इन ट्रान्सिट...

टेंडरचे काम संपवून एअरपोर्टला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेच.मुंबईला जाणारी रात्री साडे नऊ वाजताची फ़्लाईट पकडायची म्हणजे आधीच उशीर झाला होता.गडबडीत ऒन्लाईन चेक-इन करता आले नव्हते.
ई-तिकिटावर कन्फ़मर्ड असे स्टेटस जरी दाखवत होते तरी मनात थोडी धाकधुक होतीच. सामानाचे स्कॆनिंग वगैरे सोपस्कार पार पाडून आत जातो तो काउंटर समोर हि भली मोठी रांग पाहून पोटात गोळाच आला.इतर फ़्लाइटना असलेली गर्दी पाहता इमिग्रेशन व सेक्युरिटी चेक संपवायला अर्धा एक तास सहजच लागणार होता.
साडे नऊ ची फ़्लाईट म्हणजे किमान नऊ वाजता बोर्डिंग करणे आवश्यक होते.आताशा माझा धीर सुटायला लागला होता. त्याला कारणही तसेच होते. ह्या फ़्लाईटने मला सकाळपर्यंत मुंबईला पोहोचणॆ आवश्यक होते. कारण मला बायको व लेकिला पुण्यावरून घेउन येउन दुस-यादिवशी पहाटे सिंगापुरची फ़्लाईट पकडायची होती.मुंबई-पुण्यात एकच दिवस हाताशी असल्याने बरीच कामे उरकायची होती.ऐन ख्रिसमसच्या सणासुदिच्या दिवसात कशीबशी पुढची विमानतिकिटे मिळवलेली . ती रद्द करून नवीन तिकिट काढणे परवडणारे नव्हतेच.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही फ़्लाईट पकडणे अत्यंत जरूरीचे होते.
काउंटरवर पोहोचे पर्यंत घडाळ्यात आठ वाजून पस्तीस मिनीटे झाली होती.
काऊंटरवरच्या युवतीने माझे तिकिट तपासून निर्विकार चेह-याने "सॊरी सर, यु आर टु लेट टु गेट इन टु थिस फ़्लाईट" असे सुनावले. "ऎण्ड धिस फ़्लाइट इज फ़ुल सर".
आता माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली होती.तिला पटवायचा प्रयत्न चालु झाला. कधी आरडाओरडा, कधी विनंती असे बराच वेळ चालले होते. परंतु मला ह्या विमानात जागा नाही ह्या विधानावर ती ठाम होती.शेवटि एअरलाईनच्या मॆनेजरला पाचारण करण्यात आले. त्यानेही माझे तिकिट पाहून मला तेच उत्तर दिले. मी देखील माझ्या मुद्द्यावर अडून होतो.
परत दोघांनी संगणकावर पाहून काहि चर्चा केली.
"नेक्स्ट फ़्लाईट टु इडिया टुमारो इव्हिनींग सर.इफ़ यु वॊंट आय कॆन पुट यु ऒन दॆट फ़्लाईट सर"-युवती व तिचा मॆनेजर.
च्याईला उद्याची फ़्लाईट घेउन मला काय करायचे होते?

"नो मि.मॆनेजर. आय कान्ट फ़्लाय़ टुमारो नाईट.आय हेव्ह टु फ़्लाय़ टू सिंगापुर द डे आफ़्टर अर्ली मोर्निंग फ़्रोम मुंबई.
आय हेव्ह टु बी इन मुंबई बाय टुमारो.बाय हुक ओर क्रुक." त्या मॆनेजरला माझा प्रोब्लेम परत एकदा समजावून सांगितला.
पुन्हा एकदा दोघांची गाढ चर्चा चालु झाली. त्यात अजुन दोघे तिघे जण सामील झाले होते.
आता घड्याळात नऊ वाजून गेले होते. त्यामुळे हि फ़्लाईट मला पकडता येणार नाही हे जवळपास पक्के झाले होते.त्यांमुळे आता जे काही होईल ते शांत पणे पहात रहाणेच फ़क्त माझ्या हाता मध्ये होते.
अजुनही मी काउंटर सोडलेले नव्हते. किमान अर्धाएक तास मला बाजुला उभे करण्यात आले. ब-याच वेळाने त्या मॆनेजरने मला एका दुस-याच काउंटरवर बोलावले.
"सोरी सर.धिस फ़्लाइट हॆज अल्र्रेडी डिपार्टॆड.वॊट बेस्ट वी कॆन डु इज वी विल पुट यु ऒन डिफ़रंट फ़्लाइट. सो देट यु कॆन रिच मुंबई बाय टुमारो.बट नॊट इन द मोर्निंग."
दे बाबा. कसेही करून मला उद्या मुंबईत पोहोचव.- इति मी.
मग त्या बाबाने मला बरेच से ओप्शन दिले. व्हाया दुबई,व्हाया बहारीन वगैरे वगैरे..
दोन्ही फ़्लाइटसने मी उद्या मुंबईत पोहोचणार तर होतो पण संध्याकाळी. तिथून पुढे पुणे व परत मुंबई हे तितकेसे जमण्यासारखे नव्हते. त्यातच तिकडून मुंबई कनेक्टिंग फ़्लाईट ही एअर इंडियाची असल्याने उशीर होण्याची़च शक्यता जास्त होती. माझा नकार मिळताच तो बाबा परत गायब झाला.

थोड्यावेळाने हा बाबा मग एक नवीन ऒप्शन घेउन आला.
"सर वी हॆव गोट वन मोर बट लास्ट ओप्शन फ़ोर यु.लकिली वी हॆव्ह गोट वन बिझिनेस क्लास सीट व्हेकंट इन रियाध फ़्लाईट.तुम्ही इथुन रियाधला जाउ शकता.तिकडून तुम्हाला सकाळच्या एअर इंडिया फ़्लाइटचे बुकिंग देतो. तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचु शकाल."

इथे माझ्या जीवात जीव आला. दुपारी बाराला मुंबई म्हणजे चारेक वाजेपर्यंत पुण्यात पोहोचु शकणार होतो. मी अगदी खुशीखुशीतच त्याला होकार दिला अन बोर्डिंग पास ताब्यात घेतले.
आता पुढच्या फ़्लाइट्ला थोडासा वेळ असल्याने एअरपोर्टावर ड्युटिफ़्री मध्ये फ़िरणे झाले. वेळ अन पैसा दोन्ही हाताशी असल्याने दारू,चॊकलेटस वगैरे खरेदी झाली.

पहाटेचे सुमारे २ वाजले होर्ते.
डोळा लागतो न लागतो तोच विमानाची रियाधला लॆंडिंगची घोषणा झाली.झोप अर्धवट झाल्याने कॊफ़ी व सिगारेटची जबर तलफ़ आली होती. पुढच्या विमानाला सुमारे साडेतीन तास अवकाश होता.त्यामुळे विमानतळावर निवांत कॊफ़ी वगैरे पिउन फ़्रेश व्हावे असा विचार करून मी विमानतळावरचे दिशादर्शक बोर्ड पहात पुढे चालु लागलो.
शेवटी चालत चालत आपण इमिग्रेशन पाशी आलो आहोत ह्याची जाणीव झाली.

आतापर्यंत ब-याच विमानतळांवर ट्रान्सिट मध्ये वावरलो होतो. इथे मात्र प्रकार भलताच होता. इमिग्रेशनच्या समोरच्या आवारात पंधरा एक खुर्च्या मांडलेल्या होत्या. इमिग्रेशन पाशी पोहोचताच एका पोलिसाने माझी चौकशी केली. मला पहाटेची मुंबईची फ़्लाईट पकडवायची असल्याने त्याने मला त्या मांडलेल्या खुर्च्यांवर बसायला सांगितले. मी बरोबरचे सामान तिथेच बाजुला ठेवून त्याच्या पुढच्या आदेशाची वाट पहात बसून राहीलो. काहिवेळाने दोन एक तुर्की जोडपी मला तिथे सामील झाली.

आताशा मला वैताग येउ लागला होता. कोणी काहीच सांगायला तयार नव्हते. ह्या पोलिस मामाचे इंग्रजी पाहता ह्याला मी सांगितलेले कळाले की नाही अशी शंका यायला लागली. काहि वेळाने तिथे एक बांग्लादेशी सफ़ाई कामगार आला. त्याच्याकडून असे कळाले की आम्ही जेथे बसलो होतो तोच ट्रान्सिट लाउंज? होता. पुढच्या विमानाची वेळ होई पर्यंत मला तेथून हलता येणार नव्हते. लाउंज कसला.... फ़ालतुपणाच होता. बसायला खुर्च्या सोडल्या तर तिथे आणिक काहिच नव्हते. चहा कॊफ़ी सोडाच तिथे प्यायचे पाणी देखील नव्हते. बाजुच्याच जिन्यापाशी एक टोयलेट होते.तेव्हढीच काय ती सोय.
समोरच इमिग्रेशन काऊंटरस होती. निरनिराळ्या विमानांचे प्रवासी येत होते. पंधरा एक मिनीटात इमिग्रेशन काउंटर रिकामे होत होते.तेव्हढीच काय ती करमणूक.

आता दुस-या विमानाचा कनेक्टिंग टाईम भलताच मोठा वाटू लागला होता. एकाच जागी बसून जाम पकायला झाले होते. पुढच्या विमानाला पाउण एक तास राहिला असताना एक माणूस आमच्या चौकशीला आला. माझा पासपोर्ट व तिकीट घेऊन हा बाबा कुठेतरी गायब झाला. आत्ता येईल मग येईल असे करत करत चांगली पंधरावीस मिनिटे गेली. आता मात्र काळजी वाटायला लागली होती. एकतर जवळ पासपोर्ट नाही. तिकिटाची एकमेव कॊपी होती ती पण आता माझ्याकडे नव्हती.इमिगेशनच्या मंडळींना काहिच माहीती नव्हती. त्यांचे आपले एकच उत्तर. जागेवर जाउन बसा. शेवटी विमानाच्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी हा बाबा माझा बोर्डिंग पास व पासपोर्ट घेउन अवतीर्ण झाला. व त्याने मला बरोबर चलायची खुण केली. त्याला पाहून मला फ़ारच हायसे वाटले. म्हंटले चला सुटलो.

मला बरेचसे जिने चढावयाला लावून शेवटी सेक्युरीटी चेक पाशी घेउन आला. पुन्हा एकदा सामानाची व माझी वैयक्तिक तपासणी झाली. चला झाले सगळे एकदाचे असे म्हणून कधी एकदा विमानात जाउन झोपतो असे मला झाले होते.
परंतु हा माझा मोठा गैरसमज होता. मुख्य नाट्य तर आता कुठे सुरु झाले होते.

आय वाज अबाउट टु बी डिटेन्ड..........

त्याला कारण माझ्याकडे असलेल्या ड्युटी फ़्री मध्ये घेतलेल्या दारुच्या बाटल्या.

मी दारुच्या बाटल्या बरोबर घेउन चाललो आहे हे सेक्युरिटी चेक मध्ये सापडले. अर्थात त्यात लपवण्यासारखे काही नव्हतेच. दारुच्या बाटल्या व चॊकलेटस नी माझी ड्युटी फ़्री बॆग भरलेली होती. ती बॆग तशीच स्कॆन केली होती.झाले.
स्कॆनिंग मशीनवर बसलेल्या माणसाने या आधी कधी दारुची बाटली पाहिलेली नसावी.त्याने ताबडतोब उठून येऊन दोन्ही बाटल्या ताब्यात घेतल्या. व चावट दिवाळि अंकावरच्या ललनेचे चित्र पहावे अशा उत्साहाने त्या तो पहायला लागला.

आता माझी ट्युब पेटायला लागली होती.
"शिट. आय एम इन सौदी. इथे दारु निषिध्द आहे." आतापर्यंत माझ्या हे डोक्यातच आले नव्हते. अगदी खरेदी करताना सुध्दा.

इकडे माझ्याकडे दोन दारुच्या बाट्ल्या आहेत हे बहुतेक सर्व सेक्युरिटी गार्डस,पोलीस कस्टम्स वगैरेच्या लोकांना कळाले असावे.

हा हा म्हणता तिथे पोलिस,सेक्युरिटी गार्डस इतर अधिकारी वगैरे पंधरा एक लोक जमा झाले.इंग्रजी तर एकालाही धड येत नव्हते. पुन्हा एकदा माझा पासपोर्ट व बोर्डिंग पास ताब्यात घेण्यात आला. चौकशी सुरु झाली. कुठून आलास? कुठे चाललास? दारु कुठे खरेदी केली? वगैरे वगैरे..प्रत्येक नवीन अधिकारी आला कि मला ह्या प्रश्नांची परत परत उत्तरे द्यावी लागत होती. जो तो येउन माझ्यावर गुरकावत होता.

आता मात्र माझा धीर सुटायला लागला होता. च्यायला आपण ह्या नसत्या लफ़ड्यात अडकलो असे वाटाय़ला लागले होते. पण त्यांच्या पुढे तसे घाबरल्यासारखे दाखवणे चालण्यासारखे नव्हते. अजूनच प्रोब्लेम मध्ये अडकण्याची शकयता होती.

मग मात्र मी एकच धोशा चालु ठेवला. "आय एम इन ट्रान्सिट. मला इथले नियम माहित नव्हते. माहित नाहित.जर का दारुच्या बाटल्या न्यायला परवानगी नसेल तर तुम्ही त्या ठेवून घ्या.पण माझा पासपोर्ट व बोर्डिंग पास परत द्या."

आताशा बरिच मंडळि जमा झाली होती. बाटल्यांचा पंचनामा सुरु होता. वेगवेगळ्या ऎंगल ने त्यांचे फ़ोटो काढणॆ चालु होते. परत परत तीच माहिती देउन मीहि वैतागलो होतो.

मला एका छोट्या ऒफ़िस मध्ये घेउन जाण्यात आले. तिथे पुन्हा तिच चौकशी.

मी आता पुरता ब्लॆंक होऊ लागलो होतो. मनातुन जाम घाबरलो होतो. किमान काहि वर्षे तरी आता जेल मध्ये जावे लागणार. किंवा सौदी कायद्या नुसार काहितरी भयानक शिक्षा होणार असले विचार मनात डोकावु लागले होते. तरिहि त्या अधिका-यांना अधिक काहि न बोलता मी माझा जुना ठेकाच कायम ठेवला होता.
पुन्हा एकदा त्या अधिका-यांची खाजगी चर्चा चालु झाली. शेवटी मी काय म्हणतोय ह्याची त्यांना खात्री पटली असावि. सौदी मध्ये ह्या आधी मी कधीच आलो नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. आताहि मी ट्रान्सिट मध्येच होतो. त्यामुळे पासपोर्टवर सौदी इमिग्रेशनचा शिक्का वगैरे नव्हताच.

मी तर ह्या बाटल्या जप्त झाल्या असेच समजून चाललो होतो. च्यायला टेंशन त्या बाटल्यांचे नव्हतेच. इथून सहिसलामत सुटणे आवश्यक होते. च्याईला मी सलामत तर बाटल्या पचास असाच मामला होता.
आता हि मंडळी काय निर्णय घेतात ह्याची वाट पहात बसून होतो. फ़्लाईटची वेळ ही जवळपास झालीच होती. अजूनही माझा पासपोर्ट त्यांच्याच ताब्यात होता. स्साला पुढे काय होणार काहीच कळत नव्हते.

शेवटी एक वयस्कर दिसणारा अधिकारी माझ्याकडे आला. व मला घेउन परत सिक्युरीटी काउंटरवर आला. माझी हॆंडबॆग परत तपासण्यात आली. पासपोर्ट परत तपासण्य़ात आला. इस्त्राईलला वगैरे कधी गेला होतास का वगैरे विचारण्यात आले. मी स्पष्ट्पणे नाहि म्हणून सांगितले. तशी कुठलीच नोंद पासपोर्टवर नव्हतीच. आता ह्या भानगडित इस्त्राईलचा काय संबंध होता ते तोच जाणे.

आता पुढे काय असा प्रश्न होताच. तोच त्या बाबाने त्या दोन्ही बाटल्या माझ्या हॆंडबॆगेत भरल्या व भरलेली हॆंडबॆग माझ्या ताब्यात दिली व माझा पासपोर्ट व बोर्डिंग पास घेउन मला एअर इंडियाच्या काउंटरवर नेण्यात आले. बरोबर ५-६ अधिकारी होतेच. विमानात जाणारा मी शेवटचाच प्रवासी शिल्लक होतो. मला एअरपोर्ट अधिका-यांच्या बरोबर पाहून काहितरी भानगड आहे हे त्यांच्या लक्षात आलेच होते.

आता एअर इंडिया चे अधिकारी अन हे एअर पोर्टचे अधिकारी ह्यांची चर्चा सुरु झाली.
आता मी बराच रिलॆक्स झालो होतो. आपण इथून सहिसलामत सुटतोय ह्याची जवळपास खात्री पटू लागली होती. ह्यांची चर्चा चालु आहे ते पाहून बाजुचीच एक सीट पकडून लांबून ह्यांची चर्चा ऐकत बसलो. च्यायला कळत तर काहिच नव्हते. कारण सर्व अरेबिक मध्येच चालले होते. मी लांब बसलेलो आहे हे पाहून मगाशी माझ्यावर गुरकावणारे बरेचसे अधिकारी माझ्याकडे आले. आता ही मंडळी अजून काय विचारणार ह्याचा विचार करू लागलो. त्यांनी मला परत माझी हॆंडबॆग उघडवायला लावली. दोन्ही बाटल्या हाताळून पाहिल्या.
अन माझ्याक्डे डोळे मिचकावीत एकाने सुरु केले. यु गोट वेरी गुड चॊइस. वेरि गुड ड्रिंक.
कॆन आय टेक धिस फ़ॊर मी?
आता उडायची पाळी माझी होती.
बाबारे मगाशी तुम्हाला दोन्ही बाटल्या अर्पण केल्या होत्या तेंव्हा तुम्ही मला सौदी च्या कल्चरबद्दल भाषण देत होता. अन आता इकडे येउन हि शाळा.? अर्थात हे सर्व स्वगतच होते.

"इटस माय प्लेजर सर. तुम्हाला हवी ती बाटली घ्या.परंतु तुम्ही हि बाटली नेणार कशी? उगाच पकडली वगैरे गेली तर लोच्या होईल." - मी

अशी आमची चर्चा सुरु असतानाच त्यांना तिकडून बोलावणॆ आले. अन तो विषय़ तसाच राहून गेला होता.

तिकडे हा माणूस मुंबईला जाणार असून ह्याच्या बॆगेत दारुच्या बाट्ल्या आहेत. तेंव्हा हि बॆग कार्गो मध्ये टाकली तरच आम्ही ह्याला बोर्डिंग करु देउ असा सुर विमानतळ अधिका-यांनी लावला होता.

विमान सुटायला आले होते अन आता कुठे कार्गोला ही बॆग पाठवायची अश्या पेचात विमान अधिकारी पडले होते.

हो नाही करता करता शेवटी एअर इंडियाच्या अधिका-याने हि बॆग केबिन बॆगेज मध्येच ठेवण्यात येईल व सौदी एअरस्पेस पार होई पर्यंत ह्यातली दारू मला पिउ दिली जाणार नाही (आयला जसा काय मी कधी हि बाटली फ़ोडून तोंडाला लावतोय अश्याच थाटात बसलो होतो.) वगैरे लेखी दिले.

त्या कागदावर सर्वांच्या सह्या झाल्या. माझा पासपोर्ट नंबर वगैरे माहीती त्यात लिहिण्यात आली.

सर्वात शेवटी माझी सही झाली. त्यातला सौदी एअरस्पेसचा उल्लेख वाचून मला हसावे कि रडावे तेच कळेनासे झाले.
शेवटी कसाबसा विमानात दाखल झालो. दारातल्या एअरहोस्टेस फ़ार कौतुकाने माझ्याकडे पहात होत्या असे उगाचच मला वाट्त होते. माझ्यापायी विमान तास एक भर लेट झाले होते. इतक्या उशीरा येणारा कोण हा टिक्कोजीराव ह्याच थाटात बाकी सर्वजण माझ्याकडे पहात होते.

मी बॆग वरच्या कप्प्यात ठेवून जागेवर स्थानापन्न झालो तोच मगाचचा मुख्य कस्टम्स अधिकारी मला शोधत आला. व भाईने डायरेक्ट हि दारूची बाटली बक्षिस म्हणून मागितली. त्याला बोटानेच दाखवले. कि बॆग वरती कप्प्यात आहे. हवे असेल तर बॆग उघड अन हाताने घे. मला स्वहस्ते बाट्ली त्याला देउन पुन्हा कुठल्याही भानगडीत पडायचे नव्हते. कारण सौदी मध्ये दारु बाळगणे हा गुन्हा असतोच परंतु कुणी सांगावे च्यायला दारु पुरवली म्हणून परत अडकवायचे.

सगळ्यांसमोर बॆगेतून दारू काढून न्यायची त्याची हिंमत झाली नसावी. बिचारा हिरमुसला होउन गेला.

शेवटी एकदाचे विमान सुटले अन मी एअर होस्टेसला ऒर्डर दिली "वन लार्ज रेड लेबल". अर्थात ते हि सौदि एअरस्पेसच्या बाहेर आल्यावरच. Smile

एक लक्षात आले कि मला भिडणा-या सर्वच सौदीच्या अधिका-यांना त्या बाटल्या हव्या होत्या. कधीही दारू पहायला मिळत नसल्याने अशी अवस्था होत असावी. धर्माचे बंधन असले तरी पुरुषाला असल्या गोष्टिंचे आकर्षण असतेच. अन सौदी सारख्या रुक्ष देशात धर्माच्या नावाखाली हि मंडळी खरच कशी झुरत असतील ह्याची जाणीव झाली.
असो, ह्यातून एकच धडा शिकलो
"नेव्हर फ़्लाय थ्रु सौदि एअर स्पेस व्हेन यु वॊन्ट टु ड्रिंक" Wink

--------------------------------------------------------------------------------
हा मजकुर बरहा प्रणालीत टंकित केला असल्याने काहि ठिकाणी वाचताना त्रास होण्याची शक्यता आहे.

field_vote: 
0
No votes yet