मराठी नाटकांमधील अश्लीलता

ललित

मराठी नाटकांमधील अश्लीलता

- विसुनाना

मराठी साहित्याचा एक मोठाच अवकाश नाटकांनी व्यापलेला आहे. किंबहुना, मराठीतील अनेक लहान-मोठे लेखक कधी-ना-कधी नाटक लिहिण्याकडे वळलेले आहेत किंवा त्यांच्या कथा-कादंबर्‍यांची नाट्य-रूपांतरे झालेली आहेत. पहिली मराठी कादंबरी 'यमुनापर्यटन' इ. स. १८५७मध्ये लिहिली गेली, तर पहिले मराठी नाटक 'सीता-स्वयंवर' २५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदास भाव्यांनी सांगली येथे सादर केले. याचा अर्थ असा की मराठी नाटक हे मराठी कादंबरीपेक्षाही जुने आहे. शिवाय नाटक या साहित्य प्रकाराचे गुणात्मक महत्त्व हे आहे, की नाटक समजण्यासाठी प्रेक्षकाने साक्षर असण्याची गरज नसते. हे साहित्य 'दृक्श्राव्य' पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असल्याने त्यामधले विचार कोणत्याही विशिष्ट तयारीविना प्रेक्षक समजावून घेऊ शकतो. या प्रेक्षक-वाचक फरकामुळे, कला अथवा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणारा, नाटक हा साहित्यप्रकार सर्वाधिक प्रभावी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे या साहित्यप्रकारातली अश्लीलताही समाजात सहजपणे प्रसिद्धी पावते.

अश्लीलतेची स्थलकालातीत संकल्पना माणसाच्या लैंगिक व्यवहारांशी संबद्ध असते. 'लैंगिक व्यवहार' ही बाब इतर सर्व दैनंदिन व्यवहारांइतकीच सर्वसाधारण असूनही तिच्यावरच्या विविध निर्बंधांचा इतिहास अगदी विश्वनिर्मितीच्या काल्पनिक इतिहासापर्यंत (बायबल-जेनेसिसमधली 'आद्य पाप' संकल्पना) जोडता येतो. हे जरी खरे असले, तरी अश्लीलतेच्या व्यावहारिक व्याख्या या त्या-त्या संस्कृतीवर, सभ्यतेवर अवलंबून असतात आणि सभ्यता ही स्थलकालान्वये बदलणारी समाजरचना असते. "Obscenity is a function of culture - a function in the mathematical sense, its value changing with that of the variables on which it depends. " - असे म्हटले गेले आहे. 'अश्लीलता' हा विषय मुळात समाजमान्य 'श्लीलतेच्या' संकल्पनांवर आधारित असल्याने त्याला साहजिकच स्थल-कालाच्या मर्यादा येतात. 'मराठी नाटकांमधील' या दोन शब्दांनी प्रस्तुत विषयाची मर्यादा स्पष्ट होते. अतिप्राचीन भारतीय समाजातले 'यूथ' यज्ञभूमीजवळ एकत्र येऊन उघड लैगिक व्यवहार करत असत असे, असे वि. का. राजवाड्यांनी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकात नमूद केलेले असले; तरी त्या काळापासून ते मराठी भाषेत नाट्यलेखन होण्याच्या काळापर्यंत इथला समाज सभ्यतेच्या कडेकोट मर्यादांमध्ये बंदिस्त झालेला होता. या मर्यादांमुळे मराठी जनमानसात सभ्य व्यवहाराचे विशिष्ट मापदंड निर्माण झालेले होते. ज्या समाजात सर्वसामान्य आचाराबद्दलही अत्यंत बारीकसारीक नियम-मर्यादा घातलेल्या होत्या, त्या समाजात लैंगिक व्यवहाराच्या सर्वच बाबींवर – अन्न, वस्त्र, स्त्री-पुरुष नातेसंबंध, आचार आणि विचार – या सर्वांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातलेले होते - हे स्वाभाविकच आहे. मराठी साहित्यही या निर्बंधांमधून कसे सुटेल? विविध साहित्य-प्रकारांवरच्या या निर्बंधांमुळे वाङ्मयीन श्लीलाश्लीलतेच्या सीमारेषा निश्चित झालेल्या होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून आजतागायत या सीमारेषा अस्तित्वात आहेत. फक्त बदलत्या समाजमानसाचे प्रतिबिंब म्हणून त्या हळूहळू बदलत जात आहेत. म्हणूनच मराठी मानसाची 'अश्लीलतेची जाणीव' काळानुसार बदलली असली तरी ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही.

मराठी नाटकातल्या अश्लीलतेकडे पाहताना नाटकांच्या विविध अंगांच्या अश्लीलतेचा उल्लेख करता येईल. नाटकाचा विषय, संवादातील शब्दयोजना आणि कामुक अभिनय. काही नाटकांचे विषय इतके स्फोटक असतात की समाज त्यांच्याकडे अश्लील नाटके म्हणूनच पाहतो. या नाटकांमधून समाजातील काल्पनिक अथवा वास्तविक लैंगिक प्रश्नांना चव्हाट्यावर आणले जाते. अशी नाटके वादळी ठरतात, कारण समाजाच्या सभ्यतेच्या संकल्पनांना त्यांच्यामुळे धक्का पोचतो. या प्रकारची अश्लीलता कधीकधी समाज बदलवण्यासही कारणीभूत ठरते. एका काळात अश्लील ठरलेली अशी नाटके पुढे अभिजात साहित्यात गणली जाऊ शकतात. काही नाटकांमधली भाषा सभ्य समाजाला पसंत पडत नाही. त्या नाटकातल्या संवादांचे उच्चारण हेच अश्लील आहे असे मानले जाते. तर काही नाटकांमधून उघड वा छुपी कामुकता पात्रांच्या अभिनयातून व्यक्त केली जाते. अशा नाटकांमधून मुख्यत्वे प्रेक्षकांच्या कामभावनेला चाळवण्याचा प्रयत्न केलेला असतो. अर्थात, हे तिन्ही प्रकार एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतातच असे म्हणता येत नाही. ज्या नाटकांचा विषय सद्य सभ्य समाजाला अश्लील वाटतो अशी नाटके मूळ कथानकाच्या गरजेपोटी अश्लील ठरतात, मात्र भाषा आणि अभिनय यांच्या बाबतीत अश्लील ठरणार्‍या नाटकांबाबत तसे नेहमीच खात्रीने म्हणता येत नाही.

अश्लीलतेच्या मध्ययुगीन संकल्पनांनुसार 'नाटक लिहिणे, ते बसवणे आणि त्यात काम करणे' हेच सभ्य समाजाकडून सुरुवातीला अश्लील मानले गेले. इतर भारतीय भाषांप्रमाणेच मराठी नाट्यसृष्टीलाही जरी तथाकथित उच्च अभिरुचिपूर्ण प्राचीन संस्कृत नाट्यपरंपरेचा वारसा लाभला असला, तरी अर्वाचीन रंगभूमीवर येईपर्यंतचा तिचा प्रवास तमाशे, लावण्या, नाच आणि त्या अनुषंगाने येणारे अभद्र व्यवहार यांमधून झाला. 'नाटकशाळा' या शब्दाचा अर्थ आज कदाचित 'नाट्य-प्रशिक्षण शिबिर' असा लावला जाऊ शकतो. परंतु ज्या काळात हा शब्द बनवला गेला, त्या काळी या शब्दाला हीन अर्थ होता. नाटक हा 'कामुक' मनोरंजनाचा प्रकार असल्याचे गणले जाई. सुरुवातीची सर्व नाटके पौराणिक विषयांवर लिहिली गेली. त्यातल्या स्त्रीपात्रांच्या भूमिकाही पुरुषच करत. कारण स्त्रीने रंगमंचावर भूमिका करणे आणि ती सुसंस्कृत प्रेक्षकांनी पाहणे अश्लील मानलेले होते. रघपति फडके यांनी 'सीता स्वयंवर' नाटकात सीतेची भूमिका केली होती. त्या काळचा प्रेक्षकही बहुतांशी पुरुषच असे. हळूहळू स्त्रीप्रेक्षकही नाटकांना जाऊ लागले, परंतु त्यांची बैठकीची व्यवस्था स्वतंत्र असे. केतकरांच्या ज्ञानकोशात याबाबत अपेक्षा व्यक्त केलेली आहे – "याखेरीज स्त्रीपुरुषांनां समोरासमोर न बसवितां पुरुषांच्या पाठीमागें स्त्रिया किंवा अशाच प्रकारची दुसरी व्यवस्था करून व जाळ्या घालून त्यांना बसण्याची सोय करावी." मुंबई येथे होणार्‍या या नाटकांच्या प्रयोगांना वेश्याही प्रेक्षक म्हणून हजर असत असाही एके ठिकाणी उल्लेख आहे.

विनायक जनार्दन कीर्तने यांनी १८६१ साली लिहिलेल्या 'थोरले माधवराव पेशवे यांजवर नाटक' या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक नाटकावर अश्लीलतेच्या आरोपाचा जो शिंतोडा उडवला गेला, त्याचे कारण होते त्यातला एक लहानसा संवाद -

'माधव : बरे तर जातो आता, पण एक साखरेचा. . !

रमा : काय हे वेड लागले! बोलायला तरी कांही वाटते?

माधव : वाटायचे काय? , येतो. (मुका घेऊन माधवराव जातो)

मात्र हे नाटक भरपूर चालले, ते रमाबाई सती जाते तेव्हा तिची ओटी भरण्याच्या प्रसंगामुळे. रमेचे काम करणार्‍या विष्णू वाटवे या स्वरूपसुंदर नटास विष्णुशास्त्री(?) चिपळूणकरबुवा स्वत: लुगडे नेसून तालीम देत अशी आख्यायिका आहे. 'वाटवेंची वेषभूषा, नटणे-मुरडणे इतके सहज सुंदर होते की, प्रत्यक्ष स्त्रीचा नखरा त्यापुढे रद्द ठरावा.' असे एका नाट्यरसिकाने नमूद करून ठेवले आहे.

याच स्त्रीवेषधारी परंतु पुरुष नटांच्या माळेतले मेरुमणी श्री. नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या सुंदर दिसण्याबद्दल आणि स्त्रीसुलभ आविर्भावांबद्दल अशाच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे स्त्रियांच्या हळदीकुंकू समारंभात त्यांचे स्त्रीवेषात बिनदिक्कत वावरणे. दुसरी आख्यायिका अशी की एका संस्थानिकाने त्यांना नाटक सुरू असताना स्वत:जवळ येण्याची आणि मांडीवर बसण्याची कामुक आज्ञा केली. ती बालगंधर्वांनी अमान्य केली. त्यामुळे त्या संस्थानिकाच्या राज्यात बालगंधर्वांच्या नाटकांवर बंदी घातली गेली. या भूमिकांमध्येही त्या काळच्या मापदंडानुसार काहीशी अश्लीलता प्रेक्षकांना दिसली असेल. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी बालगंधर्वांवर लिहिलेल्या पुस्तकात ते म्हणतात, "In the accounts of the impersonations of Bal Gandharva, erotic allure is more clearly indicated than in most other references. He possessed an attractive appearance and sweet voice, the two features that were considered essential for all female impersonators, but he appears to have exploited their seductive potential more overtly. One way of doing this was by displaying his long hair, which flowed to the waist. In 'Manapman' he entered the stage with his hair undone, indicating that the heroine had not yet had her bath. while in another scene he turned his back to the audience to reveal a long pleated braid. " पर्यायाने या पुरुष स्त्री-पार्टी नटांबद्दलही प्रेक्षकांच्या मनात अश्लील-कामुक भाव असण्याची शक्यता असे.

या काळात हळूहळू स्त्री कलाकार स्त्री-पात्रांच्या भूमिका करू लागल्या. दुर्गाबाई कामत-गोखले, कमलाबाई गोखले यांनी ही परंपरा सुरू केली. स्वत: बालगंधर्वांनी १९२२ साली रंगमंचावर पुरुष भूमिका करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यात ते अपयशी ठरले. परंतु स्त्री-पात्रासाठी स्त्री कलाकाराची गरज १९३८ सालाच्या आसपास भासू लागली. याच काळात गोहरबाई कर्नाटकी यांनी बालगंधर्वांच्या नाटकात स्त्री-भूमिका करायला सुरुवात केली. म्हणजे स्त्रीनेच स्त्रीभूमिका करणे समाजाला अश्लील वाटेनासे झाले होते. परंतु तरीही अशा स्त्री कलाकारांना समाजात सन्मानपूर्वक वागवले जात नसे.

मराठी नाटकांनी कात टाकून नवे रूप धारण करण्याची सुरुवात १ जुलै १९३३ रोजी 'आंधळ्यांची शाळा' या श्री. वि. वर्तक यांच्या नाटकाने झाली. ते En hanske (A Gauntlet) या १८८३ सालच्या ब्यॉनसनलिखित नाटकाचे रूपांतर होते. अण्णासाहेब किर्लोस्कर यांची 'कालपक्व' परंपरा सोडून वेगळे नाटक करायचा हा पायंडा 'नाट्यमन्वंतर' या संस्थेने पाडला. या नाटकात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच केल्या होत्या हाही उल्लेख महत्त्वाचा गणला जातो. विषयांचे जुनाटपण जाऊन त्या काळच्या सद्यस्थितीवर आधारलेली नाटके रंगमंचावर येऊ लागली.

याच काळात मीनाक्षी शिरोडकर यांनी मोठेच धाडस करत बेदिंग सूट परिधान करून 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या' म्हणत 'ब्रह्मचारी' सिनेमात नृत्य केले. त्या चित्रपटाचे पुढे नाटक झाले. लेखक प्र. के. उर्फ आचार्य अत्रे यांच्यावर या प्रसंगाबद्दल अश्लीलतेचा आरोप झाला. १९४८ साली 'Charley’s Aunt' वरून अत्र्यांनी 'मोरूची मावशी' हा चित्रपट बनवला होता. पण तीच मावशी १९६३ साली जेव्हा नाटकातून रंगमंचावर आली, तेव्हा 'आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' म्हणत साडी वर धरून नाचणारी बापूराव मानेंनी साकारलेली मावशी पाहून समाजधुरीणांनी नाके मुरडली होती. अत्रे कमरेखालचे विनोद करत असा त्यांच्यावर आरोप होताच. पण त्यांचा साहित्यिक अधिकार खूपच मोठा असल्याने त्या टीकेत फारसा दम मव्हता. गंमत म्हणजे पुढे १९६६ साली याच अत्र्यांनी भाऊ पाध्ये यांच्या 'वासूनाका' कादंबरीवर त्यातल्या अश्लील भाषेवरून - "संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक 'वासूनाका' लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते." या शब्दांत टीका केली.

मो. ग. रांगणेकरांनी नाटकात काम करणार्‍या स्त्रीबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन आणि तिच्या जीवनात त्यामुळे निर्माण होणार्‍या अडथळ्यांचा मागोवा घेणारे 'कुलवधू' नावाचे नाटक १९४२ साली रंगमंचावर आणले. ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती म्हणून वादंग झाले होते. कासोटा मारलेली नऊवारी साडी न नेसता पाचवारी किंवा गोल साडी नेसून स्त्रीने वावरणे हीसुद्धा त्या काळी अश्लील बाब होती. त्यात ही गोष्ट रंगमंचावर घडणे म्हणजे फारच धाडसाचे होते.

इथे काहीसे कालांतर करून माझा स्वत:चा अनुभव सांगतो. १९८५-९०च्या आसपास, म्हणजे कुलवधू नाटकानंतर जवळजवळ ५० वर्षांनंतरसुद्धा, नाटकात काम करण्यासाठी मुली सहसा तयार नसत. हौशी नाट्यसंस्थांना हौशी स्त्री कलाकार मिळणे दुरापास्त होते. अनेक वेळेला अन्य शहरांमधून दुय्यम दर्जाच्या व्यावसायिक नट्या पैसे देऊन आणल्या जात. माझ्या पौगंडावस्थेत मी ज्या संस्थांमध्ये सहभागी झालो, त्या संस्थांमध्ये मुलींच्या घरी जाऊन, त्यांच्या घरच्या लोकांना समजावून सांगून, प्रसंगी बाबापुता करून त्या मुलींना नाटकात काम करायला आणावे लागे. शिवाय त्यांना नाटकांच्या तालमीला नेणे, आणणे हे सर्व करावे लागे. यात नाटकात काम करण्याबाबत समाजात रुजलेल्या निम्नतेच्या दृष्टिकोनाचा मोठाच वाटा होता. आजच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती कितपत बदलली आहे त्याची मला कल्पना नाही.

१९४५ सालाच्या आगेमागे र. धों. कर्व्यांनी प्रथमच संततिनियमनाचा उघड प्रचार केला. त्यालाही त्या वेळी अश्लील मानले गेले. रधोंनी 'गुरुबाजी' आणि 'न्यायाचा शोध' ही नाटके लिहिली असली, तरी लैंगिक विषयांवर कोणतेही नाटक लिहिले नाही. लिहिले असते तर ते निश्चितच अश्लील गणले गेले असते. परंतु रधोंनी स्वत: मात्र अश्लीलतेच्या आरोपात लिप्त झालेल्या बा. सी. मर्ढेकरांना पाठिंबा दिल्याचे दिसत नाही. उलट त्यांच्या 'शारदेचे पत्र' या सदरातून 'समाजस्वास्थ्य' मासिकात मर्ढेकरांवर टीकाच केलेली दिसते.

१९५० ते १९८५-९० हा काळ एकूणच मराठी वाङ्मयात उलथापालथीचा आहे. 'नवसाहित्य' निर्मितीचा हा काळ. त्याने नाटकांमध्येही अनेकविध विषय, सादरीकरणातले वेगवेगळे प्रयोग यांमुळे रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके अशी काहीशी विभागणी झाली. या काळात एकीकडे बाळ कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे नाटककार मध्यमवर्गीय विचारपरंपरेला फारसा छेद न देणारी नाटके लिहीत होते; तर दुसरीकडे चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गो. पु. देशपांडे इत्यादी लेखक बंडखोर किंवा नवे विचार मांडणारी नाटके लिहीत होते. याला मराठीतील दुसरे नाट्यमन्वंतर म्हणता येईल. अर्थातच या लेखकांच्या काही नाटकांवर अश्लीलतेचे आरोप झाले. १९८५नंतर मात्र अशा प्रक्षोभक विषयांवर नाटके निर्माण होणे हळूहळू कमी झाल्याचे दिसते.

मुळात १९५५ सालाच्या आसपास लिहिलेले विजय तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे नाटक १९७० सालात, म्हणजे १४ वर्षानंतर, डॉ. श्रीराम लागूंनी रंगमंचावर आणले. ते इतके प्रक्षोभक होते की त्याने आदर्शवादी कुटुंबव्यवस्थेच्या आणि पवित्र नातेसंबंधांच्या स्वप्नात मश्गुल असलेल्या मराठी मध्यमवर्गीय समाजाला मुळापासून हादरवून टाकले. त्यात दाखवलेला हिंसाचार आणि अनैतिक संबंध हे एकूणच समाजाच्या नीतिमत्तेच्या बुरख्याच्या चिंध्या करणारे होते. असे काही प्रत्यक्षात घडते हे मानण्यासच तत्कालीन समाजाने नकार दिला. या नाटकावर अश्लीलता आणि हिंसाचार या दुहेरी कारणांनी बालंट आले. 'वास्तवतेचाही आभासच हवा!' या लेखात रत्नाकर मतकरी यांनी या नाटकातल्या गर्भपाताच्या प्रसंगाच्या रंगमंचावरील सादरीकरणाला आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात, "पडद्यामागच्या भावांच्या लाथांचा व बहिणीच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकू येतो. यावरून प्रेक्षकांना गर्भपाताची सूचना मिळत नाही का? गर्भपात झाल्यानंतर दुसर्‍या क्षणी बाई धावत येण्याच्या परिस्थितीत नसते. पण 'गिधाडे'मधली बहीण लगेच धावत येते आणि आपल्या साडीवरील लाल डाग दाखवते. वास्तविक तो डाग दाखवण्याची काहीच गरज नव्हती. तिच्या गर्भपाताचं सूचन पडद्यामागच्या तिच्या किंकाळ्यांनी केलं होतं. मग ती वास्तवता इतक्या कुरूपपणे का प्रकट करायची?" पण तेंडुलकरांना ते दृश्य भडक, ठळक, अतिवास्तव (surreal) करून दाखवायचे असावे.

व्यभिचाराची सर्वसामान्य व्याख्या तेंडुलकरांना खटकत होती आणि वारंवार ते तिचा निषेध करताना दिसतात. त्यांच्या शब्दात सांगायचे तर "रंगभूमीची अप्रतिष्ठा होईल, वा तिचं पावित्र्य बिघडेल म्हणून मी माणसांचे हे जिणे नाटकाबाहेर ठेवायला मी तयार नाही. माझी मराठी रंगभूमी मेलेल्या 'काल'ची किंवा 'आज'ची आहे म्हणून तिने एका सुस्थित जगाचीच स्वप्नरंजनात्मक वातड चित्रे रंगवीत जगता कामा नये."

बेबी

'बेबी' या नाटकात तेंडुलकरांनी लैंगिकदृष्टया विकृत असलेल्या शिवाप्पाचे आणि त्याच्या विकृतीला बळी पडलेल्या बेबीचे विदारक चित्र रंगवले आहे. केवळ जिवंत राहण्यासाठी एक स्त्री कुत्रीसारखी वागू शकते आणि त्याच वेळी त्या जगण्याचा स्वत:ची स्वप्नेही फुलवण्यासाठी उपयोग करते, असे दुस्तर व्यक्तिमत्त्व तेंडुलकरांनी रंगवले आहे. हे नाटक त्यातल्या अश्लीलतेपेक्षाही लैंगिक क्रूरतेमुळे वादळी ठरले. तेंडुलकरांचे 'घाशीराम कोतवाल' हे नाटक अनेक अंगांनी वादांच्या भोवर्‍यात सापडले. त्यात असलेला बावन्नखणीचा उघड उल्लेख, नाना फडणवीसाचा 'राधेकृष्णहारी मुकुंदमुरारी' स्त्रीलंपटपणा, एकूणच पेशवाईवरची (आणि पर्यायाने ब्राह्मण्यावरची) टीका हे सर्व सभ्य समाजाच्या प्रस्थापित जाणिवांना हिंदकाळून टाकणारे होते. पण त्याबरोबरच एक बाप आपल्या स्वत:च्या मुलीच्या - ललितागौरीच्या - सौंदर्याचा अनैतिक वापर करून महत्त्वाचे सरकारी पद मिळवतो ("लोकांची थोबाडे बंद होण्यासाठी मला पुण्याचा कोतवाल करा") असे दाखवणे मुळात अनैतिक-अश्लील होते. तेंडुलकरांच्याच 'सखाराम बाईंडर' नाटकात याच प्रस्थापित नैतिक-अनैतिक वर्तनाच्या व्याख्यांना आव्हान दिलेले होते. त्यावरून बराच वाद झाला, कोर्टाकडून नाटकावर बंदी आणली गेली. पण त्या नाटकावर सर्वात जास्त टीका झाली, ती मात्र त्या नाटकातले एक स्त्री पात्र - चंपा रंगमंचावर साडी बदलते या दृश्यावरून. हे दृश्य खरेतर फक्त दोनच प्रयोगांमध्ये दाखवले गेले आणि नंतर ती भूमिका करणार्‍या लालन सारंग यांना साडी बदलणे अव्यवहार्य वाटल्याने बदलण्यात आले. पण त्याचा गवगवा होऊन बर्‍याच अफवा उठल्या. सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक नुकसान स्वीकारावे लागले. अशा प्रकारच्या दृश्याच्या वेळी रंगमंचावर लाल दिवा लावण्यात येत असे आणि प्रेक्षकांनी नको असल्यास ते दृश्य पाहू नये असे सुचवले जात असे. पुढे या प्रकाराची गरज भासणे बंद झाले. या नाटकाची जाहिरात भडकपणे केलेली होती. या जाहिरातीत सखारामने (निळू फुले) चंपाला (लालन सारंग) आपल्या मांडीवर खेचून घेतले असून तो तिच्या घशात दारू ओतत आहे, असे दाखविण्यात आले होते. त्यावरही टीका झाली. तेंडुलकरांच्याच 'शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकातून सभ्य समाजाच्या दांभिक वर्तनावर टीका करताना ते व्यभिचाराच्या स्त्रीविरोधी आणि एकांगी संकल्पनांवरही घाव घालतात. आजही ज्या विषयावर वादंग माजते त्या समलैंगिकतेच्या विषयावर तेंडुलकरांनी १९७२-७३मध्येच 'मित्राची गोष्ट' नावाचे नाटक लिहिले. ते कालांतराने १९८१ साली रंगमंचावर आले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की काळाच्या पुढे असलेल्या या धाडसी नाटकावर मात्र त्या वेळी कसलाही वाद झाला नाही. कदाचित त्या काळच्या समाजाने त्या विषयावर काही बोलायचेच टाळले असावे. पंचवीसएक प्रयोग झाल्यावर ते बंद पडले.

अवध्य

अश्लीलतेवरून टीका व्हावी असे नाटक चिं. त्र्यं. खानोलकरांनी लिहिले हे एक आश्चर्यच. त्यांच्या नाटकांमध्ये विषयांचे आणि सादरीकरणाचे नावीन्य असले तरी तेंडुलकरांसारखे जहाल बंडखोरीचे सातत्य त्यांच्या नाटकांमध्ये दिसत नाही. पण तरीही त्यांच्या 'अवध्य' नाटकाने अश्लीलतेच्या मर्यादांचे उल्लंघन केले असा आरोप झाला. या नाटकाच्या विषयाला अनुरूप असे काही कामुक प्रसंग लेखकाने लिहिले आहेत. उदा. अर्धनग्न अवस्थेतली एक षोडशवर्षा विशीबाविशीतल्या अर्धनग्न तरुणाला गुदगुल्या करत असल्याचेे दृश्य नाटकात दाखवलेले आहे. स्वत: खानोलकरांना हे 'अभिरुचि' नियतकालिकात प्रसिद्ध झालेले नाटक कोणी रंगमंचावर आणेल आणि त्यातल्या कथावस्तूला, पात्रांना न्याय देईल याची खात्री नव्हती. १९७१ साली अमोल पालेकरांसारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने ते त्यातल्या 'प्रायोगिक मूल्यांचा काही वेगळ्या दृष्टीने विचार करून' रंगमंचावर आणण्याचे धाडस केले. 'अवध्य' नाटकाच्या निमित्ताने 'मराठी नाटक वयात आल्याची' द्वाही नाट्यसमीक्षक श्री. माधव मनोहरांनी फिरवली होती. या नाटकात स्त्रीभूमिका करणे किती आव्हानात्मक होते त्याची कल्पना खानोलकरांच्या या उद्गारांनी येऊ शकेल – "प्रा. ज्योती रणदिवे यांनी सहसा कुणी ज्या भूमिकेच्या दिशेलाही जाणार नाही अशा एका भूमिकेचे आव्हान स्वीकारून ती भूमिका साकार केली, याबद्दल त्यांचे प्रायोगिक रंगभूमी खरोखरीच मोलाचे देणे लागेल. "

महेश एलकुंचवारांचे 'गार्बो' हे एका वेगळ्या मानसिक संघर्षाची कहाणी मांडते. त्या नाटकातले 'गार्बो' हे पात्र पारंपरिक स्त्रीच्या परिवेशाला तडा देते. अनेक पुरुष मित्रांना सर्वंकष सुख देण्याची तिची तयारी आहे. "मी एक बाजारभाव गेलेली नटी आहे, माहिती आहे ना तुम्हांला? पस्तिशी उलटलीये. कामासाठी हव्या त्या माणसाच्या मिठीत जायची तयारी आहे आज माझी." असा उद्घोष ती करते. आणि केवळ स्वत:चा वास्तववादी निर्णय म्हणून गर्भपात करायचा ती प्रयत्न करते. "नाहीये माझ्यात आईपण आजिबात. हे सगळं ढोंग आहे आईपण वगैरे... मी फक्त एक बाई आहे बाई, ह्या पुरुषाजवळून त्या पुरुषाजवळ जाणारी." असे ती स्पष्ट सांगते. असे नाटक समाजाच्या मर्यादांना आव्हान देत असले तरी त्याच्यावर अश्लीलतेचा टोकाचा आरोप झाली नाही. एलकुंचवारांचे दुसरे नाटक म्हणजे 'वासनाकांड'. यातही पूर्णपणे शारीरपातळीवरचे प्रेम किंवा स्त्री-पुरुष आकर्षण दाखवलेले आहे. असा वासनेचा उघड उच्चार करणारे हे नाटक त्या काळाच्या निकषांवर अश्लील ठरू शकले असते. रत्नाकर मतकरींच्या 'सेक्स आणि मराठी नाटक' या लेखात उल्लेखल्याप्रमाणे – 'मराठी नाटकात शारीरिक प्रेम हे कमी प्रतीचे आणि भावनिक प्रेम हे उच्च प्रतीचे समजले जाते'. या आरोपाच्या दृष्टीने 'वासनाकांड' हे नाटक मराठी नाट्यसृष्टीच्या भाबडेपणाला अपवाद ठरते.

पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देताना स्त्रीला ज्यांना सामोरे जावे लागते अश्या समस्यांचा आलेख जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात मांडला आहे. स्त्रीवरचा शारीरिक बलात्कार हा पुरुषाने केलेला सर्वात खालच्या दर्जाचा हल्ला दळवींनी थोडेही न कचरता दाखवला आहे. एका स्वतंत्र बाण्याच्या स्त्रीवर (अंबिका शिवराम आपटे), केवळ ती पुरुषांची बरोबरी करू पाहते म्हणून, एक रासवट पुढारी (गुलाबराव जाधव) बलात्कार करतो. त्या बलात्काराबद्दल झालेल्या न्यायालयीन सुनावणीत "साखर संडासात खाल्ली म्हणून काय ती गोड लागत नाही का?", "सुईच्या नेढ्यात दोरा घातला कधी? नेढं फिरवा, दोरा जाईल आत?" असे अश्लील प्रश्न तिला विचारले जातात. रंगमंचावर दाखवलेली स्त्रीशी झटापट आणि तिला नाटकात असे अश्लील प्रश्न विचारले जाणे हे समाजाला रुचले नव्हते आणि हे सर्व इतक्या उघडपणे दाखवण्याची गरज आहे काय अशी चर्चा झाली होती. या कारणामुळेच 'पुरुष' हे नाटक सर्व कुटुंबाने एकत्र पाहण्याचे नाटक म्हणून मान्य झाले नाही. महासागर (१९८०), पुरुष (१९८३) व पर्याय (१९८४) यांसारखी जयवंत दळवींची नाटके कामविकृती दाखवतात.

आपल्या कादंबरीतल्या किंवा नाटकातल्या पात्रांमध्ये एक वेडसरपणाची झाक दाखवणे ही जयवंत दळवी यांची खासियत होय. त्यांच्या 'बॅरिस्टर' नाटकातला विलायतेवरून परतलेला रावसाहेब सौंदर्याचा भोक्ता आहे. भौतिक (लैंगिकसुद्धा) व्यवहारातले सुख सर्वांनी मुक्तपणे उपभोगावे असे त्याचे मत आहे. त्याला भौतिक सुखाच्या आड येणार्‍या - विशेषत: हिंदू धर्मातील - (नाटकात दाखवलेल्या काळात अधिकच कडक असलेल्या) सामाजिक बंधनांबद्दल चीड आहे. असा हा बॅरिस्टर कधीतरी गंमत म्हणून, जिच्या ज्वालेतून नग्न स्त्री दिसते अशी आगकाडी पेटवतो; डोळे आले म्हणून राधाक्काच्या अंगावरचे दूध डोळ्यात घालायला मागवतो असे काही उल्लेख काहीसे अश्लील वाटण्यासारखे होते. कदाचित ते बॅरिस्टरच्या अंगभूत विक्षिप्तपणाचे द्योतक मानले गेले असावेत. फारसे वादंग माजले नाही तरी या गोष्टींची चर्चा होत असे.

सतीश आळेकरांच्या 'बेगम बर्वे' मध्ये दाखवलेल्या, अर्वाच्य शिव्या देणारा श्यामराव आणि स्त्रैण बेगम बर्वे यांच्यातल्या, समलिंगी आकर्षणाकडेही भुवया उंचावून पाहिले गेले. त्या पिढीचा बालगंधर्वांबद्दलचा आदरभावही त्याला कारणीभूत असावा. आळेकरांच्या 'महानिर्वाण' नाटकातही शिव्यांचा वापर आहे.

१९६९ सालचे 'काचेचा चंद्र' हे सुरेश खरे यांचे नाटक खरे म्हणजे अश्लील म्हणावे असे मुळीच नव्हते. सुरुवातीला ते व्यावसायिक रंगमंचावर चालले नाही. पण मग नाटकाच्या जाहिरातीत भावना या नटीला खांद्यावर घेतलेल्या डॉ. श्रीराम लागूंचा फोटो यायला लागला आणि ते नाटक तुफान चालू लागले. या नाटकात काहीतरी 'हॉट' आहे असे प्रेक्षकांना जाहिरातीवरून वाटले असावे. पण त्यांचे पुढचे नाटक मात्र अश्लीलतेच्या व्याख्येत बसेल असे होते आणि त्यासाठी स्त्री कलाकार मिळवणे बरेच अवघड गेले.
१९७०-७१ साली मंचित झालेल्या 'मला उत्तर हवंय' या त्यांच्या नाटकाबद्दल लेखक श्री. सुरेश खरे यांनी लिहिले आहे, की "नाटकाच्या प्रारंभीच बाप आणि मुलगी गिर्‍हाईक आणि कॉलगर्ल म्हणून समोरासमोर येतात हा सर्वात नाट्यमय प्रसंग. ज्यामुळे पुढचं नाटक घडतं. हा प्रसंग उभा करण्याकरिता तिथल्या परिभाषेत असे संवाद होते. 'कशी हवी? काय वय? मराठी, गुजराती, ख्रिश्चन, सिंधी?' या संवादावर हरकत घेतली गेली. 'युवर मदर इज फ्रिजिड, तुझी आई थंड आहे.' यातल्या 'थंड' या शब्दावर हरकत घेतली. थंड हा शब्द अश्लील आहे. (फ्रिजिड हा शब्द अश्लील नाही. ) सगळेच कट्स (सुचवलेले) मी सांगत बसत नाही. पण सुचवलेले सगळेच कट्स अनाकलनीय व हास्यास्पद होते. मी ते स्वीकारायचे नाहीत, असं ठरवलं आणि तसं कळवलं."

बालनाट्यापासून प्रौढनाट्यांपर्यंत, व्यावसायिक नाटकांपासून प्रायोगिक नाटकांपर्यंत नाटकांचे अनेकविध प्रकार लीलया आणि यशस्वीपणे हाताळणार्‍या रत्नाकर मतकरी यांनी एका अत्यंत नाजूक विषयावर लिहिलेले नाटक म्हणजे "खोल. . . खोल पाणी".

खोल खोल पाणी

'तुझ्या प्रीतीचे दु:ख मला' नावाच्या त्यांच्या कथेवर बेतलेले हे नाटक १९४० सालात नाशिकमध्ये घडलेले कथानक दाखवते. १९८३ साली आलेले हे नाटक लब्धप्रतिष्ठित पुरुष आणि समाजाच्या खालच्या स्तरातून आलेली स्त्री यांच्यातल्या सशरीर परंतु विवाहबाह्य सहजीवनाकडे त्या काळचा समाज ज्या नैतिकतेच्या चष्म्यातून पाहत होता त्यावर कटाक्ष टाकते. नायक जेव्हा "ज्याला आपण नीती-नीती म्हणतो, ते खरं असतं तरी काय?... आपली नीतीची कल्पना आपण दुसर्‍या माणसावर लादू शकतो का?..." असे प्रश्न उभे करतो, तेव्हा खरेतर तो समाजाच्या मनातलेच प्रश्न उघड्यावर आणताना दिसतो. हे नाटक राजा नावाच्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या मनातल्या अश्लीलतेच्या संकल्पनांची धारणा आणि त्यावरचा बाह्य समाजाच्या नीती-अनीतीच्या बंधनांचा परिणाम दाखवते. अगदी टोकाचा अश्लील संवाद म्हटला, तर बाळकू चंद्राक्काला म्हणतो, "पण शेज तरी पुरती मिळते का तुला?... अजून तिशी नाही तू गाठलीस... तुला ऐन जवानीतला फौजदारासारखा माजावरचा वळूच हवा! डॉक्टरांची आता पन्नाशी उलटून गेली! रोज धारोष्ण दूध पाजलंस त्याला, आणि बदाम खाऊ घातलेस, तरी किती दिवस समाधान देईल तो?..." अशा या नाटकाबद्दल निर्मात्यांच्याही मनात शंका होत्या. नाट्यसुमन या संस्थेचे मॅनेजर अरविंद चित्रे मतकरींना म्हणाले होते, "हे नाटक लोकांना आवडणार नाही... कारण ते थोडे अश्लील आहे. ते आम्ही करणारच नाही! पण तुम्हीही कोणाला देऊ नका!... ते रंगभूमीवर आलं तर तुमचं नाव खराब होईल!" पण ते नाटक लालन-कमलाकर सारंग यांच्या 'कलारंग' संस्थेने केले आणि अभिजात नाटकांच्या रांगेत जाऊन बसले. विद्याधर गोखले यांच्यासारखा नेमस्त साहित्यिकही या नाटकाने प्रभावित झाला. या नाटकावरची 'मुंबई सकाळ'ची प्रतिक्रिया अगदी चपखल वाटते – "...मराठी प्रेक्षकाची पौगंडावस्था सरली आहे की नाही हेच या नाटकाने सिद्ध होईल. प्रेक्षकांनी आपली पौगंडावस्था संपवण्याचा एक जालीम उपाय म्हणून आग्रहाने हे नाटक पाहिले पाहिजे. "

नाटककार श्याम मनोहरांनी लिहिलेलं 'येळकोट' हे नाटक मध्यमवर्गीय समाजाच्या लैंगिक सुखाच्या फँटसीज आणि प्रत्यक्षात झालेली कुचंबणा यांचा लेखाजोखा आहे. विनोदी बाजाने लिहिलेले पण थेट असलेले संवाद प्रेक्षकांना हसवत-हसवत स्वानुभवाची तपासणी करायला लावत होते. "मेंदूत सेक्स ही डेंजरस गोष्ट आहे… शरीरात सेक्स ही सुंदर गोष्ट आहे!" असे मूलगामी संवादही त्यात होते. पण तरीही चंद्रकांत कुलकर्णींसारखा दिग्दर्शकही हे नाटक करताना साशंक होता. 'यातले संवाद कोणते नट-नट्या बोलतील? एनॅक्ट करू शकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल? त्यातला वरवरचा बोल्डनेस झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल?' असे असंख्य प्रश्न दिग्दर्शकासमोर 'आ' वासून उभे राहिले. थोडक्यात, १९९३ सालीही मराठी रंगमंचावर या विषयावर थेट चर्चा करणारे नाटक उभे करणे हे आव्हान होते.

चर्चानाट्य पद्धतीने नाटके लिहिणारे लेखक चं. प्र. देशपांडे यांची 'सेक्स' ही एकांकिका आणि पुढे 'बुद्धिबळ आणि झब्बू' हा दीर्घांक या दोन गोष्टी पुढे २००० साली 'बुद्धिबळ आणि झब्बू - अर्थात तुमचं आमचं सेम असतं' या दोन अंकी नाटकाच्या स्वरूपात विकसित झाल्या. तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकांमध्ये मानवी मनातला 'हिंसक लिंगाचार' उभा करताना व्यक्ती उघड उघड भ्रष्टपणे वागताना दाखवल्या होत्या. तर सभ्य दिसणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात दबा धरून बसलेली कामभावना देशपांडे यांच्या या नाट्यातून दबकत बाहेर येते. माणूस हा समाजशील असला तरी प्राणीच असल्याने त्याच्यातली आदिम लैंगिक वासना सभ्य नीती-अनिती संकल्पनांनी बांधलेल्या विवाहसंस्थेमुळे दबून राहिलेली असते. 'समाज हा नेहमी नीतिमानच असतो आणि नीतिमानच राहतो', '...असं सूक्ष्मपणे वागायची गरज माणसानेच काळाच्या ओघात तयार केलेली आहे. समाज नीतिमान ठेवण्यासाठीच हा सूक्ष्मपणा चालू असतो.', 'ज्ञानामुळं अधिक सूक्ष्मपणा येतो. सगळ्या पद्धती अधिकाधिक गुंतागुंतीच्या आणि सुंदर होत जातात. असं होत जाणं यालाच संस्कृती म्हणतात.' – अशा संवादांमधून 'बुद्धिबळ आणि झब्बू' स्त्री-पुरुष संबंध आणि सभ्यता यांच्यातले नाते स्पष्ट करू पाहते. या नाटकात कधीकधी अश्लीलतेकडे झुकणारे लैगिक सूचन करणारे संवाद डोकावतात. सहजासहजी कोणी स्वीकारणार नाही असे सत्य हे नाटक उघड करू पाहते.

'पतीकडून जबरदस्ती केली गेली तर तो बलात्कार मानायचा का?' अशा आजही चर्चिल्या जाणार्‍या आणि अगदी सर्वोच्च न्यायालयात खटला चालण्यापर्यंत पोचलेल्या प्रश्नावर अभिराम भडकमकर यांनी लिहिलेले 'देहभान' नाटक करायलाही अनेक संस्थांनी मागेपुढे केले. खरेतर हे नाटक २००० सालाच्या आधीच लिहून झालेले असावे. पण ते रंगमंचावर येण्यास २००५ साल उजाडले. नाटकाच्या एका पातळीवर १९५० सालच्या समाजात असलेले पती-पत्नीमधले लैंगिक प्रश्न त्या काळातही कायम असल्याने अनेक वाचनं झाली. अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी नाटक नाकारलं. 'हे नाटक फारच प्रायोगिक आहे बाई!' असं म्हणत एका अभिनेत्रीने 'हे करूच नकोस' असा सल्ला दिला.' असे भडकमकरांनी लिहिले आहे.

२००० सालानंतर लैंगिक विषयांवरील नाटके लिहिताना लेखकांनी संयम बाळगला आहे असे दिसते. दोन पुरुषांमधला विवाह आणि लिव्ह–इन रिलेशनशिप हे अगदी सहजपणे घेणारे नाटक म्हणून 'छोट्याशा सुट्टीत' या सचिन कुंडलकरांच्या नाटकाचा उल्लेख करत येईल. प्रमोद काळे यांचे 'न येती उत्तरे' हे नाटक समलैंगिकतेच्या विषयाला वाचा फोडते आणि समलैंगिकांच्या 'बाहेर येण्याच्या' (coming out) मानसिक प्रक्रियेबद्दल तपशिलात जाते. पण इथेही ते नाटक अश्लील ठरण्याचा धोका होताच. म्हणूनच या लेखकाने 'नाटकाला वादाच्या भोवर्‍यात न अडकवता फक्त वस्तुस्थिती मांडण्याचे काम' केले असल्याचा दावा केला आहे. २०१० सालचे 'आतून कीर्तन, वरून तमाशा' अशा स्वरूपाचे 'पोपटपंची' नावाचे एक नाटक शफाअत खान यांनी लिहिले. या नाटकाच्या 'राखी सावंत, बॉबी डार्लिग, तरन्नुम, शबनम मौसी, बेगम नवाझीश अली, बाबा बंगाली, पॅमेला अॅंडरसन अशा अनेक प्रतिभावंतांना नम्र अभिवादन करून...', 'अठरा वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश नाही. कारण पोपटाच्या जिभेला हाड नाही!' अशा जाहिरातींपासूनच हे नाटक खळबळजनक व्हावे ही निर्मात्यांची इच्छा दिसली. ज्याला पारंपरिक 'पिवळे साहित्य' म्हटले जाते अशा 'शुक बहात्तरी' या पुस्तकाचा आधुनिक अवतार या नाटकात दिसतो. खरे म्हणजे समाजातल्या असभ्यपणाच्या, अश्लीलतेच्या वास्तवाने अस्वस्थ होऊन शफाअत खान यांनी हे नाटक लिहिले आहे. म्हणूनच या नाटकातला पोपट या संवेदना हरवलेल्या, चांगल्या गोष्टींचे विद्रूपीकरण करणार्‍या, असभ्य वागणार्‍या-बोलणार्‍यांच्या गोष्टी सांगतो. नाटककाराच्या शब्दात सांगायचे तर, 'हा आजच्या स्मार्ट, सुशिक्षित माणसाच्या थिल्लर जगण्याच्या शोकांतिकेचा तमाशा आहे. पण नाटककाराला जे म्हणायचं आहे ते सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं की नाही, हे महत्त्वाचं नाही. नाटककाराची अस्वस्थता, चीड प्रेक्षकांपर्यंत पोहोचते की नाही, हे माझ्या लेखी महत्त्वाचं आहे.' असे शफाअत खान म्हणतात, तेव्हा हे नाटक काही लोक 'पिवळा चावटपणा' म्हणूनही घेतील अशी सुप्त भीती कदाचित त्यांच्या मनात असावी.

२०१० सालच्या 'मात्र रात्र' नाटकाबद्दलही अनेक प्रतिक्रिया होत्या. ब्रॅडली हेवर्ड लिखित नाटक 'लेजिटिमेट हुई' या नाटकाचे हे भाषांतर आहे. नाटक अनेकांना आवडले. परंतु नाटकात दाखवलेली स्त्री-पुरुष पात्रांची शारिरीक जवळीक, पलंगावर केलेला नाच आणि विशेषत: चादरीखाली आवाजसह केलेल्या सूचक हालचाली यांची गरज नव्हती असे मत काही प्रेक्षकांनी व्यक्त केले. धर्मकीर्ती सुमंत यांच्या 'नाटक नको' नाटकात हस्तमैथुन दाखवले आहे. याबद्दलही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुरुवातीला 'अडगळ' या नावाने रंगमंचावर आलेल्या संभाजी भगत या लेखकाच्या प्रायोगिक दीर्घांकाला महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने परवानगी दिलेली होती. पण या दीर्घांकाचे जेव्हा 'बॉम्बे १७' नावाच्या व्यावसायिक नाटकात रूपांतर झाले तेव्हा मात्र मंडळाने त्याला तेवीस ठिकाणी कात्री लावली. या नाटकातही हस्तमैथुनाचा उल्लेख आणि स्टेजवरून लघुशंका करण्याचे सूचक दृश्य होते.

बंडखोर परंतु सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची आणि अर्थपूर्ण नाटके सुरुवातीला अश्लील ठरली, तरी कालौघात ती मुख्य प्रवाहातलीच बनतात; किंवा असेही म्हणता येईल की त्या नाटकांनी समाजाच्या सभ्यतेच्या जाणिवांचा प्रवाह बदललेला असतो. अशा खरोखरच समाज बदलणार्‍या नाटकांना त्यांच्या समकालीन प्रेक्षकांनी केलेला विरोध कालांतराने अनाठायी वाटत असला, तरी आज आपण जिथे उभे आहोत तिथेही अशा नाटकांवर अश्लीलतेचा आरोप होतच असतो. उदाहरणार्थ, अंबर हडप लिखित 'बीपी' (बालक-पालक किंवा ग्राम्य भाषेत ब्ल्यू – पिक्चर) नावाच्या (सुरुवातीला एकांकिका, नंतर) नाटकाचे प्रयोग लहान मुलांनी पाहण्यासारखे नाहीत असे महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाला वाटले. खरेतर हे नाटक पौगंडावस्थेतील मुलांच्या अनुभवांवर आधारित आहे. आजच्या काळातले हे वास्तव आहे. त्यात अश्लीलता उरलेली नाही. 'सेक्स एज्युकेशन' असा विषयच मुलांना शाळेत शिकवण्यासाठी आहे. पण मागची पिढी हे सत्य सहजपणे स्वीकारत नाही. समलिंगी लेखक बिंदूमाधव खिरे यांच्या 'पुरुषोत्तम' एकांकिकेवरही मंडळाने आक्षेप घेतले आहेत. 'समलैंगिक जोडपे' हे आता हळूहळू समाजात स्वीकारले जात असलेले सत्य आहे. परंतु या एकांकिकेतल्या जोडप्याच्या संवादावर आक्षेप आहेत.

या प्रकारच्या नाटकांहून वेगळ्या प्रकारची, परंतु त्या नाटकांतल्या अर्वाच्य भाषेमुळे, शिवीगाळीमुळे अश्लील ठरलेली, अशीही नाटकेही आहेत.

या नाटकांवरील प्रमुख आक्षेप म्हणजे, अमुकतमुक असभ्य शब्द संवादातून गाळून टाकले तरी चालले असते. परंतु, अशा नाटकांचे लेखक मात्र त्या शब्दांचा वापर अत्यावश्यक असल्याचे मानतात. सतीश आळेकर यांचे महानिर्वाण आणि एलकुंचवारांचे गार्बो या नाटकांवर हा आरोप झाला होता. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा', 'गांडू बगीचा' या कवितासंग्रहांनंतर दलित साहित्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणून असे शब्द साहित्यिक वापरात आले. 'जय भीम, जय भारत' नाटकातल्या संवादांवर अश्लीलतेचा शिक्का बसला आहे. 'गांधी आडवा येतो' हे शफाअतखान यांचे नाटक म्हणजे कानेटकरांच्या 'अश्रूंची झाली फुले' या आदर्शवादी नाटकाचे आजच्या वास्तवातले विडंबन. पण या नाटकातले कांही संवाद हे अनर्गल प्रलाप आहेत असे सेन्सॉरला वाटले. 'नाटक नको' हे धर्मकीर्ती सुमंत यांचे नाटक, 'सुखाशी भांडतो आम्ही' हे अभिराम भडकमकरांचे नाटक हीदेखील याच प्रकारात मोडतात. मराठी बोलीभाषेत लैंगिक शब्दांचा आणि शिव्यांचा वापर सैलपणे होणे वाढत आहे. त्यामुळे काही नाटकेही संवादांसाठी अशी भाषा वापरणार हे स्वाभाविकच आहे.

पण सध्या अर्वाच्य आणि वाह्यात संवादांच्या नाटकांची एक वेगळीच लाट मराठी रंगमंचावर आलेली आहे. तिला कारण ठरले ते एक परदेशी नाटक आणि त्याचे मराठी भाषांतर. लेखिका ईव एन्स्लर यांचे 'The Vagina Monologues' हे नाटक वंदना खरे यांनी 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या नावाने मराठी रंगमंचावर सादर केले. स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल असलेली सलज्जता आणि त्यामुळे निर्माण झालेले स्त्री-आरोग्याचे प्रश्न या दुष्टचक्रातून स्त्रीला बाहेर काढण्यासाठी मुळात हे नाटक लिहिले गेले. परंतु त्याच्यावर समीक्षक शिरीष कणेकर यांनी 'हा प्रयोग भारतीय संस्कृतीस अनुलक्ष्यून नसल्याची' टीका केली. त्यावर 'स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन' बंद करण्यासाठी हा प्रयोग असल्याचा दावा वंदना खरे यांनी केला. काही स्त्री प्रेक्षकांनाही हा प्रयोग बाष्कळ वाटला. परंतु एकंदरीने या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

योनीमनीच्या गुजगोष्टी

अशा स्वरूपाच्या नाटकांना व्यावसायिक यश मिळेल असे गणित करून चावट, अश्लील संवाद असलेली अनेक नाटके एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाली. 'एक चावट संध्याकाळ', 'त्या चार योनींची गोष्ट', 'कामजीवन जगू द्या, सुखी करू या', 'गुपित योनींच्या गुप्त गोष्टी', 'अश्लील वारे', 'एक चावट मधुचंद्र', 'दोन बायका चावट ऐका', या नावांची नाटके मराठी नाट्यसृष्टीत आली. 'एक चावट संध्याकाळ' हे नाटक अशोक पाटोळेंसारख्या नावाजलेल्या लेखकाने लिहिले. सुरुवातीचे काही दिवस हे नाटक पहायला येण्यास स्त्रीप्रेक्षकांना मनाई होती. या नाटकात संवादांच्या जागी फक्त पुरुषांनी पुरुषांना सांगण्याचे लैंगिक विनोद आहेत. अशा प्रकारच्या नाटकांमुळे गंभीर विषयांवरच्या, सामाजिक चाकोरीबाहेरच्या नाटकांवरही अश्लीलतेचा आळ येऊ शकतो. 'वड्याचे तेल वांग्यावर' निघाल्याने सामाजिक आशयाची नाटके लिहिण्यास लेखक बिचकतील अशी परिस्थिती आहे.

तिसर्‍या प्रकारची आणि दर्जाची अश्लील नाटके म्हणजे उघड वा छुपी कामुकता असलेली नाटके. अशी नाटके वरचेवर येत राहतात आणि त्यांचा एक स्वत:चा असा प्रेक्षकवृंदही असतो. ही नाटके कधीकधी व्यावसायिकदृष्ट्या इतकी यशस्वी होतात, की मुख्य प्रवाहातली मराठी नाटके मागे पडतात की काय अशी भीती वाटू लागते. या प्रकारच्या नाटकांची जाहिरात प्राय: 'बोल्ड, ज्वलंत, धगधगीत वगैरे विषयावरील नाटक' अशा शब्दांत केलेली असली, तरी त्या जाहिरातीतील छायाचित्रात मात्र अंगप्रदर्शन करणार्‍या स्त्री कलाकार दाखवलेल्या असतात. त्यावरून त्यांच्या 'विषयां'ची परीक्षा करता येते.

'आण्टी', 'घटकंचुकी', 'आज धंदा बंद आहे', 'हैदोस', 'जंगली कबुतर', 'भोगसम्राट', 'घाशीराम ड्रायव्हर', 'सेक्सी' अशा उघडउघड लैंगिकतेचा निर्देश करणार्‍या नावांची नाटके वेळोवेळी मराठी रंगभूमीवर आली आहेत. ही नाटके खरे म्हणजे प्रेक्षकांच्या वासना चाळवण्यासाठी 'पाडलेली' होती. आशू, नंदा देसाई यांसारख्या नट्या त्या नाटकांमधल्या उन्मादक भूमिकांसाठी प्रसिद्ध झाल्या. पण यांपैकी कांही नाटकांमध्ये मराठी नाट्यसृष्टीतले नावाजलेले कलाकारही काम करत. उदाहरणार्थ, 'जंगली कबूतर'मध्ये निळू फुले, लालन सारंग, 'हैदोस'मध्ये अरुण सरनाईक आणि 'प्रमोशन'मध्ये शलाका यांनी काम केले होते. परंतु अशा कलाकारांमुळे या प्रकारच्या नाटकांना समाजमान्यता मिळतेच असे नाही. आजही 'जंगली कबूतर' नाटक रंगमंचावर येते. पण त्याला 'पुरुष' किंवा 'शांतता! कोर्ट चालू आहे' यांसारखी समाजमान्यता मिळालेली नाही. 'अॅग्रेसिव्ह', 'पांढरपेशी वेश्या', 'नशील्या मुलीची मदमस्त कहाणी' ही आजकालची नाटके याच प्रकारची आहेत.

अॅग्रेसिव्ह

व्यावसायिक गणिते करून मुद्दाम अश्लील केलेली नाटके आणि सामाजिक प्रश्नांना हात घालताना आपसूकच समाजाच्या सभ्यतेला धक्का पोहोचवणारी नाटके यांमध्ये मूलभूत फरक आहे. 'व्यावसायिक अश्लीलता' जिथे दिसते, तिथे सेन्सॉर बोर्डाने नक्कीच पायबंद घातला पाहिजे. पण तसे करताना गंभीर विषय हाताळणार्‍या नाटकांवर घाला येऊ नये याचेही तारतम्य बाळगले गेले पाहिजे.

मराठी नाटकांमधल्या अश्लीलतेची पातळी ही समाजाच्या सभ्यतेच्या मर्यादांप्रमाणे किती बदलली ते 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'मधल्या कदाचित सर्वात 'सोज्ज्वळ' म्हणता येईल अशा संवादावरून लक्षात येईल -

बाई१ : सुरुवातीला या बायका बोलायलाच राजी नव्हत्या.. काचकूच करायच्या.. लाजायच्या, त्यांना संकोच वाटायचा... पण एकदा का त्या बोलत्या झाल्या.. की मग थांबायच्याच नाहीत...

बाई२ : खरंतर, बायकांना त्यांच्या योनीबद्दल बोलायला आवडतंच.. इतक्या त्या एक्साईट होतात..

बाई३ : साहजिकच नाही का? त्यांना आख्ख्या आयुष्यात त्यांच्या योनीबद्दल कुणी विचारलेलंच नसतं ना!

बाई१ : अगं, योनी हा शब्द तरी कसा आहे बघ की! योनी म्हणायचं का व्हजायना हासुद्धा प्रश्नच आहे म्हणा!

बाई२ : खरंय, व्हजायना असं म्हटलं की एखाद्या संसर्गजन्य रोगाचं नाव उच्चारल्यासारखं वाटतं... किंवा मेडिकल इन्स्ट्रुमेंटचं नाव वाटतं जास्तीत जास्त... 'नर्स, मला चटकन व्हजायना द्या. लवक्कर. . . हरी अप!'

'थोरले माधवराव पेशवे यांजवर नाटक' या नाटकातला सर्वात विवादित असा 'साखरेचा ...' ( अनुच्चारित मुका) कुठे आणि गुजगोष्टीतले संवाद कुठे? शे-दीडशे वर्षांत मराठी नाटकांमधल्या अश्लीलतेत (पक्षी : मराठी समाजाच्या श्लीलाश्लीलतेच्या कल्पनांमध्ये) खूपच बदल झालेला आहे. हे जरी खरे असले, तरी मराठी नाटकांच्या प्रेक्षकांच्या सभ्यतेच्या मर्यादांचा उंबरा अजूनही बराच उंच आहे. कोणे एके काळी "कथानकाची गरज असेल तर रंगमंचावर संभोगही करायला मी तयार आहे" अशी सनसनाटी मुलाखत एका मराठी नटीने दिली होती. पण असे मराठी रंगमंचावर घडेल किंवा अगदी फ्रेंच-इंग्रजी (उदा. डॅनियल रॅडक्लिफने काम केलेले 'एक्वस' - दुवा) नाटकांप्रमाणे रंगमंचावर पूर्ण नग्न अवस्थेत पात्रे वावरत आहेत असे चालू शतकाच्या अंतापर्यंत तरी घडू शकेल काय? शेवटी 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत!'

***

श्रेयाव्हेर:

इदं न मम! या लेखातील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केलेली आहे. तपशिलात चूक आढळल्यास लेखकाला जरूर कळवावे.

लेखकाबद्दल माहिती :
विसुनाना / विजय नाईक, हैदराबाद. व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. हौशी नाटककार आणि दिग्दर्शक.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा! ये बात! मस्त लेख.

श्री ना पेंडसे यांच्या कादंबरीपासून-रूपांतरित गारंबीचा बापू वरही अश्लीलतेवरून टीका झाली होती ना?

प्रमोद काळेसरांच्या या नाटकाविषयी प्रथमच समजलं. अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा अत्यंत संदर्भसंपृक्त आणि मुळातून धांडोळा घेणार लेख. खूप आवडला.

या निमित्ताने विसुनाना लिहिते झाले हा बोनस Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिला आहे, हे जाणवते. या सगळ्या कालखंडाचा साक्षीदार असल्यामुळे, जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
सख्खे शेजारी,या विनोदी प्रहसनातील, वाईफ स्वॅपिंग च्या नुसत्या उल्लेखाने चेकाळलेली पुरुष मंडळी दाखवली आहेत. त्याचाही उल्लेख, यानिमित्ताने करु इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम आढावा. संग्रही ठेवावा असा लेख.

एक शंका:
ब्रह्मचारी हे नाटक(ही) होते का? या नावाचा अत्र्यांचा चित्रपट होता, त्यात 'यमुनाजळी खेळू' हे गाणं व बिकिनीवस्त्रांकित मीनाक्षीबाई होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही विचारलेली शंका रास्त आहे. मूळ लेखात त्याप्रमाणे बदल केला आहे.
चूक दाखवल्याबद्दल आभार.
आणखी काही चूक आढळल्यास कृपया कळवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख सखोल अभ्यास करुन लिहिला आहे, हे जाणवते. अप्रतिम लेख...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

चांगला आढावा. अश्लिल म्हणजे समाजातले मोजके लोकांनी ठरवलेल्या मर्यादेच्या किंचिंत बाहेर.बॅले डान्सचा पाश्चात्य लोकांचा उद्देश काय असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला आढावा. अश्लिल म्हणजे समाजातले मोजके लोकांनी ठरवलेल्या मर्यादेच्या किंचिंत बाहेर.बॅले डान्सचा पाश्चात्य लोकांचा उद्देश काय असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा लहान असतना आई बाबांबरोबर गाढवच लग्न बघायला गेलो होतो...च्यायला नाटकामध्येच अंथरून घातल ना गड्यान स्टेजवर...मला जर संदिग्ध कल्पना होती झवाझवी बद्दल कि असा अंथरून टाकून झोपेत कपडे काढून काहीतरी करतात. च्यामायला म्हंटला आता हे हिरो हेरोइन इथे सुरु करणार का हे म्हणून फादरकड बघत मिचाक्या डोळ्यांनी तो सीन बघत होतो. तसा काय झाल नाही पण लहान असताना अश्लीलच वाटलेला.

अवांतर -अश्लीलता हि सापेक्ष आहे. brazilian नाटककार ऑगस्ट बोल नाटकाच्या तालिमी घेताना सगळ्यांना नागडा करून मगच सुरु करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अतिशय संदर्भसंपृक्त आणि टोटल कव्हरेज असलेला लेख. परफेक्ट रिव्ह्यू पेपर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक अभ्यासपूर्ण लेख लिहिण्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. भरपूर माहिती गोळा करून ती सुसूत्र मांडली गेल्यामुळे लेख वाचनीय झाला आहे.

रंगभूमीवर होणार्‍या प्रयोगांमधून दोन गोष्टी उघड उघड अश्लील पद्धतीने होतांना पाहिलेल्या आहेत पण बहुसंख्य प्रेक्षकांना आणि विशेष म्हणजे रंगमंचावरच्या नटांना अर्थच माहीत नसल्याने त्यामधील अश्लीलपणा कोणाच्या ध्यानामध्ये येत नाही.

नक्की गीत अथवा नाटक आठवत नाही पण 'कुचभल्ली वक्षाने टोचुनिया दुखवी मज'अशी ओळ एका प्रसिद्ध नाटयगीतामध्ये आहे. कृष्ण रागवलेल्या रुक्मिणीची मनधरणी करीत आहे असा तो प्रसंग आहे. गाणारा नट घोळून घोळून ही ओळ म्हणत आहे. प्रेक्षकगण, त्यामधील स्त्रियांसह, माना डोलवून त्याचे कौतुक करीत आहे. शब्दांचा अर्थ नटाला वा सर्वसामान्य प्रेक्षकांना ंआहीत असता तर हे झाले असते का? अर्थ असा आहे - स्तन (कुच) हे भाले (भल्ल) धारण करणार्‍या वक्षाने मला टोचून दुखव.

'राधाधरमधुमिलिंद' ह्या प्रसिद्ध पदाचे तेच. 'राधेच्या अधरोष्ठाच्या मधाचे पान करणारा भुंगा' अशा अर्थाचे हे शब्द घोळून घोळून म्हटले जातात.

पण अखेर एक खरे. नाटकातील नटनटया हे खरेखुरे आणि आसपासच्या समाजात प्रत्यही हिंडणारे लोक असतात. त्यामुळे ते काय दाखवू शकतील किंवा दाखवणे पसंत करतील ह्यावर नैसर्गिक बंधन असते. त्यामुळे नाटकामध्ये - विशेषतः जुन्या नाटकांमध्ये अश्लीलता आलीच तर ती अगदी स्वल्प आणि सूचक मार्गानेच येऊ शकते. सिनेमावरहि हेच बंधन येऊ शकते पण तेथे नटवर्ग आणि प्रेक्षक ह्यांच्यामध्ये अंतर अधिक असल्याने तेथे तेथे दर्श्नस्वातन्त्र्य थोडे अधिक असते. भारतामध्ये फारच कमी पण भारताबाहेरील अनेक सिनेमांमध्ये संभोगदृश्ये मोकळेपणे पाहायला मिळतात. त्याच सिनेमाचे नाटक केले तर तेच नटनट्या तसे देखावे रंगमंचावर करून दाखवायला तयार होतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्तन (कुच) हे भाले (भल्ल) धारण करणार्‍या वक्षाने मला टोचून दुखव.

यास (द ज्यूरी इज़ स्टिल औट, पण) कदाचित बॉर्डरलाइन अश्लील म्हणता येईलही, पण...

'राधाधरमधुमिलिंद' ह्या प्रसिद्ध पदाचे तेच. 'राधेच्या अधरोष्ठाच्या मधाचे पान करणारा भुंगा' अशा अर्थाचे हे शब्द...

यात नेमके अश्लील काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात नेमके अश्लील काय आहे?

"अधरोष्ठ" हा द्वैर्थी शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...केवळ 'अधर' असा शब्द आहे; 'अधरोष्ठ' असा शब्द तर कोल्हटकरांनी (बहुधा कोणताही दुय्यम अर्थ गृहीत न धरता - पण चूभूद्याघ्या!) वापरलेला आहे! सबब, ओष्ठांत 'ऊर्ध्वेकडील की अधरेकडील' असा भ्रम न करता केवळ 'अधर म्हणजे ओष्ठ' असा 'फेस व्ह्याल्यू'वर तो समास (अवांतर शंका: हा नक्की कोणता समास?) सोडविता यावा.

(किंवा, दुसऱ्या शब्दांत, 'मेजोरा की मायनोरा' असा 'कीस' न घेपाडता 'लेबिया बोले तो लिप्स' असा अर्थ 'प्रायमा फेसी' घ्यावयास प्रत्यवाय नसावा.)

इत्यलम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सोज्ज्वळ आहात गडे तुम्ही! Tongue
आम्हाला अधरोष्ट म्हटल्यावर दोन ओठांपैकी खालचा ओठ ही फोड करून दाखवलीत म्हणून समजली! नैतर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुचभल्ली वक्षांला.. : येथे अर्थ बहुधा असा आहे, '(तुझे) स्तनरूपी भाले (माझ्या) वक्षांला टोचून मला दुखव'
तसेच, 'राधाधरमधुमिलिन्द' मध्ये द्वयर्थी किंवा अश्लील असे काही वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच सविस्तर आढावा आहे. संदर्भासाठी वापरला जाईल हा लेख.

कुचभल्ली वक्षालाच्या जोडीला
हे पण एक राहिलंच...

लाविली थंड उटी वाळ्याची सखिच्या कुचकलशां ती ॥
कमलसुतंतु करी करि कंकण बंधित परि शोभे ती ॥
मदन निदाघ जनीं संचरुनी ताप समानचि देती ॥
युवतिस तपवि निदाघ जरी तो सुंदर कांति नुरे ती ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामजोश्यांची ती अजरामर छेकापन्हुति विसरलात काय?

राधा अबाउट कृष्णः

अंबरगत परि पयोधरांते रगडुनि पळतो दूरी | काय हा धीट म्हणावा तरी |
सासुसासरा पति यांदेखत अधरामृतमाधुरी | घेतसे काय वदावे तरी| तो कृष्ण काय? नव्हे गे हा, मधुकर पंकज हरी ||
गुणवंत कुचांवर लोळे, अति शोभला | तो कृष्ण काय गे सांग मला | नव्हे गे, हार कळेना तुला ||
मज शीतळ करितो श्रमी होवुनिया भला | तो कृष्ण काय? नव्हे गे, व्यजन सुवंशातला ||

कृष्ण अबाउट राधा:

वंशसंभवा अधरचुंबिनी वाटते बरी | वृषभानूची सुता काय रे, राधा लकुचस्तनी? | नव्हे रे, मुरली आठवली मनी ||

इ.इ. लकुच = फणस. लिंक.

लोकशाहीर रामजोशी या १९४७ सालच्या पिच्चरमध्ये सवाई माधवराव पेशव्यांदेखत ही लावणी सादर करतानाचा प्रसंग एकदम बहारीचा आहे. नीळकंठशास्त्री थत्ते आणि अन्य कॉण्झर्व्हेटिव्ह्ज अगोदर आक्षेप घेतात की "ब्राह्मण असून शूद्राचा धंदा करतात" वगैरे. एकजण असाही आक्षेप घेतो की "तू काय लोकशिक्षण करणार रे पातक्या? संध्येची २४ नावं तरी कधी घेतलीयस का?" त्याला प्रत्युत्तर म्हणून रामजोशी तिथल्या तिथे त्यांची ती फेमस "केशवकरणी" वाली लावणी रचून म्हणतात.

"केशवकरणी अद्भुतलीला नारायण तो जसा | तयाचा सकळ जनांवर ठसा |
माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाच्या रसा | पीत जा, जीव होईल थंडसा |" इ.इ.

संध्येच्या २४ नावांपैकी पहिली ४ नावे यांत योग्य क्रमाने आलेली आहेत. शिवाय माधव हेच नाव पेशव्याचेही असल्याने त्यांचीही तबियत एकदम खूष झाली आणि विरोधी लोकांचे तोंड बंद झाले. मग रामजोश्यांनी छेकापन्हुति सादर केली आणि त्यानंतर "कुंजात मधुर गुंजारव यमुनाजळी | होळी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी |" ही लावणी म्हटली. ते सर्व ऐकून पेशवे एकदम प्रसन्न झाले आणि तिथल्या तिथे रामजोश्यांना "काव्यशिरताज" हा किताब बहाल करून एक मोत्यांचा शिरपेचही त्यांच्या पागोट्यात स्वहस्ते खोवला. असा तो प्रसंग आहे. खूप सुंदररीत्या चित्रीकरण केलेले आहे.

त्याचे ब्याकग्रौंडही तितकेच कॉमेडी आहे. एक सांडणीस्वार सोलापूरला येतो आणि रामजोश्यांचे वडील बंधू मुद्गलशास्त्री यांना पत्र देतो. आता मजा अशी की मुद्गलशास्त्र्यांनी नुकताच "यदुवंश" नामक संस्कृत ग्रंथ लिहिलेला असतो आणि त्यांना वाटते की पेशवे सरकार त्याबद्दल काही शाबासकी, धन, इ. देतील. पण प्रत्यक्षात पत्र निघते रामजोश्यांच्या नावाचे. "पंचमीचे दरबारी तुमचे तमाशाचा कार्यक्रम योजिला असे" असे लिहिलेले असते. ROFL झालं मग, "तुमचा भाऊ आता प्रत्यक्ष पेशव्यांपुढे तमाशा करणार ही तर हद्द झाली" इ.इ. करत, तणतणत सगळे दुढ्ढाचार्य डायरेक्ट पेशव्यांकडे पोहोचतात, इ.इ. तो पूर्ण पिच्चर मुळातूनच पहावा असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त माहीती बॅट्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्स अनुराव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अश्लीलमय जग,अश्लिलांचा धर्म
.
.
.
बादवे,"अश्लिल" हा शब्द भारतीय जनमानसात फारच कुत्सित अर्थाने वापरला जातो,
या शब्दाला सन्मान मिळवून देण्यासाठी व्यापक लढा उभा करायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

लेखामागची प्रचंड मेहनत ठायी ठायी जाणवते.
काही थोड्या संदर्भत्रुटी राहिल्या आहेत त्या काजळाची तीट म्हणून शोभून दिसाव्यात.
'नच सुंदरी करू कोपा' (कुचभल्ली वक्षांला टोचुनि दुखवी मजला) हे राहिले हा मोठा प्रमाद. 'सं. सौभद्र'मध्ये इतरत्रही द्वयर्थी संवाद आहेत. उदा. 'थांब, आज मी तुला पुरतीच निरिच्छ करून टाकतो'(किंवा तत्सम.)
'अ‍ॅडम' हे नाटक रंगमंचावर आले होते की कसे हे ठाम आठवत नाही. याच नावाच्या रत्नाकर मतकरींच्या कादंबरिकेवर ते बेतलेले होते. ऑक्टोपस या बाबतीतही तसेच. शिवाय श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे या दोघांच्याच भूमिका असलेले एक नाटक होते त्यात बीजक्षेत्रचा अगदी उघड उहापोह होता आणि तेथे प्रेक्षक अस्वस्थ होत.(संदर्भ अंदाजानेच लिहिला आहे.)
शिवाय 'अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येऊनी, देती आलिंगनाते, तेचि पुरुष दैवाचे' हाही त्या काळी नर्मशृंगार नव्हता, चांगलाच 'गर्म' होता.
लेख अतिशय आवडला.
अवांतर -'मित्राची गोष्ट' ही मूळ कथा साठीच्या दशकात 'दीपावलि'च्या दिवाळी अंकात आली होती. त्याच्याच आगेमागे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'काळेकुळकुळीत केसाळ पिल्लू' या मौजकथेने खळबळ उडवली होती. अजगर, वासूनाका यांवर अत्र्यांच्या तोफा धडधडत होत्या त्याच्या थोडेसे आधी 'आम्ही असे झालो' मध्ये अत्रे 'ब्रिक-आय्डल' असे पाचकळ विनोद लिहीत होते. अगदी गेल्या सात-आठ वर्षांमागे अनिल कुसुरकरांची एक कादंबरिका.. त्या आधी विंदांच्या कवितेतले 'मोदक-स्तन'..अनेक रोचक आणि रंजक संदर्भ आहेत.
एकंदर मराठी साहित्यातील अश्लीलतेचा आढावा घेणार्‍या अशा एखाद्या लेखाचा आवाका खूप वाढला असता, पण रोचकताही तितकीच वाढली असती. अर्थात लेखकाने इतका माहितीप्रचुर लेख लिहून आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळेच हे वाक्य लिहिण्यास धजल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेश खरे यांचे 'संकेत मीलनाचा' हे नाटक असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच बहुधा. दोनच दिवसांपूर्वी दया डोंगरे यांची विस्तुत मुलाखत मटा किंवा लोकसत्तामध्ये आली होती. त्यात याचा संदर्भ शोधू म्हटले तर नेमका तोच पेपर सापडला नाही. ऑन्लाइन चेक करायचा कंटाळा केलाय. अजूनही मिळेल कदाचित.
ता. क. - शोधले. हेच ते नाटक. एक वेगळा प्रयोग होता. नाटक उच्च दर्जाचे पण संवाद अस्वस्थ करीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण आहे; ती माहिती मिळवण्यामागे घेतलेले परिश्रम विशेष जाणवतात. थोडा अधिक विस्तृत प्रतिसाद लवकरच लिहितो. सध्या ही नोंद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख माहितीपूर्ण आहे; ती माहिती मिळवण्यामागे घेतलेले परिश्रम विशेष जाणवतात >> +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेख आणि त्यावरील प्रतिसाद सगळेच उत्तम …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यासपूर्ण लेख. बरीच नवीन माहिती मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख आवडला.
यांपैकी थोडीच नाटके मी बघितलेली आहेत, त्यांकरिता स्थलकालसंदर्भ मिळाला.

पण एका बाबतीत थोडासा सैद्धांतिक फरक आहे

'व्यावसायिक अश्लीलता' जिथे दिसते, तिथे सेन्सॉर बोर्डाने नक्कीच पायबंद घातला पाहिजे. पण तसे करताना गंभीर विषय हाताळणार्‍या नाटकांवर घाला येऊ नये याचेही तारतम्य बाळगले गेले पाहिजे.

नाटके ही सामाजिक जाणीव आणि व्यावसायिकता दोन्ही हेतू सांभाळू बघतात. त्या दोहोंपैकी अमुक संवादात कुठले वरचढ, हे ठरवणे शहाणपणाचे नव्हे. सेन्साॅर बोर्डाचे सदस्य मनापासून नीरक्षीरविवेक करायचा प्रयत्न करतील, पण कुठेतरी सीमा काढायला जावी, तर फ्रिजिड आणि थंड दरम्यान रेषा काढण्याचा मूर्खपणा पदरी पडेल.

पुढच्या परिच्छेदात एक्वस वगैरेचा उल्लेख केलेला आहे, त्यावरून वाटते, की उद्धृत वाक्यापेक्षा लेखकाची भूमिका अधिक औदार आहे. त्यामुळे तारतम्याबाबत मतभेद तर-तम इतपतच असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रियांचा पहिला बहर ओसरल्यावर ( पुन्हा धागा वर काढण्याची क्लृप्ती म्हणा हवे तर Wink ) प्रतिसाद देत आहे.
आजवर माझे लेखन इतक्यांदा (>१६००वेळा) पहिल्या प्रथमच वाचले गेले असावे. त्यातले माझीच १०० वाचने असतील असे धरले तरी >१५०० वाचने ही मोठीच संख्या आहे.

हा लेख वाचणार्‍या सर्वांना माझे धन्यवाद.

अनेक जाणकारांनी प्रतिसादातून माहितीत अमूल्य भर घातली आहे. याच लेखाची नवी आवृत्ती मी जर लिहिली किंवा हा लेख संदर्भ म्हणून जर कोणी वापरला तर हे प्रतिसादांमधले उल्लेख उपयोगी पडतील. माझ्या कुवतीनुसार मी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

'व्हाईट लिली आणि नाईट रायडर' या नाटकात 'ऑनलाईन सेक्शुअल चावटपणा' हा दृष्टीआड सृष्टी असतो, हे दाखवलेले आहे. 'सेक्शुअल काँपॅटिबिलिटी' ऑनलाईन तपासता येत नाही म्हणून एक रात्र 'प्रॅक्टिकल टेस्ट' करणे अशी काहीशी रॅडिकल - धक्कादायक संकल्पना या नाटकात मांडलेली आहे. तोही उल्लेख राहून गेला. असे अनेक उल्लेख माझ्या नजरेतून सुटलेले असतील आणि ते यापुढील प्रतिसादांमधून येतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यांचे स्वागत आहे.

धनंजय यांच्या मुद्द्याबद्दल विचार करत आहे. काही उदाहरणांनी पुढे विशद करता येईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

from my blog post http://searchingforlaugh.blogspot.in/2010/09/r-g-gadkaris-sindhu-hitchco...

"...(M. V.) Dhond uncovers, what R. G. Gadkari doesn't do overtly, attractiveness of Gadkari's Sindhu of 'Ekach Pyala' in his book 'Chandra Chavathicha', 1987 (चंद्र चवथिचा)..

For instance after a long separation from her husband Sudhakar, Sindhu, whose marriage is not that old, is looking forward to a congress with him. She is humming a suggestive song to herself- चंद्र चवथिचा...

Dhond reasons that the 'fourth day' also implies the last day of a woman's monthly menstruation cycle, when having suffered variously, including even lack of a shower, on account of prevailing social customs, women looked forward to a reunion with their husbands.

I was fascinated by this. Now, Sindhu started to look like many attractive middle-aged married women ..."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

लेख अभ्यासपूर्ण आहेच अर्थात, त्याचे फार कौतुक वाटते.
कुचवल्लभ अर्थ माहीत नव्हता, तो कळाला, ही जमेची बाजू. Blum 3
नुकताच पहिला मराठी अॅडल्ट स्टँड अप काॅमेडी शो असे वर्णन करण्यात आलेला वेट विकेट हा शो पाहायला मिळाला, कर्ता ओळखीतला असल्यामुळे. मी दोघी मैत्रिणींसोबत दुसरा प्रयोग पाह्यला. कुटुंब जमलेलं असताना साधारण ज्या प्रतीचं चावट बोललं जाऊ शकतं, किंवा बीभत्स - म्हणजे घाईची परसाकडेला लागणे वगैरे - त्याच प्रतीचं यात आढळलं. मित्रमित्र किंवा मैत्रिणी यापेक्षा प्रचंड चावट बोलतात. सेन्साॅर बोर्ड कितपत परवानगी देतं ठाऊक नाही, पण हे फारच माइल्ड वाटलं. मुद्दाम जाऊन पाहावंसं नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

लेख फार आवडला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आवडला लेख. संग्रही ठेवावा असा आहे. व्यासंग थोर आहे तुमचा विसुनाना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

संदर्भसंपृक्त असा लेख. या लेखामध्ये कोणत्याही प्रकारचे - दूरान्वयानं लावता येतील असेही - संदर्भ राहून जाऊ नयेत म्हणून घेतलेले कष्ट ठायीठायी जाणवतात. मात्र व्यक्तिगत मला, त्यात एका ठोस अशा सूत्राचा अभाव जाणवला. लैंगिकता, अश्लीलता, कामुकता, नग्नता या सगळ्या गोष्टी हातात हात घालूनच येतात हे सत्यच. मात्र त्यांच्या तीव्रतेचा निकष लावताना लेखकाची काहीशी दमछाक झाल्यासारखी वाटली. त्यामुळे संदर्भसमग्रतेचा आग्रह धरताना लेख थोडा पसरट झाला की काय, असं उत्तरोत्तर वाटत गेलं. (अर्थात, हेच या अंकालाही लागू आहे!) पण त्याला दोष म्हणावं की जाणूनबुजून पत्करलेला धोका, हे व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे दाद देऊन थांबते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन