स्पॅनिश ऑमलेट: पाक-अकौशल्य झाकण्याची एक क्लृप्ती
साधारणतः अंडरग्रॅज्युएट असण्याचे दिवस. एक मित्र ठाण्यात काही कामासाठी आला होता, तासभर वेळ काढायचा होता आणि आमच्या घरात कोणीही असलं तरी तासभर करमणूक आणि पोटाला काही आराम मिळणार याची त्याला खात्री होती. पण त्याला काय माहित, तेव्हा मी एकटीच घरी होते. "चल, चहा पिऊ या!" असं म्हणून मी स्वतःच स्वयंपाकघराच्या दिशेने कूच केलं. चहाच्या मळ्यात संप सुरू झाल्यागत रंग दाखवणारा दुधाळ चहा समोर आल्यानंतर त्याचा चेहेरा त्याच चहासारखा पांढुरका झाला. काय करणार शेवटी आम्ही भटेंच, आम्हाला असलेच पदार्थ आवडणार! त्यानंतर तासाभराने खगोलशास्त्राच्या मराठीतून प्रसाराच्या नावाखाली आम्ही सगळेच टवाळ जमलो तेव्हा त्या मित्राने यथाशक्ती, यथामती माझ्या पाक-अकौशल्याची प्रशंसा केली. "साधा चहाही करता येत नाही रे हिला! पुढच्या वेळी फोन करून जा आणि घरी ही एकटीच असेल तर चहा आणि वड्याचं पार्सलच घेऊन जा!" वगैरे स्तुती कानावर आल्यानंतर मला एक भन्नाट कल्पना सुचली. आपल्याला काही जमत नाही असं भासवलं की बरेच कष्ट टळतात. कांदा आवडत नाही म्हणून घरीच नसतो, तिखट झेपत नाही म्हणून फक्त चेरी मिरच्याच घरी असतात (त्यांचा वास मस्त असतो पण तिखटपणा अगदी नावापुरताच) असं पसरवून दिलं. पुढे बरीच वर्ष या क्लृप्त्या चालून गेल्या. पुढे शिक्षणासाठी घर सोडलं, मग पोळी, भाजीच काय अगदी खायला आवडतात म्हणून मोदकही बनवायला शिकल्याची बातमी फुटली. मग दुष्ट मित्रमंडळ घरी जेवायलाही बोलवायायला लागलं. आपल्याकडे काय नवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत याची जाहिरात करण्यासाठी का होईना, लोकांना घरी जेवायाला बोलावणं आलं. पण प्रश्न असा यायचा की पारंपरिक पाकृ केल्या की लगेच "आमच्याकडे हे ना, असं करतात" वगैरे गोंडस विधानांच्या आडून शरसंधान व्हायला लागण्याची शक्यता! शेवटी एक उपाय सुचला.
शिक्षणाच्या निमित्ताने विविध देशांतल्या लोकांशी ओळखी झालेल्या होत्याच. त्यांच्याकडून जे पाकशिक्षण झालं त्याची जाहिरात करायचं ठरलं. म्हणून काल बनवलं स्पॅनिश ऑमलेट. यासाठी अंडी वगळता सामग्री काय लागते हे मला माहित नाही. कारण मी जेव्हा शिकले तेव्हा आम्ही होतो त्या ठिकाणाचं वर्णन in the middle of nowhere असं करता येईल. नाकातला द्रवही गोठवणार्या थंडीत भूक लागल्यावर सुपरमार्केट शोधण्याची कोणाची तयारी नव्हती. मग आहे ते सामान वापरून आपलं पाककौशल्य तिने दाखवलं. "अगं, ज्या असतील त्या भाज्या, तेल, मसाले असं सगळं वापरायचं. तुला चिकन, बीफ असं काही आवडत असेल तर तेही घाल. पोट भरलं, चव चांगली लागली आणि पुरेश्या भाज्या, अंडी खाल्ली की काम झालं!" असा पाकफंडा वापरल्यामुळे अलिथीया मला भारीच आवडली. तर मी काल वापरलेली सामग्री ही अशी: थोडे मश्रूम, दीड भोपळी मिरची, थोडी पार्सली. पार्सलीच्या जागी कोथिंबीरही चांगली लागते. कधी रूचिपालट म्हणून ओरीगानो वापरायचं. तिखट चव आवडत असेल तर कधी साधी मिरची, कधी अलेपिन्यो मिरच्याही वापरायच्या. मश्रूम, मिरची यांपैकी काही नको असेल किंवा घरी नसेल तर गाजर, फरसबी, मटार असंही काही वापरायचं. दोन माणसांसाठी मी चार अंडी वापरली, त्यातल्या दोन अंड्यांचा बलक वाढत्या वजनाच्या भीतीने आणि आकार कमी करण्यासाठी केलेल्या व्यायामाच्या आठवणीने फेकून दिला.
आता थोडी अमेरिकेत असल्याची जाहिरात. अमेरिकेतल्या साध्या तेलाला एक वेगळाच वास येतो ज्याची सवय मला अजून झालेली नाही. त्यामुळे फोडणी करायची नसेल तर मी ऑलिव्ह तेल वापरते. तर उथळ पातेलं किंवा खोलगट तवा म्हणता येईल अशा भांड्यात किंचित तेलात मश्रूम आणि मिरच्या परतायच्या. यात दोन पाठभेद आहेत. मश्रूम आणि पिवळ्या-केशरी मिरच्या कच्चटही चांगले लागतात; पण मला काल शिजवून खाण्याचीच इच्छा होती म्हणून मी बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवलं. कच्चट हवे असल्यास हा मालमसाला मोठ्या गॅसवर झाकणाशिवाय परतायचा. आता पुन्हा गॅस आहे का वगैरे प्रश्न विचारू नका. काही बाबतीत मी घाटीच रहाणार. कॉईल, हॉटप्लेट अशा कशाहीवर पातेलं असलं तरी तो गॅसच असतो. अमेरिकन भाषेत नाही का पेट्रोल किंवा गॅसोलीन नामक द्रवाला गॅस म्हणत, आपणपण दणकून कॉईलला गॅस म्हणून टाकायचं. आमच्या मातोश्री स्वतःच्या माहेरी चुलीलाही सवयीने गॅस म्हणून टाकायच्या; आपण वारसा नको का चालवायला! थोडक्यात गाडी चालवण्यापासून पदार्थ शिजवण्यापर्यंत गॅसचा भाषेत वापर होतो. असो. तर एवढं वाचून होईपर्यंत मश्रूम आणि मिरच्या कच्चट शिजतात. लिहून होईपर्यंत पूर्ण शिजतात आणि मश्रूमचं सुटलेलं पाणीसुद्धा उडून जातं. मग त्यात मीठ आणि पार्सली घातली. पण याचा क्रम तुम्हीच ठरवा. माझ्या जिभेलातरी या गोष्टी घालण्याची वेळ थोडी पुढे-मागे झाली तरी त्यातला फरक समजत नाही.
तर एवढ्या वेळात मैत्रिणीला एक फोन करायचा, आपण स्पॅनिश रेसिपी करतोय वगैरे उच्चभ्रूपणा मिरवायचा (अमेरिकेत आलं की युरोपातलं सगळं उच्चभ्रू होतं ना!), आणि एकीकडे अंडी फोडून घ्या. अंडी फेटताना त्यात किंचित दूध घातलं तर ऑमलेट मस्त फुलून येतं. पातेल्यातल्या भाज्या आपल्याला हव्या तेवढ्या शिजल्या की त्यात फेटलेली अंडी घालून 'गॅस' कमी करा आणि झाकण ठेवून शिजवा. फोन-अ-फ्रेंड एकीकडे सुरू असेलच. तर आज पायाचा व्यायाम जास्त केला त्यामुळे पाय दुखत आहेत वगैरे तक्रार करताना आमलेट उलटायला विसरू नका. आता इथे मात्र थोडं पाककौशल्य असलेलं बरं. नाहीतर नंतर आमलेटाचे तुकडे करण्याचे कष्ट कमी होतात, त्यामुळे माझ्यासारखे पाक-अकुशल असाल तरीही काही अडचण नाही. आमलेट उलटलं की काही ठिकाणी लागल्यासारखं दिसू शकतं. अशा वेळी कामास येतं, आबालवृद्धांचं लाडकं चीज. मच्युअर छेडर, पार्मेजान, मोझरेला सारखं एखाद्या चीजचा कीस आमलेटाच्या निदान लागलेल्या भागावरतरी टाकायचा. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून आमलेट शिजवायचं. आता फोन-अ-फ्रेंडला सरळ बायबाय करावा आणि गॅस बंद करावा. वाईनचे ग्लास काढायचे, झकास कॅब्रेने सुव्हिन्यू किंवा शिराझने ग्लास भरावे, ताटात पावाचा तुकडा आणि टेबलावर बटर ठेवावं आणि आमलेटाचं झाकण काढायचं. धार्मिक असाल तर देवाचं नाव घेऊन, नास्तिक असाल तर वाईनचा घुटका घेऊन आमलेट आख्खं काढण्याचा प्रयत्न करावा. आख्खं निघालं तर तसे फोटो काढून फेसबुकावर जाहिरात करावी, तुकडे झाले तर फोटो काढण्याआधी ताटलीत असे रचावेत की बरोब्बर अर्धं करता आलं आहे असा आव आणता येईल.
स्वयंपाकही येत नाही, तोंडाळही नाहीत आणि सबबीही काढता येत नाहीत तर मात्र अडचण येणार! यांपैकी निदान एक गोष्ट तरी शिका, तोपर्यंत आस्वाद घ्या ऑमलेट आणि रेड वाईनचा.
प्रतिक्रिया
हिरवा माज
हिरवा माज इतका की रेड वाईनही हिरवी दिसतीये.
तुझ्या हातचं काही तरी (पदार्थ) खाल्लं असल्यानं या ऑम्लेटविषयी काहीही लिहिणार नाही. जे खाल्लं होतं ते पोटभर खाल्लं होतं इतकं नक्की.
आवडली
पाककृती आणि सांगण्याची शैली आवडली. (बेरजेचे राजकारण करणारे शरद पवार हा आमचा सध्याचा आदर्श आहे! ;-))
बाकी लेख विडंबनकारांच्या हाताला खाज सुटेल असा आहे. कुठे आहेत ते सगळे कलमकसाई?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
पद्धत मस्त!
हाफीसातून फटु दिसत नसले तरी लिहिलेला भाग उत्तम आहे. स्प्यानिश आम्लेटात मध्येच तोंडात येणारे चीज (त्या गुठळ्या कशा ठेवतात देव जाणे) आणि मुख्य म्हणजे राजमा (अरे हो 'तुमच्याकडच्या' त्या किडनी बीन्स) कसा घातला नाहि? शिवाय मसाले-तिखट या ऐवजी मिरपुड (आय मीन 'फेपर फावडर' गं) म्यांडेटरी आहे (हिरव्या मिरच्या आर सो एशियन यु नो!)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
श्रावणः या अमेरिकेत मेले
श्रावणः या अमेरिकेत मेले पांढरे दिवेच नसतात. मग पिवळ्या दिव्यांनी जो उजेड पाडला तो वायनीलाही चढला असावा. वाईनमात्र झकास होती हो!
संजोपरावः इथे मी पाकृचंच विडंबन करण्याच्या बेतात आहे आणि तुम्ही विडंबनाच्या विडंबनाची सुपारी देताय! तुम्हीच घेऊन टाका सुपारी ...
ऋ: लोकशाहीचा सोस रे. मला वितळलेलं चीज आवडतं, घरातलं दुसरं मत वितळलेल्या चीजच्या विरोधात जातं. त्यामुळे मी वरूनच अर्ध्या भागावर चीज घालते. काल मश्रूम आणि मिरच्या होत्या म्हणून त्या घातल्या. कधीमधी इथे मिळतात तसल्या फ्रोजन भाज्याच घालते. अंड्यात मुळात प्रोटीन्स असताना आणखी त्या किडनी बीन्स कशाला असा प्रश्न पडला आहे.
मी मसाले-तिखट काही घालतच नाही ना. चवीसाठी भाज्या आणि अंडी आहेतच की! शिवाय पार्सलीही घातली.
त्यातून मुळात अमकी गोष्ट करण्याचा अमका नियम आहे म्हटलं की मी लगेच तो मोडायलाच जाणार. स्पॅनिश लोकांची असेल काही पारंपरिक पाककृती, पण आमच्यात स्पॅनिश ऑमलेट असंच खातात असं म्हणून वाटेल लावून देण्यात काय मजा आहे सांगू तुला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एन्जॉय माडी
>> आमच्यात स्पॅनिश ऑमलेट असंच खातात असं म्हणून वाटेल लावून देण्यात काय मजा आहे सांगू तुला!
हॅ हॅ हॅ अगदी सहमत आहे. 'आमच्यात' स्प्यानिशच काय चायनीज नुडल्सपासून ते अमेरिकन बर्गरपर्यंतच्या पदार्थात मॉन्चाव नामक द्रवापासून ते आलू टिक्की वगैरे पॅटीपर्यंत कहिबाहि घालुन हे अस्सेच खाण्याचे पदार्थ आहेत असे म्हणून ते खाल्लेच नाहित तर विकलेही जातात. (फक्त तुम्ही हिरवे झाल्यामुळे म्हटलं विसरलात की काय हा (भगवा?) माज! )
तेव्हा एन्जॉय माडी!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एन्जॉय माडी?
एन्जॉय माडी? अय्यो यार अवरं? यारगं कन्नड बरतेत इल्ले?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
ನಾನೂ ಮತ್ತ ನಿವೂ
ಬರತಾದ ರೀ. ಸ್ವಲ್ಪ ನನಗೇ ಬರತಾದ. ನಿಮಗೇನೂ ಬರತಾದ. ಅಷ್ಟ ಸಾಕ ಆಗತಾದ ಬಿಡರೀ!
बोंबला...
अहो मोडक, इथं मोडक्यातोडक्या कानडी बोलण्याबद्दल विचारणा आहे आणि तुम्ही चक्क डोसाउपमा कानडीतून लिहिताय? सांगू का बाळासाहेबांना?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
क्षीण प्रयत्न
आपल्याला कानडी येतं हे दाखवण्याचा श्रामो व रावसाहेबांच्या क्षीण प्रयत्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे (कारण त्यांनी काय लिहिलंय हे अजिबात कळलेले नाही. )
त्यात 'धन्यु' हे जितके शुद्ध मराठी आहे तितकेच 'एन्जॉय माडी' हे शुद्ध कानडी आहे असे आम्ही मानतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दिल की बात जुबां पर...
या सगळ्या उपधाग्याला 'अवांतर' अशी श्रेणी मिळाली तर किती मराठीसंकेतस्थळकंटक त्यावर त्रागा करून हे संकेतस्थळ सोडून जातील अशी एक शंका आमच्या शंकेखोर मनात आली. बाकी चालू द्या
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अवांतर.... छे, छे !! आहो
अवांतर.... छे, छे !! आहो काहीतरीच काय?
हा धागा दंगा करण्यासाठीच काढला आहे असं लेखात कुठेतरी स्पष्ट वाचलं... काय म्हणता, तुम्हाला नाही दिसलं... कदाचित त्यासाठी "मराठीसंकेतस्थळकंटक" असं स्पेशल क्वालिफिकेशन लागत असावं ( कुणास ठाउक ) :bigsmile:
ಪ್ರಕಾಟಾಆ
ಪ್ರಕಾಟಾಆ
ವಾ!
ಯ್ ಸ್ಯಾನಿಶ್ ಧಾಗ್ಯಾತ ಆಮಚ್ ಕಾನಡೀ ಸ್ಂವಾದ ಐಕೂನ ಬರಅಅಅ ವಾಟಲ್ ಬಧಾ!
ನೀವು ಏನು ಆಲೋಚಿಸುತ್ತೀರಿ
ನೀವು ಏನು ಆಲೋಚಿಸುತ್ತೀರಿ ಏನು? ನಾನು Google ಭಾಷಾಂತರಕಾರ ಬಳಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अय्यो!
ಆಲೊಚಿಸುತ್ತೆನೆ ಬಹಾಳ ದೊಡ್ದ್ ಶಬ್ದ್ ಆತ ರೀ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗೆ ಗೂಗಲ ತನಕಾ ಯಾಕ ಹೊಗ ಬೆಕು, ಬರಹ ಸಾಕು!
चिटिंग
चिटिंग! याचं गुगल ट्रान्स्लेटर जे काहि देतं त्याचा अर्थ कोण सांगणार
असो. इतकं अवांतर झालंय की अदिती आपल्याला इथे येऊन तिचं ते आमलेट खायला घालेल नी म्हणेल एन्जॉय माडी (आता चित्रातल्या आम्लेटला चान चान म्हणता येतं.. खावं लागलं तर :-ओ )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"महादू, ॠसाहेबांसाठी आमलेट
"महादू, (ॠ)साहेबांसाठी आमलेट आण." -- सामना.
ऋषिकेशशी सहमत. रोचना, हे साफ चीटींग आहे. आता या सगळ्याचा अर्थ सांगा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गूगल ट्रान्स्लेट
हाहा - सॉरी.
मी एवढेच म्हटले की "आलोचिसुत्तेने" वगैरे माझ्या कानडी साठी फार मोठे शब्द झाले राव!
ऑमलेट वाईन दिसली व समजली पण
ऑमलेट वाईन दिसली व समजली पण ते वड्यासारखे काय आहे?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
उत्तम लिहिले आहेस गं. पाकृ पण
उत्तम लिहिले आहेस गं. पाकृ पण जमली आहे असे म्हणायला वाव आहे
छान छान!
तुला स्वयंपाक करता येतो ? :O :O :O
असो, शेवटचा फोटो बघून एवढ्या मेहनतीची 'चीज' झाले असे म्हणता येइल.
तुझ्या स्वयंपाकाच्या नव्हे, माझ्या वाचनाच्या मेहनतीचे
असो, तो ब्रेड कुठल्या प्रकारचा म्हणायचा? ब्रेड आणि रेड वाइन हे काहीतरी "चीझी" पदार्थाबरोबर खाण्याचा महिमा काय वर्णावा महाराजा.
श्या, आज कोरेगाव पार्कात कुठेतरी कॉन्टीनेंटल खायला जावे लागणार
- (कॉन्टीनेंटल) सोकाजी
अवांतरः रेड वाइन कुठली होती? शिराझ फारच अॅसिडीक असते?, मला अजिबात आवडत नाही.
ब्लॉग हा माझा...
संपूर्ण लेख वाचण्याअगोदर फोटो
संपूर्ण लेख वाचण्याअगोदर फोटो बघितले. अगदी सुरवातीला अंड्याच्या पिवळ्या बलकासोबत डेटॅाल मिक्स कशासाठी केलंय अशी फालतू शंका आली. नंतर रेसिपी स्पॅनिश ऑमलेट वरून कॉर्न भेळेवर पोहचली कि काय? असं वाटलं. त्याच्याखाली डाविकडला फोटो बघून कुकर मधून तुरीची डाळ उकडून वर कोथिंबीर भुरभूरलेय असं वाटलं, नंतर पिझ्झा बेक होतोय अशी खात्री वाटली. पण जादुगार लेखिकेने थोडसं (करपलेल), sorry खरपूस भाजलेलं स्पॅनिश ऑमलेटच केलंय पाहून - 'जो नाम दिया वहीच पदार्थ किया' असं म्हणून माझाच पचका केला.
तळटीप : लेख मात्र जाम आवडला. आमच्यासारख्या बॅचलर मंडळीनी करावी अशी रेसिपी. आता बघू कोणाला जमतेय का? अशी बनवायला ( आणि खायला ) रेसिपी.
माझ्या आवृत्तीत...
आलेल्या पाहुण्यांच्या आवडीनुसार स्पॅनिश ऑम्लेटच्या माझ्या आवृत्तीत काही बदल होतात. उदा:
जाताजाता: स्पॅनिश ऑम्लेटमध्ये ऑलिव्ह ऑईलच वापरण्याची पद्धत आहे. ते कनोला वगैरे सगळे अमेरिकन असंस्कृत चाळे आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मस्त! पण...
मस्त! पण एक सूचना...
अंडी व दूध एकत्र खायची खूप जणांना सवय असते(बटाट्याच्या चाळितला पावशे पण दुधात अंडी टाकून खातो), पण भारतीय आहारशास्त्रानुसार(आयुर्वेदिक ग्रंथांनुसार) तसे करणे अत्यंत घातक आहे. अंडी व दही/दूध्/ताक हे विरुद्धान्न आहे. ह्याने हळूहळू तब्येत बिघडते. शरीरात "आम" म्हणजेच घाण साठू लागते. नंतर ह्यामुळेच संधीवाताचा त्रासही सुरू होतो. मध्य्पूर्वेतील कित्येक ज्यू-मुस्लिम पंथातही हेच निरिक्षण व हाच आहार नियम आहे.
अंडी व दूध खाताना त्यामध्ये किमान तीन-चार तासांचे अंतर हवे.
अजूनही कित्येक गोष्टी आपण सर्रास खातो, पण त्या विरुद्धान्न आहेत.(मुळात दूधासोबत घेता येतील अशा वस्तूच फारच कमी आहे.आयुर्वेदानुसार केळीचे दुधातील शिकरण हेही विरुद्धान्नच.)
विशेष आवडलेली वाक्यं/शैली:-
तर एवढं वाचून होईपर्यंत मश्रूम आणि मिरच्या कच्चट शिजतात. लिहून होईपर्यंत पूर्ण शिजतात आणि मश्रूमचं सुटलेलं पाणीसुद्धा उडून जातं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अंडी आणि दूध
ज्यू कोशर पद्धतीमध्ये आणि अनेक युरोपिअन देशांतही मासे/अंडी हे मांस म्हणून गणले जात नाहीत त्यामुळे हा नियम मुख्यतः सस्तन प्राण्यांच्या मांसाबाबत लावला जातो. अधिक माहितीसाठी:
http://www.jewishrecipes.org/recipes/parve/index.html
http://www.chabad.org/library/article_cdo/aid/815625/jewish/Is-lox-and-c...
आयुर्वेदात सांगितलेल्या अनेक नियमांना आधुनिक वैद्यकात स्थान नाही कारण शास्त्रोक्त पद्धतीनं त्यातलं काही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे खुशाल शिकरण खा!
- शिकरणप्रेमी जंतू
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
छान छान
एक शंका: ही पाककृती अंड्यांशिवाय कशी करता येईल? बेसन चालावे असे वाटते. फक्त ते वरून पेरायचं की भज्यांच्या पीठासारखे करून भाज्यांत घालायचं, हा कातालान आणि 'अंडा'ल्युशियन पद्धतींतला पोटभेद असावा
मजा आली. मी केलेलं स्पॅनिश
मजा आली.
मी केलेलं स्पॅनिश ऑम्लेट खूपच बेचव लागत होतं. आता भरपूर हिरव्या मिरच्या घालून करून पाहीन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वा वा! लेखनशैली ( आणि पाकृपण
वा वा! लेखनशैली ( आणि पाकृपण ) जमली आहे. मेली आमची गाडी स्क्रॅम्ब्ल्ड एग च्या पुढे कधी जाणार देव जाणे!
आवडले
वा वा वा... अदितीला युरिपियन काहितरी बनवता येतंय हे बघून आनंद झाला.
इथे मिळणार्या स्पॅनिश ऑम्लेटच्या तुलनेत तू बर्याच भाज्या आणि मसाला घातला आहेस. मला बहुतेक वेळा या ऑम्लेटात फक्त उकळलेले बटाटेच मिळाले आहेत.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
ळ?
बॉयलिंग पॉईंट काय आहे हो बटाट्याचा?
पाषाणभेद: वड्यासारखा दिसणारा
पाषाणभेद: वड्यासारखा दिसणारा पाव आहे.
मृत्युन्जय, लिखाणाचा सर्व खटाटोप मी केला असला तरीही ऑमलेट बनवण्याचा सर्व खटाटोप मीच केला आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पुराव्याने शाबीत करणारे तसे फोटो नाहीत.
सोकाजी, ही वाईन कॅब्रेने सुव्हीन्यू होती. शिराझ मलाही सगळ्याच पदार्थांबरोबर किंवा सगळ्याच वेळी आवडते असं नाही. एकेकाळी शिराझ अजिबातच आवडायची नाही तसं आता मात्र नाही, आता कदाचित जीभ तयार झाली असावी किंवा वयाप्रमाणे मीच मच्युअर झाले असावे. कॅब्रेने सुव्हीन्यू आणि (रक्तवर्णी) झिनफण्डेल कधीही चालतात. पिनो नुआँ आणि मर्लो आता फारशा आवडत नाहीत, या दोन्हींची चव मला आता सपक वाटते. वाईन प्यायला सुरूवात केली तेव्हा मर्लो आवडायची.
ब्रेड साधाच ब्राऊन डिनर रोल होता. चव साधारण आपल्याकडे (आपल्याकडे म्हणजे भारतात) मिळणार्या ब्राऊन स्लाईस ब्रेडसारखीच असते.
विरोचनः फक्त फोटो पाहून माझ्या फोन-अ-फ्रेंडने "पास्ता केला होतास ना" अशीच बोळवण केली. पिझाही ठीक आहे, पण डेटॉल काय. .... अगायाया
चिंतातुर जंतू: कॅनोला काय आणि व्हेजिटेबल ऑईल काय, काहीतरी विचित्र वास येतोच त्याला. त्यापेक्षा ऑलिव्ह तेलातली फोडणी बरी असेल असं अनेकदा वाटतं.
पाकृबद्दल अजून एक टीप. मैत्रिणीने ऑमलेट बनवताना भाज्या तेलात तळल्या जातील इतपत तेल घातलं होतं. मी मात्र व्यायाम आणि आकारभीरू असल्यामुळे नेहेमीप्रमाणे घाबरत घाबरतच तेल घातलं. अर्थात तेलामुळे चव चांगली येतेच, पण भाज्या आणि अंडं खाली लागण्याची शक्यताही बरीच कमी होते.
माझ्या मते, मी अंड्यातला बलक बर्याचदा टाकून देते आणि अंड्यापेक्षा भाज्याच जास्त खाते त्यामुळे ऑमलेट बर्याचदा तुटतं.
मनोबा, एक विनोद आठवला. एका माणसाला डॉक्टर म्हणतात, "धूम्रपान, मद्यपान, मांसाहार, तळकट पदार्थ, रात्रीची जागरणं सोडून तू जर सकाळी लवकर उठून व्यायाम सुरू केलास तर तुझं आयुष्य लांबेल". माणूस उत्तर देतो, "बरोबर आहे. असं सगळं केल्यावर मृत्यु लांबला असंच वाटणार."
शिकरण, फळं+दूध, 'मॉंगिनीस'चे केक, पाव, दही खाऊ नका, असं सांगणार्या एका ओळखीच्या आयुर्वेदीक वैद्याकडे बघितल्यावर एकतर हा बोलतो तसं वागत नाही (मग याचं काय ऐकायचं?) नाहीतर असं सुजलेलं तोंड, बेढब सुटलेलं शरीर असण्यापेक्षा हे सगळे पदार्थ खावेत असं वाटायचं.
नंदनः हा हा हा! नियम बनवला की तो मोडलाच पाहिजे पण पाकृच्या बाबतीत माझी कल्पकता कमी पडते. तूच का नाही एखादी बिनअंड्याच्या ऑमलेटाची पाकृ टाकत, वर त्याला "बाहा ऑमलेट" किंवा "कॅल ऑमलेट" वगैरे काहीतरी फ्यान्सी नाव दे!
मेघना: ठांकू. तुझा सुगरणीचा सल्ला काढ की तुझ्या बासनातून!
संगणकस्नेही: गाडी पुढे सरकण्यासाठी आपणच सुरू करावी लागते. बसल्या जागी गाड्या कशा सरकायच्या?
स्मिता: घरी चटकन बनणार्या वस्तू बाहेर पैसे टाकून खायला जीवावर येतं. त्यातून इथे 'घासफूस' खाणार्यांचे किंचित हालच होतात. शिवाय घरी खाल्लं की बटाटा खावा लागत नाही हा सगळ्यात मोठा फायदा!
मलाही मंदारला पडलेलाच प्रश्न पडलाय. बॉयलिंग पॉईंट काय बटाट्याचा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
=))
एकदम 'ओरिगिनल' उच्चार!
हो ना! आता सुरु करतोच नवनवीन पदार्थ बनवायला... 'कल करे सो आज कर..' वैग्रे!
बॉयलिंग पॉईंट
१००० सेल्सियस
बटाटा पाण्यात उकडलेला असतो की नाही... मग?? तुमच्यासारख्या हुशार लोकांना असे प्रश्न कसे पडतात?
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
<<कॅनोला काय आणि व्हेजिटेबल
<<कॅनोला काय आणि व्हेजिटेबल ऑईल काय, काहीतरी विचित्र वास येतोच त्याला >> भगवा माज, भगवा माज, अजून काय?
<<त्यातून इथे 'घासफूस' खाणार्यांचे किंचित हालच होता<<>> नाही हो, म्हणजे आता सगळीकडे सगळं मिळतं..... आणि इथे फ्रोझन भाज्यांव्यतिरिक्त सर्व ताज्या भाज्याही मिळतात ( हवतर अंबाडी / घोळ यांच्या जुड्या पाठ्वून देते फेड एक्स नी?)
ऑम्लेट मधे ब्रॉकोली आवड्ते आणि चीज मधले cheddar, parmesan or mozzarella अजिबात नको, पेप्पर जॅक किंवा मेक्सिकन चीज चालेल्.शिवाय स्पॅनिश ऑम्लेट बरोबर fresh avocado पाहीजेच आणि fresh fruit विशेषकरून मेलन किंवा ऑरेंज .....
ऑम्लेट आणि वारूणी ( असंच लिहीतात ना?), अब्रम्हण्यम... चॉलबे नाय, किंवा तत्सम कुठलेतरी शब्द वापरून निषेध. आम्ही अगदी कट्टर हो ( आता कट्टर काय ते बाकी विचारू नका ) :bigsmile:
लिहीण्याची श्टाईल आवडली बरं का....
तर मग कधी येउ आमच्या आवडीचे सगळे पदार्थ घालून केलेलं ऑम्लेट चाखायला?
तर मग कधी येउ आमच्या आवडीचे
कधीही या, फक्त तुमच्या चवीचं हवं असेल तर तुम्हालाच रांधावं लागेल याची तयारी ठेवा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होय होय, पूर्ण तयारी निशी
होय होय, पूर्ण तयारी निशी येउ... आणि आमच्या साठी आमच्याआवडीचं, तुम्च्यासाठी तुमच्या आवडीचं, तुमच्या आणखी आलेल्या मित्र मैत्रिणींच्या आवडीचं, शेजारी पाजारी आणि त्यांच्या देखिल मित्र-मैत्रिणिंच्या आवडीचं सगळ्यांना सगळं करून घालू हो....
आम्हाला स्वैपाक कराला फार आवडतो, म्हण्जे कसं की स्वैपाक करतांना आमची ब्रम्हानंदी लागते म्हणा .... ;;)
ऑलिव्ह ऑईल: नवीन माहिती
नुकतीच वाचनात आलेली माहिती म्हणजे, एक्स्ट्रॉ वर्जीन ऑलिव्ह ऑईल हे नेहमी सॅलॅड ड्रेसींगसारख्या गोष्टींकरता वापरावे, पदार्ध शिजवण्याकरता वापरू नये. http://www.whfoods.com/genpage.php?tname=george&dbid=56
मश्रूम्स् झाकण ठेऊन शिजवले असता खुपच पाणी सुटते. अंडी फेटून तव्यावर घातली, की मग मी त्यात थोड्या तेलावर परतून घेतलेल्या भाज्या घालते आणि सेट झालेले ऑम्लेट तव्यावरच दुमड्ते. ऑम्लेटच्या पोटातल्या भाज्यांचा खजीना खायला घेईपर्यंत गुप्त राहतो.
जाता जाता सांगावेसे वाटते, केवळ एखाद्याच फोटोचा विचार केला असता, तुमच्या फोन-अ-फ्रेंडचे अगदीच काही चुकले असे वाटत नाही.
ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवणं
http://www.teatronaturale.com/article/1769.html आणि http://www.oliveoilsource.com/page/heating-olive-oil इथे पाहिलं असता वेगळी माहिती मिळते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
असेच
अधिक तापमानावर करायच्या तळणासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरणे म्हणजे पैसे वाया घालवणे आहे. (चिंज यांनी ऑलिव्ह ऑइल विक्रेत्यांच्या संकेतस्थळाचा दुवा दिला होता. तो वाचला. गोलमटोल आहे.)
एखाद्या तळलेल्या पदार्थाला ए.व्ह.ऑ.ऑचा स्वाद हवा असेल, तर सुरुवातीचे "फ्लॅश" तळण वेगळ्या तेलात करावे (उदाहरणार्थ : रिफाइन्ड करडीचे तेल, किंवा रिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल), आणि कढईमधले तापमान कमी झाले की मग ए.व्ह.ऑ.ऑ. घालावे. भाज्या-अंडी वगैरे तव्या-कढईत पडल्यावर तापमान थोडे कमी होते. ए.व्ह.ऑ.ऑ. मधील स्वाद जळून जात नाही. हीच युक्ती लोण्याच्या स्वादासाठीसुद्धा वापरता येते.
आता हे खरे आहे : ए.व्ह.ऑ.ऑ मध्ये लसूण तळताना स्वयंपाकघरात जी काय मस्त दरवळ पसरते की आहाहा. हे तळण मंद आचेवर केलेलेच बरे. पाश्चिमात्य ऑमलेट हे नाहीतरी मंद आचेवर करायचे असते. (अंडी फेटतानाच बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर मिरच्या घालून केलेल्या पातळ अंड्यांच्या पोळ्या, यासुद्धा छान लागतात - हे भारतीय आम्लेट करताना तापमान थोडे अधिक असते.) म्हणून पाश्चिमात्य ऑम्लेट करताना ए.व्ह.ऑ.ऑ वापरलेले चालेल असे वाटते.
फ्रेंच/अमेरिकन फरक?
मी खरं तर ते इथे आणि इथे पाहिलं होतं; पण दुवे देताना इंग्लिशमधले दिले. असो. फ्रेंच विकीपीडिआच्या दुव्यांनुसार तळणाचं तापमान १५०-१८०० सेल्सिअस असतं तर ऑलिव्ह ऑईलचा स्मोकिंग पॉइंट १९०-२१० ० सेल्सिअस असतो. मला हे योग्य वाटलं कारण मी अनेकदा १५०-१७५०ला पदार्थ खरपूस होताना पाहतो. तर मग कशावर विश्वास ठेवावा?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वेगवेगळ्या तापमानांवर वेगवेगळ्या प्रकारचे तळण
खाद्याचा अगदी वरचा पापुद्रा करपून सील करून आतला भाग आतल्याच वाफेने शिजवायचा असेल, तर तेलाचे तापमान जास्त असावे. १५० डिग्रीमध्ये तळून खाद्य खरपूस केल्यास वेगळा परिणाम होतो - म्हणजे खरपूस होईस्तोवर वाफ उडून जाते. हेसुद्धा कधी हवे असते.
अतिशय उष्ण तापमानावर तळण्याला "फ्लॅश" म्हणतात.
भारतीय फोडणी करतो ते तापमान खूपच उष्ण असते. त्याच प्रमाणे चिनी स्टर-फ्राय सुद्धा "फ्लॅश" प्रकारे तळायचे असते.
काही का असेना. स्पॅनिश ऑमलेट - कुठलेही पाश्चिमात्य ऑमलेट - मंद आचेवर करायचे असते. म्हणून ए. व्ह. ऑ. ऑ. चालेल.
स्पॅनिश सोडून इतर काय
स्पॅनिश सोडून इतर काय प्रकारची पाश्चिमात्य आमलेटं असतात?
साधारणातः तव्यावर भाजण्याचे पदार्थ, पोळी, डोसे, घावन, उत्तप्पे, पॅनकेक, इ. तव्यावर टाकताना तवा चांगलाच गरम असेल याची काळजी घ्यावी लागते. आमलेटांच्या बाबतीत हा नियम नाही का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
म्हणजे फ्रेंच, अमेरिकन, वगैरे प्रकारची अॅम्लेटे
वर दिलेल्या स्पॅनिश पाककृतीला तांत्रिकदृष्ट्या "तोर्तिया" म्हणतात. (स्पेनमध्ये "तोर्तिया" म्हणजे वरील पाककृती. मेक्सिकोमध्ये "तोर्तिया" म्हणजे मक्याची किंवा मैद्याची पोळी.) स्पॅनिश लोकसुद्धा फक्त-अंड्यांचे ऑम्लेट बनवतात म्हणा. त्याला स्पेनमध्ये "तोर्तिया फ्रान्सेसा" म्हणतात.
ऑमलेटांचे प्रादेशिक भेद असतात (विकिपेडिया दुवा).
अंदी हलकी होईपर्यंत फेटली, आणि त्याचे ऑमलेट टाकले, तर तवा मध्यम आचेवर हवा. फार गरम नको. पाश्चिमात्य ऑम्लेटे भाजायची नसतात. त्यांच्यावर तपकिरी ठिपके नकोत. तव्यावर "सेट" होईस्तोवर ऑम्लेट शिजवायचे असते. अपेक्षित स्वाद हवा असेल, तर ऑम्लेट अती शिजवायलाही नको. सेट व्हावे=अंडे द्रव राहाता कामा नये, पण पाणी उडून पापुद्रे राठ व्हायला नको.
आता अंडे सेट होण्याचे तापमान साधारण ६८-७० डिग्री इतके असते. पण तवा तितकाच गरम असला, तर चालत नाही. कारण अंड्याचे विशिष्ट गुरुत्व हे तव्याला लावलेल्या तेला-लोण्याच्या पेक्षा अधिक असते. अंडे सेट होण्यापूर्वी ते तेलातून खाली पोचून तव्याला - धातूला - चिकटेल. त्यामुळे तापमन इतपत अधिक असावे, की तव्याच्या बाजूचा पातळ वॉटरप्रूफ पापुद्रा तयार व्हावा. मग ऑमलेट सेट होईपर्यंत ते तव्याला चिकटत नाही. म्हणून तेल किंवा लोणी फक्त "पाण्याचा थेंब सिझल होईल इतपत" गरम करावे.
ऑ.ऑ.चे अतिरिक्त कौमार्य
किंचित अवांतर - ह्या विषयाच्या शुद्धाशुद्धतेबद्दल अलीकडेच एनपीआरवर ऐकलेली मुलाखत आठवली - http://www.npr.org/2011/12/12/143154180/losing-virginity-olive-oils-scan...
'फ्रिजमध्ये जे असेल ते' पासून 'जे काही करता येईल ते'
लेख वाचून आमच्या विद्यार्थी दशेची आठवण झाली. काहीतरी खायला करणं म्हणजे जिवावर येत असे. त्यात बाहेर मरणाची थंडी. खिशात फार पैसे नाहीत, त्यामुळे आयतं, किंवा काल रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यातलं उरलेलं वगैरे फारच कमी वेळा असायचं. मग अशा वेळी खायचं काय, असा प्रश्नाने फ्रिज खायला उठत असे. मग 'फ्रिजमध्ये जे असेल ते' पासून 'जे काही करता येईल ते' अशा पाककृती सुचत असत. कालच्या खिचडीत सॉसेजचे तुकडे, थोडं चीज, शेव, कांदा, टोमॅटो आणि परवापासून फ्रिजमध्ये पडलेला उकडलेला अर्धा बटाटा यापासून भेळ तयार व्हायची. किंवा नाचो चिप्सवर चीज, कॅनमधलं बेबी कॉर्न, हल्यापिनो मिरच्या किंवा त्या नसतील तर हाताला येईल ते तिखट सॉस, वगैरे दहीभाताबरोबर खायचं आणि डेझर्ट म्हणून शिकरण विथ आइसक्रीम वगैरे प्रकार व्हायचे.
आमच्या काही मित्रांनी यापेक्षा अघोरी प्रकार करून बघितलेले आहेत. घरात दूध नसलं तर एक गडी सीरियलमध्ये ऑरेंज ज्यूस घालून कधी कधी खायचा. एकदा त्याच्याकडे दोन्ही नव्हते. तर या प्राण्याने कोक घालून सीरियल खाल्लं. नंतर त्याविषयी सांगताना तो म्हणाला होता, 'वाईट लागतं.' आम्हीदेखील त्यावर चटदिशी विश्वास ठेवला.
मस्तय...
फंडू डीश ... बनवणार...
- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!
हायला अदितीने चक्क पाकृमधे
हायला अदितीने चक्क पाकृमधे वेँट्री घेतली
मस्तय हे आँम्लेट
वीकांतास करुन पाहीन
.
पाककृतीमधे अंडं असल्याने
पाककृतीमधे अंडं असल्याने भटांस चालायचे नाही. त्यामुळे पास.
बटाटे
स्पॅनिश ऑमलेट मधे एरवी बटाटे असतात ना? का तो वेगळाच कॉंटिनेंटल प्रकार?
बटाटे
हो असं अनेकदा दिसतं खरं. मी पाहिलेल्या काही पाककृतींमध्ये भरपूर बटाटे होते; जालावर मिळालेली काही चित्रंही तेच दाखवतात; पण हा नियम भरपूर बटाटे वापरण्याचा नसून घरात आहेत त्या भाज्या वापरण्याचा युरोपिअन परिणाम असावा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा हा
बघितलं जंतूंनी दिलेल्या चित्रातही त्यांना अखंड आम्लेट उलटता आलेलं नाहिये..
अदिती, कळ्ळं का असं अख्ख उलटता नाहि आलं की त्याला काड्या लावायच्या! फार तर त्याला ||आम्लेट|| म्हणावे का
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरे काय करणार, शेवटी आम्ही
अरे काय करणार, शेवटी आम्ही शाकाहारीच! भाज्या जास्त आणि अंडं कमी अशी आमची पाकृ म्हटल्यावर काय होणार. हरकत नाही, पुढच्या संस्थळावर "ब्राह्मणी भुर्जी" नावाखाली पाकृ खपवेन!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदित्ये...
वरच्या प्रतिसादातलं दुसरं चित्र आहे ना... तसं स्पॅनिश ऑम्लेट असतं. उगाच काहितरी घरातल्या उरल्या-सुरल्या भाज्यांवर अंडी ओतून त्याला स्पॅनिश ऑम्लेट म्हणत नाहीत.
मनातल्या मनातः या अमेरिकन लोकांना युरोपियन ओरिजिनॅलिटी कधी कळणार कुणास ठाऊक
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
ओ बाई, हवंतर घाटी म्हणा पण
ओ बाई, हवंतर घाटी म्हणा पण अमेरिकन म्हणू नका.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धनंजय यांच्याशी सहमत!
ऑलिव्ह तेलाच्या बाबतीत ते तेल कुठल्या जातीच्या ओलिव्ह् पासून बनवलं आहे, कुठल्या प्रकारे बनवलं आहे, किती शुद्ध आहे यावर त्याचा स्मोकींग पॉईंट आवलंबून आहे, त्यामुळे मीही धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे, नेहेमीच्या वापरातल्या तेलात पदार्थ शिजवून, वरून ऑलिव्ह ऑईल घालते. अर्थातच जर ते ए. व. ऑ. ऑ नसेल, तर एवढा विचार करण्याची गरज नसावी.
शिवाय आवडतात म्हणून बर्याचदा(विशेषतः इटॅलियन पदार्थात) मी ऑलिव्हचे कापही घालत असते.
खरं आहे.
खरं आहे. तेलात वापरलेले सर्वच ऑलिव्ह एक्स्ट्रा व्हर्जिन नसतील, तेलासाठी पिळले जाण्यापूर्वी काही ऑलिव्हनी इतरांना 'Olive you' म्हणून घेतले असेल तर तेल तितकेसे एक्स्ट्रा व्हर्जिन रहात नाही.
खाल्ल्या मिठाला जागून....
खाल्ल्या मिठाला जागून.... पाकृ आवडलेली आहे.
बिपिन कार्यकर्ते
<< खाल्ल्या मिठाला जागून
<< खाल्ल्या मिठाला जागून >>
आरे आरे आरे
लेखिकेच्या पहिल्या ( धाग्यात ज्याचा उल्लेख आला आहे तो अशा अर्थाने) मित्राला दुधाळ का असे ना पण चहा, श्रामोंना काहीतरी ( पदार्थ ) मिळाला होता.... तुम्हाला लेखिकेकडे , लेखिकेच्या हातचं मीठच मिळालं... आरे आरे आरे....
कृहघेहेवेसांनल........
हातचं मीठ मिळालं.... खायला खायला ..म्हणायचं होतं
अगो, ज्याची त्याची जाण आणि
अगो, ज्याची त्याची जाण आणि जीभ! श्रामोंनीतर तक्रार करूच नये, तोंडावर त्यांनी मला निदान पोहे आणि कॉफीही चांगली झाल्याचं सांगितलं होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय करणार?
चांगलं झाल्याचं (खोटं का होईना) न सांगून जाताय कुठे??
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
तोंडावर सांगितलं ना! ह्म्म मग
तोंडावर सांगितलं ना! ह्म्म मग समजु शकतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अदिती खुष हुई!
अदिती खुष हुई!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.