देव तिळीं आला

आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले
जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध
प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन
शुद्ध दशमीला दसरा, आश्विन कॄष्ण चतुर्दशीला दिवाळी साजरी केली जाते.
पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात
दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो
पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी
आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, "तिळगूळ घ्या आणि
गोड बोला." एकमेकात सौख्य, स्नेह वाढविणारा हा गोड सण.

आता तुकाराम महाराज या सणाचे वर्णन कसे करतात पाहा -

देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

तिळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तिचे प्रतिक मानले आहे. तो स्निग्ध आहे.
’देव तिळीं आला’ म्हणजे देव आमच्या प्रेमात आला. आमच्या भक्तिच्या
अधिन झाला. याचा परिणाम काय झाला? ’गोडें गोड जीव धाला.’
यामुळे मुळचाच गोड-सुखरुप असलेला जीव देवाच्या गोडीने-सुखाने
तॄप्त झाला.

मराठी भाषा मोठी गमतीदार आहे.
’गोड’ ही एक रुचि आहे. पण गोड हा शब्द आपण कसा कसा वापरतो
पाहा.
’जेवण मोठे गोड होते हो.’ जेवणात भात, आमटी, पापड, चटणी,
भजी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ होते. प्रत्येकाची चव वेगळी पण
आपण म्हणतो जेवण मोठे गोड होते.
एखादे छोटे बाळ पाहून आपण म्हणतो ’किती गोड बाळ आहे.’
एखाद्या सुंदर युवतीचा चेहरा पाहून म्हणतो ’किती गोड मुलगी आहे.’
लताचे गाणे ऐकून म्हणतो ’किती गोड गळा आहे.’

आपण गोड खातो तसे गोड बोलावेही. कारण शब्द गोड असतात तसे
कटूही असतात. शब्द मॄदु असतात तसे कठीणही असतात.
ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत -’शब्द जैसे कल्लोळ अमॄताचे’
अमॄतासारखे गोड शब्द.

आपण असेही म्हणतो ’आजचा दिवस मोठा गोड झाला.’
किंवा असेही म्हणतो ’थोडे भांडण झाले खरे पण शेवट अखेर
गोड झाला.

देवाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
गोड तुझे रुप गोड तुझे नाम ।
नामदेवराय देवाच्या नामाचे वर्णन करतात-
अमॄताहूनी गोड नाम तुझे देवा ।

अर्थात गोड म्हणजे चांगले, सुंदर, सुखकारक, आनंद देणारे.
संतांनी ’बरवा’ हा शब्दही याच अर्थाने वापरला आहे.
नामदेवरायांचा हा गोड अभंग पाहा -

नाम बरवे रुप बरवे । दरुशन बरवे कानडीयाचे ॥
नामा म्हणे तुझे अवघेची बरवे । त्याहूनी बरवे प्रेम तुझे ॥

असा देव बरवा आहे, सुंदर आहे, गोड आहे, सुखरुप आहे,
आनंदघन आहे.

म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात-
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥

तुकाराम महाराज तर विचारतात -
सुखरुप ऐसे दुजे कोण सांगा । माझ्या पांडुरंगावाचोनी ते ॥

परमात्मा सुखरुप आहे म्हणजेच गोड आहे. जीव हा मूळात परमात्म
स्वरुपच असल्याने गोडच आहे. जीव आणि देव मुळात भिन्न नाहितच.
देवच जीवभाव धारण करुन स्वत:च भक्त झाला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात -
देव भक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ।
जड जीवां उद्धार व्हावया लागोनि । शरण तुका वंदीं पाउलें दोन्ही ॥
भक्तीचा खेळ करण्यासाठी देव आणि भक्त हे काल्पनिक द्वंद्व कल्पिले.
पण भक्तित अखेर देव आणि भक्त वेगळे राहत नाहित.
देव आणि भक्त । नाही दुजा विचार ॥
देव पहायला गेलेला भक्त हा देवच होतो. तुकाराम महाराज म्हणतात-
देव पहावया गेलो । तेथे देवची होवूनी ठेलो ।

अशाप्रकारे मुळच्या गोड असलेल्या जीवाला देवाची गोडी प्राप्त झाली.
तो तॄप्त झाला.

मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे पूण्यकाळ मानला आहे. पर्वकाळात
तिर्थात स्नान करावे असा संकेत आहे. तिर्थात स्नान केल्याने पापनाश
होतो असाही संकेत आहे.
देव तिळी आल्याने हा पर्वकाळ साधला गेला असे तुकाराम महाराज
पुढे वर्णन करतात.

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥

हा पर्वकाळ साधला गेल्याने माझ्या अंत:करणातील मळ हा दोष
नाहिसा झाला असे तुकाराम महाराज म्हणतात.
आपल्या चित्तातील पाप वासना म्हणजेच मळ हा दोष होय. ही पाप
वासना संपूर्ण नष्ट करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात्मक भक्तित आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥
भक्तिमार्गात संत महात्म्यानी नाम संकीर्तनाने सर्व पाप कसे नाहिसे
केले आहे याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत आले आहे ते असे -

तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥

मनातील पाप वासना पूर्ण नष्ट व्हायची असेल तर तिचे मूळाशी
असलेले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा विकारही
नाहिसे व्हायला हवेत. हे विकार मोठे प्रबळ आहेत. उदाहरणार्थ
काम आणि क्रोध या प्रबळ विकारांचे वर्णन करताना माऊली म्हणतात-

हे विषय दरिचे वाघ । ज्ञाननिधीचे भुजंग ।
भजन मार्गीचे मांग । मारक जे ॥

आपल्या तप सामर्थ्याने भर माध्यानीचा सूर्य जो झाकू शकतो तो
वेदज्ञ तपस्वी पराशर काम वासनेवर विजय मिळवू शकत नाही.
ज्ञानी राजा परिक्षितीला क्रोधावर विजय मिळवता न आल्याने
मॄत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते.

तुकाराम महाराज म्हणतात -
संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होता दिगांबर निस्पॄही वैराग्यकारी ।
कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरी न सुटती ॥

या कामक्रोधादी विकारांचा नाशही नामस्मरणाने होतो.
तुकाराम महाराज म्हणतात -
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥

तुकाराम महाराजांना मंबाजीने ऊसाने बडवले तरी महाराजांना क्रोध
आला नाही. महाराजांची परिक्षा पहाण्यासाठी काही कुटाळांनी एका
सुंदर वेश्येला महाराजांकडे पाठविले. तीने महाराजांचे मन जिंकण्याचे
खूप प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. उलट तिला वंदन करून
महाराज म्हणाले -
जाई वो तू माये न करि सायास । आम्ही विष्णूदास तैसें नव्हे ॥

कारण तुकाराम महाराजांच्या तिळी देव आला होता. तुकाराम महाराज
म्हणतात -
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले । कामक्रोधें केले घर रिते ॥

भक्तिगंगेतील या स्नानाचे वर्णन महाराज पुढे करतात -

पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥

भक्तिगंगेतील या एकाच स्नानाने संचित पाप-पुण्ये नष्ट झाली
आणि क्रियमाण पाप-पुण्ये खुंटली म्हणजे लागेनाशी झाली आहेत,
असे तुकाराम महाराज म्हणतात.

प्रारब्धाचा भोग कुणाला चुकविता येतो काय ? मग तुकाराम महाराज
असे कसे म्हणतात?
प्रारब्धाचा भोग हरिकॄपेने नष्ट होतो असे एकनाथ महाराज म्हणतात.
एकाजनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकॄपे त्याचा नाश असे ॥
भक्ती पुर्णत्वाला गेली की भक्ताला प्रारब्ध, संचित, क्रियमाण यांची
काही पिडा होत नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे.
प्रारब्ध क्रियमाण । भक्ता संचित नाहीं जाण ॥

आता देव अंतरी प्रकट झाल्यावर आपण स्वत: देवरुपच झाल्यावर
लोकांशी आपला व्यवहार कसा राहिला आहे हे तुकाराम महाराज
अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी शुद्ध झाली असून
"जन हे जनार्दनच आहेत" असे जाणून ती प्रेमाने गोड बोलत आहे.

नामस्मरणाने वाणी शुद्ध पवित्र पुण्यवंत होते असे तुकाराम महाराज
म्हणतात.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ ॥

आपल्यासह सर्वत्र तो एकटा परमात्माच भरलेला आहे ही परम
अनुभुती होय. सर्व संतांना ही अनुभुती आली. ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात -
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ।
नाथबाबा वर्णन करतात -
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥
तुकाराम महाराज म्हणतात -
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरुनि ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनि मानसीं ॥

सर्वत्र परमात्मा आहे असे जाणून आपण सर्वांशी प्रेमाने वागावे
आणि प्रेमाने गोड बोलावे हीच खरी संक्रांत, हेच खरे संक्रमण होय.
हाच खरा मकर संक्रांत साजरा करण्याचा उद्देश होय.

- देवदत्त दिगंबर परुळेकर मो. ९४२२०५५२२१

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर लेख आहे. गोड आहे लेख Smile

ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत -’शब्द जैसे कल्लोळ अमॄताचे’

आहाहा!!

हे विषय दरिचे वाघ । ज्ञाननिधीचे भुजंग ।
भजन मार्गीचे मांग । मारक जे ॥

अगंबाई!! कसली सुंदर रुपके आहेत. असे म्हणतात ज्ञानेश्वरी रुपकांची माळच एकामागे एक उलगडत जाते.

सर्वत्र परमात्मा आहे असे जाणून आपण सर्वांशी प्रेमाने वागावे
आणि प्रेमाने गोड बोलावे हीच खरी संक्रांत, हेच खरे संक्रमण होय.
हाच खरा मकर संक्रांत साजरा करण्याचा उद्देश होय.

अतिशय खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोड आहे खरा लेख!
आणि मला तुमच्या प्रतिक्रियेतील "अगबाई!!" हा शब्द बेक्कार आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile काहीच्या काही शब्द आहे तो. Wink पण वास्तवात इतकं गोड बोलता येत नाही म्हणून अतिकंडुशमनार्थ इथेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतंत्रपणे विचार केला तर लेख ठीक आहे. पण नास्तिकांनी भरलेल्या, बुध्दिवादी संस्थळावर तो प्रकाशित करणे, म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असा ठरेल. 'सत्यकथेमधे' अचानक 'शेगांव- एक संतस्थान' असा लेख यावा, तसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असा ठरेल.

असं का म्हणता तिमा, बुद्धाने सांगीतल्याप्रमाणे - attachment, aversion & ignorance ही तीन विषे आहेत.
कॉफीचेच उदा घ्या. कॉफीशिवाय काही लोकांचा दिवस सुरुच होऊ शकत नाही ......They cannot face the world without a cup of coffee = विष पहीले attachment
काही लोक चेहरा तांबडा होइतो घशाच्या शिरा ताणून कॉफी कशी वाईट ते पटवतात = दुसरे विष aversion
तर काही लोकांना कॉफी काय तेच माहीत नसते = तीसरे विष ignorance

.
.
तद्वत
हा लेख काहींच्या मनात तीव्र आपुलकी (attachment) निर्माण करेल
तर काही जण या लेखाचा तिरस्कार करतील (aversion )
काहीजण वाचणारच नाहीत (ignorance )

.
तीन्ही गोष्टी वर्ज्य करुन मेडिटेटिव्ह पाथ हाच- की वाचा, त्याचे अस्तित्व acknowledge करा अन move on. बहुतेक हां. मी देखील शिकतेय तेव्हा माझं १००% खरच असेल असे नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख चांगला आहे. निरुपण रसाळ आहे.
पुढिले लेखनासाठी शुभेच्छा!

ऐसीकरांना संक्रांतीच्या शुभेच्छा!

---
बाकी, लेखन वाविप्रमध्ये प्रकाशित केले आहे, तेथून हलवून "ललित" करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

देवदत्त ऐसी वर स्वागत आहे.
इथे श्रद्धेचा साज काही पहायला मिळणार नाही पण अश्रद्धेचा माज मात्र नक्की पहायला मिळेल. दोन्ही बाजू तुला माहित असल्याने मी अधिक भाष्य करीत नाही.
ऐसी वर तसा नवीन असल्याने प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स हे लक्षात असू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/