फटीतूनच जाणारी जमात !

धड धड धड धड धड धड…… सलग स्पीडब्रेकर नको म्हणून रस्त्याच्या एकदम कडेच्या फटीतून, हो रस्त्याच्या फटीतूनच जाणारी जमात आमची. काय ते सुख मिळत असंल ? सगळ्यांचंच आहे हे. होय. सगळ्यांचं. पण हे असं का ? याचा कोणीच विचार करून बघत नाही. जगाच्या विरहित घाई प्रत्येकाला. जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असेलही. पण एखादवेळेस स्पीड कमी करून, त्या स्पीडब्रेकरवरून गाडी चालवत गेलं तर काय बिघडतं ? असं मनातल्या मनात बोलत सुकाळ गाडी चालवत होता. त्याच्या मनात विचार आला, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीचं बघतोय. हरकत काहीच नाहीये. पण ही सोय किती दिवस ? त्याचा काय परिणाम होतोय ? याचं भान कधी येईल ? मुळात याचं भान येणं गरजेचं आहे हे किती जणांना महत्वाचं वाटत असेल ? किती जणांना त्याची माहिती असेल ? कितीजणांना ती माहितीसुद्धा नसेल ? किती जणांना त्याचा लवलेशही नसेल ? काय माहित ?!

सुकाळ जरा बाजूला आला आणि त्यानी एका चहाच्या टपरीवर त्याची गाडी थांबवली. त्यानी मोठा सुस्कारा सोडला. त्यानी एक चहा सांगितला. समोर एक माणूस स्मोकिंग करत बसलेला. त्याचा धूर सगळीकडं पसरत होता आणि पुन्हा सुकाळचा स्वत:शी संवाद सुरु झाला. सोय ! माणसाचा एक स्वार्थी गुणधर्म. “आपण आपली सोय पहायची बाबा !” असा हा स्वार्थी आणि पुळचट गुणधर्म. ज्यात त्या एकट्याचं भलं त्याला दिसत असतं. का भान नाहीये कोणालाच ? स्मोकिंग करणारा, त्याचं द्या सोडून तो त्याची सोय पाहतोय पण बाकी लोक गोधडी शिवतात तसं तोंडाला शिवून बसलेत का ? एक शब्द, साधा एक शब्द त्याला बोलून सांगू शकत नाही ? का ही बाकीच्यांची सोय म्हणायची मग ? सुकाळ जागचा उठला आणि शेजारी बसलेल्या काकांना म्हणाला, “का ओ काका ही आहे तुमची सोय ?” आणि ते जागचे उठून गेले. थोडक्यात तिथून पळालेच. सुकाळनी बिल दिलं आणि तो गाडी काढून पुढं निघाला. त्या स्मोकिंग करणाऱ्या माणसाला सांगून काही उपयोग नाही हे त्याला पक्कं माहितीये, कारण संधीसाधूंपेक्षा त्यांना काहीही न म्हणणारे, काहीही न बोलणारे जास्त कारणीभूत असतात. म्हणूनच तो पुढं निघाला. ते संधी साधू देणारे लोकंच सुकाळ सध्या टार्गेटवर घेऊन निघालाय. आणि सगळे त्याला फाट्यावर मारतायत. सग्गळे त्याला फाट्यावर मारतायत.

सुकाळला प्रश्न पडलेत. मला फाट्यावर मारणं ही सोय आहे का ? की पळत राहणं ही सोय ?

तो हसला आणि मनाशीच बडबडला, “आमची साली फटीतूनच जाणारी जमात !”

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

तुमची स्टाइल वेगळी आहे. आवडले. नीरीक्षण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0