नमस्कार मंडळी,
मी मराठी साहित्याचे वाचन बरेच केले आहे. अजूनही करत आहे. अर्थात येथील वाचनसम्राटांच्या तुलनेत आम्ही मांडलिक राजेच म्हणा. सुरुवातीला घरापासून वाचनालय लांब असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पैसे वसुल व्हावेत असा साधासरळ हिशेब असल्यामुळे मी जास्त पाने असलेले पुस्तकच घेत असे. यातुनच कादंबर्या वाचण्याची आवड वाढत गेली. कादंबर्या, कथा, संकीर्ण, प्रवासवर्णने, आत्मचरीत्र (चरीत्र नव्हे) अशा प्रकारच्या वाचनाची आवड जास्त प्रमाणात आहे.
कुठेतरी असेही वाचले की कादंबर्या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे.
वाचतांना बर्याचदा अनुवाद वाचण्यात येतात आणि मग कधीकधी मुळ लेखन वाचण्याची इच्छा होते पण ते तितक्यापुरतेच. तोंडी लावण्यापुरती हिंदी, इंग्रजी आणि गुजराती पुस्तके वाचली आहेत पण ती अगदी नगण्यच म्हणता येतील.
इथे विविध भाषांमधील साहित्य अभ्यासणारे विविध वाचक आहेत. तुम्हाला तुमच्या मुळ भाषेव्यतीरीक्त इतर भाषेतील वाचनाची आवड कशी निर्माण झाली याची माहिती मिळाल्यास मराठी व्यतीरिक्त इतर भाषांकडे वळता येईल का ? व कसे ? यासाठी मदत मिळेल असा विश्वास वाटतो.
धन्यवाद !