्या प्रदेशातल्या ग्रामीण भागात फक्त १८ टक्के जनता कशी राहाते, तिथलं जीवनमान कसं आहे, कुठली राज्ये शेतीप्रधान आहेत, शेती करण्याच्या प्रक्रियेमधे क्रमाक्रमाने बदल कसे होत गेले, तंत्रज्ञानाने नक्की कसा फरक पडला, आधुनिक अमेरिकन शेती आणि पशुपालनाचं स्वरूप , त्यातल्या खाचाखोचा , समस्या आणि त्यावरच्या वर्तमानकालीन आणि भविष्यातल्या उपाययोजना असा एकंदर सांगोपांग आढावा यात आहे.

मात्र हे पुस्तक निव्वळ आकडेवारीत अडकलेलं नाही. चौबळांची कंट्री म्युझिकची - अगदी शून्यापासून - विकसित झालेली आवड, त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिलेल्या प्राणिसृष्टी आणि ग्रामीण जीवनाचे कॅमेर्‍यावाटे टिपलेले क्षण , आणि हो - खुद्द चौबळांनीच काढलेली प्राण्यांची रेखाचित्रेही. यात मधे मग थँक्सगिव्हिंग सेल मधे झालेल्या धावपळीची - आणि फजितीची गमतीदार गोष्ट येते, "रूट ६" या आवडत्या रस्त्याशी जडलेल्या नात्यावरचं एक प्रकरण येतं. चौबळांनी अमेरिका पाहिली ती निव्वळ डोळ्यांनीच नव्हे. इथल्या लोकांचे रीतीरिवाज, त्यांची धार्मिकता यांकडे त्यांनी डोळसपणे पाहिले आहे. या देशात रहात असताना, हा देश कसा बदलत गेला त्याचं ऐतिहासिक भान चौबळांच्या लिखाणातून प्रतीत होतं.

एवढं सगळं करून, आपल्याला अमेरिका समजली असा लेखकाने कुठेही दावा केला नाही. नैसर्गिक वैविध्याने संपन्न असलेला हा खंडप्राय देश इतका प्रचंड आहे की निव्वळ ग्रामीण जीवन लक्षांत घेतलं तरी चौबळांचं लिखाण सर्वसमावेशक नाही आणि ते त्यांनी अगदी सहजपणे मान्य केलेलं आहे.

या पुस्तकाचा सहजपणा, वेगळेपणा आणि कुठलाही आव न आणता , मात्र अचूक निरीक्षण आणि योग्य ते विश्लेषण यांची जोड देऊन केलेले परिणामकारक वर्णन म्हणून हे छोटेखानी पुस्तक मला विशेष आवडले.

पुस्तकाचे शीर्षक : "गावाकडची अमेरिका"
लेखक : डॉ. संजीव चौबळ
प्रकाशक : मराठीसृष्टी, ठाणे
किंमत : रुपये ३५०
अमेरिकेत हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करून मिळण्याकरताचे दुवे :
http://www.bookganga.com/eBooks/Book/4644779470285255546.htm
http://kharedi.maayboli.com/shop/home.php

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

छोट्या गावातला पशुवैद्य हे ऐकून जेम्स हेरिअटची आठवण झाली. सतत सामोर्‍या येणार्‍या मध्यमवर्गीय ब्रिटिश समाजापेक्षा खूप वेगळ्या ग्रामीण ब्रिटनची ओळख त्यातून होते. प्राण्यांबद्दलच्या गोष्टींमधून मानवी स्वभावाचे कंगोरे समोर आणण्यात हेरिअट वाकबगार होता. वूडहाउसच्या विनोदाहून खूप वेगळी अशी, नर्मविनोदी पण खास ब्रिटिश शैली. ज्यांना प्राणी आवडतात त्यांनी हेरिअटची पुस्तकं आवर्जून वाचावीत; अन् ज्यांना मनुष्यस्वभावात रस आहे त्यांनीही वाचावीत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे. अमेरिका म्हणजे फक्त न्यूयॉर्क, वॉशिंग्टन नव्हे हे काही अमेरिकननांचाकडूनच ऐकले होते. महानगरे सोडून आत गेले की अमेरिकेतही दारिद्र्य, भूक, बेरोजगारी असे प्रश्न आहेत हे समजले होते. अर्थात चाळीच्या मालकाच्या मुलाची मुंज आणि आमच्या शंकर्‍याची मुंज - फरक असायचाच! गावातल्या अमेरिकन शेतकर्‍याला कदाचित दर दोन वर्षांनी गाडी बदलता येत नाही याचे शल्य असेल. असो, पण हे पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अगदी बरोबर बोललात हो संजोपराव. तसा तो देश आपल्या देशापेक्षा श्रीमंत आहे असे समजले आहे.

समीक्षा अतोनात कुतूहल चाळविणारी झाली आहे.

>> चौबळांची कंट्री म्युझिकची - अगदी शून्यापासून - विकसित झालेली आवड, त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिलेल्या प्राणिसृष्टी आणि ग्रामीण जीवनाचे कॅमेर्‍यावाटे टिपलेले क्षण , आणि हो - खुद्द चौबळांनीच काढलेली प्राण्यांची रेखाचित्रेही. >>
हे सारे वाचावेसे वाटू लागले आहे.

समीक्षा वाचून पुस्तक वाचावेसे वाटत आहे

.

या पुस्तकाबद्दल आधीही कोठेतरी वाचले होते आता उत्सूकता चाळवली गेली आहे.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

नक्कीच वाचेन.

पुस्तकाची छान ओळख . ते पुस्तक कुठे उपलब्ध आहे हे सांगितल्याबद्द्ल धन्यवाद.

एका शब्दपेक्षा दोन बरे.

पुस्तक ओळखीसाठी धन्यवाद. पुस्तकाबद्दल नक्कीच कुतुहल वाटते आहे.
अवांतर : जेम्स हेरियट आमचाही अत्यंत आवडता लेखक. त्याचे पुस्तक पहिल्यांदा आठवी मध्ये वाचले होते, त्याचे कुठ्लेहि पुस्तक कुठ्लेही पान उघडून वाचताना अजूनही तीच गम्मत वाटते. वुडहाऊस आणि हेरियट यांच्या पुस्तकांची जातकुळी एकमेकांपासुन भिन्न आहे या चिंतातुर जंतु यांच्या मताशी सहमत.

'गावाकडची अमेरिका' रोचक वाटते आहे. मराठी आणि भारतीय लोकांपासून लांब राहून डॉ. चौबळांना निश्चितच अमेरिका जास्त जवळून दिसली असेल.

शंकर पाटील आणि मिरासदारांनी चितारलेला गावाकडचा महाराष्ट्र पु.लंनी चितारलेल्या महाराष्ट्रापेक्षा चिक्कार वेगळा आहे. उत्तर इंग्लंड, स्कॉटलंडमधल्या हेरियटची शैली दक्षिणेकडच्या वूडहाऊसपेक्षा वेगळी आहे यात मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. त्यातून कोकणात रत्नांग्री तसं इंग्लंडात यॉर्कशर म्हणायला हरकत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>स्कॉटलंडमधल्या हेरियटची शैली दक्षिणेकडच्या वूडहाऊसपेक्षा वेगळी आहे यात मला फारसं आश्चर्य वाटलं नाही<<

भौगोलिक फरकापेक्षा वर्गफरक मोठा आहे. हेरिअटच्या लिखाणात साधेपणा-इरसालपणा-हट्टीपणा अशा सगळ्या पैलूंनी खेडूत दिसतात. त्यात यॉर्कशर पुडिंगचा (भरपूर प्राणिज चरबीचा) दणकटपणा आहे. वूडहाऊसची काही कथानकं लंडनबाहेर घडली तरीही उच्चवर्गातच घडतात. अर्थात, वूडहाऊस त्या वर्गातले वेगवेगळे गंमतीशीर नमुने दाखवतो. त्यात सूफ्लेचा हल्लकपणा आहे. दोघांची मजा वेगळी.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी वूडहाऊस आणि हेरियट दोघांचंही अतिशय मर्यादित लिखाण वाचलेलं आहे. आणि हा मुद्दा मला मान्य आहे. ते का असं असेल याचा विचार करत होते.

इंग्लंडमधे, विशेषतः यॉर्कशरच्या जवळ आणि लंडन, सरेपासून लांब राहिल्यामुळे या लोकांमधे असणारा किंवा लोकांना भासणारा सूक्ष्म वर्ग(?)फरक जाणवला. राणीच्या किंवा पॉश भाषेत ऑफ्टन नव्हे ऑफन म्हणतात, H चा उच्चार हेच्च् होत नाही, एखादी गोष्ट फार फार 'इंग्लिश' असते तेव्हा ती साधारणतः लंडन, सरे भागांमधली असते, यॉर्कशर, चेशरमधल्या गावाकडच्या गोष्टी इंग्लिश म्हणून दाखवल्या न जाता, त्या त्या काऊंटीच्या, भागातल्या दाखवल्या, समजल्या जातात. यॉर्कशर, चेशर इत्यादी 'इतर' इंग्लंडमधली मोठी शहरं मँचेस्टर आणि बर्मिंगहम; तिथे असणार वर्किंग क्लास आणि Indians! तिथे पॉश लोकं रहात नाहीत.
मराठी लिखाण म्हणून अत्रे किंवा पुलं आणि शंकर पाटील, द.मा. मिरासदार हे ग्रामीण महाराष्ट्राबद्दल लिहीणारे असा फरक आपल्याकडेही दिसतो, तिकडेही. तो साहित्यामधे दिसला तर फार आश्चर्य वाटत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचायला पाहिजे. पुस्तकाची ओळख कुतूहल वाढवणारी आहे.

पुस्तक वाचायला आवडेल. पण आम्ही गरीब गावाकडचे असल्याने पुस्तक विकत घेणे परवडेल असे दिसत नाही. मुसु जेव्हा आम्हाला पोस्टाने पाठवतील तेव्हा वाचूच. Wink

-Nile

तुर्तास या छान परिचयानंतर पुस्तक नक्की वाचणार असे म्हणतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फारच छान लिहिलं आहे तुम्ही. पुस्त़क नक्कीच वाचणार.

पुस्तक वाचावंसं नक्कीच वाटत आहे. अमेरिकेत वसाहती नव्याने होत होत्या त्या काळावर आधारित पुस्तकं खूप वर्षांपूर्वी वाचली होती. त्यांची आठवण झाली.

नमस्कार,

मी 'ऐसीअक्षरे'चा सभासद दोन दिवसांपूर्वीच झालो व हे पहिलेच लिखाण करतो आहे. काही दिवसांपुर्वी श्री राजेंद्र बापट यांचा फोन आला आणि 'गावाकडची अमेरिका' हे माझे पुस्तक आवडल्याचे सांगून पुस्तकाबद्दल चर्चा करू लागले. काहीही ओळख नसताना देखिल आम्ही चांगल्या अर्धा तास गप्पा मारल्या. त्यांनीच आपणहून पुस्तकावर छानसा अभिप्राय लिहिला आणि पुस्तकाची तुम्हा सर्वांना चांगली ओळख करून दिली, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.

त्यांनी लिहीलेला अभिप्राय व त्यावरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया मी वाचल्या. पुस्तकाच्या वेगळ्या विषयामुळे, कुतुहलापोटी किंवा अमेरिकेबद्द्लचे काहीतरी वेगळे लिखाण म्हणून तुम्ही सर्वांनी पुस्तक वाचण्याबद्दल उत्सुकता दाखवलीत याबद्दल तुमचा देखील मी आभारी आहे. काही वाचकांच्या प्रतिक्रीयांमधे जेम्स हेरियेट व वुडहाऊसच्या लेखनाचा उल्लेख आढळला. त्यामुळे एका ठराविक अपेक्षेने पुस्तक वाचायला घेऊन अपेक्षाभंग होऊ नये म्हणून हे थोडेसे विवेचन.

पहिली गोष्ट म्हणजे हे दोघेही फारच उच्च दर्जाचे लेखक आहेत, त्यामुळे त्यांच्या लिखाणाशी तुलना करण्याचा विचार देखील मी करणार नाही. जेम्स हेरियेटने इंग्लंड मधल्या छोट्या गावातल्या पशुवैदयकाच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर आधारित आपल्या खुसखुशित शैलीत लेखन केलेले आहे. मी देखील पशुवैद्यक असलो तरी मी अमेरिकेत उच्च दर्जाच्या गायींमधे 'टेस्ट ट्युब बेबीज' बनवण्यच्या प्रयोगशाळेमधे काम करतो. त्यामुळे मी प्रत्य़क्ष पशुवैद्यकी करीत नाही. परंतु ह्या कामानिमित्ताने आमचा गेल्या ११ वर्षांचा काळ आयोवा, पेनसिल्वेनिया व कनेक्टिकट या राज्यांतील ग्रामीण / निमग्रामीण भागांत झाला. अमेरिकेच्या एका वेगळ्या अंगाची त्यामुळे जी ओळख झाली, त्याची परिणती म्हणजे 'गावाकडची अमेरिका'!

अमेरिकेत रहाणारे सुमारे ९०% भारतीय मोठाल्या शहरांमधेच रहातात. भारतातुन येऊन सरळ अश्या मोठ्या शहरांमधे रहायला लागलं की सभोवती दोन कडी नकळत पडतात - एक अमेरिकेच्या चकचकीत शहरीकरणाचे आणि दुसरे आपल्याच प्रांतीय / भाषीक भारतियांचे. या दोन कड्यांच्यापलीकडे डोकवून बघण्याची ना तर फारशी कुणाला गरज भासते ना कुणाला कुतुहल वाट्ते.

मुंबईसारख्या महानगरात ३०-३५ वर्षे काढलेले मराठी कुटुंब अचानक 'मिड वेस्ट'मधल्या एका ६००० लोकवस्तीच्या गावकुसात जाऊन पोहोचले तर त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल हे प्रत्यक्षच अनुभवायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांना जी अमेरिका बघायला, उपभोगायला मिळते, ती आपल्याला कधीच मिळणार नाही याचे आम्हाला देखील कधी कधी वैषम्य वाटायचे. पण पुढे पुढे, ही कमतरताच आपले भांडवल बनू शकते आणि इतरांना जे बघायला मिळ्त नाही ते बघून आपण सर्वांसमोर आणू शकतो हा विचार बळावू लागला.

सुरवातिला दोनच लेख लिहीले होते. ते कुठेतरी प्रसिद्ध करून फार काही साधले असते असे वाटेना. अमेरिकेच्या ग्रामिण अंतरंगाची परिपुर्ण ओळख करून द्यायची तर एक, दोन लेखांमधे न करता, विविध अंगांवर लेखन करून ते एकत्रितपणे पुस्तकाच्या स्वरुपातच असायला पाहिजे हे तीव्रपणे जाणवू लागले. म्हणून काळजीपूर्वक विषयांची निवड केली. लेख माहितीपुर्ण व्हावेत परंतु क्लिष्ट नसावेत, व्यासंगपूर्वक असावेत परंतु कंटाळ्वाणे नकोत, तांत्रिक विषयांवरील असले तरी मनोरंजक असावेत - अशी तारेवरची कसरत होती. तसं पाहिलं तर पुस्तकात शेती किंवा पशुपालनाशी निगडीत असे दोनच लेख आहेत. छोट्या गावांतील जीवन, वन्यप्राणी जीवन, धार्मिकता, कंट्री म्युझीक, ग्रामिण भागांतील समस्या, ऋतुचक्र, अशा विविध पैलुंवरचे लेख अमेरिकेच्या ग्रामिण अंतरंगाचे चित्र वाचकांच्या पुढे उभे करतील अशी मला उमेद वाटते.

शेवटी सांगायचे म्हणजे, जमेल तेथे भारताचा आणि महाराष्ट्राचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे. न्यु यॉर्क किंवा एल. ए. मधल्या किंवा कोल्हापुर किंवा जळगावमधे बसुन वाचणारया मराठी माणसाला अ‍ॅपलेशियन पर्वतराजी समजवायची तर संह्याद्रीचाच संदर्भ द्यायला हवा. कंट्री म्युझीक मधल्या गार्थ ब्रुक्स किंवा ब्रॅड प्रेसली बद्दल बोलायच झालं तर वसंत बापट, गदिमा आणि शाहीर साबळे यांचा संदर्भ द्यायला ह्वा. एकंदरित, अमेरिकेचे चित्रण करताना, ते चित्र अधांतरी न लटकता, ते महाराष्ट्राच्या भिंतीवर घट्ट्पणे आधार घेउन बसवले असेल अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तुमच्या सारख्या रसिक व चोखंदळ वाचकांच्या पसंतीस पुस्तक उतरले तर त्याहुन अधिक काही मागणे नाही.

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

आपल्या पुस्तकाचा परिचय आणि त्यावर आपलेच मनोगत दोन्ही वाचून आनंद झाला. आता मूळ पुस्तकही वाचायची उत्सुकता आहे. राजेंद्रजींचा जनसंपर्क करण्याचा उत्साह दांडगा आहे आणि त्याचा फायदा वाचकांना होतो आहे हे विशेष. त्यामुळेच संजीवजी मनोगताबद्दल आपले आणि आपल्याला इथे आग्रहाने लिहियाला लावल्याबद्दल राजेंद्रचेही मनापासून आभार.

मेदिनी..

परीक्षण आणि लेखकाचे मनोगत - दोन्ही फार आवडले. ह्या पुस्तकाची मिळवून वाचण्याच्या यादीत भर घातली आहे. अमेरिकेच्या दोन किनार्‍यांमधल्या ह्या 'फ्लायओव्हर कंट्री'बद्दल फारसं वाचायला मिळत नाही. तेव्हा अशी पुस्तकं मराठीत येणं स्वागतार्ह आहे.

अवांतर - डॉक्टरी पेशाचा सर्वसामान्य जगण्याशी अधिक जवळून संबंध येत असल्यामुळे की काय, पण गेल्या एक-दोन दशकांतल्या वेगळ्या संस्कृतींची ओळख करून देणार्‍या पुस्तकांचे लेखक बव्हंशी डॉक्टर आहेत. उदा.- डॉ. मीना प्रभू, डॉ. उज्ज्वला दळवी (सोन्याच्या धुराचे ठसके) आणि डॉ. संजीव चौबळ.

अवांतर - डॉक्टरी पेशाचा सर्वसामान्य जगण्याशी अधिक जवळून संबंध येत असल्यामुळे की काय, पण गेल्या एक-दोन दशकांतल्या वेगळ्या संस्कृतींची ओळख करून देणार्‍या पुस्तकांचे लेखक बव्हंशी डॉक्टर आहेत. उदा.- डॉ. मीना प्रभू, डॉ. उज्ज्वला दळवी (सोन्याच्या धुराचे ठसके) आणि डॉ. संजीव चौबळ.
या यादीत मीना प्रभू( यांना आपले आडनाव र्‍हस्व का लिहावेसे वाटते हा एक वेगळाच मुद्दा आहे) हे नाव वाचून नवल वाटले. प्रभूंच्या पुस्तकांचा त्यांच्या पेशाने डॉक्टर असण्याशी काही संबंध आहे असे वाटत नाही.
संजीव यांचे मनोगत आवडले.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

प्रभूंच्या पुस्तकांचा त्यांच्या पेशाने डॉक्टर असण्याशी काही संबंध आहे असे वाटत नाही.

बव्हंशी सहमत. मात्र त्यांचं या स्वरूपाचं पहिलं पुस्तक 'माझं लंडन' काही प्रमाणात तरी त्यांच्या पेशाशी निगडीत आहे. पुढची पुस्तकं अर्थातच नाहीत.

पुस्तक वाचायला आवडेल.
नंदन, पुस्तक लवकर विकत घे बघू!!!!
Smile
बाकी मुसुंच्या धाग्यावर आम्ही काही स्वतःचे अनुभव लिहीणे म्हणजे काजव्याने सूर्व्यासमोर चमकण्यासारखे आहे त्यामुळे आमचा फक्त दंडवत!!

हे पुस्तक अलिकडेच वाचले. अतिशय आवडले.
प्रश्न : मूळ धाग्यात ज्या लिन्क्स दिल्यात त्यात या पुस्तकाच्या किमतीमधे बराच फरक दिसला. असे का ते कळल नाही.

मला पुस्तक मिळतच नाहीये. मी ठाण्याच्या मॅजेस्टिकात तीन फेर्‍या मारून आले. नक्की काय अडचण आहे कुणास ठाऊक. मराठी पुस्तक ठाण्याबाहेर जाऊन वा चक्क फ्लिपकार्टावर जाऊन घेण्याची अजून तरी वेळ आलेली नव्हती. आता ती आलीसे दिसते. Sad

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नमस्कार,

मी संजीव चौबळ, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक. माझी बहीण दादरला रहते व तिचे ऑफिस ठाण्यालाच आहे. ती तुम्हाला पुस्तक देउ शकेल. तिचा फोन नंबर - २४३८२२०८.

पुस्तकात दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल धन्यवाद.

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

दस्तुरखुद्द लेखकाकडून माहिती?! एकदम भारी वाटले.
मला काल मिळालं एकदाचं मॅजेस्टिकमधे पुस्तक. वाचून कळवीनच. Smile

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डॉक्टर साहेबांचा इंग्रजी ब्लॉग आजच पाहिला. त्यामधे या पुस्तकाचेच भाग सारांशरूपाने आलेले आहेत हे पाहून आनंद झाला.
दुवा : http://countrysideamerica.blogspot.com/

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी ही हे पुस्तक वाचले होते १-२ वर्षांपूर्वी. छानच आहे. इतक्यात मी व्यंकटेश माडगुळकर यांचे पांढरी मेंढरे हिरवी कुरणे हे पुस्तक हे ग्रामीण ऑस्ट्रेलियावर आहे , तेव्ह्या गावाकडची अमेरिका ह्या पुस्तकाची आठवण झाली. त्या दोन्ही पुस्तकावर मी ब्लॉग लिहिले आहेत. जरूर वाचा: https://ppkya.wordpress.com

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

प्रतिसाद नि लिंक करता आभारी आहे. जमेल तसं लवकरच वाचतो नि प्रतिसाद देतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एक दोन मुद्दे राहिले होते. पुस्तकात अमेरिकेतील कंट्री म्युजिक बद्दल एक प्रकरण आहे. स्वरूप आणि प्रेरणा याचा थोडक्यात आढावा आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी Warren Sendersचा Jazz Historyवर एक कार्यक्रम झाला, त्याची आठवण झाली. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात वन्यप्राणी जीवन आणि ग्रामीण अमेरिका याची देखील माहिती आहे. रेड इंडीयन बद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल, कातडी विकण्याचा त्यांचा व्यवसाय, त्यांचा आणि वसाहतवादी लोकांचा संघर्ष ह्याचे सारे वर्णन, थोडक्यात का होईना, येते. तुम्ही मध्ये एक The Revenant नावाचा सिनेमा आला होता, त्यात हे सगळे पहायला मिळते.

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com