अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ
गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली. त्याची अजून सवय व्हावी, सारखं सारखं शब्दकोशाकडे न धावता लिहीता यावं अशी खूप इच्छा आहे, आणि ऐसीवर पडीक राहून गेल्या दोन तीन वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे. पण पारिभाषिक शब्दकोशही ठराविक विषयांवर भर देतात - कोलोकियल शब्दछटांचा सुरस अनुवाद नसतोच.
उदा: flag-waving patriots हे मराठीत इडियमॅटिकली कसे म्हणायचे? फॉर दॅट मॅटर इडियमॅटिकली चा चांगला मराठी शब्द काय आहे?
मराठीतली समाजशास्त्रीय परिभाषा इंग्रजीतून थेट अनुवाद करून तयार झाली आहे, आणि बोजड वाटते. अर्थपूर्ण, पण सुरस मराठीत लिहीणे जमायला पाहिजे.
irredeemable (इथे "मदतीच्या पलिकडे" अभिप्रेत आहे, पण शब्दकोशात बँकिंग शब्दावलीचे चेक रिडीम करण्याचे पर्याय दिसतात)
compromising position / in flagrante delicto (याचा अर्थ फ्रेंच/लॅटिन धागा-धुरंधर नंदन सांगेल)
cultural transmission (पिढ्यांपिढ्या सांस्कृतिक ज्ञानाला पास ऑन करणे)
kiss of death
असे बरेच आहेत, दुसर्यांनी ही भर टाकावी...
प्रतिक्रिया
यावच्छक्य जमेल तसे पाहतो, पण
यावच्छक्य जमेल तसे पाहतो, पण एक जाणवलेली गोष्ट म्हणजे शब्दसमुच्चयाकरिता एक शब्द अशा धाटणीचे अन सूक्ष्म अर्थच्छटावाले शब्द मराठीत तितके नाहीत. किंवा असले तरी इंग्लिशसारखे नाहीत.
काही शब्दः
इन-एक्स्ट्रिकेबल = अतूट.
रिसोर्सफुल = हिकमती.
कल्चरल ट्रान्समिशन = सांस्कृतिक प्रसार/प्रचार (फारच शब्दशः होतंय का?)
लिटरली = अक्षरशः.
हेगेमोनी/हेजेमॉनी = वरचष्मा.
रिडेम्प्शन = पुनरुत्थान. (हाही रेट्रोफिटिंगच आहे.) यावरून इर्रिडीमेबल व्युत्पादिता यावा.
फ्लॅगवेव्हिंग पेट्रियट्स = अतिरेकी देशभक्त?
इडियमॅटिकली ला मराठीत प्रतिशब्दच नाहीये असे वाटते. प्रतिशब्द पाडायला काही अवघड नाही, पण सद्यस्थितीत तरी प्रतिशब्द नाही असे वाटते.
कनन्ड्रम (उच्चार चुकला असल्यास सांगणे) = शृंगापत्ती.
जज करणे = जोखणे.
बाकी, धागाकर्त्रीने समस्या हा शब्द वापरला आहे. तिथे अडचण हा शब्द अधिक साधासरळ वाटला असता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रिडीमेबल मधे रिडेंप्शन चा
रिडीमेबल मधे रिडेंप्शन चा ख्रिस्ती धार्मिक अर्थ दडलेला आहे. मूळ धार्मिक संदर्भ प्रत्येक वेळा लागू नसला तरी त्यावरून सुधारणा, पश्चात्ताप, अशा संदर्भात त्याचा वापर होतो. मराठीत पुनरुत्थान थोडं कृत्रिम वाटतं, कारण तसा सांस्कृतिक अर्थ त्यामागे नाही. तसलाच प्रायश्चित्ताचा किंवा उद्धाराचा संदर्भ असला पाहिजे असे नाही, पण तरी, "अपुनरुत्थानक" हे फारच बोजड वाटतं.
तेच प्रसार चं - पिढ्यांपिढ्याचा, कालानुक्रमाचा संदर्भ त्यात येत नाही.
ही इज इर्रिडीमेबल = त्याला
ही इज इर्रिडीमेबल = त्याला क्षमा नाही असं भाषांतर त्यातल्या त्यात ठीक होईल, कारण सांस्कृतिक संदर्भच नाहीत तेव्हा इलाज नाही. पण तितपतच, कारण इर्रिडीमेबलि वगैरे शब्द वापरले तर ही सर्व रचनाच ढेपाळते (क्रम्बल्स, गिव्ह्ज वे). बघा, अजूनेक शब्द गवसला.
प्रसाराबद्दल सहमत. पाहतो काही मिळालं तर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत आणि अवांतर
शब्दसमुच्चयाकरिता एक शब्द अशा धाटणीचे अन सूक्ष्म अर्थच्छटावाले शब्द मराठीत तितके नाहीत.
.............अगदी सहमत आहे आणि त्यात गंमतही आहे. याचे मला जाणवलेले कारण म्हणजे मराठीत आपण तसे बोलणे अपेक्षितच नाही. म्हणजे, एखादाच सूचक शब्द वापरण्याऐवजी आपण बरेचदा 'इस्कटूनच' सांगतो.
अवांतर:
आत्ताच्या पिढीला 'टेन्शन' येते. पण आधीच्या पिढीतले लोक (किंवा जुन्या चित्रपटांत वसंत शिंदे, इंदिरा चिटणीस) कसे बोलत असतील ते आठवून पाहिले तर 'टेन्शन' एका नामाऐवजी वाक्प्रचार वापरलेले आढळतील. 'टेन्शन'साठी अगदी सहज आठवलेली उदाहरणे म्हणजे जुन्या पिढीत 'जिवाला भार' होत असे, 'जिवाला पीळ' पडत असे, 'जिवाला ताप' होत असे, 'जिवाला घोर' लागत असे, इत्यादी. इंग्रजीत यांतल्या प्रत्येकासाठी शब्द नाहीत असे नाही पण आपण वापरताना सगळ्यालाच टेन्शन म्हणतो, हा आपला वर्णनकद्रूपणा. जसे, जेवण सुंदर झालंय, चित्र सुंदर आलंय, गाणं सुंदर गायलंय. सगळीकडे सुंदरसुंदर. चविष्ट, सुरेल, इ. बाकी विशेषणे गडप. किंवा आत्ताच्या पिढीत सगळ्या अडचणी (difficulty), समस्या(problem), प्रश्न(problem), गुंता(problem), गोते (trouble) या गोष्टी एकाच 'प्रॉब्लेम'च्या छताखाली आळसावून पहुडलेल्या असतात. त्यामुळे गुंता असा आहे की शब्दसमूहासाठी एक शब्द मराठीत बोलायची तितकीशी पद्धत नाही नि एखादा मिळालाच तर वर्णनासाठी इतर उपलब्ध असलेल्या गोष्टीही आपण त्यात मिसळून टाकतो. असो.
+१११११११११११
अगदी सहमत. यावरून एका लेखात वाचलेली 'मस्त' शब्दाच्या अतिवापराबद्दलची शेरेबाजी आठवली. आजी आणि नात एका लग्नात जातात, त्याचे नातीने केलेले वर्णन असे:
लग्नातलं जेवण काय मस्त होतं! नवरी मुलगी काय मस्त दिसत होती! बाकी एकूण समारंभही मस्तच झाला, ड्रेस वगैरेही सर्वांचे मस्तच होते.
आणि आजीचे वर्णनः
लग्नातलं जेवण काय चविष्ट होतं! नवरी मुलगी काय देखणी दिसत होती! बाकी एकूण समारंभही छानच झाला, ड्रेस वगैरेही सर्वांचे एकदम साजेसेच होते.
वगैरे...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काही गोष्टी व्यक्त करताना
काही गोष्टी व्यक्त करताना ('काही अभिव्यक्तींसाठी' नव्हे!) हे म्हणणं बरोबरच आहे. मराठीतली व्यक्त करण्याची रीतच इंग्रजीहून निराळी आहे.
दुसरं म्हणजे विचार करण्याची भाषा इंग्रजी होत चालल्यामुळे त्यातल्या शब्दांचं (वाक्यांचं वा आशयाचं नव्हे) 'एकास एक' भाषांतर करण्याची खोड आपल्याला लागली आहे. असं भाषांतर करताना चटकन संस्कृतचा आधार घेतला जातो. कारण 'शब्दसमुच्चयाकरता एक' म्हणून वापरण्याचे शब्द करण्याची संस्कृतची क्षमता मराठीहून जास्त आहे. शिवाय संस्कृतला इथे (फुकटच्या फाकट) भावही बराच आहे. त्यामुळे लोक चटकन 'प्रतिप्रतिसाद' म्हणतात आणि फुकट भाव खायला जातात. बिचारं मराठी 'बूच' अगदी नेमकं-चपखल असूनही कोपर्यात पडतं. काही शास्त्रीय विषयांमध्ये वेगळी अर्थछटा (अर्थच्छटा नव्हे, ती केवळ श्रुती आहे) दाखवण्यासाठी म्हणून संस्कृतातून उसन्या घेतलेल्या पारिभाषिक शब्दांचा वापर जरूर करावा. पण त्यांना मराठी शब्दांच्या डोक्यावर फाजील मिर्या वाटू देता नयेत.
शिवाय असे शब्द मराठीत अगदी नाहीतच असं नाही. होतं काय, की आपण ज्या शब्दांकरता प्रतिशब्द शोधत असतो, ते शब्द एका विशिष्ट संदर्भात असतात आणि त्या संदर्भात मराठीतले उपलब्ध शब्द वापरण्याची रीत नसते, परिणामी सवयही नसते. उदाहरणार्थ, 'मला अमुक एका गोष्टीची अॅलर्जी आहे' हे वैद्यकीय संदर्भात म्हणायचं असताना आपण मराठीत सहज हाताशी (उपलब्ध नव्हे!) असलेला 'वावडं' हा शब्द वापरत नाही. पण 'त्याला विनाकारण वचावचा बोलणार्या लोकांचं वावडं आहे' या वाक्यात मात्र तो सहजी वापरून जातो. 'दुर्गभ्रमणगाथा'मध्ये चक्क दांडेकरांनी 'रकसॅक'चं शब्दशः भाषांतर 'पाठपिशवी' असं केलं आहे. पण त्यांच्यासारख्या रसाळ मराठी लेखकाला 'पडशी' मात्र चटकन आठवू नये, याची गंमत वाटते. असलीच धमाल 'हॅरी पॉटर अॅन्ड दी फिलॉसॉफर्स स्टोन'च्या भाषांतराच्या पहिल्या आवृत्तीत. त्यातला तो फिलॉसॉफर स्टोन लोखंडाला लावला, की लोखंडाचं सोनं होतं. (आणि इतरही काही गुणधर्म आहेत त्याचे. पण हा एक महत्त्वाचा गुणधर्म. (बादवे, 'डिफायनिंग'चं भाषांतर काय करायचं?!)) त्याचं भाषांतर पहिल्या आवृत्तीत चक्क 'तत्त्वचिंतकाचा पाषाण' असं केलं होतं! अरे ए! दगडसुद्धा नाही बरं का, पाषाण! कसला पाषाण लेका?! पण सुदैवानं नंतर दुसर्या आवृत्तीच्या वेळी त्या दिवाळखोर भाषांतरकाराला कुणीतरी अक्कल शिकवली आणि त्या पुस्तकाचं नाव 'हॅरी पॉटर आणि परीस' असं झालं.
तर - असो!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
व्यवच्छेदक
व्यवच्छेदक?
होय होय! आभार.
होय होय! आभार.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फक्त +१ किंवा मार्मिक देऊन
फक्त +१ किंवा मार्मिक देऊन भागलं नाही म्हणून प्रतिप्रतिसाद!
शास्त्रीय विषयांमधे आता वापरात असलेले शब्द सुद्धा सगळे शब्द मूळ संकल्पनेच्या जवळ जातातच असे नाही. उलट आधीच जार्गनिस्टिक असलेल्या इंग्रजी शब्दाचा शब्दश: अनुवाद करून त्याला अजूनच दुर्बोध करतात. उदा: उपयुक्ततावाद (utilitarianism). १९व्या शतकात मांडलेला अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय तर्क. मला कायकी खूप बोजड वाटतो. पण तू म्हटल्याप्रमाणे विचार इंग्रजीतून होत असल्यामुळे वाचकाला सुद्धा मूळ इंग्रजी संकल्पनेची कल्पना (!) असते, आणि उपयुक्त = utility असा थेट अनुवाद केला, की बोजड शब्दाचा अर्थ लागतो.
अमुक, मराठीची रीत वेगळी आहे हे खरंय. म्हणून मी शब्दसमूहांना थेट मॅच पेक्षा तसाच अर्थ सुचवणारा, पण दैनंदिन वापरातला, साहित्यात मुरलेला शब्दप्रयोगा बद्दल म्हणत होते.
हॅरी पॉटर वरून आठवलं - फेलूदा च्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादात "पेनकिलर" चा उल्लेख आहे, त्यावरून मराठीत "वेदनाशामक गोळी" वापरलेले आहे. या पेक्षा डोकेदुखीचं औषध, किंवा साधं क्रोसिन/ अमुतान्जन ही चाललं असतं!
'प्रतिप्रतिसादा'बद्दलः मराठी
'प्रतिप्रतिसादा'बद्दलः मराठी प्रतिशब्द घडवताना मराठीतले प्रत्यय आणि उपसर्ग आपण पुरेसे वापरलेलेच नाहीत, म्हणून तर 'सरकारी मराठी'बद्दल इतके विनोद जन्माला येतात, असं प्रतिपादन माझे एक शिक्षक कायम खेदानं करत असतात, त्याची आठवण झाली. प्रत्यय आणि उपसर्ग मराठी धाटणीचे वापरले, तरी प्रतिशब्द बराच मराठी वळणाचा वाटतो. 'प्रतिप्रतिसाद' किंवा 'उपप्रतिसाद' अगदीच कृत्रिम. पण 'पोटप्रतिसाद' त्या मानानं देशी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
...
पोटपडसाद?
+१
त्यापुढील प्रतिसादास आपलं पडसादास ओटीपोटपडसाद म्हणावे काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गंमत म्हणून छान आहे! पण पडसाद
गंमत म्हणून छान आहे! पण पडसाद 'आपोआप' उमटतात, प्रतिसाद मुद्दामहून 'देतात'. हां, काही काही प्रतिप्रतिसाद 'प(ब)डप(ब)डसाद' असतात हे खरं असलं, तरी...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अहाहा! मस्त धागा आहे. तत्काळ
अहाहा! मस्त धागा आहे. तत्काळ काही भर टाकणं जमणार नाही. पण धाग्याच्या यथोचितपणाला दाद म्हणून निरर्थक प्रतिसाद लिहिण्याचं पाप करत आहे.
***
मागे मी risk या शब्दावर अडखळले होते. ’धोका’, ’धोकादायक’ याच्या पुढे काही सुचेचना. आणि मग नंतर दुसर्या कुठल्यातरी संदर्भात ’जोखीम’ हा शब्द वापरताना एकदम साक्षात्कार झाला.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
निरर्थक नाहीच - तुझं उदाहरण
निरर्थक नाहीच - तुझं उदाहरण अगदी बरोबर आहे - अशाच अनुवादाच्या शोधात आहे.
अजून एक उदाहरण: इथे प्रति-प्रतिसाद दिला की पोस्ट-संपादन करता येत नाही. तसे शब्द आहेत - तसे प्रति-प्रतिसाद, प्रत्युत्तर वगैरे शब्द माहित आहेत. पण कुठल्याही शब्दकोशात "परत इथेच पाककृती देते, बूच मारू नका" हे रुचीचे कालचे बागकाम धाग्यातले वाक्य सापडणार नाही!
बूच मारू नका हे खास जालीय
हे खास जालीय शब्द या क्यटेगरीमध्ये येइल ना. जसं रच्याकने, विदा वगैरे
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हो, कदाचित. पण मी शोधत
हो, कदाचित. पण मी शोधत असलेल्या इडियमॅटिक शब्दप्रयोगाचे उत्तम उदाहरण आहे.
मराठी वर्तमानपत्र अथवा
मराठी वर्तमानपत्र अथवा आंतरजालावरील कुठलाही लेख उघडा. त्यातले बहुतांश शब्द इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मराठी मुलांना समजत नाहीत. समजणे सोडा वाचतानादेखिल खूप अडखळत वाचतात असे निरीक्षण नोंदवतो.
सहमत आहे. मीतर मराठी
सहमत आहे. मीतर मराठी माध्यमातली असूनदेखील मलाही मआंजावरच्या बर्याचजणांचे लिखाण प्रचंड बोजड वाटते. मग फक्त वरवर वाचून साधारण सार काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करते.
एक उत्सुकता म्हणून विचारतो
एक उत्सुकता म्हणून विचारतो, "प्रचंड बोजड" वाटणार्या लिखाणाची उदाहरणं देउ शकाल का? बाळ सप्रेनी मराठी वर्तमानपत्रांचा उल्लेख केलाय आधीच त्यामुळे ती सोडून. नाही, 'हे कसं बोजड नाहीये', 'आमच्या वेळेला....' असं काहिहि करणार नाही! हे असलं बोजड समहाउ मी बघितलंच नाही की मला ते बोजड वाटलं नाही एव्हढंच जाणून घ्यायचंय.
ता.क. - हा प्रतिसाद पण बोजड वाटला का? वाटला असला तर मग तुम्ही 'बोजड' म्हणताय ते बहुदा शब्दांबद्दल नसून शैलीबद्दल असावं. ??
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
कारण माहीत नाही पण मला धनंजय,
कारण माहीत नाही पण मला धनंजय, बॅटमॅन, नंदन, अमुक आणि अर्थातच अरुणजोशी काय म्हणतायत समजायला वेळ लागतो :-D.
???
'न'वी बाजूंचे प्रतिसाद समजतात???
की वाचायच्या फंदात पडत नाही?
तुमचे
तुमचे प्रतिसाद वाचण्याआधीच, तुमच्या स्वाक्षरीकडे लक्ष जाते. आणि आम्ही थेरडे असल्यामुळे तात्काळ पळ काढतो.
कसचे कसचे!
हा आपला विनय आहे.
हा आपला
हा आपला धनंजय आहे
द्याटीज़ सोऽऽऽ नवीबाजूएस्क
द्याटीज़ सोऽऽऽ नवीबाजूएस्क
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
!!?!??! (अवांतर)
आमची बदनामी थांबवा!!!!!!
बदनामी म्हणजे उशीरा का होईना
बदनामी म्हणजे उशीरा का होईना प्रतिसाद समजतात अशी?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा ह्हा ह्हा ! (अवांतर)
हा ह्हा ह्हा... अचूक ! द्या टाळी !!
कोनाड्यात उभी
कोनाड्यात उभी हिंदमाता.
विनोदी श्रेणी देतो माझा नंबर पहिला!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नक्की कशामुळे बदनामी झालीय,
नक्की कशामुळे बदनामी झालीय, ते आधी स्पष्ट करा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हंम्म्म्म्म
हंम्म्म्म्म. धनंजयचा प्रतिसाद बोजड वाटतो हे सांगणं म्हणजे, ... जाउद्या!! पण या लोकात चक्क नंदन? you sure about it - नं द न ??
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
अर्थातच
केवळ आमच्याच आयडीपुढे अर्थातच हा शब्द का लावला आहे?
इतर आयड्यांचे प्रतिसाद भाषीय क्लिष्टतेमुळे अग्रहणीय बनतात तर आमचे प्रतिसाद 'वैचारिक क्लिष्टतेमुळे'* अगम्य बनतात असे आहे का?
=============================================================================================================
* हा मागासलेपणासाठी युफेमिझम आहे हे काय वेगळे सांगायला पाहिजे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'न'वी बाजूंचे प्रतिसाद
'न'वी बाजूंचे प्रतिसाद समजतात??? >> हो हो समजतात नो प्रॉब्लेम :-).
आमची बदनामी थांबवा!!!!!! >> बदनामी नाही. मला खरंच वेळ लागायचा तुम्ही लोकं काय बोलताय ते समजायला. आता थोडी सवय झालीय.
धनंजयचा प्रतिसाद बोजड वाटतो हे सांगणं म्हणजे, ... जाउद्या!! पण या लोकात चक्क नंदन? you sure about it - नं द न ?? >> यू मीन धनंजयची वाक्यरचना तुम्हाला क्लिष्ट वाटत नाही? नंदनच्या कोटी नेहमीच समजत नाहीत कारण रेफरन्स माहीत असेलच असे नाही.
इतर आयड्यांचे प्रतिसाद भाषीय क्लिष्टतेमुळे अग्रहणीय बनतात तर आमचे प्रतिसाद 'वैचारिक क्लिष्टतेमुळे'* अगम्य बनतात असे आहे का? >> येस आणि तुमचे प्रतिसाद अगम्य वाटणारी मी एकटीच नाही त्यामुळे 'अर्थातच'
!!!
मग एकदा आम्हालाही समजावून सांगा ना, प्लीज! आई शपथ, हा इसम जे काही खरडतो, ते त्याचे त्याला तरी कळत असेल की नाही, त्यालाच ठाऊक!
बाकी, या रेटने तुम्हाला ज्ञानेश्वरी, सलमान रश्दी आणि समग्र शेक्सपियरदेखील समजत असेल, नाही?
परिप्रेक्ष्य हा शब्द मी
परिप्रेक्ष्य हा शब्द मी ऐसीवरच वाचला पहिल्यांदा. त्याचा अर्थ (context असा आहे ना नक्की?) तो शब्द अनेक ठिकाणी वापरला गेल्यावरच समजला. अर्थनिर्णयन हा असाच एक शब्द. याशिवाय कंडू, शष्प हे 'ग्राम्य' शब्द देखील अनवट (अॅज इन माझ्या ऐकण्या/वापरण्यात खूप कमी आहेत) आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
परिप्रेक्ष्य मंजे
परिप्रेक्ष्य मंजे perspective.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी मराठी माध्यमांत शिकूनही
मी मराठी माध्यमांत शिकूनही अचूक शब्दांसाठी सारखा अडखळतो. धागा उपयुक्त आहे. जमेल तशी/तेव्हा भर घालेनच.
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अचूक शब्दांसाठी अडखळणे म्हणजे
अचूक शब्दांसाठी अडखळणे म्हणजे ऐनवेळी शब्द न आठवणे. ते बर्याच वेळा होतं पण इथे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना सहसा माहीत नसलेले मराठी शब्द अपेक्षित असावेत असं वाटतं.
कुणीतरी vulnerable लाही एक
कुणीतरी vulnerable लाही एक बरा प्रतिशब्द / शब्दसमूह / नामाखेरीज वेगळी रचना सुचवा...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नाजूक
नाजूक
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
होय की! नाजूक हा शब्द फक्त
होय की! नाजूक हा शब्द फक्त सकारात्मक छटेनं वापरायची सवय झाल्यामुळे तो असाही वापरता येईल, हे लक्षातच आलं नाही. नाजूक अलंकार, नाजूक नक्षीकाम हे बरोबर, तसंच नाजूक प्रकृती (तोळामासा प्रकृती खरंतर!), नाजूक मनःस्थिती हेही बरोबरच. (चला, अजून एक भाषिक पाप करायची परवानगी तुम्हांला या नेमक्या प्रतिशब्दाबद्दल देऊन टाकते. पण एकच बरं का! 'नैतर उताल-माताल!' ;-))
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
असहाय्य असाही एक शब्द आहे पण
असहाय्य असाही एक शब्द आहे पण तो नेमकी छटा पकडत नाही. असुरक्षित, असहाय्य या कोणत्याही शब्दाने नेमका अर्थ येत नाही. घातानुकूल असा काहीतरी जड शब्द कॉईन करावा लागेल.
घातानुकूलवगैरे
घातानुकूलवगैरे नवनिर्मितीपेक्षा 'तकलादू' ठिके.
पण अजून तरी 'नाजूक' हाच सर्वात पटणीय आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तकलादू आणि नाजूक या दोन्हीमधे
तकलादू आणि नाजूक या दोन्हीमधे एक जनरलायझेशन आहे. व्हल्नरेबल या शब्दामधे जास्त स्पेसिफिक छटा आहे. अत्यंत कठीण, शक्तिमान, चिवट प्राणी / चीजवस्तू ही एखाद्या संकटाबाबत व्हल्नरेबल असते, किंवा असू शकते.
नाजूक हा शब्द चांगला आहे.
अमुक एक मजबूत आहे पण पोटाचा नाजूक.. किंवा तमुककाका एरवी एकदम कणखर असतात पण हॉस्पिटलचा प्रसंगाला एकदम तकलादू.
अशा प्रकारे वापरता येतील शब्द.
घातानुकुल वाचले की उगीच
घातानुकुल वाचले की उगीच वातानुकुल प्रथम श्रेणी ची आठवण होते. ए-सी फर्स्ट.
हीच सेवा उत्तर भारतात
हीच सेवा उत्तर भारतात आणि कोंकणात घातानुकूल होते.
परफेक्ट!
परफेक्ट!
?
समजले नाही. का बरे घातानुकूल व्हावी?
vulnerable
मनःस्थितीच्या बाबतीत वापरायचा असेल तर 'हळवा'.
होय. म्हणजे ’नाजूक
होय. म्हणजे ’नाजूक मन:स्थिती’ही बादच. किंवा फार फार तर, ’नाजूक मन:स्थिती असलेला’ - > ’हळवा’.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
vulnerable = अगतिक/केविलवाणा
अगतिक/केविलवाणा/संभाव्य बळी/भावीबळी
.
श्विआय त्या-त्या विशिष्ट बाबतीत दुबळा/दुबळी/दुबळे
.
.
किंबहुना शब्दशः भाषांतर करणच चूक आहे. रुपांतर करावं वाक्यावाक्याचं .
अमुक अमुक व्यक्तीची तब्येत अमुक रोग/व्हायरस ह्याला व्हल्नरेबल आहे अशा अर्थाचं आंग्ल वाक्य असल्यास मराठीत पुढील रुपं चालोन जावीत :-
१. त्याला त्या विशिष्ट गोष्टीपासून अधिक धोका आहे.
२. त्याची तब्येत त्याविशिष्ट व्हायरस समोर अगतिक होउन जाते.
३. तो व्हायरस त्याच्या तब्येतीस दुबळा ठरवतो.
.
.
सदर प्रतिसाद आणि ऐसीवरचे अमुक हे आय डी ह्यांचा संबंध नाही. ऐसीवरील अमुकास मी दीर्घायुष्य चिंततो.
परवाच सतीश तांब्यांच्या चेपु
परवाच सतीश तांब्यांच्या चेपु भिंतीवर श्रीधर तिळव्यांनी लिहिलेला विलास सारंगांवरचा लेख वाचला. अमकावाद आणि तमकावाद वगैरे काहीही समजलं नाही. सारंगांच्या कसल्याशावादी लेखनशैलीला मुख्यप्रवाहातल्या मराठी वाङ्मयाने फारसा भाव दिला नाही आणि त्यामुळे त्यांचं लेखन इतकं प्रसिद्ध झालं नाही एवढा मर्यादित अर्थबोध झाला. सारंगांच्या ...वादाची गादी तांबे चालवताहेत हेही समजलं.
चेपु या ल्यापटापवरून वापरता येत नसल्याने लेख इथे देऊ शकत नाही. पण त्या लेखातल्या सर्व वादांबद्दल चार शब्द वाचायला मिळतील असं ठिकाण आंजावर आहे का?
(पूर्वी साप्ताहिक सकाळमधले माधव वझ्यांचे नाटकविषयक लेख वाचताना असं होत असे. मी त्यांना अडलेले सगळे शब्द अधोरिखित करून खुलासा विचारणार होतो. पण तितक्यात ते लेखही थांबले आणि सा.स.चाही दर्जा...)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
असाच लेख लोकसत्तामधेही आला
असाच लेख लोकसत्तामधेही आला होता. सारंग हे उत्तम लेखक असतीलच, त्याबद्दल शंका नाही, पण ते कसे वेगळे होते हे सांगताना इतरांच्या मांडणीला "मखलाशी" म्हणणे, किंवा कोणालाच ते कसे समजले नाहीत हे आणि इतकेच वेगवेगळ्या क्लिष्ट आणि चमत्कारिक शब्दांत पुन्हापुन्हा मांडणे यातच लेख संपला. ठीक आहे.. इतरजण खुजट असल्याने त्यांना समजले नाही पण मग नेमके काय होते ते स्वतःला मात्र मांडता न येणे किंवा तसा प्रयत्नही न दिसणे.. असं वाटलं.
अवांतर श्रेणी बरोबर आहे. पण
अवांतर श्रेणी बरोबर आहे. पण त्या वरील प्रतिसादाशिवाय या प्रतिसादाला संदर्भच राहणार नाही. वास्तविक हा प्रतिसाद "पडलेले प्रश्न" किंवा "ही बातमी"मधे पाहिजे हे मान्य.
तेव्हा दोन्ही प्रतिक्रिया एकत्रपणे तिथे हलवल्या तर अर्थ टिकेल.
परवाच .....
....आणि आत्ताच मिसळपावने आदूबाळच्या प्रतिसादात, सतीश तांब्यांच्या चेपु भिंतीवर श्रीधर तिळव्यांनी लिहिलेल्या विलास सारंगांवरच्या लेखाच्या उल्लेखाबद्दल ही अजून 'डबे जोडणारी' टिप्पण्णी लिहिली !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
cultural transmission ला
cultural transmission ला 'वारसा चालवणे' नाही का चालणार?
kiss of death साठी 'हुंगून गेलं' हा पेंडशांनी 'तुंबाडचे खोत'मध्ये रुळवलेला शब्द आठवला. अर्थात तो सगळीकडे चालायचा नाही. 'मरणाच्या दारातून परत येणे' चालेल का? (थोडे वात्रटः घंटा वाजवून येणे, वर हात लावून येणे)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
kiss of death:भोज्ज्याला
kiss of death:भोज्ज्याला शिवून परत येणे??
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
मृत्यूमुखातून परतणे.
मृत्यूमुखातून परतणे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुनर्जन्म
पुनर्जन्म हा शब्द ह्या संदर्भात आधीच वापरात आहे की!
उदा :- "ह्या घटनेतून अमक्यानं पुन्हा जीवनात रुळणं/परतणं म्हणजे त्याचा पुनर्जन्मच होता "
...
हे वात्रटपेक्षा अश्लील वाटतात. असो.
रंगेहाथ हस्तांतर
in flagrante delicto = रंगेहाथ पकडणे? (आता हा कॅचिंग रेड-हँडेडचा प्रभाव आहे की नाही, माहीत नाही).
cultural transmission = मेघना म्हणते, तसा 'सांस्कृतिक वारसा चालवणे'* योग्य वाटते. अर्थात, यात किंचित अॅक्टिव्ह/उद्मेखून केलेली क्रिया अशी छटा अधिक आहे.
* द. भा. धामणस्करांची 'हस्तांतर' ही कविता आठवली.
रंगेहाथ पकडणे बरोब्बर बसतं
रंगेहाथ पकडणे बरोब्बर बसतं की! रेड-हँडेड शी याचा काय संबंध आहे आता शोधला पाहिजे.
सांस्कृतिक वारसा चालवणं तर फारच फिट्ट बसतं! (मेघना, प्लीज मी माझा लेख तुला पाठवते, त्यावर अस्सल देशी संस्कार कर, बंगाली मिश्टीत योग्य पेमेंट करीन, नाहीतरी जिम तू सोडलेलेच आहेस..)
kiss of death - चा अनुवाद कळला नाही. याचा अर्थ वरवर जवळचा, उपयुक्त वाटणारा, पण निश्चित घातक संबंध असा होतो.
चालतंय की! (चलनाची चर्चा नंतर
चालतंय की! (चलनाची चर्चा नंतर केलेली चालेल. योग्य त्या चलनात वसुली केली जाईल याची खातरी बाळगावी. :प)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
kiss of death
ओह, मी ते चक्क हॅरी पॉटरी अर्थानं घेतलं की! 'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' ही म्हण चटकन आठवली. पण नेमकं भाषांतर सुचेना.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
व्ह्लनरेबल साठी भेद्य हा
व्ह्लनरेबल साठी भेद्य हा त्यातल्या त्यात ठीक शब्द वाटतो. पण मग अमुकतमुक वॉज़ व्हल्नरेबल टु क्षयझ अशा थाटाची वाक्ये आहेत तशी भाषांतरित करता येत नाहीत. मुळात असा एखादा प्रतिशब्द हुडकणे आणि तो ज्या संदर्भात वापरला जातो त्या थाटाची वाक्ये मराठीत आणणे या दोहोंची सांगड घालणं आवश्यक आहे, नैतर शब्दवाईज़, वाक्यफूलिश व्हायची पाळी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झक्कास
'भेद्य ' हा शब्द खूपच चपखल आहे. सध्या वापरात नसला; तरी नक्कीच रुळण्यासारखा आहे.
सावरकरांनी बर्रेच नवीन शब्द सुचवले उर्दू-इंग्लिश शब्दांना मराठीत.
त्यातले सारेच नसले, तरी खूपसे अगदि आज आपण सर्रास/सहज वापरतो.
सावरकरांपूर्वी ते इतके वापरात हे ऐकून मला आश्चर्य वातलं होतं.
हे ते शब्द :-
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
.
.
तुझा 'भेद्य' हा शब्द अगदि चपखल वाटला.
किस ऑफ डेथ करिता मृत्युघंटा
किस ऑफ डेथ करिता मृत्युघंटा हा शब्द तुलनेने चपखल वाटतो आहे. "अमुकतमुक म्हणजे त्यांच्याकरिता मृत्युघंटाच होती" वगैरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
घंटा म्हणजे आगाऊ वॉर्निंग.
घंटा म्हणजे आगाऊ वॉर्निंग. किस ऑफ डेथ म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण प्रक्रिया न होता केवळ झलक मिळणे.
घंटेतही तसा अर्थ ध्वनित होतोच
घंटेतही तसा अर्थ ध्वनित होतोच ना पण? आगमनाची चिन्हे आहेत पण प्रत्यक्ष आगमन नाही वगैरे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
'डेथ नेल'चे थेट भाषांतर? (इंग्रजीतील प्रस्तुत 'मृत्युघंटा' ही मृत्यूच्या पूर्वसूचनेपेक्षा पश्चात्सूचना असते - 'दामू नेना चचला'-टैप्स - इतकाच काय तो फरक.)
धन्यवाद. मराठीत तरी ही
धन्यवाद. मराठीत तरी ही पूर्वसूचनाच पाहिली आहे आजवर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एवढ्याशा चर्चेतच किती
एवढ्याशा चर्चेतच किती वेगवेगळ्या अर्थछटा आणि शब्द निघाले - नाजुक, तकलादू, भेद्य, घातानुकुल, हळवा. पारिभाषिक शब्दकोशात विकारक्षम, अतिसंवेदनशील, वगैरे क्लिष्ट पर्याय आहेत. ऐसीकरांनी एक पर्यायी शब्दकोश तयार करायला हवा!
किस ऑफ डेथः मरणाची चव घेऊन
किस ऑफ डेथः मरणाची चव घेऊन आलो / पैलतिरी पाऊल टेकवून आलो इत्यादी शब्दसमुह अधिक सुयोग्य ठरावा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
...
'मृत्यूशी चुम्माचाटी' कशी वाटते?
अर्थाच्या
अर्थाच्या दृष्टीने बघायला गेलं तर 'मृत्युशी चुम्माचाटी' पेक्षा 'चुम्माताटी' जास्त शोभून दिसेल.
'यमावलोकन' कसा वाटतो ?
'यमावलोकन'
'यमावलोकन' भन्नाट!!!
सांस्कृतिक बॅगेज
'किस ऑफ डेथ'चा मूळ धार्मिक संदर्भ (जुडस/ख्रिस्त) आणि अलीकडचा माफिया संकेतांतला संदर्भ लक्षात घेतला तर त्यात जी फसवून विश्वासघात करण्याची छटा आहे; ते सांस्कृतिक बॅगेज अनुवादातून मराठीत आणणं, जिकीरीचं आहे.
'गॉडफादर'मधला प्रसंगः
कडेलोट होता होता वाचणे
"कडेलोट होता होता वाचणे " ह्या अस्सल मराठी शब्दसमूहातून हीच्च भावना दिसत नै का 'किस ऑफ डेथ' वाली ?
बादवे, इथून व्हिडियो/दिशपट/दृक् पट पाहता येत नैत.
अर्थ
किस ऑफ डेथचे मला दोन अर्थ सुचतात/बरोबर वाटतात -
१. रोचना म्हणतात त्याप्रमाणे - याचा अर्थ वरवर जवळचा, उपयुक्त वाटणारा, पण निश्चित घातक संबंध असा होतो. किस सकारात्मक पण डेथ म्हणजे नक्कीच घातक..
२. दुसरा म्हणजे, एखादी घटना पुर्णपणे नाश करणारी.
एक शंका
धागा आवडला.
काही शब्द हे भाषांतर न करता तसेच ठेवणे इष्ट वाटते. उदाहरणार्थ "rucksack" करता "पडशी" असा शब्द वापरायला हवा होता असं सूचित करण्यात आलेलं आहे. "पडशी" म्हणजे कपड्यात गुंडाळून त्याचं गाठोडं करून चालताना पाठीला लावण्याकरताचं सामान असा मला अर्थ अभिप्रेत आहे. (चूभूद्याघ्या). तस्मात् "rucksack" करता "पडशी" हे गंमत म्हणून ठीकाय परंतु ती "rucksack" आहे हे पुरेसं स्पष्ट झाल्यावरच केवळ गंमत म्हणून पडशी हा शब्द योग्य ठरेल.
मूळ धाग्यामधे इडियमॅटिक लिखाणाबद्दल विचारलं गेलेलं आहे. तिथे पर्यायी वाक्प्रचार शोधणं हे मात्र खूपच रोचक ठरू शकेल. मात्र सरसकटपणे सर्वच ठिकाणी देशी प्रतिशब्द वापरणं उचित ठरेल असं वाटत नाही.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
पडशी इ.इ.
जुन्या पिढीतल्या लोकांनी याचे असेच भाषांतर केले असते असे वाटते. ऑम्लेटला अंड्याची पोळी म्हणणे वगैरे अनेक उदा. सांगता येतील.
एक अतिअवांतर उदा. आठवले: मॅन-ऑफ-वॉर अर्थात लढाऊ गलबतास पेशवेकालीन मराठीत काहीवेळेस 'मनवर' असेही म्हटल्या जात असे असे वाचल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"मन्वर" चा हा अर्थ माहिती
"मन्वर" चा हा अर्थ माहिती नव्हता. छान.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मग दुसरा अर्थ काय आहे?
मग दुसरा अर्थ काय आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थ
"दिलवर" तसा "मनवर" असा शब्द वाटला होता. "दिलवरा" वगैरे संबोधने शतकापूर्वीच्या मराठी साहित्यामधे येतात.
पहा : http://shabdkosh.raftaar.in/Meaning-of-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4...
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मॅन-ऑफ-वॉर अर्थात लढाऊ गलबतास
अशी नाद अनुसरणारी भाषांतरं / रूपांतरं मराठीला नवी नाहीत. ’प्लॅटफॉर्म’चा ’फलाट’. ’रॉकॉईल'चे 'राकेल'. 'गॅस ऑइल' -> 'घासतेल' -> 'घासलेट'. 'टिन पॉट'चे 'टिनपाट'. (अजून रुळायचा असलेला ’व्हॉट्सॅप’चा ’वत्साप’. :प) फिरंगी नावांच्या बाबतीत तर मराठी दप्तरात हे कैक वेळा दिसतं (याची उदाहरणं माझ्याहून तुलाच जास्त सुचली पाहिजेत. ’एल्फिस्टन’ - ’अल्पिष्टन’, ’फ्रेंच’ - ’फरांसीस’, वगैरे)
बाकी मुसुंचा मुद्दा मान्य आहे. संकल्पना परकी असल्यामुळे मूळ शब्द कधी तसाच ठेवायचा आणि कधी त्याचा सांस्कृतिक अवतारही बदलायचा, ही तारतम्यानं करण्याची गोष्ट आहे. (म्हणून तर भाषांतरासाठी कितीही यंत्रं निघाली, तरी आमच्या पोटाला वट्ट चिमटा बसणे नाही!)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+११११११
इंगरेज, फरांसीस, फिरंगी, वलंदेज, डिंगमार, ही झाली समूहनामे.
वैयक्तिक नावे: अल्पिष्टनाचे फेमस उदा. तर दिलेलेच आहे. बाकी मॉस्टिन व ऑस्टिनचे अनुक्रमे माष्टिन आणि आष्टिन, गॉडर्डचे गाडर, मॅकफर्सनचे मेघफास, सार्टोरियसचे सरताऊस, रॉस लँबर्टचे रासलंपट, इ. अनेक रंजक उदा. सापडतात.
फिरंगीच का, भारतीय बिगरमराठी नावांतही असे बदल होतात, उदा. तंजावुर या तमिऴ नावाचे चंदावर, जिंजीचे चंजी, वगैरे.
एक अजून रोचक उदा. म्हणजे टोपण. आता टोप म्हणजे टोपी म्हणून त्यावरून ते आलंय की टु ओपन चं टोपण झालंय काय माहिती. पर्सनली दुसरी व्युत्पत्ती जास्ती मसालेदार वाटते, पण कितपत खरी ते माहिती नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रासलंपट! काय कडक नाव आहे! कोण
रासलंपट! काय कडक नाव आहे! कोण होता हा रासलंपट?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी अगदी ब्रिटिश
अगदी अगदी
ब्रिटिश अधिकार्यांपैकी एक होता असे दिसते. याचा नक्की रोल किती मोठा होता ते माहिती नाही. मराठी रियासतीच्या बहुधा ५ व्या खंडात वरील उल्लेख आलेले आहेत- अपभ्रंशाची मजा म्हणून.
कल्पना करा, असा एखादा उल्लेखः "आज सायंकाळी रासलंपट साहेब बावनखणीत जाताना दिसला"...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पाने