जलपर्णीच्या नशिबाचा पहिला फेरा : सुदान चैनीज
उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा
_________
जलपर्णीच्या नशिबाचा पहिला फेरा : सुदान चैनीज
- आदूबाळ
सहस्ररश्मी अस्ताची वाट चालत होता. आता काळोख होईल. आता आनन्दध्वजाचा दिवस उजाडेल. दिवसभर पुणक विषयाच्या कानाकोपर्यात उधळलेले आर्यचिनी भोजनशालेचे ग्राहक खगस्थानाकडे खग परतावे तसे परततील. जुनाट बंगल्याच्या प्रघानात१ उभ्या केलेल्या सुदान चैनीजमध्ये गजबज वाढेल. कुक्कुटलौल्यचोष्य२, शैजवानत्रिभर्जव्रीही३, मधुखट्ट्सार४ इत्यादी पक्वान्नांचा फन्ना उडवावयास सुरुवात होईल. भृष्टशेवयांची मागणी पुरवता पुरवता सेवकांचे नाकी जिऊ५ येतील. धनपेटिकेशी बसून या आस्थापनेचा नियोजक आनन्दध्वज अर्धोन्मीलित नेत्रांनी आपल्या नितम्बसुराकुपीतून६ घोट घोट घेईल. ऐसेच चालेल. चालत आले आहे.
मनुष्य मात्र दैवाधीन. पाच जणांचे दैव पालटण्याचा आरंभ त्या सायंकाळपासून होणार होता. परंतु दैवही निरालम्ब नसते. त्या संध्याकाळी नवदशवर्षिणी गुरुनितम्बिनी जलपर्णी सुदान चैनीजमध्ये प्रवेश करती झाली नसती, किंवा ऋत्विजाध्वर्यूसुत रुद्रप्रयागावर सरस्वती प्रसन्न असती, किंवा खुद्द आनन्दध्वजाला 'तो' दूरध्वनि आला नसता, तर ही कथाही घडती ना.
सांगतो. तयासाठीच बैसलो आहोत. सांगतो. अवधारिजो.
'तो' दूरध्वनि
आनन्दध्वजाचा स्वभाव चिंता करण्याचा मुळातच नसे. परंतु सध्या चिंतेचा भ्रमर आनन्दध्वजाभोवती जरा गुंजारव करीत होता. सुदान चैनीजचे व्यवस्थापन हाच आनन्दध्वजाचा एकमेव व्यवसाय नव्हता. रात्रीच्या सुरेची सुरई काठोकाठ भरलेली राहील, आणि दिवसा नितम्बसुराकुपीत भरण्याइतकी सुरा उरेल; एवढा चरितार्थ आनन्दध्वज चालवत असे. त्यासाठी सुदान चैनीज पुरे पडते ना.
या चित्रावर क्लिक करून मोठं चित्र बघता येईल.
दक्षिणमरहठ्ठदेशीच्या प्रत्येक मार्गपरिवहनस्थानकात 'खचाखच गचागच' नामे एक चोपडी मिळतसे. अतर्क्य कामलीलांच्या विलक्षण वर्णनांनी संपृक्त असे हे प्रकाशन पथिकांमध्ये अतिप्रिय होते. ही चोपडी वाचकांची चेतना केंद्रभागी केंद्रित करून शरीराचे अन्य भाग निश्चेतन करून टाकत असे. त्यायोगे मार्गपरिवहनमंडळाच्या खचाखच भरलेल्या आरक्तयानात मिळणारे गचागच गचके सहन करण्यासाठी वाचक-पथिकांना बळ मिळतसे. वाङ्मयाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध असतो तो असा! आनन्दध्वज या मासिकाचा संपादक होता. हे लोककार्य करण्यासाठी त्यास प्रतिमाह दशसहस्र रुपये मिळत असत. अनेक वर्षे हा क्रम अव्याहत चालू होता.
परंतु नवसहस्रकालाही आता षोडषावे वर्ष लागले. तंत्रे बदलली. हरेकाच्या हातात भ्रमणध्वनि येऊनही दशक लोटले. तेही चतुर झाले. तीन किंवा चार ग मिरवणार्या आंतरजालास धारण करू लागले. आता कामुक चलच्चित्रांश भ्रमणध्वनित असणे सामान्य गोष्ट झाली. तुरङ्गी पुरुषांचे हुङ्कार आणि बहुरङ्गी ललनांचे चीत्कार शीर्षबोण्डुक७ कानी धारण करताच स्पष्ट ऐकू येऊ लागले. ऐशा स्थितीत कोण्या टापरट्यपूर्ण दुकानी मिळणारी पिवळट चोपडी कोण वाचतो? हर हर! काळ मोठा कठीण आला.
'खचाखच गचागच'चा खप कमी होतो आहे हे मालकाच्या ध्यानी आले. हेही दैवच. पण मनुष्यस्वभाव मोठा चमत्कारिक. अधिकारी पुरुष कनिष्ठ अधिकार्यास ताडितो, कनिष्ठ त्याचे कनिष्ठास. दुखण्याचे मूलस्थान कोठे हे कोण पाहतो? तद्वत गचागचाधिपतीने आनन्दध्वजाला उत्तरदायी ठरविले. दूरध्वनिवरून बहुत निर्भर्त्सना केली. "खप वाढीव नाहीतर..." ऐशा बोलीवर बोलणे संपले.
'खचाखच गचागच'चा मालक ही एक मोठी हस्ती होती. तयाचे नाव, गाव, कुळ आनन्दध्वजास ठावे नव्हते. त्यालाच काय, फारसे कोणालाच ठावे नव्हते. गोपनीयता जणु तयाचे दुसरे नाव. मालक तो दिसतो कसा आननी हेही कोणास ठावकी नव्हते. पण बोलवा अशी की तयाची शक्ती मोठी, प्रभाव दांडगा. अनुज्ञेविना मक्षिकाही पार्श्वभाग पुसत ना. मनात आणे, तर कोणाच्याही ध्वजेतून आनन्द नष्ट करू शके. "खप वाढविला नाहीस तर खोपचियात घेऊन खपवोन टाकेन." ऐशा प्रेमळ संभाषणाने दूरध्वनि संपला. आनन्दध्वजास वृद्धश्रमण८ नेहमीसारखा कडवट लागेना.
याच चिन्तेत आनन्दध्वज असताना रुद्रप्रयाग प्रवेशिला.
रुद्रप्रयाग
"आनन्दध्वजगारू... हे घ्या!" कागदाचे दहाबारा तुकडे समोर टाकत युवक बोलता झाला. विशी-बाविशीचा, पीनोपनेत्रधारी रुद्रप्रयाग 'खचाखच गचागच'च्या अनेक अनाम लेखकांपैकी एक होता. दरमाह एक चावटकथा वाचकांचरणी रुजू करून दोसहस्र कवड्या वाजवून घेतसे. तयाचे ऋत्विजाध्वर्यू तात तयाच्या कोषात पुरेसे धन देत नसत. तयाची सोय आणि आपला मानसिक आंबटशौक पुरा करावयाचे साधन म्हणोन रुद्रप्रयाग नियमित लेखनकामाठी करीतसे.
आनंदध्वजाने भृकुटी ताणत कथेवर नजर टाकली. त्याचे मुखावर कडवट भाव पसरला.
"वच्छीची मच्छी? हे नाव आहे काय रे तुझिया कथेचे?" आनंदध्वज गरजला. "भो मित्रा, तू तर आता शुद्ध पाटिया टाकतोस की रे."
"का गारू? चिरडीस येणेस काय जाहले?"
"चांडाळा, ही तर तुझी जुनीच कथा. 'पारू तुझी लिंबं धरू?' नामे दुगस्त साली आपणच प्रकाशित केली होती." आनंदध्वज कडाडिला. "पारूची वच्छी आणि लिबांची मच्छी करून गंडवितोस काय!"
रुद्रप्रयाग अधोवदन झाला. मुखी अवकळा पसरली. स्कन्ध सम्पातले.
"गारू, मजला क्षमा कर. माझी प्रतिभा मजला सोडून गेली आहे. मजला लेखनावरोधाचा विकार९ झाला आहे. नवीन कथानके सुचेनात. नवीन पात्रे जमेनात…"
"रुद्रप्रयागा, अरे तू तर शैलीचा राजा. उपमांचा उमराव. लिहीत राहा, मार्ग सापडत जाईल."
"नाही, गारू. शैली तर आता इतकी आंगवळणी पडली आहे की मी परवा किराण्याच्या यादीत 'उभार उडीद' आणि 'टंच टोमॅटो' ऐसे लिहिले. मातेने ताडियेले."
आनंदध्वजाने मान हलविली. अतिपरिचयादवज्ञा हा सृष्टीचा नियम येथेही लागू झाला होता. जमीन कितीही सुपीक असेना, पीक निघणेसही अखेर मर्यादा असते. आंडील पाडा झाला तरी तो किती महिषींस पुरा पडणार याचे कोष्टक असते. वर्धमान ते ते चाले, मार्ग रे क्षयाचा. इत्यादी.
"थोडे महिने लेखनसंन्यास घ्यावा, रुद्रप्रयागा. प्राप्त परिस्थितीत हेच योग्य."
"गारू, हे नको. तुमची मोठी अडचण होईल. माझिया कथांना अमूप चाहतावर्ग आहे. कथा येणेचे थांबले तर वाचक नाराज होईल. म्हणोन मोडकीतोडकी का होईना, पण कथा लिहोन आणिली."
आनंदध्वजाचे हृदय हेलावले. तयाने डोळे मिटले. तेही खरेच. मालकाने आत्ताच राग दिला होता, तयात ऐसा तारांकित लेखक लुळ्या इंद्रियासारखा निश्चेष्ट पडला होता.
"काय पाहिजे तुवा? काय पाहिजे ते मिळवोन देईन. तुझिया प्रतिभेचा नळ परत वाहो लागेपर्यंत तुझिया साथीस मी आहे."
त्याच क्षणी जलपर्णीने सुदान चैनीजमध्ये प्रवेश केला, आणि ती आनंदध्वजासमोर, रुद्रप्रयागाच्या डावीकडेस येऊन टेकली.
जलपर्णी
अचानक आलेल्या व्यत्ययाने वैतागून रुद्रप्रयागाने चश्मा डावीकडे फिरविला.
...आणि डोळियाच्या बाहुल्या जणू बाहेर यायच्या घाईस आल्या!
गहूगोऱ्या वर्णाच्या लंबगोल चेहऱ्यावर टोकदार नाक होते. बोलताना शेंडा किंचित हेलकावे खात होता. आरक्त ओष्ठस्निग्धिकेने१० अंकित रेखीव, मांसल ओठ चिनी पाककृतींची मागणी करीत होते. फिकट पिवळ्या ट्यूतकाचा११ गळा चांगलाच खोल होता. त्यातून दोन घुमटांमधली भेग रुद्रप्रयागची नजर आणखी खोलात घेऊन जात होती. कंचुकीची सैटानी पट्टी ते वजनदार गुलाबजाम सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती, पण भरल्या वाटीवर श्रीखंडाचा मऊसूत डोंगर व्हावा त्याप्रमाणे आकर्षक गोलाई वर उभारली होती. हाताचिया बारीकशा हालचालीसंगे घुमटांच्या पृष्ठभागी सूक्ष्म लाटा उठत होत्या. संपूर्ण यंत्रामध्ये आकर्षक थरथराट होत होता.
केशसंभार अर्ध्या पाठीवर उतरला होता. काळसर करड्या बटांच्या विपुलतेत मध्येच एखादी जांभळी बट लक्ष वेधून घेत होती. केशसंभार संपताच दोनेक इंचात त्या फिकट पिवळ्या ट्यूतकाचे११ अवतारकार्यही समाप्त झाले होते, आणि निमुळत्या कटीच्या दोहोंबाजूस रेखीव स्नायू आपल्या अस्तित्वाच्या पुसटखुणा दाखवत होते. बरोबर मध्यभागी एक खंजीर गोंदवला होता, आणि खंजिराचे निमुळते टोक खाली खाली जात कौशेयात१२ नाहीसे झाले होते. त्या खंजिराच्या टोकाने बहुदा आतमध्ये काही गुप्तधनाची पेटी खोलली होती. झोकदार नितम्बांची डेरेदार वळणे रुद्रप्रयागाच्या मस्तकात उधम मचवून गेली. पायांत रक्तवर्णी उच्चसोपानाची पादत्राणे१३ होती.
त्या कामपुतळीच्या अंगप्रत्यंगाला रुद्रप्रयाग डोळयात साठवून ठेवत असतानाच ती वळली. धूम्रवर्णी डोळ्यांनी रुद्रप्रयागला आपादमस्तक न्याहाळिले. डाव्या भुवईच्या टोकाला टोचलेली ऊर्मिका अस्पष्ट चमकली. नाभीतले स्फटिक सुस्पष्ट चमकले.
"व्हॉट आर यू स्टेअरिंग अॅट? हॉट लडकी देखी नहीं कभी, चंदू??"
या चित्रावर क्लिक करून मोठं चित्र बघता येईल.
...आणि मुखस्तंभ उभ्या रुद्रप्रयागच्या अंगावर मेनू कार्ड भिरकावून ती चालती झाली.
---x---
"गारू…" रुद्रप्रयागच्या वदनावर जळाबाहेर काढलेल्या मीनाचे भाव होते. "काय होतं हे?"
"मित्रा रुद्रप्रयागा, अरे मुखाची झापड तरी मीट!" आनंदध्वज हसला. "आमच्या या सुदान चैनीजच्या अनेक नियमित आणि समाधानी ग्राहकांपैकी या एक आहेत. पुणक नगरीत शिकायला आहेत. शेजारच्या बंगलियात भाडियाने राहतात. इयेचे नाव जलपर्णी असे."
"गारू, मजला ही हवी." रुद्रप्रयागाच्या डोळियांत अनङ्गसुरुङ्ग विस्फोटत होते.
"बा रुद्रप्रयागा, हे सामान तुजला झेपण्याजोगे नोहे. त्वां पडलास सोवळ्यातला पापड. ती पेटलेल्या वातीचा फटाका." आनंदध्वज समजुतीच्या सुरात म्हणाला. "हां… पण तियेवरून प्रेरणा नक्की घे. या वच्छी-मच्छी गुवापेक्षा जलपर्णीस गुंफून झक्क कथा लिही पाहू…."
"गारू… मजला ही डोक्यात नको. समीप हवी. तिच्या कटीला माझिया हातांची महिरप घालावयाची आहे. तिचिया छातीचे भाले मजला माझिया छातीत रुतवून घ्यावयाचे आहेत. तिचिया ओठांचा विळखा माझिया…"
"शांत शांत…" आनन्दध्वज मिश्कीलपणे म्हणाला. "पाहू आपण. मला एका सांग, तुजला या विषयांत अनुभव किती? अगोदरची कोणी सखी? कोणी शय्यासोबतीण?"
"नाही गारू… मी धारोष्ण दुधासम निर्मळ आहे. पाकिटबन्द रेशमी फुग्यासम अनाघ्रात आहे. जितवृक्षाच्या तैलासम अजित आहे.१४"
"अरे काय सांगतोस काय!" आनन्दध्वजाचा स्वत:च्या कानावर विश्वास बसेना. "म्हणजे तुझिया विडी बंडलाचा धागा अजून कोणी तोडलाच नाही? तुझी सुपारी अजून ओलीच? स्वत:चा लिफाफा आजवर स्वहस्तेच उघडीत आलास?"
"कोडियातले बोलणे समजत नाही गारू, पण मी अजूनही शिश्नशुचिता सांभाळून आहे."
"अरे मग त्या सगळ्या रोमहर्षक कथा? त्या वाचोन माझा समज झाला की बारा बावींचे पाणी तू प्याला असणार!"
"गारू, ते सर्व माझिया प्रतिभेचे मृगजळ. माझिया मन:चक्षूंसमोर घडणारा चित्रपट मी फक्त शब्दांत पकडितो. प्रत्यक्ष क्षुधाशांतीची संधी अद्याप आली नाही."
"आणि पहिला प्रयत्न करण्यासाठी जलपर्णीच सापडली का? अरे, काञ्चनगंगेवर स्वारी करण्याआधी किमान हनुमान टेकडी तरी चढावयाचा अनुभव गाठीशी हवा रे…" रुद्रप्रयागाच्या चेहऱ्याकडे पाहून आनंदध्वजाने नि:श्वास सोडिला. "असो. गारूचा उपयोग येयासाठीच. कदाचित हीच दैवगती असेल. प्रत्यक्षाचा अनुभव घेतल्यावर तुझिया लेखणीला परत पान्हा फुटेल. जलपर्णीसही तुझियासारख्याच कोणी हवा असेल. असो."
"माझियासारखा कोणी म्हणजे?"
आनन्दध्वज गालांत मंद हसला.
"तिची आवड सर्वसामान्यांपेक्षा थोडी वेगळी आहे मित्रा. आज जे तू बघितलेस ती चित्रपटाची झलक आहे असे समज. आणि चित्रपट थोडा मारधाडपट आहे. बैस थोडा वेळ. हाक्काने शेवया खा. घटिकाभराने आपण वर सौधावर जाऊ, आणि तुला सगळे कळेलच. मग निर्णय तुझा आहे."
_________
१ पोर्च
२ चिकन लॉलीपॉप
३ शेजवान ट्रिपल फ्राईड राईस
४ स्वीट अँड सार सूप
५ चिनी भाषेत 'नऊ'
६ हिप फ्लास्क
७ हेड फोन
८ ओल्ड मॉन्क
९ writer's block
१० Lip gloss
११ T-shirt
१२ Jeans
१३ High-platform shoes
१४ virgin olive oil
_________
चित्रश्रेय : अमुक
प्रतिक्रिया
ओहोहो!! जियो!! क्या बात है.
ओहोहो!! जियो!! क्या बात है.
आबा __/\__
वाक्यावाक्याला फुटत होते
काय अब्यास, काय शैली, काय
काय अब्यास, काय शैली, काय पांडित्य, काय समयगूगलसूचकत्व, काय शैंपिकशब्दनिर्मितिपटुत्व _/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आदूबाळ आणि अमुक दोघांना
आदूबाळ आणि अमुक दोघांना कुर्निसात!!
काय कमाल शैली साधलीये, नुसती शैलीचा नाही तर स्वतंत्र कथा म्हणूनही प्रचंड इन्टरेस्टिंग प्रकरण झालंय
आणि अमुकरावांची दोन्ही चित्रे काय आहेत, काय डिटेलिंग, काय भाव, ती लेदर टाईट ललना तर जबर दिलखेचक आणि तिच्या मागचा टॅटू मिठाईवर वर्ख
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१११११११११११११११११११११११११११११११११
अमुकराव हे ऑलमोस्ट प्रतिसरवटे आहेत. _/\_
एक बाऽरीक आक्षेपः ललनेच्या चेहर्यावरचे भाव हे derision चे असावेत असे दिसते. मात्र ते derision एखाद्या हॉट ललनेपेक्षा 'हुच्चभ्रू समीक्षकाचे' जास्त वाटतेय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कहरकथा
मस्तवाल,आव्हानात्मक , टंच कथा.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत ...
वाचतोय...
.
आबा अनुक्रम किंवा दुवे टाका
आबा अनुक्रम किंवा दुवे टाका ना धाग्यात.
_____
हां आता मस्त.
आहाहाहाहाहा अप्रतिम, काय ते
आहाहाहाहाहा
अप्रतिम, काय ते आंग्लनूडलांचे मराठी शेवयीकरण.
काय ते त्रिओदनासम भारगच्च पात्रवर्णन.
जितं
आहाहाहाहाहा अप्रतिम, काय ते
आहाहाहाहाहा
अप्रतिम, काय ते आंग्लनूडलांचे मराठी शेवयीकरण.
काय ते त्रिओदनासम भारगच्च पात्रवर्णन.
जितं
एक नंबर!
ज ह ब ह र ह द ह स्त! तळटीपलेल्या शब्दांबरोबरच, 'सैटानी'सारखे शब्दही नेमके जमलेत. एकदम खचाखच गचागच! अमुकरावांची चित्रेही क्लासच; पहिले चित्र पाहून 'गणपत वाणी' आठवला - एकविसाव्या शतकातला, पोट सुटलेला आणि आर्यचिनी भोजनशाला सांभाळणारा.
एक लंबर!
एक लंबर!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
_/\_
दन्डवत घ्या...
जबरदस्तं. आंदो आंदो.
जबरदस्तं. आंदो आंदो.
आनन्दध्वज प्रथम याच्या कथा
आनन्दध्वज प्रथम याच्या कथा अद्यापावेतो पठिल्या नाहीत. परन्तु आनन्दध्वज द्वितीयचा जलपर्णीचा प्रथम फेरा पठून परम संतोष जाहला. उर्वरित फेरे कधी येकदा येताहेत अशी उत्कंठा लागली आहे. ते सत्वर प्रकाशित करावेत अशी विनंती. बाळिका चार्वीचा सिद्धहस्त, शब्दप्रभू आदूबाळकाचरणी शिरसाष्टांग दंडवत! रा. रा. अमुक यांनी कथेस चित्रित करून तीस चतुर्चन्द्र लाविले आहेत!
आयुष्यात एकच इच्छा आहे
आयुष्यात एकच इच्छा आहे प्यारीसचा तावर आणि आदूबाळ नामक माणसाला भेटणे.
अफाटकहरकेलाय
चित्रे फारच छान.
एकच लेख आख्खा अंक पेलतोय.
आबा बघा तुम्ही टॉवरींग
आबा बघा तुम्ही टॉवरींग पर्सनॅलिटी झालात.
ऑफिसात हसू आवरता आवरता नाकीनौ
ऑफिसात हसू आवरता आवरता नाकीनौ आले.
पुढचे भाग लौकर येऊद्यात..
याला म्हणतात प्रतिभा!
काय ती असामान्य प्रतिभा! कुक्कुटलौल्यचोष्य, शैजवानत्रिभर्जव्रीही, मधुखट्ट्सार वगैरे शब्द काय, "पारू तुझी लिंबं धरू" काय, जितवृक्षाच्या तैलासम अजित काय...कहर आहे! त्यात आपल्या अमुकरावांच्या रेखाचित्रांनी अजूनच मजा आलीय. टाळ्या! शिट्या आणि पुढल्या भागांची प्रतिक्षा!
मारधाडीच्या उल्लेखाने या रूद्रप्रयागाचे प्राक्तन आपल्या स्थानिक मध्यमवर्गियासारखेच असणार आहे की काय अशी शंका आली.
फडकलाय... टीप- वारली भाषेत
फडकलाय...
टीप- वारली भाषेत कामक्रीडा करणेस- चला फडकुलं जांव असे म्हणतात
ही कथा पूर्ण वाचल्यानंतर
ही कथा पूर्ण वाचल्यानंतर 'कायरे, काय माणूस आहेस की आदूबाळ?' असा वाक्प्रचार प्रचलित करण्याची इच्छा झालियसी आहे.
आॅफिसात हे वाचणे डेंजरस आहे
"नाही, गारू. शैली तर आता इतकी आंगवळणी पडली आहे की मी परवा किराण्याच्या यादीत 'उभार उडीद' आणि 'टंच टोमॅटो' ऐसे लिहिले. मातेने ताडियेले."
हे अगदीच तंताेतंत रोफल आहेय.
आॅफिसात वाचत असल्याचा पश्चात्ताप होतोय, माझ्याकडे संशयाने पाहू लागलेत सहकारी. हसून हसून पुरेवाट.
This too shall pass!
धाग्यास पुन्हा वर आणलेच
धाग्यास पुन्हा वर आणलेच पाहिजे. कोणाचा मिस झाला असेल तर.
केव्हाही उघडून वाचावा, हसून श्वास मोकळा करुन घ्यावा.
आबा म्हणजे भारी लेखक.
आबा म्हणजे भारी लेखक.
लै म्हन्जे..लैच..भारी...