खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (२)

ही सगळी कथा ऐकल्यावर पुढे काय होणार याची उत्सुकता मला लागली होतीच. खरे सांगायचे तर झाल्या प्रकारात आमच्या दुर्दैवी सावकारबुवांचा मुलगाच दोषी आहे याबद्दल मला स्वतः सावकारबुवांच्या इतकीच खात्री वाटत होती. पण होम्सवरही माझा तितकाच विश्वास होता. ज्या अर्थी घडलेल्या गोष्टींचा सावकारबुवांनी लावलेला अन्वय होम्सला पटलेला नव्हता, त्या अर्थी अजूनही या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळू शकते असे मला राहून राहून वाटत होते. त्यामुळे होम्सने जेव्हा मलाही आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला तेव्हा मला ती एक इष्टापत्तीच वाटली. स्रीटहॅम हे उपनगर लंडनच्या दक्षिणेला आहे. तिथे पोहोचेपर्यंत होम्सने तोंडातून चकार शब्दही काढला नाही. उलट पूर्ण वेळ तो मान खाली घातलेली आणि कपाळाला आठ्या अशा अवस्थेत विचारात गर्क होऊन बसला होता. होम्सचा एकंदर आविर्भाव बघता होल्डर साहेबांना मात्र कुठेतरी आशेचा किरण गवसल्यासारखे झाले होते. त्यामुळे काही वेळानंतर आपल्या व्यवसायाबद्दल त्यांनी माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. थोडा वेळ आगगाडीतून प्रवास केल्यावर थोडेसे अंतर चालत आम्ही आमच्या प्रसिद्ध सावकारबुवांच्या लहानशा निवासस्थानी फेअरबँक इथे येऊन पोचलो.

फेअरबँक हे घर मोठे होते. चौरस आकारात पांढऱ्या दगडाने बांधून काढलेले. इतर घरांच्या तुलनेत रस्त्यापासून जरा लांब उभे आहे असे वाटणारे. रस्त्यावरच एक मोठ्या बिडाच्या लोखंडी दारांचे फाटक होते. फाटकातून आत आल्यावर समोरच घोडागाडी जाऊ शकेल अशा दोन आवळ्या जावळ्या वाटा होत्या. त्यांच्या मधोमध हिरवळीचा राखलेला पट्टा होता. हिरवळीवर सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरलेली होती. उजव्या हाताला झाडांची एक लहानशी राई होती. राईच्या पलिकडे उंच वाढलेल्या मोठ्या झाडांचे दोन पट्टे रस्त्यापासून ते स्वयंपाकघराच्या दरवाज्यापर्यंत गेले होते. या दोन पट्ट्यांच्या मधून एक पाऊलवाट रस्त्यापासून ते स्वयंपाकघरापर्यंत जात होती. ती बहुतेक फेरीवाले, भाजीवाले वगैरे लोकांसाठी केलेली असावी. डाव्या हाताला एक आळी मागे तबेल्यापर्यंत गेली होती. ती सार्वजनिक असावी कारण घराच्या आवाराचा भाग असल्यासारखी काही ती दिसत नव्हती. पण सार्वजनिक असली तरी फारशी वापरात नसावी असे वाटत होते. मी आणि सावकारबुवा, आम्हाला दोघांना घराच्या फाटकात तसेच उभे करून होम्स घराची तपासणी करायला निघून गेला. घराचे बाहेरून चारी बाजूंनी सावकाश निरीक्षण केल्यावर त्याने फेरीवाल्यांसाठी केलेल्या वाटेची तपासणी केली. मग तो परसदारच्या बागेकडे आणि तिथून तबेल्यातून तबेल्याकडे जाणाऱ्या आळीकडे गेला. सावकाश एकेक पाऊल टाकत टाकत बारकाईने चाललेला हा तपास इतका वेळ चालला होता की शेवटी मी आणि होल्डरसाहेब आत जेवणघरातल्या शेकोटीजवळ बसून त्याची वाट पाहू लागलो. आम्ही दोघं नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो असतानाच जेवणघराचे दार उघडून मध्यम उंचीची, सडपातळ अशी एक तरुण मुलगी आत आली. तिचे केस काळेभोर होते आणि डोळेही तसेच काळे होते. तिच्या फिकुटलेल्या वर्णामुळे तिचे डोळे आणखीनच गडद असल्यासारखे दिसत होते. आजवर कधी एखाद्या बाईचा चेहरा इतका पांढरट पडलेला मी पाहिला नव्हता. तिचे ओठही रक्त नसल्यासारखे पांढरे पडले होते पण तिचे डोळे मात्र रडून रडून चांगले लाल झाले होते. जराही आवाज न करता माझ्या शेजारून ती निघून गेली तेव्हा तिला किती जबरदस्त दुःख झाले आहे हे मला अगदी लख्खपणे जाणवले. सकाळी होल्डरसाहेब म्हणाले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तिला दुःख झालेले दिसत होते. ती चांगली खंबीर मनाची आणि स्वतःवर विलक्षण ताबा असलेली मुलगी होती हे तिच्याकडे बघून कळत असल्यामुळे तिला झालेले दुःख जास्त जाणवत होते. माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत ती आपल्या काकांपाशी गेली आणि स्त्रीसुलभ अशा वात्सल्याने तिने काकांच्या डोक्यावर हलकेच थोपटले.

"बाबा, आर्थरला सोडून द्यायला तुम्ही त्यांना सांगितलेत ना? "

"नाही गं बाळा. आपल्याला याच्या मुळापर्यंत जायला हवे ना"

"पण आर्थर निर्दोष आहे. माझी खात्री आहे. तुम्हाला माहित्ये बायकांना या गोष्टी बरोबर ओळखू येतात. त्याने काहीच वेडेवाकडे काम केलेले नाहीये. मला माहित्ये. त्याच्याशी इतके निर्दयपणे वागल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल. "

"जर तो इतका धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, तर तोंड का नाही उचकटते स्वतःचे? "

"तुम्ही त्याच्यावर इतका मोठा आळ घेतलात याचा त्याला राग आला असेल"

"मी त्याला मुगूट हातात धरलेला माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. मग त्याच्यावर आळ घेण्याशिवाय मी दुसरे काय करू शकतो? "

"त्याने फक्त बघायला म्हणून तो मुगूट हातात घेतला असेल. मी सांगते तुम्हाला असेच झाले असणार. ही चौकशी बंद करा हो. आपला आर्थर तुरुंगात आहे या कल्पनेनेच मला रडू फुटते. "

"जोपर्यंत ते हरवलेले खडे परत मिळत नाहीत तोवर मी ही चौकशी थांबवणार नाही. मुळीच नाही. मेरी, आर्थरबद्दलच्या तुझ्या प्रेमापोटी तुझे या सगळ्याच्या भयंकर परिणामांकडे साफ दुर्लक्ष होतेय. चौकशी बंद करणे लांबच राहिले, उलट मी याचा खोलवर तपास करायला म्हणून लंडनहून एका सद्गृहस्थांना घेऊन आलो आहे. "

"हेच का ते सद्गृहस्थ? " माझ्याकडे तोंड करून ती म्हणाली.

"नाही. हे ते नव्हेत. हे त्यांचे मित्र आहेत. त्या गृहस्थांना एकट्यानेच काही तपास करायचा होता. ते सध्या तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत आहेत. "

"अबेल्याकडे जाणाऱ्या आळीत? " तिच्या भुवया उंचावल्या. "तिथे काय सापडणार त्यांना? हे बघा हे तेच सद्गृहस्थ दिसतायत. साहेब, माझा भाऊ आर्थर निर्दोष आहे हेच तुम्हीही सिद्ध करून दाखवाल. हो ना? "

"माझंही हेच मत आहे आणि ही गोष्ट आपण नक्कीच सिद्ध करू या. " दाराजवळच्या पायपुसण्यावर आपल्या बुटांना लागलेले बर्फ पुसता पुसता होम्स म्हणाला. "आपण मेरी होल्डर आहात खरे ना? बाईसाहेब, आपली परवानगी असेल तर आपल्याला एक दोन प्रश्न विचारू शकतो का मी? "

"जरूर विचारा. हा गोंधळ निस्तरण्यासाठी मी कुठलीही मदत करायला तयार आहे"

"काल रात्री तुम्ही काही ऐकले नाहीत का? "

"नाही. माझ्या काकांच्या चढलेल्या आवाजाने मला जाग आली आणि मी खाली आले"

"तुम्ही काल रात्री सगळी दारे - खिडक्या लावल्यात त्या वेळी सगळ्या कड्या व्यवस्थित लावल्या होत्यात? "

"हो. "

"आज पहाटे त्या सगळ्या तशाच लावलेल्या होत्या? "

"हो"

"तुमच्या मोलकरणीचे काही प्रेमप्रकरण आहे का? काल रात्री ती आपल्या प्रियकराला भेटायला बाहेर गेली होती अशी तक्रार तुम्ही आपल्या काकांकडे केली होतीत? "

"हो. तीच काल रात्री दिवाणखान्यात कॉफी घेऊन आली होती. काका त्या मुगुटाबद्दल सांगत असताना तिने ऐकले असणार. "

"अच्छा! तुम्हाला असे वाटते का, की रात्री तिने आपल्या याराला ही गोष्ट सांगितली असेल आणि मग त्या दोघांनी मिळून हा दरोडा घालायचा बेत आखला असेल? "

"पण मी आर्थरला चोरी करताना पकडलेय ना? मग आता या सगळ्या गप्पा कशाला मारताय तुम्ही लोक? " होल्डर साहेब न राहवून ओरडले.

"होल्डर साहेब, जरा थांबा. आपण त्या गोष्टीवर बोलणारच आहोत. बाईसाहेब, मी असे धरून चालतो की या मोलकरणीला स्वयंपाकघराच्या दारातून आत येताना काल रात्री तुम्ही बघितलेत? "

"हो. रात्री स्वयंपाकघराचे दार लावलेले आहे का हे मी बघायला गेले तेव्हा ती गुपचूप दारातून आत येत होती. बाहेरच्या अंधुक प्रकाशात मी तिच्या दोस्तालाही पाहिले. "

"तुम्ही ओळखता त्याला? "

"हो हो. आमच्याकडे नेहमी येणारा आमचा भाजीवाला आहे तो. त्याचं नाव फ्रान्सिस प्रॉस्पर. "

"तो दरवाज्याच्या डाव्या बाजूला उभा होता? दाराजवळ पण लगेच आत पाऊल टाकता येईल इतक्या जवळ नाही. थोड्या अंतरावर? " होम्सने विचारले.

"हो बरोबर आहे"

"त्याचा एक पाय लाकडाचा आहे का? "

हे ऐकताच मेरीच्या काळसर डोळ्यांमध्ये भीती दाटून आली. ती म्हणाली, " तुम्हाला पिशाच्च - जादू असले काही वश आहे की काय? तुम्ही कसे काय ओळखलेत? " ती हलकेच हसली. पण तिला प्रश्न विचारणाऱ्या होम्सच्या चेहऱ्यावर उत्तरादाखल हसू काही उमटले नाही.

"मला आता वरचा मजला तपासून पहायचाय̱. घराच्या अंगणाची आणि परसाची तपासणी अजूनही थोडी बाकी आहे. पण मला वाटते, आधी या खालच्या खिडक्या आपण तपासून पाहू या! "

असे म्हणून तरातरा चालत तो एकेका खिडकीपाशी गेला. फक्त हॉलमधून तबेल्याकडच्या गल्लीत उघडणाऱ्या खिडकीपाशी तो थांबला. ती खिडकी उघडून आपल्या मोठ्या भिंगातून त्याने बराच वेळ पाहणी केली. शेवटी एकदाचा तो म्हणाला, "हं. आता वर जाऊ या"

"होल्डरसाहेबांची कपडे बदलण्याची खोली लहानशी आणि साधी होती, खोलीत फार सामानसुमान नव्हते. एक करड्या रंगाचे जाजम, एक मोठे अनेक खणी कपाट आणि एक भला थोरला आरसा एवढ्याच वस्तू तिथे होत्या. त्या कपाटाजवळ जाऊन होम्सने त्याच्या अंगच्या कुलुपाची तपासणी केली.

"हे कपाट उघडायला कुठली किल्ली वापरली होती? "

"आर्थर म्हणाला होता तीच. बाहेरच्या खोलीतल्या कपाटाची किल्ली. "

"ती आहे का इथे? "

"ही काय या आरशाच्या टेबलावर आहे"

आरशाच्या टेबलावरची किल्ली उचलून होम्सने कपाटाचे कुलूप काढले.

""हे कुलूप उघडताना आजिबात आवाज होत नाही. त्याचमुळे तुम्हाला काल रात्री जाग आली नाही. आणि ही त्या मुगुटाचीच पेटी ना? आपल्याला तो मुगूट पाहणे गरजेचे आहे. " असे म्हणत होम्सने ती पेटी उघडली आणि आतला दागिना टेबलावर ठेवला. तो मुगुट म्हणजे अलंकार घडवणाऱ्याच्या कौशल्याचा एक अजोड नमुना होता. आणि त्याच्यावर बसवलेले छत्तीस खडे आजवर मी पाहिलेल्या खड्यांपैकी सर्वोत्कृष्ट होते यात काही वादच नाही. त्याच्या एका बाजूला मात्र एक मोठा चरा गेलेला होता आणि तीन खडे बसवलेला त्याचा एक तुकडा गायब होता.

"होल्डर साहेब, या मुगुटाच्या एका बाजूचा तुकडा हरवलेला आहे तसाच हा भाग आहे. हा बघा इथे हे तीन खडे आहेत. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आपल्या हाताने हा भाग तोडावा. "

होल्डर साहेब भीतीने दोन पावले मागे सरकले. "मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही. "

"ठीक आहे. मग मलाच हे केले पाहिजे. " होम्सने आपली सगळी शक्ती एकवटून तो तुकडा तोडायचा जोरदार प्रयत्न केला. पण व्यर्थ.

"तो भाग जरा हलला खरा. ही पाहा ही माझी बोटे. माझ्या बोटांमधे एरवी असते त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती आहे. तरीही हा तुकडा मोडायचा झाला तर मला कितीतरी वेळ शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. मग एखादा साधासुधा माणूस तर हे काम करूच शकणार नाही. आता मला सांगा होल्डरसाहेब, मी जर हा तुकडा तोडलाच तर काय होईल असे तुम्हाला वाटते? इथे बंदुकीतून गोळी झाडल्यासारखा जोरदार आवाज होईल. मग हे सगळे तुमच्यापासून केवळ हाताच्या अंतरावर घडले आणि तुम्हाला काहीसुद्धा ऐकू आले नाही? "

"मला काहीच कळत नाहीये. मी या सगळ्याबद्दल खूपच अंधारात आहे. "

" आपण हा अंधार जमेल तितका कमी करू या. तुम्हाला काय वाटते बाईसाहेब? "

"मीही माझ्या काकांइतकीच गोंधळून गेले आहे. "

"तुम्ही तुमच्या मुलाला पकडलेत तेव्हा त्याच्या पायात चपला - बूट काहीच नव्हते? "

"नाही. त्याच्या अंगावर फक्त शर्ट आणि पायजमा होता. "

"आपले दैव बलवत्तर आहे असेच म्हटले पाहिजे. आणि तरीसुद्धा हा गुंता आपल्याला सोडवता आला नाही, तर आपणच कर्मदरिद्री... होल्डर साहेब, माझे इथले काम झालेय. आता आपली परवानगी असेल तर मी बागेत आणखी काही गोष्टींची तपासणी करतो. "

त्याने आम्हाला घरातच थांबायला सांगितले. बागेत पावलांचे ठसे जितके कमी असतील तितके त्याचे काम सोपे होईल असे त्याचे म्हणणे होते. सुमारे तासभर तो बाहेरच होता. काम संपवून तो आत आला तेव्हा त्याचे पाय बर्फाने भरले होते आणि नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कसलाही अंदाज बांधणे अशक्य होते.

"होल्डर साहेब, माझे इथले काम संपले आहे. जे काही बघण्यासारखे होते त्याची पाहणी मी केली आहे. आता पुढचे काम मी माझ्या घरी गेल्यावरच करता येईल. " होम्स म्हणाला.

"पण होम्स साहेब, ते खडे? ते कुठायत? "

"ते काही मी सांगू शकत नाही"

"आता काही ते खडे मला परत मिळायचे नाहीत.. आणि माझ्या मुलाचे काय? मी त्याची आशा करायची का? " होल्डर साहेबांना दुःख असह्य झाले.

"माझं मत अजूनही तेच आहे. "

"मग सांगा तरी काल रात्री माझ्या घरी नेमका काय प्रकार घडला ते? "

"उद्या सकाळी नऊ ते दहा या वेळात तुम्ही माझ्या घरी आलात तर मी त्याबद्दल तुम्हाला नक्की सांगू शकेन. बरं, मला सांगा, ते खडे परत मिळवण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करायची तुमची तयारी आहे ना? "

"मी अगदी कफल्लक झालो तरी चालेल पण ते खडे परत मिळाले पाहिजेत. "

"हे उत्तम झाले. आता मी बघतो काय करायचे ते. गरज पडली तर आज दुपारी मी पुन्हा येईन तुमच्याकडे. "

काहीतरी अंदाज बांधण्याचे काम होम्सने पूर्ण केलेले होते हे उघड होते. पण हे अंदाज नेमके काय आहेत हे काही मला ओळखता येईना. आमच्या परतीच्या प्रवासात कैक वेळा मी त्याला याबद्दल प्रश्न विचारले. पण दर वेळी तो काहीतरी बोलून विषय एकदम तिसरीकडेच न्यायचा. शेवटी मीच कंटाळून तो नाद सोडला. आम्ही घरी पोचलो तेव्हा तीनचा सुमार होता. घरी आल्या आल्या होम्स घाईने आपल्या खोलीत निघून गेला. आणि काही क्षणातच वेष बदलून खाली आला. त्याने मवाल्याचं बेमालूम सोंग काढलं होतं. आपली कॉलर सरळ उभी करून. त्याने चकचकीत रंगाचा कोट घातलेला होता. गळ्यात लाल रुमाल बांधलेला होता आणि त्याचे बूट मात्र जुनाट होते. तो अगदी नमुनेदार दिसत होता.

"मला वाटते हे जमलेय नीट. वॉटसन, तू माझ्याबरोबर येऊ शकला असतास तर फार बरे झाले असते. पण मी ज्या कामगिरीवर निघालोय त्यामध्ये खरेच आशेला काही जागा आहे का नुसताच मृगजळाचा पाठलाग करावा लागणार आहे हे माझे मलाच सांगता येणार नाही. पण मला ते कळेल लौकरच. मला यायला वेळ लागेल. कदाचित दोनपाच तासही घालवावे लागतील. "

असं म्हणून टेबलावरच्या ब्रेडच्या दोन तुकड्यांचे त्याने सँडविच करून ते आपल्या खिशात टाकत तो आपल्या कामगिरीवर निघून गेला.

माझा दुपारचा चहा नुकताच संपला होता तेव्हा तो परत आला. स्वारी एकदम खुशीत दिसत होती. त्याच्या हातात एक जुनाट इलॅस्टिक लावलेला बूट होता. तो बूट गोल फिरवत फिरवत त्याने खोलीच्या कोपऱ्यापाशी ठेवला. मग टेबलावर बसत त्याने एका कपात चहा ओतून घेतला.

"मी माझ्या कामाला जाता जाता घरी डोकवायला आलो आहे! " तो म्हणाला.

"आता कुठे जाणारेस? "

वेस्ट एंडच्या पलिकडेपर्यंत मजल मारायची आहे. मला यायला चिकार उशीर होईल. त्यामुळे माझी वाट बघत बसू नकोस. "

"तपास कसा चाललाय? "

"मस्त चाल्लाय. मगाशी मी पुन्हा एकदा स्ट्रीटहॅमला जाऊन आलो. पण आत घरी मात्र गेलो नाही. हे प्रकरण छोटे आहे पण फारच रंजक आहे. मी काहीही झाले असते तरी ते माझ्या हातून सुटू दिले नसते. अरे पण मी इथे गप्पा छाटत काय बसलोय! मला हे कपडे बदलून पुन्हा एकदा माझा सभ्य वेष धारण केला पाहिजे"

त्याच्या एकूण आविर्भावाकडे बघून मला असे जाणवत होते, की तो वरवर दाखवतोय त्यापेक्षा मोठे यश त्याला मिळालेय. त्याचे डोळे लुकलुकत होते आणि त्याच्या खोल गेलेल्या, खप्पड गालांवर चमक दिसत होती. तो गडबडीने वर निघून गेला आणि थोड्याच वेळात हॉलचे दार लावून घेतल्याचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या आवाजाने होम्स पुन्हा एकदा आपल्या कामाला निघून गेला आहे हे मी ओळखले.

-- अदिति
(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या शेरलॉक होम्सच्या साहसकथांपैकी 'द बेरील कॉरोनेट' या कथेचा स्वैर अनुवाद)
क्रमशः

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतोय आणि पुढील भागाची वाटही पहात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

काय हे! अजुन एक भाग! Wink
वाचतोय.. येऊ दे पुढला भागा. अनुवाद अगदी म्हंजे अगदीच उत्तम झाला आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!