लाईटहौशी (भाग ३)

क्लीव्हलंड ते मिन्नेअपोलिस

लहानपणापासून कधी जलाशायांजवळ राहिलो नव्हतो. औरंगाबाद-धुळे-डोंबिवली या प्रामुख्याने होणाऱ्या प्रवासात पाण्याचा संबंध जास्त येत नसे. डोंबिवली म्हणजे काही अरबी समुद्राचा किनारा नव्हे. तसंच, औरंगाबादला राहून पाहिलेला खूप मोठा जलाशय म्हणजे पैठणचा नाथसागर! अथांग जलाशयांची ओढ फक्त पुस्तकांमुळे निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकेत येऊन क्लीव्हलंड शहरात पहिली नोकरी लागली तेव्हा मस्त वाटलं होतं. क्लीव्हलंड… शिकागोचं कुरूप भावंड! हे शहर "mistake on the lake" या नावाने प्रसिद्ध आहे हे हळू हळू कळलं आणि त्यासोबतच त्याची कारणंसुद्धा…

शिकागोप्रमाणेच या शहराचा एक भाग म्हणजे ईरी सरोवराचा किनारा आहे. डाऊनटाऊनमधले आडवे रस्ते त्या किनाऱ्याला समांतर आणि उभे रस्ते सगळे सरोवरात जाऊन उडी मारणारे… रस्त्यांची रुंदी आणि शहरातली माणसं यांचं प्रमाण १०:१ असं उलटं आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतलं एक महत्त्वाचं शहर / आर्थिकदृष्ट्या महत्वाचं वगैरे असलेलं हे शहर त्यातून वाहणाऱ्या "कुयाहोगा" नदीसारखं वाकडंतिकडं वाढलं, पण यशस्वी झालं नाही. १९५०-६० नंतर प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला शहर भरभराटीला येणार असं भाकीत व्हायचं, आणि दशक संपता संपता पुन्हा जैसे थे! एकदा तर नवल घडलं, आणि कुयाहोगा नदीलाच आग लागली. कुयाहोगा नदीकाठावर दोन्ही बाजूंना उभ्या राहिलेल्या फ़्यक्ट्र्या ती नदी प्रदूषित करत राहिल्या आणि नदीपात्रावर गोळा झालेल्या त्या रसायन्नांना एका दिवशी आग लागली. त्या वेळेपर्यंत क्लीव्हलंड बर्यापैकी "नावडतं" झालं होतं, आणि सगळ्या देशाचं दुर्भाग्य पोटाशी घेऊन या शहरातली नदीच शब्दश: होरपळून निघाली होती.

लाईटहाउसविषयी बोलायचं सोडून मी शहराचा बरावाईट इतिहास का सांगतोय? ते शहरच असं आहे. विषय निघाला की दोन शिव्या दिल्याशिवाय पुढं जावसंच वाटत नाही. तर मी इथे राहायला आलो तेव्हा जलाशयाजवळ राहायला मिळणार म्हणून खूप आनंदात! अपार्टमेन्टच्या खिडकीच्या एका कोपऱ्यातून ईरी सरोवर दिसायचं. पहिल्यांदा मस्त वाटलं. मग नोकरी सुरु झाली, काम वाढलं आणि खिडकीच्या कोपऱ्यातून दिसणाऱ्या बोटींकडे बघून राग यायचा. साले पैसेवाले लोक… मंगळवारी दिवसाढवळ्या कामंधंदे टाकून बोटी फिरवणं कसं बरं जमतं? आम्हीच साले आमच्या खिडकीशी बसून एका डोळ्याने बाहेर बघणार आणि एका डोळ्याने laptop वर आमचा फाटलेला कोड! सुरुवातीला आमचं ऑफिस एका अत्यंत उदास १०० वर्षं जुन्या इमारतीत होतं, त्यामुळे निदान काम व्हायचं… आणि नंतर आमचं ऑफिस स्वत:च्या नव्याकोऱ्या इमारतीत गेलं… lakefront वर! आणि आम्हाला वाकुल्या दाखवण्यासाठी हि सगळी नवीकोरी इमारत काचेची! इमारतीच्या कुठल्याही भागातून दिसणारा तो अथांग जलाशय, त्या बोटी, किनाऱ्याला लागूनच समांतर असलेले रेल्वे रूळ, त्यावरून जाणाऱ्या मालगाड्या आणि इंजिनं… श्या… असूया वाटावी असं सगळं सगळं दिसायचं तिथून… आणि एवढं सगळं ओलांडून किनाऱ्यापासून थोडंसं दूर असलेलं लाईटहाउस!

लाईटहौशी आहे म्हणून सगळ्याच लाईटहाउसविषयी मी गोड गोड लिहीन असं काही नाही. या एका लाईटहाउसचा राग कायम मनात आहे. एकतर, ईरी सरोवर आळशी… लाटाबिटांचा व्यायाम त्याला मानवत नाही. असल्या आळशी पाण्यात कसला आलाय धोका? आणि मला तरी या खांबावरचा दिवा लागलेलं कधी आठवत नाही. लागत असेलही… हमने कभी ना देखा!

या उदास शहरात दर विकांताला काय करायचं? कुठे जायचं? हा प्रश्न पडायचा आणि उत्तर लवकर सापडायचं नाही. मला प्रत्येक वेळी वाटायचं या लाईटहाउस वर एकदा तरी जावं. मला याआधी दुसऱ्या लाईटहाउसवर आनंदाने भेटलेली शांतता मला इथेही भेटली असती, तिने माझं स्वागत केलं असतं, आणि आम्ही दोघांनी मागे वळून सगळ्या शहराला, आणि त्या काचेच्या इमारतीला वाकुल्या दाखवल्या असत्या. मी ३-४ वेळा त्या लाईटहाउसचा रस्ता शोधायचा प्रयत्न केला. GPS / Google Maps असं सगळं वापरून झालं. प्रत्येक वेळी मी किनाऱ्यावरच्या एका पार्कपर्यंत बरोबर जायचो. पण पुढे काहीच नाही. त्या लाईटहाउसचा रस्ता एका श्रीमंत लोकांच्या मरीनाच्या मागे लपून बसला होता. आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीआड! ज्या लाईटहाउसच्या पायथ्याशीसुद्धा जाता येत नाही ते कसलं लाईटहाउस? जो मार्गदर्शक आपल्याला मार्ग दाखवायला रस्त्यापर्यंत न येता दुरूनच खाणाखुणा करतो तो कसला मार्गदर्शक? कंटाळवाणा दिव्याचा खांब साला!!


दोन वर्षानंतर क्लीव्हलंड सोडून minnesota मध्ये आलो. इथे अथांग जलाशय जवळ नाही, पण शहराला ठिकठिकाणी भोकं पडली आहेत आणि त्यातून छोटीमोठी तळी / डबकी / लेक तयार झाली आहेत. थोड्क्यात, या शहरात "लेकीं"ची कमतरता नाही. आणि त्यात भरीस भर म्हणजे शहर दुभागणारी "Mighty Mississippi"! पानगळीच्या दिवसांत शहरातून फिरताना एक छोटेसे, खेळण्यातले वाटावे असे लाईटहाउस सापडले. खूप हसलो. कुठे भयानक खडकांवर उभे दीपस्तंभ आणि कुठे हा दिव्याचा खांब… तो पण नदीकाठचा! आतापर्यंत पाहिलेल्या लाईटहाउसपैकी या एकाचे प्रयोजनच मला कळले नाही. मिसिसिपीवरच्या असंख्य पुलांपैकी एका पुलाखाली हा खांब कुणी बांधला कुणास ठाऊक! आणि लाईटहाउस जिथे बांधलं ते म्हणे बूम island!

असे असले तरी दोन गोष्टी मी नाकारणार नाही. एक तर पुलावरून अखंड वाहतूक चालू असते, डाऊनटाऊनचा गोंगाटही फार दूर नाही, तरीही या लाईटहाउस च्या पायथ्याशी शांत वाटतं. मिसिसिपी नदी या ठिकाणी येउन थोडी निवांत बसून वगैरे पुढे जात असेल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण तिथून परतताना हे लाईटहाउस "पुन्हा ये रे" असं म्हणतं. पुन्हा येतो तेव्हा पट्कन सापडतं, आणि पुन्हा त्याच शांत मुद्रेने स्वागत करतं.


(क्रमश:)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आधीच लिखाण मस्त! त्यात इतके सुंदर पाणी वाले फोटो..!!
मात्र सध्या लागोपाठच्या दुष्काळांनी नाथसागर पार रोडावलाय! यंदा भरून वाह्यला तर बघायला जाऊच! ही दोन जुनी छायाचित्रे गूगलबाबाच्या क्रुपेने...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

नाथसागर बघून छान वाटले. स्थलांतरित पक्षी (migratory birds… स्थलांतरित हा शब्द योग्य आहे का?) वगैरेंमुळे पक्षीनिरीक्षणासाठी कधी काळी नाथसागर खूप प्रसिद्ध होता… आता रोडावल्यावर अवस्था काय आहे माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो म्हणजे अक्षरक्षः ग्रीटींग कार्ड फोटो आहेत. हा भागही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख नावासकट (पाण्यात नाव नाहीयै तरी) फोटो लेखन मुळातच मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0