आधुनिकतेला पारखी आपली मराठी
.
गुगलने हिंदीमध्ये व्हॉइस सर्चची सोय करून देऊन भारतीय भाषांसाठी एक मोठी क्रांतीच केलेली आहे. त्याचा अचूकपणा मी तपासून पाहिला. अगदी छान आहे. मराठीतले शब्द बोलले तरी त्याला जवळपासचे हिंदी शब्द पकडले जातात.
दक्षिण भारतीय किंवा बांग्ला भाषेसाठी अशी सोय आधीच करून दिलेली आहे की नाही याची मला कल्पना नाही.
गुगलने टचस्क्रीनवर मराठीत लिहिलेले टेक्स्टमध्ये रूपांतरीत करण्याची सोय आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. तीदेखील फार प्रभावीपणे काम करते.
असे प्रकल्प खरे तर फार महाग नाहीत. तरीही टेक्स्ट रेकग्निशन (text recognition), व्हॉइस रेकग्निशन (voice recognition) व स्पेलचेक (spellcheck) यासारख्या गरजेच्या गोष्टींकडे आपले स्वत:चे लक्ष जात नाही ही भारतीय भाषांची शोकांतिका आहे. आणखीही काही गरजा असू शकतात.
मराठीतून टायपिंग करण्यासाठीची निर्दोष साधनेही जवळजवळ नाहीतच किंवा असली तरी बोटावर मोजण्याइतकीही नाहीत हे वास्तव आहे. शिवाय लिपी देवनागरी असली तरी मराठी व हिन्दीच्या काही गरजा वेगळ्या आहेत हे लक्षात घेतले जात नाही.
आपल्या शासनाचे सांस्कृतिक खाते, शिक्षण खाते यांचे या आधुनिक गरजांकडे लक्षच जात नाही का? यथावकाश गुगल मराठीसाठीही हे करेल, पण स्वत:हून स्वभाषेचा विविध मार्गांनी विकास करण्यातला अभिमान आपल्याकडे नाहीच का? हे प्रकल्प करण्यामध्ये गुगल व आपले सरकार यांची भागिदारी आहे असेही ऐकण्यात येत नाही.
सध्या अनेक जण सोशल मेडियावर रोमनमधून मराठी लिहितात. त्यांनी तसे लिहिले तरी वाचणा-यांनी ते समजून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. ते सोशल मेडियामध्ये पुढचा बहुतेक काळ असणारच आहेत, तेव्हा देवनागरी टायपिंगची पद्धत शिकून घ्यावी, आत्मसात करून घ्यावी हे त्यांच्या लक्षातच येत नाही. इतका आळशीपणा चालूच राहिला, तर भविष्यात रोमन हीच मराठीची लिपी राहील व याबाबतीत आपण मलेशिया-इंडोनेशियाची मलय भाषा, फिलिपीन्सची टॅगॅलॉग भाषा यांच्या यादीत जाऊन बसू.