पुढे दिलेली काही उदाहरणं पाहा:
● कुठलाही गुन्हेगार जन्मत: वाईट नसतो. परिस्थितीमुळे तो तसा बनतो.
● मराठी नाटकाचा प्रेक्षक बहुतकरून उच्च मध्यमवर्गातला आहे.
● सरकारी नोकर म्हटला म्हणजे कुठल्याही जातीतून वर आलेला असला तरी एकदा पदावर आला की मग त्याने प्रत्येकच नागरिकाचं हित बघायला पाहिजे. 'हा ब्राह्मण, हा मराठा, हा आपला माणूस' असा भेदभाव त्याने करणं बरोबर नाही.
ही सगळी वाक्यं 'सेक्सिस्ट' मराठीत आहेत, म्हणजे त्यांच्यात उल्लेखिली गेलेली यच्चयावत माणसं पुल्लिंगी आहेत. तर माझा चर्चाप्रस्ताव असा की असं मराठी तुम्हाला खटकतं का? यामध्ये आपल्या मनातल्या कायमस्वरूपी प्रतिमांचा संबंध येतो. 'गुन्हेगार' हा शब्द पाहिला की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर पुरुष येतो, आणि याचं एक कारण म्हणजे स्त्री गुन्हेगारांचं एकूणांतलं प्रमाण खरोखरीच कमी असतं. पण याउलट नाटक बघायला स्त्रिया खूपच येतात, आणि नाटक पाहणारी 'सरासरी' व्यक्ती पुरुष असते असं मुळीच नाही. तेव्हा यातली काही वाक्यं काहींना काही प्रमाणात खटकतात आणि बाकीची नाहीत असं अर्थातच शक्य आहे.
मी राहतो तिथे (म्हणजे कॅनडामध्ये) सर्वसाधारण सामाजिक वातावरण असं आहे, की sexist English हे अप्रतिष्ठित मानलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ, 'Every doctor in Canada tries to provide the best care for his patients' हे वाक्य लोकांना इतकं पटकन चुकीचं वाटतं की वर्तमानपत्रांत, पुस्तकांत वगैरे अशा प्रकारची भाषा आता खूपच मागे पडली आहे. (त्यामानाने sexist French काहीसं जास्त प्रचलित आहे, पण फ्रेंच व्याकरणात न शिरता ह्या मुद्द्याची चर्चा करणं शक्य नसल्यामुळे तो सोडून देतो.)
इथे 'सेक्सिस्ट' (लिंग-पक्षपाती?) असं विशेषण लावण्यामागे तसं मराठी गैर आहे असं मी मुळीच गृहीत धरलेलं नाही. 'सेक्सिस्ट असलं तर असलं, आम्ही समजून घेतो आणि आम्हाला ते खटकत नाही' अशा प्रकारची भूमिका ही काही आपोआपच चुकीची ठरत नाही. तर महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे, अशा तऱ्हेचे भाषिक प्रयोग केले जाऊ नयेत असं तुम्हाला वाटतं का, वाटत असल्यास तुम्ही काय पर्याय सुचवाल इत्यादि विषयांवर चर्चा झाल्यास बिघडणार नाही.