सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ३)

-------------
भाग १ | भाग २ | भाग ४ | भाग ५
-------------
निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'.

प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली. माझा आणि व्यायामाचा संबंध शाळेत पी टी च्या तासाला सरांनी करून घेतलेल्या शारीरिक हालचालींपुरताच होता. आणि त्यातही मी सुरवातीलाच जो उत्साह दाखवला होता त्यामुळे माझे नागरीकशास्त्राचे आणि पी टीचे शिक्षक एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले होते.

व्यायाम आवडू लागून व्यायामशाळा वगैरेंच्या मागे लागण्याच्या वयात "Pen is mightier than sword" या सुविचाराच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे दंड बैठका आणि जोर वगैरेंच्या मागे लागण्याऐवजी जिथे जिथे बैठका मारून बसून राहिल्यास दंड लागत नाही अश्या सर्व कार्यक्रमांच्या मागे जोर लावला होता. त्यामुळे मित्रही तसेच. कुणालाच माझे हे नवे दुःख कळत नव्हते. आरशात बघून भांग पाडताना मला माझे पोट आधी दिसू लागले. कपाट उघडून कपडे शोधताना, न होणारे शर्ट पुढे येऊन 'मला घालून तर बघ' असे चिडवतायत असे वाटू लागले. बूट घालताना आपण लेस असलेले बूट घेण्यास नकार का दिला? त्याचे कारण राहून राहून समोर येवू लागले. त्या विमनस्क अवस्थेत माझे खाणे कमी झाले. हे वाक्य लिहित असताना मागे उभी असलेली माझी आई आणि बायको दोघी फिस्सकरून हसल्या. मी सासू सुनेत ढवळा ढवळ करीत नाही. माझा स्वभावच तसा आहे. एकदा ठरवले ना नाही करायची ढवळा ढवळ, मग नाही. कोणी किती का म्हणेना की मी घरातली एक काडी इकडची तिकडे करीत नाही, पण निश्चय म्हणजे निश्चय, म्हणून इथे सुद्धा त्यांच्या हसण्याचे कारण न विचारता पुढे लिहिणे चालू ठेवले

हा तर मी काय म्हणत होतो. मनाची अवस्था पार विमनस्क झाली होती. आणि या अवस्थेत मी जिम लावायचा निर्णय घेतला. इतरांच्या बाबतीत असं काही होतं की नाही मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीत फार होतं. एखादी गोष्ट मी करायची ठरवली की सगळीकडे मला त्याच गोष्टी दिसू लागतात. लग्न करायचं होतं तर सगळीकडे उपवर मुली दिसू लागल्या. घर घ्यायचं होतं तर सगळीकडे घरं दिसू लागली. मुलं झाली सगळीकडे दुपटी, लाळेरी, खुळखुळे, पिपाण्या, डायपर विकणारे दिसू लागले. तसंच, सकाळी क्लासला जाताना मला नवीन शोध लागला. क्लासच्या जवळ चक्क तीन जिम आहेत. मग घरी आल्यावर मी माझा निर्णय जाहीर करून टाकला की मी जिम लावणार. पण माझ्या या निर्णयावर इतक्या विविध प्रतिक्रिया येतील ते मला माहिती नव्हते.

आई म्हणाली, 'काही जाडा बिडा नाही आहेस. उलट असाच छान दिसतोस'. भाऊ म्हणाला, 'नीट बघून घे रे बाबा, मी तीनदा पैसे भरून पस्तावलोय. अंग फार दुखतं. आणि तुझी लेक्चर्स कशी सांभाळशील?' क्लासमधले सहकारी त्यांचे पूर्ण वर्षाचे पैसे भरून दहा दिवस गेल्याचे अनुभव सांगू लागले. सोसायटीमधला जिम मध्ये जाणारा परममित्र, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला की, 'अरे बाबा पाच दिवसात माझ्या पाठीत उसण भरली. आता घरी कसे सांगणार म्हणून जिमचे कपडे घालून तास दीड तास समवजनी मित्राच्या घरी जाऊन बसतो'. माझी घरगुती ऋजुता दिवेकर म्हणाली, 'जिमचं नंतर बघा. आधी तोंडावर नियंत्रण ठेवा.' मी म्हणालो, 'अगं ! प्रोफेसरने तोंड बंद केले तर कसं चालेल?' फणकाऱ्याने मान उडवून निघूनच गेली ती. कधी कधी बायकांचं काही कळतंच नाही मला. मुलांनी तर कहरच केला. त्यांनी बच्चे कंपनीत जाहीर करून टाकलं की सायकल विकल्यावर आता आमचे बाबा जिमला जाणार आहेत, आणि सायकलसारखी जिम विकता येत नाही म्हणजे त्यांची मजा येणार आहे. त्यांचे मित्र घरी येता जाता माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागले.

मग मी जिमची चौकशी करण्याच्या मागे लागलो. हा एक वेगळाच अनुभव होता. प्रत्येक जिम मध्ये गेल्यावर त्यांनी मला जिमची एक फेरी मारून आणवली. तिथे सगळीकडे मोठमोठ्या आवाजात रॉक की पॉप की मेटल असलं कुठलं तरी संगीत लावून ठेवलं होतं. त्या मोठ्या आवाजाच्या संगीताच्या पार्श्वध्वनीवर वेगवेगळी उपकरणे काय करतात त्याची माहिती ते मला देत होते आणि मी जणू माझं आडनाव तळवलकर असल्याच्या थाटात त्यांच्या प्रत्येक विवेचनाकडे लक्ष देत होतो. त्यामुळे कळलं काही नसलं तरी आपल्या शरीराचे वरचा, खालचा आणि पोटाचा असे तीन भाग असतात आणि त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे व्यायाम असतात इतपत प्राथमिक ज्ञान झाले.

प्रत्येक जिममध्ये त्यांनी माझे वजन केले. ते प्रत्येक जिममध्ये वेगवेगळे येत होते आणि प्रत्येक ठिकाणी वाढतच चालले होते. किती होते ते सांगून मला चिडवण्याचा तुमचा मार्ग मी उघडून देणार नाही. फक्त इतकेच सांगतो की जर मी सलमान खानच्या being human सारखा ब्रँड काढला तर त्याचे नाव being superhuman ठेवावे लागेल. मग प्रत्येकाने मला जिमचे महत्व पटवण्यासाठी B M I वगैरे तांत्रिक गोष्टींचा मारा केला. त्यातून मला एकच कळले की मी माझ्या उंचीच्या प्रमाणाबाहेर वाढलो होतो. एकाने तर सांगितले की चाळीशीनंतर शरीराचे metabolism की काय ते मंद होते. माझा धीर सुटू लागला आणि शेवटी तिसऱ्या जिममधील चौकशी संपताच पैसे भरून टाकले.

घरी येताना मनातल्या मनात सर्व जिमच्या फीजची तुलना करून बघितली आणि जाणवले की मी सगळ्यात महाग जिममध्ये वर्षभराचे पैसे भरून घरी चाललो होतो. आता हे हिला कसे समजावयाचे ह्या विचाराने टेन्शन येवून मी ते कमी करण्याचा उपाय म्हणून एका उपहारगृहाकडे मोर्चा वळवला.

-------------
भाग १ | भाग २ | भाग ४ | भाग ५
-------------

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग फारच आवडला. पण मी कालच अन्यत्र जाऊन वाचून आले. रहावत नाही :). फार आवडली ही ललित-साखळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद…. ऐसीच्या निमित्ताने मी देखील पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणिक एक म्हणजे जिममध्ये ते व्यायामगुरू आणि गुर्विण्या तुमचे पर्सनल ट्रेनर बनायला बघतात. कारण त्यांना अजून वरचे चार पैसे मिळवायचे असतात....
अशाच एका गळेपडू गुर्विणीला मी, "मला सुम्मो रेसलर व्हायचंय, काय ट्रेनिंग टिप्स आहेत तुझ्याकडे?" असं म्हणून हताश केलं होतं!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या नशिबी गुरंच आपलं गुरूच आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इथे हसून घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.