मुखपृष्ठाविषयी - ब्लो माय ट्रंपेट

मुखपृष्ठाविषयी.

मुखपृष्ठाविषयी - ब्लो माय ट्रंपेट

- चिंतातुर जंतू

अंकाचा विषय आणि त्याबद्दलची जगभरातली वेगवेगळ्या काळातली मतंमतांतरं पाहिली तर हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट आठवणं अगदी साहजिक आहे. अंकातल्या लिखाणातूनसुद्धा त्याची प्रचिती येईल. अशा परिस्थितीत एका मुखपृष्ठात हे सगळं सुशेगाद माववायचं झालं तर हत्तीचाच एखादा अवयव हवा (काय? सुज्ञ लोकांना मन्या जोशीची दिवाळी अंकातली कविता आठवत्ये ना?) आणि तो अवयवसुद्धा साधासुधा नाही तर भयस्वप्नात येईल इतका अगडबंब हवा. ह्या अवयवावर आव्हानावर स्वार होताना संदीपनं विविध आयुधं भात्यातून काढलेली दिसतात (नाही हो, ह्या अंकातलं प्रत्येक वाक्य द्वयर्थी नाही). हत्तीच्या अवयवाऐवजी ट्रकचा पार्श्वभाग वापरणं ही कल्पना आणि अंकाचं शीर्षकच त्याच्याशी घसट करणारं घडवणं हा त्यातला एक भाग झाला. आताच्या काळात असं दिसतं की विविध प्रकारच्या सुखाची हमी देणाऱ्या प्रतिमा प्रामुख्यानं लैंगिक सुखाच्या अनुभूतीचीच हमी दिल्यासारखं करत असतात. तथाकथित सभ्य लोक जिथे वावरतात तो सार्वजनिक अवकाश अशा प्रतिमांनी टचटचून भरलेला असतो. आंबा सेवणारी कत्रिना जे विक्षेप करत पाहणाऱ्याला जिभल्या चाटायला लावते ते उघड लैंगिक असतात. लहान मुलांची खेळणीसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. टेडी बेअर किंवा तत्सम सॉफ्ट टॉइज असोत की डायपर - तुमच्या मुलाला त्यातून जणू काही ऑरगॅझमच मिळणार असतं असं जाहिराती पाहून वाटतं. त्यातच आजकालची सभ्य माणसंसुद्धा काही कमी नसतात बरं - बटबटीत कपडे ल्यालेले, नखरे अणि उत्तान चंचूविक्षेप करत हौशीहौशीनं काढलेले सेल्फी सोशल मीडियावर लाखोंच्या आकड्यांत सापडतात. (लहान मुलांसाठीची समजली जाणारी) कॉमिक पुस्तकं आणि त्यावर आधारित सिनेमे नीट पाहिले तर दिसेल की ते लेदर फेटिश किंवा BDSM वगैरे प्रतिमांनी लदबदलेले असतात. थोडक्यात सांगायचं तर शृंगार वगळता इतरही सगळ्या व्यवहाराचं पॉर्निफिकेशन झालेल्या जगात आज आपण राहतोय. तशा कित्येक प्रतिमा ह्यात सापडतील. स्त्रीदेहाचं वस्तुकरण जगातल्या सर्वात जुन्या व्यवसायाइतकंच पुरातन वाटावं इतकं आता आपल्या अंगवळणी पडलंय. बिच्चारे पुरुषसुद्धा आता भोगवस्तू म्हणून मिरवतात. सोमणांच्या मिलिंदनं नंदनवनातल्या अजगराला इव्हकडून आपल्या अंगावर घेतला त्याला खूप वर्षं होऊन गेली. इथे वावरणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या फेमिनिस्टांचं जॉन अब्राहमच्या देहावरचं खुल्लमखुल्ला प्रेम तुम्हाला सुपरिचित आहेच, पण बिचाऱ्याला गुलाबपाकळ्यांत घोळवून हे मुखपृष्ठ इथल्या कर्त्याकरवित्या बोलवित्यांचीच चाटतंय असं मात्र नका गडे म्हणू! शाब्दिक खेळ आणि चावटपणा ह्यांचा अनुबंध मोठा खोल आणि विस्तारित आहे. त्यात भारतभर एकट्यानं फिरणाऱ्या ट्रकवाल्यांचा तर श्लीलअश्लील सगळ्याच विरंगुळ्यांशी घट्ट संबंध. त्यामुळे अंकाच्या शीर्षकापासून रात्री डिपर लावण्याच्या चावट विनंतीपर्यंत सगळं एकदम पलंगतोड काम आहे. अंकाच्या विविध विभागांसाठी वापरलेल्या प्रतिमांतही एकविसाव्या शतकातल्या (आणि गावात जेव्हा एक गरीब ब्राह्मण राहत असे अशा कोणे एके काळीपासूनच्याही) जगण्याच्या पॉर्निफिकेशनचे विविध नमुने दिसतील. अंकाला झाकणारे सगळेच पडदे आजच बाजूला करायचे नाहीत त्यामुळे त्याविषयी नंतर कधी तरी. थोडं नीट पाहावं लागेल ते मात्र तुमचं तुम्ही आणि आपल्या जबाबदारीवर पाहा!

मुखपृष्ठ
(मोठ्या आकाराच्या चित्रासाठी चित्रावर क्लिक करा.)

मुखपृष्ठाला आलेल्या काही प्रतिक्रियांवरून असं जाणवलं की त्यातल्या काही घटकांविषयी थोडं आणखी स्पष्टीकरण दिलं तर एक दृश्यप्रयोग म्हणून त्यात काय काय केलेलं आहे हे समजण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी ही पुरवणी –

रंग – मुखपृष्ठावर वापरलेला लाल रंग आणि एकंदर रंगसंगती अनेक संदर्भ घेऊन येतात. पॅरिसमधल्या सुप्रसिद्ध 'मूलॅं रूज'पासून 'गर्म कहानियॉं'सारख्या भारतभरातल्या स्टेशनांवरच्या व्हीलर स्टॉल्सवर मिळणाऱ्या पुस्तकांपर्यंत हा किंवा असे रंग तुम्हाला दिसतील. इंग्रजीत ज्याला 'किच' (Kitsch) म्हटलं जातं तशा प्रकारची ही रंगसंगती आहे. त्याचा पॉर्नशी जवळचा संबंध तर आहेच, पण हिंदी सिनेमाच्या जुन्या धाटणीच्या पोस्टर्सपासून ते हिंदू देवीदेवतांच्या भडक कॅलेन्डर्सपर्यंत अनेक माध्यमांतून असे रंग आपल्यापर्यंत पोचत असतात. भारतीय उपखंडातल्या ट्रकांच्या सजावटीमागची सौंदर्यदृष्टी ह्या 'किच'मध्येच मोडते. त्यामुळे अंकाचा विषय, त्याच्याशी संबंधित रंगसंगती, त्यातलं किच आणि त्याचा संबंध ट्रककलेशी लावण्यामागची कल्पकता इथे स्पष्ट करावीशी वाटते.

देवीदेवतांच्या कॅलेंडरमधून निघणारा आणखी एक मुद्दाही इथे मांडायला हवा. देवीदेवतांची चित्रंच नव्हेत, तर दक्षिणेकडची देवळं किंवा 'जय संतोषी मॉं'सारखे पौराणिक कथांवरचे चित्रपटही अशा रंगसंगतीचा वापर करतात. त्यामुळे जनमानसात एकीकडे त्या रंगसंगतीला एक पावित्र्य लाभतं; त्याउलट व्हीलर स्टॉलवरच्या पल्प फिक्शनशीही ते रंग संबंधित असल्यामुळे तथाकथित अभिजनांच्या दृष्टीतून त्यावर रुचिहीन लोकरंजनी सवंगतेचे आरोप होतात. ही द्विध्रुवात्मक (वि)संगती पॉर्नशी एक वेगळं नातं जोडते. एकीकडे जनमानसात पॉर्न पूर्वापार प्रचलित आहे, पण दुसरीकडे (व्हिक्टोरियन अव्वल इंग्रजी अंमलाखाली राहिल्यामुळे की काय?) इथल्या काही (अभि?)जनांना पॉर्नविषयी एक आकस – किमान चारचौघांत तरी Wink – व्यक्त करावासा वाटतो. ह्याउलट, मुळात भारतीय दृष्टी इतकी व्यापक होती की पार ऋग्वेदापासून गाथा सप्तशतीपर्यंत कित्येक अभिजात भारतीय ग्रंथांत लैंगिकतेशी संबंधित वर्णनं आढळतात. म्हणजे, आपल्या क्लासिक परंपरेचा हा एक अविभाज्य भाग आहे. तो नाकारणं म्हणजे आपल्याच परंपरेची समृद्धी नाकारणं. म्हणजे अशी काहीशी द्विध्रुवात्मक (वि)संगती आपल्या अंकाच्या विषयालाही एकविसाव्या शतकातही झेलावी लागते आहे. मुखपृष्ठावर आणि विभागसंगत सजावटीमध्ये जगभरातल्या अशा अभिजात प्रतिमांचा तथाकथित सवंग प्रतिमांशी साधलेला संयोग (संकर?) पाहिला तर ही द्विधृवात्मक (वि)संगती अधिक स्पष्ट होईल.

लोकप्रिय कलाविष्कारातून मुखपृष्ठाविषयीचा आणखी एक संदर्भ उलगडतो. विसाव्या शतकात आधुनिक कलेत जे अनेक नवे प्रवाह आले त्यांतल्या अनेकांमध्ये असलेला एक समान दुवा म्हणजे त्यांनी नित्य परिचयाच्या mass-produced प्रतिमांना उच्च कलेचं अधिष्ठान दिलं. 'पॉप आर्ट' म्हणून जो प्रवाह अमेरिकेत उभा राहिला त्यात अॅन्डी वॉरहॉलसारख्या कलाकारांनी अशा प्रतिमांचा पुनर्वापर केला. मेरिलिन मन्रोचं पोस्टर किंवा कॅम्पबेल सूपचे कॅन अशा त्यानं वापरलेल्या सुपरिचित प्रतिमा बाजारपेठेतून आल्या होत्या, तर माओच्या पोस्टरसारख्या प्रतिमा राजकीय प्रचारविश्वातून उपजल्या होत्या. वॉरहॉलनं अशा प्रतिमांना त्यांच्या मूळ संदर्भचौकटीतून काढून त्यांचा सरेआम पुनर्वापर केला. बाजारपेठ किंवा राजकारण तुमच्यावर ज्या प्रतिमांचा भडीमार करतंय त्यांनाच मी उच्च कला म्हणून तुमच्यासमोर सादर करतो आणि अभिजाततेच्या तुमच्या कल्पनांनाच हादरे देतो, असा काहीसा विचार त्यामागे होता. ट्रकचा सुपरिचित पार्श्वभाग, सन्नी लिओनीची किंवा जॉन अब्राहमची सुपरिचित दर्शनी बाजू वगैरेंचा इथला पुनर्वापर असा काहीसा आहे. त्यामुळे तो ट्रकचा पार्श्वभाग यथार्थदर्शी म्हणून थेट घेणं अभिप्रेत नाही आहे, तर तो ह्या सगळ्या खेळकरपणाचा एक भाग आहे. आणि हा खेळ किंवा ही गंमतजंमत तुमच्या सवंगतेच्या आणि उच्च अभिरुचीच्या कल्पनांना आव्हान देते आहे. मुखपृष्ठाला नीट पाहिलंत आणि थोडा विचार केलात, तर बेधडक पॉर्नमधली तथाकथित सवंगता, आपल्या महान संस्कृतीत पूर्वापार चालत आलेल्या उच्च अभिरुचीपूर्ण आविष्कारांतली गंमतीशीर लैंगिकता तसंच बाजारीकरणातून सगळ्याचं झालेलं सवंग पॉर्नीकरण अशा अनेक घटकांचा जो परस्परसंबंध आहे त्याचीच कदाचित तुम्हाला प्रचिती येईल.

अधिक खोलात शिरू पाहणाऱ्यांसाठी मुखपृष्ठावरच्या आणि आतल्या निवडक अभिजात प्रतिमांचे स्रोत -

खजुराहो, भारतीय लघुचित्रं, राजा रविवर्मा, दीनानाथ दलाल यांचे दिवाळी अंकासाठी काढलेले मुखपृष्ठ

My Wife, Nude, Contemplating Her Own Flesh Becoming Stairs, Three Vertebrae of a Column, Sky and Architecture - Salvador Dalí
The Musicians – Caravaggio
Self-Portrait with Arm Twisted above Head - Egon Schiele
Red Room (Child) and Red Room (Parents) - Louise Bourgeois
शुंगा

Un chant d'amour - Jean Genet
My Little Princess - Eva Ionesco
The Cook, the Thief, His Wife & Her Lover - Peter Greenaway

इतर प्रतिमास्रोत - जालावरून साभार

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मुखपृष्ठ फारच चांगलं झालंय.ट्रकच्या मागच्या भागाचा वापर अफलातून.चिंज तुम्ही एक ट्रम्पेट मागेही लावू शकता तुमच्या ट्रकला.तुमचा ट्रकही बहुतेक व्हिंन्टेजच असणार- ते मोठे हँडल पुढुन क्लिन्नर गरागरा फिरवल्यावर इस्टार्ट होतो तसला.
मलपृष्ठावर कोणते चित्र आहे?

...हा प्रतिसाद मात्र अश्लील आहे. मागे ट्रम्पेट लावणे काय, पुढून मोठे हॅंडल गरागरा फिरवणे काय, ते फिरवणारा क्लिन्नर (किन्नराशी यमक साधणारा) काय, तसे ते फिरवल्यावर इस्टार्ट होणे काय, मलपृष्ठ काय, नि मलपृष्ठावर चित्र काय!

असो चालू द्या.

मुखपृष्ठात कामुकतेची व पॉर्नची बरीच अंगे दाखवली आहेत. मग ते चित्रपट कलेतील असो, अध्यात्मातील, जाहीरातीतील की वास्तुकलेतील असो. आवडले.

मुखपृष्ठ च्या साठी Great Blow Job !!!!!!
मात्र

आंबा सेवणारी कत्रिना जे विक्षेप करत पाहणाऱ्याला जिभल्या चाटायला लावते ते उघड लैंगिक
असतात

.
तीव्र असहमत
ही जाहीरात पाहतांना मला केवळ आमरसाचाच "कैफ" चढतो.
कतरीना आठवण्याच्या "वादळवेळा" वेगळ्या
आणि असेलच सेक्सी यात काही तर तो आमरस बस्स !
आणि अशा पुर्वग्रहदुषीत नजरेने तुम्ही जाहीराती बघु लागलात तर उद्या तुम्ही Volkswagen चा लोगो कित्ती अश्लील म्हणुन ओरडणार.

Volkswagen चा लोगो कित्ती अश्लील म्हणुन ओरडणार.

फोक्सवागेनच्या लोगोत नक्की अश्लील काय ते कळले नाही. आम्हांस मात्र तो ष्टेट ब्यांक ऑफ इंडिया(किंवा ष्टेट ब्यांक ऑफ काहीही)चा लोगो भयंकर अश्लील वाटतो ब्वॉ.

ही जाहीरात पाहतांना मला केवळ आमरसाचाच "कैफ" चढतो.
कतरीना आठवण्याच्या "वादळवेळा" वेगळ्या
आणि असेलच सेक्सी यात काही तर तो आमरस बस्स !

धर्मकीर्ती सुमंतांच्या लेखातून तुम्हाला याचे स्पष्टीकरण मिळेल. आमरस सेक्सी वाटणे हेच इथे पॉर्न आहे.

मुळात ही जाहिरात पाहून आमरस सेक्सी वगैरे वाटणारे लोक किती असतील देव जाणे. परिचयातल्या अनेकांना लैंगिक व्यवहारच आठवतात.

बायदवे, म्हटले तर अवांतर नैतर सवांतर- एका लैंगिक व्यवहाराला ब्लोजॉबला भारतीय कामशास्त्रात 'आम्रचूषितकम्' अशी संज्ञा दिलेली आहे हा निव्वळ योगायोग नसावा. ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

द्व्यर्थी लिहिणे बोलणे हे पॅार्न साहित्य होईल काय? हा मुद्दा आहे.
( अश्लिल बोलणे हे बरेचजण टाळतात अथवा ऐकल्यावर हसत नाहीत. समोरचा बोलणारा कीव करून म्हणतो याला काही समजत नाही.) बुद्धीचा वापर अश्लिल कोट्या करण्याकडेच करायचा झाल्यास चांगले लेखक कोणालाच हार जाणार नाहीत.असो.
प्रतिसाद काढून टाकायला तयार आहे.

हे बेशक पॉर्न आहे (म्हणजे माझ्या मते.)

अजून पूर्ण अंक आला/वाचला नाही, पण पॉर्नमध्ये 'सेवनातला चोरटेपणा' हेही - उपाभोक्त्याच्या बाजूने - मोठं अंग आहे. त्या चोरटेपणात मग "सगळं करून बसलोय...हां! पण तरी बघा मी कसा साळसूद आहे!" अशी छुपी प्रौढी येते, आणि त्याचं दृश्य रूप द्वैर्थी बोलणं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुखपृष्ठ आणि त्यासंबंधीचा लेख अतिशय आवडला. 'आर्स ग्रेशिया आर्टिस' आठवून गेले! Wink

मुख्पृष्ठामागची कल्पना, अंकाचे नाव वगैरे भयंकर आवडले मात्र मुखपृष्ठ आवडले नाही. असे का झाले असावे यावर विचार करत होतो. दोन मुख्य 'दृश्य' कारणे

१. जंतू म्हणताहेत म्हणून हा गाडीचा मागचा भाग आहे हे मान्य करुयात पण डोळ्याला जाणवणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे ट्रकचा मागचा भाग हा आडवा आयताकृती असतो. तो इथे उभा का झालाय हे कळत नाही. अंक ऑनलाईन आहे छापिल कागदाच्या 'उभारलेल्या' मितीचे बंधन या अंकाला नाही. तरी हे चित्र असे उभे का समजले नाही. का परंपरेला शरण?

२. हॉर्न ओके प्लीज हे दाराच्या खालील बाजुला असते ते वर आल्याने मुळात हे ट्रकचे मागील दारच वाटत नाही. ते वर लिहिण्यामागे पुन्हा परंपरावाद आड आलेला दिसतोय

----

या व्यतिरिक्त प्रतिमांचा आततायी हव्यास नडल्यासारखं वाटतंय. मेघनाने संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जे जे अनावश्यक ते ते पॉर्न या न्यायाने इतक्या प्रतिमा मुद्दा मांडायला मुळातच अनावश्यक होत्या असे माझे मत. त्या अर्थाने हे मुखपृष्ठच पॉर्न आहे (तोच उद्देश असेल तर ठिक). त्यापेक्षा "आई वड्लांचा आर्शिवाद', ट्रकांवर अनेकदा दिसबारा भारताचा अशोक चक्राशिवायचा झेंडा नि उडती कबुतरे, हनुवटीवर हात मुडपून वाट पाहणारी प्रेयसी - वर विमान, मागे टृएन, शेजारी ट्रक आणि खाली 'तुम कब आओगे' असे खास ट्रकीय नमुने आले असते तर मला अधिक आवडले असते.

-- आत वेगवेगळ्या विभागांमध्येही पुन्हा त्याच प्रकारच्या प्रतिमा बघुन तर (तिसरी त्याच ढंगाची पॉर्न क्लीप बघताना यावा तितका) कंटाळाच आला. तिथे ट्रकसंबंधी इतरही काही वैशिष्ट्ये गोंदवता आली असती.

---

परखड मत द्यावं की नाही ठरत नव्हते. पण एक वाचक म्हणून ते मांडणे मला अगत्याचे वाटले.
पुन्हा एकदा कल्पना आणि नाव दोन्ही झकास!

=====

आणखी एक या साईटचे/आंतरजालाचे थोडे श्रेय मान्य केले असते तरी चाललं असतं.

नुकतेच मुखपृष्ठावरील प्रतिमा जालावरून घेतल्या आहेत हा बदल लेखात केलेला दिसल्याने वरील आक्षेप मागे घेत आहे. ज्याचे श्रेय त्याला दिल्याबद्दल ऐसी व्यवस्थापनाचे आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुखपृष्ठाच्या पॉईंट्शी सहमत. मलाही वाचल्यावर असं झालं, की हा ट्रकचा पार्श्वभाग आहे का? बरं बरं. तसं समजू. Wink

क्वचित ट्रकला मागची भिंत असते तेव्हा पूर्ण रंगवतात :

Truck art

गूगल शोधात पाकिस्तानी ट्रकांमागे मुखपृष्ठासारखी कप्प्याकप्प्यांतली चित्रे अधिक सापडली. पण भारतातही असे ट्रक असतील, असे वाटते.

होय पण तेव्हा वर चित्र आणि खाली मजकूर असतो. इथे तसेही नाहिये.
तसंही मुपृवरील सगळ्याच इमेजेस जालावरून घेतलेल्या आहेत तर नुसत्या चिकटवताना तरी निरिक्षण सुयोग्य असणे ही काही मोठी अपेक्षा नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शक्य आहे, A-B टेस्टिंग बघायला पाहिजे.

जर चित्र बहुतेक ब्राउझरांमध्ये स्क्रोल करावे लागत असेल, तर शीर्षक वरती यावे, असे बंधन येऊ शकत असेल.

ठीकच आहे. शिर्षक आणि कॅप्शन या दोहोंपैकी इथे शिषर्क जास्त समर्पक असल्याने ते वरती आहे हे योग्यच वाटते. खाली आल्यास उलट विचित्र वाटेल.

-Nile

शीर्षक आणि कॅप्शनचे म्हणत नाहिये. अख्खा वर लावलेला पिछवाडाच खाली हवा.
तसेही दिलेली ढिगभर चित्रे बघायला स्क्रोल करावे लागतेच की.

एकुणच मुपृ साफ फसले आहे असे माझे मात आहे. शिवाय आतमधील विभागांवरची चित्रेही त्याच पठडीतली आहेत. कंटाळा येईस्तोवर फेबुवर त्याच त्या प्रतिमा दिसत आहेत. हे सगळे डोळ्यांना त्रासदायक आहे.
त्यावर सारवासारव काय कितीही करता येईल!

असो. माझ्याकडून लेखनसीमा - कारण मुपृ कसेही असले तरी आतील अंक (अजूनतरी) खूप छान आहे आणि या भल्या/बुर्‍या डेकोरेशनपेक्षा तेच शब्दप्रशान अंकात महत्त्वाचे आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुखपृष्ठावर सहसा शिषर्क वरती असतं, त्याबद्दल मी बोलतोय. त्यामुळे पॉर्न ओके प्लीज हे त्या चित्राच्या खाली आलं तर जास्त बरं दिसेल असं मला वाटत नाही इतकंच मी म्हणलेलं आहे. (अनुमोदन फक्त त्या संदर्भातल्या प्रतिसादाला आहे.)

सारवासारवीचा आरोप कोणावर केला आहे कळलं नाही. मुखपृष्ठ मी बनवलेलं नाही. ते बनवताना वा बनवल्यावर त्यात माझा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे मला कोणतीही सारवासारव करण्याची आवश्यकता नाही. ते मुखपृष्ठ मी सर्व वाचकांना खुलं केल्यानंतरच प्रथम पाहिलं.

खाली अमुकने दिलेल्या प्रतिसादाशी इथे सहमती व्यक्त करतो. मुळ मुखपृष्ठाविषयी वा त्याच्या रसग्रहणाविषयी मी अजून कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही हे जाता जाता इथे नमूद करायला हरकत नाही. असो. तुर्तास तरी इथून पुढच्या चर्चेत रस नाही.

-Nile

पहिले वाक्य सोडल्यास पुढिल परिच्छेद जेनेरिक होता. ज्याला योग्य वाटेल त्याने तो घ्यावा. तो तुम्हाला उपप्रतिसाद देताना तो लिहिल्याने तुमच्यावर तो आरोप असल्याचा गैरसमज झाला असल्यास दिलगीर आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. ......डोळ्याला जाणवणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे ट्रकचा मागचा भाग हा आडवा आयताकृती असतो. तो इथे उभा का झालाय हे कळत नाही.

२. हॉर्न ओके प्लीज हे दाराच्या खालील बाजुला असते ते वर आल्याने मुळात हे ट्रकचे मागील दारच वाटत नाही....

ऋ, चिंजंचा अर्थान्वय तूर्तास बाजूस ठेवू. मुखपृष्ठ पाहिल्यावर वरील या दोन्ही वास्तववादी अपेक्षा कुठून आल्या नि कशासाठी ते मला कळले नाही. संपूर्ण मुखपृष्ठ हे काही ट्रकचे वा ट्रकच्या पार्श्वभागाचे छायाचित्र नव्हे. अंकाच्या नावाशी ट्रकचा नि पॉर्नचा संबंध जोडून देणे हे त्याचे मुख्य काम आहे. ते चित्राच्या वरच्या भागातून नि चौकट्यांच्या आराखड्यातून ट्रक पुरेसा स्पष्ट आहे. तपशीलात पाहता पॉर्नशी संबंध असलेल्या इतर गोष्टी उलगडतील. नाही उलगडल्या तर नाही कळलं, असं म्हणूच शकतोस. तुझा अर्थान्वय चिंजंच्या तुलनेत वेगळा असणं निराळं नि त्यांचा अर्थान्वय हाच खरा असं मानून मुपृकडून अपेक्षा करत राहणं निराळं. तुझा ट्रकसारखंच दिसणारं मुखपृष्ठ हवं हा निराधार अट्टहास वाटतो.

मला प्रतिवाद अपेक्षित नाही कारण तू आधीच लेखनसीमा घालून घेतली आहेस. त्यामुळे.. असो.

चित्राचा वरचा भाग सोडला तर खालचं चित्र ट्रकच्या पार्श्वभागासारखं मलाही वाटत नाहीये.(आणि वरचा भाग तर थेट जालावरून उचललाय. फक्त शब्दबदल केलाय. त्यामुळे वरच्या भागातली क्रिएटिव्हिटी रेडीमेड) ट्रकच्यामागेही चित्र असतात. ओके. असतील. असोत. पण म्हणून हे चित्रपण ट्रकवरचं म्हणून शोभतंय का? तर, माझ्यामते नाही.

इथेच मला एक शंका आहे. मुखपृष्ठ बनवताना, म्हणजे खालचं कोलाज बनवताना, बनवणार्‍याने 'सो-कॉल्ड' ट्रक-थिम असल्यास, त्याच्या पोताचा विचार केला का? म्हणजे पोत चकचकीतच ठेवण्यामागे काही ठोस/थोर विचार आहे का? की मर्यादा?

आता जरा ऋची उगाच वकिली -

ऋने 'ट्रकसारखंच दिसणारं मुखपृष्ठ हवं हा अट्टहास' कुठे बरं केलाय? उलट, धागाकर्ताच त्या चित्राला ट्रकसारखं म्हणतोय. आणि म्हणून ऋ म्हणतोय, की छे ते तसं अजिबात वाटत नाहीये.
(हो ना रे ऋ? ;))

पुन्हा, ऋला दिलेल्या प्रतिसादातून -
१. चिंजंचा अर्थान्वय तूर्तास बाजूस ठेवू.
२. ... त्यांचा अर्थान्वय हाच खरा असं मानून मुपृकडून अपेक्षा करत राहणं निराळं...

चित्रकाराने त्याचं काम केलं. चिंजंना चित्र कसं वाटलं, त्यात त्यांना काय दिसलं ते त्यांनी सांगितलं. चित्रकाराला अपेक्षित असेल तेच चिंजं अचूक ओळखतील असं नाही (अर्थात, यात चिंजंनी संदीपसोबत काम केलेलं नाही हे इथे गृहीत धरलंय). त्यात कमी जास्त होईलही. तुम्हांला ट्रकचा पार्श्वभाग फक्त वरचा दिसला ना? मग झालं तर. तेवढाच माना. तेवढं तरी 'ट्रकसारखं' आहे ना? खालंचं चित्रं ट्रकचा पार्श्वभाग दिसत नसेल तर कदाचित चित्रकाराला त्यातून वेगळं काही सांगायचं असेल ही शक्यता उरते (पहिली शक्यता ही की त्याला खरोखरंच पार्श्वभाग दाखवायचा होता नि जमला नाही. पण ते तूर्तास सोडून देऊ. तेवढा विश्वास संदीपवर टाकू.;)). आता ती शक्यता जमेस धरून काही दिसलं तर पाहा, नाही दिसलं तर इतरांना विचारा. नाही पटलं तर सोडून द्या. कारण जोवर खुद्द चित्रकार इथे येऊन चिंजंच्या वा तुमच्या मताबाबत खरेखोटेपणाची शहानिशा करत नाही, तोवर या चर्चेला सुफळता नाही. फक्त मतमतांतरांचा बुजबुजाट होतो, जे बरेचदा घडतंच. कारण चित्रकाराने त्याला हवं ते चित्रातूनच सांगितलंय हे विधान कायमच लागू असतं (हे जेवढं मी तुमच्या वा ऋच्या प्रतिसादाविषयी म्हणतोय, तितकंच चिंजंच्या मजकुरालाही लागू आहे.). अर्थात चित्रकार येऊन स्वतःच बोलला तर त्यासारखं दुसरं शिक्षण नाही. कारण त्यात चित्रकाराला अपेक्षित चित्रनिर्मिती, मग ती सार्वजनिक झाल्यावर निघणारे अर्थान्वयांचे ओघ यांतून तो स्वतः त्याला जे म्हणायचं तो अर्थ पोहोचवण्यात किती यशस्वी ठरला, हे कळू शकतं. लोकांनाही नि त्यालाही. त्या प्रामाणिक मत देण्यातूनच दोघांनाही स्वतःपलीकडे जाऊन कलाव्यवहाराबाबत काही कळू शकतं. लोकांच्या मतांवर, मग ती चित्रकाराच्या दृष्टीने अनपेक्षित (वास्तव/अवास्तव) असल्यास अंतर्मुख होऊन विचार करू शकतो. जर कलानिर्मिती लोकांसाठी असेल तर ही लोकांची मतं जाणून घेणं त्याच्यासाठीही तितकंच उपयोगी पडतं. ती स्वान्तःसुखाय असेल तर ती लोकांसाठी सार्वजनिक करण्यात त्याचा कलानिर्मितीव्यतिरिक्त इतर हेतू असायला हवा. असो.

मी इथे चित्रकार वा चिंजं कुणाचीच बाजू घेत नाहीय वा मुखपृष्ठ कसं योग्य-अयोग्य आहे, याबाबतही बोलत नाहीय. कुठल्याही कलाकृतीबाबत एखादा अर्थान्वय आपल्याला अवास्तव, ताणलेला वाटू शकतो. तेच इथे होत असेल तर त्यातून कलेबाबत काही नवं शिकायला मिळतं का इतकं आपण करू शकतो, असं वाटतं.

असो. चित्रं पाहून मला काय वाटलं ते जमलं तर सांगीन कधीतरी.

(अर्थात, यात चिंजंनी संदीपसोबत काम केलेलं नाही हे इथे गृहीत धरलंय)

असेल बुवा.

प्रतिसाद खरोखर आवडला. पण, तो एखाद्या सुंदर कलाकृतीच्या संदर्भात चाललेल्या चर्चेत आला असता तर जास्त थोर वाटला असता. इथे जरा वायाच गेल्यासारखा झाला. असो.

खरंतर मला वेळ नसल्याने मी लेखनसीमा घालून घेतली होती. पण अमुकसारख्या व्यक्तीने प्रतिसाद दिल्यावर व त्यात काही बिंदुगामी मुद्दे उपस्थित केल्यावर वेळ काढणं सोडून पर्याय नव्हता. यानंतरचा प्रतिसाद वेळ झाल्यावर/झाल्यास केला जाईल याची नोंद घ्यावी.

एक चित्र हजारो शब्दांइतकंच बोलकं असतं हे हा धागा सिद्ध करतो. मात्र हे जालावरच्या तयार प्रतिमा चिकटवून केलेलं ठिगळचित्र (अर्थात कोलाज) असल्याने अधिक शब्द लागले असावेत Wink मुळात, हे चित्र कितीही अमॅच्युअर आणि पुअरली पेस्टेड (पॉर्न शब्दाच्या चौकटीमागून मूळ जालावरील चित्रातला शब्दाचा लहानसा भाग डोकावतोय, किंवा प्लीजची काळी चौकट ट्रकच्या दुभंगावरच कोणताही पोतबदल न होता पेस्ट झालीये इत्यादी अनेक गोष्टींमुळे पुअरली पेस्टेड) कोलाज असले तरी इतक्या शब्दांच्या कुबड्या लागाव्यात इतके काही ते दुबळे नाहीये. पण तरीही संपादकांना अन्वयार्थ उलगडूनच दाखवायचाय त्याला इलाज नाही. तर ते असो.

इथे अनेक गोष्टी आहेत. मुळात अनुक्रमणिका पाहिलीत तर हा धागा संपादकीय विभागात आहे. तेव्हा हा अन्वयार्थ अधिकृत संपादकीय अन्वयार्थ आहे. तो त्यांनी ठिगळचित्रकाराशी बोलून लिहिला नसेल तर तो त्यांचा दोष. जर त्या चित्रकाराला आपल्या ठिगळचित्राविषयी अन्य काही लिहायचे असेल तर तो लिहिल आणि जर त्याने म्हटले की, "नाही नाही संपादक काहीही लिहोत - त्यांना नीटसे हे कळलेले नाही - हे चित्र पेस्टवताना मी याला असे बघत होतो" तर उत्तम. मग ही चर्चाच गैरलागू ठरेल. मात्र तोवर अधिकृत संपादकीय अन्वयार्थ हाच उपलब्ध आहे. जर नुसते मुखपृष्ट चर्चेसाठी/मतांसाठी खुले केले असते आणि हा अन्वयार्थ प्रतिसादात आला असता तर तुमचे म्हणणे ग्राह्य होते. आता हे धागा स्वरूपात आले आहे. तेव्हा जर मी किंवा कोणीही सदस्य-वाचक या धाग्यावर लिहिलेल्या संपादकीय अन्वयार्थाचे खंडन करत असेल तर छे छे तुम्ही या अन्वयार्थाच्या धाग्यावर लिहिताना हाच अन्वयार्थ गृहित का धरता? असे विचारणे -सॉरी पण -हास्यास्पद आहे. हा अन्वयार्थावर प्रतिकीया नको असतील तर तो जाहिर लिहावाच का?

आजवर ऐसीवर असे मुपृ 'समजावण्या'ची गरज पडली नव्हती. ही गोष्ट नवा पायंडा धरू. मुखपृष्ठावर प्रतिक्रीया देण्यासाठी वेगळी सोय असावी हे उत्तम पण त्यासोबत "थांबा हं तुम्हाला हे समजावतो हं! तुम्हाला जर हे ठिगळचित्र झेपलं नाही तर या, मी मदत करतो." अश्या स्वरात ते आहे.

इतकंच नाही लोकांनी 'ब्लो माय ट्रम्पेट' ऐकून ट्रम्पेट वाजवायला गेल्यावर "अहो पण ट्रम्पेट कुठाय? ही नुसतीच पिपाणी आहे" अशी तक्रार केली तर, नाही नाही हे ट्रम्पेटच कसे आहे हे 'समजावणारी' पुरवणी 'मदत' जोडली तरी "छे छे हा फक्त एका व्यक्तीचा अन्वयार्थ आहे" असे म्हणणेच अचंबित करणारा आहे.

ही समजावणी नाहीये, मदत नाहिये तर फक्त अन्वयार्थ आहे असे वाटायला आधी जागा होतीही असे वादापुरते मान्य करता आले असते. पण ही जी रातोरात पुरवणी वाढवली जाते त्यात स्पष्ट म्हटले आहे

मुखपृष्ठाला आलेल्या काही प्रतिक्रियांवरून असं जाणवलं की त्यातल्या काही घटकांविषयी थोडं आणखी स्पष्टीकरण दिलं तर एक दृश्यप्रयोग म्हणून त्यात काय काय केलेलं आहे हे समजण्यासाठी त्याची मदत होईल.

आता तर स्पष्टपणे सांगितलं जातं हे चित्र समजून घ्यायला हे वाचा. तरीही ते काय काहिहि सांगतील, त्या लेखनाकडे लक्ष द्यायची गरज नाही असे म्हणणे असेल तर एकवेळ, अमुक, तुमच्या म्हणण्याचा विचार करता येईल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी व्यवस्थापकांचे अभिनंदन. स्तुत्य उपक्रम. मुखपृष्ठ आणि अंकाचे नाव भयंकर आवडले. Loved all the pictures of women and their naked bodies and different poses. But men are showcased differently on the coverpage - there is one with a face (who seems to be hungry ;)), John Abraham is only showing one nipple, and Soman is censored. It doesn't seem fair. Is porn only associated with women and their naked bodies? Doesn't that make it sexist?

अरे हो की.. पुन्हा बघितल्यावर ते सेक्सिस्ट आहे हा तुमचा तर्क मलाही पटतोय!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुखपृष्ठातल्या - आणि विशेषांकात अन्यत्र थीम म्हणून वापरलेल्या चित्रांतही - juxtaposition हे तंत्र वापरलेलं जाणवतं. एखादी गोष्ट अधोरेखित करायची तर त्याच्या जोडीने त्याच्या विरोधी धर्माची गोष्ट ठेवायची, ज्या योगे त्या वस्तूचं - किंवा तिच्या शेजारच्या वस्तूचं - भान अधोरेखित होतं. मी प्रामुख्याने दृष्य अनुभवांबद्दल बोलतो आहे हे उघडच आहे. रसास्वाद, गंध, आवाज यांच्या अनुभूती एकमेकांमधे इतक्या सेंद्रियरीत्या मिसळतात की असं जक्स्टापोझिशनिंग त्यांच्या बाबत मला कठीण वाटतं. दृष्य अनुभवांबद्दल मात्र हे एकसमयावच्छेदेकरून शक्य आहे.

तर हा विरोधाभास इथे श्लैल्य नि अश्लैल्याच्या संदर्भात वापरल्याचं मला जाणवलं. आंबा खाणं, फेसबुक पाहणं, सेल्फी काढून टाकणं, चांदोबाचं मुखपृष्ठ, हॅम बर्गर, कपिल शर्मा कॉमेडी शो, बालगंधर्व मधला सुबोध भावे यासार्‍यामधे पॉर्न आहे याचं सूचन एकंदर थीममधून आपल्याला दिलं गेलेलं आहे.

पारंपारिकदृष्ट्या विचार करतां, उपरोल्लेखित गोष्टींमधे लैंगिकता नाही - किमान शारिरीक समागमाचं सूचन नाही. मात्र त्यांच्या सेवनामधे/ग्रहणामधे/अनुभवण्यामधे बटबटीतपणा, ठळकपणा, एक प्रकारचा उथळपणा आहे हे सूत्र असल्याचं जाणवतं.

यात काय आहे यापेक्षा काय नाही याची आपण कल्पना केली म्हणजे "पॊर्न" या संकल्पनेला नक्की कसं मांडलं आहे याची कल्पना येईल. या थीममधे "काय नाही" याचा चटकन विचार करतां असं जाणवतं की यात सौष्ठव, मिनिमालिझम, एक प्रकारचा निवांतपणा, सेन्स ऒफ प्रपोर्शन असं दिसत नाही. दुसरं म्हणजे यात निवडल्या गेलेल्या इमेजेसमधून - मग तो फोटो असो की पेंटिंग असो - त्यात अर्थाचे वेगवेगळे पदर दिसावेत, रचना किंवा कोनांच्या दृष्टीने काहीतरी अनोखं वाटावं असं नाही.

तर मग पॊर्न-अनुभवाला "सौंदर्यानुभूतीच्या बरोब्बर उलट जे असतं ते" असं मानावं हे प्रस्तुत थीममधे सूचित करायचं आहे काय?

असो. एक प्रकारे हे मुखपृष्ठ किंवा ही थीम एक प्रकारचं व्हिज्युअल सटायर आहे. आपण ज्या गोष्टी सहजगत्या उपभोगतो त्यांची अनुभूती ही अर्थसंपृक्त किंवा श्रीमत आहे की ती बटबटीत आहे, एक प्रकारचा चीपनेस त्यात आहे याचा विचार या सटायरने मला दिला इतपत म्हणतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मर्ढेकरांच्या एका सुप्रसिद्ध ओळीचं विडंबन करतां असं सुचेल की

श्लैल्याच्या या तलवारीवर
अश्लैल्याची तुटेल ढाल !

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्यात काहीही घुसडता येइल.
जे जे मला आवडत नाही ते सगळ पॉर्न अस मी जाहीर करतो.
उदा. सुधीर गाडगीळ ने दिलेल्या सर्व मुलाखती

खरंतर जे जे आवडते, जे जे चांगले म्हणजे पॉर्न अशी व्याख्या असायला पाहिजे ना.

सगळे उलटे का बोलतायत?

हो, ४×४ ऐवजी ८×४ हवे होते, ट्रकचा मागचा भाग वाटण्यासाठी. कल्पना मस्तं, रंगसंगती व निवड छानच! सेक्सीस्ट म्हणायला वाव आहे पण!

ही साईट आठवली (वार्‍याने हलते रान?) - http://trumpdonald.org/

(हा विनोद आहे. ट्रम्पसमर्थकांनी आपल्या 'भावणा दूखावून' घेऊ नयेत ;))

मला मुखपृष्ठाचं चित्र आवडलं असं अजून म्हणता येत नाही. हे असं चित्र असलेलं पुस्तक किंवा मॅगझिन मी चटकन हातात घेणार नाही. कारण ते फार बटबटीत आहे. तिथेच मुखपृष्ठाचा मूळ हेतू साध्य होतो.

संदीपने जेव्हा अंकाचं नाव म्हणून 'पॉर्न ओके प्लीज' सुचवलं तेव्हा नाव ऐकूनच हसायला आलं आणि ते तो चित्रात मांडणार कसं याबद्दल कुतूहल लागून राहिलं होतं. ट्रकांच्या मागे दिसणारी चित्रं धूळ उडून, हवेचा परिणाम होऊन मळकट होतात; तो पोत मुखपृष्ठाच्या आणि इतर चित्रांत नाही. जे तुकडे चित्रांत एकत्र जोडलेले आहेत त्यांतल्या बहुतेक चित्रांमध्ये चकचकीतपणा आहे.

नीलिमा कढे मुलाखतीत म्हणतात, "आपली दृश्यजाणीव मृत आहे, हे निश्चितच खरं आहे. याला दृश्यप्रदूषणही म्हणणार नाही, ही दृश्यनिरक्षरता आहे. आपल्या डोळ्यांवर मोठमोठे फ्लेक्सबोर्ड्स आघातच करत नाहीत. अस्वस्थ वाटून ते फाडून टाकले पाहिजेत! हे होत नाही, कारण कोणालाही हे खटकत नाही. परिसरामध्ये असणारी घाण पाहून त्रास होतच नाही. कारण आपण सौंदर्य बघण्याऐवजी हेच बघत बघत मोठे झालो आहोत."

फ्लेक्सबोर्डांवर असतो तसा बटबटीतपणा मुखपृष्ठाच्या संपूर्ण चित्राला आहे, पण आतल्या प्रत्येक चौकटीला चकचकीत फिनीश आहे, अपवाद अभिजात चित्रा-शिल्पांचा. चकचकीत ते सगळं सुंदर असं समजण्याच्या जगात बर्गरमधून ओघळणारं चीज मुद्दाम मिरवणं किंवा बाथटबमध्ये गुलाबपाकळ्या घालून नाहणारा जॉन अब्राहम (सेक्सी नसून) अश्लील आहे; हे मृखपृष्ठातून मला दिसतंय. हे सगळं एकत्र मांडलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक चौकट स्वतंत्र बघण्याचं स्वातंत्र्य चित्र बनवणाऱ्याने दिलेलं नाही. त्या चौकटीमुळे अभिजात आणि रसरशीत चित्रंही बटबटीत दिसायला लागतात.

उदाहरणार्थ मला 'बॅटलिंग पॉर्नोग्राफी' पुस्तकाचं मुखपृष्ठ आठवलं; अंकाच्या मुखपृष्ठामुळे मला ते अधिक चांगलं समजलं; किंवा उलटही असेल कदाचित. या चित्रात 'हसलर'चं मुखपृष्ठ स्वतंत्र बघता येत नाही, तर त्याला असलेली निषेधाच्या काळ्या रंगाची पार्श्वभूमी आणि हातात फलक धरणाऱ्या स्त्रिया असं ते चित्र एकत्र वाचणं अपेक्षित आहे. स्त्रीचं शरीर फक्त मांसाचा तुकडा म्हणून दाखवणारं बटबटीत चित्र स्त्रीवादासंबंधीच्या पुस्तकावर असणं, ही गोष्ट काहींना सेक्सिस्ट वाटू शकते; संदर्भाशिवाय वाक्यं वाचणं किंवा सोयीसाठी वाक्याचा तुकडाच वाचण्यातली गल्लत अशीच असते; चित्र अर्धंच वाचणं.

'बॅटलिंग पॉर्नोग्राफी'च्या मुखपृष्ठापेक्षा अंकाचं मुखपृष्ठ आधुनिक वाटतं; सगळे अनुभव एकसंध दिसत नाहीत, तुकड्यांतुकड्यांमध्ये येतात अशा निराशाजनक अर्थाने आधुनिक. जिथे नजर जावी तिथे अशी चिकनीचुपडी दृश्यं दिसतात, ती डोळ्यांवर तुकड्यातुकड्याने आदळत राहतात. पण ते सगळं एकाच अश्लील संकल्पनेत गोवता येईल असं असतं, असं मला हे मुखपृष्ठ बघून जाणवतं. जिथे 'आई-दादांचा आशीर्वाद' यांतली एक पवित्र भावना किंवा खजुराहोची शिल्पं आणि अन्य भारतीय अभिजात चित्रंही बटबटीतपणा घेऊनच समोर येतात.

थोडंसं अंकाच्या रंगांबद्दलही बोलावंसं वाटतं. त्यातला अबोली रंग, टिप्पीकल गर्ली, बायकी छापाचा आहे (तसं असूनही तो इथे गोग्गोड दिसत नाही हे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं).

एवढा मोठा प्रतिसाद टंकूनही, हे मुखपृष्ठ असणारं पुस्तक मी सहज हातात घेईन असं मला वाटत नाही. पॉर्न, अश्लीलता याबद्दल बराच विचार करून, ह्या अंकात तीन लेखांक लिहूनही मला अश्लैल्याबद्दल फार प्रॅक्टिकल कुतूहल नाही, सगळं सैद्धांतिकच आहे, असं ह्या मुखपृष्ठामुळे वाटायला लागलं आहे. ह्या मुखपृष्ठामुळे, मला वाटलं होतं त्यापेक्षा मी अधिक स्नॉब आहे, असा साक्षात्कारही होत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकंदरीत चर्चा वाचून 'ट्रक्युलंट' ह्या शब्दाच्या उत्पत्तीचा अंदाज आला Wink

मुखपृष्ठ म्हणून हे चित्र आणि वरच्या चित्रपट्ट्याही मला अंकापासून पारच बारगळलेल्या वाटतात. चित्रकाराचा त्यामागे काहीएक विचार असणारच. पण तो मला काही झेपलेला नाही हे नोंदण्याची संधी संपादकपदाची झूल उतरवल्यावर घेते आहे. मग - ट्रकसाधर्म्य आहे की नाही, त्याबद्दल स्पष्टीकरण आणि पुरवणीस्पष्टीकरण हवं की नाही, चित्र कोणकोणत्या स्रोतांतून वाहत येतं, त्यानं नक्की काय साधतं, या वादांमध्ये न पडणंच उत्तम. कारण माझ्यातला वाचक - प्रेक्षक त्या चित्रासाठी खुली नजर घेऊन आलेलाच नाही. ही माझी मर्यादा की चित्रकाराची - ते काळच ठरवेल.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन