पॉर्नबद्दल कायदा काय सांगतो?

मुलाखत

पॉर्नबद्दल कायदा काय सांगतो?

- मस्त कलंदर

'पॉर्न' या विषयाची कायदेशीर बाजूही समजून घ्यायला हवी, म्हणून आम्ही वकील विकी शाह यांची या अंकासाठी मुलाखत घेतली.

कायद्याचा तराजू आणि तलवार

कायद्याच्या भाषेत पॉर्नची व्याख्या कशी करता येईल?

खरं सांगायचं तर भारतीय संविधानात 'पॉर्न' या शब्दाची व्याख्याच केलेली नाही. जे काही आहे ते 'अश्लीलते'च्या संदर्भाने म्हटले गेले आहे. अश्लीलतेची व्याख्या आहे. आणि व्याख्येसोबत जोड्लेली विशेषणे अधिक अर्थ विशद करतात. उदाहरणार्थ - कामोत्तेजक (lascivious), मनमोहक (appealing), लैंगिकरस असलेली (prurient interest), कुमार्गाला लावेल अशी (deprave) - अशी गोष्ट पाहणं, वाचणं, ऐकणं हे कायद्याने निषिद्ध आहे. 'पॉर्न'ची मात्र कायद्याच्या दृष्टीने शब्दश: व्याख्या नाही.

भारतीय दंडविधानानुसार पॉर्न पाहणे, जवळ बाळगणे, त्याचं वितरण करणे, पॉर्न तयार करणे आणि पॉर्नचे आदान-प्रदान करणे याबद्दल काय कायदे आहेत?

पॉर्न पाहायला कायद्याची आडकाठी नाही. बंद खोलीत किंवा सार्वजनिक नसलेल्या अशा खाजगी ठिकाणी नागरिक पॉर्न पाहू शकतात. मात्र पॉर्न जवळ बाळगणं, त्याचा साठा करणं, वितरण किंवा आदान-प्रदान करणं हे मात्र गुन्हे आहेत.

पॉर्न पाहणं गुन्हा नाही, पण जवळ बाळगणं किंवा साठा करणं हा गुन्हा आहे. मग हे सगळं प्रकरण चालतं कसं?

भारतीय माहिती-तंत्रज्ञान कायदा हा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या पॉर्नबद्दल आहे. त्यांचे सर्व्हर्स भारतात नसतात. बऱ्याचशा भारतीय पॉर्न चित्रफिती पाहिल्या (मल्लू / देसी पॉर्न), तर कुणी त्यात स्वत:हून व्यावसायिकरित्या काम करतं असंही दिसत नाही. लपवलेल्या कॅमेऱ्यातून हे चित्रीकरण होत असतं. कधीकधी ते जोडपं स्वत:साठी म्हणून रेकॉर्ड करतं आणि ते चुकीच्या हाती पडून त्या पॉर्नफितीचा प्रसार होतो. अशा वेळेस ती चित्रफीत नक्की कुणी अपलोड केली हे शोधून काढणं महत्त्वाचं ठरतं. जर त्या जोडप्याने स्वत:च तो व्हिडिओ अपलोड करून त्याचा प्रसार केला असेल, तर अशा वेळेस पूर्ण चित्रच पालटतं.

लहान मुलांना पॉर्नमध्ये वापरले जाऊ नये, म्हणून एखादा कायदा अस्तित्वात आहे का?

हो. लहान मुलांना अशा कामांसाठी वापरणं हा आंतराष्ट्रीय स्तरावरच खूप मोठा गुन्हा मानला जातो. भारतीय माहिती-तंत्रज्ञान कायद्याबद्दल म्हणाल तर कलम ६७ब हे लहान मुलांना पॉर्नमध्ये वापरण्याच्या विरोधात आहे.

लहान मुलांना कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये सहभागी असलेले दाखवणाऱ्या इ-साहित्याचे प्रकाशन किंवा प्रसारण करणं यासाठी कायद्याने शिक्षा आहे. या ई-साहित्यात चित्रफिती, छायाचित्रं, मजकूर, डिजिटल छायाचित्रं अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. अशा गोष्टी तयार करणं, जमवणं, शोधणं (seeks), आंतरजालावर शोधणं (browse), डाऊनलोड करणं, त्यांची जाहिरात करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, आदानप्रदान करणं किंवा वितरित करणं हा गुन्हा आहे. ऑनलाईन नातेसंबंधांत (इंटरनेटच्या माध्यमातून) लैंगिक क्रियेसाठी मुलांच्या मनात भावना वाढीस लावणं, त्यांना फूस लावणं (Cultivate, entice or induce) हे सारे गुन्हे मानले जातात. लहान मुलांचा कायद्याच्या दृष्टीने खूपच विचार केला जातो. त्यांच्यासाठी अनैतिक मानवी तस्करीविरोधातला कायदा आहे, लहान मुलांसंबंधी संरक्षण कायदा (चिल्ड्रेन प्रोटेक्शन अ‍ॅक्ट) आहे. अशा चार-पाच कायद्यांमधून मुलांचे शोषण, लैंगिक शोषण आणि तस्करी या सर्वांविरोधात मुलांचे रक्षण केले जाते.

एखाद्या व्यक्तीच्या नकळत आणि अर्थातच परवानगीशिवाय त्या व्यक्तीच्या समागमाच्या वेळेस ध्वनीचित्रफीत बनवल्यास अशा चित्रफितीला पॉर्न म्हणावे का?

कायद्यामध्ये 'पॉर्न'ची व्याख्या नसल्याने याला पॉर्न म्हणता येणार नाही. परंतु तो त्या व्यक्तींच्या कॉपीराईटचा भंग आहे. तसेच कलम ६६-इ नुसार हे कृत्य त्या व्यक्तींच्या खाजगीपणाचा भंग (Violation of Privacy) ठरते. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी अवयवाचे तिच्या संमतीशिवाय चित्रीकरण आणि / किंवा प्रकाशन करणे आणि ते एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवणे हा गुन्हा आहे. फक्त हे पॉर्नोग्राफीच्या अंतर्गत येत नाही. इथे अश्लीलता असू शकते. त्यामुळे अश्लीलतेचे कलम लागू पडू शकते.

कायद्याने पॉर्नची व्याख्या केली नसली तरी पर्यायी (options) कलमांमधून व्याख्या दिल्या गेल्या आहेत.

भारतात वेगवेगळ्या राज्यांत पॉर्नवषयी वेगवेगळे कायदे आहेत का?

वेगवेगळ्या देशांत यासंबंधी निरनिराळे कायदे असले, तरी भारतात सर्व राज्यांसाठी 'अश्लीलते'विरोधात समान कायदा आहे.

पॉर्न किंवा अश्लीलतेसंबंधी काही महत्त्वाचे / प्रसिद्ध खटले आहेत का?

सर्वोच्च न्यायालयातले काही किंवा मुंबई उच्च न्यायालयातले काही खटले आहेत. उदाहरणार्थ, लोणावळ्याला २००८मध्ये एक रेव्ह पार्टी झाली होती आणि तिथे लोक पॉर्न चित्रपट पाहत होते. जिथे पार्टी आयोजित केली गेली होती, तो एक खाजगी बंगला होता. ती काही सार्वजनिक जागा नव्हती. त्यामुळे 'खाजगी ठिकाणी अश्लील चित्रपट पाहणे बेकायदेशीर नाही' असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

मोना सिंग खटल्याच्या संदर्भात काय घडले? कारण तोही एक गाजलेला खटला होता.

या खटल्याच्या बाबतीत 'मी ती नव्हे आणि तो मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे' अशी मोना सिंगची भूमिका होती, त्यामुळे तिथे व्यक्तीच्या परवानगीवाचून चित्रीकरण करण्यासंबंधीचं कलम लागू होत नाही. तो अश्लील एमएमएस ज्या वेबसाईटवर अपलोड केला गेला होता, त्या वेबसाईटच्या सी.ई.ओ.ला अटक करण्यात आली. आणि या केसमुळे आय. टी. कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. त्या दृष्टीने हा खटला महत्त्वाचा ठरतो.

भारतात 'पॉर्न' चित्रपट प्रताधिकारयुक्त करता येऊ शकतो का?

नाही. कारण पॉर्न चित्रपट ही संज्ञाच भारतीय चित्रपटव्यवसायामध्ये अधिकृतपणे लागू नाही. 'कामसूत्र' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली नाही, त्यामुळे तो चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यात आला. जेव्हा चित्रपट बनवण्याच्या कलेच्या अभिव्यक्तीचा प्रश्न येतो, तेव्हा चित्रपटाची कथाही पाहिली जाते आणि त्या अनुषंगाने चित्रपटास परवानगी देण्यात येते किंवा नाही. सबब भारतात कायद्याने पॉर्न चित्रपटाचा, म्हणजेच अश्लील चित्रपटाचा, प्रताधिकार घेणं शक्य नाही.

भारतात पॉर्न चित्रपटामध्ये काम करणाऱ्या लोकांचं हित जपणारे काही कायदे किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही अधिकृत संघटना आहेत का?

अश्लीलता कायद्याला मान्य नसल्यामुळे पॉर्न चित्रपटवाल्यांची संघटना किंवा नोंदणीकृत गट मुळातच असू शकत नाही. विशाखा कायद्याप्रमाणे लैंगिक छळाच्या विरोधात सर्वसामान्यांना असलेले जागतिक आणि राष्ट्रीय कायदे त्यांनाही लागू पडतात. अर्थात तीही मुख्यत्वे मार्गदर्शक तत्त्वंच आहेत. पण त्यांच्यासाठी काही खास असे वेगळे कायदे नाहीत.

दुसरं म्हणजे, काही देशांत आहे, तशी भारतात पॉर्न इंड्स्ट्रीही नाही. इथे सर्वसाधारणपणे वेश्या किंवा कॉलगर्ल्स अशा चित्रपटांत काम करतात. पॉर्नस्टार हा अधिकृत व्यवसाय असणारे लोकही भारतात नाहीत. त्यामुळे लैंगिक छळाच्या विरोधात ते कलाकार दाद मागू शकतात, पण पॉर्न चित्रपटामध्ये काम करणाऱ्यांसाठी म्हणून काही खास कायदे नाहीत.

पॉर्नसाठी तस्करीसंबंधी काही कायदे, नियम किंवा खटले, असा काही विदा आहे का?

भारतात दर वर्षी किती पॉर्न चित्रपट / चित्रफिती बनतात, यावर अधिकृत असं सर्वेक्षण अजून झालेलं नाही. त्यामुळे कलाकारांची संख्या, आयात केले गेलेले / निर्यात केले गेलेले चित्रपट / चित्रफिती, असा काही विदा उपलब्ध नाही. जे काही लोक निर्यात केले जातात, तेही शरीरविक्रयासाठी केले जातात, खास 'पॉर्नसाठी तस्करी झालेले लोक' असा आकडा उपलब्ध नाही. कायद्याच्या भाषेत म्हणाल, तर मानवी तस्करी ही एकच संज्ञा आहे. पॉर्नसाठी तस्करी असं काही वेगळेपण त्यात नाही.

कायद्यातल्या पळवाटांमुळे किंवा तसा काही कायदा अस्तित्वातच नसल्यामुळे पॉर्न कलाकारांना काही छळवणुकीस सामोरे जावं लागतं का? त्यांना पोलिसांकडूनही काही त्रास होतो का?

पुन्हा तसंच म्हणेन. अशी अधिकृत संघटनाच अस्तित्वात नसल्याने याची आकडेवारी उपलब्ध नाही. अश्लीलता कायद्याने निषिद्ध असल्याने अशा लोकांना लपूनछपून काम करावे लागते आणि ते माहीत असल्यास पोलिसांकडून त्रास होण्याचा धोका नक्कीच आहे. परंतु असे विशिष्ट खटले आजवर दाखल झालेले नाहीत.

पॉर्न पाहण्याच्या व्यसनामुळे घटस्फोट होणं किंवा कुटुंबाचा समतोल बिघडणं यावरून काही खटले कोर्टात आलेले तुम्ही पाहिले आहेत का?

फक्त पॉर्नच्या व्यसनामुळे झालेली घटस्फोटाची प्रकरणं खूप कमी आहेत, जवळजवळ नगण्यच. बरेचदा घटस्फोटाचे खटले हे व्यभिचारामुळे किंवा विवाहबाह्य संबंधामुळे दाखल होतात. समाधानकारक नसलेलं नातं, विसंवाद ही कारणंदेखील आहेतच. गेल्या वर्षीचं 'इंडिया टुडे'चं सर्वेक्षण पाहिलंत, तर शहरी भागात सर्वसाधारणपणे ७५% जोडपी सेक्सचा आनंद लुटतात. त्यामुळे सेक्सलाईफसाठी पॉर्न आणि मग त्यातून होणाऱ्या विसंवादातून घटस्फोट असं चित्र नसावं. अर्थात यात विवाहित आणि अविवाहित अशी दोन्ही जोडपी आहेत. 'इंडिया टुडे'कडून बहुतेक दर दोन वर्षांनी हा सर्व्हे केला जातो. त्यात पॉर्न आणि पॉर्नचं व्यसन यांचं लोकांमधलं असलेलं प्रमाण हाही मुद्दा विचारात घेतला जातो.

पॉर्न पाहण्याच्या व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या किंवा विवाहित जोडप्यांत ताण-तणाव निर्माण होण्याची काही प्रकरणं तुम्ही पाहिली आहेत का?

पॉर्नचं व्यसन लागणं किंवा जोडीदाराकडून आपल्या फॅंटसीज पुऱ्या होण्याची अपेक्षा असणं हे एक कारण असू शकेल, पण तेच एक कारण घटस्फोटाच्या मुळाशी असेल असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. कारण घटस्फोटांची कारणं गुंतागुंतीची असतात.

पती-पत्नीच्या नात्यावर पॉर्नचे दुष्परिणाम झाल्याच्या केसेस कोर्टात येतात का?

खरंतर हे सगळं व्यक्तीपरत्वे बदलतं. पॉर्न आणि वास्तव जग कुणीही व्यक्ती कितपत समंजसपणे स्वीकारू शकते त्यावर ते अवलंबून आहे. कित्येकदा असंही होतं, की शरीराच्या गरजा असतात; पण काही कारणाने किंवा शारीरिक ताकदीमुळे त्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा वेळेस पॉर्न मदतीला येतं आणि त्यांना त्या आवेगाचा आनंद घेता येऊ शकतो. त्यामुळे भारतीय वातावरणाचा विचार करायचा तर बरेचदा पॉर्नची नातेसंबंधामध्ये मदत होतो. समाजजीवनावर मात्र तसाच परिणाम होतो असं मात्र म्हणता येणार नाही. नातेसंबंधावर होणाऱ्या पॉर्नच्या परिणामापेक्षा, त्याचा समाजावर अधिक विघातक परिणाम होतो.

भारतातले यासंबंधीच्या कायद्यांचं मूळ कशात आहे? काही धार्मिक संकल्पना किंवा व्हिक्टोरिया राणीच्या काळातले ब्रिटिश नियम की इतर काही?

आपला प्राचीन इतिहास पाहता, भारतात 'कामसूत्र' हे सेक्सचा सांगोपांग विचार करणारं साहित्य उपलब्ध आहे. त्यात समलैंगिकांपासून किन्नरांपर्यंत सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. जे सगळं त्या काळी जर समाजमान्य होतं, तर आताच्या काळात कायद्याने थांबवता येण्यासारखं काहीच असू नये. तसंही पॉर्न पाहणं हे स्वेच्छेने होते. जर ते बळजबरीने लादलं गेलं तर मात्र त्यावर आक्षेप घ्यायला हवा.

सध्याचा भारतीय कायदा एकाच गोष्टीवर अवलंबून आहे असं नाही. एकुणातच, कोणत्याही संविधानात कायदा ही विकसनशील गोष्ट आहे. तो एकदाच बनवून पिढ्यानपिढ्या लागू करता येत नाही, तो काळानुरूप बदलायलाही हवा आणि तो बदलतोही. काही धर्मांमध्ये अशा गोष्टींना मनाई असू शकेल. ते त्या-त्या धर्माच्या रीतिरिवाजांना किंवा तत्त्वांना धरून असेल. त्यामुळे आता कुणी त्याला चुकीचं म्हणत असेल, तर ते सगळ्यांसाठी चुकीचं असेलच असं नाही. त्यामुळे एखाद्या धर्माप्रमाणे कायदा चालणं हे विवेकास धरून नाही. बरेचदा कायद्यानेही काही जातिधर्मांच्या रीतिरिवाजांवरती आक्षेप घेऊन ते बंद पाडले आहेत.

या मुलाखतीतून काही शंकांचं निरसन नक्कीच होईल ही आशा आहे. या मुलाखतीबद्दल 'ऐसीअक्षरे.कॉम' विकी शाह यांचे ऋणी आहे.

***

चित्र जालावरून साभार

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण. मला वाटतं पॉर्न नक्की कशाला म्हणावं याची व्याख्या करणं कठीण जातं. अश्लीलतेची व्याख्या तर अजूनही कठीण. गेल्या काही शतकांत लोकांची नजरही बदलली आहे. एके काळी स्कर्टची लांबी कमी होऊन गुडघ्याच्या आसपास यायला लागली तेव्हाही लोकांना ते अश्लील वाटलं होतं. यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या मध्ये स्विमसूट घातलेली बाई दाखवली तेव्हाही लोकांना तो कहर वाटला होता. आता सर्रास हिरोच्या मागे पंधरा बायका टू पीस घालून नाचतात तेव्हा काही वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संविधानात 'पॉर्न' या शब्दाची
व्याख्याच केलेली नाही. जे काही आहे ते 'अश्लीलते'च्या
संदर्भाने म्हटले गेले आहे. अश्लीलतेची व्याख्या आहे. आणि
व्याख्येसोबत जोड्लेली विशेषणे अधिक अर्थ विशद करतात.
उदाहरणार्थ - कामोत्तेजक (lascivious), मनमोहक
(appealing), लैंगिकरस असलेली (prurient interest),
कुमार्गाला लावेल अशी (deprave) - अशी गोष्ट पाहणं,
वाचणं, ऐकणं हे कायद्याने निषिद्ध आहे. 'पॉर्न'ची मात्र
कायद्याच्या दृष्टीने शब्दश: व्याख्या नाही.

ते हैदोस वगैरे मासिकात सदरिल मजकुर अश्लील नाही वगैरे कायदेशीर इशारा छापलेला असायचा ते कसं काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

१)पॅार्नची परदेशात काय व्याख्या आहे?
२) अश्लिलसाठी इंग्रजीत आणि कायदे /न्यालयात कोणता शब्द वापरला आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यासाठी या मुलाखतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण भारतीय कायदा पॉर्नबद्दल मौन बाळगतो, तो अश्लीलतेबद्दल बोलतो ही बहुमोल माहिती मला या मुलाखतीतून मिळाली. त्यानं माझ्या डोक्यातले काही ब्लॉक्स ढासळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बंद खोलीत किंवा सार्वजनिक नसलेल्या अशा खाजगी ठिकाणी नागरिक पॉर्न पाहू शकतात. मात्र पॉर्न जवळ बाळगणं, त्याचा साठा करणं, वितरण किंवा आदान-प्रदान करणं हे मात्र गुन्हे आहेत.

म्हणजे फक्त streaming वाटतं. पण ईन्टर्नेटच्या पुर्वी हे कसं काय शक्य होते?

बादवे १९४७ पासून किती लोकांवर असे गुन्हे नोंदवले आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0