नेपाळमध्ये स्वतंत्र राज्यं होती तेव्हाच्या काही प्रथा-परंपरा आजही सुरू आहेत. त्यातीलच एक ‘कुमारी’प्रथा !
साधारण ३ ते १० या वयोगटातील मुलगी. तिची निवड धर्मगुरू करतात. तिची रहाण्याची सोय ठराविक देऊळवजा आश्रमात केली जाते. धार्मिक गुरूंच्या देखरेखीखाली तिने तिथे रहायचे, कुटुंबियांपासून दूर! साधारणपणे ५ ते ७ वर्षांचा काळ (ती वयात येईपर्यंत) तिचं वास्तव्य तिथेच असतं. गुरूजींच्या परवानगीनुसार कुटुंबिय तिला वर्षाकाठी एखाद्यावेळी भेटू शकतात. तिचं धार्मिक व शालेय शिक्षण तिथे होतं. अधून मधून तिच्या वयाचे सवंगडी तिच्याबरोबर खेळण्यासाठी बाहेरून आणले जातात. तिचं दर्शन वर्षातून एकदाच, ठराविक दिवशी, भव्य स्वरूपात भरवल्या जाणार्या यात्रेत करता येतं. एरवी ती दर्शन देत नाही. जर ती रहात असलेल्या देवळात पर्यटक भेट देत असतील व गुरूजींनी परवानगी दिली तरच काही क्षणांसाठी ती ठराविक ठिकाणी उभी राहून दर्शन देऊ शकते. आम्हांलाही पाटणकुमारीचं दर्शन घेता आलं, परंतु तिचे फोटो काढण्यास मज्जाव होता. एका देवळात इतर काही कुमारींचे फोटो बघितले.
तिचा तिथला मुक्काम संपला की ती बाह्य जगात, तिच्या कुटंबियांकडे परत जाऊन, पुढील शिक्षण, लग्न, संसार असं सामान्य माणसांचं जीवन जगू लागते.
.. तिच्या निवडीचे निकष काय असतात?
.. तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी तिच्यासमवेत इतर कोण असतं?
.. धार्मिक शिक्षण व शालेय शिक्षण म्हणजे नक्की काय स्वरूपाचं असतं?
.. बाहेर पडल्यानंतर समाजात तिला कशा प्रकारची वागणूक मिळते?
आणि सर्वांत महत्त्वाचं...
.. तिला स्वत:ला या प्रक्रियेत शिरताना - असताना - तिथून बाहेर पडताना व त्यानंतर सामान्य स्त्री म्हणून जगताना तिच्या मनात नक्की काय-काय असतं?
गाईडकडून मिळालेल्या माहितीने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण उत्तारांविना मनात तसेच पडून राहिलेत.
चित्रा राजेन्द्र जोशी - २५.०१.२०१५