तिसरा दिवस, दहावी गोष्ट

भाषांतरित कथा

तिसरा दिवस, दहावी गोष्ट

- जयदीप चिपलकट्टी

────────────

मूळ इटालियन: 'Il Decameron', by Giovanni Boccaccio, circa 1350.

इंग्रजी भाषांतरे:
1. The Decameron: Translated by G. H. McWilliam, Penguin Classics, 1995.
2. The Decameron: Translated by John Payne, Modern Library, New York, 1950.
3. The Decameron: Translated by Guido Waldman, Oxford World's Classics, 2008.

────────────

राणीचं बोलणं दिओनेओ लक्ष्यपूर्वक ऐकत होता. त्याची एकट्याचीच गोष्ट सांगायची राहिली होती, त्यामुळे तिचं बोलणं संपताच तिच्या खुणेची वाट न पाहता त्याने हसून बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला :

मुलींनो, सैतानाला पाताळात कसा कोंबायचा हे बहुतेक तुम्हांला माहीत नसणारच, त्यामुळे ते मी तुम्हांला सांगितलं तर विषयांतर झालं असं काही म्हणता येणार नाही. अाणि कुणी सांगावं, ते समजल्यामुळे तुम्हाला कदाचित मोक्षदेखील मिळेल. कामदेवाचा वावर बहुतकरून भिकाऱ्यांच्या पालांपेक्षा ऐषारामी वाड्यांमध्ये अाणि उबदार गाद्यागिरद्यांवर असतो खरा; पण कधीकधी त्याचा प्रभाव घनगर्द अरण्यांत, रांगड्या डोंगरकपारींत अाणि वैराण वाळवंटातदेखील जाणवल्याखेरीज राहत नाही. त्याची जिच्यावर सत्ता चालत नाही अशी काही वस्तू नाही.

तर सांगायची गोष्ट अशी, की माघ्रेब प्रदेशात गाफ्सा नावाच्या शहरी एक गडगंज श्रीमंत माणूस राहत होता. त्याला अनेक मुलंबाळं होती, त्यांत अलिबेख नावाची एक अतिशय देखणी अाणि लाघवी स्वभावाची मुलगी होती. ती काही ख्रिश्चन नव्हती; पण तिच्या अासपासची अनेक कुटुंबं ख्रिश्चन असल्यामुळे त्या धर्माची महती काय अाहे, अाणि ते लोक देवाची सेवा कशी करतात याविषयी तिला पुष्कळ ऐकायला मिळत असे. तेव्हा अशी सेवा करायचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता असं तिने एकाला विचारलं. तेव्हा तिला असं उत्तर मिळालं, की भौतिक गोष्टींचा मोह सोडणं हेच श्रेयस्कर अाहे, अाणि अशा प्रकारे संसाराचा त्याग केलेले अनेक जण इजिप्तमध्ये थीब्सच्या वाळवंटात राहतात. अलिबेख जवळपास चौदा वर्षांची होती अाणि अगदी भोळी होती; तेव्हा लहर अाली तशी विशेष काही बेत न ठरवता दुसऱ्या दिवशी कुणाला काही न सांगता ती घराबाहेर पडली. प्रवास खडतर होता, पण मनाचा हिय्या करून तो तिने पुरा केला, अाणि वाळवंटात पोहोचली. दूरवर तिला एक झोपडी दिसली, त्या दिशेने ती गेली तेव्हा तिला एक साधू भेटला. तिला तिथे बघून साधूला अचंबा वाटला, अाणि काय पाहिजे तुला, असं त्याने विचारलं. ती म्हणाली, की मला देवाचं बोलावणं अालं अाहे अाणि त्याची सेवा करायला मी अाले अाहे. तेव्हा ती कशी करायची हे मला कोणी शिकवेल का?

इतक्या तरुण अाणि सुंदर मुलीला बघून या बाबाला स्वत:चा भरवसा वाटेना. तिला जवळ ठेवलं, तर सैतानाच्या जाळ्यात अापण नक्की अडकणार अशी त्याला धास्ती वाटली. तेव्हा त्याने तिच्या भावुकतेचं कौतुक केलं; तिला मुळं, जंगली फळं अाणि खजूर खायला दिला; प्यायला पाणी दिलं; अाणि तो म्हणाला, "मुली, इथे जवळच एक साधुपुरुष राहतो, तो तुला माझ्यापेक्षा चांगला सल्ला देऊ शकेल, तेव्हा तू त्याच्याकडे जा." असं म्हणून त्याने तिला वाटेला लावलं.

तिथेही असाच प्रकार झाला, अाणि असं होत होत शेवटी ती रुस्तीको नावाच्या एका सुस्वभावी, पापभीरू अाणि तरुण संन्याशाकडे अाली, अाणि तिने त्याला तोच प्रश्न विचारला. अापलं मन किती खंबीर अाहे याची चाचणी घ्यावी असं रुस्तीकोच्या मनात अालं, म्हणून त्याने तिला अात बोलावलं. अंधार पडला तसा त्याने एका कोपऱ्यात पामच्या झावळ्यांचा बिछाना तयार केला, अाणि तिला विश्रांती घ्यायला सांगितली.

पण एवढं होताहोताच त्याच्या संयमावर मोहाचा तुफानी हल्ला व्हायला उशीर लागला नाही. काही क्षणांतच त्याचा दणदणीत पाडाव झाला, अाणि प्रतिकार करण्याचे फारसे कष्ट न घेता त्याने शेपूट खाली घालून हार कबूल केली. अापल्या मनातले सात्त्विक विचार अाणि प्रार्थना वगैरे सगळं त्यानं बाजूला सारून दिलं, अाणि या मुलीच्या तारुण्याचा अाणि सौंदर्याचा विचार सोडून त्याला काही सुचेना. अापण लंपट अाहोत असा तिला संशय न येऊ देता अापल्या मनातला हेतू कसा साध्य करावा, यासाठी तो युक्त्या शोधू लागला. त्याने अाडवळणाने तिला काही प्रश्न विचारले, अाणि तिने अजून पुरुष पाहिलेला नाही अाणि ती दिसते तितकी खरोखरीच निरागस अाहे याची शहानिशा करून घेतली. देवाची सेवा करण्याच्या मिषाने तिला फितवण्याची एक युक्ती त्याला सुचली. सैतान हा देवाचा किती महाभयानक शत्रू अाहे या विषयावर सुरवातीला त्याने एक लांबलचक प्रवचन ठोकलं. अाणि तो म्हणाला की देवाने मुळात या सैतानाची पाताळामध्ये हकालपट्टी केली होती, तेव्हा त्याला पुन्हा तिथे कोंबणं याइतकी देवाची उत्कृष्ट सेवा दुसरी कुठलीही नाही.

मुलीने विचारलं, की हे कसं करायचं? रुस्तीको म्हणाला, "ते अाता तुला कळेलच, मी जे करतोय ते बघून तसंच कर." त्याने जे काही थोडे कपडे घातलेले होते ते काढून टाकले, अाणि तो खट्ट नागडा झाला. मुलीनेही तेच केलं. प्रार्थना करतो अाहोत अशा अाविर्भावात तो गुडघे टेकून बसला, अाणि त्याने मुलीला अापल्यासमोर बसवलं.

तशा स्थितीत मुलीचा सारा लोभसपणा सामोरा येताच रुस्तीको अभिलाषेने वेडावून गेला, अाणि अापोअापच जीर्णोद्धार झाला. अलिबेख या दृश्याकडे थक्क होऊन पाहत राहिली, अाणि त्याला म्हणाली, "रुस्तीको, हे समोर लोंबतंय ते काय अाहे? मला तसलं काही नाही."

रुस्तीको म्हणाला, "अगं मुली, मी सैतान म्हणत होतो तो हाच. बघतेस ना तू? तो मला इतका त्रास देतोय, की मला अगदी सहन होत नाही."

मुलगी म्हणाली, "देवाची अगदी कृपा अाहे बाई! मला अशा काही सैतानाचा जाच नाही, तेव्हा माझी गत तुझ्यापेक्षा बरी अाहे म्हणायची."

रुस्तीको म्हणाला, "ते खरं अाहे, पण तुझ्याकडे अशी एक चीज अाहे, की जी माझ्याकडे नाही." मुलगी म्हणाली, "कुठली?"

रुस्तीको म्हणाला, "तुझ्याकडे पाताळ अाहे. माझ्या अात्म्याला मुक्ती मिळावी म्हणून देवानेच तुला इथे पाठवलं असा माझा पुरेपूर विश्वास अाहे. हा सैतान मला जर असाच त्रास देत राहिला, अाणि तुला जर माझी कीव अाली असेल; तर याला पुन्हा पाताळात कोंबण्यासाठी तू मला मदत करायला हवीस. त्यामुळे मलासुद्धा खूप हायसं वाटेल, अाणि देवाची फार मोठी सेवा केल्यामुळे तोही प्रसन्न होईल. तू इथे अाली होतीस ते याच्यासाठीच की नाही?"

यावर ती मुलगी निरागसपणे म्हणाली, "जर माझ्याकडे पाताळ असेल, तर तू म्हणतोस तसं लागलीच करू या." रुस्तीको म्हणाला, "मुली, देव तुझं भलं करो. त्याला अात कोंबू म्हणजे तो मला अाणखी छळणार नाही." मग तो मुलीला एका पलंगावर घेऊन गेला, अाणि या हलकट सैतानाला कसा कैद करायचा हे त्याने तिला शिकवलं. सैतानाला पाताळात कोंबण्याचा प्रसंग पूर्वी कधी अाला नसल्यामुळे हा पहिला अनुभव मुलीला काहीसा दुखला. ती म्हणाली, "हा सैतान फारच दुष्ट अाहे बाई! देवाचा हा अगदी कट्टर वैरीच असला पाहिजे, कारण माणसांना तर सोडाच, पण अात शिरताना पाताळालाही तो त्रास देतोय."

रुस्तीको म्हणाला, "मुली, असं नेहमीच होणार नाही." अाणि तसं काही होऊ नये याची खात्री करून घेण्यासाठी पलंगावरून उतरण्याअाधी त्यांनी अाणखी पाचसहा वेळा सैतानाला अात कोंबून त्याचा नक्षा असा उतरवला, की पुन्हा दिवसभर त्याने डोकं वर काढलं नाही.

पण पुढच्या काही दिवसांत सैतानाचा गर्व पुन्हापुन्हा उफाळून येऊ लागला, अाणि अापल्या कर्तव्याच्या हाकेला ओ देऊन त्याचा ताठा मोडण्यात कधीही मागे नसणाऱ्या त्या मुलीला हा प्रकार फारच अावडू लागला. ती रुस्तीकोला म्हणाली, "देवाची सेवा करण्यात अानंद अाहे असं गाफ्सामधले लोक म्हणत असत ते किती खरं अाहे, हे अाता मला कळलं. सैतानाला पाताळात कोंबल्यामुळे जितकं बरं वाटतं, तितकं बाकी कशामुळेही वाटल्याचं माझ्या अाठवणीत नाही. मी तर म्हणेन, की जे लोक देवाची सेवा करायची सोडून बाकी काहीतरी करत बसतात ते अगदी बैलोबा अाहेत."

ती अाता सारखीसारखी रुस्तीकोकडे येऊन म्हणू लागली, "मी इथे अाले अाहे ती देवाची सेवा करायला, फुकट वेळ दवडायला नाही. चल ना, सैतानाला पाताळात कोंबायला." अाणि काही वेळा सेवेत गर्क असताना ती म्हणे, "हा सैतान पाताळातून बाहेर का पळतो तेच मला कळत नाही. तो इथे असताना पाताळाला जितका अानंद होतो तितकाच त्यालाही झाला, तर त्याला कधी निघावंसं वाटणारच नाही."

अशा रीतीने रुस्तीकोला झिजवून झिजवून तिने त्याचा पार निकाल लावून टाकला. जिथे बाकी एखादा पुरुष तापला असता, तिथे रुस्तीकोला थंडी भरू लागली. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, की सैतान गर्वाने फार माजला तरच त्याला पाताळात कोंबायचा, एरवी नाही. देवाच्या कृपेने अापण त्याची अशी खोड मोडली अाहे, की ‘माझा पिच्छा सोड बाबा अाता’ अशी गयावया तो देवासमोर करू लागला अाहे." हे इतकं सांगून त्याने मुलीची कशीबशी समजूत काढली, पण सैतानाला अात कोंबायला रुस्तीको अापल्याला बोलवेनासा झाला अाहे हे अोळखून एक दिवस ती म्हणाली, "हे बघ रुस्तीको, तुझ्या सैतानाला अद्दल घडली अाणि तो तुला अाता त्रास देत नाही हे ठीक अाहे; पण माझं पाताळ काही मला स्वस्थ बसू देत नाही. तुझ्या सैतानाची खोड मोडण्यासाठी माझ्या पाताळाची मदत झाली, तशी माझ्या पाताळातलं वादळ शमवण्यासाठी तुझ्या सैतानाने पुढे यायला हवं."

वनस्पतींची मुळं अाणि पाणी यांवर गुजराण करीत असल्यामुळे रुस्तीकोला ही मागणी पुरी करणं जमण्यासारखं नव्हतं. तो म्हणाला, की तुझं पाताळ शांत करायचं तर बरेच सैतान लागतील; पण मला जमेल तेवढं मी करेन. तेव्हा कधीमधी तो शक्य तितकं करी, पण सिंहाच्या जबड्यात फुटाणा टाकण्यासारखाच तो प्रकार होता. त्यामुळे अापल्याकडून म्हणावी तशी देवाची सेवा होत नाही असं मुलीला वाटू लागलं, अाणि ती सतत कुरकुरू लागली.

अाणि अशा प्रकारे एका बाजूला खावखाव अाणि दुसऱ्या बाजूला कमजोरी अशा परिस्थितीत अलिबेखचं पाताळ अाणि रुस्तीकोचा सैतान यांच्यातला हा झगडा काही काळ चालू राहिला. त्याच वेळी गोष्ट अशी झाली की गाफ्सामध्ये एक खूप मोठी अाग लागली. अलिबेखचा बाप अाणि त्याच्या मुलाबाळांसकट कुटुंबातले सगळे जळून ठार झाले. त्याची सगळी मालमत्ता अापोअापच अलिबेखच्या नावावर झाली. त्यामुळे अापला सगळा पैसा चैनीपायी फुंकून टाकलेल्या नीरबाल नावाच्या माणसाला तिच्यात रस उत्पन्न झाला, अाणि अलिबेख जिवंत अाहे असं ऐकून तो तिच्या शोधात निघाला. वारस नाही या कारणापायी तिची सगळी मालमत्ता सरकारजमा होण्याअाधीच ती त्याला सापडली. तिची नाखुषी असूनही तिच्याशी लग्न करून नीरबाल तिला गाफ्सामध्ये परत घेऊन अाला, त्यामुळे रुस्तीकोला चांगलंच हायसं वाटलं. अलिबेखच्या संपत्तीतला अर्धा वाटा नीरबालचा झाला. तिथल्या बायकांनी अलिबेखला विचारलं, की तू वाळवंटात देवाची सेवा केलीस ती कशी? नीरबालचा तिच्याशी संग होण्याअाधीची ही गोष्ट. तर ती म्हणाली, की सैतानाला पाताळात कोंबून मी देवाची सेवा करीत असे, अाणि या सेवेत खंड पाडून नीरबालने फार मोठं पाप केलेलं अाहे. सैतानाला पाताळात कसं कोंबतात असं त्या बायकांनी विचारलं, तेव्हा अर्धवट शब्दांत अाणि अर्धवट हातवारे करून तिनं ते समजावून सांगितलं. त्यांची हसून हसून अशी मुरकुंडी वळली, की त्या अजून हसायच्या थांबलेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, "अगं, तू काही नाराज होऊ नको. अाम्हीपण इथे सगळं काही तितकंच चांगलं करतो, अाणि देवाची सेवा करायला तुला नीरबाल पुष्कळ मदत करील."

ही गोष्ट थोड्याच दिवसांत षट्कर्णी झाली, अाणि देवाची सेवा करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे सैतानाला पाताळात कोंबणे अशा अर्थाची एक म्हणच सगळ्या बायकांत प्रचलित झाली. ही म्हण नंतर समुद्रपार झाली, अाणि अजूनही इथे इटलीत ती कधीकधी ऐकायला मिळते. अाणि म्हणूनच, तरुणींनो, जर देवाची तुम्हावर कृपा व्हावी असं वाटत असेल, तर तुम्हीही सैतानाला पाताळात कोंबायला शिका. यात भाग घेणाऱ्या सर्वांना अाणि देवालाही त्यामुळे अानंद होतो, अाणि त्या अनुषंगाने पुष्कळ चांगल्या गोष्टी उत्पन्न होऊन बाहेर येतात.

दिअोनेअोच्या गोष्टीमुळे स्त्रीवर्गाला चांगल्याच गुदगुल्या झाल्या, अाणि त्यानंतर बराच वेळ त्या अंग हलवून खिदळत राहिल्या. गोष्ट पुरी झाल्यानंतर, अापल्या राजवटीची मुदत संपल्याची खूण म्हणून राणीने फुलांचा मुकुट अापल्या डोक्यावरून उतरवला अाणि हलक्या हातांनी तो फिलोस्त्रातोला बहाल केला. ती म्हणाली, "अात्तापर्यंत मेंढ्यांनी लांडगे हाकले, अाता लांडग्यांना मेंढ्या हाकणं त्यापेक्षा किती चांगलं जमतं ते बघू!"

फिलोस्त्रातो हसून म्हणाला, "जर तुम्ही माझं ऐकलं असतं; तर सैतानाला पाताळात कसा कोंबायचा हे रुस्तीकोने अलिबेखला शिकवलं, तितक्याच कौशल्याने लांडग्यांनी मेंढ्यांना शिकवलं असतं. तुम्ही काही मेंढ्यासारख्या वागला नाहीत, तेव्हा उगीच अाम्हाला लांडगे म्हणू नका. ते काही असलं, तरी अाता राज्य माझं अाहे. तेव्हा मला जमेल तसं मी ते चालवीन."

यावर नायफिली म्हणाली, "हे बघ, फिलोस्त्रातो! तुम्ही पुरुषांनी असलं काही अाम्हांला शिकवायचा प्रयत्न केला असता, तर त्या मासेत्तोला कॉन्वेन्टमधल्या ननकडून शिकावी लागली, तशी अाम्ही तुम्हांला काही अक्कल शिकवली असती. काबाडकष्ट करून तुमची हाडं खिळखिळी झाली असती, तेव्हा कुठे तुमची गेलेली बोलती परत अाली असती."

❈ ❈

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अगदी आनंदध्वजाच्या कथांची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डाॅ.धीरज

हा हा हा ROFL ROFL ROFL

जुने लोक बाकी एकदम चावट होते यात वट्ट शंका नाही. हर हर ती संस्कृती गेली आणि समाज सोवळा झाला....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहावा म्हणजे शुचि का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा, याचीही फॅनफिक लिहा. मूळ कथा गंमतीशीरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही कथा वाचल्यावर प्रत्येकाने सैतानाच्या डोक्यावर '६६६' आंकडा गोंदवून घ्यावा म्हणजे त्यांना जास्तीतजास्त पातळांचा आय मीन पाताळांचा लाभ घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Satan can quote sriptures हेच असावं।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर आहे! तथाकथित आध्यात्मिक लोकांची इतकी 'खेचक' गोष्ट दुसरी वाचली नव्हती मी. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन