मुखपृष्ठाविषयी

मुखपृष्ठाविषयी.

मुखपृष्ठाविषयी

लेखक - चिंतातुर जंतू

“There are certain things that are usable, forceful, and vital about commercial art.” — Roy Lichtenstein, 1963

नव्वदोत्तरी

कोणत्याही काळात घडणाऱ्या काही प्रमुख घटना त्या काळाला काही तरी वेगळं आणि विशिष्ट परिमाण देतात. तसा नव्वदोत्तरी काळही अनेक घटनांमुळे जनमानसात रुजला. मात्र, ह्या काळातल्या काही नवीन वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे हे रुजणंसुद्धा आधीपेक्षा वेगळं ठरलं. जागतिकीकरणामुळे अशा घटना जगभर पोहोचण्याचा आणि गाजण्याचा वेग आणि प्रमाण आता प्रचंड आहे. शिवाय, हा काळ प्रतिमांनी संपृक्त आहे. जगभरातल्या घडामोडी प्रतिमांद्वारे मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचणं आता शक्य होतं. आधी केबल टीव्ही, मग इंटरनेट आणि नंतर सोशल मीडिआनं त्याला अधिकच हातभार लावला आहे. ‘व्हायरल’ ह्या शब्दालाही त्यामुळे एक नवा अर्थ लाभला आहे. अशा काही निवडक व्हायरल घटनांचं आणि प्रतिमांचं कोलाज ह्या वर्षीच्या ‘ऐसी अक्षरे’ दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर आहे. ते नीट पाहिलंत तर त्यातले काही इतर नव्वदोत्तरी घटकही लक्षात येतील. उदाहरणार्थ, बाजारपेठेच्या रेट्यापुढे कलेतला अभिजनवाद ह्या काळात जवळपास नामशेष झाला. ‘जी खपते तीच चांगली कला’ हा न्याय रुळला. पाश्चात्य देशांत ‘पॉप आर्ट’ला पूर्वीच प्रतिष्ठा लाभली होती. आता ते भारतातही रुजलं. उदाहरणार्थ, हिंदी सिनेमाच्या जुन्या पोस्टर्सना कलासंग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आली. ह्या कोलाजमध्ये त्यामुळे अधूनमधून काही लोकप्रिय कलाप्रकारांमधल्या प्रतिमाही गुंफलेल्या दिसतील. वस्तूविक्रयाला हातभार लावण्यासाठी जाहिराती जन्म घेतात. मात्र, ह्या काळात बाजारपेठेला जी नवी प्रतिष्ठा मिळाली त्यामुळे जुन्यानव्या जाहिरातींनादेखील त्यांच्या ह्या मूळ हेतूपलीकडचं एक कलामूल्य लाभलं. म्हणून ह्या कोलाजमध्ये काही जुन्या जाहिराती, पोस्टर्स आणि इतर व्यावसायिक वापरातले दृश्य घटकही दिसतील. ते बारकाईनं पाहिलेत तर तुमच्यातल्या काहींना तथाकथित सदभिरुचीत न बसणाऱ्या आणि म्हणून वेगळ्या ठरणाऱ्या एका नॉस्टॅल्जियाचा अनुभव येईल, कारण त्यातले रंग हे ‘डीसेंट’ नाहीत, तर अगदी स्वस्तात छापलेल्या हॅन्डआऊट्स किंवा सिनेमाच्या जुन्या तिकिटांसारखे ‘चीप’ आहेत. अभिजनवादाच्या पीछेहाटीच्या ह्या काळात अभिजनांमध्ये रुळलेल्या भाषेची पारंपरिक उच्च भूमिकाही डळमळीत झाली. त्यामुळे मराठीची (खरं तर सर्वच भाषांची) सर्रास आणि अभूतपूर्व तोडमोड होऊ लागली. रोमन लिपीत हिंदी-मराठी लिहिणं, रुळलेला मराठी शब्द सोडून कॅज्युअली इंग्रजी प्रतिशब्द वापरणं असे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणात होऊ लागले. ‘आधुनिकोत्तर की उत्तर-आधुनिक’ वगैरे वादांना फाट्यावर मारून ह्या काळात ह्या मोडतोडीमधून एक नवीनच भाषा रुळली. ह्या सगळ्या मोडतोडीनं नव्वदोत्तरी काळात मराठी भाषेवर आणि दृश्य पातळीवरही मोठंच इम्प्रेशन ‘सोडलं’. (होय हे क्रियापद असं वापरणं ‘मराठी मराठी’ नसून हिंदी वळणाचं आहे आणि ते मुद्दामच तसं वापरलं आहे!) त्या नव्या भाषेची आणि त्यातल्या कॅज्युअल खेळकरपणाचीही थोडी ‘टेस्ट’ देण्याचा प्रयत्न हे मुखपृष्ठ करतं. हे सगळं दाखवतानाच एका संभाव्य धोक्याचा निर्देशही त्यात आहे : आजच्या माध्यमसंपृक्त काळात त्याच त्याच गोष्टी जनमानसावर आदळत आहेत. त्यामुळे डॉली मेंढीप्रमाणे आपलेही क्लोन्स तर होत नाहीत?

संकल्पना आणि मांडणी - संदीप देशपांडे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

या पडद्यासाठी बरेच ओप्शनस अॅवलबल आहेत .त्यातून काही ट्रेन्डी कलरस चूझ करून आमच्याकरता डिस्पले केलेत याबद्दल थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘आधुनिकोत्तर की उत्तर-आधुनिक’ वगैरे वादांना फाट्यावर मारून ह्या काळात ह्या मोडतोडीमधून एक नवीनच भाषा रुळली. ह्या सगळ्या मोडतोडीनं नव्वदोत्तरी काळात मराठी भाषेवर आणि दृश्य पातळीवरही मोठंच इम्प्रेशन ‘सोडलं’. (होय हे क्रियापद असं वापरणं ‘मराठी मराठी’ नसून हिंदी वळणाचं आहे आणि ते मुद्दामच तसं वापरलं आहे!) त्या नव्या भाषेची आणि त्यातल्या कॅज्युअल खेळकरपणाचीही थोडी ‘टेस्ट’ देण्याचा प्रयत्न हे मुखपृष्ठ करतं..

दाताखाली 'सोडलं' येतं ना येतं तोच कंसही आलाच. आणि मग "'होय'च्या नंतर एक स्वल्पविराम हवा होता का?" असं म्हणणार्‍या, डोक्यातल्या मुद्रितशोधकानं चपापून इकडेतिकडे बघत जीभ चावली. Smile

प्रयत्न भारी आहे. पण आता हे मुखपृष्ठ आणि संकल्पनेचं प्रास्ताविक यांनी उंचावलेल्या अपेक्षा अंक पुरा करेल ना (का?) असा नवा प्रश्नही पडला. शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुखपृष्ठ आणि संकल्पना आवडली. याला 'पास्तीश' म्हणता येईल का याचा विचार करतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0