पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा - अर्ध्या वाटेवरचे विचार

”उत्पल

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा - अर्ध्या वाटेवरचे विचार

- उत्पल

'किधर जानेका?' या मूलभूत प्रश्नापासून
दार उघडून आत जाईपर्यंत.
बेसिन, टॉवेल, टीव्हीच्या रिमोटपासून
आपण आणि हिने तळहातावर काहीच जपलं नाही बहुधा
या विचारापर्यंत.
'कितनी देर?' या केस बांधतानाच्या
तिच्या प्रश्नापासून
तिच्या अमर स्तनभाराकडे बघेपर्यंत.
बोलायचंय, विचारायचंय,
पण नकोच बोलायला, विचारायला...

मुंबई दिनांक

अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक'ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई 'घडते' आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी - दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीने जे झपाटलं, त्यात एक कोन त्यातील काही थेट लैंगिक संदर्भाचा होता. मी ही कादंबरी वाचली, तेव्हा वीस-बावीस वर्षांचा होतो. काही मुली किंवा स्क्रीनवरील काही ललनांविषयी विशेष ममत्व वाटण्याचा हा काळ होता. जयवंत दळवींची 'चक्र', 'ऋणानुबंध' या कादंबऱ्यांमधून लैंगिक विश्वाने दार किलकिलं केलं होतं. शिवाय आशू रावजी आणि दिनू कानडे या नावाचं एक लेखकद्वय होतं. त्यांच्या पुस्तकात संभोगाची रसभरित वर्णने असत. 'हैदोस'सारखी 'आउट अँड आउट' पोर्नोग्राफिक पुस्तकंही वाचली जायची. ब्लू फिल्म्स पाहायलाही सुरुवात झालेली होती. त्यामुळे लैंगिकता कधी अस्पष्टपणे, तर कधी स्पष्टपणे समोर येतच होती. पण 'मुंबई दिनांक'चा या संदर्भातला उल्लेख मी मुद्दाम करतोय, कारण या कादंबरीनं उत्तम साहित्यकृतीचं दर्शन तर घडवलंच, पण लैंगिकतेचे काही नवे आयाम दाखवले. लैंगिकतेची एक नवी दृष्टी दिली. कामेच्छा ही आजूबाजूला सर्वत्र, सर्व लोकांच्या मनात वावरत असते; अय्यरसारखा एखादा त्याबाबत बेधडकपणे वागतो आणि हे काम उरकून पुढच्या कामाला लागतो; याचा अर्थ ही गोष्ट अगदी सहजपणेही होऊ शकते - हे या कादंबरीतून दिसलं. मुख्य म्हणजे त्यातील काही विधानांनी, मांडणीने - आणि अय्यरचा जो स्वसंवाद सुरू असतो, त्याने - माझ्यावर परिणाम केला. सॅली (अय्यरशी गहिरं नातं असलेली वेश्या) गेल्यानंतर अय्यरचा स्वतःशी झालेला संवादही विशेष होता. कादंबरीत पुढे अय्यर आणि मकामुरा नामे एक जपानी चित्रकार यांच्या भेटीचा प्रसंग आहे. भेटीदरम्यान हा चित्रकार संभोगाची चित्रं काढतो हे अय्यरला कळतं. त्यांच्या संवादातलं मकामुराचं म्हणणं माझ्या लक्ष्यात राहिलं. "धिस इज द मोस्ट चॅलेंजिंग सब्जेक्ट. टिंगल करण्यासारखा हा विषय नाही. आयुष्याचं मूलतत्त्व म्हणजे हा विषय. जीवनातल्या बाकी क्षेत्रांवर यंत्रयुगानं आक्रमण केलं आहे. पण ही क्रिया अमर आहे. ही अशीच अबाधित चालू राहील."

मी लैंगिकतेसंदर्भात जे थोडं-फार लिहिलं आहे त्यात 'प्रचंड भौतिक-तांत्रिक प्रगती करूनही अजिबात न बदललेली जैविक क्रिया' ही नोंद माझ्याकडून घेतली गेली. त्याच्या मुळाशी कधीकाळी वाचलेला हा संवाद आहे. हा संवाद वाचताना एकूणच प्रेम आणि सेक्स या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत; आणि डी-कास्टा, अय्यरसारखे आपले 'हीरो'सुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत याचा अर्थ प्रेमाकर्षण, लैंगिक आकर्षण हे नॉर्मलच असलं पाहिजे असं वाटायचं.
***

कामभावना जागी होताना सहज, निसर्गत:च जागी होते; मात्र ती शमवणं तितकंसं सोपं नाही हे लक्षात आल्यापासून या इच्छेच्या नियोजनाचं काय करता येईल, काय करायला हवं हे विचार डोक्यात घोळत असत. टीनएज आणि विशी-पंचविशीच्या काळाकडे पाहिलं, की नैतिकतेच्या कचाट्यात सापडलेली तरुण जनता दिसते. मी स्वत: स्त्रीबद्दलचं आकर्षण आणि स्त्रीवादाबद्दलचं आकर्षण या दोन्ही ट्रॅक्सवर चालत होतो. त्या काळात बरेच उलट-सुलट विचार होत होते. वेश्या या विषयाबाबत तेव्हापासून आस्था होती. त्याबरोबर होतं ते एक प्रकारचं सहसंवेदन. जोडलेपणाची आणि असहायतेची, अपराधबोधाची जाणीव. वाढीच्या टप्प्यांवर जेव्हा 'व्यवस्था' महत्त्वाची हे उमगू लागलं तेव्हा मला वेश्या फारच जवळची वाटू लागली. मी वेश्यांकडे गेलेलोही आहे. तिथल्या अनुभवांचं वैविध्य बरंच आहे. मला वेश्येबरोबर असताना शांत आणि कनेक्टेड वाटलेलं आहे. शारीरिक समाधान (आणि त्यामुळे नंतर मिळणारं मानसिक 'निचरा'-स्वास्थ्य) मिळालेलं आहे. खळबळही जाणवलेली आहे. वेश्येबद्दल मला जे वाटतं; त्याच्याशी मानसिक अस्वास्थ्य, पराभूत जाणीव हे कायमचं जोडलं गेलेलं आहे. आपण वांझोटे बुद्धिवादी आहोत ही जाणीव ज्यांनी करून दिली आहे, त्यांत वेश्या वरच्या स्थानावर आहेत. शारीरिक गरज इतकी सरळ, स्पष्ट असताना तिच्या पूर्ततेची कोणतीही व्यवस्था नसावी? आणि जी आहे, ती अशी शोषणाधारित असावी? माझं वेश्यांशी झालेलं शारीरिक आणि भावनिक शेअरिंग यावर - आणि महत्त्वाचं म्हणजे कधीकधी माणूस असण्याच्या नैतिक गोचीवरही मात करणारी 'पुरुष' असण्याची शरीरकेंद्री गोची काय असते हे जे मला या अनुभवांमधून जाणवलं, त्यावर - मी काही चर्चांमधून बोललो आहे. त्यावर सविस्तर लिहायला हवं असं वाटतं. पण अजून तरी मी काही निर्णय घेतलेला नाही. (याबाबत एक सांगावंसं वाटतं. एखाद्या विषयावर काही मांडत असताना तुमचा दृष्टिकोन मांडण्याइतकंच महत्त्वाचं असतं ते अनुभवकथन. कारण 'काय असायला हवं' या विचाराइतकंच 'प्रत्यक्षात काय झालं? काय होऊ शकतं? बदलाची, पर्यायाची गरज का आहे?' हे महत्त्वाचं असतं आणि ते 'आपबीती'तून स्पष्ट होऊ शकतं. आपण स्वतःच एक 'केस स्टडी' होऊ शकतो. विशेषतः परिवर्तनवादी विचारांचा ध्यास असलेल्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कामप्रेरणेबाबत लिहितानादेखील आपल्या बाबतीत काय घडलं हे सांगणं आवश्यक आहे.)

'मिळून साऱ्याजणी'च्या संपादक गीताली वि. मं., त्यांचा नवरा मुकुंद सा. न. आणि इतर समविचारी मित्र यांनी एकत्र येऊन 'पुरुष उवाच' या नावाचा एक गट सुरू केला होता. स्त्री-पुरुष समतेबाबत, स्त्रीवादाबाबत आस्था असलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन बोलावं असा या गटाचा उद्देश. या गटाच्या बैठकींना मी जाऊ लागलो आणि मला बोलायला व्यासपीठ मिळालं. मग 'मिळून साऱ्याजणी'च्याही संपर्कात आलो. पुढे तिथे कामही केलं. या प्रवासात आणि आज तो प्रवास (तात्पुरता) थांबल्यावर माझ्या लक्ष्यात येत गेलं, की मला - एका पुरुषाला - कामजीवनाबद्दल स्त्रियांशी बोलता आल्याने बराच फायदा झाला आहे. दुसरं म्हणजे 'मिळून साऱ्याजणी'च्या संपादकीय विभागात काम केलेला मी एकटाच पुरुष होतो. माझ्याआधी एक जण तिथे होते, पण अगदीच अल्प काळाकरता. संपादकीय कामात ज्या चर्चा रंगायच्या, त्यांत माझा 'पर्स्पेक्टिव्ह' कधीकधी वेगळा असायचा. तो बहुदा मी पुरुष असल्यामुळेही असेल. पण स्त्रीवादी विचाराकडे माझा ओढा असल्याने मला फार मोठ्या विचारकलहाला कधीच सामोरं जावं लागलं नाही. कारण स्त्रीवादाची चिकित्सा होणं मला मान्यच होतं आणि आहे, पण स्त्रीप्रश्न म्हणून काहीतरी व्यापक प्रमाणात आपल्याकडे अस्तित्वात आहे याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. विचारधारेचं 'रिजिडीकरण' झाल्यामुळे येणारे दोष स्त्रीवादातही आहेतच; पण स्त्रीवाद 'पर्स्पेक्टिव्ह' देतो का? तर 'देतो' हे स्पष्ट आहे.

एक लक्ष्यात येत होतं, की आधुनिकतेच्या आणि नैतिकतेच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं, तर आपल्या कामप्रेरणेची गोची झाली आहे. कारण निसर्गतः असलेली तीव्र जैविक प्रेरणा आणि व्यवस्थेची बंधनं यांत आपण अडकलो आहोत. (यात पुन्हा व्यक्तिसापेक्ष आणि काही लिंगसापेक्ष फरकही आहेतच. उदा. कामेच्छेच्या तीव्रतेतील फरक. कामेच्छेमधील भावनिक गुंतवणुकीतील फरक - संभोगानंतर सहसा स्त्रीला काही वेळ शांतपणे बाहुपाशात पडून राहावंसं वाटतं आणि पुरुषाला मात्र सहसा 'हिला अजून किती वेळ जवळ घ्यावं लागेल' असं वाटतं. स्त्रीचं 'वस्तुकरण' पुरुषाकडून त्याला कळायच्या आत होतं. पुरुषांची 'insertive' कामेच्छा आणि स्त्रीची 'receptive' कामेच्छा यातील द्वंद्वात्मक नातं. पुरुषाला 'मोकळं होण्यासाठी' शरीरात गुंतायचं असतं, तर सहसा स्त्रीला गुंतण्यासाठी मोकळं व्हायचं असतं इत्यादी. इतरही भिन्नत्वाचे मुद्दे.)

कामेच्छेमुळे पुरुषाला लिंगाच्या ताठरलेपण येतं, त्यातून 'अवघडलेपण' येतं आणि कामेच्छा पूर्ण झाल्यावरही कालांतराने ते येत राहतं, तसं 'अवघडलेपण' स्त्रीला येत नाही हा एक फरक जाणवू लागला होता. माणूस सृष्टीचा घटक आहे, आणि म्हणून त्याला जे वाटतं, तो जे काही करतो, ते सगळंच मूलत: नैसर्गिक आहे (मग ते नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरी) हे लक्ष्यात येऊ लागलं. बलात्काराविषयी शोध घेत असताना 'नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायोलोजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन' या पुस्तकाशी परिचय झाला. लैंगिक संदर्भात पुरुष 'पुरुषासारखा' का वागतो याची उत्क्रांतीच्या अंगाने उकल करायचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. मॅट रिडलेसारख्या उत्क्रांतीच्या अभ्यासकाने 'द रेड क्वीन : सेक्स अँड द इव्होल्यूशन ऑफ ह्यूमन नेचर' या पुस्तकात स्त्री-पु्रुषांमधील लैंगिकतेबाबतच्या मानसिकतेतील फरकाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील 'Sexing the mind' या प्रकरणाच्या शेवटी टेस्टोस्टेरॉन या 'पुरुषीकरण' करणाऱ्या संप्रेरकाविषयी तो लिहितो - There are two periods when testosterone levels rise in male children: in the womb, from about six weeks after conception, and at puberty. As Anne Moir and David Jessel put it in a recent book - Brain Sex, the first pulse of hormone exposes the photographic negative; the second develops it. This is a crucial difference from the way the hormone affects the body. The body is masculinized by testosterone from the testicles at puberty, whatever its womb experience. But not the mind. The mind is immune to testosterone unless it was exposed to a sufficient concentration (relative to female hormones) in the womb. It would be easy to engineer a society with no sex difference in attitude between men and women: Inject all pregnant women with the right dose of hormones, and the result would be men and women with normal bodies but identical feminine brains: War, rape, boxing, car racing, pornography, and hamburgers and beer would soon be distant memories: A feminist paradise would have arrived.

उत्क्रांतीचे अभ्यासक जैविक प्रेरणेच्या, मूळ 'डिझाईन'च्या आधारे पुरुषी वर्तनाचा आणि स्त्री वर्तनाचा खुलासा करतात. मंगला सामंतांसारखे अपवाद वगळता स्त्रीवादी अभ्यासकांना बरेचदा ते मान्य होत नाही, कारण वर्तनातील 'नर्चर'चा भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. खरं असं आहे, की माणसाच्या कृतीचं कारण नेचर आणि नर्चर दोघांच्याही मिश्रणातून तयार होतं; पण लैंगिक संदर्भात नर्चरमुळे जर नेचर दाबलं जात असेल, तर ते उफाळून वर येतंच. प्रेम, शारीर आकर्षण या प्रेरणा संस्कृतीकरणाने कितीही दाबल्या, तरी त्या पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर येतात. 'सेक्स इज द बेस्ट मेडिसिन' (इफ टेकन विथ प्रिकॉशन) हे मी माझ्या 'पुरुष असण्याच्या' अनुभवावरून सांगू शकतो. होतं काय, की सेक्सविषयी प्रचंड चर्चा करण्यात आपण वेळ वाया घालवतो. ते करून मोकळे होत नाही. ही जर एक अटळ अशी भावना आहे, तर तिचा अनुभव घेऊन, मोकळं होऊन मग इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष्य द्यावं हे आपल्याला कळत नाही. भूक लागलेली असताना काम नीट होत नाही हा नियम याही गरजेला लागू आहे. मी आजवर एकदाही दारू प्यायलो नाही. प्यावी असं कधी वाटलं नाही. पण मित्रांबरोबर ‘बसलो' आहे. चकणा पुष्कळ खाल्ला आहे. यात एक टप्पा असा आला, की मला मित्रांची विमानं उडण्याचा कंटाळा येऊ लागला. त्यानंतर मी विमान न उडणाऱ्या मित्रांबरोबरच बसू लागलो. पण विशी-पंचविशीच्या वयात असं लक्ष्यात यायचं, की दारूभोवती ज्या गप्पा रंगतात त्यांत बाई हा विषय असतो. दारू प्यायलेली नसतानाच्या चिंतनातही बाई हा विषय असतो. मग एवढा वेळ जर त्यात वाया चालला आहे, तर ते करून मोकळं का होत नाही असा प्रश्न मला पडायचा. स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं यात गैर काय आहे? म्हणजे बाईच्या शरीराबद्दल अचकट-विचकट विनोद करणं, रस्त्यातल्या बाईकडे कामुक नजरेने पाहणं हे मान्य; पण प्रत्यक्ष सेक्स मात्र वाईट? मला दारूत बुडणं खरं तर कृत्रिम वाटतं. 'हाय कंबख्त तूने पीही नहीं' असं म्हणणाऱ्यांना मला कधीकधी 'हाय कंबख्त तूने लीही नहीं' असं म्हणावसं वाटतं. सेक्स अतिशय 'लिबरेटिंग' असतं, सुंदर असतं हे आपल्याला कळलेलंच नाही. आपण सेक्सला 'गिल्ट'मध्ये ढकलून दारू पीत बसलो आहोत! आज पस्तिशी-चाळिशीच्या घरातले मित्रदेखील विशीतल्या उत्साहाने कामुक विनोद वगैरे पाठवतात तेव्हा मौज वाटते.
***

सगळं जग सालं या रूमभोवती फिरतंय
असं वाटण्यापासून
तिच्या केसातून हात फिरवेपर्यंत.
पुरुष असण्याचा लैंगिक मसुदाच
घोळ घालणारा आहे असा उद्वेग उद्वेग
आणि मग त्याचे हात अपूर्ण अपूर्ण
तिच्या अनुत्सुक शरीरावर.
एकीकडे एक एक दुसरीकडे तिसरं काही
अशा अवस्थेपासून
मला हे नको आहे पण तू हवी आहेस असं वाटेपर्यंत.
शोषणाचा अजून एक मुक्काम आपण गाठला असं वाटण्यापासून
तिच्या देहाची रेघ ओलांडायला तिची हरकत नाही
हे तिनेच बंद डोळ्यांनी सांगितलं असं वाटेपर्यंत.

मुळात 'लैंगिक प्रश्न' असं काही अस्तित्वात आहे का हा विचार केला, तर 'हो, आहे' असं उत्तर येतं. इथे पुन्हा बरेच गट पाडता येतील. ज्यांच्यासाठी हा 'प्रश्न' म्हणून अस्तित्वात नाही, ज्यांना लग्नाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे असं वाटतं अशांचा एक गट. ज्यांना लग्नपूर्व काळातही काही अडचण जाणवली नाही, अशांचा एक गट. लग्नपूर्व काळात अडचण आली आहे, अशांचा एक गट. लग्न न झाल्यामुळे अडचण येत आहे अशांचा एक गट. लग्नानंतर जोडीदार गेल्यामुळे अडचण येत आहे, अशांचा एक गट. लग्नोत्तर काळात जोडीदाराचा लैंगिक संदर्भात कंटाळा आला आहे, अशांचा एक गट इ. ज्यांना लैंगिक प्रश्न जाणवत नाही, त्यांचा यासंदर्भात विचार करायची अर्थातच आवश्यकता नाही. त्यामुळे तो विचार इतर गटांबाबतच करावा लागेल.

आज आपण ज्या टप्प्यावर आहोत, तिथे आपण काही अंशी का होईना पण कामप्रेरणेचं अस्तित्व किमान मान्य तरी केलेलं आहे. अर्थात मुक्त लैंगिकतेचा तत्वत: पुरस्कार करणारे व प्रत्यक्षातही स्वत:च्या वा जोडीदाराच्या मुक्ततेचं ओझं होऊ न देणारे किती जण आहेत याची आकडेवारी माझ्याकडे नाही. वरील मत माझ्या प्राथमिक निरीक्षणावर आधारलेलं आहे. मागे एका मैत्रिणीला गप्पांच्या ओघात मी विचारलं, ”तुझ्या नवऱ्याचा बाहेर कुणाशी संबंध आल्याचं कळलं, तर तुला काय वाटेल?” तिने चटकन उत्तर दिलं, “काहीही करा, पण मुलं जन्माला घालू नका म्हणजे झालं.” आता प्रत्यक्षात तिच्या नवऱ्याचा संबंध आला, तर ती ते सहजतेने स्वीकारेल का हा प्रश्न आहेच; पण तिची 'तात्त्विक मंजुरी' मला सूचक वाटली. पत्रकारितेत असणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलताना तिने सांगितलं; की आपल्याला कल्पना नसते, पण लग्नव्यवस्थेला समांतर अशी एक भावनिक-शारीरिक संबंधांची व्यवस्था नीट रचली गेलेली असते आणि ती छुपेपणाने सुरू असते. आता अशी व्यवस्था कमी-अधिक प्रमाणात जर सुरू असेल, तर काही लोकांनी भावनिक गुंतवणुकीचा आणि कामेच्छेचा प्रश्न त्यांच्या परीने सोडवला आहे असंही मानता येईल. मला असं वाटतं की अशी समांतर व्यवस्था असणं अगदीच शक्य आहे आणि स्वाभाविकही आहे, कारण मुळात लग्न ही नैसर्गिक व्यवस्था नव्हे. (आता मी वर म्हटलं; तसं 'माणूस जे काही करतो' ते नैसर्गिक असेल, तर लग्न नैसर्गिक का नाही? ते नैसर्गिक नाही, कारण तो निसर्गातला हस्तक्षेप आहे. आपल्या इतर अनेक गोष्टींसारखाच. माणसाला उन्हाळ्यात गार हवा हवीशी वाटणं नैसर्गिक आहे. पण एसी तयार करणं हा निसर्गातला हस्तक्षेप आहे. प्रेरणा नैसर्गिक आणि प्रेरणेच्या परिणामी निसर्गातील वस्तूंमध्ये किंवा मानवी स्वभावात बदल करून केलेली व्यवस्थानिर्मिती हा हस्तक्षेप. यातील तात्त्विक खोलात अजूनही जाता येईल. कारण जर हस्तक्षेप केल्याने नवीन प्रेरणा निर्माण झाल्या आहेत, तर त्या नैसर्गिक मानायच्या का; असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सध्या फक्त हे नोंदवून पुढे जाऊ.) जर प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला एकाच भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असतं, तर लग्न 'नैसर्गिक' झालं असतं. 'मानवी प्रेरणेला न्याय देणारी' या संदर्भाने ती नैसर्गिक व्यवस्था नाही. खरंतर बहुविध नातेसंबंध असणं नैसर्गिक आहे. खासगी मालमत्तेच्या उगमानंतर लग्नसंस्था बळकट झाली आणि खासगी मालमत्ता टिकून राहिल्याने लग्नसंस्थाही टिकून राहिली आहे. त्यामुळे आज प्रचंड संख्येच्या समुदायाला एक चौकट देण्याच्या प्रयत्नातील एक प्रयत्न म्हणूनही लग्नसंस्थेकडे पाहावं लागतं. पण कामप्रेरणेच्या बाबतीत आपण 'संस्थात्मक' सुधारणा न केल्याने लग्नसंस्था कळाहीन झाली आहे. (र. धों. कर्वे यांच्या 'कामशास्त्राचा सामाजिक विचार' या लेखातील एक परिच्छेद मननीय आहे - ज्या समागमाने एकापासून दुसऱ्यास कोणताही रोग लागतो तो अनीतीचा समजला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या समागमापासून समाजास अनिष्ट अशी संतती उत्पन्न होते तोही अनीतीचाच समजला पाहिजे. हे दोन्ही नियम इतरांप्रमाणेच पती-पत्नीच्या समागमालाही तितक्याच जोराने लागतात हे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. वास्तविक पाहता गर्भधारणेचा व रोगसंसर्गाचाही प्रतिबंध हल्ली सहज करता येतो. त्यामुळे जरूर असल्यास हे दोन्ही उपाय वापरल्यास विवाहबाह्य संबधातील अनीती आता पार नाहीशी करता येईल. तेव्हा ज्यास असा संबंध ठेवणे असेल त्यांनी त्याची माहिती मिळवून तिचा उपयोग केला पाहिजे. पारंपरिक नीतीच्या कल्पना आमच्या मते याबाबतीत त्याज्य आहेत. समागमास भटांची किंवा कायद्याची परवानगी लागण्याचे काहीच कारण नाही. हल्ली विवाहित स्त्रियांवर कायद्याने समागमाची सक्ती असते. हा कायद्याचा व धर्माचा रानटीपणा आहे. या बाबतीत वेश्यांस जे स्वातंत्र्य असते, यावरून विवाहसंस्थेची किंमत होते. अनेकांशी समागमाची इच्छा स्त्रीपुरुषांस नैसर्गिक आहे व वर सांगितलेल्या दोन्ही प्रकारची खबरदारी घेतली असता त्यात कोणाचेही खरोखर नुकसान नाही. यामुळे आमचे मते ती अनीती नाही. वेश्यांनी देहविक्रय करणे किंवा पुरुषांनी त्याचा उपयोग करणे यातही आमचे मते अनीती नाही.)

***

शरीरसंभव होता होता डोळ्यांसमोर चमकून गेलेला
कम्युनिस्ट जाहीरनामा, फ़ेमिनिस्ट उतारा
आणि गांधींचं मंगल प्रभातसुद्धा.

लैंगिकतेला नैतिक परिमाण असावं का? लग्नबाह्य शरीरसंबंधाला सहसा 'अनैतिक' म्हटलं जातं. म्हणजे नैतिकता टिकवायची असेल, तर कामसुखातील वैविध्य, वेगळ्या अनुभवाची आस, रोमांचकता याला नकार द्यायचा का? मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. पण हा मुद्दा तितका सरळही नाही, कारण तो समाजधारणेशी निगडित आहे.

कामप्रेरणा शारीरिक आणि मानसिक अशा दोन पातळ्यांवर कार्यरत असते. आणि ती काही आपली एकमेव प्रेरणा नव्हे. माणसामध्ये नैतिक प्रेरणादेखील कार्यरत असते. प्रचलित नैतिक प्रेरणा विवाहपूर्व आणि विवाहबाह्य कामसुखापासून मागे ओढणारी असल्याने शारीरिक सुखाच्या पूर्ततेमागोमाग मानसिक अस्वास्थ्य आलं, तर काय? लग्न मरेपर्यंत टिकावं असं नाही; पण लग्नव्यवस्थेची हुशारी अशी आहे, की तुम्ही सहवासामुळे संवेदनाप्रधान होतच जाता. मग त्यातून बाहेर कसं पडायचं? यात मला एक-दोन मार्ग दिसतात. एक मार्ग हा - की लग्नाच्या पद्धतीमध्ये एक मूलभूत बदल करणं आणि 'ही तुमची आजन्म घालून दिलेली गाठ वगैरे नाही, तुम्हांला एकमेकांचा कंटाळा यायची शक्यता आहे, त्यामुळे जर असं झालं तर अमुक अमुक मार्ग आहेत', असं सगळं लग्न होतानाच सांगणं. अर्थात ही शक्यता धूसर दिसते. कारण भारतीय संदर्भात तरी लग्न 'कायमच्या स्थैर्या'च्या संकल्पनेवर उभं आहे आणि लग्नाबाबतची भारतीय मानसिकता 'अतिनैतिक', 'अतिसंवेदनशील' अशी आहे. परंतु तरीही नवीन दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांनी लग्नाला नवीन स्वरूप द्यायचं ठरवलं, तर एक नवी सुरुवात होऊ शकते. 'ओपन मॅरेज'सारखी व्यवस्था असणं हाही एक मार्ग आहे. आव्हान असं आहे, की कामप्रेरणेला पावित्र्याच्या जोखडातून बाहेर काढता येईल का हे पाहणं आणि या प्रक्रियेत कामेच्छा ही अखेरीस जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे हेदेखील लक्ष्यात ठेवणं. हे लक्ष्यात ठेवलं तरच भरकटलेपण येणार नाही. कुठल्याही सुखाबाबत असतो तो 'संयम आणि भाना'चा मुद्दा कामसुखालाही लागू होतो आणि तो या सुखाबाबत थोडा जास्तच महत्त्वाचा आहे.
***

'तुम्हारे साथ अच्छा लग रहा है, फुल नाईट रूको ना'
असं ती एकदम म्हणते
तेव्हा त्याच्या मेंदूतल्या शेकडो कप्प्यांवर
धडका देणाऱ्या अठरा-वीस-पंचवीस-तीसच्या हजारो मजबूर मुली
एक क्षण थांबतात.
एकदा मेंदू फोडावाच या मुलींनी
असं वाटण्यापासून
तिच्या अचानकच्या इच्छेने बरं वाटण्यापर्यंत...

कामेच्छा आणि तिचे विविध आविष्कार - हस्तमैथुनापासून पॉर्न साहित्य, पॉर्न फिल्म्स, वेश्यागमन, लग्नपूर्व लैंगिक संबंध, लग्नबाह्य संबंध - यांतील प्रत्येकाची चर्चा नैतिकतेच्या प्रस्थापित चौकटीतून केली; तर त्याबाबतचं मूल्यनिर्णयन होऊ शकणार नाही. कारण मुळात आपल्याकडे तरी हे सगळं नैतिकदृष्ट्या 'वाईट' आहे. त्यामुळे या चौकटीच्या बाहेरून पाहिलं, तरच आपल्याला काहीएक मूल्यनिर्णयन करता येईल.

पॉर्नचं उदाहरण घेऊ. लग्नाआधी पॉर्न पाहणं मान्य असतं, पण प्रत्यक्ष सेक्स मान्य होत नाही. लग्नानंतर नवरा-बायकोंमधील संबंध मान्य होतो, पण पॉर्न पाहणं मान्य होत नाही. इथे 'आता तुला एक खेळणं दिलंय, तर तू शेजारच्या मुलाचं खेळणं कशाला मागतोस?' हा ‘नियमनाचा' विचार आणि 'मी तुला पुरेसा/पुरेशी नाही का?' हा दुखावलेल्या मनाचा एक विचार असतो. लग्नाची आणि लग्नकेंद्री नात्याची ही एक अडचणच आहे. 'कर्तव्यभावनेतून शारीरिक समाधान' ही कल्पनाच काहीशी भयंकर आहे. ('कर्तव्यभावनेतून प्रेम'देखील न पटणारं!). एकमेकांच्या लैंगिक तृप्तीसाठी एकमेकांना 'नेमून' देणं हे फारच गमतीशीर आहे. त्यामुळे आपल्याला लैंगिक तिढा सोडवायचा असेल, तर ही गृहीतकं सोडावी लागतील, मानसिकता बदलावी लागेल, आपल्या शारीरिक गरजेविषयी स्पष्ट बोलावं लागेल. लैंगिक भुकेचं प्रमाण कमी-अधिक असू शकतं, लैंगिक तृप्तीच्या (sexual gratification) प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असू शकतात हे समजून घ्यावं लागेल.

लग्नानंतर पॉर्न पाहणं यात काही गैर नाही; पण हे मान्य करूनदेखील पॉर्नबाबतचं मूल्यनिर्णयन करावं लागेल. (आपण जे जे काही करतो, त्याचं मूल्यनिर्णयन होऊच शकतं. आपण आपल्या कृतीच्या मूल्यनिर्णयनाची सवय लावून घेणं चांगलंच. कारण त्यामुळेच 'उपभोक्ता' म्हणून जगत असताना आणि बऱ्याच अंशी ते अपरिहार्य आहे हे मान्य असतानासुद्धा 'माणूस' म्हणून माझी अमुक कृती योग्य/अयोग्य/आवश्यक/अनावश्यक आहे का हा विचार मनात जागता राहू शकतो.) पॉर्न पाहण्याची वारंवारता, त्याचं व्यसन लागणं, त्याचे मानसिक-शारीरिक-कौटुंबिक दुष्परिणाम या अंगाने ते करता येईल. शिवाय एका गोष्टीबाबत शंका असायचं कारण नाही. लैंगिक समाधानाचं स्थान मान्य केलं तरी ते माणूस म्हणून जगण्याचं सार्थक नाही. गरज ही गरजच असावी. तिने विवेकशक्तीवर घाव घालू नये. 'खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो' हा प्रश्न लैंगिकतेलाही लागू आहे. तेव्हा या व इतर निकषांच्या आधारे लग्नानंतर इतर कुणाशी किंवा वेश्येशी आलेले संबंध याचंही मूल्यनिर्णयन करता येईल. (उदा. लैंगिक समाधान घेणं या गोष्टीला तात्त्विक मंजुरी दिल्याने काहीही करून, वाटेल तेव्हा ते आपल्याला मिळायलाच हवं अशी आपली वृत्ती होते आहे का? 'व्यसन' या शब्दाची व्याख्या करणं अवघड असलं, तरी ते अशक्य नाही. त्यामुळे पॉर्न किंवा कुणा व्यक्तीशी येणारे संबंध याचं आपल्याला व्यसन लागतंय का हे ठरवणं गरजेचं आहे. आपलं मनोविश्व लैंगिकतेने व्यापून गेलं आहे का? आपण आपल्या कार्यक्षेत्रात आपलं योगदान देत आहोत ना? याची तपासणी करत राहणं आवश्यक आहे.) लग्नाच्या वेळी या मुद्द्यांवर काहीच चर्चा होत नाही. मी वर म्हटलं, तसं ती व्हावी; म्हणजे पुढचा मार्ग सुकर होईल. मात्र ती झाली नसेल आणि लग्नानंतर हे मुद्दे उभे राहिले; तर त्याबाबत दोघांनी बसून, बोलून ठरवणं हेच योग्य आहे. ते कदाचित अवघड आहे, कारण असे संवाद करायची आपल्याला सवय नाही; पण असा संवाद होणं हाच मार्ग योग्य आहे. अन्यथा लग्नव्यवस्थेचे फायदे घेत स्वतःच्या प्रेम आणि कामसंबंधी वर्तनाला एकतर्फी वळण देणं योग्य नव्हे.

मला स्वतःला पॉर्नपेक्षा लग्नपूर्व आणि लग्नोत्तर प्रत्यक्ष लैंगिक संबंध अधिक आरोग्यपूर्ण वाटतात. यातली अडचण अर्थातच ही आहे, की लैंगिक सुखाचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था 'समाजमान्य नैतिकते'अंतर्गत लावली गेलेली नाही आणि लैंगिक समाधानाकडे बघण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. त्यामुळे तिथे बदल झाल्याशिवाय पुढे काही होणार नाही. शिवाय लैंगिक इच्छेमध्ये कायम भोगलालसाच आहे असंही मला वाटत नाही. लैंगिक इच्छेला सौंदर्यानुभवाचं परिमाणदेखील आहे आणि इतर अनेक अनुभवांच्या ओढीसारखीच या अनुभवाची ओढ वाटणं नैसर्गिक आहे. Penetrative sex (भेदन संभोग) हा एक आविष्कार तर झालाच; पण शारीरिक अनुभव, स्पर्शाचा अनुभव हा दर वेळी तिथपर्यंत जाण्यासाठीच हवा असतो असं नाही. एखादं चांगलं गाणं ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात जावंसं वाटणं यासारखंच शारीरिक अनुभव घ्यावासा वाटणं हीदेखील एक सहज ऊर्मी होऊ शकते.

कामजीवनाबाबत विचार करताना मला एक जाणवतं ते असं, की ही 'टू वे प्रोसेस' असल्याने ती कायमच 'फूलप्रूफ', घर्षणरहित अशी होणं अशक्य आहे. हे नातंच मुळात द्वंद्वात्मक असल्याने त्यावर सतत काम करत राहणं एवढंच आपण करू शकतो. फक्त आपल्याला यावर काम करायला हवं आहे (त्याचं नियोजन करण्यासाठी, त्यातील आनंद वाढवण्यासाठी किंवा त्याचा अतिरेक टाळण्यासाठी) हे कळणं गरजेचं आहे!
***

'कल का माल कैसा था साब'
असं दुसऱ्या दिवशी समाज विचारतो
तेव्हा समाजाचं डोकं उडवून
ते प्रजासत्ताकाच्या टोकावर ठेवून
चौका चौकातून प्रजासत्ताक नाचवत
तो ओरडतो - 'वो माल नहीं, इन्सान थी
और उसको मैं अच्छा लगा था...

चित्रस्रोत : उत्पल

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

बापरे! विचार करतोय. लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'तुम्हारे साथ अच्छा लग रहा है, फुल नाईट रूको ना'
असं ती एकदम म्हणते
तेव्हा त्याच्या मेंदूतल्या शेकडो कप्प्यांवर
धडका देणाऱ्या अठरा-वीस-पंचवीस-तीसच्या हजारो मजबूर मुली
एक क्षण थांबतात.
एकदा मेंदू फोडावाच या मुलींनी
असं वाटण्यापासून
तिच्या अचानकच्या इच्छेने बरं वाटण्यापर्यंत.

वा!! काय मस्त भावना आहेत.
अजुन लेख वाचायचा आहे. कवितेचे तुकडे वाचले. प्रतिसाद मग.
_____
मी वेश्येवरची सहानुभूतीपूर्ण व गौरवपूर्ण भावनेतील एक इंग्रजी कविता व तिचा अ‍ॅनॅलिसीस पूर्वी दिलेला होता. तो धागा देते आहे - http://aisiakshare.com/node/3695
____
लेख फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

It would be easy to engineer a society with no sex difference in attitude between men and women: Inject all pregnant women with the right dose of hormones, and the result would be men and women with normal bodies but identical feminine brains: War, rape, boxing, car racing, pornography, and hamburgers and beer would soon be distant memories: A feminist paradise would have arrived.

इथे अतिशयोक्ती केली आहे असे वाट्ते (उदा. बऱ्याच पुरुषांना युध्द, रेसिंग मधे रस नसतो). पुस्तक एका पत्रकाराने लिहिल्यामुळे असेल बहुदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मार्ग हा - की लग्नाच्या पद्धतीमध्ये एक मूलभूत बदल करणं आणि 'ही तुमची आजन्म घालून दिलेली गाठ वगैरे नाही, तुम्हांला एकमेकांचा कंटाळा यायची शक्यता आहे, त्यामुळे जर असं झालं तर अमुक अमुक मार्ग आहेत', असं सगळं लग्न होतानाच सांगणं.

हे नेमकं कोण कोणाला सांगणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचा घाट छान आहे.

सेक्स अतिशय 'लिबरेटिंग' असतं, सुंदर असतं हे आपल्याला कळलेलंच नाही. आपण सेक्सला 'गिल्ट'मध्ये ढकलून दारू पीत बसलो आहोत! आज पस्तिशी-चाळिशीच्या घरातले मित्रदेखील विशीतल्या उत्साहाने कामुक विनोद वगैरे पाठवतात तेव्हा मौज वाटते.

ह्यात आपण म्हणजे कोण? चाळिशीला येऊनही असे जोक पाठवणार्‍यांनाही खाजगी विचार असतातच आणि माणसाच्या खाजगी व सार्वजनिक वागणुकीत जमीन-अस्मानाचे अंतर असू शकते. बाकी गिल्ट बद्दल बोलायचं तर ते एक शस्त्र आहे त्यामुळे योनिशुचितेच्या कल्पना व गिल्ट दोन्ही टिकवणे फायद्याचे असते.

यातली अडचण अर्थातच ही आहे, की लैंगिक सुखाचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था 'समाजमान्य नैतिकते'अंतर्गत लावली गेलेली नाही आणि लैंगिक समाधानाकडे बघण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. त्यामुळे तिथे बदल झाल्याशिवाय पुढे काही होणार नाही.

अगदी पटले; पण लैंगिक सुखाचा प्रश्न फक्त समाजमान्य नैतिकतेमुळे सुटत नाही असे नाही. त्याला आर्थिक परिमाणसुद्धा आहे. कोणतेही नैतिक अधिष्ठान नसलेल्या प्राण्यांच्या कळपात बिटा मेल्सना लैंगिक सुखापासून वंचित राहायची वेळ येणे असाधारण नाही. त्याप्रमाणेच लैंगिकव्यवहाराबद्दलचे सगळे दूषित नीतिग्रह काढून टाकले म्हणून सगळ्यांचा लैंगिक सुखाचा प्रश्न सुटेल असेही नाही. काहींना वैविध्य आणि काहींना काहीच नाही असे व्हायची शक्यता जास्त.
त्यामुळे,

कामसुखातील वैविध्य, वेगळ्या अनुभवाची आस, रोमांचकता याला नकार द्यायचा का? मला व्यक्तिशः तसं वाटत नाही.

ह्याच्याशी सहमत असलो तरी ह्याला संस्थात्मक किंवा सगळ्यांना करता येणारा उपाय काहीही नाही. ओपन मॅरेज असणे वा लग्नाआधी अशी सगळी चर्चा करुन ह्या सगळ्याला (आपल्या नैसर्गिक प्रेरणेच्या विपरीत जाऊन) जोडीदार तयार होणे अगदी सहज होणारे नाही.
त्यामुळे ज्यांना अगदीच त्याची निकड/आस, धाडस व संधी आहे त्यांना ते चोरुन मिळवण्याशिवाय पर्याय राहात नाही. बाकीचे आपल्या इच्छांचे "मूल्यनिर्णयन" करुन फँटसी व रिअ‍ॅलिटी असे दुभंग आयुष्य जगतात; आकर्षण वाटलेल्या व्यक्तींशी माफक फ्लर्टिंग करुन थोडीफार रोमांचकता मिळवतात आणि पॉर्न पाहून फँटसीची उजळणी करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूपच सुंदर प्रतिसाद आहे. व्यनि करते आहे.
___
जाऊ दे इथेच लिहीते कारण व्यनिमध्ये सुरवातीला अतिपाल्हाळ लावावे लागत आहे.-

ननि,

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा - अर्ध्या वाटेवरचे विचार

- या लेखावरचा आपला प्रतिसाद अतिशय आवडला मला. प्रत्येकालाच लैंगिक गरज अक्युट असते असे नसते. हे मला नात्यातील काही वृद्ध, विधुर-विधवा व्यक्तींकडे पाहून लक्षात आले. त्यांनी मोठा काळ एकटेपणात घालवला असूनही कोणतीही चलबिचल मला आढळली नाही की कमतरता. काही सूक्ष्म ट्रेट्स मात्र जाणवले. पण एकंदर थंड रक्त असावे असा कयास. याऊलट काही व्यक्तींना "कामप्रेरणा/कामसुखाचा ध्यास" हा शाप असतो म्हणावयास प्रत्यवाय नसावा. शाप कारण ही आदिम प्रेरणा पूर्ण होत नाही , जोडीदाराच्या शारीरीक्/मानसिक दुराव्यामुळे किंवा कशाही मुळे.
.
मी ज्योतिषात ओढले गेले त्याचे कारण हेरिडिटरी आहेच पण त्याचबरोबर हेसुद्धा आहे की कुंडली मॅचिंगने अनुकूल विवाह होतात का - हे पडताळून पहाण्याचे आकर्षण.
.
मुद्द्यावरती येते - माझ्या ओळखीतील एक स्त्री ३ रीत असल्यापासून म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षापासून मास्टरबेट करते. माहीत नाही इतक्या लहान वयात, कसे काय सापडले. पण लहानपणीही तिला घृणा वाटत नसे. ती गोष्ट देवाची "भेट" च वाटत असे - गॉड्स गिफ्ट.
.
लग्नापश्चात तिने नवर्‍याला सांगीतले होते - तू बाहेर कोणाशी संबंध ठेवलेस तर माझी हरकत नाही फक्त सुरक्षित संबंध ठेव. पण त्या बदल्यात तिलाही तेच स्वातंत्र्य अपेक्षित होते. अर्थात ते मान्य तर झालेच नाही, ती स्त्री अधिकच करकचून आवळली गेली. मला तुमच्या प्रतिसादातील सर्वाधिक आवडलेला मुद्दा हा-

त्यामुळे ज्यांना अगदीच त्याची निकड/आस, धाडस व संधी आहे त्यांना ते चोरुन मिळवण्याशिवाय पर्याय राहात नाही. बाकीचे आपल्या इच्छांचे "मूल्यनिर्णयन" करुन फँटसी व रिअ‍ॅलिटी असे दुभंग आयुष्य जगतात; आकर्षण वाटलेल्या व्यक्तींशी माफक फ्लर्टिंग करुन थोडीफार रोमांचकता मिळवतात आणि पॉर्न पाहून फँटसीची उजळणी करतात.

हे त्रिवार सत्य आहे. किंबहुना अजुन एका मुद्द्याची त्यातच भर घालते - औषधांनी काही लोक नियोजन करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा प्रतिसादांमुळे हा अंक अधिक वाचनीय झाला आहे. मान गये ननि आपको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

पुरुष स्त्री कडे आकृष्ट होतो, मग त्याची आसक्ती वाढते आणि या आसक्तीमधून मग तो जीवनावर प्रेम करायला शिकतो. याउलट स्त्री जीवनावर प्रेम करते आणि ते उपभोगण्यासाठी तिला पुरुषाची गरज भासते असे माझे आकलन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही लेख असे असतात कि ते जितक्यावेळा वाचू तितक्या वेळा वेगळं आणि नवं काही मिळत जातं.

फारच ताकदीने लिहिलेला आणि विचारांना चालना देणारा लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा लेख अत्यंत आवडला व ननिंचा प्रतिसादही भन्नाट आहे.
हा लेख पुर्ण समजला असे नाही शांतपणे पुन्हा वाचुन विचार करावा लागेल असा आहे.
तुर्तास एक फार कन्फ्युजन होत आहे ते अस की अरुण साधु यांच्या " मुखवटा" कांदबरीत मी खालील अर्थाच विधान हे नक्की

जीवनातल्या बाकी क्षेत्रांवर यंत्रयुगानं आक्रमण केलं आहे. पण ही क्रिया अमर आहे. ही अशीच अबाधित चालू राहील."

अगदी सेम टु सेम वाचल्याच आठवतय. थोडाफार शब्दांत फरक असावा पण मी हे तर "मुखवटा" मध्ये वाचल्याच आठवतय.
की अरुण साधुंनी दोन्हीकडे कदाचित हा आवडता विचार मांडला असावा. काय कळत नाही पण मला अजुन मेमरी वर कॉन्फीडन्स आहे खरा. पुस्तक वाचुन ७-८ वर्ष झालीत व ती प्रत मजकडे नाही मात्र हे वाक्य मेंदुवर कोरल गेलेल होत.
याने काहीच फरक पडत नाही फक्त एक किडा म्हणुन कोणी कन्फर्म सांगु शकेल काय की हे मुखवटा त आहे की नाही ?
बाकी उत्पल यांचा लेख प्रचंड आवडला व नीट समजुन घेण्याचा अजुनही प्रयत्न करतोय हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार….

नगरीनिरंजन - तुमचं म्हणणं बऱ्याच अंशी पटलं. या विषयाबाबत संस्थात्मक किंवा सगळ्यांना करता येईल असा उपाय नाही हे मलाही कधीकधी वाटतं. त्यामुळेच मी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे की ही 'टू वे प्रोसेस' असल्याने घर्षणरहित कधीच होणार नाही. सर्वजण अगदी पूर्ण समाधानी राहतील हे चित्र जवळजवल अशक्य आहे. पण तरीही आहे त्याहून बरी व्यवस्था असू शकेल असं वाटतं. पझेसिव्हनेस, एकनिष्ठा या कायमस्वरूपी नैसर्गिक प्रेरणा आहेत असं मला वाटत नाही. कारण तसं असतं तर एकमेकांचा कंटाळा आला नसता. या भावना मनात सीप इन होतात (इतर अनेक भावनांसारख्याच) त्यामुळे त्यांना वळवता येऊ शकतं.

प्रणव - ते अनुभवी लोकांनी अननुभवी लोकांना सांगायचं आहे. पालकांनी वा इतर मोठ्यांनी मुलांना.… रिडलेने त्या परिच्छेदात थोडी अतिशयोक्ती केली आहे हे मान्य. त्याने मुद्दा पोचवण्याकरता तसं केलं असावं.

आनंद - तुमच्याशी सहमत आहे. पण हे अर्थातच प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला लागू होणार नाही.

मारवा - 'मुखवटा' मी वाचलेली नाही. पण तुम्ही म्हणताय तसं असेल तर गंमत आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचल्यानंतर थोडं हडबल्यासारखं झालं. साहित्यकृतींतून, कानावर सहज पडणार्या संभाषणांमधून, हास्यविनोदांतून आणि प्रत्यक्ष अनुभवांतून पुरुषाची लैंगिक प्रेरणा स्त्रीपेक्षा बरीच वेगळी असते, त्यांची कामेच्छा स्त्रीपेक्षा साधारणतः अधिक असते आणि त्याच्या पूर्तेतेकडे पहाण्याचा पुरुषाचा हेतू अधिक स्वच्छ असतो इतकी जाणीव तर होतीच पण तरी इतक्या सुस्पष्टपणे आणि प्रांजळपणे केलेलं एका पुरुषाचं, स्वतःच्या कामप्रेरणांबद्दलचं कथन थोडं अस्वस्थ करून गेलं.

निसर्गतःच मिळालेल्या प्रेरणांतला असमतोल आणि फरक भाळी घेऊन कोणत्याही व्यवस्थेत दोन्ही बाजूंना संपूर्ण न्याय मिळेल याची शक्यताच धूसर असताना या आपापल्या नैसर्गिक प्रेरणा भागविण्यासाठी स्त्रीपुरुषांना एकमेकांकडेच पहावे लागते या अपरिहार्य व्यवस्थेची मौज वाटली. कुटुंबव्यवस्थेतल्या पुरुषप्रधानतेतून स्त्रीचे दमन होत आलेले आहे असे म्हणत असतानाच हीच कुटु़ंबव्यवस्था जोडीदाराबद्दलच्या एकनिष्ठतेबाबतीत स्त्रीच्या दृष्टीने किती झुकलेली आहे याचाही विचार करावासा वाटला. लैंगिक नात्याच्या आधारावर आपल्याला हवा असलेला पुरुष सर्वार्थाने आपला व्हावा, त्याच्यापासून झालेल्या संततीशी त्याने बांधील असावं आणि या संततीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीत त्याने सामिल व्हावं ही स्त्रीची आदीम प्रेरणा कुटुंबव्यवस्था बर्याच अंशी पुरवते पण हे असं बांधिल असणं पुरुषाच्या नैसर्गिक प्रकृतीच्याच विपरीत आहे याचा मात्र विचार केला जात नाही. स्त्रीच्या आनंदासाठीही कामसुख महत्वाचं असतंच पण स्त्रीसाठी अशी स्वच्छ अन्नाप्रमाणेच भूक अशी त्याची तीव्रता साधारणतः नसावी त्यामुळे "खाईन तर तुपाशी" असा माज करणं स्त्रीला परवडत असावं आणि मग समाज पुरुषाकडूनही तीच अपेक्षा करत असावा. हा असमतोल लेख वाचताना जाणवला, भारतीय संदर्भात लग्नपूर्व काळात स्त्री-पुरुषांसाठी लैंगिक मोकळेपणा नसणं अमानुष आहे हे पुन्हा आणि अधिक प्रकर्षानं जाणवलं आणि एकूणच पुरुषाच्या लैंगिकतेकडे आणि त्याच्या मानसिकतेकडे थोडं समजूतदारपणे पाहिलं पाहिजे हेही लक्ष्यात आलं. हाच समजूतदारपणा लेखकानेही स्त्रीवादाविषयी दाखविल्याने ते समजून घेणं सोपं झालं असावं.

भारतीय समाजात योनीशुचितेचं इतकं प्रस्थ माजवलेलं आहे की त्याकडे पाहण्याची नितळ दृष्टी स्त्रीकडे येणं कठीणच असतं. शाळकरी मुली बॉलिवूडी स्वप्नरंजनात गुरफटलेल्या असतात आणि त्याचवेळी वयात येणारी मुले आपल्या तीव्र शारिरीक कामप्रेरणांशी झगडत असतात. त्या दोघांना वाढवण्यात, लैंगिक शिक्षण देण्यात आणि एकमेकांच्या कामप्रेरणांकडे पहाण्याची स्वच्छ दृष्टी देण्यात आपण समाज म्हणून इतके अपयशी ठरतो की कामेच्छांच्या बाबतीत स्त्री-पुरुष दोन स्वतंत्र ग्रहावरती वावरणार्या जमातींसारख्या एकमेकांच्या मानसिकतेबद्दल अनभिज्ञ असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्द्ल आभार...

शाळकरी मुली बॉलिवूडी स्वप्नरंजनात गुरफटलेल्या असतात आणि त्याचवेळी वयात येणारी मुले आपल्या तीव्र शारिरीक कामप्रेरणांशी झगडत असतात

हे पटलं.

मुद्दा लैंगिक शिक्षणाचा, लैगि़क विषयाबाबतच्या मोकळेपणाचा आणि लैंगिक नियमनाचा आहे. या विषयावर अंतिम असं काही उत्तर सापडणं अवघड आहे, पण 'विषय हाताळायलाच नको' हे नको...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीच्या आनंदासाठीही कामसुख महत्वाचं असतंच पण स्त्रीसाठी अशी स्वच्छ अन्नाप्रमाणेच भूक अशी त्याची तीव्रता साधारणतः नसावी त्यामुळे "खाईन तर तुपाशी" असा माज करणं स्त्रीला परवडत असावं आणि मग समाज पुरुषाकडूनही तीच अपेक्षा करत असावा.

जैविक पातळीवर विचार करता स्त्रियांना आणि बहुतांश माद्यांना "खाईन तर तुपाशी" ह्याशिवाय परवडणार नाही; आणि एखाद्या (जैविक) जमातीतल्या स्त्रियांनी असा माज केला नाही तर त्या प्राणीजमातीलाही ते परवडणार नाही. ती जमात नष्ट होईल.

ह्याचं कारण असं की, आपली गुणसूत्रं टिकवून ठेवणं, त्यासाठी ती पुढच्या पिढीत पाठवणं आणि आणखी पुढच्या पिढीत पाठवणं ही सर्व सजीवांची मूलभूत प्रेरणा आहे. लैंगिक पुनरुत्पादन होतं अशा कोणत्याही प्रजातीचा विचार करू. नर आणि मादी ह्यांचा नैसर्गिक कल आपली प्रजा जन्माला घालणं आणि लवकरात लवकर त्या जबाबदारीतून मोकळं होणं अशी असते. लवकर मोकळं होण्याच्या शर्यतीत (बहुतांश प्राणी जमातींमध्ये) नर जिंकले. फार वस्तुमान नसणारा शुक्राणू दिला की त्यांचं काम झालं. मग त्यांची पद्धत अशी की अधिकाधिक माद्यांना आपले शुक्राणू देऊ करायचे आणि अधिकाधिक प्रजा निर्माण करायची.

माद्या पहिली शर्यत हरल्या त्यामुळे त्यांची योजना अशी असते की कमी प्रजा निर्माण करायची, पण जी काही प्रजा निर्माण होईल त्यांचा व्यवस्थित सांभाळ करायचा. मनुष्यांमध्ये पुरुषाला पाच मिनीटं पुरतात, स्त्रीवर निदान नऊ महिन्यांची जबाबदारी असते. मुळात बीजांडं निर्माण करणे ही प्रक्रिया स्त्रीच्या/मादीच्या शरीरासाठी बरीच खर्चिक असते. त्यात आणखी नऊ महिने ही मोठी गुंतवणूक. एवढी गुंतवणूक करून पुढच्या अपत्यात आपली फक्त ५०% गुणसूत्रंच जाणार, आणि उरलेली ५०% पुरुषाकडून/नराकडून येणार. तसं असेल तर मग निवड करताना "खाईन तर तुपाशी" केलं नाही तर कोणीही सोम्यागोम्याची, टिकून राहून मुलं पैदा न करण्याची क्षमता न बाळगणारी, मुलंही जन्माला येतील. हा त्या स्त्री/मादीसाठी घाट्याचा व्यवहार होईल.

बरं, लैंगिक प्रेरणा ही गोष्टही अशी की मुलं जन्माला घालण्यासाठी/येण्यासाठी लालूच म्हणून स्त्रीलाही कामतृप्तीचा (orgasm) आनंद मिळणार. तेव्हा होणाऱ्या गर्भाशयातल्या हालचालींमुळे शुक्राणू बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार.

उत्क्रांतीच्या ह्या पद्धतीतच स्त्री-पुरुष (किंवा नर-मादी) संघर्ष आहे; पुरुषांना अधिकाधिक स्त्रिया हव्या असतात; आणि ह्याच स्त्रियांनी 'खाईन तर तुपाशी' हा माज बाळगणं त्यांच्यासाठी आणि पर्यायाने प्रजातीच्या भल्यासाठी आवश्यक असतं.

समाज म्हणून आपण ह्या नैसर्गिक संघर्षाची धार कमी करू बघत आहोत.

---

एवढं सगळं अवांतर करून झाल्यावर, उत्पल, लेखाबद्दल विचार करत आहे. जीवशास्त्र समजलं म्हणून उपाय लगेच सुचतो असं नाही. उपाय शोधतानाही कोणावर अन्याय होऊ नये, अशा प्रकारची नैतिकता सोडून देता येत नाही.

रुचीच्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल विशेष सहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला, सगळे आयाम कळण्यासाठी अजून काहीवेळा वाचावा लागेल,

आपण जे जे काही करतो, त्याचं मूल्यनिर्णयन होऊच शकतं. आपण आपल्या कृतीच्या मूल्यनिर्णयनाची सवय लावून घेणं चांगलंच. कारण त्यामुळेच 'उपभोक्ता' म्हणून जगत असताना आणि बऱ्याच अंशी ते अपरिहार्य आहे हे मान्य असतानासुद्धा 'माणूस' म्हणून माझी अमुक कृती योग्य/अयोग्य/आवश्यक/अनावश्यक आहे का हा विचार मनात जागता राहू शकतो."

हे मला उत्पलच्या एकूण मेंदूमागचंच इंजिन वाटतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे 'आता तुला एक खेळणं दिलंय, तर तू शेजारच्या मुलाचं खेळणं कशाला मागतोस?' हा ‘नियमनाचा' विचार आणि 'मी तुला पुरेसा/पुरेशी नाही का?' हा दुखावलेल्या मनाचा एक विचार असतो.

आमचे गुरुजी सांगायचे हॉटेल वाल्याच्या पोराला किराणा दुकानातला सुकामेवा खावासा वाटतो तर किराणा वाल्याच्या मुलाला हॉटेलातली भजी खावीशी वाटतात. नाविन्य वा विविधतेच आकर्षण हे असतच. हल्ली हॉटेलमधे फार गर्दी होते. लोकांना काय घरी खायला मिळत नाही की काय? अस मला पुर्वी वाटायच.
एवढी भूक लागली होती तर हॉटेल मधे जाउन खायचं. आमचे डबे कशाला हुंगायचे?
येथे लघवी/ शौच करु नये ही जागा नेहमी तुंबलेल्यांना का सोयीचे असते? जवळपास कुठे स्वच्छतागृह नसते. अन घाईची लागली तर काय करायच? तोंड दाबून बुक्क्यांचा मार. मोकळ तर व्हावच लागत.
लैंगिकतेचा समतोल राखण्यात जी एनर्जी खर्च होते तिचा सदुपयोग दुसरीकडे कुठे करता येईल का हा वादाचा मुद्दा आहे. लैंगिकतेचा असलेला नैतिकतेशी अतूट संबंध हा नव्याने जोडावा लागेल. खूप कालावधी जाईल त्यात. सामाजिक लैंगिकतेचा बँड खूप मोठा आहे.लैंगिकतेचा गुंता सोडवताना काही गाठी सुटणार नाही. काही सोडवण्याचा प्रयत्न केला तर अधिक अधिक घट्टच होत जातील.
बोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात. त्या व्यक्तिवरचे संस्कार हे एक महत्वाचे कारण असते, जेव्हा एखाद्याचे अन्न हे दुसर्‍याचे विष बनते त्यावेळी त्यांचे सहजीवन अशक्य बनते. पण दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत. त्यामुळे विकृती हे देखिल प्रकृतीच आहे पण समाजाला मान्य नसलेली. कारण त्यामागची प्रेरणा नैसर्गीकच असते. लैंगिकतेचा मुद्दा थोडाफार असाच आहे. लैंगिकतेवर काही विश्लेषण करण हे देखील एखाद्याच्या लैंगिक छळाच्या कल्पनेत बसू शकत.
उत्पलचा लेख चांगला आहे. मंगला सामंत अपवाद वगळला तर बाकीच्या स्त्रीवादी/स्त्री समतावादी/ स्त्री स्वातंत्र्यवादी लेखिका याविषयी फारस लिहित नसावेत. उत्पलचे निरिक्षण हे चांगल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला नव्याने विचार करावा लागेल कित्येक गोष्टींचा हा लेख वाचून. नवीच दृष्टी मिळाल्यासारखी वाटतेय. मनापासून नमस्कार सर. खूप खूप भावलं लिखाण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार…

@ प्रकाश घाटपांडे -

सामाजिक लैंगिकतेचा बँड खूप मोठा आहे.लैंगिकतेचा गुंता सोडवताना काही गाठी सुटणार नाही. काही सोडवण्याचा प्रयत्न केला तर अधिक अधिक घट्टच होत जातील.

विकृती हे देखिल प्रकृतीच आहे पण समाजाला मान्य नसलेली. कारण त्यामागची प्रेरणा नैसर्गीकच असते. लैंगिकतेचा मुद्दा थोडाफार असाच आहे. लैंगिकतेवर काही विश्लेषण करण हे देखील एखाद्याच्या लैंगिक छळाच्या कल्पनेत बसू शकत.

पटलं..

@ अदिती - स्पष्टीकरणाबद्दल आभार….माझा मुद्दा अधिक स्पष्ट व्हायला मदत झाली. 'नॅचरल हिस्टरी ऑफ रेप'मध्येही हा आशय आला आहे. मला याबाबत अधिक समजून घ्यायला आवडेल.

आपली गुणसूत्रं पुढच्या पिढीत पाठवणं ही सजीवांची मूलभूत प्रेरणा आहे

खरं आहे. पण मूल नको असणारेही काहीजण आहेत. मी त्यातलाच. अशांचा बहुधा वेगळा अभ्यास करावा लागेल…:)…

समाज म्हणून आपण ह्या नैसर्गिक संघर्षाची धार कमी करू बघत आहोत….

हो, आणि ते आवश्यकही आहे. मात्र त्याचे काय परिणाम होऊ शकतील याबाबत उत्सुकता आहे.

उपाय शोधताना कुणावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची नैतिकता सोडून देता येत नाही

हो. पटलं. पण तू म्हणते आहेस तसं उत्क्रांतीच्या पद्धतीतच संघर्ष असल्याने, हे नातंच द्वंद्वात्मक असल्याने हे कसं साध्य करायचं हा प्रश्न आहे.

जीवशास्त्र समजलं तरी उपाय लगेच सुचतो असं नाही.

हे करेक्ट आहे. फक्त जीवशास्त्र समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे…:)…कारण बऱ्याच मानवी प्रेरणांचं मूळ तिथे सापडू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं आहे. पण मूल नको असणारेही काहीजण आहेत. मी त्यातलाच. अशांचा बहुधा वेगळा अभ्यास करावा लागेल…:)…

गुणसूत्रं पुढच्या पिढीत पाठवणं ही मूलभूत प्रेरणा आहे असं म्हटलं तरी निसर्गातच त्याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ समलैंगिकता. त्याबद्दलही स्पष्टीकरणं शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो.
पण मुद्दा त्यापेक्षाही व्यापक आणि तुझ्या लेखातल्या विचारांच्या दिशेकडे जाणारा आहे. निसर्गाचा नियम आहे म्हणून तो तसाच्या तसा पाळावा का; ह्याचं उत्तर समाज म्हणून कळीचं आहे. निसर्गनियम हे वर्णन आहे, अपेक्षा नाहीत.

'नॅचरल हिस्टरी ऑफ रेप'मध्येही हा आशय आला आहे. मला याबाबत अधिक समजून घ्यायला आवडेल.

पुस्तकाच्या संदर्भाबद्दल आभार. जरूर वाचून काढेन. (कधीतरी ह्या विषयावर लिहायलाही मला आवडेल. मुहूर्त कधी लागतोय ते बघू!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख फार आवडला. त्यानं अजून काही प्रश्न पाडले. (हे लेख चांगला असण्याचं द्योतकच.)

लेखक पुरुष असण्यातून येणार्‍या गरजांविषयी आणि कोंड्यांविषयी बोलतो आहे खरा. पण हे पुरुषसापेक्ष किती आणि व्यक्तीसापेक्ष किती? ते कसं ठरवायचं? काही काही बाया असतीलच ना, ज्यांच्या लैंगिक गरजा तीव्र असतील? फक्त आपल्याकडे त्यांना तसं म्हणायचीही मुभा नाहीच आहे. काही शतकांपूर्वी यमी तसं म्हणाली असेल, तरी त्याला आपण वंशविस्ताराची निकड असं लेबल लावल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मग आज - आत्ता तुमच्याआमच्याबरोबरची बाई - असं म्हणाली, तर? अब्रह्मण्यम. निहार सप्रेंच्या लेखात म्हटलं आहे तसं, अल्टिमेट काइन्ड ऑफ डिस्ट्रॅक्शन. त्याला आपण 'का' असा प्रश्न विचारत नाही कधीच. तसंच 'पुरुषाला बाबा अशी अशी निकड असते,' यालाही नाही विचारत. का? का असते अशी निकड? खरंच यच्चयावत पुरुषांना असते का? कारण 'यच्चयावत बायांना अशी निकड न-स-ते-च.' असं विधान लोक छातीठोक करतात आणि ते खोटं आहे हे मला माहितीय. मग हे तरी विधान पूर्ण खरं कसं मानावं?

अर्थात - हे स्वैर सुटलेलं डोकं. त्यानं लेखातले प्रश्न रद्दबातल होत नाहीतच. उत्पल म्हणतो आहे, तसं त्यांबद्दल बोलू या तरी. मग ते प्रश्न सुटतील वा न सुटतील...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन