किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (उत्तरार्ध)

अणुशक्तीकेंद्रांमधून बाहेर पडणार्‍या प्रत्यक्ष किरणोत्सारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले गेले असले तरी याला दुसरी एक बाजू आहे. रिअॅक्टरमध्ये निर्माण होत असलेल्या ऊष्णतेचा उपयोग करून त्यापासून वीज तयार करण्यासाठी या ऊष्णतेला बाहेर काढणे आवश्यक आहे. रिअॅक्टरमधून सतत वाहणारे शीतलक (कूलंट) पाणी या ऊष्णतेला बाहेर नेते. ते काम करत असतांना शीतलकावरसुध्दा न्यूट्रॉन्सचा परिणाम होऊन ते पाणीसुध्दा किरणोत्सारी बनते. रिअॅक्टरमधून बाहेर काढलेले वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कमालीचे रेडिओअॅक्टिव्ह असते. शिवाय त्यामधून एवढी जास्त ऊष्णता बाहेर पडत असते की विद्युतकेंद्र बंद असले तरीही त्या इंधनाला थंड करण्यासाठी त्यामधून पाण्याचा प्रवाह चालत रहावा यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. या दोन्ही प्रकारच्या पाण्यांमध्ये रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांचे कण मिसळलेले आणि विरघळलेले असल्यामुळे ते किरणोत्सारी असते. हे पाणी क्षेपक(पंप), उष्णता-विनिमयक(हीट एक्स्चेंजर्स) आदि उपस्करांमधून (इक्विपमेंट्समधून) फिरत असते. निरनिराळ्या गाळण्यां(फिल्टर)मधून तसेच आय़ॉनएक्स्चेंजर्समधून त्याचे शुध्दीकरण केले जाते, तेंव्हा हा रेडिओअॅक्टिव्ह कचरा त्यात जमा होतो. याखेरीज रिअॅक्टरच्या सान्निध्यात येणारी यंत्रे, उपकरणे, पाण्याचे पाइप, टाक्या वगैरे सर्वच गोष्टी रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांच्या संसर्गाने दूषित (काँटॅमिनेटेड) होत असल्याने त्यांना वेळोवेळी स्वच्छ (डिकाँटॅमिनेट) करावे लागते. कधी कधी त्या बदलाव्याही लागतात. यातून उत्पन्न झालेल्या सर्व किरणोत्सारी कचर्‍याची विल्हेवाट अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. त्यासाठी प्रत्येक अणूशक्तीकेंद्रात एक मोठा वेस्ट मॅनेजमेंट विभाग असतो. केंद्रामधून बाहेर सोडल्या किंवा टाकल्या जाणार्‍या प्रत्येक पदार्थाची चाचणी करून त्याची उच्च, मध्यम आणि निम्न पातळीचा कचरा (हाय, मीडियम व लो लेव्हल वेस्ट) यात विभागणी केली जाते. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची व्यवस्थित नोंद ठेवूनच नियमानुसार त्याची योग्य प्रकारे वासलात लावली जाते.

पण काही कारणाने त्यातून काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये पर्यावरणात मिसळली गेली तर ती हवा, पाणी, अन्न यामधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. शरीरात जाऊन त्याचा भाग बनलेली किरणोत्सारी द्रव्ये अल्फा किंवा बीटा रे यांचे प्रक्षेपण करत असतील तर ते किरण शरीराच्या आतल्या इंद्रियांवर प्रभाव टाकू शकतात. चेर्नोबिलच्या अपघातात रिअॅक्टर व्हेसल आणि बिल्डिंगचे छप्पर उडून त्यांच्या आतील किरणोत्सारी द्रव्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून इतरत्र पसरली आणि त्यांच्यामुळे अशा प्रकारे बरीच हानी झाली. फुकुशिमा येथील अपघातात त्यांचे प्रमाण प्रत्यक्षात मर्यादेच्या फारसे पलीकडे गेले नव्हते, शिवाय खूपशा प्रतिबंधक उपाययोजना केल्या गेल्या. त्यामुळे तिथे झालेल्या किरणोत्सारामुळे कोणीही दगावले नाही किंवा पंगू झाले नाही. पण कदाचित तसे होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि प्रतिबंधक उपाय म्हणून लाख दोन लाख लोकांचे त्या भागामधून स्थलांतर करावे लागले होते. त्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागला. थ्री माइल आयलंडमध्ये यातले काहीच झाले नाही. बाहेर सारे आलबेल राहिले. फक्त रिअॅक्टरचा सत्यानाश झाल्यामुळे आर्थिक नुकसान तेवढे झाले. जगामधील इतर सुमारे चारशे रिअॅक्टर्समध्ये इतक्या वर्षांत अशी आणीबाणीची वेळ कधी आली नाही. एकंदरीत पाहता अणुऊर्जाकेंद्रांचा सुरक्षेतिहास (सेफ्टी रेकॉर्ड) इतर कोणत्याही उद्योगापेक्षा खूप चांगला राहिलेला आहे.

वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कुठे ठेवायचे हा एक सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याला अनेक बाजू आहेत. औष्णिक केंद्रांमधील कोळशाची राख पूर्वी एका मोठ्या उघड्या खड्ड्यात टाकून दिली जात असे, पण आता पर्यावरणावरील प्रभाव पाहता इतर कामांसाठी तिचा उपयोग करणे सक्तीचे झाले आहे. अणुऊर्जेमधले स्पेंट फ्यूएल अत्यंत किरणोत्सारी असल्यामुळे ते असे उघड्यावर टाकूनही देता येत नाही किंवा इतर कामांसाठी त्याचा उपयोग करूनही घेता येत नाही. ते एका अभेद्य अशा कवचात गुंडाळून जमीनीखाली खोलवर पुरून ठेवणे हा एक उपाय आहे आणि काही प्रमाणात तो अंमलात आणला जात आहे. पण तो तरी किती सुरक्षित आहे? शतकानुशतकानंतर ते कवच असेच अभेद्य राहणार आहे का? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यांची खात्रीलायक तसेच व्यावहारिक (प्रॅक्टिकल) उत्तरे शोधण्यासाठी सर्वत्र संशोधन चालले आहे. कोळसा जळून गेल्यानंतर त्यातून धूर निघतो आणि राख शिल्लक राहते, त्यानंतर न जळलेला फारसा कोळसा शिल्लक रहात नाही. पण अणूइंधनाची गोष्ट वेगळी असते. सध्याच्या तंत्रज्ञानाप्रमाणे ऱिअॅक्टरमध्ये घातलेल्या युरेनियमपैकी जेमतेम एकादा टक्काच खर्च होतो. त्यामधून बाहेर काढलेल्या इंधनातसुध्दा त्यातले निदान ९८ - ९९ टक्के युरेनियम शिल्लक असते आणि नवे तंत्रज्ञान विकसित झाल्यास भविष्यात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे आजचे स्पेंट फ्यूएल हा उद्याचा उपयुक्त असा कच्चा माल या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. ते सांभाळून ठेवण्यात सध्या तरी काहीच तांत्रिक अडचणही नाही. ते जर अतिरेक्यांच्या हाती लागले तर त्याचा दुरुपयोग होईल वगैरे शंका इतर कित्येक गोष्टींच्या बाबतीतसुध्दा काढता येतील. सध्या तरी ते इंधन कडेकोट बंदोबस्तात सांभाळून ठेवणे एवढाच चांगला उपाय आहे.

मोटारीचा किंवा साखरेचा कारखाना चालत असतांना काही आपत्ती उद्भवली तर त्यातील सारी यंत्रे बंद करून ठेवता येतात, पण अणुविद्युतकेंद्र असे बंद करता येत नाही. त्यामध्ये चालत असलेली अणूंच्या विखंडनाची क्रिया कंट्रोल रॉड्सद्वारा पूर्णपणे थांबवली तरी आधीच्या विखंडनातून निर्माण झालेले नवे अणू अत्यंत उद्दीप्त (एक्सायटेड) झालेले असतात आणि त्यांच्या गर्भामधून ऊष्णता बाहेर पडतच राहते. ती हळू हळू शून्यावर येण्यास काही दिवस लागतात. तोपर्यंत अणुभट्टीला थंड करत राहणे अत्यंत आवश्यक असते. या वर्षी फुकुशिमा येथे झालेल्या अपघातात दुर्दैवाने हे काम करता आले नाही. त्यामुळे रिअॅक्टरमधील पाण्याचे तपमान वाढत जाऊन त्याची वाफ झाली, त्याचा दाब वाढला, इंधनाचे तपमान वाढतच गेल्याने त्या पाण्यामधून हैड्रोजन वायू बाहेर पडला, तो रिअॅक्टर व्हेसलच्या बाहेर येऊन बिल्डिंगमध्ये जमा झाला आणि तेथील हवेशी त्याचा संयोग होऊन स्फोट झाला. असे काही विपरीत घडू नये यासाठी तप्त इंधनाला थंड करण्याच्या अनेक प्रकारच्या पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवलेल्या असतात आणि त्या आपले काम व्यवस्थित रीत्या सांभाळतात. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात शेकडो रिअॅक्टर हजारो वेळा सुरळीतपणे बंद आणि सुरू झाले आहेत. या काळात फक्त तीन दुर्घटना घडल्या. थ्री माइल आयलंडमध्ये एका चुकीच्या निर्णयामुळे ही पर्यायी यंत्रणा थांबवली गेली. यापुढे कोणत्याही चालकाला (ऑपरेटरला) तसे करताच येणार नाही अशी तरतूद त्यानंतर करण्यात आली आहे. चेर्नोबिल या एका वेगळ्या प्रकारच्या रिअॅक्टरमध्ये ती यंत्रणा एरवी काम करायची, पण दुर्घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीमध्ये ती अपुरी पडली. त्या प्रकारचे रिअॅक्टर आता उभारले जात नाहीत. फुकुशिमामध्ये आलेल्या ऐतिहासिक सुनामी आणि भूकंपानंतरसुध्दा आधी सारे रिअॅक्टर त्या धक्क्यातून वाचले होते पण सुनामीने माजवलेल्या अनपेक्षित हाहाःकारात एकाच वेळी चारही पॉवर प्लँट्स बंद पडले, डिझेल इंजिने आणि डिझेलचे साठे महापुरात बुडाले, बाहेरून वीज आणणारे विजेचे खांब पडले, रस्ते उध्वस्त झाले, यामुळे बाहेरून मदत मिळणे अशक्य झाले. रिअॅक्टर्सना थंड ठेवणारी यंत्रणा राबवण्यासाठी जी यंत्रसामुग्री चालावी लागते तिलाच वीज मिळेनाशी होऊन ही पर्यायी व्यवस्था कोलमडल्यामुळे रिअॅक्टरमधील इंधन तापत गेले. अशी अनेक संकटे एकदम आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवत गेली. आतापर्यंत ज्या दुर्घटना घडल्या त्यांच्यापासून धडे घेऊन सुधारणा होत आलेल्या आहेत, आता फुकुशिमा येथील घटनाक्रमाचाही विचार करून भविष्यात यावरही मात केली जाईल.

मोटार किंवा साखर कारखाना जेंव्हा अखेर बंद पडतो तेंव्हा तिथली सगळी जुनी यंत्रसामुग्री काढून टाकून त्या जागी आणखी काही करता येते. पण अणूशक्तीकेंद्राच्या बाबतीत तसे करता येत नाही. त्या केंद्रामधील यंत्रसामुग्रीच नव्हे तर मुख्य इमारतीसुध्दा दूषित झालेल्या असतात. त्यातील प्रत्येक गोष्ट वेगळी करून, तिला काळजीपूर्वक तपासून त्या सर्वांची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. याला डीकमिशनिंग असे म्हणतात. हे कामदेखील स्वयंचलित यंत्रांच्या सहाय्याने दूर राहून करावे लागते. यासाठी भरपूर खर्च तर येतो, पण त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. इथल्या वस्तू भंगार म्हणूनसुध्दा विकता किंवा वापरता येत नाहीत. तिथल्या मातीतसुध्दा काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये मुरलेली असल्यामुळे ती जमीन सहजासहजी इतर कामासाठी उपयोगात आणण्यात अडचणी येण्याची मोठी शक्यता असते. पहिल्या पिढीमधील न्यूक्लियर पॉवर स्टेशन्स आता या अवस्थेला पोचली आहेत. हा वायफळ खर्च करण्यासाठी खाजगी कंपन्या तयार नसतील किंवा त्याच बंद पडल्या तर त्यासाठी कोण पैसे देईल ? या मुद्द्यावर वादविवाद चालले आहेत. भारतामध्ये आतापर्यंत बांधलेली सर्व अणूविद्युत केंद्रे सरकारच्याच किंवा सरकारी कंपनीच्या मालकीची असल्यामुळे ती सरकारचीच जबाबदारी पडते. पेन्शन फंडासारखी काही आर्थिक तरतूद डीकमिशनिंगसाठी सुरुवातीपासून केली तर त्यामधून भविष्यकाळात निधी जमा होऊ शकेल. सध्या तरी जुनी केंद्रे चालतील तेवढी चालवत रहायची असे धोरण अवलंबले जात आहे.

"अॅटॉमिक रिअॅक्टर आणि अॅटम बाँब या दोन्हींमध्ये अणूचे विघटन या एकाच क्रियेचा उपयोग होत असल्यामुळे अणुशक्तीकेंद्रात कोठल्याही क्षणी आण्विक विस्फोट होऊ शकतो" अशी बेछूट विधाने काही सुशिक्षित लोक करतांना दिसतात. पण या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या रचना संपूर्णपणे निराळ्या असतात. बिरबलाने झाडाच्या उंच फांदीवर टांगलेल्या मडक्यातली खिचडी कदाचित कधीतरी शिजेलही, पण अणुभट्टीचे रूपांतर अणूबाँबमध्ये होण्याची शक्यता तेवढीही नसते. अणुविद्युतकेंद्र सुरू केल्यानंतर त्याची शक्ती(पॉवर) शून्यापासून क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी अणूविघटन क्रिया थोडी तीव्र करावी लागते आणि त्याची व्यवस्था केलेली असते. पण जर ती क्षमतेच्या पलीकडे जाऊ लागली, किंवा जास्तच वेगाने वाढायला लागली तर आपोआप ती ताबडतोब पूर्णपणे बंद पडावी अशी व्यवस्था असते. रिअॅक्टर बंद पडला तरी चालेल, पण तो अनियंत्रित होता कामा नये या पायावर त्याची नियंत्रक यंत्रणा (कंट्रोल सिस्टिम) उभारलेली असते. त्यामुळे अपघाताने तर नाहीच, पण घातपाती कृत्याने सुध्दा असे होऊ शकत नाही.

एवढे गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) विवरण झाल्यानंतर आता थोडी महत्वाची आकडेवारी पाहू.

खोलीमध्ये लख्ख उजेड आहे की अंधुक प्रकाश आहे, ताटातला भात ऊन ऊन आहे की गारढोण आहे हे कोणीही न सांगता आपल्याला समजते. मात्र आपल्या शरीरातून कितीही क्ष किरण आरपार गेले तरी आपल्याला त्यांचा पत्ता लागत नाही. प्रयोगशाळांमध्ये आढळलेल्या काही अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घटनांची कारणे शोधतांना शास्त्रज्ञांना अदृष्य किरणांचे अस्तित्व समजले आणि मग तशा प्रकारच्या परिणामांवरून त्यांचे मोजणे सुरू झाले. या किरणांमधील ऊर्जेचा विचार करून राँट्जेन नावाचे एकक (युनिट) पूर्वी ठरवले गेले. पण हे किरण कोणत्याही पदार्थाच्या आत शिरले आणि पुन्हा बाहेर पडले तर त्यांच्याकडे बरीच ऊर्जा शिल्लक असते. अर्थातच त्यामधील जेवढी ऊर्जा या प्रवासात खर्च झाली तेवढ्याचाच परिणाम त्या पदार्थावर होणार. याचा विचार करून रॅड (radioactivity absorbed dose) हे वेगळे युनिट बनवले गेले. पण निरनिराळ्या प्रकारच्या रेडिएशनमुळे होणारे हे परिणाम प्रत्येक पदार्थांच्या बाबतीत वेगळे असतात. माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आपल्या दृष्टीने महत्वाचे असतात. यासाठी रेम (Roentgen equivalent man) हे एकक वापरले जाते. वरील अमेरिकन युनिट्सच्या ऐवजी आता ग्रे(Gy) आणि सीव्हर्ट(Sv) ही आंतरराष्ट्रीय एकके इतर देशांमध्ये सर्रास उपयोगात आणतात. पण अमेरिकेत अजूनही पौंड, मैल आणि गॅलन चालतात, त्याच प्रमाणे या बाबतीतसुध्दा ते आपली जुनीच युनिटे वापरतात. या दोन्हींमध्ये १०० पटींचा फरक आहे. १ ग्रे म्हणजे १०० रॅड आणि एक सीव्हर्ट म्हणजे १०० रेम होतात. पण ही मूल्ये उपयोगाच्या दृष्टीने फार मोठी असल्यामुळे मायक्रोसीव्हर्ट (μSv) आणि मिलिरेम (mrem) या युनिट्समध्ये नेहमीचे काम चालते. मायक्रो म्हणजे दहालक्षांश आणि मिनि म्हणजे सहस्रांश असल्यामुळे १ मिलिरेम (mrem) म्हणजे १० मायक्रोसीव्हर्ट (μSv) होतात. आता या युनिट्समधील काही आकडेवारी पाहू.

नैसर्गिक किंवा पार्श्वभूमीवरील किरणोत्सारामुळे मिळालेला सरासरी वार्षिक डोस (The average 'background' dose of natural radiation)
जागतिक सरासरी २.४ मिलिसीव्हर्ट (mSv) - स्थानिक पातळ्या १ पासून १० मिलिसीव्हर्ट (mSv)
अमेरिका ३६० मिलिरेम mrem -- ३.६ मिलिसीव्हर्ट (mSv) -- काही ठिकाणी १००० मिलिरेम -- १० मिलिसीव्हर्ट (mSv)

जास्तीच्या मानवनिर्मित डोससाठी आयसीआरपी या जागतिक संस्थेच्या वार्षिक मर्यादा बहुतेक सर्व राष्ट्रे पाळतात. त्या अशा आहेत
नेहमीसाठी - कामगारांसाठी २० मिलिसीव्हर्ट (mSv) - ५ वर्षांची सरासरी
जनतेसाठी १ मिलिसीव्हर्ट (mSv) किंवा १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)
आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये - कामगारांसाठी १०० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv)
जनतेसाठी २० ते १०० मिलिसीव्हर्ट (mSv)
या मर्यादा फक्त अणुकामगारांसाठी नसून त्या इस्पितळे, कारखाने, खाणी, हवाई वाहतूक इत्यादी सर्व संबंधित क्षेत्रांसाठी आहेत.

भारतीय रिअॅक्टर्सचा अनुभव -
जनतेसाठी - जुने रिअॅक्टर्स - प्रतिवर्ष ७ ते ३० मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे १३
नवे रिअॅक्टर्स- प्रतिवर्ष ०.३ ते ७ मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे २
एईआऱबी आणि आयसीआरपी मर्यादा १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)
कामगारांना मिळालेला सरासरी डोस - ०.३ ते ४ मिलिसीव्हर्ट (mSv)
एईआऱबी व आयसीआरपी मर्यादा २० मिलिसीव्हर्ट (mSv)

किरणोत्साराचा माणसाच्या आरोग्यावर पडणारा प्रभाव पाहू.
० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv) - काही नाही - रेफरन्स डोस
१००० ते २००० मिलिसीव्हर्ट (mSv) - तात्पुरता थकवा
२००० ते ३००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - महिना ते वर्षभरात पुन्हा ठीक
३००० ते ६००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - मृत्यूची शक्यता
६००० ते १०००० मिलिसीव्हर्ट (mSv) - भीषण थकवा - निश्चित मृत्यू
अमूक इतक्या रेडिएशन डोसमुळे कँसर होतो अशी काही आकडेवारी उपलब्ध नाही. सगळ्याच किरणोत्सारामुळे, अगदी नैसर्गिक कारणामुळेसुध्दा, तो होण्याच्या शक्यतेची टक्केवारी थोडीशी वाढते. प्रदूषण, रासायनिक खते, जंतूनाशके, वलस्पती तूप, सेलफोन, पिझ्झाबर्गरसारखे फास्ट फूड वगैरेंमुळे सुध्दा ती वाढते असे सांगितले जात असते. हिरोशिमा आणि नागासाकीवरील बाँबहल्ले आणि चेर्नोबिल येथील अपघात यामध्ये ज्या लोकांना एकाच वेळी खूप मोठा डोस मिळाला त्यामधील थोड्या लोकांना (प्रत्येकाला नाही) नंतर कँसर झाला. त्यामुळे असा तीव्र किरणोत्सार मात्र काही प्रमाणात तरी घातक आहेच असे म्हणता येईल आणि त्यापासून सावध राहण्याची काळजी घेतली पाहिजे.

वरील डोसची आकडे वारी आणि परिणामांची माहिती यावरून असे दिसते की जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १००० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.
कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.
भारतामधील जनतेला प्रत्यक्षात मिळत असलेला डोस वरील मर्यादांच्या एक शतांश इतका कमी आहे आणि नैसर्गिक डोसच्या मानाने १ ते ५ टक्के एवढाच आहे.
कामगारांना मिळणारा डोस मर्यादेच्या एक पंचमांश ते एक पन्नासांश आणि सुमारे सरासरी नैसर्गिक डोसच्या एवढाच आहे. केरळसारख्या राज्यात काही ठिकाणी भूगर्भात थोरियम मिळते. त्या भागातला नैसर्गिक डोसच याहून काही पटीने जास्त आहे. त्या भागात वास्तव्य करण्यापेक्षा रिअॅक्टरवर काम करणे अधिक सुरक्षित आहे असे मानावे लागेल. पण त्या भागातल्या लोकांना रेडिएशनशी संबंधित काही व्याधीच होत नाहीत. यावरून जो बोध मिळतो तो घ्यावा.

आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुध्दा जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १० ते ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.
कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या १ ते १० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो. त्याच्याही दोनतीनपटीवर गेल्यास तो घातक ठरतो.
पण अशी परिस्थिती चेर्नोबिलनंतर गेल्या पंचवीस वर्षात कोठेही कधी उद्भवली नाही,

मला वाटते की हे आकडे पुरेसे बोलके आहेत. आता अणुशक्तीमुळे होत असणार्‍या किरणोत्साराला घाबरायचे की नाही हे आपल्यावर आहे. आदिमानव साध्या आगीलासुध्दा भीत असे, आजसुध्दा आगीमध्ये होरपळून मरणाच्या बातम्या रोज वाचायला मिळतात, पण एकंदरीत पाहता मानवाने अग्नीच्या भयावर विजय मिळवला आहे. धीटपणे आणि सावधपणे त्याचा उपयोग करून त्याने आपले पूर्ण जीवन बदलून टाकले आहे. किरणोत्साराच्या बागुलबुवाला घाबरून अणुशक्तीचा उपयोग करणेच टाळायचे की आवश्यक तेवढी सावधगिरी बाळगून तिचा उपयोग करून घ्यायचा हे आपणच ठरवायचे आहे. रे़डिओअॅक्टिव्ह कचर्‍याच्या आणि डीकमिशनिंगच्या व्यवस्थापनात अजून त्रुटी आहेत, त्या दूर करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी एका चांगल्या पर्यायाकडे पाठ फिरवावी का? औष्णिक ऊर्जा आणि जलविद्युत यामध्येसुध्दा काही अडचणी आहेत आणि दिवसेदिवस त्या वाढत जाणार आहेत. सौर ऊर्जा आणि पवनऊर्जा हे स्वच्छ विकल्प असले तरी अजूनही ते परवडण्यासारखे झालेले नाहीत किंवा तसे होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. मुख्य म्हणजे आज आपल्याला विजेची इतकी गरज आहे आणि ती वाढत जाणार आहे की त्यासाठी 'हे किंवा ते' असे करण्यापेक्षा 'हे आणि ते' असे करण्याची आवश्यकता आहे. याचाही विचार व्हायला हवा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

अणुशक्तीकेंद्रांमध्ये काम करणार्‍यांकडे एक सिगरेटच्या आकाराचे एक नळकांडे असणारे मोजणी यंत्र असते त्याचा फोटो पाहिल्याचे आठवते. मिळाला तर बघतो. छान लेख.
मानवाला प्रगती करायची असेल तर अणूउर्जेला पर्याय नाही हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

दोन्ही भाग आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साध्या भाषेतला,सुटसुटीत लेख आवडला.
एक शंका:- जर्मनी व इतर काही प्रगत,धनवान देश झपाट्याने अणूर्जेवर अवलंबून राहणे कमी का करत आहेत? पाचेक दशकात सध्याच्या क्षमतेच्या पाचेक टक्केही अणूऊर्जा कार्यरत ठेवायची नाही असे काहिसे त्यांचे उद्दिष्ट आहे म्हणे. ते का आहे?

सध्या जी फ्रान्स ची कंपनी भारतात येत आहे ती काही ह्या क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी नाही.त्यांचे उत्पादनाचा कुठेही प्रत्यक्षात वापर झालेला नाही अशा स्थितीत आपण ते घ्यावे का?

भारतात सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी खरोखर उत्तम आहे का?
भोपाळ वायुपीडितांचे काय झाले?
जो अणुप्रकल्प होनार आहे त्यामुळे विस्थापित झालेल्यांना न्याय्य तर सोडाच पण जे काही आश्वस्त नुकसानभरपाई ठरली आहे, ती खरेच मिळेल असे वाटते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखमाला रोचक आणि माहितीपूर्ण आहे.

>>सध्या जी फ्रान्स ची कंपनी भारतात येत आहे ती काही ह्या क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी नाही.त्यांचे उत्पादनाचा कुठेही प्रत्यक्षात वापर झालेला नाही अशा स्थितीत आपण ते घ्यावे का?<<

कंपनीच्या तांत्रिक क्षमतेविषयी अधिक उहापोह तज्ज्ञ करतील, पण वरवर पाहता 'अरेवा' या कंपनीविषयीच्या विकीपीडिआवरील माहितीनुसार या म्हणण्याला फारसा आधार दिसत नाही. ही कंपनी या क्षेत्रातली एक नामांकित कंपनी आहे आणि फॉर्च्यून मासिकाने २००६ साली जागतिक उर्जा कंपन्यांपैकी सर्वात कौतुकास्पद असे तिला संबोधले होते वगैरे माहिती तिथे मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा लेख किरणोत्सार या विषयावर आहे. या बाबतीत भारताची कामगिरी नि:संशय उत्कृष्ट प्रतीची आहे हे मी आकडेवारीवरून या लेखात दाखवले आहे.
अवांतर विषयावर मारलेल्या खड्यांना उत्तरे देऊन मी या लेखावरील चर्चेला भरकटवण्याचे काम करणार नाही.
अरेवा, भोपाळ, विस्थापित वगैरेवर चर्चा करण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी वेगळे धागे काढावेत, कदाचित आधी काढलेले असतीलही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भोपाळ वगैरे अवांतर म्हणून देउया. लेख किरणोत्सार व पर्यायाने आण्विक शक्ती ह्या विषयावर आहे काय?
असेल तर काही प्रगत देश अणुऊर्जेपासून दूर का जात आहेत ही शंका तरी विषयानुरुप ठरावी.
भरकटवणे वगैरे उद्देश ठेवून काही लिहिलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

अवांतर म्हणून उपेक्षा करण्याला अर्थ नाही. रिलेव्हंट प्रश्न वाटले.. त्या प्रतिसादात लेखातल्या मूळ विचारांवर किंवा भारताच्या अणूउर्जेतील प्रगतीवर ताशेरे नसून निव्वळ त्या निमित्ताने मनात येणारे प्रश्न दिसताहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इसवी सन २००० ते २०१० मध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षात जगामधील निरनिराळ्या देशात अणूऊर्जेचा हिस्सा किती टक्के होता आणि २००९ व २०१० या दोन वर्षात किती टेरावॉटतास ऊर्जेची निर्मिती झाली हे खालील अधिकृत दुव्यावर पहावे. यावरून प्रगत जगातील देश अणूऊर्जेपासून किती वेगाने दूर जात आहेत (किंवा नाहीत) आणि त्या आधी ते तिच्या किती जवळ गेलेले आहेत ते समजेल. तसेच आज आपण कुठे आहोत हे सुध्दा दिसेल.
http://www.world-nuclear.org/info/nshare.html
जगभरातील किती देशात किती रिअॅक्टर्स सध्या कार्यरत आहेत आणि किती नव्या रिअॅक्टर्सची उभारणी चालली आहे किंवा त्यांच्या योजना आखल्या जात आहेत हे खालील दुव्यावर पहावे.
http://www.world-nuclear.org/info/reactors.html

सगळ्या जगाने अणूऊर्जेवर बहिष्कार टाकला आहे असे त्यातून मला तरी दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलेल्या लिंका उपयुक्त आहेत. अगदि थेट विदाच दिसतोय.
आम्ही बोलत होतो ते मुख्यत्वे ऐकलेल्या बातम्यांच्या आधारे(त्यात स्पष्ट असा डेटा नव्हता). त्यातल्या काही पुढील ठिकाणी पाहू शकतो:-
http://www.guardian.co.uk/world/2011/mar/15/germany-merkel-switches-nucl...

http://www.bloomberg.com/news/2011-05-30/merkel-s-coalition-agrees-to-sh...

http://www.spiegel.de/international/germany/0,1518,757371,00.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

न्युक्लिअर फिशनवरच्या विकीलेखात असे स्पष्ट वाक्य आहे की:

Concerns over nuclear waste accumulation and over the destructive potential of nuclear weapons may counterbalance the desirable qualities of fission as an energy source, and give rise to ongoing political debate over nuclear power.

लेखातले मुद्दे पटतात. या ऊर्जास्रोताला पर्याय नाही हेही खरं. पण सर्व फॅक्ट्स जाणूनही एक भीती राहतेच की आगीत जळून लोक मरणे / कोळशाच्या खाणीतले अपघात
आणि
अण्विक इंधनविषयक अपघात यात गुणात्मक फरक नक्कीच आहे, विशेषतः दुष्परिणामांच्या अचूकतेविषयी अज्ञान आणि त्यांच्या स्प्रेड ऊर्फ व्याप्तीची रेंज..

खाणीतले अपघात, रिफायनरीत आग, यांचे परिणाम ठराविक भूभागात राहतात. अदृश्यरित्या पसरत नाहीत.. पिढ्यांच्या अंतराने परिणाम करत नाहीत..

तेव्हा अण्विक इंधनाची ही भीती "डिसप्रपोर्शनेट" असली तरी काल्पनिक नसावी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किरणोत्साराची भीती काल्पनिक नाहीच. रिअ‍ॅक्टरच्या आत इतके प्रखर गॅमा किरण असतात की चुकून माकून कोणताही जीव तिथे जाऊन पोचला तर तो क्षणार्धात नष्ट होईल.
धोक्याचे विश्लेषण (रिस्क अ‍ॅनॅलिसिस) करतांना संभाव्यता, वारंवारिता आणि भीषणता (प्रोबेबिलिटी, फ्रिक्वेन्सी व सिव्हीरिटी) या तीन्हींचा विचार केला जातो. विमान अपघातात मरण जवळ जवळ निश्चित असते पण त्याची वारंवारिता कमी असते. मोटार अपघातात याच्या उलट असते. प्रत्यक्षात मोटार अपघातात मरण पावलेल्यांची संख्या जास्त असते. तरीही अजून काही लोक विमान प्रवासाला घाबरतात.
अ‍ॅटॉमिक रिअ‍ॅक्टर्सच्या बाबतीत फॉल्टट्री काढून सेफ्टी अनॅलिसिस करतात आणि भीषण अपघाताची शक्यता अत्यंत कमी कशी करता येईल याचा विचार केला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्देसुद आणि समयोचित लेख. बहुतांश तांत्रिक शंका दुर झाल्या.

आता प्रश्न राहतात ते जमिन संपादनासंबंधी मात्र ते इथे अवांतर ठरावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!