आल्फ्रेड हिचकॉक

संकीर्ण

आल्फ्रेड हिचकॉक

लेखिका - नीलांबरी जोशी

आल्फ्रेड हिचकॉक(१३ ऑगस्ट १८९९ – २९ एप्रिल १९८०)

चित्रपटाचा नायक मोकळ्या आभाळाखाली शेतांमधून जिवाच्या आकांतानं पळत असताना मध्येच संकटाच्या चाहुलीनं, तो एकदम पाय मुडपून खाली बसतो. त्याच क्षणी वरून एक विमान येतं. ते खाली यायला लागतं आणि अकस्मातपणे खाली येऊन शेतांमध्ये कीटकनाशकांचा विषारी फवारा मारतं. एकदम तिथे चक्रीवादळ सुरू होतं आणि नायकाचा जीवच घुसमटतो. कसाबसा जीव मुठीत धरून तो दूरवरून येणाऱ्या एका गाडीकडे परत धावायला लागतो. नायक गाडीला थांबण्यासाठी हात दाखवतो पण गाडी त्याच्यासाठी न थांबता भरधाव वेगात निघून जाते. प्रेक्षकांचा श्वास रोखलेलाच रहातो! अशा हजारो प्रसंगांत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा दिग्दर्शक म्हणजे थ्रिलर चित्रपटांचा बेताज बादशहा आल्फ्रेड हिचकॉक! शेतात एकदम विमान येऊन चक्रीवादळ होणं, हा 'डस्टिंग क्रॉप्स' गाजलेला प्रसंग त्याच्या 'नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट' या चित्रपटातला आहे. हिचकॉकनं हा प्रसंग शूट करताना कॅमेरा कसाकसा फिरेल, याचं एक उत्कृष्ट स्केच काढलं होतं. या दृश्यातला नायक म्हणजे कॅरी ग्रांट हा अभिनेता मरण पावला, तेव्हा सर्व टीव्ही चॅनेल्सनी त्याचा 'डस्टिंग क्रॉप्स' हाच गाजलेला प्रसंग दाखवला होता!

प्रचंड मोठं पोट, चपटा चेहरा, कपाळामागे गेलेले केस, बारीकसे पण चाणाक्ष डोळे, चिमणीच्या चोचीसारखं नाक आणि डबल हनुवटी असं अनाकर्षक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या हिचकॉकनं प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करणारे ५३ रहस्यप्रधान चित्रपट काढले. 'चित्रपटाचा मूळ हेतू मनोरंजन हा आहे आणि त्यासाठी आधी प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटात मुळात रस वाटायला हवा', असं म्हणणाऱ्या हिचकॉकनं थ्रिलर प्रकारातल्या चित्रपटांमध्ये एकमेवाद्वितीय असं स्थान निर्माण केलं.

हिचकॉक १

चित्रपटात तंत्राचा उत्कृष्ट वापर करणारा हिचकॉक सेक्स, रहस्य आणि विनोद यांचं बेमालूम मिश्रण करून थ्रिलर चित्रपट बनवत असे. सुटसुटीत कथा, आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना, प्रेक्षकांच्या मनाशी खेळ, सतत बदलणारी दृश्यं आणि कॅमेऱ्याचे बदलणारे अँगल्स, ताण वाढवण्यासाठी मागे चालू असणारं काहीसं लाऊड संगीत, सावल्यांचा गूढ खेळ, आरसे, गोलाकार जिन्याच्या भयावह पायऱ्या, फ्लॅशबॅक्स, प्रेक्षकांना विचारात पाडणं, एडिटिंग आणि साऊंडवर उत्तम लक्ष असणं, लाईटचे खेळ वापरून सावल्यांमुळे रहस्य वाढवणं हे सगळे थ्रिलर चित्रपटांचेे अविभाज्य भाग आहेत.

थ्रिलर चित्रपटात कोणाचं तरी आयुष्य टांगणीला लागलेलं असतंंच. थ्रिलर म्हटल्यावर पाठलाग, अपहरण, खून, सुरे, पिस्तुलं, विषप्रयोग, दरोडे, दहशतवादी, राजकीय हेरगिरी, प्रेमत्रिकोणातून घडणारे खून, बळी पडलेली माणसं, गुन्हेगार, दुर्दैवी लोक, निरपराध लोक, तुरुंगातले सहकारी, भूतकाळात भयंकर गोष्टी घडलेल्या व्यक्तिरेखा, स्त्रियांवर आलेलं एखादं भयावह संकट, कोर्टातले नाट्यमय प्रसंग, सुप्त लैंगिकता, मनोविश्लेषण, मानसिक रुग्ण, पोलिस, डिटेक्टिव्ह, एकसारखी दिसणारी दोन माणसं, विचित्र नातेसंबंधात गुंतलेली माणसं, सतत एकीकडून दुसरीकडे कुठेतरी प्रवासाला जाणारी माणसं - हे सगळं आलंच.

थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला. ज्या काळी चित्रपटाचा दिग्दर्शक नावाचा माणूस कसा दिसतो, ते लोकांना माहीतदेखील नसायचं अशा काळात प्रत्येक चित्रपटात स्वत: क्षणभर दर्शन देऊन हिचकॉक प्रेक्षकांपर्यंत सहज पोचला.

पाच फूट आठ इंच उंचीचा हिचकॉक आयुष्यभर लठ्ठच होता. एकदा तर त्याचं वजन ३६५ पौंडांपर्यंत (१६५ किलो) पोचलं होतं! त्याचं रोजचं जेवण रोस्ट चिकन, हॅमचा तुकडा, उकडलेले बटाटे, दोन भाज्या, ब्रेड, एक बाटली वाईन, सॅलड, डेझर्ट आणि ब्रँडी इतकं साधं(!) असे. त्याला आईस्क्रीम भयंकर आवडायचं. मात्र आईस्क्रीम खाणं हा कार्यक्रम साधारण संध्याकाळनंतरचा असायचा. खाण्याची आवड असणाऱ्या हिचकॉकला अंड्यांचा मात्र फोबियाच होता!

हिचकॉकला भीती हा विषय केंद्रस्थानी ठेवून चित्रपट का काढावेसे वाटले, याचं उत्तर त्याच्या बालपणातल्या दोन प्रसंगांमध्ये सापडतं. त्यातला पहिला प्रसंग खूपच विचित्र होता. हिचकॉक पाच वर्षांचा असताना एकदा त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या बेडरूममध्ये झोपवलं आणि ते दोघं फिरायला गेले. लहानगा हिचकॉक मधल्या काळात उठला. भोवतालचा अंगावर येणारा काळोख पाहून तो भीतीनं गारठला. मग तसाच रिकाम्या घरात चालत चालत तो स्वयंपाकघरात पोचला. तिथल्या फ्रिजमधला मांसाचा एक तुकडा त्यानं खायला सुरुवात केली. मात्र आपण एकटे आहोत आणि अचानक कोणीतरी काळोखातून आपल्या अंगावर येईल, अशी भीती त्याच्या मनात तेव्हा बसली ती कायमच! दुसऱ्या प्रसंगात म्हणजे त्याच्या लहानपणी हिचकॉकच्या वडिलांनी एक चिठ्ठी देऊन त्याला पोलिस स्टेशनात पाठवलं. तिथे 'खोडकर मुलांचा आम्ही असाच समाचार घेतो' असं एक पोलिस म्हणाला आणि त्यानं दहा मिनिटं हिचकॉकला एका बराकीत डांबलं. ती दहा मिनिटं, आता पुढं काय घडेल याच्या सस्पेन्समध्ये हिचकॉकनं अतिशय साशंक आणि भयग्रस्त अवस्थेत काढली. हे दोन अनुभव हिचकॉक आयुष्यात कधीच विसरू शकला नाही, असं तो स्वत:च सांगत असे.

आल्फ्रेड हिचकॉकचा जन्म १३ ऑगस्ट १८९९ला, 'फ्रायडे द थर्टीन्थ' या भीतिदायक समजल्या जाणाऱ्या दिवशी लंडनमध्ये झाला. हिचकॉकचे वडील विल्यम यांचा लंडनमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय होता. त्याची आई एमा जेन ही खूप करारी स्त्री होती. लहानपणापासूनच रोमन कॅथॉलिक धर्माच्या शिकवणुकीमुळे आपल्या हातून चूक घडली तर नंतर कन्फेशन मागावं लागेल, याची हिचकॉकला सतत काळजी असायची. त्यामुळे हातून चूक होऊच नये यासाठी त्याच्या मनात सतत एक दबलेली भीती असे. हिचकॉकच्या घरात आईची हुकमत होती. आक्रमक स्वभावाच्या आईबद्दलही त्याला कायम भीती वाटत असे. कदाचित यामुळेच हिचकॉकच्या 'नटोरियस', 'द बर्डस'‌, 'रिबेका' आणि 'सायको' अशा चित्रपटांमध्ये आईचा प्रचंड दबाव असलेला नायक दिसतो.

हिचकॉकला विल्यम हा भाऊ आणि एलन कॅथलीन ही दोन मोठी भावंडं होती. मात्र वयात बरंच अंतर असल्यामुळे हिचकॉक आणि त्याची भावंडं यांच्यात फारसं सख्य नव्हतं. आईची भीती आणि भावंडांशी फारसं न जमणं, यातून हिचकॉक एकाकी बनला. सोबतच्या विद्यार्थ्यांबरोबरही त्याचं नीट जमत नसलं तरी मानसिक पातळीवर हिचकॉकनं स्वत:चं एक भावविश्व निर्माण केलं होतं. हिचकॉकनं नकाशे जमवून एखादं ठिकाण त्या नकाशावरून गल्लीबोळांपर्यंत पाठ करण्यचा छंद जोपासला होता. एडगर अॅलन पो हा हिचकॉकचा आवडता लेखक होता. हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध, आत्मचरित्रं, राजकारणातली कारस्थानं असं सर्वच प्रकारांचं हिचकॉकचं वाचन जबरदस्त होतं. सिनेमाच्या तांत्रिक अंगांची माहिती देणारी पुस्तकंही हिचकॉक आवर्जून वाचत असे. नंतरच्या काळात त्याची सेक्रेटरी सुझन हिनं, 'विमान जमिनीवरून झेप घेऊन आकाशात कसं उडतं, ते मला समजतच नाही', असं म्हटल्यानंतर हिचकॉकनं चक्क तिला विमानं आणि एरोडायनॅमिक्स याबाबत सविस्तर समजावून सांगितलं होतं. असंच एकदा त्यानं एका माणसाला टेलिव्हिजन कसा चालतो, हेही समजावून सांगितलं होतं.

शाळा संपल्यावर 'स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड नॅव्हिगेशन' या कॉलेजमध्ये हिचकॉकनं यंत्रं, इलेक्ट्रॉनिक्स आणि जहाजं यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण त्याचे वडील १९१४ साली मरण पावले. त्यामुळे त्यानं शिक्षण अर्धवट टाकून 'हेन्ले टेलिग्राफ अँड केबल कंपनी'मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हा हिचकॉक फावल्या वेळात चित्रकला शिकत असल्यामुळे हेन्ले कंपनीनं त्याला आपल्या जाहिरातींच्या डिपार्टमेंटमध्ये हलवलं. एकदा विजेच्या दिव्यांचा वापर आणि केबलिंग किती महत्त्वाचं आहे, या विषयाची जाहिरात करायची होती. तेव्हा हिचकॉकनं दोन मेणबत्त्यांचं चित्र काढलं. बाकी कागदावर सगळा काळोख होता. चित्राचं नाव होतं 'चर्च लायटिंग'! विजेच्या दिव्याशिवाय चर्चमधलं दृश्य पुरेसं दिसणार नाही, असं हिचकॉकनं त्या जाहिरातीत चतुराईनं व्यक्त केलं होतं.

चित्रपट या प्रकाराचं हिचकॉकला आकर्षण वाटत होतंच. त्यातच 'फेमस प्लेयर्स' ही अमेरिकन कंपनी आपला इंग्लंडमधला फिल्म स्टुडिओ लंडनमध्ये थाटणार ही बातमी हिचकॉकला वाचायला मिळाली. या कंपनीत काम मिळवण्यासाठी तो त्यांच्या लंडनमधल्या स्टुडिओत जाऊन धडकला. १९२० साली फेमसनं हिचकॉकला पूर्णवेळ नोकरी दिली. यानंतर ३ वर्षांत हिचकॉकनं फेमस प्लेयर्सच्या ११ मूकपटांवर काम केलं. या काळात हिचकॉकनं चित्रपटाचं लेखन, पटकथा, संकलन अशा अनेक गोष्टी शिकून घेतल्या. स्टुडिओत सकाळी येणारा पहिला आणि स्टुडिओतून रात्री निघणारा शेवटचा माणूस, असं तेव्हा हिचकॉकचं वर्णन केलं जात असे.

'फेमस प्लेयर्स' मात्र या काळात डबघाईला येत चालली होती. चित्रपट बनवणं जमेना तसं फेमस प्लेअर्सनं आपला गाशा गुंडाळला आणि आपला स्टुडिओ इतर चित्रपट कंपन्यांना भाड्यानं द्यायला सुरुवात केली. फेमसचे सगळे पगारी नोकर बेकार झाले. त्यात हिचकॉक होताच. मात्र तेव्हाच मायकेल बाल्कन हा इंग्लिश निर्माता, व्हिक्टर सॅव्हिल आणि ग्रॅहॅम कट्स हे दोन दिग्दर्शक, उद्योजक जॉन फ्रिडमन यांनी एक चित्रपटकंपनी स्थापन केली. त्यात हिचकॉकला नोकरी मिळाली. या काळात आल्मा रेव्हिल या तरुणीचा हिचकॉक काम करत असलेल्या कंपनीत प्रवेश झाला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आल्मा पटकथालेखन आणि एडिटिंग या क्षेत्रात तिथे मदत करत असे.

मात्र ही कंपनीदेखील बंद पडली. मायकेल बाल्कन यानं मग 'गेन्सबरो पिक्चर्स' ही नवीन कंपनी काढली. 'गेन्सबरो कंपनी'नं फेमस प्लेअर्सचा स्टुडिओ विकत घेतला. हिचकॉकनं गेन्सबरोत प्रवेश करून चित्रपट बनवताना हरप्रकारे मदत केली. मात्र हिचकॉकच्या चित्रपट बनवण्यातल्या अनेक गुणांमुळे त्याची इतरांना असूया वाटायला लागली. त्याची परिणती गेन्सबरोमधून हिचकॉकला चक्क काढून टाकण्यात झाली. तेव्हा बाल्कननं त्याला एका स्वतंत्र चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर दिली.

हिचकॉकनं बाल्कनसोबत 'द प्लेजर गार्डन' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. 'द प्लेजर गार्डन' चित्रपटादरम्यान बरेच किस्से घडले. या चित्रपटाचे नायक-नायिका आणि एक कॅमेरामन यांच्याबरोबर हिचकॉक 'द प्लेजर गार्डन' या चित्रपटाचं शूटिंग करायला म्युनिकहून इटलीकडे जाणाऱ्या जर्मन ट्रेनमध्ये बसला होता. तेव्हा त्याला ज्या फिल्मच्या रोलवर फिल्म चित्रित करायची होती तो रोलच कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला; नंतर हिचकॉककडे असलेले दहा हजार लिरा कोणीतरी चोरले; मग नायिकेचा पाण्यात बुडवून तिचा प्रियकर खून करतो अशा दृश्याचं चित्रीकरण करायचं होतं, तेव्हा नायिका बनलेली अभिनेत्री पाण्यात उतरू शकत नव्हती म्हणून ऐन वेळी दुसऱ्या डमी नायिकेची तजवीज करावी लागली; एवढंच नव्हे तर चित्रीकरण आटोपून म्युनिकला परत जाताना ट्रेनमधल्या खिडकीतून हिचकॉकनं सामान आत टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खिडकीची काच दिसली नाही. मग ती काचच फुटली आणि त्याला ३५ स्विस फ्रँक्स दंडादाखल भरावे लागले! अशी सगळी संकटं पार करून १९२५ साली हिचकॉकनं दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट तितकासा चालला नाही. मात्र कथेवरची आणि चित्रपटाच्या तंत्रावरची हिचकॉकची हुकमत जाणकारांना चांगलीच जाणवली.

याच वर्षात आलेला हिचकॉकचा 'द लॉजर' हा चित्रपट मात्र चांगला चालला. १८८८ साली लंडनच्या व्हाईट चॅपेल भागातल्या 'जॅक द रिपर' या माणसानं केलेल्या खूनसत्रावर बेलॉक लेंडसी या लेखिकेनं 'द लॉजर' नावाची कादंबरी लिहिली होती. हा 'जॅक द रिपर' रात्रीच्या वेळी तरुण मुलींना गाठून त्यांचे खून करायचा. त्यांपैकी वेश्यांना मारून तो त्यांच्या प्रेतांची वेडीवाकडी चिरफाड करायचा. या कथेवर 'द लॉजर' हा चित्रपट आधारित होता. सप्टेंबर १९२६ मध्ये पत्रकारांसाठी त्याचा खास शो आयोजित केला होता. वर्तमानपत्रांनी हा चित्रपट प्रचंड उचलून धरला. विशेष म्हणजे, पडद्यावर आपण क्षणभर दर्शन द्यायचं हा प्रकार या चित्रपटात हिचकॉकनं प्रथम वापरला.

'द लॉजर' चित्रपटानंतर २ डिसेंबर १९२६ रोजी हिचकॉकनं आल्मासोबत लग्न केलं. हनीमूनसाठी हिचकॉक आल्माला घेऊन स्वित्झर्लंडमध्ये गेला. ते दोघं तेव्हा जिथे राहिले ते आल्प्स पर्वतावरचं सेंट मॉरिझ गावातलं 'पॅलेस हॉटेल' हिचकॉकला भलतंच आवडलं. नंतर दरवर्षी ख्रिसमसला हिचकॉक आणि आल्मा तिथे जात असत. हनीमूनहून परत आल्यावर हिचकॉकनं लंडनमध्ये '१५३ क्रॉमवेल रोड' या ठिकाणी एक फ्लॅट घेतला. पार्ट्यांना वगैरे फारसा न जाणारा हिचकॉक पाहुण्यांना घरी बोलावत असे. तेव्हा आल्माच त्यांना स्वत: खायला करून जेवायला द्यायची. हिचकॉक आणि आल्मा या दोघांना एक मुलगी झाली.

हिचकॉक 2
(उभे असलेले पॅट्रिशिया आणि तिचा नवरा, बसलेले हिचकॉक आणि आल्मा, आल्माच्या दोन मुली)

तिचं नाव त्यांनी पॅट्रिशिया ठेवलं. हिचकॉक आणि आल्मा यांचं एकमेकांशिवाय पान हलत नसे. हिचकॉकच्या शेवटच्या काळात 'अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट'चं पारितोषिक घेताना त्यानं चार माणसांचे आभार मानायची परवानगी मागितली होती. तेव्हा 'पहिली व्यक्ती त्याच्या फिल्मचा एडिटर, दुसरी व्यक्ती म्हणजे पटकथालेखक, तिसरी व्यक्ती म्हणजे सर्वात चांगला स्वयंपाकी आणि चौथी व्यक्ती म्हणजे त्याच्या मुलीची आई आणि या चार व्यक्तींचं एकच नाव म्हणजे आल्मा रेव्हिल!' असं तो भावनाविवश होऊन म्हणाला होता.

यानंतरच्या काळात ६ ऑक्टोबर १९२७ रोजी अमेरिकेत 'द जॅझ सिंगर' हा बोलपट निघाला. मूकपटाकडून बोलपटाकडे असा चित्रपटाचा चेहरामोहराच बदलण्याची शक्यता निर्माण झाल्यावर, ब्रिटनमध्ये बनणाऱ्या चित्रपटांची संख्या आणि गुणवत्ता मात्र खालावतच चालली होती. यावर दर्जेदार ब्रिटिश चित्रपट काढण्याच्या हेतूनं जॉन मॅक्स्वेल यानं 'ब्रिटिश इंटरनॅशनल पिक्चर्स' (बीआयपी) ही कंपनी सुरू केली. जॉन एक वकील होता. त्यानं चित्रपटनिर्मितीतल्या उत्तमोत्तम लोकांना आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. हिचकॉकही बीआयपीत गेला. पण बीआयपीबरोबरचे हिचकॉकचे पाच सहा चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे जॉन मॅक्स्वेलची हिचकॉकबद्दलची मतं फारशी चांगली उरली नाहीत. त्यामुळे हिचकॉकनं मॅक्स्वेलला आणि पर्यायानं बीआयपीला रामराम ठोकला.

हिचकॉक तेव्हा राजवाड्यातून पळालेल्या एका राजकन्येच्या कथेवर विचार करत होता. त्या कथेत एक राजकन्या राजवाड्याबाहेर पडून दोन आठवडे एका तरुण माणसासोबत भन्नाट आयुष्य जगते, असं धमाल पद्धतीत रंगवलं होतं. हिचकॉकचा हा प्रकल्प काही पुढे गेला नसला तरी याच कथेवरचा 'रोमन हॉलिडे' हा चित्रपट मात्र विलक्षण गाजला!

यानंतर काय करावं, असा हिचकॉकपुढे प्रश्न होताच. बाल्कन 'गोमाँट' या चित्रपटसंस्थेमध्ये काम करत होता. हिचकॉककडे एक चांगलं स्क्रिप्ट आहे असं कळल्यावर बाल्कननं हिचकॉकला 'गोमाँट'मध्ये यायचं सुचवलं. हिचकॉक ज्या स्क्रिप्टवर विचार करत होता ती कथा होती 'बुलडॉग ड्रमंड्‌स बेबी'! या कथेवर आधारित बनलेला चित्रपट म्हणजे 'द मॅन हू न्यू टू मच'! हा चित्रपट हिचकॉकनं दोन वेळा काढला. पहिला चित्रपट १९३४ सालचा होता तर दुसरा चित्रपट १९५६ सालचा होता. त्रुफाँ या दिग्दर्शकानं '१९५६ सालचा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या मानानं फारच उत्कृष्ट होता' असं म्हटलं होतं. त्यावर हिचकॉकनं 'पहिला चित्रपट एका बुद्धिमान नवोदितानं काढला होता तर दुसरा एका व्यावसायिक दिग्दर्शकाचा होता' असं स्वत:बद्दलचंच मत व्यक्त केलं होतं.

यानंतर सॉमरसेट मॉम या इंग्रजी लेखकाच्या गुप्तहेर कादंबऱ्यांवर हिचकॉकनं तीन चित्रपट काढले. सॉमरसेट मॉमनं अॅशेनडेन हा गुप्तहेर निर्माण केला होता. त्यावरून नंतर इयान फ्लेमिंग या लेखकानं प्रेरित होऊन 'जेम्स बाँड' या गुप्तहेराची व्यक्तिरेखा तयार केली होती. हिचकॉकनं मॉमच्या कादंबऱ्यांवर काढलेले तीन चित्रपट म्हणजे '३९ स्टेप्स', 'द सिक्रेट एजंट' आणि 'सॅबोटाज'! राजकीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय हेरगिरी हे विषय या चित्रपटात हिचकॉकनं रंगवले होते. 'सॅबोटाज' या चित्रपटात तर एक भलताच मजेदार विनोदी प्रसंग होता. या प्रसंगात एक देखणी तरुण स्त्री आणि तिच्यापेक्षा वयानं तिचा बराच मोठा शेतकरी नवरा, असं जोडपं असतं. एके रात्री त्यांच्याकडे एक देखणा तरुण पाहुणा येतो. नवऱ्याकडून शारीरिक सुखाला आचवलेली ती स्त्री पाहुण्याकडे आकर्षित होऊन त्याचं नीट आदरातिथ्य करते. त्याला दुपारी केलेलं चिकन खाऊ घालते. शेतकरी मात्र ते पाहून सगळं चिकन संपेल, या भीतीनं 'आता पुरे' असं बायकोला दरडावतो.

रात्री शेतकरी, त्याची बायको आणि पाहुणा एकाच बेडवर झोपतात. शेतकरी अर्थातच बायको आणि पाहुणा यांच्यामध्ये झोपायची काळजी घेतो. रात्री बायको दचकून उठते, नवऱ्याला 'बाहेर कोंबड्या का आवाज करतायत' ते पहायला पाठवते. नवरा बाहेर गेल्यावर ती लगेच त्या पाहुण्याला म्हणते, 'चल, आता संधी दवडू नकोस'. त्यावर तो पाहुणा उठतो आणि फ्रिजमधलं उरलेलं चिकन भराभर संपवतो. प्रेक्षकांमध्ये अर्थातच हास्याच्या उकळ्या फुटतात.

'सॅबोटाज' या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे हिचकॉकच्या चित्रपटात खलनायक जर्मन असणारा त्याचा हा
तिसरा चित्रपट होता. नंतरही हिचकॉकला नाझी पार्टीचा असलेला तिटकारा त्याच्या चित्रपटांमध्ये कायम दिसतो.

हे चित्रपट करताना प्रत्यक्ष आयुष्यात हिचकॉकचे प्रॅक्टिकल जोक्स चालू असायचे. जेराल्ड द्यु मॉरिए या मित्राला म्हणजे, 'रिबेका' कादंबरीची लेखिका डॅफ्नी द्यु मॉरिए हिच्या वडिलांना तर त्यानं एकदा जेवायला बोलावून निळ्या रंगाच्या जेवणाचा थाट उडवला होता. निळं सूप, निळे मासे, निळं चीज यांनी भरलेलं ताट पाहून मॉरिएला काय वाटलं असेल कोण जाणे!

१९३०च्या दशकाच्या शेवटी हिचकॉक इंग्लंडमध्ये तर लोकप्रिय झालाच होता; पण तेव्हा त्याची ख्याती अमेरिकेतही पोचली होती. 'न्यूयॉर्क मॅगेझिन'नं 'अमेरिकेत इतका मौल्यवान आणि एकमेव असा दिग्दर्शकच नाही' असं हिचकॉकबद्दल लिहिलं होतं. हॉलिवूडमधला प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड सेल्झनिक याला हिचकॉकनं अमेरिकेत यावं, असं वाटत होतं. त्यानुसार सेल्झनिकबरोबर ७ वर्षांचा करार करून आल्मा आणि पॅट्रिशियाला घेऊन हिचकॉक १९३९ साली अमेरिकेत पोचला. तिथे त्यानं डॅफ्नी द्यु मॉरिएच्या 'रिबेका' या कादंबरीवर चित्रपट काढण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली. हिचकॉकनं जून १९३९ मध्ये सेल्झनिकला 'रिबेका'ची पटकथा पाठवली. डेव्हिडनं 'रिबेका'ची पटकथा वाचून हिचकॉकला पटकथा भिकार आहे, अशी सुरुवात करून नंतर प्रमुख पात्रं, कादंबरीतलं वातावरण असं सगळ्याचं विश्लेषण करून एक पत्र पाठवलं होतं. सेल्झनिकसारख्या बुद्धिमान निर्मात्याकडे काम करण्यातलं आव्हान त्यातून हिचकॉकला उमगलं.

रिबेकाचं कथानक प्रेक्षकांना जबरदस्त खिळवणारं आणि गूढ होतं. 'काल रात्री मला मँडर्ली परत एकदा स्वप्नात दिसली' या वाक्यानं हा सिनेमा सुरू होतो. चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो. मॅक्झिम दि विंटर हा मँडर्ली या इंग्लंडमधल्या एका विस्तीर्ण हवेलीचा मालक असतो. त्याची अत्यंत देखणी बायको रिबेका समुद्रातल्या एका अपघातात मरण पावलेली असते. मॅक्झिम या सगळ्या तणावाला कंटाळून फ्रान्सच्या एका समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलमध्ये रहायला जातो. तिथे त्याला चित्रपटाची नायिका भेटते. मॉरिएच्या कादंबरीत आणि सिनेमातही या नायिकेचं नावच नाही, हे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. घाबरलेली, एकाकी नायिका मॅक्झिमबरोबर लग्न करते आणि ते दोघं एका पावसाळी रात्री निथळत मँडर्लीला पोचतात. तेव्हा रात्र, पावसाळी हवा, ब्लॅक आणि व्हाईटमध्ये दिसणारं ते मँडर्लीचं घर प्रेक्षकांसमोर ‌गूढपणे उलगडत नेण्यात हिचकॉक कमालीचा यशस्वी झाला आहे. रिबेका कशी मरण पावली, ते प्रेक्षकांना मग उलगडत जातं. रिबेका रात्रीच्या वेळी समुद्रात पडून मेलेली असते. तिथे तेव्हा मॅक्झिमही गेलेला असतो. त्यामुळे रिबेकाच्या खुनाचा आळ मॅक्झिमवर आलेला असतो. मात्र रिबेकाला कॅन्सर असतो. कॅन्सरनं कणाकणानं मरण्याऐवजी रिबेकानं आत्महत्या केली, असं चित्रपटाच्या शेवटी लंडनमधल्या एका डॉक्टरच्या सांगण्यावरून निष्पन्न होतं. आपल्याकडे याच सिनेमावर आधारित 'कोहरा' हा हिंदी चित्रपट निघाला होता. विश्वजीत, वहिदा रेहमानपेक्षाही डॅनव्हर्सचा रोल केलेली ललिता पवार जास्त लक्षात राहिली होती.

'रिबेका' चित्रपट अमेरिकेत खूप गाजला. या चित्रपटाला ११ ऑस्कर नामांकनं मिळाली आणि उत्कृष्ट सिनेमाचं एक पारितोषिक मिळालं. मात्र हिचकॉकला कधीही आयुष्यात ऑस्कर पारितोषिक मिळालं नाही, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.

१९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. तेव्हा हिचकॉक आपल्या आईला लंडनमध्ये फोन लावायचा ३ दिवस प्रयत्न करत होता. शेवटी हिचकॉक आईला भेटायला लंडनला गेला आणि तिची नीट व्यवस्था लावून तो परत अमेरिकेला आला.

यानंतर हिचकॉकनं 'सस्पिशियन' हा कॅरी ग्रांट आणि जोन फाँटेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट काढला. या चित्रपटात नवरा आपल्या बायकोच्या खुनाचा प्रयत्न करतोय असं कथानक होतं. फाँटेनला या भूमिकेसाठी ऑस्कर पारितोषिक मिळालं होतं.

यानंतरच्या हिचकॉकच्या चित्रपटात एक महत्त्वाचा विषय मांडला गेला. तो विषय म्हणजे मनोविश्लेषण! सेल्झनिक या दिग्दर्शकाला काही प्रमाणात मनोविकार होते आणि त्याला स्वत:लाच त्यासाठी औषधं घ्यावी लागत होती. त्यामुळे त्यालाही मनोविश्लेषणावर चित्रपट काढण्यात अत्यंत रस होता. फ्रान्सिस ब्रिडिंग यानं लिहिलेल्या 'द हाऊस ऑफ डॉ. एडवर्डिस' या कादंबरीवर हिचकॉक आणि सेल्झनिक यांनी मग 'स्पेलबाऊंड' हा चित्रपट काढला. 'स्पेलबाऊंड' मध्ये नायकाला भयावह स्वप्नं पडतात. ती स्वप्नदृश्यं दाखवण्यासाठी हिचकॉकनं साल्वादोर दाली या जगप्रसिद्ध सरिआलिस्ट चित्रकाराची चित्रं वापरली होती. चित्रीकरणावर १५ लाख डॉलर्स खर्च झालेल्या 'स्पेलबाऊंड' या चित्रपटानं ७० लाख डॉलर्सचा गल्ला जमवला होता.

इनग्रिड बर्गमन आणि ग्रेगरी पेक असे खंदे कलाकार आणि हिचकॉकच्या चित्रपटात असणारे सगळे धक्कादायक प्रसंग 'स्पेलबाऊंड'मध्ये खच्चून भरलेले होते. बर्गमननं यात डॉ. कॉस्टन्स पीटरसन या 'ग्रीन मॅनॉर्स' नावाच्या मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधल्या मानसोपचारतज्ज्ञाचं काम केलं होतं. चित्रपटात सुरुवातीला ग्रेगरी पेक यानं काम केलेला डॉ. एडवर्डिस हा देखणा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. कॉस्टन्स आणि एडवर्डिस थोड्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपल्याला मनोविकारतज्ज्ञ म्हणवणारा हा डॉक्टर प्रत्यक्षात एक हिंसक प्रवृत्तीचा खुनी असावा, असं तिला वाटतं. त्यातच एडवर्डिसला स्मृतिभ्रंशाचा विकार जडतो. आपण कोण आहोत, तेच तो विसरतो. चित्रपटाच्या शेवटी एडवर्डिस खुनी नसल्याचं कॉस्टन्स शोधून काढते.

हिचकॉकच्या 'स्पेलबाऊंड'नंतर लगोलग 'नटोरियस' हा चित्रपट आला. या चित्रपटात इनग्रिड बर्गमननं रंगवलेली अॅलिशिया ही देखणी, संभ्रमात असलेली आणि आयुष्यातल्या हेलकाव्यांनी गांजलेली अमेरिकन तरुणी असते. तिचे वडील मात्र नाझींबद्दल सहानुभूती बालगणारे नाझी गुप्तहेर समजले जात असतात. त्यामुळे डेव्हलिन नावाचा एक अमेरिकन गुप्तहेर 'ब्राझिलच्या एका नाझी ग्रुपकडून युद्धविषयक हालचालींची माहिती काढून घ्यायची कामगिरी' अॅलिशियावर सोपवतो. अॅलिशियाच्या वडिलांचा सेबॅस्टियन हा एक मित्र ब्राझिलमध्ये असतो. सेबॅस्टियनला आपल्याकडे आकर्षित करून अॅलिशियानं नाझींबद्दल माहिती मिळवावी अशी अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याची इच्छा असते. अॅलिशियाचं ते हेरगिरीचं काम सुरू होईपर्यंत डेव्हलिन आणि अॅलिशिया एकमेकांच्या बेहद्द प्रेमात पडतात. सेबॅस्टियनशी अॅलिशिया नंतर लग्न करून त्याची नाझी लोकांकडची गुपितं मिळवते. तिच्यावर सेबॅस्टियन विषप्रयोग करतो पण डेव्हलिन तिला वाचवतो. इथे हा चित्रपट संपतो. केवळ दोन तासांचा हा सिनेमा प्रेक्षकांची सतत उत्कंठा ताणतो आणि खुर्चीला खिळवून ठेवतो. या चित्रपटाला ऑस्करची दोन पारितोषिकं मिळाली होती.

'नटोरियस' या चित्रपटातलं अडीच मिनिटांचं कॅरी ग्रांट आणि इनग्रिड यांचं चुंबनदृश्य खूपच गाजलं होतं. त्यामागची मजा म्हणजे तेव्हा अमेरिकेत तीन सेकंदांपर्यंतचंच चुंबन चित्रपटात दाखवायला परवानगी होती. त्यामुळे अडीच मिनिटांच्या या दृश्यात अॅलिशिया आणि डेव्हलिन दर ३ सेकंदांनंतर एकमेकांपासून ओठ विलग करतात आणि परत चुंबन घ्यायला सुरू करतात. ही कल्पना अर्थातच हिचकॉकची होती. हातात स्टॉपवॉच घेतलेला एक माणूस चित्रीकरणाच्या वेळी '३ सेकंद झाले, पुरे!' असं ओरडतोय, ही कल्पनाही मजेदार वाटते. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या नावात हिचकॉकचं नाव आल्फ्रेड हिचकॉक्स 'स्पेलबाऊंड' असं झळकलं होतं, इतका तो महत्त्वाचा दिग्दर्शक मानला जायला लागला होता. अर्थात विचित्रपणे वागणं ही हिचकॉकची खासियत तशीच राहिली होती. 'फॅमिली प्लॉट' या चित्रपटाच्या टीमला हिचकॉकनं एकदा थडग्यांनी वेढलेल्या दफनभूमीच्या सेटवर दृश्य उभं करून जेवण दिलं होतं. तिथे वेटर आणि वेट्रेसेसही शोक दाखवण्याच्या काळ्या रंगाच्या पोशाखात हजर होते!

१९५० ते १९६० च्या दशकात हिचकॉकनं त्याचे 'डायल एम फॉर मर्डर', दुसऱ्यांदा काढलेला 'द मॅन हू न्यू टू मच', 'व्हर्टिगो' आणि 'रेअर विंडो' हे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले. यातल्या 'डायल एम फॉर मर्डर' या चित्रपटात लंडनमधली अतिशय श्रीमंत, देखणी, विवाहित स्त्री मार्गो मेरी वेंडिस हिचं अमेरिकन लेखक मार्क हॅलिडे याच्यासोबत एक प्रेमप्रकरण घडतं. मार्गोचा नवरा टोनी एक निष्णात टेनिस प्लेयर असतो. तो तेव्हा टेनिस खेळण्यासाठी एका दौऱ्यावर गेलेला असतो. नंतर सारखं बाहेर रहावं लागतं यासाठी टोनी खेळणं सोडून देतो. मार्क अमेरिकेला परत जातो. मार्गो आपण परत एकदा संसारात रममाण व्हावं, असा विचार करून तिची आणि मार्कची प्रेमपत्रं नष्ट करते. मात्र त्यातलं एक पत्र कोणीतरी चोरलेलं असतं. तिला कोणीतरी त्यावरून ब्लॅकमेल करत असतं. टोनीच आपल्या बायकोची संपत्ती मिळवण्यासाठी तिला ब्लॅकमेल करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असतो, असं या चित्रपटाचं कथानक होतं. 'किसी नजर को तेरा इंतजार आज भी है' हे सुरेल गाणं असलेला 'ऐतबार' हा हिंदी चित्रपट 'डायल एम फॉर मर्डर'वर आधारित होता. त्यात मार्गोचं काम डिंपल कपाडियानं केलं होतं.

यानंतरचा हिचकॉकचा 'रेअर विंडो' हा चित्रपट एका वास्तवातल्या खुनाच्या केसवर आधारित होता. १९२४ साली क्रिपन नावाच्या ससेक्स, इंग्लंडमधल्या माणसानं आपल्या गर्भवती बायकोचा विष पाजून खून केला आणि तिच्या प्रेताचे तुकडे केले. पोलिसांना आपली बायको लॉस एंजेलिसला गेल्याचं सांगितलं. आपल्या सेक्रेटरीबरोबर प्रेमप्रकरण असलेला क्रिपन नंतर पकडला गेला. त्या सेक्रेटरीनं क्रिपनच्या बायकोचे दागिने घातलेले दिसले. एका मित्रानं क्रिपनच्या बायकोचा कॅलिफोर्नियात शोधही घेतला. स्कॉटलंड यार्ड या प्रकरणात आल्यावर त्यांना क्रिपन आणि त्याची सेक्रेटरी खोट्या नावानं पळून जाताना सापडली. घरातल्याच कपाटात क्रिपनच्या बायकोच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होतेे.

'रेअर विंडो'मध्ये एल. बी. जेफ्रिज उर्फ जेफ हा न्यूयॉर्क मॅगेझिनचा फोटोग्राफर आपला पाय तुटल्यामुळे एका उन्हाळ्यात घरी बसून असतो. तो व्हीलचेअरमध्ये जखडल्यानं वैतागून कंटाळवाणा झालेला असतो. आपल्या दोन रूमच्या छोट्या अपार्टमेंटमधून शेजारपाजारच्या लोकांचा दिनक्रम पहाणं, हे जेफसाठी मनोरंजनाचं साधन बनलेलं असतं. त्या सगळ्यातून तो समोर राहणाऱ्या सेल्समननं एका पावसाळी रात्री आपल्या बायकोचा कसा खून केला ते शोधून काढतो. या चित्रपटातल्या ३१ अपार्टमेंट्सचा सेट हिचकॉकनं पॅरामाऊंट स्टुडिओत लावला होता. ९८ फूट रुंद, १८५ फूट लांब आणि ४० फूट उंच असणाऱ्या त्या सेटवर सर्व पिक्चर चित्रित केला गेला होता.

१९५६ साली हिचकॉकनं 'द मॅन हू न्यू टू मच'चं नवीन व्हर्जन काढलं. एक मिस्टर आणि मिसेस मॅकेना हे अमेरिकन जोडपं आपल्या मुलाला घेऊन मोरोक्कोमधल्या मराकेश या शहरामध्ये फिरायला निघालेलं असतं. तिथे एका फ्रेंच माणसाचा त्यांच्या नजरेसमोर खून होतो. तो फ्रेंच माणूस मरताना कोडभाषेतला एक संदेश डॉ. मॅकेना या नायकाच्या कानात पुटपुटतो. यावरून मॅकेनाला खूप माहिती मिळते, म्हणूनच चित्रपटाचं नाव 'द मॅन हू न्यू टू मच' असं होतं. ते जोडपं आता एका हेरगिरीच्या प्रकरणात अडकतं. त्यांना महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनाच्या कटाची माहिती त्या मरणाऱ्या माणसाकडून कळलेली असते. मग त्या जोडप्यानं याबाबत कोणाशीही वाच्यता करू नये, यासाठी चित्रपटातले खलनायक त्यांच्या मुलाचं अपहरण करतात. चित्रपटाचा शेवट 'रॉयल आल्बर्ट हॉल'मध्ये होतो. खून तिथेच एका कॉन्सर्टच्या वेळी होणार असतो. या कॉन्सर्टच्या वेळचं एक गाणं अपहरण झालेल्या मुलाबरोबर आईवडिलांची भेट आणायला कारणीभूत ठरतं. ते गाणं म्हणजे 'के सेरा सेरा'! चित्रपटात हे गाणं डोरिस डे या नायिकेनंच गायलं आहे. १९५६ साली या गाण्याला ऑस्कर मिळालं होतं.

यानंतरच्या 'व्हर्टिगो' चित्रपटात हिचकॉकनं अॅक्रोफोबिया म्हणजे उंच ठिकाणांची भीती वाटणं. हा विषय हाताळला. मात्र 'व्हर्टिगो'नंतरचा हिचकॉकचा चित्रपट म्हणजे त्याच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू ठरला. तो चित्रपट म्हणजे 'शॉवरच्या दृश्यात नायिकेचा खून' या प्रसंगानं जगभर गाजलेला 'सायको'!

हिचकॉक 3
(वेळ चुकवू नका असं सांगणारं सायकोचं पोस्टर)

सायको चित्रपटाच्या सुरुवातीला फिनिक्स या अमेरिकेतल्या शहरातल्या एका साध्या हॉटेलमधल्या एका रूममध्ये एक जोडपं दिसतं. यातली ती म्हणजे मॅरियन, ऑफिसच्या लंच टाईममधून वेळ काढून भराभर हॉटेलमध्ये आपला प्रियकर सॅम लूमिस याला भेटायला आलेली असते. सॅमचं लग्न झालेलं असतं. तो पहिल्या बायकोसोबत घटस्फोट घेऊन मॅरियनशी लग्न करणार असतो. घटस्फोटासाठी जी रक्कम बायकोला द्यावी लागणार असते, ती रक्कम लगेच देणं त्याला शक्य नसल्यानं त्याचा घटस्फोट आणि पर्यायानं मॅरियनसोबतचं लग्न लांबलेलं असतं. त्यामुळे दोघांना असं ओझरतं, चुटपुट लावणाऱ्या भेटण्याशिवाय गत्यंतरच नसतं.

मॅरियन हॉटेलमधून परत ऑफिसला येते. तिचा बॉस तिला बँकेत भरण्यासाठी ४० हजार डॉलर्स देतो. सॅमसोबत रहाता यावं यासाठी तिला पैशांची गरज असतेच. त्यामुळे ते पैसे बँंकेत न भरता आपणच हडप करावे असं मॅरियनला वाटायला लागतं. मग ऑफिसमधून बँकेत न जाता घरी जाऊन मॅरियन एक बॅग भरते आणि कुठंतरी जायला निघते. मॅरियन गाडी चालवत असताना संध्याकाळ होते. तुफान पाऊसही कोसळायला लागतो. मॅरियनला काचेवर आदळणाऱ्या पावसाच्या धारांमुळे समोरचं काही दिसतच नाही आणि गाडी चालवणं अशक्य होतं. कुठेतरी रात्रीपुरता आसरा घ्यावा असा ती विचार करत असतानाच 'बेट्स मोटेल' अशी तिला पाटी दिसते. मॅरियन तिथे आत जाते, तर एक साधंसं मोटेल आणि शेजारी त्याचं एक व्हिक्टोरियन पद्धतीचं गूढ घर दिसतं. नॉर्मन बेट्स हा जरासा लाजरा, देखणा तरुण त्या हॉटेलचा मालक असतो. तो मॅरियनची हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद करून घेतो. तिला तिची रूम दाखवतो.

मॅरियन रूममध्ये जाते. तेव्हा ती बॅगमधून पैशांचं पाकीट काढून पलंगावर ठेवते. मॅरियन जेव्हा रूममध्ये असते तेव्हा नॉर्मन भिंतीला असलेली तसबीर बाजूला करून त्यामागच्या एका छिद्रातून तिच्याकडे पहात असतो. यानंतर नॉर्मन घरी जातो. तेव्हा ते भयंकर घर, आकाशात जाणवणारे काळसर ढग हे पाहून एक रहस्यमय, भीतीचं वातावरण उभं करण्यात हिचकॉक प्रचंड यशस्वी झालाय. नॉर्मन घरी गेल्यावर मॅरियन, म्हणजे एक तरुणी मॉटेलमध्ये आल्याबद्दल त्याची आई चिडचिड करते. तिला मॅरियनचं येणं आवडलेलं नसतं.

यानंतर इकडे मोटेलमध्ये मॅरियन शॉवर घ्यायला जाते. ती शॉवरमधून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांचा आनंद मनसोक्तपणे लुटत असतानाच शॉवरच्या कर्टनवर एक सावली दिसते. पडद्यावर पाठमोरी दिसणारी नॉर्मनची आई सुऱ्यानं मॅरियनचा निर्घृण खून करते. मॅरियनच्या देहावर सपासप होणारे सुऱ्याचे असंख्य वार, तिची धडपड, असहाय्यता, मागे असलेलं आक्रोशणारं संगीत यानं प्रेक्षक पुरेपूर भांबावतो. आधी जराशा संथ चालणाऱ्या या चित्रपटात एक खून येईल आणि मुख्य नायिका त्या खुनाची, इंटरव्हलच्या आधीच बळी ठरेल अशी प्रेक्षकांची मानसिकताच नसते. यानंतर शॉवर कर्टनमधली एकेक रिंग वरच्या कडीतून निसटत जाते आणि मॅरियन मरून पडते. तिच्या भयाण मृत डोळ्याचा एक पडदा व्यापून रहाणारा क्लोजअप मात्र प्रेक्षकांना दिसतो.

नंतर या चित्रपटात बरेच प्रसंग घडून नॉर्मनची आई पूर्वीच मरण पावलेली असते आणि नॉर्मननंच आईचा वेश घेऊन मॅरियनचा खून केलेला असतो, असं प्रेक्षकांच्या लक्षात येतं! मात्र चित्रपट इथे संपत नाही. नॉर्मनला पोलिस स्टेशनमध्ये नेलं जातं. तेव्हा एक मानसोपचारतज्ज्ञ प्रेक्षकांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची एका लांबलचक विश्लेषणातून उत्तरं देतो. त्या विश्लेषणानुसार नॉर्मन हा मनोरुग्ण असतो. त्याला स्किझोफ्रेनिया हा मनोविकार असतो. नॉर्मनचं हे दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व कसं तयार झालं ते मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. नॉर्मनचे वडील मरण पावल्यानंतर तो आणि त्याची आई त्या महाकाय घरात रहात असतात. नॉर्मनची आई त्यानंतर एका माणसावर प्रेम करायला लागते. आईबद्दल कमालीच्या पझेसिव्ह असणाऱ्या नॉर्मनला ते सहन होणं शक्यच नसतं. त्यामुळे आपली आई आणि तिचा प्रियकर दोघांचाही नॉर्मन खून करतो. जगासमोर मात्र आईनं आपल्या प्रियकराचा खून करून स्वत: आत्महत्या केली असं चित्र दिसतं.

नंतर आपण आईला मारल्याचा नॉर्मनला पश्चात्ताप होतो. नॉर्मन आईचं प्रेत थडग्यातून उकरून आणतो. त्याचं ममीकरण करतो. एकाच घरात एकदा आई आणि एकदा नॉर्मन अशा आवाजात बोलून तो घरात दोन माणसं रहात आहेत, असा आभास निर्माण करतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वातही कधी आई संचारते तर कधी तो नॉर्मन असतो. आपण आईबद्दल जसे पझेसिव्ह होतो तशी आई आपल्याबद्दल पझेसिव्ह असणार, असं तो गृहीत धरतो. मग नॉर्मन मॅरियनकडे आकर्षित झाल्यावर आईला मत्सर वाटणारच, या भूमिकेतून तो आईचा वेश धारण करून मॅरियनचा खून करतो.

चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात पोलिस त्या तळ्यातून मॅरियनची गाडी बाहेर काढत असतात. गाडीच्या पाटीवर एनएफबी ही नॉर्मन फ्रान्सिस बेट्स यातली आद्याक्षरं दिसतात. तेव्हाच चित्रपट संपल्याची 'द एंड'ची पाटी प्रेक्षकांना दिसते.

'सायको' चित्रपटातला सर्वाधिक गाजलेला मॅरियनच्या खुनाचा शॉट हिचकॉक ७ दिवस चित्रित करत होता. त्यानं एकूण ७८ तुकडे जोडून हा एक शॉट बनवला आहे. हा प्रसंग हिचकॉकनं इतक्या थरारक आणि परिणामकारकरीत्या रंगवल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी चक्क हा चित्रपट पाहून नंतर शॉवर घेणं बंद केलं. मॅरियनचं काम केलेल्या जेनेट ली हिनंही स्वत: नंतरच्या आयुष्यात कधीच शॉवर घेतला नाही.

'सायको'च्या रहस्याबद्दल आणि प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याबाबत हिचकॉक कमालीचा दक्ष होता. 'सायको' प्रदर्शित होण्याआधी आपल्या सहायकाला पाठवून हिचकॉकनं 'सायको' कादंबरीच्या सर्व प्रती विकत घेतल्या होत्या. तर चित्रीकरणापूर्वी सर्व स्टाफला गुप्तता बाळगण्याची उजवा हात उंचावून शपथ घ्यायला लावली होती. १९६० साली चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 'चित्रपट सुरू झाल्यानंतर कोणालाही आत प्रवेश नाही' असं पोस्टरही लागलं होतं. त्यात हिचकॉक हातातल्या मनगटी घड्याळाकडे बोट दाखवून 'वेळेवर या' असा इशारा देताना दिसतो. चित्रपट थिएटरमध्ये दाखवायच्या आधी संगीताची रेकॉर्ड लावून 'आता दहा मिनिटं राहिली, आता पाच मिनिटं राहिली' अशी अधूनमधून अनाऊन्समेंटही होत असे. 'सायको' या चित्रपटाच्या निर्मितीला ८ लाख डॉलर्स लागले असले तरी हिचकॉकनं त्यावर शेवटी २ कोटी डॉलर्स कमाई केली.

'सायको'नंतर हिचकॉकनं डॅफ्नी द्यु मॉरिए या लेखिकेच्याच कथेवर 'द बर्ड्स' हा चित्रपट काढला. टिपी हेड्रन त्यात नायिका होती. टिपी हेड्रनच्या ६ वर्षाच्या मुलीला त्यानं 'द बर्ड्स'मधल्या पोशाखातल्या आपल्या आईची तितक्याच उंचीची मोठी बाहुली दिली होती. मात्र ती बाहुली चक्क एका कॉफिनमध्ये ठेवलेली होती!

यानंतर हिचकॉक प्रचंड खायला आणि दारू प्यायला लागला. १९८०च्या सुरुवातीला त्यानं ऑफिसही बंद केलं. 'बेल एअर' या लॉस एंजेलिसमधल्या उच्चभ्रू लोकांच्या वस्तीतल्या आपल्या बंगल्यात हिचकॉक २९ एप्रिल १९८० रोजी मरण पावला. हिचकॉकला वयाच्या पाचव्या वर्षी पोलिसचौकीत डांबून ठेवलं होतं, तेव्हा तो पोलिस 'धिस इज व्हॉट वुई डू टू बॅड लिटिल बॉईज' असं म्हणाला होता. हिचकॉकच्या थडग्यावर त्याला काय कोरलेलं आवडेल असं विचारल्यावर त्यानं 'धिस इज व्हॉट वुई डू टू बॅड लिटिल बॉईज' असं उत्तर दिलं होतं. मात्र आपलं प्रेत दफन न करता जाळावं, अशी हिचकॉकची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह दहन करून त्याची राख पॅसिफिक समुद्रात विखुरली गेली!

हिचकॉक त्याच्या कॅमिओजसाठी फार प्रसिद्ध होता! 'द लॉजर'या चित्रपटामध्ये न्यूजरूमधल्या टेबलापाशी, 'ब्लॅकमेल' या चित्रपटामधल्या एका ट्रेनमध्ये, 'रिबेका' या चित्रपटाच्या शेवटी फोन बूथजवळ, 'सस्पिशियन'या चित्रपटामध्ये एक पत्र पोस्टाच्या पेटीत टाकताना, 'स्पेलबाऊंड'या चित्रपटामध्ये एंपायर हॉटेलच्या लिफ्टमधून बाहेर येताना, 'सायको'या चित्रपटामध्ये जेनेट लीच्या ऑफिसबाहेर अशा अनेक प्रसंगांत हिचकॉक क्षणभर दर्शन द्यायचा.

'एखादं भयावह स्वप्न पाहून जागं झाल्यावर आपण ठीकठाक आहोत असं लक्षात आल्यामुळे एखाद्याला जसा आनंद होतो, तसाच आनंद प्रेक्षकांना चित्रपटांमधून द्या!' असं हिचकॉक म्हणत असे. हिचकॉकचे चित्रपट परतपरत पाहून आधी हृदयात धडधड, नखं चावणं, डोळे विस्फारणं, मती कुंठित होणं आणि शेवटी रहस्याचा उलगडा झाल्यावर ओठांवर स्मित खेळवत सुटकेच्या भावनेत त्या चित्रपटातून बाहेर येणं यातला आनंद निर्विवादपणे आजही हवाहवासा वाटतोच!

('लाईमलाईट' या आगामी पुस्तकातून)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

टिपी हेड्रनच्या ६ वर्षाच्या मुलीला त्यानं 'द बर्ड्स'मधल्या पोशाखातल्या आपल्या आईची तितक्याच उंचीची मोठी बाहुली दिली होती. मात्र ती बाहुली चक्क एका कॉफिनमध्ये ठेवलेली होती!
......द गर्ल (२०१२) हा टीव्हीवर प्रसारित करण्यासाठी बनवलेला चित्रपट अवश्य पाहावा असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! चित्रपटातील प्रसंग आणि हिचकॉकच्या जीवनातील खरेखुरे प्रसंग या दोहोंच्या मिलाफामधून हा लेख अतिशय सुंदर रंगला आहे. वाचतच गेले. शेवटपर्यंत उत्सुकता राहीली. हिचकॉकच्या आयुष्यातील कितीतरी वेगळेच प्रसंग कळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख लेख. परवाच व्हर्टिगो बघितला. मला त्याच्या नेहमीच्या चित्रपटांबरोबरच 'फ्रेंझी' हा विशेष न गाजलेला चित्रपटही आवडतो. कधी कधी आजच्या सीजीआयच्या काळात हिचकॉक असता तर त्याने कसे चित्रपट काढले असते असं वाटून जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0