पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः

अवयावांना अंग असा उल्लेख येतो. बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भागास अंक म्हणतात. ( संदर्भ). पंखड़ी असा शब्द हिंदीत फुलाच्या पाकळी साठी वापरला जातो पंकज हा शब्द विशीष्ट फुलासाठी वापरला जातो. पंकज हे फुल चिखलात/दलदलीत उगवत म्हणून पंक म्हणजे चिखल अथवा दलदल अशास्वरूपाची व्युत्पत्ती वाचण्यात येते पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.

नदीत गाळ इत्यादी साचून जमीनीचा भाग टोक पुढे जाते (नदी मागे सरकते) यास हिंदीत पाँग असा शब्द आहे (संदर्भ). पाक हा शब्द अन्न शिजवणे (पिक,पक्व असा उत्पत्ती क्रम असल्यास कल्पना नाही. स्वयंपाक मधला पाक हा पच् धातूवरून आलेला आहे. त्याचे कर्मणि भू.धा.वि. पक्व असे होते. मूळ अर्थ शिजवणे,हिंदीत पकाना. अनुषंगाने आलेला म्हणजे जठराग्नीने शिजवणे, मऊ करणे, पचवणे. त्यावरून पुढे दु:ख पचवणे, विष पचवणे वगैरे. अशी माहिती मिपा धाग्यात सदस्य राही यांनी दिली.) आणि इतर भाषेत पवित्र या अर्थानेही येतो.

एवढेच नाही मराठी व हिंदीत पाख आणि पाखी हे शब्द आहेत जे पंख अथवा पाकळी सदृश्य गोष्टींना सुद्धा वापरले जाताना दिसतात. मराठीत धान्य पाखडणे या शब्दाचीही आठवणे येते. मराठीत एकपाखी घर म्हणजे एक उतरते छत असलेले घर, दुपाखी म्हणजे दोनबाजूनी उतरती छते असलेली घरे चौपाखी म्हणजे चार बाजूनी उतरते छत असलेली घरे. (संदर्भ मोल्सवर्थ).

मराठीतला 'पाकोळी' हा शब्द आठवतो का ? पुर्वी मला या शब्दाचा कोळी (कातीण) या शब्दाशी संबंध असेल असे का कोण जाणे वाटायचे पण पंखेरू/पाखरू हा शब्द आणि पाख पाखी या मराठी/हिंदी शब्दांकडे बघीतले की पाकोळी शब्दातील 'पाक' हा त्याच्या पंखांबद्दल आहे असे वाटते. मग पक्षी>पंछी या शब्दांच्या उत्पत्तीचा स्रोत नजरे समोर येतो. पाक/पाख हा शब्द नुसता वापरला जात असेल तेव्हा कदाचीत त्याचा अर्थ दोन भागांपैकी एक भाग असाही होत असेल. कृ. पां. कुलकरणीलिखित आणि श्रीपद जोशी यांजकडून सुधारित मराठी व्युत्पत्तीकोशात. पक्ष म्हणजे पंख, त्यावरून पक्षिन् म्हणजे पंख असलेला; पक्ष म्हणजे बाजू, त्यावरून हा पक्ष, तो पक्ष, (महिन्याचा) काळा पक्ष-शुक्ल पक्ष, वगैरे. किंवा पूर्वपक्ष-उत्तरपक्ष; छपराच्या दोन बाजू म्हणजे दोन पक्ष,पाख इ. माहिती उपलब्ध आहे. (संदर्भ:मिपाधाग्यावरील राही यांचा प्रतिसाद )

भारतीय कालगणनेत महिन्याच्या (मास) पंधरवड्यांना पक्ष असा शब्द येतो जसे कृष्णपक्ष शुक्लपक्ष इत्यादी पण हा पक्ष शब्दाचा ऋग्वेदात एकच उल्लेख आढळला पण यात पक्ष शब्द कोणत्या अर्थाने येतो आहे ते मला माहित नाही.

युजानो हरिता रथे भूरि त्वष्टेह राजति ।
को विश्वाहा द्विषतः पक्ष आसत उतासीनेषु सूरिषु ॥१९॥
- ऋग्वेद: सूक्तं ६.४७


(अनुषंगिक अवांतरः ऋग्वेदात चंद्र=सोम आणि त्याचे लहान होत जाणे याची कदाचीत नोंद असावी अत्री ऋषी कदाचीत सुर्यग्रहणांची वगैरे त्या काळात निरीक्षणे करत असावेत; नंतरच्या एतरीय ब्राह्मणात पक्ष हा शब्द जास्त वेळा पाहवयास मिळतो व रामायणातही आढळतो असे दिसते.)

मराठीत पक्ष आणि हिंदीत पाख हे शब्द पंधरवडा म्हणजे महिन्याचा एक भाग या अर्थाने रूळल्याचे दिसते.

ऋग्वेदात पाक हा शब्द दिसतो तो कोणत्या अर्थाने येतो ते माहीत नाही (ऋग्वेदात वर्ष आणि युग या संकल्पनांचा उल्लेख येत असलातरी महिन्यांच्या नावांचे उल्लेख कमी आहेत असे वाचून आहे)

*पाकः पृच्छामि मनसाविजानन्देवानामेना निहिता पदानि ।
वत्से बष्कयेऽधि सप्त तन्तून्वि तत्निरे कवय ओतवा उ ॥५॥ - ऋग्वेद: सूक्तं १.१६४

http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/ या वेबसाईटवर पर्छामि असं रुप दिलय

पाकः पर्छामि मनसाविजानन देवानामेना निहिता पदानि

पाकः चा अर्थ त्यांनी Unripe असा केलेला दिसतो आहे Unripe in mind, in spirit undiscerning, I ask of these the Gods established places; - See more at: http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/#sthash.ahpti1dy.dpuf पण Unripe पाकः च्या विरुद्धार्थी वाटतो म्हणून साशंकता वाटते आहे.

*स्वयं यजस्व दिवि देव देवान्किं ते पाकः कृणवदप्रचेताः ।
यथायज ऋतुभिर्देव देवानेवा यजस्व तन्वं सुजात ॥६॥ -ऋग्वेद: सूक्तं १०.७

सवयं यजस्व दिवि देव देवान किं ते पाकः कर्णवदप्रचेताः |

Worship, thyself, O God, the Gods in heaven: what, void of knowledge, shall the fool avail thee?
- संदर्भ: http://www.ancientvedas.com/chapter/10/book/7/#sthash.oPKPMJeu.dpuf असा भावार्थ या दुव्यावर आढळला पण त्यातून पाकः शब्दाचा नेमका कोणता अर्थ ध्वनीत होतो ते लक्षात येत नाही.

असे पाकः या शब्दाचे दोन उल्लेख मला ऋग्वेदाबद्दलच्या आंतरजालीय शोधात आढळले. संस्कृत जाणकारांकडून पाकः हा शब्द ऋग्वेदात कोणत्या अर्थाने येतो आहे हे माहिती करून हवे आहे. अर्थात हि माहिती सर्व साधारण उत्सुकता म्हणून हवी आहे.

धागा लेख काढण्या मागचा मुख्य उद्देश मात्र जरासा वेगळा होता इतर काही शोध घेताना मी योगा योगाने मराठीतील पाख आणि पाखी या शब्दांपर्यंत पोहोचलो. मला जुन्या/प्राचीन मराठी साहित्यातीलतील पाक / पाख आणि पाखी या शब्दांचा अंतर्भाव असलेले लेखन अंश हवे आहेत (सहज कल्पना असल्यास ते कोणत्या अर्थाने येतात या सहीत). सध्या खाप्रे डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे एकतर आपणास ठाऊक असलेल्या शब्द वापरावर अधारीत अथवा संत साहित्य इत्यादी जुन्या साहित्यावर आधारीत माहिती देण्यातील सहकार्यासाठी जाणकारांचा मी आभारी असेन.

* संस्कृत अथवा ऋग्वेदीय उल्लेखांत त्रुटी (मी विषयाचा संस्कृतचा अभ्यासक नसल्यानुळे त्या तशा असू शकतात) असल्यास चु.भू.दे.घे.
* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून, मी विनंती करेन तशा विकी प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.
* ह्याच विषयावर मिपावर आधी धागा काढला असून त्यात संदर्भ नोंदले आहेत ते इकडेही सवडीने नोंदवेन. माहिती हवी असल्यामुळे मिपावर धागा असतानाही इकडे सुद्धा काढण्याचा प्रपंच करतो आहे काही जणांसाठी हि पुर्नावृत्ती असेल म्हणुन क्षमस्व.
* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

<पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.>

असे जड जायचे काहीच कारण नाही. पंख, पंखा, पंखडी ह्या सर्वांचे मूळ 'पक्ष' मध्ये आहे. मोनिअर विल्यम्समध्ये 'पक्ष्' (१ आणि १० प.) असा धातु देवनागरी लिपीमध्ये दर्शवून त्याचा एक अर्थ to take part or side असा दर्शविला आहे. त्याच्याखाली लगेचच 'paksha' हा शब्द रोमन लिपीत दाखवून त्याचा अर्थ wing असा दाखविला आहे. मोनिअर विल्यम्सच्या मांडणीनुसार 'paksha' हा 'पक्ष्' ह्याच्याशी संबंधित आहे. पक्ष असलेला तो पक्षिन् असा इन्नन्त शब्द तयार होतो. त्यापासून मराठी आणि अन्य भाषांमध्ये पक्षी, पंख, पंखा असे शब्द मिळतात. 'पंक' ह्याचे मूळ 'पच्' ह्या धातूकडे जातो. ह्याचे दोन अर्थ - एक म्हणजे शिजणे, ज्यावरून 'पाक' शब्द तयार होतो आणि दुसरा अर्थ 'पसरणे' ज्यावरून 'पंक', 'प्रपंच' असे शब्द तयार होतात. अशा रीतीने भिन्न स्रोतांपासून हे शब्द झालेले आहेत.

आता वेदातील 'पाक'. माझा वेदातील संस्कृतचा काहीहि अभ्यास नाही तरीहि जालावरून मिळालेली माहिती देतो.

ऋग्वेदातील तुम्ही दर्शविलेली मं.१, सू.१६, ऋक् ५ अशी आहे:

ह्याचा अन्वयः मनसा (=चेतसा) अविजानन् (=अजानन्) पाक: (=मूढमति:) (अहं) देवानां (+इन्द्रादीनां) एना (+एतानि प्रसिद्ध्या स्तूयमानानि) निहिता पदानि (=निहितानि पदानि = निगूढानि स्वरूपानि) पृच्छामि (= किंरूपाणि कीदृशानि चेति पृच्छामि)। वष्कये वत्से अधि (=एकसंवत्सरे वत्से आदित्यरूपे) कवय: (+ऋष्यादय:) ओतवा उ (=ओतवे खलु = वेतुं खलु = यज्ञं निर्मातुं) सप्त तन्तून् वि तत्निरे (=वितन्वन्ति = आदित्यमुद्दिश्य यज्ञं कुर्वन्ति यत्तस्य किं तत्त्वमिति पृच्छामि)॥

ह्याचा मराठी अर्थ शब्दश: - मूढ असा जो मी, तो आपल्या बुद्धीने अजाणता असल्यामुळे देवांची (जी) ही गुप्त स्वरूपे, (त्यां)विषयी विचारतो. एक वर्षाच्या वत्साच्या अंगावर कविजन (वस्त्र) विणण्यासाठी सात तंतु ताणीत असतात.

ह्याचे स्पष्टीकरणः - ह्या मन्त्रात ऋषि आपले अज्ञान मान्य करून म्हणतो: "देवांस जर अनेक रीतीनी स्तुति करून उपासक जन भजतात. पण देव म्हणजे काय, ते कसे असतात, त्यांचे स्वरूप काय हे समजत नाही कारण ते सर्व गुह्य आहे. उदा. आदित्याला एक वर्षाचा पाडा समजून त्याला अनुलक्षून यज्ञ करतात ह्याचा अर्थ काय? आदित्य देव कोण? इत्यादि मला मंदमतीला कळत नाही, ह्यासाठी मी प्रश्न करतो.

(वत्से वष्कये = एक वर्षाच्या वत्साच्या अंगावर, नित्य एक वर्षाचा तरुण दिसणारा जो सूर्य, त्याला यजनीय देव मानून.
सप्त तन्तून् वि तत्निरे ओतवे = वस्त्र विणण्यास सात तन्तु ताणीत असतात. ’तन्तु ताणणे म्हणजे म्हणजे यज्ञ करणे अथवा यज्ञाची सिद्धता करणे असे रूपक करण्याची वेदांमध्ये चाल आहे. पहा मं.१, सू.१४२)

येथे 'पाक' ह्याचा अर्थ 'मूढमति' असा दाखविला आहे.

हा शब्द दुसर्‍यांदा ऋग्वेदात मं.१०, सू.७, ऋक् ६ येथे असा येतो:

स्वयं यजस्व दिवि देव देवान्किं ते पाकः कृणवदप्रचेताः ।

Worship, thyself, O God, the Gods in heaven: what, void of knowledge, shall the fool avail thee? येथेहि 'पाक' ह्याचा अर्थ 'void of knowledge' (मूढमति) असा करण्यात आला आहे.

तुमचा तिसरा प्रश्न म्हणजे जुन्या/प्राचीन मराठी साहित्यातील पाक / पाख आणि पाखी या शब्दांचा अंतर्भाव असलेले लेखन अंश हवे आहेत, ह्या सन्दर्भात तुळपुळे-फेल्डहाउस ह्यांच्या जुन्या मराठीच्या शब्दकोशात मला खालील उतारे सापडले

पाक (pāka) [Sk.] 1 m. शिजवलेले अन्न; cooked food. पाक करी ते नानाविधापरी DP. 48; इंद्रियरुचीसारिखे । करविती पाक निके Jñā. 3.129; श्वपचाचिये घरिचा पाकु । जऱ्हि जाला अपाड रसिकु । तथापि सदाचार लोकु । तयासि नातळेचि कीं VS. 1.2. 2 adj. परिपक्व; ripe. उहां कवणु काचा, कवणु पाका Cau. 9. 3 m. गूळपाण्याचे चुलीवर ठेवलेले आधण; a boiling mixture of water and jaggery. चुलीवरी पाकु ठेविला: तंव पाकु लांघला LP. 407

पाख/पांख (pākha/pã̄kha) m. [Sk. pakṣa/cf. pakṣa] 1 पंख; a wing. चिंतीतचिंतितां तीएसीही पाख निगति LP. 215; DṛP. 96; (साळोंकीएचा) पाख LP. 281; अपक्षा पाख देसी LU. 35; मासी पांख पाखडी । तंव हें सरे Jñā. 13.1098; पांखेंविण होय आळिय Jñā. 880; पाख फाडकरुनि ठेला उभा RS. 169; (पर्वत) इंद्राभेण पाखींसीं पळाले RS. 790; पाखीं झाडपितें: कपोतीं खेळतें: देखिलीं तेणें UG. 319; पांखाचेनि फडात्कारें । पक्षी नभीं संचरे VS. 1.108. 2 पंधरवडा; one half of a lunar month. मासोपवासू...पाखू यकू केला LP. 330; हें तुम्हां पाखापाखा भेटैल LU. 79; पाखां एकां अनुसरों LU. 525; पाखाआरुतें अवस्थान जालें SP. 36

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरती दिलेली माहिती चांगली आहे, त्याला पुरवणी :
पाक म्हणजे मूल (आणि लाक्षणिक अर्थ अल्पमति) याची व्युत्पत्ती वेगळी आणि पाक म्हणजे शिजवलेले याची व्युत्पत्ती वेगळी.

पाक (धातु पा पाने = पिणे, उणादि प्रत्ययाने झालेले रूप) म्हणजे (दूध-)पिते(-मूल) किंवा पा-धातु पालन/रक्षण करणे या अर्थी, पालन-करण्यालायक मूल वा अर्भक (लाक्षणिक अर्थ १ - बालबुद्धीचा व्यक्ती ; लाक्षणिक अर्थ २ - बालकासारखा निरागस निष्पाप). हा शब्द आद्युदात्त आहे, म्हणजे याच्या पहिल्या अक्षरावर आघात येतो. या शब्दापासून बालक अर्थाने मराठीत तत्सम किंवा तद्भव शब्द प्रचलित नाही. मराठीत "पवित्र" अर्थाने हा "पाक" शब्द उपलब्ध आहे, तो वैदिक संस्कृतातून, असे मत द. ह. अग्निहोत्र्यांच्या मराठी कोशात दिलेले आहे. परंतु मराठीतला अर्थ फारसी "पाक"च्या निकट जातो, म्हणून तिथून आला असावा, असे माझे मत आहे. (आता फारसी आणि संस्कृत यांची जननी वा आजी एकच आहे खरी. परंतु मराठीतला अर्थ फारसीजवळचा आहे, वैदिक संस्कृतापेक्षा काहीसा लांब आहे.)
पा (धातु पच् = शिजवणे, त्याला पाणिनीय घञ् प्रत्यय) म्हणजे शिजवलेले अन्न. हा शब्द अन्तोदात्त आहे, म्हणजे याच्या शेवटच्या अक्षरावर आघात येतो.

वरील दोहाँत जो स्वराघाताचा फरक आहे, तो मराठीकरिता नि:संदर्भ आहे. मराठीत अन्त्य 'अ'कार निभृत/लुप्त होतो, आघात उरलेल्या एका "पा" स्वरावर राहातो.

(वरील संस्कृतातील माहितीकरिता स्रोत : अमरकोशाची रामाश्रमी टीका, मोनिएर विल्यम्सचा संस्कृत-इंग्रजी कोश आणि अष्टाध्यायीवरची काशिका व्याख्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपणा दोघांच्याही प्रतिसादातून एकदम नवी आणि रोचक माहिती मिळते आहे.

अरविंद कोल्हटकर यांनी दिलेली माहिती

'पंक' ........... आणि दुसरा अर्थ 'पसरणे'

हा पसरणे या अर्थाची कल्पना नव्हती आणि तसे सुचले नाही.

पाक: (=मूढमति:)

या बद्दलही आजीबात माहित नव्हते. धनंजय यांनी दिलेली पाक म्हणजे मूल (आणि लाक्षणिक अर्थ अल्पमति) हि माहिती इथे लक्षात घेता येते असे दिसते. मग http://www.ancientvedas.com येथील "Unripe in mind" या अनुवादातही तसेच मुढमती अथवा अल्पमती हाच अर्थ ध्वनीत करावयाचा असावा असे दिसते. एकुण मी शोधात असलेल्या पाख / पाखी शब्दांशी संबंध असण्याची शक्यता 'ना के बराबर' असे म्हणू शकतो असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.